“आम्ही आमचे कर्तव्य केले आहे”
जॉर्ज काऊच यांनी कथित केल्याप्रमाणे
सकाळी क्षेत्र सेवा केल्यानंतर माझ्या सोबत्यानं दोन सँडविचेस काढले. ते खाऊन झाल्यावर मी एक सिग्रेट काढली. त्यानं मला विचारलं, “तू किती वर्षांपासून सत्यात आहेस?” त्यावर मी उत्तर दिलं, “काल रात्री, पहिल्यांदाच मी सभेला उपस्थित राहिलो होतो.”
मार्च ३, १९१७ रोजी, एव्हनमोर नामक एका लहानशा नगरापाशी व पिट्सबर्ग, पेन्सिल्व्हेनिया, अमेरिकेपासून ५० किलोमीटर पूर्वेकडे असलेल्या एका शेतमळ्यावर माझा जन्म झाला होता. तिथंच मी, माझे चार भाऊ आणि एक बहीण लहानाचे मोठे झालो.
आमच्यावर फारसे धार्मिक संस्कार झालेले नव्हते. कधीकाळी माझे आईबाबा चर्चला जात होते पण आम्ही मुलं लहान असतानाच त्यांनी तेही सोडून दिलं होतं. पण, तरीही एक सृष्टिकर्ता असल्याचा आमचा विश्वास होता आणि आमच्या कौटुंबिक जीवनात बायबलची मूलभूत तत्त्वं आम्ही पाळत होतो.
मला आईबाबांकडून मिळालेलं सगळ्यात उत्तम प्रशिक्षण जबाबदारीसंबंधी होते—ती स्वीकारणे आणि पूर्ण करणे. नेमकं हेच तर शेतमळ्यावरील आमचं जीवन होतं. पण, फक्त काम-काम अशातलं आमचं जीवन नव्हतं. बास्केटबॉल आणि बेसबॉल खेळणं, घोड्यावरून रपेट मारणं आणि पोहणं अशा हितकर करमणुकीची मौज आम्ही लुटत असू. त्याकाळी फारसा पैसा नव्हता तरी शेतमळ्यावर आम्ही खाऊनपिऊन सुखी होतो. प्राथमिक शाळेत असताना आम्ही एका खोलीच्या शाळेत जात होतो; पुढे माध्यमिक शाळेत शिकत असताना आम्ही नगरातील शाळेत जाऊ लागलो.
एकदा रात्री मी आणि माझा एक मित्र नगरातून फेरफटका मारत होतो. तेव्हा एक सुंदर तरुणी माझ्या मित्राला भेटण्यासाठी आपल्या घरातून बाहेर आली. फर्न प्रू नामक या मुलीशी माझ्या मित्रानं माझी ओळख करून दिली. माझ्या माध्यमिक शाळेला जाण्याच्या रस्त्यावर ती राहत असल्यामुळे मला तर बरंच झालं. कित्येकदा तिच्या घरावरून जात असताना फर्न बाहेर आपली कामं उरकत असल्याचं मी पाहायचो. स्पष्टच होतं, की ती अतिशय मेहनती मुलगी होती आणि म्हणूनच ती माझ्या मनात बसली. आमची दाट मैत्री झाली, आम्ही एकमेकांत गुंतत गेलो आणि शेवटी एप्रिल १९३६ रोजी आमचा विवाह झाला.
बायबल सत्याशी परिचय
माझा जन्म होण्यापूर्वी एक वयस्कर स्त्री नगरात राहत होती; तिच्या धार्मिक विश्वासामुळे नगरातील लोक तिला जाचत होते. शनिवारच्या दिवशी बाजारहाट करण्यासाठी नगरात जाताना आई आवर्जून तिला भेटायला जायची. आई तिचं घर स्वच्छ करायची, तिला हवं नको ते पाहायची; अगदी शेवटपर्यंत आईनं तिच्यासाठी हे सर्व केलं. मला तरी असं वाटतं, की या स्त्रीला दाखवलेल्या चांगुलपणामुळेच यहोवानं आईला आशीर्वादित केलं होतं कारण ती स्त्री एक बायबल विद्यार्थी होती; त्याकाळी यहोवाच्या साक्षीदारांना याच नावानं संबोधलं जायचं.
याच्या काही काळानंतर अचानक माझ्या आत्याच्या मुलीचा मृत्यू झाला. चर्चनं आत्याचं इतकं काही सांत्वन केलं नाही पण बायबल विद्यार्थी असलेल्या एका शेजारणीनं मात्र तिचं खूप सांत्वन केलं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा नेमकं काय होतं याचं स्पष्टीकरण या बायबल विद्यार्थीनीनं तिला दिलं. (ईयोब १४:१३-१५; उपदेशक ९:५, १०) तिच्यासाठी सांत्वनाचा हा मोठा स्रोत होता. त्यानंतर माझ्या आत्यानं पुनरुत्थानाच्या आशेविषयी आईला सांगितलं. लहान वयातच आईचे पालक तिला पारखे झाले होते त्यामुळे आईची आस्था जागृत होऊन मृत्यूच्या वेळी नेमकं काय होतं हे जाणून घेण्यास ती उत्सुक झाली. या अनुभवामुळेच अनौपचारिकपणे साक्ष देण्याच्या संधींचा फायदा उचलण्याचं महत्त्व माझ्या मनावर बिंबवलं गेलं.
सन १९३० च्या दशकात दररोज सकाळी, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष जोसफ एफ. रदरफोर्डचा रेडिओवरून प्रक्षेपित होणारा कार्यक्रम आई ऐकू लागली. त्याच काळात आम्ही राहत असलेल्या ठिकाणी साक्षीदारांनी घरोघरचं कार्य सुरू केलं. आमच्या अंगणातील झाडाच्या सावलीत ते आपला पोर्टेबल फोनोग्राफ लावायचे आणि बंधू रदरफोर्डची रेकॉर्ड केलेली प्रवचने ऐकवायचे. या रेकॉर्डींगमुळे आणि त्यासोबतच टेहळणी बुरूज आणि गोल्डन एज (सध्या सावध राहा!) या नियतकालिकांमुळे आईची आस्था जिवंत राहिली.
काही वर्षांनंतर म्हणजे १९३८ साली प्रत्येक टेहळणी बुरूज वर्गणीदाराला एक पोस्टकार्ड पाठवून २५ किलोमीटर दूरवरील एका घरात आयोजित केलेल्या खास सभेचं निमंत्रण दिलं गेलं. आईला जायची इच्छा होती त्यामुळे मी, फर्न आणि माझे दोन भाऊ तिच्यासोबत गेलो. जॉन बूथ आणि चार्ल्स हेसलर या प्रवासी पर्यवेक्षकांनी उपस्थित असलेल्या डझनावारी लोकांसमोर भाषणे दिली. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी सकाळी सेवेत सहभाग घेण्यासाठी ते एका गटाची व्यवस्था करू लागले. त्यांच्यासोबत जाण्यासाठी कोणीही पुढं आलं नाही तेव्हा बंधू हेसलरनं माझी निवड केली आणि विचारलं, “आमच्यासोबत येण्यास तुला काही हरकत नाही ना?” ते नेमकं काय करणार होते हे मला माहीत नव्हतं, पण तरीही त्यांची मदत करण्यात मला खरंच कोणतीही अडचण नव्हती.
दुपार होईस्तोवर मी त्यांच्यासोबत घरोघर गेलो आणि मग बंधू हेसलरनं दोन सँडविचेस काढले. चर्चच्या पायऱ्यांवर बसून आम्ही ते खाऊ लागलो. मग सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, मी ती सिग्रेट काढली तेव्हा कुठं बंधू हेलसरला समजलं की मी केवळ एका सभेस उपस्थित राहिलो होतो. त्याच दिवशी संध्याकाळी जेवणासाठी ते आमच्या घरी येतील असं स्वतः सांगून एका बायबल चर्चेसाठी शेजाऱ्यांनाही आमंत्रित करण्यास त्यांनी सांगितलं. जेवण उरकल्यानंतर त्यांनी आमच्यासोबत बायबल अभ्यास केला आणि उपस्थित असलेल्या सुमारे दहा लोकांच्या गटासमोर एक भाषण दिलं. आम्ही प्रत्येक आठवडी असा बायबल अभ्यास करावा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आमच्या शेजाऱ्यांना ही गोष्ट रुचली नसली तरी मी आणि फर्ननं प्रत्येक आठवडी गृह बायबल अभ्यास करण्याचं ठरवलं.
सत्यातील प्रगती
यानंतर लवकरच, मी आणि फर्न क्षेत्र सेवेसाठी बाहेर पडलो. कारमध्ये आम्ही मागच्या सीटवर बसलो होतो; आम्ही नुकतीच आमची सिग्रेट शिलगावली आणि माझ्या भावानं मागे वळून आम्हाला सांगितलं: “आताच मला समजलं की यहोवाचे साक्षीदार धूम्रपान करत नाहीत.” फर्ननं पटकन आपली सिग्रेट खिडकीबाहेर टाकून दिली—मी मात्र माझी संपवून टाकली. धूम्रपान करण्यात आम्हाला एक आगळाच आनंद मिळत असला तरीही यानंतर आम्ही सिग्रेटला पुन्हा कधीच हात लावला नाही.
सन १९४० मध्ये आमचा बाप्तिस्मा झाला त्यानंतर मी आणि फर्न एका सभेत उपस्थित होतो; तिथं, पायनियरींग म्हटल्या जाणाऱ्या पूर्ण-वेळेच्या प्रचार कार्यात सहभाग घेण्याचं प्रोत्साहन देणारा लेख आम्ही अभ्यासला. घरी जाताना एका बांधवानं विचारलं: “तू आणि फर्न पायनियरींग का करत नाही? तुम्हाला तर काहीच अडचण नाही.” त्याचं म्हणणं मला मान्य होतं आणि या कार्यांसाठी आम्ही स्वतःला देऊ केलं. माझ्या नोकरीच्या ठिकाणी मी ३० दिवसांची नोटीस दिली आणि पायनियरींग करण्याच्या योजना आम्ही आखल्या.
कुठं सेवा करावी याविषयी वॉच टावर संस्थेशी बोलणी केल्यानंतर आम्ही बाल्टिमोर, मेरीलैंड इथं गेलो. तिथं पायनियरांसाठी एक निवासस्थान होतं आणि राहण्याचा-खाण्यापिण्याचा खर्च दरमहा १० डॉलर होता. आम्ही बचत केलेला थोडाफार पैसा आमच्याजवळ होता आणि इतका पैसा हर्मगिदोनापर्यंत सहज पुरेल असं आम्हाला वाटलं. (प्रकटीकरण १६:१४, १६) कारण तेव्हा आम्हाला असं वाटायचं, की हर्मगिदोन जणू ऊंबरठ्यावरच आहे; आणि ऊंबरठा ओलांडून आत यायला जास्त उशीर लागणार नाही. यास्तव, आम्ही पायनियर सेवा सुरू केली तेव्हा आम्ही आमचं घर विकून टाकलं आणि सगळं काही सोडून दिलं.
सन १९४२ ते १९४७ पर्यंत आम्ही बाल्टिमोरमध्ये पायनियर सेवा केली. त्या काळात यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याप्रती असलेला विरोध अगदी शिगेला पोहंचला होता. स्वतःच्या कारमधून आमच्या बायबल विद्यार्थ्यांच्या घरी जाण्याऐवजी काही वेळा आम्ही दुसऱ्यांच्या कारमधून जात असू. त्यामुळे आमचे कारचे टायर चिरले जायचे नाही. कोणालाही असा विरोध आवडत नाही, पण खरं सांगू आम्हाला नेहमीच क्षेत्र सेवा फार फार आवडली. खरं तर, प्रभुच्या कार्यात थोडासा धोका पत्करण्यातही मौज असल्यामुळे आम्ही आनंदानं त्याची अपेक्षा करत असू.
लवकरच आमच्यापाशी होता नव्हता तो सर्व पैसा संपला. आमच्या कारचे टायर तर झिजलेच पण त्यासोबत आमचे कपडे आणि आमच्या वहाणा देखील झिजल्या. दोनतीन प्रसंगी आजारपणामुळे आम्हाला कित्येक दिवस अंथरूणाला खिळावे लागले. पायनियरींग करत राहणं सोपं नव्हतं पण ते सोडून देण्याचा विचार आम्ही कधीच मनांत डोकावू दिला नाही. तसं करण्याचा शब्दही आमच्या तोंडून कधी फुटला नाही. पायनियर कार्यात टिकून राहता यावं म्हणून आम्ही एक अतिशय साधंसुधं जीवन जगू लागलो.
नेमणुकीतील बदल
सन १९४७ मध्ये आम्ही लॉस ॲन्जेलेस, कॅलिफोर्निया इथल्या अधिवेशनासाठी गेलो. तिथं, मंडळ्यांना भेटी देऊन त्यांना साह्य करण्यासाठी प्रवासी कार्यासाठी आमची नेमणूक करणारं एकएक पत्र मला आणि माझ्या भावाला अर्थात, व्हिल्यमला दिलं गेलं. त्याकाळी अशा कार्यासाठी कोणतंही खास स्वरूपाचं प्रशिक्षण दिलं जात नव्हतं. आम्ही एका पायावर ही नेमणूक स्वीकारली. पुढील सात वर्षांत मी आणि फर्ननं ओहियो, मिशिगन, इन्डियाना, इलिनॉइस आणि न्यूयॉर्क या ठिकाणी सेवा केली. सन १९५४ मध्ये आम्हाला २४ व्या गिलियड क्लासचं अर्थात मिशनऱ्यांना प्रशिक्षित करणाऱ्या प्रशालेस उपस्थित राहण्याचं आमंत्रण मिळालं. तिथं असताना फर्नला पोलियोची बाधा झाली. परंतु, आनंदाची गोष्ट म्हणजे ती त्यातून बरी झाली आणि मग न्यूयॉर्क तसेच कनेक्टीकेटमध्ये प्रवासी कार्य करण्यास आम्हाला नियुक्त केलं गेलं.
आम्ही स्टॅमफर्ड, कनेक्टीकेट इथं सेवा करत असताना वॉच टावर संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष नेथन एच. नॉर यांनी आम्हाला त्यांच्या आणि ऑड्री नामक त्यांच्या पत्नीसोबत बेथेलमध्ये तो सप्ताहांत घालवण्याचं निमंत्रण दिलं. त्यांच्या खोलीत त्यांनी आमच्यासाठी सजावट केलेले बीफस्टेक बनविले होते. यापूर्वीच बंधू नॉरशी आमची ओळख झाली होती; इतकंच नाही तर सहवास, भोजन यांशिवाय आणखीनही काहीतरी त्यांच्या मनात असल्याचं ताडण्याइतपत मी त्यांच्याशी परिचित झालो होतो. त्या दिवशी संध्याकाळी काही वेळानंतर त्यांनी मला विचारलं, “तुम्हाला बेथेलमध्ये यायला आवडेल का?”
यावर मी उत्तर दिलं: “मला सांगता येणार नाही; कारण बेथेल जीवनाविषयी मला जास्त काही माहीत नाही.”
अनेक दिवस याचा विचार केल्यानंतर आम्ही बंधू नॉरला कळवलं, की आमच्याबद्दल त्यांची तशी इच्छा असल्यास आम्ही यायला तयार आहोत. पुढच्याच आठवडी, एप्रिल २७, १९५७ रोजी म्हणजे आमच्या लग्नाच्या २१ व्या वाढदिवशी आम्ही बेथेलमध्ये रुजू व्हावं असं पत्र आम्हाला मिळालं.
बेथेलमधील पहिल्या दिवशी, आमच्याकडून अपेक्षिल्या जाणाऱ्या गोष्टींविषयीच्या सुस्पष्ट सूचना बंधू नॉर यांनी आम्हाला दिल्या. त्यांनी मला म्हटले: “तू आता काही विभागीय सेवक नाहीस. तू इथं बेथेलमध्ये काम करण्यासाठी आला आहेस. तुझं हे काम सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे आणि इथं बेथेलमध्ये तुला दिलं जाणारं प्रशिक्षण, कार्यात उतरवण्यासाठी तू आपला वेळ आणि शक्ती खर्ची घालावी अशी आमची इच्छा आहे. तू इथं राहावं अशी आमची इच्छा आहे.”
बेथेलमधील अर्थपूर्ण जीवन
माझी पहिली नेमणूक मॅग्झीन आणि मेलिंग डिपार्टमेंटमध्ये होती. नंतर, तब्बल तीन वर्षांनंतर बंधू नॉर यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. त्यांनी मला सांगितलं, की बेथेलगृहाचा कार्यभार उचलणं हे तुला बेथेलमध्ये आणण्याचं मुख्य कारण होतं. त्यांच्या सूचना अगदी थेट होत्या, “तू इथं बेथेलगृह चालवणार आहेस.”
बेथेलचं व्यवस्थापन पाहताना, मी शेतमळ्यावर लहानाचा मोठा होत असताना आईबाबांनी शिकवलेल्या धड्यांची मला आठवण झाली. बेथेलगृह बरंचसं एखाद्या सर्वसामान्य कुटुंबासारखं असतं. इथंही कपडे धुवावे लागतात, स्वयंपाक करावा लागतो, भांडी स्वच्छ करावी लागतात, बिछाना करावा लागतो आणि अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. गृह संघटन हे बेथेलला राहण्याजोगं एक सुखावह ठिकाण बनविण्याचा प्रयत्न करते ज्याला एखादी व्यक्ती स्वतःचं घर म्हणू शकते.
मला असं वाटतं, की बेथेलच्या कार्यातून कुटुंबे बरेच काही धडे घेऊ शकतात. आम्ही पहाटे लवकर उठतो आणि दैनंदिन बायबल वचनाची चर्चा करून आध्यात्मिक विचारांनिशी दिवसाची सुरवात करतो. आमच्याकडून, मेहनत करण्याची आणि संतुलित पण व्यस्त जीवन जगण्याची अपेक्षा केली जाते. काहींना वाटतं तसं बेथेल काही एक मठ नाही. आमच्या नियोजनबद्ध जीवनामुळे आम्ही पुष्कळ काही साध्य करतो. अनेकांनी असं म्हटलं आहे, की या ठिकाणी त्यांना लाभलेल्या प्रशिक्षणानं त्यांना आपल्या कुटुंबातील आणि ख्रिस्ती मंडळीतील जबाबदाऱ्या स्वीकारण्यास मदत केली आहे.
बेथेलमध्ये येणाऱ्या तरुण स्त्रीपुरुषांना कदाचित स्वच्छता, लॉन्ड्री किंवा फॅक्टरी या विभागांमध्ये काम करण्यास नियुक्त केलं जाईल. असं अंग-मेहनतीचं काम अप्रतिष्ठित आणि खालच्या दर्जाचं आहे असं जगाचे लोक आपल्याला भासवतील. पण तरीही, बेथेलमधील तरुणांना याची जाणीव होते, की अशा कार्यनियुक्त्या आपल्या कुटुंबाच्या योग्य कार्यवाहीसाठी आणि आनंदासाठी आवश्यक आहेत.
खरोखर आनंदी राहण्यासाठी तुम्हाला हुद्द्याची आणि प्रतिष्ठेची गरज आहे या विचारास जगीक लोक कदाचित खतपाणी घालतील. पण हे चुकीचं आहे. आपल्याला नेमून दिलेलं काम आपण करतो तेव्हा आपण ‘आपलं कर्तव्य करत असतो,’ आणि यहोवाचे आशीर्वाद आपल्याला लाभतात. (लूक १७:१०) आपल्या कार्याचा उद्देश—यहोवाची इच्छा पूर्ण करणं आणि राज्य हितांना बढावा देणं—आपण आठवणीत ठेवतो तेव्हा कुठं आपण खरोखर आनंदी आणि समाधानी राहू शकतो. हे लक्षात ठेवल्यास, कोणतीही नेमणूक आनंददायी आणि समाधानी असू शकते.
विस्तारात भाग घेण्याचा विशेषाधिकार
क्लीवलंड, ओहियोमधील १९४२ सालाच्या अधिवेशनात म्हणजे आम्ही बेथेलला यायच्या एका दशकापूर्वी बंधू नॉर यांनी एक भाषण दिलं होतं ज्याचं शीर्षक, “शांती—ती टिकू शकते का?” असं होतं. त्यांनी हे स्पष्ट केलं, की जोरदारपणे चालू असलेलं दुसरं महायुद्ध संपुष्टात येईल आणि मग शांतीचा काळ असेल; यामुळे मग विस्तारित प्रचार मोहिमेसाठी वाव मिळेल. १९४३ साली, मिशनऱ्यांना प्रशिक्षित करणारी गिलियड प्रशाला आणि बांधवांच्या जाहीर भाषणाच्या क्षमता सुधारण्यासाठी ईश्वरशासित सेवा प्रशाला सुरू करण्यात आली. मोठमोठी अधिवेशनंही संघटित केली गेली. खासकरून सन १९५० च्या दशकात यांकी स्टेडियम, न्यूयॉर्कमध्ये झालेली अधिवेशनं प्रमुख अशी अधिवेशनं होती. सन १९५० आणि १९५३ मध्ये तिथं झालेल्या अधिवेशनांच्या वेळी, प्रत्येकी आठ-आठ दिवसांच्या त्या अधिवेशनांसाठी हजारो लोकांच्या राहण्याच्या सोईकरता भव्यदिव्य ट्रेलर सिटीची व्यवस्था करण्याची सुसंधी मला लाभली.
या आणि १९५८ साली झालेल्या सगळ्यात मोठ्या अधिवेशनानंतर राज्य प्रचारकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. याचा बेथेलमधील आमच्या कार्यावर थेट परिणाम झाला. सन १९६० च्या दशकाच्या अखेरीस आणि १९७० च्या दशकाच्या सुरवातीस जागेअभावी कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या सोयी करणं अतिशय कठीण होतं. आमच्या वाढत्या कुटुंबाची राहण्याची सोय करण्यासाठी आम्हाला आणखीन बेडरूम्स, किचन आणि डायनिंग रूम्सची गरज होती.
विस्तार करण्यासाठी बंधू नॉर यांनी फॅक्टरी पर्यवेक्षक बंधू मॅक्स लार्सन यांना आणि मला एक योग्य जागा शोधण्यास सांगितलं. सन १९५७ मध्ये मी बेथेलला आलो तेव्हा ५०० सदस्यांचं आमचं कुटुंब केवळ एका मोठ्या निवासी इमारतीत राहात होतं. पण मग कालांतरानं, संस्थेनं जवळचे तीन मोठे हॉटेल्स—द टावर्स, द स्टॅन्डीश आणि द बॉसर्ट—तसेच अनेक लहानसहान इमारती विकत घेऊन त्यांचं नूतनीकरण केलं. सन १९८६ मध्ये हॉटेल मार्गरेट उभं होतं ती जागा विकत घेऊन तेथील सुंदर नवीन इमारतीचं, २५० लोकांना राहता येईल अशा निवास्थानात रूपांतर केलं गेलं. मग १९९० च्या दशकात, अतिरिक्त १,००० कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी ३० मजल्यांची एक इमारत बांधली गेली. आज ब्रुकलिन बेथेल, आमच्या कुटुंबातील ३,३०० पेक्षा अधिक लोकांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करू शकतं.
ब्रुकलिन बेथेलपासून जवळजवळ १६० किलोमीटर दूर असलेले वॉलकील, न्यूयॉर्क इथली जागा देखील विकत घेतली गेली. कालांतरानं म्हणजे १९६० च्या दशकाच्या अखेरीस या ठिकाणी निवासस्थाने आणि मोठा छापखाना उभारला गेला. आज, आमच्या बेथेल कुटुंबाचे सुमारे १,२०० सदस्य इथं राहून काम करतात. सन १९८० मध्ये, न्यूयॉर्क शहराच्या जवळपास आणि जिथून सहजासहजी हमरस्त्याला लागता येईल, अशी ६०० एकर जमीन शोधण्यास सुरवात झाली. स्थावर संपत्तीचा एजंट हसून म्हणाला: “अशी जमीन तुम्हाला कुठं मिळणार हो? शक्यच नाही.” पण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यानं फोन करून सांगितलं: “तुम्हाला हवी तशी जमीन मला मिळाली आहे.” आज पॅटरसन, न्यूयॉर्कमध्ये तिला वॉचटावर एज्युकेशनल सेंटर म्हणून ओळखलं जातं. तिथं प्रशाला चालवल्या जातात आणि १,३०० सेवकांहून अधिक लोक तिथं राहतात.
मी शिकलेले धडे
मी हे शिकलो, की एक चांगला पर्यवेक्षक तो असतो जो इतरांकडून मौल्यवान माहिती मिळवू शकतो. बेथेल पर्यवेक्षक या नात्यानं ज्या अधिकतर कल्पना अंमलात आणण्याचा विशेषाधिकार मला लाभला त्या सर्व मला इतरांकडून मिळाल्या आहेत.
मी बेथेलमध्ये आलो तेव्हा अधिकतर लोक, मी आज आहे तसे वयस्कर होते. त्यांच्यापैकी अधिकतर काळाच्या पडद्याआड झाले आहेत. जे वृद्ध होऊन मरतात त्यांची जागा कोण घेतं बरं? नेहमीच सगळ्यात सक्षम व्यक्ती ही जागा घेते असं नाही. तर जे विश्वासूपणे इथं कार्य करून स्वतःस देऊ करतात असे लोक ही जागा घेतात.
लक्षात ठेवण्याजोगी आणखीन एक बाब म्हणजे एका चांगल्या पत्नीचं मोल. माझ्या ईश्वरशासित नेमणुका पूर्ण करण्यात माझी प्रिय पत्नी फर्न हिच्या आधाराची मला मोठी मदत झाली. आपली पत्नी तिच्या नेमणुकीत खूष आहे की नाही याची खात्री करणं ही प्रत्येक पतीची जबाबदारी आहे. माझ्या आणि फर्नच्या आवडीच्या गोष्टी करण्याच्या योजना आखण्याचा मी प्रयत्न करतो. त्या फार महागड्या असण्याची गरज नाही; केवळ रोजच्या नित्यक्रमापेक्षा थोडेसं वेगळं असावं इतकंच. आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी खटपट करणं ही तिच्या पतीची जबाबदारी आहे. पती आपल्या पत्नीसोबत घालवतो ते क्षण अतिशय मोलाचे असून ते भर्रकन उडून जातात त्यामुळे त्यानं त्या क्षणांचा सर्वोत्तम उपयोग केला पाहिजे.
येशूनं सांगितलेल्या शेवटल्या दिवसांत मी जगत असल्याचा मला आनंद होतो. सबंध मानवी इतिहासातील हा सर्वात अद्भुत समय आहे. प्रतिज्ञा केलेल्या नवीन जगाची सुरवात करण्याची तयारी करण्यास प्रभू कशाप्रकारे आपली संघटना विस्तारित करत आहे हे आपण आपल्या विश्वासाच्या चक्षूंनी पाहू शकतो आणि समजू शकतो. यहोवाच्या सेवेत घालवलेल्या माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहताना मला दिसून येतं, की मनुष्य नव्हे तर खुद्द यहोवा त्याची संघटना चालवत आहे. आपण केवळ त्याचे सेवक आहोत. त्याअर्थी निर्देशनासाठी आपण नेहमी त्याच्याकडे पहावं. आपल्याला काय करायचं हे त्यानं एकदा स्पष्ट केल्यावर मग ते पूर्ण करण्यासाठी आपण त्वरित एकजुटीनं कार्य करावं.
यहोवाच्या संघटनेत स्वतःला झोकून द्या आणि एका अर्थपूर्ण, आनंदी जीवनाची शाश्वती तुम्हाला मिळेल. तुम्ही जे काही करत आहात—मग तुम्ही पायनियर कार्यात असा, विभागीय कार्यात असा, मंडळीत एक प्रचारक असा, बेथेल सेवक असा अथवा मिशनरी सेवक असा—दिलेल्या निर्देशनाचं पालन करा आणि तुमची नेमणूक बहुमोल समजा. प्रत्येक नेमणुकीत आणि यहोवाच्या सेवेतील प्रत्येक दिवशी खूष राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. काही वेळा तुम्ही थकून जाल, अथक काम करावं लागेल किंवा मग तुम्ही निराश होऊन जाल. नेमकं याच वेळी यहोवाला केलेल्या आपल्या जीवनाच्या समर्पणाचा उद्देश आठवणीत ठेवणं जरूरीचं आहे. आपल्या समर्पणाचा उद्देश, आपली नव्हे तर त्याची इच्छा पूर्ण करणं हा आहे.
मी कामावर आलो आणि माझ्या कामात खूष नव्हतो असा एकही दिवस मला आठवत नाही. का बरं? कारण आपण जिवेभावे स्वतःस यहोवाला देऊ करतो तेव्हा आपल्याला या गोष्टीचं समाधान वाटत असतं की ‘आपण आपलं कर्तव्य केलं आहे.’
[१९ पानांवरील चित्र]
सन १९४६ साली बाल्टिमोरमध्ये पायनियरींग करताना
[१९ पानांवरील चित्र]
सन १९५० साली फर्नसोबत ट्रेलर सिटीमध्ये
[१९ पानांवरील चित्र]
मॅग्झीन डिपार्टमेंट
[१९ पानांवरील चित्र]
सन १९५० सालातील ट्रेलर सिटी
[२२ पानांवरील चित्र]
ऑड्री आणि नेथन नॉर यांच्यासोबत
[२३ पानांवरील चित्र]
पॅटरसन, न्यूयॉर्कमधील वॉचटावर एज्युकेशनल सेंटर
[२४ पानांवरील चित्र]
सध्या फर्नसोबत