वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w87 १२/१ पृ. १६-२१
  • वृद्ध पालकांच्या बाबतीत इश्‍वरी भक्‍ती आचरणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वृद्ध पालकांच्या बाबतीत इश्‍वरी भक्‍ती आचरणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काळजीचा ‘स्वतःचा भार वाहा’
  • कौटुंबिक सहकार्य
  • पालक मुलांमध्ये परत राहायला येतात तेव्हा दाखविलेले “सूज्ञान” व “समंजसपणा”
  • शुश्रुषा गृहाकरवीची काळजी
  • संतोषी दातृत्व, संतोषी प्रतिसाद
  • वृद्धजनांची काळजी घेणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • आपल्या वृद्ध पालकांचा सन्मान करणे
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • पवित्र सेवेच्या विशेषाधिकारांची नितान्त कदर करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • आपल्या पालकांची अंतःकरणे आनंदित करणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
w87 १२/१ पृ. १६-२१

वृद्ध पालकांच्या बाबतीत इश्‍वरी भक्‍ती आचरणे

“[मुले किंवा नातवंडे यांनी] प्रथम आपल्या घरच्यांबरोबर इश्‍वरी भक्‍तीनुसार वागून आपल्या वडीलधाऱ्‍या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.”—१ तिमथ्यी ५:४.

१, २. (अ) वृद्ध पालकांच्या काळजीबद्दल पवित्र शास्त्र कोणाला जबाबदार धरते? (ब) या कर्तव्याकडे कानाडोळा करणे हे ख्रिश्‍चनांसाठी गंभीर का असणार?

मूल होता त्यावेळी तुमचे संगोपन व संरक्षण त्यांनी केले. युवक झाला तेव्हा तुम्ही त्यांचा सल्ला व आधार घेतला. पण आता ते वृद्ध झाले आहेत व त्यांनाच आधाराची गरज आहे. त्यामुळे प्रेषित पौल म्हणतो: “कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर इश्‍वरी भक्‍तीनुसार वागून आपल्या वडीलधाऱ्‍या माणसांचे उपकार फेडावयास शिकावे. कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे. जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्‍वास नाकारला आहे. तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.”—१ तिमथ्यी ५:४, ८.

२ हजारो यहोवाचे साक्षीदार आपल्या वृद्ध पालकांची काळजी घेत आहेत. ते केवळ “दयावंतपणा” (द लिविंग बायबल) किंवा “कर्तव्य” (द जरूसलेम बायबल) म्हणून नव्हे तर “इश्‍वरी भक्‍ती” ने म्हणजे देवाविषयीचा पूज्यभाव बाळगून करतात. गरजेच्या वेळी आपल्या पालकांना धुडकावून लावणे हे ‘[ख्रिस्ती] विश्‍वास नाकारणे’ याच्याशी तुल्य आहे हे ते जाणतात.—पडताळा तीतास १:१६.

काळजीचा ‘स्वतःचा भार वाहा’

३. आपल्या पालकांची काळजी घेणे हे एक खरे आव्हान का असू शकते?

३ वृद्ध पालकांची देखरेख करणे हे खासपणे पाश्‍चिमात्य देशात खरे आव्हानात्मक बनले आहे. कुटुंबे वेगवेगळी राहतात. महागाई तर अनियंत्रित बनली आहे. घरच्या स्त्रियांनाही प्रापंचिक नोकऱ्‍या कराव्या लागतात. या कारणामुळे वृद्ध पालकांची काळजी घेणे एक मोठे दिव्य बनले आहे; खासपणे काळजी घेणारेच जर वृद्धावस्थेत डोकावत असतील तर ते खरेच दिव्य ठरते. आपल्या पालकांचा संभाळ करणारी एक भगिनी म्हणते: “आमची आता पन्‍नाशी सुरु झाली आहे व आता आम्हाला आमच्या मोठ्या मुलांचे व नातवंडांचेही बघायचे असते.”

४, ५. (अ) काळजी करण्याच्या जबाबदारीचा सहभाग कोणी घ्यावा असे पवित्रशास्त्र दर्शविते? (ब) येशूच्या काळी काहींनी पालकासंबंधीच्या आपल्या कर्तव्यास कसे युक्‍तिबाजपणे दूर झटकले होते?

४ पौलाने सूचित केले की “मुले वा नातवंडे” यांना या जबाबदारीत समाविष्ट करता येऊ शकते. (१ तिमथ्यी ५:४) तथापि, कधी कधी एकाच पूर्वजाचे एकमेकांपासून दुरचे वंशज काळजी घेण्याचा ‘स्वतःचा भार वाहण्या’ विषयी नाखूष असतात. (पडताळा गलतीकर ६:५) एका वडीलांची तक्रार आहे: “माझ्या थोरल्या बहिणीने तर या प्रकरणातून आपले अंग काढून घेतले आहे.” पण असे हे मार्गाक्रमण यहोवाला संतुष्ट करणारे आहे का? येशूने परूश्‍यांना एकदा काय सांगितले होते ते आठवा: “मोशेने सांगितले आहे: ‘तू आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख’ . . . परंतु तुम्ही म्हणता, ‘जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की, “जे मी तुम्हाला पोषणासाठी द्यावयाचे ते कुर्बान (म्हणजे देवाला अर्पण) केले आहे,”’—तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही. अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता.”—मार्क ७:१०–१३.

५ विपन्‍नावस्थेतील पालकांना मदत करण्याचे कोणी यहुदी इच्छित नव्हता तर तो आपणाकडील धनसंचय “कुर्बान” केला आहे, म्हणजे मंदिराच्या वापरासाठी दान करण्यासाठी ठेवला आहे असे घोषित करी. (लेवीय २७:१–२४ पडताळा.) तरीपण हे काढून ठेवलेले दान लगेच देऊन टाकण्याच्या बंधनात तो नव्हता. त्यामुळेच तो आपले सर्वस्व अनिश्‍चित काळासाठी राखून ठेवू शकत होता (व वापरूही शकत होता). पण तेच आपल्या पालकांना आर्थिक साह्‍याची गरज आहे हे त्याला दिसते तेव्हा आपणाला हे कर्तव्य नको म्हणून तो अगदी पूज्य भावनेने त्याचे सर्व काही “कुर्बान” झाले आहे असे सांगे. येशूने या फसवणूकीचा धिक्कार केला.

६. आज सुद्धा काहींना आपल्या पालकीय कर्तव्यास युक्‍तिबाजपणे झटकून देण्यासाठी काय चालना देणारे असेल, पण हे देवास संतोषविणारे आहे का?

६ याचप्रमाणे आज जो ख्रिस्ती पोकळ सबबी सांगून आपले कर्तव्य युक्‍तिबाजरित्या झटकून टाकतो तो देवास मूर्खात काढू शकणार नाही. (यिर्मया १७:९, १०) हे खरे की, आर्थिक समस्या, ढासळते आरोग्य किंवा तत्सम परिस्थिती एखाद्याला आपला पालकाकरता किती करता येऊ शकते त्यावर बांध घालू शकते. तरीपण काही जण पालकांच्या कल्याणापेक्षा स्वतःची मिळकत, वेळ व खाजगीपणा याला जादा महत्व देत असतील. तर मग एका बाजूला देवाच्या वचनाचा प्रसार करणे व दुसऱ्‍या बाजूला मात्र पालकांच्या बाबतीत अक्रियाक राहून त्या देववचनास “निरर्थक” करणे हे किती ढोंगीपणाचे आहे बरे!

कौटुंबिक सहकार्य

७. वृद्ध पालकांची काळजी घेण्यात संपूर्ण कुटुंब कसे सहकार्य देऊ शकते?

७ काही तज्ज्ञांचे असे मत आहे की वृद्ध पालकाशी संलग्न असणाऱ्‍या समस्या उद्‌भवतात तेव्हा कौटुंबिक बैठक घेण्यास हवी. कुटुंबातील एका सदस्याला याविषयीच्या अनेक जबाबदाऱ्‍या संभाळाव्या लागत असतील, तरीपण शांततापूर्ण व हेतूनिष्ठरितीने सर्व सदस्यांनी “खाजगी संभाषण” हाताळले तर एकंदरीत कामाचा भार सर्व सदस्यांना वाटून घेता येईल. (नीतीसूत्रे १५:२२) दूर राहणारे सदस्य आर्थिक सहयोग किंवा अधूनमधून भेटी देऊ शकतील. इतर काही, घरातील कामे हाताळण्याची मदत देऊ शकतील व वृद्ध पालकाला नेण्या–आणण्यासाठी वाहन पुरवू शकतील. पालकांना नियमितरित्या भेटी देण्याचे सहमत दर्शविणे ही साधी गोष्ट सुद्धा महत्वपूर्ण सहयोग आहे. ८०त असणारी एक भगिनी आपल्या मुलांविषयी म्हणते: “त्यांची भेट मला शक्‍तीवर्धक ठरते!”

८. (अ) पूर्ण वेळेच्या कार्यात सहभागी असणाऱ्‍या कौटुंबिक सदस्यांना त्यांच्या पालकांची काळजी घेण्यापासून सूट आहे का? (ब) पूर्ण वेळेचे कार्य करणाऱ्‍या काही जणांनी आपल्या पालकांसबंधीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी किती प्रमाणापर्यंत मजल नेली?

८ तथापि कुटुंबातील कोणी सदस्य पूर्ण वेळेच्या कार्यात गुंतत असतो तेव्हा कुटुंबापुढे नाजूक समस्या उभी रहाते. पूर्ण वेळचे सेवक या कर्तव्यामधून सबबी सांगून मोकळे होत नाहीत तर पालकांची काळजी करता यावी याकरता त्यांनी विलक्षण प्रयत्न केले आहेत. एक विभागीय देखरेखे म्हणतात: “पूर्ण वेळेच्या कार्याच्या गरजा पूर्ण करीत असतानाच आमच्या पालकांची काळजी घेण्यामध्ये आम्हावर शारिरीक व भावनिक केवढा भार येतो याची कल्पनाच करवत नाही. खरे म्हणजे आमच्या सहनशीलतेची मर्यादा गाठली जाते व वेळोवेळी सामर्थ्याच्या पराकोटीची किती गरज आहे ते वाटू लागते.” (२ करिंथकर ४:७) यहोवा अशांना नित्याने आधार देत राहो.

९. पालकांची काळजी घेण्यासाठी ज्यांना पूर्ण वेळेची सेवा सोडून देण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता अशांना कोणते प्रोत्साहन देता येण्याजोगे आहे?

९ कधी कधी सर्व मार्गांचा अवलंब केल्यानंतर सुद्धा कोणा कौटुंबिक सदस्याला पूर्ण वेळचे कार्य सोडण्याशिवाय दुसरा पर्याय राहात नाही. आपल्या सेवेचे हक्क त्यागण्यात त्या व्यक्‍तिमध्ये किती गोंधळाचे विचार येत असतात ते समजण्याजोगे आहे. ‘माझ्या वृद्ध व आजारी आईची काळजी घेणे ही आमची जबाबदारी आहे हे मला ठाऊक आहे,’ असे एक माजी मिशनरी म्हणतो, ‘पण कधी कधी ते बरेच विचित्र वाटते.’ तरीही हे ध्यानात ठेवा की, “प्रथम आपल्या घरच्याबरोबर इश्‍वरी भक्‍तिने वागून . . . उपकार फेडावयास शिकावे . . . हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे.” (१ तिमथ्यी ५:४) शिवाय हेही ध्यानात ठेवा की, “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.” (इब्रीयांस ६:१०) ज्यांना आपणामागे बऱ्‍याच वर्षाची पूर्ण वेळेची सेवा सोडली असे एक जोडपे म्हणते: “आम्ही त्याकडे आता बघतो त्याप्रमाणे हे दिसते की आम्हाला पूर्ण वेळेच्या कार्यात राहणे हे जसे महत्वपूर्ण होते तसेच आमच्या पालकांची काळजी करणे हेही महत्वाचे आहे.”

१०. (अ) काहींनी पूर्ण वेळेची सेवा अकालीच का सोडून दिली असावी? (ब) कुटुंबांनी पूर्ण वेळेच्या सेवेबद्दल कोणता दृष्टीकोन धरावा?

१० काहींनी कदाचित पूर्ण वेळेची सेवा त्यांच्या घरच्या सदस्यांच्या म्हणण्यामुळे सोडून दिली असावी. त्यांनी म्हटले असावे: ‘तुला तर अद्याप नोकरी नाही आणि कुटुंबाचा प्रपंच सुद्धा चालवायचा नाही तर मग तूच आपल्या मम्मी पपांची काळजी का घेऊ शकत नाही?’ पण, प्रचाराचे कार्य आज अत्यंत महत्वाचे नाही का? (मत्तय २४:१४; २८:१९, २०) त्यामुळेच पूर्ण वेळेचे कार्य करणारे महत्वाचे काम करीत असतात. (१ तिमथ्यी ४:१६) येशूने सुद्धा सूचित केले की काही प्रकरणात देवाची सेवा ही कौटुंबिक प्रकरणापेक्षा अग्रगण्य समजण्यात यावी.

११, १२. (अ) येशूने एका माणसाला “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरु दे” असा सल्ला का दिला? (ब) पूर्ण वेळची सेवा करणाऱ्‍या सदस्याच्याबाबतीत काही कुटुंबानी कोणती व्यवस्था केली?

११ उदाहरणार्थ, एका माणसाने येशूचे अनुयायी होण्याच्या आमंत्रणाचा असे म्हणून त्याग केला की, “पहिल्याने माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या,” तेव्हा येशूने म्हटले: “[आध्यात्मिक दृष्ट्या] मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरु दे. तर तू जा व देवाच्या राज्याची सर्वत्र घोषणा कर.” (लूक ९:५९, ६०) वस्तुतः यहुदी मृतांना त्याच दिवशी दफन करीत. त्या माणसाचा बाप खरोखरी मेला होता हे अशक्यच वाटते. त्यामुळेच त्याने उद्‌गारिलेल्या शब्दांचा हा अर्थ असावा की त्याचा म्हातारा बाप मरेपर्यंत त्याला त्याच्याजवळ राहू द्यावे. तरीपण ही काळजी करण्यासाठी त्या माणसाचे इतर नातेवाईक उपलब्ध असल्यामुळेच येशूने त्याला “देवाच्या राज्याची घोषणा कर”ण्याचे उत्तेजन दिले.

१२ अशाच प्रकारे काही कुटुंबाना हे आढळले की सर्व सदस्यांनी सहकार दिल्यास त्यांच्यापैकी पूर्ण वेळेची सेवा करणाऱ्‍या सदस्याला ती सेवा न सोडता आपल्या पालकाची काळजी घेण्यात थोडाफार सहभाग घेता येऊ शकेल. उदाहरणार्थ, काही पूर्ण वेळेचे उपाध्याय शनिवार–रविवार किंवा आपल्या सुट्टीच्या काळात पालकांची मदत करतात. ही लक्षवेधक गोष्ट दिसत आहे की काही पालकांनी आपल्यापरिने मोठा त्याग पत्करून आपल्या मुलांना पूर्ण वेळेच्या सेवेत टिकून राहण्याचे उत्तेजन दिले. अशी राज्य आस्था प्रधान स्थानी ठेवणाऱ्‍यांना यहोवा समृद्ध आशीर्वाद देतो.—मत्तय ६:३३.

पालक मुलांमध्ये परत राहायला येतात तेव्हा दाखविलेले “सूज्ञान” व “समंजसपणा”

१३. पालकांना मुलांमध्ये राहायला येण्याचे परत निमंत्रित केले जाते त्यावेळी कोणत्या समस्या उद्‌भवू शकतात?

१३ येशूने आपल्या विधवा आईला विश्‍वासात असणाऱ्‍या नातेवाईकासोबत राहण्याची व्यवस्था केली. (योहान १९:२५–२७) याचप्रमाणे कित्येक साक्षीदारांनीही पालकांना आपल्या घरी राहण्याचे निमंत्रण दिले व त्याद्वारे आनंद व आशीर्वाद मिळविला. पालक घरी आल्यामुळे विजोड अशी जीवन पद्धत, मर्यादित स्वरूपाचा एकांत, दररोजची काळजी घेण्याचा त्रास यामुळे बहुतेकांना उद्विग्न झाल्यासारखे वाटायला लागते. “आईंचे उरकता उरकता मला बरे त्रासल्यासारखे होते,” असे ॲन म्हणते, तिची सासू आजारी आहे. “कधी कधी तर मला अगदी नकोसे होते व आईंना नको ते बोलून जाते—आणि शेवटी मला त्याचा मनःस्ताप होतो.”

१४, १५. अशा परिस्थितीत “सूज्ञान” व “समंजसपणा” कुटुंबाची ‘बांधणी’ करण्यास कशी मदत देतो?

१४ शलमोनाने म्हटले की, “सूज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते.” (नीतीसूत्रे २४:३) त्यामुळे आपल्या सासूबाईंच्या आजाराविषयी ॲनने अधिक समंजस बनण्याचा प्रयत्न राखला. “मी लक्षात ठेवले की त्या आजारी आहेत व त्या मुद्दाम तशा काहीं वागत नाहीत.” असे तिने म्हटले. तरीपण, “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय.” (याकोब ३:२) पण जेव्हा तंटा उभा राहतो त्यावेळी द्वेष वाढू नये व माथे भडकले जाऊ नये याकरता सूज्ञता व्यक्‍त करा. (इफिसकर ४:३१, ३२) कुटंबात बोलणी करा आणि सहमत होण्यास वा बदल करण्यास जागा द्या.

१५ समंजसपणा सुद्धा दळणवळण परिणामकारकपणे राखण्यास मदत देतो. (नीतीसूत्रे २०:५) नव्या घरी आल्यावर कदाचित कोणा पालकास तेथील वळणास जुळवून घेणे थोडेसे कठीण वाटत असेल. किंवा दुर्बल निर्णयामुळे ते सहकार्य देत नसतील. अशा या परिस्थितीत दृढपणे बोलण्याव्यतिरिक्‍त दुसरी कसली निवड नसणार. (पडताळा उत्पत्ती ४३:६–११.) “मी माझ्या आईला नको म्हटले नाही,” एक भगिनी म्हणते, “तर ती आपले सर्व पैसे खर्च करून बसते.” एका वडीलांना हे दिसून आले की त्यांना आपल्या आईचे मत जिंकता येते. ते म्हणतात: “कित्येकदा समजावून सांगण्यात यश येत नाही तेव्हा मी आईला स्पष्ट म्हणतो की, ‘आई मजसाठी तरी निदान तू ते करशील का?’ त्यावेळी ती माझे ऐकते.”

१६. प्रेमळ पतीने आपल्या बायकोसंबंधाने “समंजसपणा” का दाखवावा? ते त्याला कसे जमेल?

१६ कामाचा एकंदर व्याप बहुधा बायकोलाच संभाळावा लागत असल्यामुळे समंजस पतीचे, ती भावनिक, शारीरिक वा आध्यात्मिक रितीने गळून जात नाही ना, याकडे लक्ष राहील. नीतीसूत्रे २४:१० म्हणते: “संकटकाळी तुझे धैर्य खचले तर तुझी शक्‍ति अल्प होय.” तर मग आपल्या बायकोचा उत्साह वाढविण्यासाठी पतीला काय करता येईल? “माझे पती घरी परतल्यावर,” एक भगिनी म्हणते, “मला बाहूत घेऊन म्हणतात की तू माझ्यासाठी किती किती काम करतेस. त्यांनी व्यक्‍त केलेल्या या जिव्हाळ्याशिवाय ते करणे मला जमणारच नाही.” (इफिसकर ५:२५, २८, २९) पती तिच्यासोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास करू शकतात व नियमाने तिजबरोबर प्रार्थना करू शकतात. होय, अशा या कठीण परिस्थितीत सुद्धा घर किवा कुटुंब ‘बांधता येऊ शकते.’

शुश्रुषा गृहाकरवीची काळजी

१७, १८. (अ) काही कुटुंबांना कोणते पाऊल उचलण्याचे भाग पडले? (ब) या प्रकरणात वयाने मोठी असणारी मुले त्यांच्या पालकांना परिस्थितीशी जुळवून घेण्यात कशी मदत करू शकतात?

१७ एक वार्धक्य शास्त्रज्ञ म्हणतात: “[पालकांना] घरी ठेवण्यासाठी कुटुंबापाशी नैपुण्य वा पैसा राहिला नाही अशी सुद्धा वेळ येते.” एक पती म्हणतो: “माझ्या आईची काळजी २४ तास घेता घेता माझ्या बायकोची प्रकृतीच ढासळली. सरतेशेवटी आईला शुश्रुषा गृहात ठेवण्याशिवाय निवड राहिली नाही. पण ते करताना आमच्या अंतःकरणाला केवढे चरे पडले होते.”

१८ त्या परिस्थितीत शुश्रुषा गृहातील चिकित्सा ही सर्वात उत्तम उपलब्ध असणारी ठरू शकते. तरीपण अशा सोयीत राहिलेल्या पालकांना विचित्र, विचलीत व आपल्याला टाकून दिले आहे असे वाटत असते. एक भगिनी, जिला आपण ग्रेटा म्हणू, म्हणाली: “आम्ही हे का करीत आहोत ते आईला नीट समजावून सांगावे लागले. त्यामुळे तिने स्वतःमध्ये बदल करून घेतला व नव्या जागेत स्वतःच्या घरासारखी राहू लागली.” कार्यक्रमात बदल करून नियमाने भेटी घेणे पालकांना समाधान देते व त्याद्वारे तुमची त्याजवरील प्रीती व्यक्‍त होत राहते. (पडताळा २ करिंथकर ८:८.) जेथे दूरवरील अंतराची समस्या आहे तेथे टेलिफोन, पत्र व अधूनमधून दिल्या जाणाऱ्‍या भेटी याकरवी संपर्क राहू द्या. (पडताळा २ योहन १२.) तरीपण जगाच्या लोकांच्या सहवासात राहणे काही अंशी अडथळाजनक ठरते. त्यामुळे ‘त्यांच्या आध्यात्मिक गरजासंबंधाने जागृत असा.’ (मत्तय ५:३) “आम्ही आईला वाचण्यासाठी साहित्य देतो व शक्य आहे तितक्या प्रमाणात तिजसोबत आध्यात्मिक गोष्टींची चर्चाहि करतो,” असे ग्रेटा म्हणते.

१९. (अ) शुश्रुषा गृहाची निवड व तत्संबंधी घ्यावी लागणारी काळजी याविषयी कोणती दक्षता घेतली पाहिजे? (ब) आपल्या पालकाची काळजी करण्याचा हरप्रकारे प्रयत्न राखण्याचा फायदा ख्रिश्‍चनाला कसा होतो?

१९ द वॉल स्ट्रीट जर्नल ने अमेरिकेतील ४०६ शुश्रुषा गृहांचा अभ्यास केल्यावर असा अहवाल दिला की “त्यापैकीची एक पंचमांश शुश्रुषा गृहे वसाहतीस संभाव्य धोक्याची वाटली तर यापैकीची अर्धी किमान दर्जाची होती.” असे हे अहवाल सर्वसाधारणपणे निराशजनक वाटतात. तद्वत शुश्रुषा गृहाची गरज आहेच तर त्याची निवड करताना दक्षता घ्या. त्यात स्वच्छता, देखरेख, प्रशिक्षित अधिकारी, घरगुती वातावरण व पुरेसा आहार या गोष्टी आहेत का ते पाहण्यासाठी प्रत्यक्षच भेट द्या. तुमच्या पालकांची काळजी जितक्या अधिक जवळून घेता येईल तितकी घ्या. त्यांचे समर्थक व्हा आणि जागतिक सण व मनोरंजनाच्या बाबतीत जेव्हा विचित्र परिस्थिति सामोरी येते त्यावेळी ती टाळण्यासाठी त्यांना मदत द्या. आपल्या पालकांना सर्वोत्तम अशी काळजी देऊ केल्याने तुम्हाला दोष बनण्याचे टाळता येईल व मग त्याचा मनस्ताप नंतर होणार नाही.—पडताळा २ करिंथकर १:१२.

संतोषी दातृत्व, संतोषी प्रतिसाद

२०. मुलांनी संतोषाने दातृत्व राखावे हे का महत्वाचे आहै?

२० “ते खूपच कठीण होते,” असे आपल्या पालकांची काळजी घेणाऱ्‍या एका ख्रिस्ती स्त्री ने म्हटले. “मला त्यांचा स्वयपाक, स्वच्छता करावी लागे, मोठ्याने ओरडून त्यांच्याशी संभाषण करावे लागे, बहिर्दिशेस जाण्याची घाई होई तेव्हा अंथरूण बदलावे लागे.” “पण जे काही आम्ही त्यांच्यासाठी केले,” तिचा पती म्हणतो, “ते सर्व आंदाने, संतोषाने केले. आम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागत आहे म्हणून आम्ही किती चिडचीडे झालो आहोत हे आम्ही पालकांना न भासविण्याचा चिकाटीचा प्रयत्न राखला.” (२ करिंथकर ९:७) वृद्ध बहुतांशी मदत स्विकारण्यास तयार नसतात व इतरांना भार होण्याची त्यांची इच्छा नसते. त्यामुळे तुम्ही जी प्रवृत्ती दाखवता ती मोठी चिकाटीची होते.

२१. (अ) पालकांना संतोषप्रद प्रतिसाद कसा दाखवता येईल? (ब) आपला वृद्धापकाळ येण्याआधीच पालकांनी काही योजना करून ठेवणे का सूज्ञतेचे असेल?

२१ त्याच वेळी पालक जी वृत्ति प्रदर्शित करतात ती सुद्धा महत्वाची आहे. एक भगिनी आठवून सांगते: “मी आईसाठी जे जे करीत होत्ये ते तिला कधीच समाधानकारक वाटत नसे.” या कारणास्तव पालकांनी अव्यवहारी वा अवास्तव मागणी करणारे नसावे. वस्तुतः पवित्र शास्त्र म्हणतेच की, “आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.” (२ करिंथकर १२:१४) काही पालक त्यांना मिळणारे उत्पन्‍न उधळपट्टी करण्यात घालवतात व मग आपल्या मुलांवर भार बनून अडून बसतात. तथापि, नीतीसूत्रे १३:२२ म्हणते: “चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रास वतन ठेवितो.” याकरताच, वृद्धापकाळ येण्याआधीच शक्य आहे तितक्या प्रमाणात पालकांनी काही निधि बाजूला राखून ठेवला पाहिजे की ज्याद्वारे त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी काही तरतूद ठेवता येईल.—नीतीसूत्रे २१:५.

२२. वृद्ध पालकांची काळजी घेण्याविषयी कोणी जे प्रयत्न घेईल त्याविषयीचा त्याने कोणता दृष्टीकोण राखावा?

२२ पालकांची काळजी घेणे म्हणजे त्यांचे ‘उपकार फेडणे’ आहे असे पौलाने म्हटले ते योग्यच आहे. (१ तिमथ्यी ५:४) एक बंधू म्हणतो: ‘आईने माझी २० वर्षे काळजी घेतली. त्याच्या तुलनेत मी काय केले?’ तर मग, वृद्ध पालक असलेल्या सर्व ख्रिश्‍चनांना याचप्रकारे ‘इश्‍वरी भक्‍ती घरी आचरण्यासाठी’ प्रेरणा लाभावी. त्यांनी हे आठवणीत असू द्यावे की पालकांचा सन्मान करणाऱ्‍यांना देव जे अभिवचन देऊन आहे त्याकरवी तो त्यांना समृद्ध आशीर्वाद देईल. त्याचे ते अभिवचन असे आहे: “तू पृथ्वीवर दीर्घायू [होशील.]”—इफिसकर ६:३.

लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे

◻ आपल्या पालकांच्या बाबतीत असणारी जबाबदारी काही जण येशूच्या काळी कशी झटकून टाकीत?

◻ वृद्ध पालकांची काळजी कोणी घ्यावी व का?

◻ पालक मुलांच्या कुटुंबात राहायला आल्यावर कोणत्या समस्या अनुभवास येऊ शकतात पण त्यावर कशी मात करता येईल?

◻ शुश्रुषा गृहाची काळजी का जरूरीची भासते व त्याजशी जुळवून घेण्यामध्ये पालकांना कशी मदत देता येईल?

[१८ पानांवरील चित्रं]

पालकांच्या घेतल्या जाणाऱ्‍या काळजीत सर्वांना कसे सहभागी होता येईल ते ठरविण्यासाठी कौटुंबिक बैठक घेण्यास हवी

[२० पानांवरील चित्रं]

शुश्रुषा गृहाकरवीची काळजी जरूरीची भासेल त्यावेळी वृद्ध जनांच्या भावनिक व आध्यात्मिक सुस्थितीसाठी नियमित भेटी देत राहणे आवश्‍यक आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा