अंत्यविधीच्या प्रथांविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन
ध्यानीमनी नसताना एखाद्या जवळच्या माणसाचा अचानक मृत्यू होतो तेव्हा आभाळच कोसळतं. सुरवातीला माणूस त्या धक्क्याने हादरून जातो, आणि त्यानंतर असह्य भावनिक दुःखाने पीडित होतो. एखाद्या दुःखदायक आजारामुळे बऱ्याच काळापासून अंथरुणाला खिळलेल्या आपल्या प्रिय माणसाचा मृत्यू होतो तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी असते, पण तरीसुद्धा त्याला गमावल्याचे दुःख आणि त्यामुळे आलेला रिक्तपणा हा तर असतोच.
परिस्थिती कशीही असो, पण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्यामुळे शोकाकुल झालेल्यांना आधाराची आणि सांत्वनाची अत्यंत गरज असते. कधीकधी, बायबलवर आधारित नसलेल्या अंत्यविधीच्या प्रथा पाळण्याचा आग्रह धरणाऱ्यांकडून शोकाकुल ख्रिस्ती व्यक्तीला छळवणूकही सहन करावी लागते. आफ्रिका आणि जगातल्या इतर भागांतही हा प्रकार सहसा आढळतो.
शोकाकुल ख्रिश्चनाला अशा बायबलवर आधारित नसणाऱ्या अंत्यविधीच्या प्रथा कशा टाळता येतील? शिवाय, अशा कठीण प्रसंगी सहविश्वासू बांधव त्याला कशाप्रकारे आधार देऊ शकतात? यहोवाला संतोषविण्यास उत्सुक असणाऱ्या सर्वांसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.”—याकोब १:२७.
एक समान धागा
बऱ्याचशा अंत्यविधीच्या प्रथा एका समान धाग्यात गुंफलेल्या आहेत, आणि तो म्हणजे मृत लोक अद्यापही पूर्वजांसोबत एका अदृश्य लोकात जिवंत आहेत हा विश्वास. त्यांना शांती मिळावी म्हणून शोकाकुल कुटुंबियांना काही विशिष्ट रितीरिवाज पार पाडणे अत्यावश्यक वाटते. दुसरीकडे, ते रितीरिवाज पार न पाडल्यास सबंध समाजावर काहीतरी अनर्थ ओढवेल असा विश्वास बाळगणारे शेजारी आपल्याला नावे ठेवतील अशी काहींना भीती वाटते.
खऱ्या ख्रिश्चनाने मानवाच्या भीतीपुढे हार मानून देवाला न आवडणाऱ्या प्रथांमध्ये कधीही सहभागी होऊ नये. (नीतिसूत्रे २९:२५; मत्तय १०:२८) बायबल स्पष्टपणे सांगते की मृत लोक बेशुद्धावस्थेत असतात, ते म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; . . . ज्या अधोलोकाकडे [शिओलकडे] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:५, १०) म्हणूनच, यहोवाने प्राचीन काळी आपल्या लोकांना ताकीद दिली होती की त्यांनी मृतांना शांती लाभण्यासाठी किंवा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कोणताही प्रयत्न करू नये. (अनुवाद १४:१; १८:१०-१२; यशया ८:१९, २०) बायबलची ही सत्ये, अंत्यविधीच्या अनेक प्रचलित प्रथांच्या विरोधात आहेत.
“लैंगिक शुद्धीकरण?”
मध्य आफ्रिकेच्या काही देशांत, शोकाकुल विवाहित साथीदाराला आपल्या मृत पती किंवा पत्नीच्या जवळच्या एखाद्या नातेवाईकासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची प्रथा आहे. असे न केल्यास, ती मृत व्यक्ती कुटुंबियांचे काहीतरी नुकसान करील असा समज आहे. या प्रथेला “लैंगिक शुद्धीकरण” म्हणतात. पण बायबल मात्र कोणत्याही विवाहबाह्य लैंगिक संबंधाला “जारकर्म” म्हणते. आणि ख्रिश्चनांना ‘जारकर्मापासून पळ काढण्याची’ आज्ञा असल्यामुळे, ते असल्या गैरबायबलीय प्रथेचा धैर्यपूर्वक विरोध करतात.—१ करिंथकर ६:१८.
मर्सी नावाच्या एका विधवेचेच पाहा.a तिच्या पतीचा १९८९ साली मृत्यू झाला तेव्हा नात्यातल्याच एका पुरुषासोबत तिने हे लैंगिक शुद्धीकरण पार पाडावे अशी तिच्या नातेवाईकांची इच्छा होती. पण ही प्रथा देवाच्या नियमाच्या विरोधात आहे असे स्पष्ट करून तिने याला नकार दिला. नातेवाईक चिडले, आणि तिचा अपमान करून ते निघून गेले. एका महिन्यानंतर त्यांनी तिच्या घराची बरीच नासधूस केली, आणि “करू दे आता तुझा धर्म तुला मदत,” असे म्हणून तिच्या घरावरचे लोखंडी पत्र्यांचे छप्पर देखील काढून नेले.
मंडळीतल्या बांधवांनी मर्सीला सांत्वन दिले आणि तिला एक नवे घर देखील बांधून दिले. हे पाहून शेजारीपाजारी इतके प्रभावित झाले की त्यांपैकी काहींनी या कामाला हातभार लावण्याचे ठरवले; आणि छपरासाठी सर्वात आधी कोणी गवत आणून दिले, तर टोळीप्रमुखाच्या कॅथलिक धर्मीय बायकोने. मर्सीची एकनिष्ठता पाहून तिच्या मुलांना प्रोत्साहन मिळाले. त्या घटनेनंतर तिच्या मुलांपैकी चौघांनी यहोवा देवाला समर्पण केले असून, एक तर अलीकडेच मिनिस्ट्रीयल ट्रेनिंग स्कूलमध्येही सहभागी होऊ शकला.
लैंगिक शुद्धीकरणाच्या प्रथेमुळे, काही ख्रिश्चन दबावात येऊन विश्वासात नसणाऱ्या व्यक्तीशी विवाह करून बसले. उदाहरणार्थ, सत्तरीत असणाऱ्या एका विधूर बांधवाने आपल्या मृतक पत्नीच्या नात्यातल्या एका तरुण मुलीशी घाईगडबडीत विवाह केला. असे केल्यामुळे आपले लैंगिक शुद्धीकरण झाले आहे असे त्याला म्हणता येत होते. पण ख्रिश्चनांनी “केवळ प्रभूमध्ये” विवाह करावा या बायबलच्या सल्ल्याच्या हे विरोधात आहे.—१ करिंथकर ७:३९.
जागरणाचे कार्यक्रम
बऱ्याच देशांत, शोक व्यक्त करू इच्छिणारे मृत व्यक्तीच्या घरी गोळा होतात आणि रात्रभर जागरण करतात. जागरणासोबतच खाणेपिणे आणि मोठ्याने गाणेबजावणे देखील असते. असे केल्याने मृतकाला शांती मिळते आणि त्याच्या कुटुंबियांचे जादूटोण्यापासून रक्षण होते असा त्यांचा समज आहे. मृतकाची मर्जी राखण्यासाठी त्याला उद्देशून तोंडपुजी भाषणे देखील दिली जातात. भाषण झाल्यानंतर शोकसभेला आलेले लोक एक भजन गातात आणि मग त्यांच्यापैकी दुसरा कोणीतरी भाषण द्यायला उभा राहतो. हे कधीकधी पहाटेपर्यंत चालते.b
खरा ख्रिस्ती अशाप्रकारच्या जागरण कार्यक्रमांत भाग घेत नाही कारण बायबल स्पष्टपणे सांगते की मृत लोक जिवंतांना मदत किंवा त्यांचे नुकसान करण्यास असमर्थ असतात. (उत्पत्ति ३:१९; स्तोत्र १४६:३, ४; योहान ११:११-१४) बायबलनुसार भूतविद्या निंद्य आहे. (प्रकटीकरण ९:२१; २२:१५) तरीसुद्धा, अशाप्रकारच्या भूतविद्येशी संबंधित प्रथा इतर लोक करू पाहतात तेव्हा त्यांना अडवणे एखाद्या ख्रिस्ती विधवेला सोपे जाणार नाही. कदाचित ते तिच्या घरात हा जागरणाचा कार्यक्रम करण्याचा अट्टहास करत असतील. आधीच शोकाकुल असताना हा अनावश्यक मनःस्ताप सोसाव्या लागणाऱ्या दुःखी ख्रिश्चनांना सहविश्वासू बांधव कोणती मदत देऊ शकतात?
बऱ्याचदा मंडळीचे वडील शोकाकुल ख्रिस्ती कुटुंबास आधार देण्याकरता त्यांच्या नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात; बऱ्याच वेळा यात त्यांना यशही आले आहे. अशाप्रकारे समजूत काढल्यानंतर हे लोक शांतपणे तेथून निघून जातात आणि मग अंत्यविधी केला जातो त्या दिवशी पुन्हा एकत्र होतात. पण काहीजण भांडायला सुरू करतात तेव्हा काय करावे? त्यांना पटवून सांगण्यासाठी वाद घालत राहिल्यास कधीकधी प्रकरण मारामारीपर्यंत जाऊ शकते. ‘प्रभुच्या दासाने भांडू नये, तर त्याने सहनशील असावे.’ (२ तीमथ्य २:२४) त्यामुळे नातेवाईक हेकेखोरपणे आपल्याच मनाप्रमाणे करण्याचा अट्टहास करतात तेव्हा कदाचित एखाद्या ख्रिस्ती विधवेला व तिच्या मुलांना, त्यांना असे करण्यापासून रोखणे शक्य होणार नाही. मात्र त्यांच्या घरात पार पडणाऱ्या अशा कोणत्याही खोट्या धार्मिक विधीत ते स्वतः सहभागी होत नाहीत, कारण “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका,” या बायबलच्या आज्ञेनुसार ते वागतात.—२ करिंथकर ६:१४.
हेच दफनविधीच्या बाबतीतही आठवणीत ठेवावे. खोट्या धर्माच्या पाळकाच्या नेतृत्वाखाली चालणारे गायन, प्रार्थना किंवा कोणतेही विधी यांत यहोवाचे साक्षीदार सहभागी होत नाहीत. अगदी जवळचे नातेवाईक असल्यामुळे ख्रिश्चनांना अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक वाटले तरीसुद्धा ते त्यात सहभाग मात्र घेत नाहीत.—२ करिंथकर ६:१७; प्रकटीकरण १८:४.
आदरणीय अंत्यविधी
यहोवाच्या साक्षीदारांच्या अंत्यविधी कार्यक्रमांत मृतांना शांती लाभावी या कल्पनेने केलेले कोणतेच विधी नसतात. राज्य सभागृह, अंत्यविधीचे एखादे खास ठिकाण, मृत व्यक्तीचे घर अथवा दफनभूमी यांपैकी कोणत्याही एका ठिकाणी बायबलवर आधारित भाषण दिले जाते. मृत्यूविषयी आणि पुनरुत्थानाच्या आशेविषयी बायबल काय म्हणते हे स्पष्ट करून शोकाकुल जणांना सांत्वन देणे हा या भाषणाचा उद्देश असतो. (योहान ११:२५; रोमकर ५:१२; २ पेत्र ३:१३) शास्त्रवचनांवर आधारित असणारे एखादे गीत गायिल्यावर सांत्वनपर प्रार्थना करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात येतो.
अलीकडेच, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांच्या, यहोवाच्या साक्षीदारांपैकी असणाऱ्या सर्वात धाकट्या बहिणीचा अंत्यविधी याच पद्धतीने पार पाडण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी, राष्ट्रपतींनी वक्त्यांचे मनस्वी आभार मानले. कित्येक मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मंत्रीमंडळातील एक मंत्री महोदया म्हणाल्या की, “मी उपस्थित राहिले त्यांपैकी हा सर्वांत आदरणीय अंत्यविधी होता.”
शोक व्यक्त करण्यासाठी विशिष्ट पेहराव?
यहोवाचे साक्षीदार देखील आपल्या प्रिय माणसांच्या मृत्यूचा शोक करतात. येशूप्रमाणे कदाचित अश्रू गाळून. (योहान ११:३५, ३६) पण, सर्वांना दिसेल अशा चिन्हाच्या माध्यमाने आपल्याला झालेले दुःख जाहीर करण्याची गरज आहे असे त्यांना वाटत नाही. (पडताळा मत्तय ६:१६-१८.) बऱ्याच देशांत, मृत पतीला शांती लाभावी म्हणून विधवांना शोक व्यक्त करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घालावे लागतात. हा पेहराव तिला अंत्यविधीनंतर कितीतरी महिने, कधी कधी तर वर्षभरही घालावा लागतो, आणि हा पेहराव काढून टाकण्यासाठी आणखी एक मेजवानीचा कार्यक्रम ठेवला जातो.
अशा या बाह्य चिन्हांच्या माध्यमाने शोक व्यक्त न केल्यास मृत व्यक्तीचा अनादर होतो असे समजतात. त्यामुळे, स्वाझीलँड येथील काही जमातींच्या प्रमुखांनी यहोवाच्या साक्षीदारांची त्यांच्या स्वतःच्या घरांतून आणि मालकीच्या जमिनींवरून हकालपट्टी केली. अर्थात, अशा या विश्वासू ख्रिश्चनांची इतर ठिकाणी राहणाऱ्या त्यांच्या आध्यात्मिक बांधवांनी चांगली काळजी घेतली.
स्वाझीलँडच्या मुख्य न्यायालयाने यहोवाच्या साक्षीदारांच्या बाजूने निर्णय देऊन त्यांना स्वतःच्या मालकीच्या जमिनींवर आपापल्या घरी परतण्याची परवानगी देण्यात यावी असा आदेश दिला आहे. एका ख्रिस्ती विधवेने एक पत्र आणि टेप रेकॉर्डिंग दाखवली ज्यात तिच्या पतीने स्पष्टपणे म्हटले होते की तिने त्याच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी कोणताही विशिष्ट पेहराव करू नये; तेव्हा कोठे तिला स्वतःच्या मालकीच्या घरात राहण्याची परवानगी देण्यात आली. अशारितीने तिने सिद्ध करून दाखवले की ती खऱ्या अर्थाने आपल्या पतीचा आदर करत होती.
आपला मृत्यू होण्याआधीच अंत्यविधीकरता स्पष्ट सूचना देणे फार फायदेकारक शाबीत होऊ शकते, विशेषतः अशा ठिकाणी, जेथे बायबलच्या विरोधातील प्रथा सर्वसामान्य आहेत. कॅमरून येथे राहणाऱ्या व्हिक्टर यांचेच उदाहरण पाहा. आपला अंत्यविधी कसा पार पाडला जावा हे त्यांनी लिहून ठेवले होते. त्यांच्या कुटुंबात, मृतांना आदर देण्याकरता कट्टरपणे काही खास परंपरा पाळणाऱ्या, मानवी कवट्यांची पूजा करणाऱ्या समाजातील बरीच बडी मंडळी होती. शिवाय, ते स्वतः कुटुंबातील मान्यवर सदस्य असल्यामुळे आपल्या कवटीचीही पूजा केली जाईल हे त्यांना माहीत होते. म्हणूनच, यहोवाचे साक्षीदार कोणत्या पद्धतीने आपला अंत्यविधी पार पाडतील याविषयी त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या. यामुळे त्यांच्या विधवा पत्नीला आणि मुलांना जास्त अडचणींना तोंड द्यावे लागले नाही आणि त्या परिसरातील लोकांना देखील चांगली साक्ष देण्यात आली.
बायबलनुसार नसणाऱ्या रितीरिवाजांची नक्कल टाळा
बायबलचे ज्ञान असूनही काहींना इतरांपेक्षा वेगळे काही करण्याची भीती वाटते. छळवणूक टाळण्यासाठी काहीजण, मृत माणसासाठी परंपरेनुसार जागरण करीत आहोत असे भासवून आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करतात. शोकाकुल कुटुंबियांना वैयक्तिकरित्या सांत्वन देण्यासाठी त्यांच्याकडे जाणे फार चांगले आहे, पण अंत्यविधीच्या दिवसापर्यंत दररोज रात्री मृत व्यक्तीच्या घरी अंत्यविधीसारखाच लहानसा कार्यक्रम घेणे आवश्यक नाही. असे केल्यामुळे पाहणाऱ्यांसाठी हे आध्यात्मिक अडखळण बनू शकते; कारण त्यामुळे यात सहभागी होणाऱ्यांचा मृतांच्या स्थितीविषयी बायबलमध्ये जे सांगितले आहे त्यावर पूर्ण विश्वास नाही असा समज होऊ शकतो.—१ करिंथकर १०:३२.
बायबल ख्रिश्चनांना देवाच्या उपासनेला जीवनात प्रथम स्थान देण्याचे आणि आपल्या वेळेचा सुज्ञतेने सदुपयोग करण्याचे उत्तेजन देते. (मत्तय ६:३३; इफिसकर ५:१५, १६) पण काही ठिकाणी, एखाद्याचा अंत्यविधी असल्यामुळे आठवडाभर आणि कधीकधी त्यापेक्षा जास्त काळ मंडळीचे सर्व कार्यक्रम ठप्प पडल्याचे पाहण्यात आले आहे. ही समस्या केवळ आफ्रिकेतच आहे असे नाही. एका अंत्यविधीसंबंधी दक्षिण अमेरिकेहून हे वृत्त आले: “तीन ख्रिस्ती सभांमध्ये अत्यंत कमी लोक उपस्थित होते. दहा दिवसांपर्यंत क्षेत्र सेवेत कोणीही सहभाग घेतला नाही. मंडळीच्या बाहेरच्या लोकांना आणि बायबल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपल्या काही बंधूभगिनींना अंत्यविधीच्या कार्यक्रमांत सहभागी झालेले पाहून आश्चर्य वाटले आणि थोडीशी निराशा देखील.”
काही समाजांत शोकाकुल कुटुंबाचे लोक अंत्यविधीनंतर काही मोजक्या जवळच्या मित्रांना अल्पोपहाराकरता आपल्या घरी आमंत्रित करतात. पण आफ्रिकेच्या अनेक भागांत अंत्यविधीला आलेले शेकडो लोक आमंत्रण नसताना मृत व्यक्तीच्या घरी येऊन थडकतात आणि मेजवानीची अपेक्षा करतात; प्रसंगी पशूंचाही बली दिला जातो. ख्रिस्ती मंडळीसोबत संबंध ठेवणाऱ्यांपैकी देखील काहीजणांनी या प्रथेचे अनुकरण करून मृतांच्या शांतीसाठी, प्रथेनुसार मेजवानी देत असल्याचे भासवले.
यहोवाच्या साक्षीदारांमध्ये जे अंत्यविधीचे कार्यक्रम होतात, त्यांमुळे शोकित कुटुंबियांवर अनावश्यक आर्थिक ओझे लादले जात नाही. त्याअर्थी, अंत्यविधीचा वारेमाप खर्च भागवण्यासाठी उपस्थितांनी काही आर्थिक हातभार लावावा या उद्देशाने काही खास व्यवस्था करण्याची गरज पडू नये. गरीब विधवांची आवश्यक खर्च भागवण्याची ऐपत नसल्यास मंडळीतले इतरजण नक्कीच आनंदाने मदत करतील. ही मदत अपुरी पडल्यास, वडील त्या व्यक्तीची योग्यता पाहून आर्थिक मदत पुरवण्याची व्यवस्था करू शकतात.—१ तीमथ्य ५:३, ४.
अंत्यविधीच्या प्रथा काही नेहमीच बायबलच्या विरोधात नसतात. पण असतात तेव्हा ख्रिस्तीजनांचा शास्त्रवचनांनुसारच वागण्याचा निर्धार असतो.c (प्रेषितांची कृत्ये ५:२९) यामुळे कधीकधी आणखी संकटे आली तरीसुद्धा, देवाच्या सेवकांपैकी कित्येकजण अशा परीक्षांचा यशस्वीरित्या सामना केल्याचा आपला अनुभव सांगू शकतील. जो “सर्व सांत्वनदाता देव” आहे त्या यहोवाकडून सामर्थ्य मिळाल्यामुळे आणि त्यांच्या संकटात त्यांना सांत्वन देणाऱ्या सहविश्वासू बांधवांच्या प्रेमळ मदतीमुळे ते असे करू शकले.—२ करिंथकर १:३, ४.
[तळटीपा]
a या लेखात नावे बदलण्यात आली आहेत.
b काही भाषेच्या लोकांत आणि समाजांत “जागरण” हा शब्द शोकाकुल कुटुंबियांना दिलेली लहानशी भेट या अर्थाने वापरण्यात येतो. यात शास्त्रवचनांविरुद्ध असे कदाचित काहीही नसेल. सावध राहाच्या! मे २२, १९७९ (इंग्रजी) अंकात पृष्ठे २७-८ पाहा.
c अंत्यविधीच्या प्रथांमुळे ख्रिस्ती व्यक्तीवर भयंकर परीक्षा येण्याची शक्यता असते अशा देशांमध्ये वडीलजन बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला याविषयी आधीच कल्पना देऊ शकतात. आपली सेवा पूर्ण करण्यासाठी संघटित या पुस्तकातील प्रश्नांची या नवीन लोकांसोबत चर्चा करताना, “जीव, पाप आणि मृत्यू” तसेच “संमिश्र विश्वास” या विभागांकडे खास लक्ष देण्यात यावे. या दोन्ही विभागांत पर्यायी प्रश्न असल्यामुळे, बायबलवर आधारित नसणाऱ्या अंत्यविधीच्या प्रथांविषयी माहिती देण्याची वडिलांना संधी मिळू शकेल जेणेकरून अशा परिस्थितीत सापडल्यास देवाचे वचन आपल्याकडून काय अपेक्षिते हे त्या बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला माहीत असेल.
[२३ पानांवरील चौकट]
दृढ राहिल्यामुळे आशीर्वादित
सीबॉन्गिली ही स्वाझीलँड येथे राहणारी एक धैर्यवान ख्रिस्ती विधवा आहे. अलीकडेच तिच्या पतीचा मृत्यू झाल्यावर मृतांना शांती मिळावी म्हणून बरेच लोक ज्या प्रथा पाळणे आवश्यक समजतात त्या पाळण्यास तिने नकार दिला. उदाहरणार्थ, तिने आपल्या डोक्यावरचे केस काढले नाहीत. (अनुवाद १४:१) तिच्या कुटुंबातील आठ सदस्यांना याचा राग आला आणि त्यांनी जबरीने तिचे केस काढले. तसेच, त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांना देखील सीबॉन्गिलीला सांत्वन देण्यासाठी तिच्या घरी येऊ दिले नाही. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, राज्य संदेशाविषयी आस्था असणारे इतरजण मंडळीच्या वडिलांनी लिहिलेली सांत्वनपर पत्रे घेऊन तिच्याकडे जाऊ शकले. सीबॉन्गिलीला ज्या दिवशी शोक व्यक्त करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा पेहराव करायचा होता, त्यादिवशी एक विलक्षण घटना घडली. कुटुंबातील एका वडीलधाऱ्या सदस्याने, शोक व्यक्त करण्याच्या पारंपरिक प्रथा न अनुसरण्याच्या तिच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी एक सभा घेतली.
सीबॉन्गिली सांगते: “माझ्या धार्मिक विश्वासांनुसार मला शोक व्यक्त करण्यासाठी काळा झगा घालता येईल का असे त्यांनी मला विचारले. मी माझी भूमिका समजावून सांगितल्यावर, आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही असे ते म्हणाले. माझ्याशी वाईट रितीने वागून माझ्या इच्छेविरुद्ध केस काढले त्याबद्दल त्या सर्वांनी माझी क्षमा मागितली तेव्हा तर मला आश्चर्यच झाले. सर्वांनी क्षमा करण्याची मला विनंती केली.” नंतर सीबॉन्गिलीच्या बहिणीने, यहोवाच्या साक्षीदारांचाच धर्म खरा आहे यावर आपल्याला विश्वास झाला असल्याचे सांगितले आणि बायबल अभ्यासाची विनंती केली.
दुसरे एक उदाहरण विचारात घ्या: बेन्जमिन नावाचा एक दक्षिण आफ्रिकी मुलगा २९ वर्षांचा असताना त्याला आपल्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी मिळाली. त्यावेळी बेन्जमिन आपल्या कुटुंबातला एकटाच साक्षीदार होता. दफनविधी सुरू असताना, सर्वांना ओळीने कबरेजवळून जाऊन शवपेटीवर मूठभर माती टाकायची होती.d दफनविधीनंतर, कुटुंबातील सर्वांनी मुंडन करून घेतले. बेन्जमिनने या सर्व रिवाजांत भाग घेतला नाही त्यामुळे त्याच्या मृत पित्याचा आत्मा त्याला शिक्षा देईल असे शेजाऱ्यांनी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी भाकीत केले.
बेन्जमिन म्हणतो, “मी यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे मला काहीएक झाले नाही.” कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील हे पाहिले. कालांतराने त्यांपैकी पुष्कळांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास सुरू केला आणि देवाला केलेले आपले समर्पण बाप्तिस्मा घेऊन चिन्हित केले. आणि बेन्जमिनचे काय झाले? त्याने पूर्ण वेळेचे सुवार्तिकाचे काम सुरू केले. मागील काही वर्षांपासून त्याला यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांत एक प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य करण्याचा विशेष सुहक्क मिळाला आहे.
[तळटीप]
d काहींना असे वाटते की कबरेवर फुले किंवा मूठभर माती टाकण्यात काही गैर नाही. पण ही मृतांना शांती लाभण्यासाठी केलेली कृती आहे असे जर समाजातील लोक समजत असतील किंवा ही कृती खोट्या धर्माच्या धर्मसेवकाच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या समारंभात समाविष्ट असेल तर ख्रिस्ती व्यक्तीने असे करण्याचे टाळावे.—सावध राहाच्या! मार्च २२, १९७७ (इंग्रजी) अंकातील पृष्ठ १५ पाहा.