वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 १/१५ पृ. १९-२२
  • आपल्या प्रियजनांकरता आगाऊ योजना करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या प्रियजनांकरता आगाऊ योजना करणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत्यूचा विचार का करावा?
  • मालमत्ता बळकावणे
  • “ती उभयता एकदेह होतील”
  • अंत्यविधीच्या रूढी
  • कायदेशीर कारवाई करणे
  • बाबींची कुटुंबासोबत चर्चा करणे
  • तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करा
  • अंत्यविधीच्या प्रथांविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुमचं कुटुंब सुखी होऊ शकतं!
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
  • कौटुंबिक जीवन यशस्वी करणे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • अंतःकरणापासून आदर मिळवणारा पती
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 १/१५ पृ. १९-२२

आपल्या प्रियजनांकरता आगाऊ योजना करणे

आफ्रिकी वर्तमानपत्रात ऍनीची दुःखद गोष्ट अलीकडेच छापून आली. ऍनीचा पती व्यापारी होता. तो १९९५ मध्ये मरण पावला तेव्हा त्याच्याकडे १५ गाड्या, बँकेची अनेक खाती, सुमारे ४००० (अमेरिकी) डॉलरची रोकड, एक दुकान, एक बार आणि तीन बेडरूम्सचे घर होते. त्याच्याकडे एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे, मृत्युपत्र.

असे म्हटले जाते, की ऍनीच्या दीराने सर्व मालमत्ता व पैसे जप्त केले आणि ऍनीला तिच्या सहा मुलांसह जबरदस्तीने त्यांच्या स्वतःच्या घरातून बाहेर काढले. निराधार झालेली ऍनी आपल्या मुलांसह आता तिच्या भावाकडे राहत आहे. शाळेची फी भरण्यासाठी आणि शाळेचा युनिफॉर्म घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिच्या चार मुलांना शाळा सोडावी लागली आहे.

ऍनीने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर तिला काही मालमत्ता आणि एक गाडी देण्यात यावी असा निर्णय न्यायालयाने दिला. प्रत्यक्षात मात्र तिला काहीच मिळाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तिच्या दीराने अवलंब करावा, याकरता तिला पुन्हा एकदा न्यायालयात जाणे भाग होते.

मृत्यूचा विचार का करावा?

कुटुंबाचा मस्तक त्याच्या मृत्यूच्या शक्यतेची योजना करण्यास चुकतो तेव्हा काय होऊ शकते, हे ऍनीच्या गोष्टीवरून दिसून येते. मरणानंतर प्रत्येक मनुष्य “आपले धन दुसऱ्‍यांना ठेवून जातात.” (स्तोत्र ४९:१०) याशिवाय, आपल्या मालमत्तेचे काय केले जाते यावर मृत व्यक्‍तीचे कोणतेही नियंत्रण नसते. (उपदेशक ९:५, १०) मरणानंतर आपल्या मालमत्तेचे काय करण्यात यावे, हे स्पष्ट होण्यासाठी एखाद्याने मरणाआधीच काही व्यवस्था करणे गरजेचे आहे.

आपला कदाचित अनपेक्षित मृत्यू होऊ शकतो, याची खरे तर आपल्या सर्वांना कल्पना आहे, तरी देखील अनेक जण त्यांच्या प्रियजनांकरता आगाऊ व्यवस्था करून ठेवत नाहीत. आपल्या या चर्चेमुळे आफ्रिकेतील विशिष्ट सांस्कृतिक गटांकडे लक्ष वेधले जाईल, परंतु जगाच्या इतर भागांत देखील काहीशा अशाच प्रकारच्या समस्या आहेत.

मृत्यूची शक्यता लक्षात घेऊन आपल्या मालमत्तेची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करणे किंवा कसे, ही एक व्यक्‍तिगत बाब आहे. (गलतीकर ६:५) तरी देखील एखादा असे विचारेल, ‘एखादा मनुष्य जिवंत असताना आपल्या बायकोची आणि मुलांची मोठ्या प्रेमानं काळजी घेतो, तर मरणाआधी तो त्यांच्या कल्याणासाठी काही व्यवस्था करणार नाही का?’ याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्यांपैकी बहुतेक जणांना या शक्यतेचा विचार देखील करण्यास आवडत नाही, की आपला कदाचित मृत्यू होईल, तर मग मृत्यूपूर्वी योजना करण्याची गोष्ट तर दूरच राहिली. खरे तर, आपला मृत्यू केव्हा होईल, हे आपण आधीच ठरवू शकत नाही कारण बायबल म्हणते: “तुम्हाला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहा ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.”—याकोब ४:१४.

मृत्यूची शक्यता लक्षात ठेवून योजना करणे व्यवहार्य आहे. तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबीयांप्रती तुमची प्रेमळ काळजी देखील यातून दिसून येते. आपण बाबींची योग्य ती व्यवस्था न केल्यास, इतर जण ती व्यवस्था करतील. आपल्या मालमत्तेची आणि आपल्या अंत्यविधीविषयी असे लोक निर्णय घेतील ज्यांच्याशी आपली कधी भेट देखील झालेली नसेल. अशा परिस्थितींत, आपले पैसे आणि आपली मालमत्ता कोणाला देण्यात यावी हे काही देशांत तेथील शासनाद्वारे ठरवण्यात येते. काही ठिकांणी नातेवाईक ठरवतात आणि बहुतेकवेळा त्यांच्या निर्णयांमुळे कलह निर्माण होऊन कुटुंबामध्ये द्वेषभावना बळावते. याखेरीज, इतरांनी घेतलेला निर्णय आपल्या इच्छेपेक्षा कदाचित फारच वेगळा असेल.

मालमत्ता बळकावणे

एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर सर्वात जास्त दुःख होते ते विधवा झालेल्या त्याच्या पत्नीला. आपल्या जीवनसोबत्याच्या मृत्यूमुळे तिला दुःख तर होतेच, शिवाय बहुतेक वेळा तिची मालमत्ताही बळकावली जाते. सुरवातीलाच आपण ऍनीच्या बाबतीत हे पाहिले आहे. पत्नींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले जाते, हे मालमत्ता बळकावण्याचे अंशतः कारण आहे. काही संस्कृतींमध्ये पत्नीला कौटुंबिक सदस्य मानले जात नाही. ती एका अर्थाने परकी आहे, जिला कोणत्याही क्षणी माहेरी जावे लागेल किंवा दुसऱ्‍या कुटुंबात विवाह करून जावे लागेल. उलटपक्षी, ही कारणमीमांसा चालू राहते, की एखाद्या मनुष्याचे भाऊ, त्याच्या बहिणी आणि त्याचे पालक त्याच्या पत्नीला कधीही सोडणार नाहीत. आणि त्याचा मृत्यू झाल्यास, त्याचे कुटुंब असे समजते, की त्याचे सर्वकाही त्यांचेच आहे, त्याच्या बायकोचे आणि मुलांचे त्यात काहीही नाही.

आपल्या पत्नींवर विश्‍वास न ठेवणारे पती अशा प्रकारच्या विचारसरणीला खतपाणी घालतात. माईक आपल्या व्यापाराच्या गोष्टी केवळ त्याच्या भावांसोबत करत असे. मालमत्ता नक्की किती आहे, हे त्यांनाच माहीत होते, पण त्याच्या पत्नीला याविषयी इतकी सुद्धा कल्पना नव्हती. जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे भाऊ त्याच्या पत्नीकडे आले आणि त्यांचा भाऊ ऋणकोकडून जे पैसे अपेक्षित होता ते पैसे त्यांनी तिला मागितले. तिला याविषयी पुसटशी कल्पना देखील नव्हती. त्यानंतर, नवऱ्‍याने तिच्याकरता विकत आणलेले फोटोकॉपियर्स आणि टाईपराईटर्स यावरही त्यांनी हात मारला. अखेरीस त्याच्या भावांनी घर आणि घरातील सर्वकाही घेतले. या विधवेला आणि तिच्या चिमुकल्या मुलीला जबरदस्तीने घरातून घालवून लावले तेव्हा त्या दोघींकडे फक्‍त त्यांचे कपडे होते.

“ती उभयता एकदेह होतील”

ख्रिस्ती पती आपल्या पत्नींवर प्रेम करतात आणि त्यांना भरवशाच्या पात्र समजतात. असे पुरुष पुढील शास्त्रवचनीय सल्ल्यावर मन लावतात: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी.” तसेच हे पुरुष पुढील ईश्‍वरप्रेरित निवेदन मान्य करतात: “पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील, आणि ती उभयता एकदेह होतील.”—इफिसकर ५:२८, ३१.

ईश्‍वरनिष्ठ पती, ख्रिस्ती प्रेषित पौलाशी देखील सहमत आहेत जेव्हा त्याने लिहिले: “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) या तत्त्वाच्या एकवाक्यतेत, ख्रिस्ती पतीने लांबच्या प्रवासाची योजना केल्यास, त्यांच्यापासून दूर असताना कुटुंबाची काळजी घेतली जावी म्हणून तो योग्य ती व्यवस्था करील. त्याचप्रमाणे, मृत्यूआधी तो आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या कल्याणासाठी आगाऊ व्यवस्था करील, हे तर्कसंगत नाही का? असे करणे केवळ व्यावहारिकच नाही, तर अनपेक्षित अनर्थासाठी तयारी करताना प्रेमळपणाचे देखील आहे.

अंत्यविधीच्या रूढी

ख्रिस्ती पतीला याबाबतीत विचार करण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. जीवनसोबती, मालमत्ता आणि कदाचित मुलांना देखील गमावल्यामुळे विधवेला अपार दुःख होते, तरी सुद्धा सुतक पाळण्याच्या पारंपरिक पद्धतींचे तिने पालन करावे म्हणून काही समाज तिला जबरदस्तीही करतात. नायजेरियातील द गार्डियन नामक एक वर्तमानपत्र दुःखदपणे म्हणते, की विधवेने तिच्या पतीच्या मृत शरीरासोबत अंधार असलेल्या खोलीत झोपावे, अशी काही क्षेत्रांतील परंपरा आहे. इतर ठिकांणी, जवळजवळ सहा महिन्यांचा सुतक पाळण्याचा कालावधी पूर्ण करेपर्यंत विधवा स्त्रिया घराच्या बाहेर निघू शकत नाहीत. त्या काळादरम्यान त्यांनी स्नान करता कामा नये आणि इतकेच नव्हे तर जेवणाआधी आणि जेवणानंतर हात धुणे सुद्धा त्यांच्याकरता निषिद्ध मानले जाते.

अशा प्रकारच्या रूढींमुळे विशेषतः ख्रिस्ती विधवांकरता समस्या निर्माण होते. देवाला आनंदी करण्याची इच्छा असल्यामुळे ह्‍या विधवा बायबल शिकवणीच्या एकवाक्यतेत नसलेल्या रूढी टाळण्यासाठी प्रेरित होतात. (२ करिंथकर ६:१४, १७) तथापि, त्या रूढी मान्य न केल्यास एखाद्या विधवेचा कदाचित छळ करण्यात येईल. तिला आपला जीव वाचवण्यासाठी कदाचित पलायन देखील करावे लागेल.

कायदेशीर कारवाई करणे

बायबल सुज्ञपणे असे म्हणते: “उद्योग्याचे विचार [“योजना,” NW] समृद्धि करणारे असतात.” (नीतिसूत्रे २१:५) कुटुंबाचा मस्तक कोणत्या योजना करू शकतो? बहुतेक समाजांत मृत्युपत्र बनवणे किंवा मृत्यूनंतर एखाद्याच्या मालमत्तेचे कशा प्रकारे विभाजन करण्यात यावे, याचा खुलासा करणारा दस्तऐवज तयार करणे शक्य आहे. यात कदाचित अंत्यविधीच्या माहितीचा तपशीलवार समावेश केला जाऊ शकतो. या दस्ताऐवजात कदाचित हे देखील स्पष्ट केले जावे, की अंत्यविधी आणि सुतक पाळण्याच्या रूढी यांबाबतीत विवाह सोबत्याने काय करावे (किंवा काय करू नये).

लिया नामक एका स्त्रीचा पती १९९२ मध्ये मरण पावला. ती म्हणते: “मला पाच मुलं आहेत—चार मुली आणि एक मुलगा. मृत्यू होण्यापूर्वी माझे पती काही काळ आजारी होते. पण आजारी पडण्याआधीच त्यांनी मृत्युपत्रात त्यांची इच्छा लिहून ठेवली होती, की त्यांची सर्व मालमत्ता मला आणि मुलांना मिळावी. यामध्ये विम्यापासून मिळणारे पैसे, शेती, जनावरं आणि एक घर होतं. त्यांनी मृत्युपत्रावर स्वाक्षरी केली आणि ते मला दिलं. . . . माझ्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीत नातेवाईक स्वतःचा हिस्सा दाखवू लागले. तेव्हा मी त्यांना सांगितलं, की माझ्या पतीने शेती त्यांच्या स्वतःच्या पैशाने खरेदी केली होती आणि तिच्यासाठी दावा करण्याचा कोणालाही काहीही हक्क नाही. लिखित स्वरूपातील मृत्युपत्र पाहिल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं.”

बाबींची कुटुंबासोबत चर्चा करणे

एखादा मनुष्य आपल्या विश्‍वासांविषयी आणि इच्छांविषयी आपल्या कुटुंबासोबत बोलत नाही तेव्हा समस्या निर्माण होऊ शकतात. एका मनुष्याच्या बाबतीत जे घडले त्याचा विचार करा; त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आग्रह धरला, की स्थानिक रूढीनुसार त्याचे गावात दफन करण्यात यावे. जेव्हा त्याच्या विधवा पत्नीचा आणि मुलांचा जीव धोक्यात आला तेव्हा त्यांना नाइलाजाने त्याचे मृत शरीर नातेवाईकांकडे देऊन तेथून काढता पाय घ्यावा लागला. ती खेदाने म्हणते: “माझ्या पतीने त्यांच्या चुलत्यांना किंबहुना त्यांच्या चुलत भावांना दफनविधीबद्दल आगाऊच सांगितलं असतं, तर नातेवाईकांनी पारंपरिक पद्धतीनं अंत्यविधीचा आग्रह धरला नसता.”

काही समाजांमध्ये तोंडी करार, लिखित दस्ताऐवजाप्रमाणे बंधनकारक असतो. अशी परिस्थिती स्वाझीलँडच्या काही भागांत आहे जेथील अनेक लोकांचा विश्‍वास पारंपरिक अंत्यविधीच्या आणि सुतक पद्धतींना हातभार लावणारा आहे. याची कल्पना असल्यामुळे, आयझक नावाच्या एका ख्रिस्ती इसमाने यहोवाचे साक्षीदार नसलेल्या त्याच्या नातेवाईकांना एकत्र बोलावले आणि आपल्या मृत्यूनंतर काय करण्यात यावे, यावर त्याने त्यांच्याशी चर्चा केली. त्याने त्यांना सांगितले, की कोणाला विशिष्ट मालमत्ता द्यावी आणि त्याने हे सुद्धा स्पष्ट केले, की आपल्यावर कोणत्या प्रकारे अंत्यविधी करण्यात यावा. त्याच्या मृत्यूनंतर सर्वकाही त्याच्या इच्छेप्रमाणे झाले. आयझकवर ख्रिस्ती पद्धतीने अंत्यविधी करण्यात आला आणि त्याच्या पत्नीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आली.

तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करा

मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाच्या संरक्षणार्थ तुम्ही आगाऊ काय कराल, ही व्यक्‍तिगत बाब आहे; पण एडवर्ड नामक ख्रिस्ती असे म्हणतो: “माझ्या कुटुंबातील आठ सदस्यांच्या लाभास्तव मी जीवन विमा उतरवला आहे. माझ्या बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यास माझ्या पत्नीची स्वाक्षरी चालते. त्यामुळे माझा मृत्यू झाल्यास ती माझ्या खात्यातून पैसे काढू शकते. . . . माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मी मृत्युपत्र करून ठेवलंय. मी मरण पावल्यास मी जे काही मागे ठेवीन ते सर्व माझ्या पत्नीचं आणि मुलांचं असेल. मी पाच वर्षांपूर्वीच मृत्युपत्र करून ठेवलं आहे. मी ते एका वकिलाकडून तयार करून घेतलंय आणि माझ्या पत्नीकडे व माझ्या मुलाकडे त्याची एक-एक प्रत आहे. नातेवाईकांनी माझ्या अंत्यविधीमध्ये कोणताही हस्तक्षेप करू नये, हे मी माझ्या मृत्युपत्रात स्पष्ट केलं आहे. मी यहोवाच्या संघटनेचा सदस्य आहे. त्यामुळे माझ्या अंत्यविधीकरता एक किंवा दोन साक्षीदार असले तरी पुरे. या सर्व गोष्टींची चर्चा मी माझ्या नातेवाईकांसोबत केली आहे.”

म्हणजेच, अशा प्रकारची व्यवस्था करणे तुमच्या कुटुंबाकरता एक भेटवस्तू आहे. अर्थातच, मृत्यूच्या शक्यतेची योजना करणे चॉकलेट किंवा फुलांचा गुच्छ देण्यासारखे नाही. तरी सुद्धा, यातून तुमचे प्रेम दिसून येते. यातून शाबीत होते, की ‘तुमच्या घरच्यांची तरतूद’ करण्याची तुमची इच्छा आहे, तुम्ही त्यांच्यासोबत नसाल तेव्हा देखील.

[६ पानांवरील चौकट/चित्र]

आपल्या आईकरता येशूने तरतूद केली

“येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालीया ह्‍या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पाहा, हा तुझा मुलगा! मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पाहा, ही तुझी आई! आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने [योहानाने] तिला आपल्या घरी ठेवून घेतले.”—योहान १९:२५-२७.

[२२ पानांवरील चित्र]

अनेक ख्रिस्ती आपल्या कुटुंबांच्या संरक्षणार्थ विचारपूर्वक कायदेशीर पावले उचलतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा