वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ७/१५ पृ. १४-१९
  • तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाने आपल्या कामापासून विसावा घेतला
  • इस्राएलने देवाच्या विसाव्यात प्रवेश केला नाही
  • अद्याप विसावा राहिला आहे
  • देवाच्या विसाव्यात प्रवेश करा
  • देवाचे वचन सक्रिय आहे
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • देवाचा विसावा काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • काम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा उचित काळ आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ७/१५ पृ. १४-१९

तुम्ही देवाच्या विसाव्यात प्रवेश केला आहे का?

“जो कोणी [देवाच्या] विसाव्यात आला आहे त्यानेहि, . . . आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.”—इब्री लोकांस ४:१०.

१. विसावा इतका हवाहवासा का वाटतो?

विसावा. या शब्दातच किती सुखावह गोडवा आहे! आजच्या जगातल्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात थोडासाच का होईना, पण विसावा कोणालाही हवाहवासा वाटतो. तरुण असो की वृद्ध, विवाहित असो की अविवाहित, आपल्या सर्वांना नुसतेच दररोजचे जिणे देखील थकवून, शिणवून टाकते. आणि ज्यांना शारीरिक दुर्बलता किंवा अपंगत्व आहे, अशांसाठी तर प्रत्येक दिवस एक आव्हान घेऊनच उजाडतो. “सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे,” असे बायबलमध्ये काही उगीच म्हटलेले नाही. (रोमकर ८:२२) पण विसावा घेत असलेली व्यक्‍ती आळशी आहे असे नेहमीच म्हणता येणार नाही. माणसाला विसाव्याची गरज असते आणि ही गरज भागवल्याशिवाय चालत नाही.

२. यहोवा केव्हापासून विसावा घेत आहे?

२ स्वतः यहोवा देव देखील काही काळापासून विसावा घेत आहे. उत्पत्तिच्या पुस्तकात आपण वाचतो: “याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही सिद्ध झाले. देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपविले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला.” यहोवाच्या लेखी हा “सातवा दिवस” खास महत्त्वाचा होता कारण प्रेरित अहवाल पुढे म्हणतो, “देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.”—उत्पत्ति २:१-३.

देवाने आपल्या कामापासून विसावा घेतला

३. देवाने विसावा घेतला यामागे कोणती कारणे असू शकत नाहीत?

३ देवाने “सातव्या दिवशी” विसावा का घेतला? अर्थातच, थकवा आल्यामुळे नाही. यहोवा “महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे,” आणि तो “थकतभागत नाही.” (यशया ४०:२६, २८) तसेच साचेबद्ध कामाचा कंटाळा घालवण्यासाठी देवाला विसावा किंवा विरंगुळा हवा होता असेही नाही; येशूने आपल्याला सांगितले: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीहि काम करीत आहे.” (योहान ५:१७) शेवटी, “देव आत्मा आहे,” आणि प्राणिमात्रांच्या शरीरांतील चक्र किंवा त्यांच्यासारख्या गरजा देवाला नाहीत.—योहान ४:२४.

४. “सातवा दिवस” त्याआधीच्या सहा ‘दिवसांपेक्षा’ वेगळा कसा होता?

४ मग देवाने “सातव्या दिवशी” विसावा का घेतला हे आपण कशाप्रकारे समजून घेऊ शकतो? त्यासाठी आपल्याला या बाबीकडे लक्ष दिले पाहिजे, की निर्मितीच्या याआधाच्या सहा ‘दिवसांच्या’ दीर्घ कालावधीदरम्यान, आपण पूर्ण केलेल्या कामाविषयी देवाला अत्यंत समाधान झाले हे खरे आहे; पण ‘सातव्या दिवसाला’ मात्र देवाने खासपणे आशीर्वाद दिला व त्यास “पवित्र” घोषित केले. कन्साईस ऑक्सफोर्ड डिक्शनरी “पवित्र” या शब्दाची, “(एखाद्या देवाला किंवा विशिष्ट धार्मिक उद्देशाला) पूर्णपणे समर्पित किंवा त्यासाठी खासपणे राखून ठेवलेले,” अशी व्याख्या करते. ज्याअर्थी, यहोवाने “सातवा दिवस” आशीर्वाद देऊन पवित्र केला, त्याअर्थी त्याच्या ‘विसाव्याचा’ संबंध त्याच्या स्वतःच्या गरजांशी नसून, त्याच्या पवित्र इच्छेशी आणि उद्देशाशी असावा. कशाप्रकारे हा संबंध असावा?

५. निर्मितीच्या पहिल्या सहा ‘दिवसांत’ देवाने कशास कार्यरत केले?

५ याआधीच्या सहा निर्मितीच्या ‘दिवसांत,’ पृथ्वी आणि त्याभोवतीच्या सर्व गोष्टींचे कार्य ज्या चक्रांवर आणि ज्या नियमांवर अवलंबून आहे, ते देवाने बनविले आणि त्यांस त्याने कार्यरत केले. यांची रचना किती अद्‌भुतरितीने करण्यात आली आहे याचा शास्त्रज्ञांना आताशी उलगडा होऊ लागला आहे. ‘सहाव्या दिवसाच्या’ समाप्तीस, देवाने पहिले मानवी जोडपे निर्माण केले आणि त्याने त्यांना ‘पूर्वेस असणाऱ्‍या एदेन बागेत’ ठेवले. शेवटी देवाने मानवी कुटुंबाकरता आणि पृथ्वीकरता असणारा आपला उद्देश या भविष्यसूचक शब्दांत घोषित केला: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.”—उत्पत्ति १:२८, ३१; २:८.

६. (अ) ‘सहाव्या दिवसाच्या’ समाप्तीस आपण निर्मिलेल्या सर्व गोष्टींविषयी देवाला काय वाटले? (ब) “सातवा दिवस” कोणत्या अर्थाने पवित्र आहे?

६ “सहावा दिवस” संपत आला तेव्हा, अहवाल सांगतो की: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ति १:३१) देवाने जे काही केले होते, त्याविषयी त्याला समाधान वाटले. या अर्थाने त्याने विसावा घेतला, किंवा पृथ्वीच्या संबंधाने आणखी निर्मिती करण्याचे त्याने थांबवले. तो बगिचा अर्थात परादीस अगदी परिपूर्ण आणि सर्वांगसुंदर होते, पण ते केवळ एक लहानशा क्षेत्रापर्यंतच होते आणि पृथ्वीवर फक्‍त दोनच मनुष्यप्राणी होते. पृथ्वी आणि मानवजात देवाने उद्देशलेल्या स्थितीत येण्याकरता बराच अवकाश लागणार होता. त्यामुळे, त्याने एक “सातवा दिवस” नेमला ज्यात त्याआधीच्या सहा ‘दिवसांत’ त्याने निर्माण केलेले सर्वकाही, त्याच्या पवित्र इच्छेनुरूप वाढणार होते. (पडताळा इफिसकर १:११.) “सातवा दिवस” संपेल तोपर्यंत सबंध पृथ्वी एक बगिचा, परादीस बनलेली असेल, ज्यात सदासर्वकाळ परिपूर्ण मानवजात नांदेल. (यशया ४५:१८) “सातवा दिवस” हा पृथ्वी आणि मानवजातीसंबंधाने देवाची इच्छा पूर्णतेस नेण्यासाठी राखून ठेवलेला, किंवा समर्पित आहे. त्या अर्थाने तो “पवित्र” आहे.

७. (अ) “सातव्या दिवशी” देवाने कोणत्या अर्थाने विसावा घेतला? (ब) “सातवा दिवस” समाप्तीस येईल तोवर सर्वकाही कशाप्रकारे घडून येईल?

७ देवाने “सातव्या दिवशी” आपल्या निर्मिती कार्यापासून विसावा घेतला. आपण जे सुरू केले ते आता स्वतःहून शेवटपर्यंत चालावे म्हणून जणू तो मार्गातून बाजूला झाला. त्याला पूर्ण खात्री आहे की ‘सातव्या दिवसाच्या’ शेवटापर्यंत सर्वकाही त्याने उद्देशल्याप्रमाणेच घडून आलेले असेल. काही अडथळे आले असले तरीसुद्धा, ते दूर करण्यात आलेले असतील. देवाची इच्छा पूर्णपणे वास्तवात उतरेल तेव्हा सर्व आज्ञाधारक मानवांना फायदे लाभतील. काहीसुद्धा याच्या आड येऊ शकणार नाही कारण ‘सातव्या दिवसावर’ देवाचा आशीर्वाद आहे आणि त्याने तो “पवित्र” केला आहे. आज्ञाधारक मानवांकरता किती अद्‌भुत भवितव्य!

इस्राएलने देवाच्या विसाव्यात प्रवेश केला नाही

८. इस्राएली लोक केव्हापासून आणि कशाप्रकारे शब्बाथ पाळू लागले?

८ काम आणि विसावा यासंबंधाने यहोवाने केलेली व्यवस्था इस्राएलच्या फायद्याचीच होती. सिनाय पर्वतावर त्यांना नियमशास्त्र देण्याआधी देखील देवाने मोशेच्या द्वारे त्यांना सांगितले की, “पाहा, परमेश्‍वराने तुम्हाला शब्बाथ दिला आहे म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हाला दोन दिवसांचे अन्‍न देतो; सातव्या दिवशी प्रत्येकाने आपआपल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले ठिकाण सोडून कोणीहि बाहेर जाऊ नये.” त्यामुळे, “लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला [शब्बाथ पाळला].”—निर्गम १६:२२-३०.

९. शब्बाथाचा नियम इस्राएली लोकांसाठी साहजिकच स्वागतार्ह का होता?

९ इजिप्तच्या दासत्वातून नुकतेच स्वतंत्र झालेल्या इस्राएली लोकांना ही व्यवस्था नवीन होती. इजिप्त आणि इतर देशांतील लोक पाच ते दहाच्या गटांत दिवसांची मोजणी करत असत; पण गुलामीत असलेल्या इस्राएली लोकांना ते विसाव्याकरता सुटी देत नसावेत. (पडताळा निर्गम ५:१-९.) त्यामुळे हा बदल त्यांनी आनंदाने स्वीकारला असेल असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही. शब्बाथाचा नियम एक त्रासदायक निर्बंध आहे असे समजण्याऐवजी, त्यांनी आनंदाने त्याचे पालन करायला हवे होते. देवाने तर नंतर त्यांना असेही सांगितले की शब्बाथ त्यांना इजिप्तमधील दासत्वाची आणि त्यातून देवाने त्यांना कसे सोडवले होते याची आठवण म्हणून राहणार होता.—अनुवाद ५:१५.

१०, ११. (अ) आज्ञाधारक राहिल्यास, इस्राएली लोकांसमोर कोणती आनंददायक आशा होती? (ब) इस्राएली लोक देवाच्या विसाव्यात का प्रवेश करू शकले नाहीत?

१० मोशेसोबत इजिप्तमधून बाहेर आलेले इस्राएली लोक आज्ञाधारक राहिले असते, तर त्यांना “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा [वाग्दत्त] देशांत” प्रवेशण्याची सुसंधी मिळाली असती. (निर्गम ३:८) तेथे त्यांना खरा विसावा लाभला असता, केवळ शब्बाथाच्या दिवशीच नव्हे तर त्यांच्या सबंध जीवनभर. (अनुवाद १२:९, १०) परंतु, असे घडले नाही. त्या लोकांविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “ऐकूनहि, कोणी चीड आणिली? मोशेच्या द्वारे मिसरातून [इजिप्तमधून] निघालेले सर्वच नव्हत काय? आणि चाळीस वर्षे तो कोणावर संतापला? ज्यांनी पाप केले, ज्यांची प्रेते रानात पडली, त्यांच्यावर नव्हे काय? आणि शपथ वाहून तो कोणाला म्हणाला की, तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तरी ह्‍यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्‍वासामुळे त्यांना आत येता आले नाही.”—इब्री लोकांस ३:१६-१९.

११ किती मोठा धडा शिकायला मिळतो यातून आपल्याला! यहोवावर विश्‍वास नसल्यामुळे त्याने जो विसावा देण्याचे अभिवचन दिले होते, तो विसावा त्या पिढीला मिळू शकला नाही. त्याउलट ते सर्व अरण्यात नाश पावले. अब्राहामाचे वंशज असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळवून देण्याबद्दल देवाच्या इच्छेच्या पूर्णतेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता हे त्यांनी पूर्णपणे समजून घेतले नाही. (उत्पत्ति १७:७, ८; २२:१८) देवाच्या इच्छेनुरूप कार्य करण्याऐवजी, ते आपल्याच सांसारिक स्वार्थांत पूर्णपणे गुरफटून गेले होते. आपण कधीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवता कामा नये!—१ करिंथकर १०:६, १०.

अद्याप विसावा राहिला आहे

१२. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांसमोर अद्यापही कोणती आशा होती आणि ती मिळवण्याकरता त्यांना काय करायचे होते?

१२ अविश्‍वासामुळे इस्राएल देवाच्या विसाव्यात आले नाही याकडे लक्ष वेधल्यानंतर पौल आता आपल्या सहविश्‍वासू बांधवांना संबोधतो. इब्री लोकांस ४:१-५ येथे सांगितल्यानुसार, तो त्यांना खात्री देतो की “[देवाच्या] विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेविलेले आहे.” पौल त्यांना ‘सुवार्तेवर’ विश्‍वास ठेवण्याचे प्रोत्साहन देतो कारण “ज्या आपण विश्‍वास ठेविला आहे, ते आपण [विसाव्यात] प्रवेश करीत आहो.” पौल येथे शब्बाथाकरवी मिळणाऱ्‍या शारीरिक विसाव्यासंबंधी बोलत नव्हता, कारण येशूच्या खंडणी बलिदानाने नियमशास्त्र आधीच संपुष्टात आलेले होते. (कलस्सैकर २:१३, १४) उत्पत्ति २:२ आणि स्तोत्र ९५:११ चे शब्द उद्धृत करताना पौल हिब्रू ख्रिश्‍चनांना देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्याचे प्रोत्साहन करीत होता.

१३. स्तोत्र ९५ उद्धृत करताना, पौलाने “आज” या शब्दाकडे लक्ष का वेधले?

१३ शब्बाथाच्या दिवशी विसावा घ्यावा ही जशी पूर्वीच्या इस्राएली लोकांसाठी एक “सुवार्ता” होती, त्याच प्रकारे देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्याची संधी ही हिब्रू ख्रिश्‍चनांच्या लेखी एक “सुवार्ता” असायला हवी होती. म्हणूनच, पौलाने आपल्या सहविश्‍वासू बांधवांना आर्जवून सांगितले की इस्राएली लोकांनी अरण्यात केलेली चूक त्यांनी पुन्हा करू नये. निर्मितीनंतर देवाने विसावा घेऊन बराच काळ लोटला होता; तरीसुद्धा, आपण ज्यांना आता स्तोत्र ९५:७, ८ म्हणू, त्या वचनांचा उल्लेख करून पौल “आज” या शब्दाकडे विशेष लक्ष आकर्षित करतो. (इब्री लोकांस ४:६, ७) पौल काय सांगू इच्छित होता? हेच, की देवाने पृथ्वी आणि मानवजात यांसंबंधी आपला उद्देश पूर्णपणे साध्य होण्याकरता जो “सातवा दिवस” राखून ठेवलेला होता, तो अद्यापही सुरूच होता. त्यामुळे, त्याच्या ख्रिस्ती बांधवांनी स्वतःच्या स्वार्थी अभिलाषांच्या मागे न लागता देवाच्या उद्देशानुरूप कार्य करावे ही एक तातडीची गरज होती. त्याने पुन्हा एकदा ताकीद दिली: “आपली मने कठीण करू नका.”

१४. देवाचा “विसावा” अद्याप राहिला आहे हे पौलाने कसे दाखवून दिले?

१४ याव्यतिरिक्‍त, देवाने ज्याचे अभिवचन दिले होते तो “विसावा” केवळ यहोशवाच्या नेतृत्त्वाखाली वाग्दत्त देशात जाऊन स्थायिक होण्यापुरता मर्यादित नव्हता, हे देखील पौलाने स्पष्ट केले. (यहोशवा २१:४४) आपला मुद्दा सिद्ध करण्याकरता पौल म्हणतो, “कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो (देव) दुसऱ्‍या दिवसाविषयी बोलला नसता.” आणि त्यामुळे पौल पुढे म्हणतो: “देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.” (इब्री लोकांस ४:८, ९) या ‘शब्बाथाच्या विसाव्याचा’ काय अर्थ आहे?

देवाच्या विसाव्यात प्रवेश करा

१५, १६. (अ) “शब्बाथाचा विसावा” या शब्दप्रयोगातून कोणता अर्थबोध होतो? (ब) ‘आपल्या कृत्यांपासून विसावा घेणे’ याचा काय अर्थ होतो?

१५ “शब्बाथाचा विसावा” हा शब्दप्रयोग, “शब्बाथ पाळणे” या अर्थाच्या ग्रीक शब्दाचे भाषांतरित स्वरूप आहे. (किंग्डम इंटरलिनियर) प्राध्यापक विल्यम लेन सांगतात: “निर्गम २०:८-१० या वचनांत विसावा आणि आराधना एकमेकांशी निगडीत आहेत यावर जोर दिला आहे; या वचनांच्या आधारावर यहुदी धर्मात शब्बाथासंबंधी ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यांतूनच या शब्दप्रयोगाला एक खास अर्थ आला आहे . . . [यात] देवाच्या भक्‍तीतून आणि आराधनेतून व्यक्‍त होणारा हर्षसोहळा आणि आनंदोल्लास यांवर विशेष भर आहे.” त्याअर्थी, अभिवचनाचा विसावा म्हणजे केवळ कामापासून सुटका नाही. उलट, कंटाळवाण्या, उद्देशहीन परिश्रमाऐवजी, देवाला गौरव आणणारी आनंददायक सेवा करणे असा त्याचा अर्थ होतो.

१६ हे पौलाच्या पुढील शब्दांवरून दिसून येते: “कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेहि, जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा, आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.” (इब्री लोकांस ४:१०) निर्मितीच्या सातव्या दिवशी देवाने विसावा घेतला तो थकवा आल्यामुळे नाही; तर त्याने निर्मिलेली सृष्टी वाढत जाऊन पूर्ण गौरवात यावी आणि त्याकरवी तो आराधला जावा, गौरविला जावा यासाठी त्याने पृथ्वीचे निर्मिती कार्य थांबवले होते. देवाच्या निर्मितीत आपणही सामील असल्यामुळे या व्यवस्थेला आपणही सहकार्य दिले पाहिजे. आपण “आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला” पाहिजे, म्हणजेच आपण तारण मिळवण्याच्या हेतूने देवासमोर आपला धार्मिकपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न सोडून दिला पाहिजे. त्याउलट आपण देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवला पाहिजे. आपल्याला तारण हे येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर मिळेल आणि त्याच्याचद्वारे सर्वकाही पुन्हा एकदा देवाच्या उद्देशाच्या एकवाक्यतेत आणले जाईल यावर आपल्याला विश्‍वास असला पाहिजे.—इफिसकर १:८-१४; कलस्सैकर १:१९, २०.

देवाचे वचन सक्रिय आहे

१७. शारीरिक इस्राएलने केलेली कोणती चूक आपण टाळली पाहिजे?

१७ इस्राएली लोक आज्ञाभंजक आणि अविश्‍वासू असल्यामुळे देवाने अभिवचन दिलेल्या विसाव्यात प्रवेश करू शकले नाहीत. या कारणास्तव पौलाने हिब्रू ख्रिश्‍चनांना आर्जवून म्हटले: “त्या ‘विसाव्यात येण्याचा’ आपण होईल तितका प्रयत्न करावा. ह्‍यासाठी की, त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये.” (इब्री लोकांस ४:११) पहिल्या शतकातील बहुतेक यहुद्यांनी येशूवर विश्‍वास ठेवला नाही आणि सा.यु. ७० साली यहुदी व्यवस्थीकरण नष्ट झाले तेव्हा त्यांपैकी बऱ्‍याच जणांना भयंकर परिस्थिती सोसावी लागली. आज देवाच्या अभिवचनावर आपला विश्‍वास असणे किती महत्त्वाचे आहे!

१८. (अ) देवाच्या वचनावर विश्‍वास ठेवण्याकरता पौलाने कोणकोणती कारणे दिली? (ब) देवाचे वचने “कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण” का आहे?

१८ यहोवाच्या वचनावर विश्‍वास ठेवण्याकरता आपल्याजवळ ठोस आधार आहे. पौलाने लिहिले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री लोकांस ४:१२) खरोखर, देवाचे वचन, अर्थात संदेश “कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण [आहे].” हिब्रू ख्रिश्‍चनांनी आपल्या पूर्वजांच्या बाबतीत काय घडले ते लक्षात ठेवायचे होते. तुम्ही अरण्यात नाश व्हाल असा न्यायदंड यहोवाने बजावल्यावरही त्यांनी वाग्दत्त देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अर्थात मोशेने त्या लोकांना ताकीद दिली होती, की “तुमच्यापुढे आमलेकी व कनानी लोक आहेत म्हणून तुम्ही तरवारीने पडाल.” पण कशाची तमा न बाळगता, इस्राएली लोक जेव्हा पुढे सरसावले, तेव्हा “पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्‍यांनी खाली उतरून त्यांना मार देत हर्मापर्यंत पिटाळून लाविले.” (गणना १४:३९-४५) यहोवाचे वचन कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे आणि त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्‍याला याचे परिणाम भोगावेच लागतील.—गलतीकर ६:७-९.

१९. देवाचे वचन किती प्राबल्याने “भेदून आरपार जाते,” आणि देवाप्रती आपण जबाबदार आहोत हे आपण का ओळखले पाहिजे?

१९ देवाचे वचन अत्यंत प्राबल्याने “जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार [जाते]”! ते माणसाचे विचार आणि हेतू यांना भेदून, प्रतिकात्मकपणे हाडांच्याही अगदी आतपर्यंत, जणू मज्जेलाही भेदून जाते! इजिप्तच्या गुलामीतून स्वतंत्र झालेल्या इस्राएली लोकांनी नियमशास्त्र पाळण्याची तयारी दाखवली असली तरीसुद्धा, यहोवाला माहीत होते की त्यांच्या मनांत देवाच्या तरतुदींबद्दल आणि अपेक्षांबद्दल कदर नव्हती. (स्तोत्र ९५:७-११) त्याची इच्छा पूर्ण करण्याऐवजी, ते स्वतःच्या शारीरिक वासना पूर्ण करण्यामागे लागले होते. त्यामुळे ते देवाने अभिवचन दिलेल्या विसाव्यात प्रवेश करू शकले नाहीत, तर अरण्यात नाश पावले. यातून आपण धडा घेतला पाहिजे, कारण “त्याच्या दृष्टीला अदृश्‍य अशी कोणतीहि निर्मिति नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” (इब्री लोकांस ४:१३) असे असल्यामुळे आपण ‘ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्‍यांपैकी न होता’ देवाला केलेल्या आपल्या समर्पणानुसार जगले पाहिजे.—इब्री लोकांस १०:३९.

२०. भवितव्यात काय आहे, आणि देवाच्या विसाव्यात येण्याकरता आपण आताच काय केले पाहिजे?

२० “सातवा दिवस”—देवाच्या विसाव्याचा दिवस—अद्याप सुरू असला तरीसुद्धा, पृथ्वी आणि मानवजातीसंबंधी आपला उद्देश पूर्णत्वास नेण्याकरता तो अत्यंत जागरूक आहे. फार लवकर, मशीही राजा येशू ख्रिस्त दियाबल सैतानासहित देवाच्या इच्छेचा विरोध करणाऱ्‍या सर्वांचा पृथ्वीवरून नाश करील. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यादरम्यान, येशू आणि त्याच्यासोबत राज्य करणारे १,४४,००० सहशासक, पृथ्वीला आणि मानवजातीला देवाने उद्देशलेल्या स्थितीत आणतील. (प्रकटीकरण १४:१; २०:१-६) यहोवा देवाची इच्छाच आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. देवापुढे आपला धार्मिकपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आणि स्वतःच्याच इच्छा आकांक्षांच्या मागे लागण्याऐवजी ही वेळ “आपल्या कृत्यांपासून विसावा” घेऊन राज्याच्या बढतीकरता मनोभावे सेवा करण्याची आहे. असे करण्यासोबतच आपण आपल्या स्वर्गीय पिता यहोवाला विश्‍वासू राहिल्यास देवाच्या विसाव्याकरवी मिळणारे असंख्य फायदे आपल्याला लाभतील, आजच नव्हे तर सर्वकाळ.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

◻ देवाने “सातव्या दिवशी” विसावा घेण्यामागचा उद्देश काय होता?

◻ इस्राएली लोकांना कोणता विसावा लाभू शकला असता पण ते या विसाव्यात का प्रवेश करू शकले नाहीत?

◻ देवाच्या विसाव्यात प्रवेश करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

◻ देवाचे वचन सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे असे का म्हणता येईल?

[१६, १७ पानांवरील चित्र]

इस्राएली लोकांनी शब्बाथ पाळला पण ते देवाच्या विसाव्यात प्रवेश करू शकले नाहीत. असे का घडले हे तुम्हाला माहीत आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा