‘ख्रिस्तामध्ये चालत राहा’
“तर ख्रिस्त येशू जो प्रभु, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा.”—कलस्सैकर २:६.
१, २. (अ) हनोखने त्याच्या जीवनात विश्वासूपणे यहोवाची सेवा केल्याचे वर्णन बायबल कसे करते? (ब) कलस्सैकर २:६, ७ मध्ये सूचित केल्याप्रमाणे, यहोवाने आपल्याला त्याच्याबरोबर चालत राहण्यास कशी मदत केली आहे?
तुम्ही कधी एका लहान मुलाला त्याच्या वडिलांबरोबर चालताना पाहिले आहे का? तो आपल्या वडिलांच्या प्रत्येक हालचालीचे अनुसरण करतो, त्यांच्याकडे अगदी कौतुकाने पाहतो; ते त्याला मदत करतात, त्यांची स्वतःची भावमुद्रा प्रेमळ आणि पसंती दर्शवणारी असते. उचितपणे, एखाद्याने विश्वासूपणे केलेल्या त्याच्या सेवेचे वर्णन करण्याकरता यहोवा हुबेहूब अशाच वर्णनाचा उपयोग करतो. जसे की, विश्वासू हनोख “[खऱ्या] देवाबरोबर चालला” असे देवाचे वचन म्हणते.—उत्पत्ति ५:२४; ६:९.
२ एक दयाळू पिता आपल्या मुलाला त्याच्याबरोबर चालण्यास जसा मदत करतो तसेच यहोवानेही आपल्याला शक्य ते सर्वोत्तम साहाय्य पुरवले आहे. त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर पाठवले. येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरील जीवनात वारंवार आपल्या स्वर्गीय पित्याचे गुण हुबेहूब प्रदर्शित केले. (योहान १४:९, १०; इब्री लोकांस १:३) यास्तव, देवाबरोबर चालत राहण्याकरता आपण येशूबरोबर चालणे जरूरीचे आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “तर ख्रिस्त येशू जो प्रभु, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा, त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हास शिकविल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले, विश्वासाने उपकारस्तुती ओसंडू द्या.”—कलस्सैकर २:६, ७, NW.
३. कलस्सैकर २:६, ७ नुसार, ख्रिस्तामध्ये चालत राहण्यात केवळ बाप्तिस्मा घेणे एवढेच समाविष्ट नाही असे आपण का म्हणू शकतो?
३ ख्रिस्तामध्ये चालत राहण्याची इच्छा असल्यामुळे, त्याच्या परिपूर्ण पावलांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नास्तव प्रामाणिक अंतःकरणाचे बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा घेतात. (लूक ३:२१; इब्री लोकांस १०:७-९) संपूर्ण जगभरात केवळ १९९७ मध्येच, ३,७५,००० लोकांनी—दर दिवशी सरासरी, १,००० पेक्षा अधिक लोकांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. ही वाढ रोमांचकारी आहे! परंतु, ख्रिस्तामध्ये चालत राहण्यात केवळ बाप्तिस्मा घेणे एवढेच समाविष्ट नाही हे कलस्सैकर २:६, ७ मधील पौलाचे शब्द दाखवून देतात. “चालत राहा” असे भाषांतर करण्यात आलेले ग्रीक क्रियापद, एक असे कार्य दर्शवते जे सतत, चालू असावयास हवे. शिवाय, पौल पुढे असे म्हणतो, की ख्रिस्तामध्ये चालत राहण्यात चार गोष्टींचा समावेश होतो: ख्रिस्तामध्ये मुळावणे, त्याच्यामध्ये रचले जाणे, विश्वासात दृढ होणे व उपकारस्तुती ओसंडू देणे. तेव्हा आपण या प्रत्येक वाक्यांशाचा विचार करू या व ख्रिस्तामध्ये चालत राहण्यास आपली कशी मदत करतात ते पाहू या.
तुम्ही ‘ख्रिस्तामध्ये मुळावलेले’ आहात का?
४. ‘ख्रिस्तामध्ये मुळावलेले’ म्हणजे काय?
४ सर्वप्रथम, आपण ‘ख्रिस्तामध्ये मुळावलेले’ असले पाहिजे असे पौल लिहितो. (पडताळा मत्तय १३:२०, २१.) ख्रिस्तामध्ये मुळावण्याकरता एखादी व्यक्ती कसा प्रयत्न करू शकते? एखाद्या रोपट्याची मुळे आपल्याला दिसणार नाहीत, तरी रोपट्याला ती आवश्यक असतात—ती त्याला स्थिर ठेवतात आणि त्याचे पोषण करतात. त्याचप्रमाणे, ख्रिस्ताच्या उदाहरणाचा आणि त्याच्या शिकवणुकीचा, सुरवातीला आपल्यावर अदृश्यरीत्या प्रभाव पडतो, आपल्या मनांत व अंतःकरणात त्या खोल रुजून बसतात. तेथे ते आपले पोषण करतात आणि आपल्याला बळकट करतात. आपल्या विचारसरणीवर, आपल्या कार्यांवर आणि आपल्या निर्णयांवर आपण त्यांना नियंत्रण करू देतो तेव्हा यहोवाला आपले जीवन समर्पित करण्यास आपण प्रवृत्त होतो.—१ पेत्र २:२१.
५. कशाप्रकारे आपण आध्यात्मिक अन्नाची ‘आस धरू शकतो’?
५ येशूला देवाकडून येणारे ज्ञान प्रिय होते. त्याने त्याची तुलना अन्नासोबतही केली. (मत्तय ४:४) एवढेच नव्हे तर, डोंगरावरील आपल्या प्रवचनात त्याने इब्री शास्त्रवचनांतील आठ विविध पुस्तकांतून २१ उताऱ्यांचा उल्लेख केला. त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करण्याकरता आपण प्रेषित पेत्राने आर्जवल्याप्रमाणे, “नूतन जन्मलेल्या बालकांसारखे” आध्यात्मिक अन्नाची ‘आस धरली पाहिजे.’ (१ पेत्र २:३) नवजात बालकाला भूक लागते तेव्हा ते आपली तीव्र इच्छा प्रकट करते. सध्या आपल्याला आध्यात्मिक अन्नाविषयी असे वाटत नसल्यास, पेत्राचे शब्द आपल्याला ती इच्छा ‘धरण्याचे’ उत्तेजन देतात. ते कसे? “परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा,” हे स्तोत्र ३४:८ मधील तत्त्व कदाचित आपली मदत करील. आपण नियमितरीत्या यहोवाच्या वचनाचा, अर्थात बायबलचा, कदाचित दर दिवशी त्याच्यातील एका भागाचे वाचन करण्याद्वारे “अनुभव” घेत राहिलो तर ते आध्यात्मिकरीत्या पोषक आणि चांगले असल्याचे आपल्याला दिसून येईल. कालांतराने, आपली इच्छा वाढत राहील.
६. आपण वाचतो त्यावर मनन करणे का आवश्यक आहे?
६ परंतु, आपण खाल्लेले अन्न चांगल्यारीतीने पचवणेसुद्धा महत्त्वाचे आहे. त्यासाठी वाचलेल्या गोष्टींवर मनन करणे जरूरीचे आहे. (स्तोत्र ७७:११, १२) उदाहरणार्थ, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य पुस्तकाचे वाचन करताना, प्रत्येक अध्याय वाचून झाल्यावर आपण स्वतःला: ‘या अहवालात मला ख्रिस्ताच्या गुणांबद्दल काय कळते व मी माझ्या जीवनात त्यांचे अनुकरण कसे करू शकतो?’ असे विचारल्यास आपल्याला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. अशाप्रकारे मनन केल्याने, शिकत असलेल्या गोष्टी आपण लागू करू शकतो. मग, आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा, आपल्याजागी येशू असता तर त्याने काय केले असते असे आपण स्वतःला विचारून पाहू शकतो. त्यानुसार निर्णय घेतल्यावर, आपण खरोखरच ख्रिस्तामध्ये मुळावलेले आहोत हे दाखवून देतो.
७. जड आध्यात्मिक पोषणाविषयी आपला दृष्टिकोन काय असावा?
७ पौल आपल्याला “जड अन्न” अर्थात देवाच्या वचनात असलेले गहन सत्य घेण्यासही आर्जवतो. (इब्री लोकांस ५:१४) याबाबतीत संपूर्ण बायबल वाचून काढण्याचे आपले पहिले ध्येय असेल. त्यानंतर, ख्रिस्ताचे खंडणी बलिदान, यहोवाने आपल्या लोकांबरोबर केलेले विविध करार किंवा बायबलमधील काही भविष्यसूचक संदेश यांसारख्या अधिक विशिष्ट विषयांचा अभ्यास करता येऊ शकतो. अशाप्रकारचे आध्यात्मिक जडान्न घेण्यास व पचवण्यास मदत करण्याकरता विपुल प्रमाणात साहित्य आहे. इतके ज्ञान घेण्यामागील आपला उद्देश काय? बढाई मारणे नव्हे, तर यहोवाबद्दल प्रेम वाढवणे व त्याच्या समीप जाणे हा आपला उद्देश आहे. (१ करिंथकर ८:१; याकोब ४:८) आपण भूकेल्यांप्रमाणे हे ज्ञान घेतो, ते स्वतःला लागू करतो, व इतरांना मदत करण्याकरता त्याचा उपयोग करतो तेव्हा आपण ख्रिस्ताचे अनुकरण करत असतो. यामुळे त्याच्यामध्ये चांगल्याप्रकारे मुळावण्यास आपल्याला मदत होईल.
तुम्ही ‘ख्रिस्तामध्ये रचले जात’ आहात का?
८. ‘ख्रिस्तामध्ये रचले जाणे’ म्हणजे काय?
८ ख्रिस्तामध्ये चालत राहण्याच्या दुसऱ्या पैलूच्या संबंधात, पौल लागलीच दुसऱ्या एका कल्पनाचित्राकडे वळतो—रोपट्यापासून एका इमारतीकडे वळतो. बांधकाम होत असलेल्या एखाद्या इमारतीचा आपण विचार करतो तेव्हा, आपण फक्त पायाचाच विचार करीत नाही तर अतिशय कष्टाने बांधलेल्या इमारतीचा आपण विचार करतो. तसेच, ख्रिस्तासारखे गुण आणि सवयी विकसित करण्यास आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात. हे परिश्रम लपून राहत नाहीत कारण पौलानेही तीमथ्याला म्हटले होते: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी.” (१ तीमथ्य ४:१५; मत्तय ५:१६) कोणती काही ख्रिस्ती कार्ये आहेत जी आपली उभारणी करतात?
९. (अ) सेवेमध्ये ख्रिस्ताचे अनुकरण करता यावे म्हणून आपण कोणते व्यावहारिक ध्येये ठेवू शकतो? (ब) आपण आपल्या सेवेचा आनंद घ्यावा अशी यहोवाची इच्छा आहे हे आपल्याला कसे कळते?
९ येशूने आपल्याला सुवार्तेचा प्रचार करण्याची व शिकवण्याची नेमणूक दिली आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) धैर्याने व प्रभावीपणे साक्ष देऊन त्याने एक परिपूर्ण उदाहरण मांडले. अर्थातच, आपल्याला अगदी त्याच्यासारखे कधीही जमणार नाही. पण, प्रेषित पेत्राने आपल्यासाठी हे ध्येय ठेवले आहे: “ख्रिस्ताला प्रभु म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.” (१ पेत्र ३:१५) तुम्ही ‘उत्तर देण्यास सिद्ध’ नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर निराश होऊ नका. वाजवी ध्येये ठेवा जी तुम्हाला त्या स्थरापर्यंत हळूहळू पोहंचण्यास मदत करू शकतील. पूर्वतयारी केल्याने तुम्हाला तुमच्या सादरतेत काही फेरफार करता येईल किंवा आणखी एक अथवा दोन शास्त्रवचने त्यात घालता येतील. अधिक बायबल साहित्यांचे वाटप करण्याचे, अधिक पुनर्भेटी करण्याचे किंवा एखादा बायबल अभ्यास चालू करण्याचे ध्येय तुम्ही ठेवू शकता. प्रमाणावर अधिक जोर असू नये—इतकेच तास झाले पाहिजेत, इतक्याच साहित्याचे वाटप झाले पाहिजे किंवा इतकेच अभ्यास असले पाहिजेत यावर—तर दर्जावर असला पाहिजे. वाजवी ध्येये ठेवून त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने, सेवेमध्ये चांगला भाग घेतल्याने मिळणारा आनंद तुम्हाला अनुभवता येईल. हेच यहोवा अपेक्षितो—आपण त्याची सेवा “हर्षाने” करावी अशी त्याची इच्छा आहे.—स्तोत्र १००:२; पडताळा २ करिंथकर ९:७.
१०. कोणती काही ख्रिस्ती कार्ये आहेत जी आपण केली पाहिजेत व त्यांमुळे आपल्याला कशी मदत होते?
१० मंडळीत आपण जी कार्ये करतो तीही आपल्याला ख्रिस्तामध्ये रचले जाण्यास मदत करतात. त्या कार्यांतील सर्वात महत्त्वाचे कार्य आहे, एकमेकांना प्रेम दाखवणे, कारण हेच खऱ्या ख्रिश्चनांचे ओळख चिन्ह आहे. (योहान १३:३४, ३५) आपण अभ्यास करीत होतो तेव्हा, बहुतेकांना अभ्यास घेणाऱ्या व्यक्तीचीच जास्त आपुलकी वाटत होती, आणि हे स्वाभाविकच आहे. परंतु, आता आपण मंडळीतील इतरांशी परिचय करून पौलाच्या सल्ल्याच्या ‘आपले अंतःकरण विशाल’ करू शकतो का? (२ करिंथकर ६:१३) वडिलांनाही आपल्या प्रेमाची आणि कृतज्ञतेची गरज आहे. त्यांना सहकार्य देऊन, त्यांच्याकडून शास्त्रवचनीय सल्ला घेऊन तो स्वीकारून आपण त्यांचे काम अधिक हलके करत असतो. (इब्री लोकांस १३:१७) त्याचबरोबर, यामुळे ख्रिस्तामध्ये रचले जाण्यास हातभार लागतो.
११. बाप्तिस्म्याविषयी आपण कोणता वास्तविक दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
११ बाप्तिस्म्याचा प्रसंग आनंदाचा असतो! परंतु मग त्यानंतरचा जीवनातील प्रत्येक क्षण तेवढाच आनंददायी असला पाहिजे अशी अवास्तव अपेक्षा आपण करू नये. ख्रिस्तामध्ये रचले जाण्याच्या अधिकांश भागात ‘पुढे चालत’ राहणे समाविष्ट आहे. (फिलिप्पैकर ३:१६) याचा अर्थ निस्तेज, कंटाळवाणी जीवन-शैली असा होत नाही. त्याचा साधा आणि सोपा अर्थ, सरळ दिशेने चालत राहणे—दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, चांगल्या आध्यात्मिक सवयी विकसित करून दिवसानुदिवस व वर्षानुवर्षे त्या सवयी आचरत राहणे होय. लक्षात ठेवा, “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.”—मत्तय २४:१३.
तुम्ही “विश्वासात दृढ” आहात का?
१२. “विश्वासात दृढ” होणे म्हणजे काय?
१२ ख्रिस्तामध्ये चालत राहण्याचे वर्णन करताना तिसऱ्या वाक्यांशात पौल आपल्याला “विश्वासात दृढ” होण्यास आर्जवतो. एक भाषांतर असे म्हणते: “विश्वासात पक्के होणे”; कारण पौलाने वापरलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “खात्री करणे, गॅरंटी देणे व कायदेशीररीत्या बदलता न येणारा,” असाही होऊ शकतो. आपण ज्ञानात वाढत जातो तसे, यहोवा देवावरील आपला विश्वास भक्कम आहे, वस्तुतः कायदेशीररीत्या स्थापित आहे हे पाहण्याकरता आपल्याला आणखी कारणे दिली जातात. यामुळे आपण आणखी स्थिर होतो. आणि सैतानी जग आपल्याला डळमळू शकत नाही. यावरून आपल्याला “प्रौढतेप्रत” जाण्याबद्दल पौलाचा सल्ला आठवतो. (इब्री लोकांस ६:२) प्रौढता आणि स्थैर्य यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे.
१३, १४. (अ) कलस्सै येथील पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी, त्यांच्या स्थैर्याला असलेल्या कोणत्या धोक्यांचा सामना केला? (ब) प्रेषित पौलाला कशाची चिंता लागली असावी?
१३ पहिल्या शतकात कलस्सैतील ख्रिश्चनांच्या स्थैर्याला धोका होता. पौलाने ताकीद दिली: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सैकर २:८) “[देवाच्या] प्रिय पुत्राच्या राज्यात” प्रजा बनलेल्या कलस्सैकरांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या आशीर्वादित आध्यात्मिक स्थितीपासून ते भरकटू नयेत अशी पौलाची इच्छा होती. (कलस्सैकर १:१३) कोणत्या मार्गाने फसवणूक? पौलाने “तत्त्वज्ञान” याच्याकडे अंगुली दर्शवली; बायबलमध्ये येथेच हा शब्द आढळतो. तो, प्लॅटो किंवा सॉक्रेट्स सारख्या ग्रीक तत्त्वज्ञान्यांविषयी बोलत होता का? खऱ्या ख्रिश्चनांना यांच्याकडून धोका होताच होता; पण त्या दिवसांत, “तत्त्वज्ञान” या शब्दाचा अर्थ सीमित नव्हता. तो सामान्यपणे अनेक गटांना किंवा विचारशैलींना, मग त्या धार्मिक असल्या तरी, त्यांना सूचित करत होता. जसे की, जोसिफस आणि फायलो यांसारख्या पहिल्या शतकातील यहुद्यांनी स्वतःच्या धर्माला एक तत्त्वज्ञान असे संबोधले—कदाचित त्याची आकर्षकता आणखी वाढवण्याच्या उद्देशास्तव.
१४ पौलाला ज्या तत्त्वज्ञानांविषयी चिंता लागली असावी ते धार्मिक स्वरूपाचे होते. कलस्सैकरांना त्याने लिहिलेल्या पत्राच्या त्याच अध्यायात तो नंतर, “हाती धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको,” असे शिक्षण देणाऱ्यांना संबोधतो; ते ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे रद्द करण्यात आलेल्या मोशेच्या नियमशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करीत होते. (रोमकर १०:४) गैरख्रिस्ती तत्त्वज्ञानाबरोबरच, इतरही प्रभाव कायम होते ज्यांच्यापासून मंडळीच्या आध्यात्मिकतेला धोका होता. (कलस्सैकर २:२०-२२) ‘जगाच्या प्राथमिक शिक्षणाचा’ भाग असलेल्या तत्त्वज्ञानाविरुद्ध पौलाने इशारा दिला. कारण हे खोटे शिक्षण मानवी उगमाकडून होते.
१५. बहुतेकदा आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या अशास्त्रवचनीय विचारसरणीद्वारे स्वतःची फसवणूक होण्यापासून आपण सावध कसे राहू शकतो?
१५ देवाच्या वचनावर पूर्णपणे आधारित नसलेल्या मानवी कल्पना आणि विचारसरणी यांना बढावा दिल्याने ख्रिस्ती स्थैर्याला धोका पोहंचू शकतो. अशा धोक्यांपासून आज आपण सावध राहणे फार आवश्यक आहे. प्रेषित योहानाने आर्जवले: “प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा.” (१ योहान ४:१) यास्तव, तुमचा एखादा शाळासोबती तुम्हाला, बायबल दर्जांनुसार जगणे जुनी रीत आहे असे पटवून देण्याचा प्रयत्न करीत असल्यास किंवा तुमचा एखादा शेजारी, भौतिक मनोवृत्ती विकसित करण्यासाठी तुमच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असल्यास किंवा तुमचा एखादा सहकर्मी, तुमच्या बायबल प्रशिक्षित विवेकाविरुद्ध कार्य करण्यास तुमच्यावर अगदी चतुराईने दबाव आणत असल्यास किंवा कदाचित एखादा सहविश्वासूही आपल्याच मतानुसार मंडळीतील इतरांबद्दल टिकात्मक, नकारात्मक बोलत असल्यास, ते स्वीकारू नका. देव वचनाच्या एकवाक्यतेत नसलेल्या सर्व गोष्टी दूर सारा. असे केल्यावर ख्रिस्तामध्ये चालत असताना आपण आपले स्थैर्य टिकवू शकू.
“विश्वासाने उपकारस्तुती ओसंडू” देणे
१६. ख्रिस्तामध्ये चालत राहण्याचा चौथा पैलू कोणता आहे व आपण कदाचित कोणता प्रश्न विचारू शकतो?
१६ पौल उल्लेख करतो त्याप्रमाणे आपण “विश्वासाने उपकारस्तुती ओसंडू” दिली पाहिजे; हा, ख्रिस्तामध्ये चालत राहण्याचा चौथा पैलू आहे. (कलस्सैकर २:७) “ओसंडू” देणे, हा शब्द ऐकल्यावर आपल्याला लागलीच अशी नदी आठवते जी किनाऱ्यावरून तुडूंब भरून ओसंडून वाहत आहे. यावरून ख्रिश्चनांना सूचवले जाते, की आपली उपकारस्तुती निरंतर किंवा नेहमी चालू असावयास हवी. आपल्यातील प्रत्येकजण विचारू शकतो, ‘मी कृतज्ञ आहे का?’
१७. (अ) बिकट परिस्थितीतही, आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे पुष्कळ कारणे असतात असे का म्हणता येते? (ब) यहोवाकडून आलेल्या काही देणग्या कोणत्या आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला खास कृतज्ञता वाटते?
१७ खरेच, यहोवाची दररोज उपकारस्तुती ओसंडू देण्यासाठी आपल्याकडे भरपूर कारणे आहेत. सर्वात बिकट परिस्थितीतही, काही असे लहानसहान क्षण असू शकतात ज्यांमुळे आपल्याला क्षणिक आराम मिळू शकतो. जसे की, आपल्या मित्राचा सहानुभाव. एखाद्या प्रिय व्यक्तीचा प्रेमळ स्पर्श. रात्रीची शांत झोप बलवर्धक ठरते. एक स्वादिष्ट भोजन भूक शमवते. एखाद्या पक्ष्याचे मंजूळ गाणे, लहान मुलाचे हास्य, चकाकते निळेशार आकाश, ताजी हवा—या सर्व किंवा आणखी पुष्कळ गोष्टी केवळ एका दिवसातच आपण अनुभवू शकतो. या देणग्यांना आपण सहजपणे क्षुल्लक समजू शकतो. या सर्व गोष्टी आभार मानण्याच्या पात्र नाहीत का? त्या सर्व, “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणाऱ्या यहोवाकडून येतात. (याकोब १:१७) त्याने दिलेल्या देणग्यांपुढे वरील गोष्टी फार खुजा वाटतात—उदाहरणार्थ, आपले जीवनच घ्या. (स्तोत्र ३६:९) याशिवाय, त्याने आपल्याला अनंतकाळ जगण्याची संधी दिली आहे. ही देणगी देण्याकरता यहोवाने, “त्याला नित्य आनंददायी” असलेल्या आपल्या एकुलत्या एका पुत्राला पाठवून सर्वोत्कृष्ट बलिदान दिले.—नीतिसूत्रे ८:३०; योहान ३:१६.
१८. आपण यहोवाचे आभारी आहोत हे कशाप्रकारे दाखवू शकतो?
१८ तेव्हा, “परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, . . . चांगले आहे,” हे स्तोत्रकर्त्याचे शब्द किती यथार्थ आहेत बरे. (स्तोत्र ९२:१) तसेच, थेस्सलनीकाकरांतील ख्रिश्चनांना पौलाने, “सर्व स्थितीत उपकारस्तुति करा,” असे स्मरण दिले. (१ थेस्सलनीकाकर ५:१८; इफिसकर ५:२०; कलस्सैकर ३:१५) आपल्यातील प्रत्येकाने अधिक कृतज्ञ असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रार्थनेत, देवाला नुसत्याच आपल्या गरजांविषयीच्या विनंत्याच असू नयेत. काही विनंत्या ठीक आहेत. समजा तुमचा एखादा मित्र तुमच्याकडून काही हवे असते तेव्हाच तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्हाला कसे वाटेल! यास्तव, यहोवाचे फक्त आभार मानण्यास व त्याची स्तुती करण्यास प्रार्थना का करू नये? या कृतघ्न जगाकडे तो पाहतो तेव्हा आपल्या अशा प्रार्थनांनी त्याला कितीतरी आनंद वाटेल! दुसरा फायदा म्हणजे, अशा प्रार्थना आपल्याला, जीवनाच्या सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करू शकतात, आपण खरोखरच किती आशीर्वादित आहोत याची आठवण देऊ शकतात.
१९. कलस्सैकर २:६, ७ मधील पौलाच्या बोलण्यावरून, आपण ख्रिस्तामध्ये चालत राहण्यात सतत सुधारणा करीत राहू शकतो हे कसे काय सूचित होते?
१९ देवाच्या वचनातील फक्त एका उताऱ्यातून आपण कितीतरी सुज्ञ मार्गदर्शन मिळवू शकतो ही गोष्ट उल्लेखनीय नाही का? ख्रिस्तामध्ये चालत राहण्याविषयी पौलाचा सल्ला आपल्यातील प्रत्येकाने ऐकणे आवश्यक आहे. यास्तव, ‘ख्रिस्तामध्ये मुळावण्याचा’ ‘रचले जाण्याचा,’ ‘विश्वासात दृढ होत जाण्याचा,’ ‘उपकारस्तुती ओसंडू देण्याचा’ आपण निश्चय करू या. नव्याने बाप्तिस्मा घेतलेल्यांसाठी हा सल्ला खासकरून महत्त्वाचा आहे. परंतु, तसा तो सर्वांनाच लागू होतो. एक सोटमूळ खोल अगदी खोल कसे वाढत जाते आणि एका इमारतीचे बांधकाम वर कसे चढत जाते त्याचा विचार करा. तसेच, ख्रिस्तामध्ये आपले चालणे कधीही थांबत नाही. प्रगती करण्याकरता आपल्यासमोर पदोपदी संधी आहेत. यहोवा आपल्याला मदत करील आणि आशीर्वाद देईल, कारण आपण निरंतर त्याच्याबरोबर आणि त्याच्या प्रिय पुत्राबरोबर चालत राहावे अशी त्याची इच्छा आहे.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ ख्रिस्तामध्ये चालत राहण्यामध्ये कशाचा समावेश होतो?
◻ ‘ख्रिस्तामध्ये मुळावलेले’ म्हणजे काय?
◻ कशाप्रकारे आपण ‘ख्रिस्तामध्ये रचले’ जाऊ शकतो?
◻ “विश्वासात दृढ” होणे इतके महत्त्वाचे का आहे?
◻ “उपकारस्तुती ओसंडू” देण्यासाठी आपल्याकडे कोणती कारणे आहेत?
[१० पानांवरील चित्र]
झाडाची मूळे कदाचित दिसणार नाहीत, पण ती झाडाला अन्नपुरवठा करतात व दृढ धरून ठेवतात