राज्य घोषकांचा वृत्तान्त
प्रत्येक संधीचा उपयोग करणे
यहोवाचे साक्षीदार त्यांच्या बायबलच्या शैक्षणिक कार्यासाठी जागतिक स्तरावर ओळखले जातात. याशिवाय समाजाला लाभदायक ठरतील असे कार्यक्रमही ते आयोजित करतात. या जनसामान्यांसाठी असलेल्या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इक्वादोरमधून मिळालेले खालील अनुभव याची हमी देतात.
◻ एका मोठ्या काचेच्या कारखान्याच्या मंडळाने कर्मचाऱ्यांकरता कौटुंबिक मूल्यांवर एक व्याख्यानमाला आयोजित करण्याचे ठरवले. कर्मचाऱ्याच्या व्यवस्थापकांनी अनेक कॅथलिक पाळकांना यात भाग घेण्याचे निमंत्रण दिले, पण त्यांच्याकडून काही उत्तर आले नाही. एका पाळकाने म्हटले, की या विषयावर बोलण्यास योग्य असलेले फारच कमी पाळक आहेत आणि त्यांच्यापैकी कोणीही येऊ शकेल असे वाटत नाही. हे ऐकल्यानंतर, त्या कारखान्यात काम करणाऱ्या एका साक्षीदार कर्मचाऱ्याने बहुतेक वेळा व्यापारी क्षेत्रात काम करणाऱ्या एका बांधवाला आपल्या कारखान्यात बोलावण्याची व्यवस्था केली.
दुसऱ्याच दिवशी, हा साक्षीदार कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापकांकडे अभ्यास कोर्सची योजना घेऊन गेला. वॉच टावर सोसायटीच्या वेगवेगळ्या प्रकाशनांमधून विषयांची त्याने यादी तयार केली होती. व्यवस्थापक हे पाहून अगदी आश्चर्यचकित झाले. चर्चा करण्यासाठी तीन विषय निवडण्यात आले—मानवी नातेसंबंध, कामाच्या ठिकाणावरील नीतिमूल्ये आणि कौटुंबिक नीतिमूल्ये. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांसोबत या माहितीचा विचार करण्यासाठी योजना आखण्यात आली.
कर्मचाऱ्यांना सात गटांत विभाजित करण्यात आले. प्रत्येक गटात ३० कर्मचारी होते. त्यानंतर तीन लायक बांधवांनी त्यांना माहिती दिली. याचे कोणते पडसाद उमटले? कित्येक कर्मचाऱ्यांनी बांधवांना त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले आणि बायबल अभ्यास घेण्यात मदत ठरणाऱ्या २१६ प्रकाशनांचे वाटप करण्यात आले. हे कर्मचारी मंडळ इतके प्रभावित झाले, की त्या मंडळाने साक्षीदारांना अशाप्रकारची व्याख्याने वारंवार देण्याची विनंती केली.
◻ इक्वादोरमध्ये, शाळेत धर्माचे शिक्षण देण्यास परवानगी असलेला कायदा अलीकडेच संमत करण्यात आला. एका मिशनरी बहिणीने प्राथमिक शाळेच्या एका अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना विचारले, की नवा कायदा किती परिणामकारक आहे. त्या अधीक्षकांनी म्हटले, की मरीयाची उपासना करण्याचा कार्यक्रम आम्ही आखला खरा, पण तो फोल ठरला. त्यानंतर मिशनरी बहिणीने सांगितले, की अशाप्रकारच्या उपासनेमुळे कॅथलिक नसलेल्या मुलांपुढे समस्या उभी राहू शकते आणि अधीक्षकही या गोष्टीशी सहमत झाल्या. मिशनरी बहिणीने म्हटले: “परंतु आमच्याकडे बायबलमधून नैतिक मूल्ये शिकवण्याचा असा कार्यक्रम आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट धर्म स्वीकारण्याची सक्ती केली जात नाही.” अधीक्षकांनी मिशनरी बहिणीला असे म्हटले: “मग तुम्ही केव्हा याल? परवा?” थोर शिक्षकाचे ऐका हे पुस्तक मिशनरी बहिणीने दाखवल्यानंतर “शांती करणारे ते धन्य” या धड्यावर चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले.
ठरलेल्या दिवशी परतल्यानंतर मिशनरी बहीण सात वर्गांत गेली आणि मुलांशी ती तीन तास सलग बोलत होती तेव्हा अधीक्षकही तिचे शांतपणे ऐकत होत्या. इयत्ता पाचवीच्या वर्गात बोलून झाल्यानंतर एका विद्यार्थ्याने म्हटले: “बाई तुम्ही सहावीच्या वर्गात जायला विसरू नका. ती मुले नेहमी आम्हाला मारण्याच्या तयारीतच असतात आणि आमच्याशी ती नेहमी भांडतात!” एका शिक्षिकेने म्हटले: “हिंसाचार हा फार महत्त्वाचा विषय आहे. या विषयावर बोलण्यास आपल्याला हा वेळ पुरेसा नाही.”
या शाळेत परत जाऊन आज्ञाधारकपणा आणि खोटे बोलणे या विषयांवर चर्चा करण्याची योजना करण्यात आली. आतापर्यंत याचे फारच समाधानकारक परिणाम मिळत आहेत. आजही मिशनरी बहीण रस्त्यावर कोठे दिसल्यास ती मुले त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे धावतात आणि बायबलविषयी अनेक प्रश्नही विचारतात. इतर मुले मोठ्या अभिमानाने त्या बहिणीची ओळख त्यांच्या पालकांशी करून देतात. याशिवाय, त्या शाळेतील दोन मुलांसोबत गृह बायबल अभ्यासही सुरू झाला आहे.