यहोवाचे वचन सजीव आहे
गलतीकरांस, इफिसकरांस, फिलिप्पैकरांस व कलस्सैकरांस लिहिलेल्या पत्रांतील ठळक मुद्दे
यहुदी मत समर्थकांच्या बहकाव्यात येऊन काही ख्रिस्ती शुद्ध उपासनेपासून मार्गभ्रष्ट झाले आहेत हे प्रेषित पौलाच्या कानावर आले तेव्हा त्याने “गलतीयांतील मंडळ्यांना” एक प्रभावशाली पत्र लिहिले. (गल. १:१) सा.यु. ५०-५२ च्या सुमारास लिहिलेल्या या पत्रात पौलाने त्यांची केलेली कानउघाडणी व त्यांना दिलेला आग्रहाचा उपदेश वाचायला मिळतो.
याच्या सुमारे दहा वर्षांनंतर रोममध्ये “ख्रिस्त येशूचा बंदिवान” असताना पौलाने इफिसस, फिलिप्पै व कलोसे येथील मंडळ्यांना पत्रे लिहिली व त्यांत या मंडळ्यांतील बांधवांना उपयुक्त सल्ला व प्रेमळ प्रोत्साहन दिले. (इफिस. ३:१) बायबलमधील गलतीकर, इफिसकर, फिलिप्पैकर व कलस्सैकर या पुस्तकांतील संदेशाकडे लक्ष दिल्याने आज आपल्यालाही बराच फायदा होऊ शकतो.—इब्री ४:१२.
‘नीतिमान ठरणे’—कशा प्रकारे?
यहुदी मत समर्थकांनी धूर्तपणे पौलाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो आपल्या जीवनाबद्दल काही तपशीले सादर करून आपल्या प्रेषितत्त्वाचे समर्थन करतो. (गल. १:११-२:१४) त्यांच्या खोट्या शिकवणींचे खंडन करण्याच्या उद्देशाने पौल हा मुद्दा मांडतो: “मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो.”—गल. २:१६.
पौल म्हणतो, की ख्रिस्ताने “जे नियमशास्त्राधीन होते त्यांस” ख्रिस्ती स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी ‘सोडवले.’ म्हणूनच तो गलतीकरांना असा सल्ला देतो: “[स्वातंत्र्यात] टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.”—गल. ४:४, ५; ५:१.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
३:१६-१८, २८, २९—अब्राहामाशी करण्यात आलेला करार अजूनही अस्तित्वात आहे का? हो, आजही तो अस्तित्वात आहे. नियमशास्त्राचा करार हा देवाने अब्राहामासोबत केलेल्या कराराऐवजी देण्यात आला नव्हता, तर त्याला जोडण्यात आला होता. त्यामुळे, नियमशास्त्र “नाहीसे” करण्यात आल्यावरही अब्राहामाचा करार रद्द झाला नाही. (इफिस. २:१५) या करारांतर्गत देण्यात आलेली अभिवचने पुढे अब्राहामाच्या अस्सल ‘संतानास’ प्राप्त होतात. या संतानात प्रामुख्याने येशू ख्रिस्ताचा, तसेच जे “ख्रिस्ताचे” आहेत त्यांचा समावेश होतो.
६:२—“ख्रिस्ताचा नियम” काय आहे? या नियमात येशूच्या सर्व शिकवणींचा व त्याच्या सर्व आज्ञांचा समावेश होतो. विशेषतः, “एकमेकांवर प्रीति करावी” ही आज्ञा यात समाविष्ट आहे.—योहा. १३:३४.
६:८—‘आत्म्यासाठी पेरण्याचा’ काय अर्थ होतो? आत्म्यासाठी पेरणे म्हणजे देवाच्या आत्म्याचा आपल्यावर प्रभाव होईल अशा प्रकारे आचरण करणे. तसेच, देवाच्या आत्म्याचा ज्यांमुळे आपल्यावर जास्तीत जास्त प्रभाव पडू शकेल अशा प्रकारच्या कार्यांमध्ये सहभागी होणेही यात समाविष्ट आहे.
आपल्याकरता धडे:
१:६-९. मंडळीत समस्या निर्माण होतात तेव्हा ख्रिस्ती वडिलांनी तत्परतेने पावले उचलली पाहिजेत. शास्त्रवचनांच्या साहाय्याने तर्कशुद्ध युक्तिवाद करून ते चुकीच्या विचारांना लगेच खोडून काढू शकतात.
२:२०. खंडणी ही आपल्या प्रत्येकाला देवाकडून वैयक्तिक रीत्या मिळालेली एक भेट आहे. आपण या भेटीकडे याच दृष्टीने पाहण्यास शिकले पाहिजे.—योहा. ३:१६.
५:७-९. वाईट संगत आपल्याला सत्यानुसार आचरण करण्यापासून मागे रोखू शकते. म्हणूनच, अशा प्रकारची संगत टाळण्यातच शहाणपण आहे.
६:१, २, ५. मंडळीतील “आध्यात्मिक वृत्तीचे” बांधव आपल्याला आपली ओझी वाहण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ, नकळत घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे आपण अडचणीत किंवा त्रासदायक परिस्थितीत सापडतो तेव्हा ते आपल्याला साहाय्य करू शकतात. पण, आपल्या आध्यात्मिक जबाबदाऱ्यांचा भार मात्र आपण स्वतःच वाहिला पाहिजे.
“जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे”
इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात पौल ख्रिस्ती ऐक्यावर भर देऊन, ‘कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावतांना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र केले जाण्याविषयी’ सांगतो. सर्वांना ‘विश्वासाच्या एकत्वाप्रत येऊन पोहचण्यास’ साहाय्य करण्यासाठी ख्रिस्ताने “मानवरूपी देणग्या” दिल्या आहेत.—इफिस. १:१०; ४:८, NW, १३.
देवाचे गौरव करण्यासाठी व ख्रिस्ती ऐक्याला हातभार लावण्यासाठी, ख्रिश्चनांनी ‘नवा मनुष्य धारण केला’ पाहिजे आणि “ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन” झाले पाहिजे. तसेच, त्यांनी “सैतानाच्या डावपेचांपुढे . . . टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण” केली पाहिजे.—इफिस. ४:२४; ५:२१; ६:११.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१:४-७. अभिषिक्त ख्रिश्चनांना त्यांच्या जन्माआधीच कशा प्रकारे नेमण्यात आले होते? व्यक्तिशः नव्हे, तर एक समूह किंवा गट या नात्याने त्यांना आधीपासून नेमण्यात आले होते. अपरिपूर्ण मानवांचे हे जग अस्तित्वात येण्याअगोदरच हे घडले. उत्पत्ति ३:१५ यात नमूद असलेली भविष्यवाणी आदाम व हव्वेला मुले होण्याआधीच घोषित करण्यात आली होती. ख्रिस्ताच्या अनुयायांपैकी काही जणांनी त्याच्यासोबत स्वर्गात राज्य करावे या देवाच्या उद्देशाचा या भविष्यवाणीत समावेश होता.—गल. ३:१६, २९.
२:२—जगाचा आत्मा कशा प्रकारे ‘अंतरिक्षात राज्य’ करतो? “जगाचा आत्मा,” म्हणजेच स्वैराचारी व अवज्ञाकारी आत्मा किंवा प्रवृत्ती ही सर्वत्र पसरलेल्या अंतरिक्षासारखी आहे. (१ करिंथ. २:१२) हा आत्मा अतिशय प्रभावशाली व अविरत कार्य करणारा असल्यामुळे तो अंतरिक्षात राज्य करतो असे म्हणता येते.
२:६—अद्याप पृथ्वीवर असताना अभिषिक्त ख्रिस्ती “स्वर्गात” कसे असू शकतात? या वचनात “स्वर्गात” असे म्हणताना त्यांना स्वर्गात मिळणार असलेल्या वतनास सूचित केलेले नाही. त्याऐवजी, ‘पवित्र आत्म्याचा त्यांच्यावर शिक्का मारण्यात आल्यामुळे’ त्यांना देवापुढे जे गौरवी स्थान प्राप्त होते त्यास हे सूचित करते.—इफिस. १:१३, १४.
आपल्याकरता धडे:
४:८, ११-१५. येशूने “कैद्यांना कैद करून नेले” याचा असा अर्थ होतो, की ख्रिस्ती मंडळीची उभारणी करण्याकरता त्याने सैतानाच्या ताब्यात असलेल्यांना मुक्त करून त्यांचा देणग्यांच्या रूपात वापर केला. आपण मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांच्या आज्ञेत राहिले पाहिजे व त्यांच्या अधीन राहून मंडळीच्या सर्व व्यवस्थांना सहकार्य दिले पाहिजे. असे केल्यास, आपण ‘प्रीतीने ख्रिस्ताप्रत सर्व प्रकारे वाढू.’—इब्री १३:७, १७.
५:२२-२४, ३३. आपल्या पतीच्या अधीन राहण्यासोबतच पत्नीने त्याचा मनापासून आदर केला पाहिजे. म्हणजेच, तिने “सौम्य व शांत आत्मा” प्रदर्शित केला पाहिजे. तसेच, आपल्या पतीबद्दल तिने नेहमी आदराने बोलले पाहिजे. आणि, त्याने घेतलेले निर्णय यशस्वी होण्याकरता आपल्या परीने योगदान करण्याद्वारे त्याला इतरांचाही मान मिळवून देण्यास तिने प्रयत्नशील असले पाहिजे.—१ पेत्र ३:३, ४; तीत २:३-५.
५:२५, २८, २९. पती ज्या प्रकारे आपल्या शरीराचे “पालनपोषण” करतो त्याच प्रकारे त्याने आपल्या पत्नीच्याही शारीरिक व भावनिक गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. तसेच, यहोवासोबत घनिष्ट संबंध राखण्यास त्याने तिला साहाय्य केले पाहिजे. तिच्यासोबत पुरेसा वेळ घालवण्याद्वारे व तिच्याशी प्रेमाने बोलण्या-वागण्याद्वारे आपण तिची कदर करतो हे त्याने दाखवले पाहिजे.
६:१०-१३. दुरात्मिक शक्तींचा यशस्वी रीत्या प्रतिकार करण्यासाठी आपण देवाने पुरवलेली आत्मिक शस्त्रसामग्री धारण करण्याच्या बाबतीत जराही हयगय करू नये.
“आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे”
फिलिप्पैकरांना लिहिलेल्या पत्रात पौलाने प्रीतीवर विशेष भर दिला आहे. तो म्हणतो, “माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीति ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी.” त्यांनी फाजील आत्मविश्वास बाळगण्याची चूक करू नये म्हणून पौल त्यांना असा सल्ला देतो: “भीत व कापत आपले तारण साधून घ्या.”—फिलिप्पै. १:९; २:१२.
जे आध्यात्मिक रीत्या प्रौढ आहेत त्यांना पौल, “देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी” सतत प्रयत्नशील राहण्याचे प्रोत्साहन देतो. तो म्हणतो: “आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.”—फिलिप्पै. ३:१४-१६.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
१:२३—पौल ज्या “दोहोंसंबंधाने” पेचात होता त्या दोन गोष्टी कोणत्या व त्याने कशापासून ‘सुटून जाण्याची’ उत्कंठा व्यक्त केली? पौल ज्या परिस्थितीत होता त्यामुळे तो एका पेचप्रसंगात अडकला होता. त्याला दोन पर्यायांपैकी एक निवडावा लागणार होता: जगणे किंवा मरणे. (फिलिप्पै. १:२१) यांपैकी कोणता पर्याय आपण निवडणार हे जरी त्याने सांगितले नाही, तरी “येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची” उत्कंठा तो व्यक्त करतो. (फिलिप्पै. ३:२०, २१; १ थेस्सलनी. ४:१६) ही ‘सुटका’ ख्रिस्ताच्या उपस्थितीदरम्यान घडणार होती व त्यायोगे पौलाला यहोवाने त्याच्याकरता राखून ठेवलेले स्वर्गातील प्रतिफळ प्राप्त होणार होते.—मत्त. २४:३.
२:१२, १३.—आपण ‘इच्छा व कृती करावी’ हे यहोवा कशा प्रकारे घडवून आणतो? यहोवाचा पवित्र आत्मा आपल्या मनावर व बुद्धीवर प्रभाव करून, देवाची सेवा आणखी उत्साहाने करण्याची इच्छा आपल्या मनात जागृत करू शकतो. यहोवाने आपल्याला ही मदत पुरवली असल्यामुळे, आपल्याला स्वतःच्याच सामर्थ्याने ‘आपले तारण साधून घ्यावे लागेल’ असा आपण विचार करण्याची गरज नाही.
आपल्याकरता धडे:
२:५-११. येशूच्या उदाहरणावरून दिसून येते की नम्रता हे दुर्बलतेचे नव्हे तर नैतिक बळाचे चिन्ह आहे. शिवाय, जे नम्र असतात त्यांचा यहोवा सन्मान करतो.—नीति. २२:४.
३:१३. ‘मागील गोष्टींमध्ये’ निरनिराळ्या गोष्टींचा समावेश असू शकतो. उदाहरणार्थ, भरपूर पगाराची नोकरी, श्रीमंत कुटुंबाचे सदस्य असल्यामुळे वाटणारी आर्थिक सुरक्षितता, किंवा ज्यांबद्दल आपण पश्चात्ताप केला आहे व ज्यांपासून आपल्याला ‘धुऊन पवित्र करण्यात आले आहे’ अशा गतकाळात आपल्या हातून घडलेल्या गंभीर चुका. (१ करिंथ. ६:११) आपण या मागील गोष्टी विसरून जावे, म्हणजेच त्यांच्याविषयी काळजी करत बसू नये व ‘पुढील गोष्टींकडे लक्ष लावावे.’
४:१४-१६. फिलिप्पै येथील ख्रिस्ती गरीब असले, तरीही औदार्य दाखवण्याबाबत त्यांचे उदाहरण अनुकरणीय आहे.—२ करिंथ. ८:१-६.
‘विश्वासात दृढ होणे’
कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रात पौल खोट्या शिक्षकांच्या शिकवणींचे खंडन करतो. तारण हे नियमशास्त्रातील आज्ञांचे पालन करण्यावर नव्हे, तर ‘विश्वासात अढळ राहण्यावर’ अवलंबून आहे असे तो प्रतिपादन करतो. तो कलस्सैकरांना असे प्रोत्साहन देतो, ‘ख्रिस्तामध्ये चालत राहा; त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, आणि विश्वासात दृढ होत असलेले व्हा.’ विश्वासात अशा प्रकारे दृढ झाल्यामुळे त्यांच्यावर कोणता परिणाम होण्यास हवा?—कलस्सै. १:२३; २:६, ७.
पौल लिहितो, “पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.” प्रेषित पौल त्यांना सांगतो, “जे काही तुम्ही करिता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.” तसेच, मंडळीबाहेर असलेल्या लोकांशी ‘सुज्ञतेने वागण्याचा’ सल्लाही तो त्यांना देतो.—कलस्सै. ३:१४, १५, २३; ४:५.
शास्त्रवचनीय प्रश्नांची उत्तरे:
२:८—“जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे” असलेल्या कोणत्या गोष्टींविरुद्ध पौलाने इशारा दिला? जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेल्या गोष्टी म्हणजे, ज्यांपासून सैतानाचे जग बनले आहे त्या मूलभूत गोष्टी. अर्थात, त्याच्या जगाचे अविभाज्य अंग असलेले, त्यास मार्गदर्शित वा प्रेरित करणारे पायाभूत घटक अथवा तत्त्वे. (१ योहा. २:१६) या गोष्टींपैकी काही म्हणजे, जगिक तत्त्वज्ञान, पैशाची व वस्तूंची हाव आणि खोटे धर्म.
४:१६—लावदिकियातील मंडळीला लिहिलेल्या पत्राचा बायबलमध्ये समावेश का करण्यात आला नाही? या पत्रातील माहिती आजच्या काळाकरता समर्पक नसल्यामुळे कदाचित त्याचा समावेश करण्यात आला नसावा. किंवा या पत्रात, बायबलमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या इतर पत्रांतील मुद्द्यांचीच पुनरुक्ती केलेली असावी.
आपल्याकरता धडे:
१:२, २०. देवाने त्याच्या अगाध कृपेमुळे पुरवलेली खंडणी, आपल्या विवेकास बोचणारी दोषभावना दूर करून आपल्याला आंतरिक शांती देऊ शकते.
२:१८, २३. ‘लीन म्हणवून घेण्याची’ प्रवृत्ती, म्हणजेच, संपत्तीचा त्याग करून किंवा मुद्दामहून शरीराला दंड देऊन इतरांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने नम्रतेचा आव आणणे, हे खरे तर ‘दैहिक बुद्धीने गर्वाने फुगलेले’ असण्याचे लक्षण आहे.