वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१५ पृ. ४-६
  • धनदौलतीने तुम्हाला सौख्य मिळेल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धनदौलतीने तुम्हाला सौख्य मिळेल का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पैशाचे प्रेम सौख्याप्रत निरवत नाही
  • आपल्याकडे आहे त्यात समाधान मानणे
  • सौख्याची गुरुकिल्ली
  • पैशांविषयी सुज्ञ दृष्टिकोन कोणता?
    सावध राहा!—२००७
  • एक श्रीमंत आणि बुद्धिमान राजा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • देवाच्या नवीन जगात खरी संपन्‍नता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुम्हाला आनंदी होण्यासाठी कशाची आवश्‍यकता आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१५ पृ. ४-६

धनदौलतीने तुम्हाला सौख्य मिळेल का?

राजा शलमोनाला पैशाचे महत्त्व माहीत होते. त्याने लिहिले: “ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करितात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्व काही साध्य होते.” (उपदेशक १०:१९) मित्रांबरोबर मेजवानी केल्याने सुख मिळू शकते, पण भाकर किंवा द्राक्षारस मिळवण्याकरता तुम्हाला पैसे लागतात. भौतिक गोष्टी विकत घेण्याचा पैसा हाच एक मार्ग असल्यामुळे त्याच्यानेच “सर्व काही साध्य होते.”

शलमोनाकडे अमाप संपत्ती असली तरीसुद्धा धनदौलतीलाही काही सीमा असतात हे त्याला माहीत होते. जीवनामध्ये भौतिक गोष्टींची चंगळ असली म्हणजेच सौख्य मिळते असे नाही हे त्याने जाणले होते. त्याने लिहिले: “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही.”—उपदेशक ५:१०.

समजा एखादा श्रीमंत मनुष्य आणखी संपत्ती प्राप्त करतो. शलमोन म्हणतो: “संपत्ति वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेहि वाढतात.” (उपदेशक ५:११) एखाद्याची “संपत्ति,” किंवा धनदौलत वाढते तेव्हा त्याची काळजी घेण्याकरता आणखी लोकांची गरज भासते. दुरुस्ती करणारे, काळजी घेणारे, नोकर, रक्षक आणि इतर लोक यांना त्यांच्या कामाचा पगार द्यावा लागतो. ह्‍यासाठी आणखी पैसे लागतात.

या सर्व गोष्टींचा एखाद्याच्या सौख्यावर थेट परिणाम होतो. सा.यु.पू. चौथ्या शतकात हयात असलेल्या झेनफेन नामक एका ग्रीक इतिहासकाराने एका गरीब व्यक्‍तीविषयी लिहिले जो नंतर श्रीमंत झाला होता:

“अरे, तुम्हाला असे का वाटते, की माझ्याकडे भरपूर असले म्हणजे तितकाच मी सुखी होईन? तुम्हाला माहीत नाही, मी गरीब होतो तेव्हा जसं खाऊन पिऊन सुखानं झोपत होतो तसं आता किंचितही झोपू शकत नाही. माझ्याकडं इतकी संपत्ती असल्यामुळे मला काय मिळालं तर, माझ्यावर जास्तीची काळजी घेण्याची, इतरांना अधिक वाटून देण्याची जबाबदारी पडली आहे आणि माझ्याकडे होते त्यापेक्षा अधिक संपत्तीची काळजी घेण्याची पीडा माझ्यावर आली आहे. कारण पुष्कळ नोकर आता अन्‍नपाण्यासाठी, कपड्यालत्त्यासाठी माझ्यावरच अवलंबून आहेत, काहींना वैद्याची गरज आहे; कोणी माझ्याकडे, कोल्ह्यानं मेंढीवर हल्ला केला, किंवा कड्यावरून पडून माझा बैल मेला किंवा जनावरांना रोग आला, अशी गाऱ्‍हाणी सांगत येतो. म्हणून आता मला असे वाटू लागले आहे, की . . . माझ्याकडे पूर्वी थोडंच होतं ते बरं होतं कारण जास्त असल्यामुळे माझ्यावर जास्तच पीडा आल्या आहेत.”

लोक आणखी धनदौलत मिळवण्यामागे का लागले आहेत याचे आणखी एक कारण म्हणजे येशू ख्रिस्ताने ज्याला “द्रव्याचा मोह” म्हटले त्या मोहाने ते भुलवून गेले आहेत. (मत्तय १३:२२) त्यांची फसवणूक झाली आहे कारण, ते जी धनदौलत मिळवण्याची खटपट करीत असतात तीत त्यांना केव्हाही समाधान किंवा सौख्य मिळत नाही. अधिक संपत्ती असल्यावर पुष्कळ गोष्टी करता येतात; थोडीशी संपत्ती असल्यावर तसे करता येत नाही असा ते तर्क करतात. म्हणून आणखी कसे मिळवता येईल याच प्रयत्नात ते असतात.

पैशाचे प्रेम सौख्याप्रत निरवत नाही

एखाद्या श्रीमंत मनुष्याची त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीबद्दल असलेल्या काळजीमुळे रात्रीची शांत झोपच उडून जाते. शलमोन लिहितो: “कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही.”—उपदेशक ५:१२.

एखाद्याच्या संपत्तीची हानी होण्याच्या शक्यतेची जेव्हा अधिक काळजी केली जाते तेव्हा नुसती झोपच उडून जात नाही. एका कंजूष व्यक्‍तीचे वर्णन करताना शलमोनाने लिहिले: “तो सर्व आयुष्यभर अंधारांत अन्‍न खातो; त्यास बहुत खेद, राग व संताप ही होतात.” (उपदेशक ५:१७) आपल्या धनदौलतीत सुखी राहण्याऐवजी तो ‘पीडित’ होऊन जेवतो; अन्‍नासाठी पैसा खर्च करायलाही त्याच्या जीवावर येते. अशा अस्वस्थकारी मानसिक दृष्टिकोनामुळे एखाद्याच्या तब्येतीवर विपरित परिणाम होऊ शकतात. भरीस भर म्हणजे तब्येत ढासळल्यामुळे दुःखी व्यक्‍तीची काळजी आणखीच वाढते कारण त्यामुळे तो आणखी संपत्ती मिळवू शकत नाही.

यावरून कदाचित तुम्हाला प्रेषित पौलाने काय लिहिले ते आठवेल: “परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून . . . त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” (१ तीमथ्य ६:९, १०) पैशाच्या मागे लागून लोक फसवेगिरी करतात, खोटं बोलतात, चोरी करतात, स्वतःच्या देहाची विक्री करतात व खूनही पाडतात. परिणामी, पैशावरची पकड घट्ट ठेवण्याच्या प्रयत्नात एखादा स्वतःला भावनिक, शारीरिक व आध्यात्मिक खेदांनी भोसकून घेतो. हा सौख्याकडे नेणारा मार्ग वाटतो का? मुळीच नाही!

आपल्याकडे आहे त्यात समाधान मानणे

धनदौलतीविषयी समतोल दृष्टिकोन बाळगण्याविषयी शलमोनाला आणखी काही म्हणावयाचे होते. त्याने लिहिले: “तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमांचे काहीहि फळ आपल्याबरोबर घेऊन जाणार नाही. मला जे बरे व मनोरम दिसून आले ते हे: मनुष्याने खावे; प्यावे व ह्‍या भूतलावर जे श्रम तो करितो त्या सर्वात देवाने त्यास दिलेल्या आयुष्यभर सुख भोगावे कारण एवढेच त्याच्या वाट्यास आहे.”—उपदेशक ५:१५, १८.

या शब्दांवरून दिसून येते, की आपण जिवंत राहणार नाही अशा काळासाठी संपत्ती साठवण्याची खटपट करण्यात सौख्य नाही. त्यापेक्षा कष्टाच्या कामातून मिळेल त्यात समाधानी व आनंदी राहणे बरे. प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेल्या त्याच्या प्रेरित पत्रात हेच विचार मांडले; तो म्हणाला: “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.”—१ तीमथ्य ६:७, ८; पडताळा लूक १२:१६-२१.

सौख्याची गुरुकिल्ली

शलमोनाकडे प्रचंड धनदौलत आणि ईश्‍वरी बुद्धी होती. परंतु त्याने सौख्याला पैशाबरोबर नव्हे तर बुद्धीबरोबर जोडले. तो म्हणाला: “ज्याला ज्ञान प्राप्त होते, जो सुज्ञता संपादन करितो, तो मनुष्य धन्य [सुखी] होय. कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीहि इष्ट वाटणारी वस्तु त्याच्याशी तुल्य नाही. त्याच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे; त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहेत; त्याचे माग आनंदाचे आहेत; त्याच्या सर्व वाटा शांतिमय आहेत. जे त्याला धरून राहतात त्यास ते जीवनवृक्षरूप आहे; जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य होय.”—नीतिसूत्रे ३:१३-१८.

भौतिक संपत्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ का आहे? शलमोनाने लिहिले: “ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाहि आश्रय देणारा आहे; तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करिते.” (उपदेशक ७:१२) पैशाने काही प्रमाणात संरक्षण मिळते, पैशाचा मालक त्याला हवे ते विकत घेऊ शकतो; पण बुद्धी, एखाद्याच्या जीवावर बेतू शकणाऱ्‍या धोक्यांपासून त्याचे संरक्षण करते. खरी बुद्धी एखाद्याचा अकाली मृत्यूपासूनच बचाव करीत नाही तर ती देवाबद्दलच्या योग्य भयावर आधारित असल्यामुळे सार्वकालिक जीवनाप्रत त्याला निरवू शकते.

ईश्‍वरी बुद्धीने सौख्य का प्राप्त होते? कारण, खरे सौख्य केवळ यहोवा देवाकडूनच येऊ शकते. खरे सौख्य सर्वोच्च देवाच्या अधीन राहिल्यानेच मिळू शकते हे अनुभवावरून सिद्ध होते. टिकाऊ सौख्य देवाबरोबरच्या मान्यताप्राप्त स्थितीवर अवलंबून असते. (मत्तय ५:३-१०) बायबलच्या अभ्यासाद्वारे आपण शिकलेल्या गोष्टींचे अवलंबन केल्याने आपण “वरून येणारे ज्ञान” विकसित करू. (याकोब ३:१७) धनदौलतीतून कदापि न मिळणारे सौख्य ते आपल्याला प्रदान करील.

[५ पानांवरील चित्र]

माणूस सुखी कसा होऊ शकतो हे राजा शलमोनाला माहीत होते. तुम्हाला माहीत आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा