एक श्रीमंत आणि बुद्धिमान राजा
आपल्याकडे धनदौलत असली तर आपण सुखात राहू असे तुम्हाला वाटते का? समजा, कोणीतरी तुम्हाला खूप पैसा दिला, तर तुम्हाला आनंद होणार नाही का? कदाचित होईल. कदाचित तुम्ही आता तो पैसा कसा खर्च करावा याचाही विचार करू लागाल.
कबूल आहे, की जीवन सोयीस्कर आणि सुखकर बनवू शकणाऱ्या अनेक गोष्टी आहेत ज्या विकत घेता येऊ शकतात. शिवाय, पैसा हा आजारपण किंवा बेकारी यांसारख्या अनपेक्षित समस्यांपासून “आश्रय” देऊ शकतो.—उपदेशक ७:१२.
परंतु, पैसा आणि सौख्य यांत काय नाते आहे? बऱ्याच लोकांप्रमाणे तुमचे देखील असे मत आहे का, की पैसा आला की ओघाओघाने माणसाला सुखही मिळतेच? या प्रश्नांचे उत्तर मिळणे जरा कठीणच असू शकते कारण पैसा सहजपणे मोजला जाऊ शकतो; सौख्य मोजता येत नाही. तुम्ही सौख्य एका तराजूवर ठेवून त्याचे वजन पाहू शकत नाही.
याशिवाय, श्रीमंतांपैकी काही खूप सुखी वाटतात, तर काही दुःखी. गरीबांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. तरीसुद्धा, बहुतेक लोकांना—ज्यांच्याकडे आधीपासूनच धनदौलत आहे अशांनासुद्धा—वाटते, की आणखी पैसा असला की त्यांना जास्त सौख्य मिळेल.
प्राचीन इस्राएलातील राजा शलमोनाने या विषयावर लेखन करून त्याचा खुलासा केला. पृथ्वीवर राहून गेलेल्या धनाढ्य लोकांपैकी तो एक होता. बायबलमधील पहिले राजे नामक पुस्तकाच्या १० व्या अध्यायात तुम्ही त्याच्या अमाप संपत्तीचे वर्णन वाचू शकता. जसे की, त्यातील १४ वे वचन पाहा काय म्हणते: “प्रतिवर्षी शलमोनाकडे सोने येई ते सहाशे सहासष्ट किक्कार भरे.” (तिरपे वळण आमचे.) ही संख्या २५ टन सोन्याच्या बरोबरीची आहे. आज, त्या सोन्याची किंमत ७,७५,००,००,००० रुपयांपेक्षा किती तरी अधिक असू शकते!
आणि शलमोन केवळ श्रीमंतच नव्हता; देवाने त्याला बुद्धी देऊन आशीर्वादित केले होते. बायबल म्हणते: “शलमोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता. देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेविले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरले लोक त्याच्या दर्शनास येत.” (१ राजे १०:२३, २४) आपल्यालाही शलमोनाच्या बुद्धीचा फायदा होऊ शकतो; कारण त्याचे लिखाण बायबलमध्ये सामील आहे. धनदौलत आणि सौख्य यांमधील नात्याविषयी तो काय म्हणतो ते आपण पाहू या.
[Picture Credit Line on page 3]
Die Heilige Schrift - Übersetzt von Dr. Joseph Franz von Allioli पासून पुनःनिर्मित Druck und Verlag von Eduard Hallberger, Stuttgart