वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१५ पृ. ७-९
  • युनीके व लोईस—अनुकरणीय शिक्षक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • युनीके व लोईस—अनुकरणीय शिक्षक
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “बालपणापासूनच” शिक्षण
  • तीमथ्याचे प्रस्थान
  • महत्त्वपूर्ण धडे
  • युनीकेच्या उदाहरणातून एक आई काय शिकू शकते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • तीमथ्याला लोकांना मदत करायची इच्छा होती
    आपल्या चिमुकल्यांना शिकवा
  • तरुणांनो—यहोवाला सन्मान मिळेल अशाप्रकारची ध्येये राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • सेवा करण्यास तयार असलेला—तीमथ्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१५ पृ. ७-९

युनीके व लोईस—अनुकरणीय शिक्षक

यहोवाचे सेवक या नात्याने, आपल्या मुलांना प्रभावकारी धार्मिक शिक्षण देणे ही गंभीर जबाबदारी आहे हे आपल्याला माहीत आहे. परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी, ही कामगिरी सर्व प्रकारच्या अडथळ्यांनी व अडचणींनी युक्‍त असू शकते. आणि धार्मिक मतभेद असलेल्या कुटुंबांमध्ये एक ख्रिस्ती पालक जेव्हा या आव्हानाचा सामना करीत असतो तेव्हा तर ते अधिकच कठीण असते. ही परिस्थिती काही नवीन नाही. सा.यु. पहिल्या शतकातील एक आई अशाच परिस्थितीत असल्याचे शास्त्रवचने आपल्याला दाखवून देतात.

तिचे नाव होते युनीके; ती आपल्या कुटुंबासोबत दक्षिण-मध्य आशिया मायनर येथील लुकवनियाच्या क्षेत्रातील लुस्त्र या शहरात राहात होती. लुस्त्र एक लहानसे प्रांतीय शहर होते; त्याला काही खास महत्त्व नव्हते. ती एक रोमन वसाहत होती जिचे नाव होते यूल्या फेलिक्स जेमिना लुस्ट्रा; आजूबाजूच्या क्षेत्रांतील दरोडेखोरांच्या कार्यहालचालींचा प्रतिरोध करण्याकरता ऑगस्टस सिझर यांनी तिची स्थापना केली होती. युनीके एक यहुदी ख्रिस्ती होती; ती, धार्मिक मतभेद असलेल्या घरात आपला ग्रीक पती, आपला मुलगा तीमथ्य आणि आई लोईस यांच्याबरोबर राहत होती.—प्रेषितांची कृत्ये १६:१-३.

कदाचित, लुस्त्र येथे फार कमी यहुदी राहत होते; कारण, तेथे सिनगॉग (सभास्थान) असल्याचा कोणताही उल्लेख बायबलमध्ये करण्यात आलेला नाही; पण, जवळजवळ ३० किलोमीटर दूर असलेल्या इकुन्यामध्ये यहुदी लोकांची वस्ती होती. (प्रेषितांची कृत्ये १४:१९) म्हणजे युनीकेला आपला विश्‍वास इतका सहजासहजी आचरता आला नसावा. तीमथ्याचा जन्म झाल्यावर त्याची सुंता करण्यात आली नाही; म्हणजेच, युनीकेच्या पतीने याला विरोध केला असावा असे काही विद्वानांचे म्हणणे आहे.

परंतु युनीके, तिच्या विश्‍वासात एकटीच नव्हती. असे दिसते, की तीमथ्याला त्याच्या आईकडून व आजीकडूनa म्हणजे लोईसकडून, “पवित्र शास्त्राची” माहिती मिळाली होती. प्रेषित पौलाने तीमथ्याला पुढीलप्रमाणे आर्जवले: “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते खिस्त येशूमधील विश्‍वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे.”—२ तीमथ्य ३:१४, १५.

“बालपणापासूनच” शिक्षण

“बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची” शिकवण देण्यात आली होती असे पौलाने तीमथ्याला म्हटले तेव्हा त्याचा उघड अर्थ तान्हेपणापासून असा होतो. हे, ग्रीक शब्द (ब्रेफोस) याच्या अनुरूप आहे जे सामान्यपणे एका नवजात बालकाला सूचित होते. (पडताळा लूक २:१२, १६.) अशाप्रकारे युनीकेने आपली देव-प्रदत्त जबाबदारी गांभीर्याने घेतली; वेळ न दवडता तिने बालपणापासूनच तीमथ्याला अशी शिकवण दिली जी त्याला देवाचा एक भक्‍तिमान सेवक या नात्याने वाढण्यास मदतदायी ठरणार होती.—अनुवाद ६:६-९; नीतिसूत्रे १:८.

तीमथ्याला शास्त्रवचनीय सत्यांची ‘खात्री करून देण्यात’ आली होती. एका ग्रीक शब्दकोशानुसार, पौलाने येथे वापरलेल्या शब्दाचा अर्थ अमूक गोष्टीची “पक्की खात्री करून दिली जाणे; शाश्‍वती करून देणे” असा होतो. यात काही संशय नाही, की तीमथ्याच्या अंतःकरणात अशी पक्की खात्री रुजवण्यासाठी, देवाच्या वचनावर तर्क करण्यास तसेच त्याच्यावर आपला विश्‍वास ठेवण्यास त्याला मदत करण्यासाठी पुरेसा वेळ आणि परिश्रम यांची आवश्‍यकता होती. स्पष्टतः, युनीके आणि लोईस या दोघींनी तीमथ्याला शास्त्रवचनांतून शिकवण देण्याकरता खूप कष्ट घेतले. आणि या ईश्‍वरी स्त्रियांना त्यांच्या कष्टाचे किती उत्तम प्रतिफळ मिळाले! पौल तीमथ्याविषयी असे म्हणू शकला: “तो विश्‍वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठायी होता; तुझी आई युनीके हिच्या ठायी होता; आणि तोच तुझ्याहि ठायी आहे असा मला भरवसा आहे.”—२ तीमथ्य १:५.

युनीके आणि लोईसने तीमथ्याच्या जीवनात केवढी महत्त्वाची भूमिका बजावली! याबाबतीत, लेखक डेव्हिड रीड असे म्हणतात: “तीमथ्याच्या धर्मान्तराच्या व्यक्‍तिगत अनुभवाव्यतिरिक्‍त दुसरे काहीही महत्त्वाचे नाही असे जर प्रेषिताला वाटले असते तर त्याने लागलीच त्याला त्याची आठवण करून दिली असती. परंतु, तीमथ्याच्या विश्‍वासाविषयी त्याला सर्वात पहिले असे म्हणावयाचे आहे, की ‘लोईस . . . आणि युनीके मध्ये’ तो विश्‍वास आधीपासूनच जिवंत होता.” लोईस, युनीके आणि तीमथ्य यांच्या विश्‍वासासंबंधीचे पौलाचे वाक्य दाखवून देते, की पालकांनी किंवा आजीआजोबांनी एखाद्या युवकाला लहानपणापासूनच घरीच दिलेले शास्त्रवचनीय शिक्षण बहुधा त्याची भावी आध्यात्मिक आशा ठरवण्यात खूप महत्त्वाचे आहे. तेव्हा, देवाप्रती आणि आपल्या मुलांप्रती असलेली आपली जबाबदारी पूर्ण करण्याबाबतीत आपण काय करत आहोत यावर कुटुंबातील सदस्यांनी गंभीरपणे विचार करू नये का?

कदाचित, लोईस आणि युनीके यांनी आपल्या घरात निर्माण केलेल्या वातावरणाचाही पौल विचार करीत असावा. सा.यु. ४७/४८ च्या सुमारास तो जेव्हा पहिल्यांदाच लुस्त्र येथे राहावयास गेला होता तेव्हा कदाचित त्याने त्यांच्या घरी भेट दिली असावी. तेव्हाच कदाचित या दोन स्त्रिया ख्रिस्ती धर्मात आल्या असाव्यात. (प्रेषितांची कृत्ये १४: ८-२०) त्यांच्या घरातील प्रेमळ, आनंदी नातेसंबंध पाहूनच पौलाने लोईससाठी तीमथ्याची “आजी” हा शब्द निवडला असावा. त्याने वापरलेला (टेथी या पारंपरिक आणि आदरणीय शब्दाच्याविरुद्ध असलेला मॅम्मी) हा ग्रीक शब्द, “एक लहान मूल प्रेमाने” आपल्या आजीला असे संबोधते; आणि या संदर्भात तो शब्द “ओळखीचा व आपुलकीचा” काहीसा वेगळा अर्थ देतो, असे सेसलॉ स्पीक नामक एक विद्वान म्हणतात.

तीमथ्याचे प्रस्थान

पौलाने दुसऱ्‍यांदा (सा.यु. ५० च्या सुमाराला) लुस्त्रला भेट दिली तेव्हा युनीकेची वैवाहिक स्थिती कशी होती याबद्दल काही स्पष्टीकरण नाही. अनेक विद्वानांच्या मते, ती तेव्हा विधवा झाली होती. असो, तीमथ्य आपल्या आईच्या आणि आजीच्या मार्गदर्शनामुळे एक उत्तम तरुण पुरुष झाला; कदाचित तो तेव्हा २० वर्षांचा असावा. “त्याला लुस्त्रातले व इकुन्यातले बंधु नावाजीत होते.” (प्रेषितांची कृत्ये १६:२) स्पष्टतः, तीमथ्याच्या अंतःकरणात राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्याची इच्छा रुजवण्यात आली होती; कारण त्याने पौल आणि सिलास यांच्याबरोबर मिशनरी प्रवासाला येण्याविषयी पौलाचे आमंत्रण स्वीकारले होते.

तीमथ्य आता निघणार यावर युनीके आणि लोईसला कसे वाटले असेल त्याची कल्पना करा! पौल पहिल्यांदाच त्यांच्या शहराला भेट द्यायला आलेला असताना त्याच्यावर दगडमार होऊन तो मेला असे समजून त्याला टाकण्यात आल्याची घटना अजूनही त्यांच्या मनात ताजी होती. (प्रेषितांची कृत्ये १४:१९) म्हणून तीमथ्याला जाऊ देण्यास त्या दोघींना इतके सोपे वाटले नसावे. तो खूप दिवसांसाठी जाणार व पुन्हा घरी सुखरूप येईल की नाही याचा कदाचित त्यांनी विचार केला असावा. अशा संभाव्य चिंतेत असतानाही त्याच्या आईने व आजीने त्याला हा खास सुहक्क स्वीकारण्यास निश्‍चितच उत्तेजन दिले जेणेकरून तो यहोवाची सेवा अधिक प्रमाणात करू शकत होता.

महत्त्वपूर्ण धडे

युनीके आणि लोईस यांचा काळजीपूर्वक विचार केल्यावर आपल्याला पुष्कळ काही शिकता येते. विश्‍वासाने त्यांना तीमथ्याचे आध्यात्मिक सुदृढ संगोपन करण्यास प्रवृत्त केले. आजीआजोबा आपल्या नातवंडांसमोर आणि इतरांसमोर ईश्‍वरी भक्‍तीच्या प्रौढतेचे, स्थिरतेचे उदाहरण मांडतात तेव्हा अख्ख्या ख्रिस्ती मंडळीला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. (तीत २:३-५) तसेच, युनीकेचे उदाहरण, ज्यांचे पती सत्यात नाहीत अशा मातांना, आपल्या मुलांना आध्यात्मिक प्रशिक्षण देण्याच्या जबाबदारीची आणि प्रतिफळांची आठवण करून देते. असे करण्यासाठी कधीकधी मोठ्या धैर्याची आवश्‍यकता भासेल; विशेषकरून तेव्हा, जेव्हा पिता आपल्या पत्नीच्या धार्मिक विश्‍वासांप्रती योग्य मनोवृत्ती बाळगत नसतो. यासाठी चातुर्याची देखील आवश्‍यकता आहे; कारण ख्रिस्ती पत्नीने आपल्या पतीच्या मस्तकपदाचा आदर केला पाहिजे.

तीमथ्याने इतकी आध्यात्मिक प्रगती केली, की तो एक उत्तम मिशनरी आणि पर्यवेक्षक बनला; आणि हे पाहून लोईस आणि युनीके यांना त्यांचा विश्‍वास, श्रम आणि आत्म-त्याग यांचे प्रतिफळ मिळाले. (फिलिप्पैकर २:१९-२२) आजही, आपल्या मुलांना शास्त्रवचनीय सत्ये शिकवण्याकरता वेळ, धीर आणि दृढनिश्‍चय यांची आवश्‍यकता आहे, आणि त्यांच्या परिश्रमाचे सार्थक तेव्हा ठरते जेव्हा परिणाम चांगला निघतो. धार्मिक मतभेद असलेल्या कुटुंबात ‘बालपणापासूनच पवित्र लिखाणांची’ शिकवण मिळालेले अनेक अनुकरणीय ख्रिस्ती तरुण त्यांच्या ईश्‍वरी पालकांना खूप आनंद देतात. आणि हे नीतिवचन किती खरे आहे की: “सुज्ञ मुलास जन्म देते ती त्याजविषयी आनंद पावते.”—नीतिसूत्रे २३:२३-२५.

“माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही,” असे प्रेषित योहानाने आपल्या आध्यात्मिक मुलांविषयी म्हटले. (३ योहान ४) निश्‍चितच, या शब्दांत व्यक्‍त केलेली भावना युनीके आणि लोईस या दोन अनुकरणीय शिक्षकांसारख्या शाबीत झालेल्या अनेकांच्या बाबतीतही खऱ्‍या आहेत.

[तळटीप]

a लोईस ही तीमथ्याच्या वडिलांची आई नव्हती हे, सिरियाक अनुवादातून स्पष्ट होते. तेथे २ तीमथ्य १:५ मध्ये “तुझ्या आईची आई” असे म्हटले आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा