वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ५/१ पृ. ८-१३
  • यहोवाचा दिवस जवळ आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचा दिवस जवळ आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कीटकांचा हल्ला
  • “अहो मद्यप्यांनो, जागे व्हा!”
  • “याजकहो, . . . शोक करा”
  • “परमेश्‍वराचा दिवस येत आहे”
  • ‘यहोवा विलंब करणारा नाही’
  • उत्तरेकडून हल्ला!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • पहिला अनर्थ—टोळ
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
  • यहोवाच्या नावाचा धावा करा आणि सुरक्षित बचाव मिळवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ५/१ पृ. ८-१३

यहोवाचा दिवस जवळ आहे

“अहो वृद्धहो, हे ऐका; देशात राहणारे सर्व जनहो, कान द्या.”—योएल १:२.

१, २. यहुदामधील कोणत्या परिस्थितीमुळे यहोवाने योएल याला त्याची प्रबळ भविष्यवाणी घोषित करण्यास प्रेरित केले?

“त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्‍वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.” किती नाट्यमय घोषणा! देवाने त्याच्या लोकांकरता योएल संदेष्ट्याद्वारे दिलेला हा एक संदेश होता.

२ योएल १:१५ येथील हे शब्द, सा.यु.पू. ८२० सालाच्या आसपास यहुदामध्ये लिहिण्यात आले असावेत. तो देश हिरव्यागार डोंगर-दऱ्‍यांनी नटला होता. फळे आणि धान्य मुबलक होते. हिरवीगार आणि विशाल कुरणे होती. तथापि, त्या देशात काहीतरी वाईट घडत होते. जेरुसलेम आणि यहुदामध्ये बआल उपासनेची भरभराट होत चालली होती. या खोट्या देवतासमोर लोक पिऊन धिंगाणा घालत होते. (पडताळा २ इतिहास २१:४-६, ११.) हे सर्व चालू ठेवण्यास यहोवा परवानगी देणार होता का?

३. यहोवाने कोणत्या गोष्टीचा इशारा दिला आणि राष्ट्रांना कशासाठी तयार होण्यास हवे?

३ योएल, हे बायबलमधील पुस्तक या प्रश्‍नाचे उत्तर अगदी स्पष्टपणे देते. यहोवा देव त्याच्या सार्वभौमत्त्वाचे दोषनिवारण करील आणि त्याच्या पवित्र नावाचे शुद्धीकरण करील. यहोवाचा महान दिवस जवळ होता. तेव्हा देव “यहोशाफाटाच्या खोऱ्‍यात” सर्व राष्ट्रांवर न्यायदंड बजावेल. (योएल ३:१२) सर्वशक्‍तिमान यहोवाबरोबर लढाई करण्याची वेळ आली होती. आपल्यासमोर सुद्धा यहोवाचा महान दिवस आहे. तर मग, आपल्या दिवसाकरता आणि भूतकाळातील दिवसाकरता असलेल्या योएलच्या भविष्यसूचक शब्दांचे आपण काळजीपूर्वक परीक्षण करू या.

कीटकांचा हल्ला

४. योएलने इशारा दिलेली घटना किती मोठी असणार होती?

४ आपल्या संदेष्ट्याद्वारे यहोवा म्हणतो: “अहो वृद्धहो, हे ऐका; देशात राहणारे सर्व जनहो, कान द्या. तुमच्या काळी अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळी अशी गोष्ट कधी घडली होती काय? तुम्ही हे आपल्या मुलाबाळास कळवा, तुमच्या मुलांनी आपल्या मुलाबाळास कळवावे व त्यांच्या मुलांनी आपल्या पुढच्या पिढीस कळवावे.” (योएल १:२, ३) वडीलधारे आणि सर्वजण अशाप्रकारच्या गोष्टीची आशा करू शकत होते जी गोष्ट त्यांच्या किंवा त्यांच्या वाडवडिलांच्या काळात कधीही घडली नव्हती. ही घटना इतकी विलक्षण होती, की तिसऱ्‍या पिढीपर्यंत तिचे स्मरण करण्यात आले! ही संस्मरणीय घटना कोणती होती? याचा शोध घेण्यासाठी, आपण योएलच्या दिवसांत असल्याची कल्पना करू या.

५, ६. (अ) योएल भविष्यवाणी करत असलेल्या पीडेचे वर्णन करा. (ब) या पीडेचा उगम कोण होता?

५ ऐका! योएलला दूरवरून येणारी गर्जना ऐकू येते. आकाशात काळोख पसरतो आणि आकाशातील हा काळोख जसजसा गडद होत जातो तसतसा हा भयानक आवाज वाढत जातो. त्यानंतर धूरासमान ढग खाली उतरतो. कोट्यवधी कीटकांचे ते सैन्य आहे. आणि ह्‍या सैन्याने केलेली किती ही नासधूस! आता नवे जग भाषांतर यातील योएल १:४ या वचनाचा विचार करा. हल्ला करणाऱ्‍या या कीटकांमध्ये पंख असणारे टोळच नाहीत. इतर प्रकारचेही कीटक आहेत! खुरडत चालणारे, पंखरहित टोळधाडही येत आहे. हवेमुळे या टोळधाडी अचानक येतात आणि त्यांचा आवाज रथांच्या आवाजाप्रमाणे आहे. (योएल २:५) त्यांच्या खादाडपणामुळे, हे कोट्यवधी टोळ निमिषात एका सुंदर बगीच्याला ओसाड करू शकतात.

६ सुरवंट—पतंग किंवा फुलपाखरू यांची डिंभक अवस्था—देखील हल्ला करण्यासाठी येत आहेत. अधाशी सुरवंटांचे बलाढ्य सैन्य वनस्पतींचे पान न्‌ पान साफ करून टाकतात; वनस्पती निष्पर्ण होत नाहीत तोपर्यंत हे सुरवंट तेथून हटत नाहीत. त्यांच्याकडून जे शिल्लक राहते त्यांतील बहुतेक भाग टोळ खातात. आणि त्यांच्याकडून जे शिल्लक राहते ते जलद चाल करणारी झुरळे खातात. पण याकडे लक्ष द्या: योएल अध्याय २, वचन ११ मध्ये, देव या टोळांच्या सैन्याची ओळख ‘त्याचे सैन्य’ अशी करून देतो. होय, टोळांद्वारे ही पीडा घडवून आणण्याचा उगम तो स्वतः होता; या टोळामुळे देश ओसाड पडून भयंकर दुष्काळ पडणार होता. केव्हा? ‘यहोवाच्या दिवसाच्या’ काही काळाआधी.

“अहो मद्यप्यांनो, जागे व्हा!”

७. (अ) यहुदाच्या धार्मिक पुढाऱ्‍यांची परिस्थिती कशी होती? (ब) आज ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांची अवस्था यहुदाच्या धार्मिक पुढाऱ्‍यांप्रमाणे कशी आहे?

७ पुढील आज्ञा दिली जाते तेव्हा अपकीर्तीच्या लोकसमुदायाला, यहुदाच्या धार्मिक पुढाऱ्‍यांना वेगळे केले जाते: “अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा; द्राक्षारस पिणाऱ्‍यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षारसाकरिता विलाप करा, कारण तो तुमच्या तोंडून काढून घेतला आहे.” (योएल १:५) होय, यहुदाच्या आध्यात्मिक मद्यप्यांना “जागे व्हा”, शुद्धीवर या असे सांगण्यात आले होते. हा केवळ प्राचीन इतिहास आहे, असा मात्र विचार करू नका. आता देखील, यहोवाच्या महान दिवसाआधी, ख्रिस्तीधर्मजगताचे पाळक लाक्षणिकरीत्या द्राक्षारसाच्या नशेने इतके मस्त झाले आहेत की त्यांना परात्पराच्या आज्ञेची थोडीसुद्धा जाण राहिलेली नाही. यहोवाच्या महान आणि भयावह दिवसाद्वारे त्यांना त्यांच्या नशेच्या धुंदीतून उठवले जाईल तेव्हा त्यांना किती आश्‍चर्य वाटेल!

८, ९. (अ) टोळांचे आणि त्यांच्या पीडेमुळे होणाऱ्‍या परिणांमाचे वर्णन योएल कसे करतो? (ब) आज टोळ कोणास सूचित करतात?

८ टोळांच्या महान सैन्याकडे पाहा! “माझ्या देशावर बळकट व असंख्य लोक आले आहेत; त्यांचे दात सिंहाच्या दातासारखे आहेत; त्यास सिंहिणीचे सुळे आहेत. त्यांनी माझ्या द्राक्षवेलांची नासधूस केली आहे; माझ्या अंजिराच्या झाडाच्या ढलप्या काढिल्या आहेत, सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकिली आहे, आणि त्याच्या फांद्या पांढऱ्‍या झाल्या आहेत. तरुण स्त्री गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरिता शोक करिते तसा शोक करा.”—योएल १:६-८.

९ यहुदावर हल्ला करणाऱ्‍या टोळांच्या ‘देशाची’ अर्थात टोळधाडीची ही एक निव्वळ भविष्यवाणी आहे का? नाही, यामध्ये आणखी काहीतरी समाविष्ट आहे. योएल १:६ आणि प्रकटीकरण ९:७ या दोन्ही वचनांमधील टोळ देवाच्या लोकांना सूचित करतात. आधुनिक दिवसांतील टोळांचे सैन्य, यहोवाच्या अभिषिक्‍त टोळांच्या सैन्य दलाशिवाय दुसरे कोणी नाही; त्यांच्यासोबत आता येशूची ५६,००,००० “दुसरी मेंढरे” देखील आहेत. (योहान १०:१६) यहोवाच्या उपासकांच्या या महान समुदायाचा भाग असल्यामुळे तुम्हाला आनंद होत नाही का?

१०. टोळांच्या पीडेचा यहुदावर कोणता परिणाम होतो?

१० टोळांच्या पीडेमुळे काय परिणाम झाला याविषयी आपल्याला योएल १:९-१२ मध्ये वाचावयास मिळते. एका टोळधाडीनंतर दुसरी टोळधाड येऊन त्यांनी जवळजवळ संपूर्ण प्रदेश ओसाड केला. धान्याचा, द्राक्षारसाचा आणि तेलाचा तुटवडा असल्यामुळे अविश्‍वासू याजकांना त्यांचे काम चालू ठेवता येणे शक्य नव्हते. भूमीसुद्धा शोक करत आहे कारण टोळांनी तिच्या पिकाची नासाडी केली आहे आणि फळांनी लगडलेल्या झाडांवरची फळे नष्ट केली आहेत. द्राक्षीचे वेल नाश झाल्यामुळे बआलची उपासना करणाऱ्‍या मद्यप्यांना द्राक्षारस राहिला नाही.

“याजकहो, . . . शोक करा”

११, १२. (अ) देवाचे याजक होण्याचा आज कोण दावा करतात? (ब) ख्रिस्ती धर्मजगताच्या पुढाऱ्‍यांवर आजच्या टोळांच्या पीडेचा कसा परिणाम होतो?

११ मार्गभ्रष्ट याजकांकरता असणारा देवाचा संदेश ऐका: “याजकहो, गोणताट घालून शोक करा; वेदीची सेवा करणाऱ्‍यांनो, विलाप करा.” (योएल १:१३) योएलच्या भविष्यवाणीच्या पहिल्या पूर्णतेत, लेवीय याजकांनी वेदीपाशी सेवा केली. परंतु शेवटच्या पूर्णतेबद्दल काय? आज, ख्रिस्तीधर्मजगताच्या पाळकांनी देवाच्या वेदीपाशी सेवा करण्याचा अधिकार स्वतःसाठी राखला आहे आणि आपण देवाचे सेवक आहोत, त्याचे ‘याजक’ आहोत, असा ते दावा करत आहेत. तथापि, देवाचे आधुनिक दिवसांतील टोळ आगेकूच करत असताना त्यांची सध्याची स्थिती काय आहे?

१२ ख्रिस्ती धर्मजगताचे ‘याजक’ जेव्हा यहोवाच्या लोकांना कार्यरत असल्याचे पाहतात आणि ईश्‍वरी न्यायाचा त्यांचा इशारा ऐकतात तेव्हा ते अगदी वेडेपिसे होतात. राज्य संदेशाच्या विध्वंसक परिणामांमुळे शोकाकुल आणि क्रोधित होऊन ते आपले ऊर बडवून घेतात. त्यांचा कळप त्यांच्या कह्‍यातून निघून जात असल्यामुळे ते गळा काढून रडत आहेत. त्यांची कुरणे ओसाड पडल्यामुळे त्यांना गोणताटावर पडून रात्र काढू द्या आणि झालेल्या नुकसानासाठी शोक करू द्या. लवकरच त्यांचे स्थान देखील गेलेले असेल! खरे तर, त्यांचा अंत जवळ असल्यामुळे देव त्यांना संपूर्ण रात्र शोक करण्यास सांगतो.

१३. ख्रिस्ती धर्मजगतातील सर्वजण यहोवाच्या इशाऱ्‍याप्रती अनुकूल प्रतिक्रिया दाखवतील का?

१३ योएल १:१४ या वचनानुसार त्यांची आशा, पश्‍चात्ताप करण्यावर आणि मदतीसाठी ‘यहोवाला आरोळी मारण्यावर’ अवलंबून आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील सबंध पाळकवर्ग यहोवाकडे येईल, अशी अपेक्षा आपण करू शकतो का? अर्थातच नाही! त्यांच्यापैकी काहीजण कदाचित यहोवाच्या इशाऱ्‍याला प्रतिक्रिया दाखवतीलही. परंतु या धार्मिक पुढाऱ्‍यांची आणि त्यांच्या सदस्यांची आध्यात्मिक उपासमार कायम राहील. संदेष्टा आमोस याने भाकीत केले: “प्रभु परमेश्‍वर [“यहोवा,” NW] म्हणतो, पाहा असे दिवस येत आहेत की त्यात मी देशावर दुष्काळ आणीन; तो दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्‍नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्‍वराची [यहोवाची] वचने ऐकण्यासंबंधीचा होईल.” (आमोस ८:११) दुसऱ्‍या बाजूला पाहता, पौष्टिक आध्यात्मिक मेजवानीप्रती आपण किती कृतज्ञ आहोत; देव ही मेजवानी ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासामार्फत’ आपल्याला प्रेमळपणे देतो.—मत्तय २४:४५-४७.

१४. टोळांची पीडा कोणत्या गोष्टीचे पूर्वचिन्ह आहे?

१४ टोळांची पीडा कोणत्या तरी गोष्टीचे पूर्वचिन्ह होते आणि आहे देखील. कोणत्या गोष्टीचे पूर्वचिन्ह? योएल आपल्याला स्पष्टपणे असे सांगतो: “त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्‍वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.” (योएल १:१५) आज संपूर्ण जगभरात देवाच्या टोळधाडी या गोष्टीला स्पष्टपणे सूचित करतात, की यहोवाचा महान आणि भयंकर दिवस जवळ आहे. निश्‍चितच, सर्व प्रामाणिक अंतःकरणाचे लोक झाडा घेण्याच्या त्या खास दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत; तेव्हा वाईट लोकांच्या विरोधात ईश्‍वरी न्यायदंड बजावण्यात येईल आणि यहोवा हाच विश्‍वाचा सार्वभौम या नात्याने विजयी होईल.

१५. देशाच्या वाईट परिस्थितीला पाहता ईश्‍वरी इशाऱ्‍याकडे लक्ष देणारे कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवतात?

१५ योएल १:१६-२० मध्ये दाखवण्यात आल्यानुसार, प्राचीन यहुदामध्ये अन्‍नधान्याचा पुरवठा संपुष्टात आला होता. त्याचप्रमाणे आनंदही नाहीसा झाला होता. पेवे रिकामे पडले होते आणि कोठारे पाडावी लागली होती. टोळांनी रानांतील कुरणे खाऊन टाकल्याने गुरे व्याकूळ होऊन भटकत होती आणि मेंढरांचे कळपच्या कळप मरत होते. किती मोठी विपत्ती! अशाप्रकारच्या परिस्थितींत योएलने काय केले? वचन १९ नुसार त्याने म्हटले “हे परमेश्‍वरा, [यहोवा] तुझा मी धावा करितो.” आज सुद्धा, अनेक लोक ईश्‍वरी इशाऱ्‍याकडे कान देतात आणि विश्‍वासाने यहोवा देवाच्या नावाने धावा करतात.

“परमेश्‍वराचा दिवस येत आहे”

१६. ‘देशात राहणाऱ्‍या सर्वांचा’ का थरकाप झाला पाहिजे?

१६ देवाची पुढील आज्ञा ऐका: “सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत.” (योएल २:१) अशाप्रकारची प्रतिक्रिया का? भविष्यवाणी उत्तर देते: ‘कारण, परमेश्‍वराचा [यहोवाचा] दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे. तो अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस आहे; तो पर्वतावर विस्तारलेल्या प्रभातेच्या प्रकाशासारखा आहे.’ (योएल २:१, २) यहोवाच्या महान दिवसासोबत तातडीचा खरा अर्थ जोडलेला आहे.

१७. यहुदा देशावर आणि त्यातील लोकांवर टोळांच्या पीडेचा कोणता परिणाम झाला?

१७ अथक टोळांनी खरोखरच्या एदेन बागेला ओसाड केले तेव्हा संदेष्ट्याला मिळालेल्या दृष्टान्ताच्या परिणामाची कल्पना करा. टोळांच्या या सैन्याचे वर्णन ऐका: “त्यांचे स्वरूप घोड्यांच्या स्वरूपासारखे आहे. स्वारांसारखे ते धावतात. ते उड्या टाकितात, त्यांचा आवाज डोंगरमाथ्यांवरून जाणाऱ्‍या रथांच्या आवाजासारखा आहे; धसकट खाऊन टाकणाऱ्‍या ज्वालेच्या कडकडण्यासारखा ते आवाज करितात; युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत. त्यांच्यापुढे राष्ट्रे व्यथित होतात, सर्वांची तोंडे काळवंडतात.” (योएल २:४-६) योएलच्या दिवसांतील टोळांच्या पीडेच्या वेळी बआल उपासकांच्या यातना वाढल्या आणि चिंतेचे सावट त्यांच्या चेहऱ्‍यावर दिसू लागले.

१८, १९. आज देवाच्या लोकांचे कार्य टोळांच्या पीडेसमान कसे राहिले आहे?

१८ आज्ञांकित, परिश्रमी टोळांना कोणत्याही गोष्टीने थांबवता आले नाही. ‘वीराप्रमाणे धाऊन’ ते तट देखील चढून गेले. त्यांच्यापैकी काही ‘शस्त्रांना सामोरे गेले, इतर खचले नाहीत.’ (योएल २:७, ८) देवाच्या लाक्षणिक टोळांच्या आजच्या सैन्याचे किती हुबेहूब भविष्यसूचक वर्णन! आजही, यहोवाच्या टोळांच्या सैन्याची आगेकूच चालू आहे. अडथळा आणणारा कोणताही “तट” त्यांना थांबवू शकत नाही. देवाप्रती असणाऱ्‍या त्यांच्या सचोटीशी ते हातमिळवणी करत नाहीत, खरे तर मरणाला सामोरे जाण्यासही ते तयार आहेत; नात्सी शासनादरम्यान हाइल हिटलर असे म्हणण्यास नकार देण्याद्वारे हजारो साक्षीदारांनी ‘शस्त्रांचा सामना केला.’

१९ ख्रिस्ती धर्मजगताच्या ‘शहरामध्ये’ देवाच्या आजच्या टोळासमान सैन्याने पूर्णपणे साक्ष दिली आहे. (योएल २:९) त्यांनी संपूर्ण जगातही अशी साक्ष दिली आहे. ते अद्यापही सर्व अडथळे पार करत आहेत आणि यहोवाच्या संदेशाची घोषणा करत असता कोट्यवधी लोकांच्या घरापर्यंत पोहंचत आहेत, लोकांना रस्त्यांवर भेटत आहेत, दूरध्वनीद्वारे लोकांशी बोलत आहेत आणि संभाव्य असणाऱ्‍या प्रत्येक मार्गाद्वारे लोकांशी संपर्क साधत आहेत. खरोखरच, त्यांनी कित्येक अब्ज बायबल प्रकाशनांचे वाटप केले आहे आणि त्यांच्या कधीही न संपणाऱ्‍या सेवाकार्यात सार्वजनिकरीत्या आणि घराघरांत ते अद्यापही अनेक प्रकाशनांचे वितरण करतील.—प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१.

२०. आधुनिक दिवसांतील टोळांना कोण समर्थन देत आहे आणि त्याचा कोणता परिणाम होतो?

२० योएल २:१० दाखवते, की टोळधाड एखाद्या मेघाप्रमाणे आहे ज्यामुळे सूर्य, चंद्र आणि तारे दृष्टिआड होतात. (पडताळा यशया ६०:८.) या सैन्य दलाच्या मागे कोण आहे, यात काही शंका आहे का? या कीटकांच्या गर्जनेपेक्षा जास्त आवाज असलेले योएल २:११ येथील शब्द आपण ऐकतो: “परमेश्‍वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करितो; कारण त्याचा तळ विस्तीर्ण आहे; त्याचा हुकूम बजाविणारा बलवान आहे; परमेश्‍वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे; त्या वेळी कोण टिकेल?” होय, यहोवा देव टोळांच्या सैन्याला आता—त्याच्या महान दिवसाआधी पाठवत आहे.

‘यहोवा विलंब करणारा नाही’

२१. “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल” तेव्हा काय होईल?

२१ योएलप्रमाणे, प्रेषित पेत्र यहोवाच्या महान दिवसाविषयी बोलला. त्याने लिहिले: “चोर येतो तसा प्रभूचा [यहोवाचा] दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.” (२ पेत्र ३:१०) दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली, दुष्ट सरकारी “आकाश,” ‘पृथ्वीवर’ म्हणजे देवापासून दूर गेलेल्या मानवजातीवर राज्य करते. (इफिसकर ६:१२; १ योहान ५:१९) हे लाक्षणिक आकाश आणि पृथ्वी यहोवाच्या महान दिवशी ईश्‍वरी क्रोधाग्नीपासून बचावणार नाहीत. त्याऐवजी ‘नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी येईल आणि त्याच्या वचनाप्रमाणे आपण त्यांची वाट पाहत आहोत.’—२ पेत्र ३:१३.

२२, २३. (अ) यहोवाची दयावान सहनशीलता दाखवण्याप्रती आपली प्रतिक्रिया कशाप्रकारची असली पाहिजे? (ब) यहोवाच्या दिवसाच्या निकटतेप्रती आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली पाहिजे?

२२ आजच्या दिवसातील सर्व विकर्षणे आणि विश्‍वासाच्या सर्व परीक्षा यांमुळे काळाच्या निकडीकडे आपले दुर्लक्ष होऊ शकते. परंतु लाक्षणिक टोळ आगेकूच करत आहेत तसे अनेक लोक राज्य संदेशाचा स्वीकार करत आहेत. देवाने याकरता समय दिला असला तरी, सहनशीलतेला विलंब समजून आपण स्वतःचा गोंधळ करून घेऊ नये. “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.”—२ पेत्र ३:९.

२३ यहोवाच्या महान दिवसाची वाट पाहत असताना आपण २ पेत्र ३:११, १२ मधील पेत्राचे शब्द लक्षात ठेवू: “तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्‍तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे तप्त होऊन वितळतील.” या कार्यात निश्‍चितच यहोवाच्या टोळसैन्यासोबत आपण राहणे समाविष्ट आहे; शेवट येण्यापूर्वी राज्याच्या सुवार्तेच्या प्रचारामध्ये नियमित आणि अर्थपूर्ण सहभाग घेण्याद्वारे असे करणे शक्य आहे.—मार्क १३:१०.

२४, २५. (अ) यहोवाच्या टोळांच्या सैन्यासोबत काम करण्याच्या विशेषाधिकाराप्रती तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवता? (ब) योएल कोणता अर्थपूर्ण प्रश्‍न विचारतो?

२४ हे देवाचे टोळसैन्य, यहोवाचा महान आणि भयंकर दिवस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपले काम थांबवणार नाही. रोखता न येणाऱ्‍या या टोळांच्या दलाचे अस्तित्व या गोष्टीचा विलक्षण पुरावा आहे, की यहोवाचा दिवस निकट आहे. यहोवाच्या महान आणि भयंकर दिवसाच्या आधी शेवटच्या हल्ल्यामध्ये देवाचे अभिषिक्‍त टोळ आणि त्यांचे सहकारी यांच्यासोबत सेवा करण्यात तुम्हाला आनंद होत नाही का?

२५ यहोवाचा दिवस किती महान असेल! यात काहीच आश्‍चर्याचे नाही जेव्हा असा प्रश्‍न विचारला जातो की: “त्या वेळी कोण टिकेल?” (योएल २:११) या प्रश्‍नाचा आणि इतर अनेक प्रश्‍नांचा पुढील दोन लेखांत विचार केला जाईल.

तुम्ही स्पष्ट करू शकाल का?

◻ यहुदावरील कीटकांच्या पीडेविषयी यहोवाने इशारा का दिला?

◻ आजच्या दिवसातील योएलच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत, यहोवाचे टोळ कोण आहेत?

◻ ख्रिस्ती धर्मजगताचे पुढारी टोळांच्या पीडेप्रती कशी प्रतिक्रिया दाखवतात आणि त्यांच्यातील काहींना तिच्या परिणामांपासून वाचणे कशाप्रकारे शक्य आहे?

◻ विसाव्या शतकात टोळांची पीडा किती लांबपर्यंत पसरली आहे आणि ही पीडा कोठवर असेल?

[९ पानांवरील चित्र]

कीटकांची ही पीडा कोणत्यातरी वाईट गोष्टीचे पूर्वचिन्ह होते

[Credit Line]

निष्पर्ण झाड: FAO photo/G. Singh

[१० पानांवरील चित्र]

आजच्या टोळांच्या पीडेमागे यहोवा देव आहे

[Picture Credit Line on page 8]

टोळ: FAO photo/G. Tortoli; टोळांचा कळप: FAO photo/Desert Locust Survey

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा