यहोवा कोण आहे?
यहोवाने त्याच्या एका विश्वासू उपासकाला सांगितले: “माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” (निर्गम ३३:२०) “देव आत्मा आहे” आणि मानव त्याला आपल्या शारीरिक डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. (योहान ४:२४) भर दुपारी उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहणे जसे डोळ्यांसाठी घातक असते तसेच अति तेजोमय सूर्य आणि विश्वातील इतर अगणित सूर्यांना निर्माण करणाऱ्या प्रचंड उर्जेच्या उगमाकडे पाहणे आपल्याकरता घातक ठरेल.
देवाविषयी जाणण्याकरता आपल्याला त्याला पाहण्याची आवश्यकता नाही. बायबल, आपल्यासाठी ते सुंदर पुडके, अर्थात पृथ्वी निर्माण करणारा कोण आहे तसेच त्याचे व्यक्तिमत्त्व या दोन्हींची ओळख करून देते. तेव्हा, आपल्याला जीवन देणाऱ्या व त्या जीवनाचा आनंद लुटण्याकरता एक आल्हाददायक आसरा देणाऱ्या पित्याविषयीची माहिती बायबलमधूनच शोधणे योग्य ठरेल.
त्याच्या नावाचा अर्थ
प्रत्येक नावाचा अर्थ असतो; आज अनेकांना याची कदाचित जाणीवही नसेल. उदाहरणार्थ, डेव्हीड हे इंग्रजीतील सर्वसामान्य नाव एका हिब्रू शब्दापासून आले आहे ज्याचा अर्थ होतो, “प्रिय.” सृष्टीकर्त्याचे नाव यहोवा यालाही एक अर्थ आहे. कोणता अर्थ? मूळ हिब्रू भाषेतील बायबलमध्ये, हे ईश्वरी नाव, YHWH या चार अक्षरांमध्ये लिहिले आहे आणि बायबलच्या हिब्रू भागात ते जवळजवळ ७,००० वेळा आढळते. त्या ईश्वरी नावाचा अर्थ, “तो व्हावयास कारणीभूत ठरतो,” असा आहे असे समजले जाते. याचा अर्थ असा होतो, की यहोवा आपले उद्देश साध्य करण्याकरता त्याला हवे तसे तो सुज्ञपणे बनतो. तो निर्माणकर्ता, न्यायाधीश, तारणकर्ता, जीवनरक्षक आहे म्हणून आपली अभिवचने पूर्ण करू शकतो. एवढेच नव्हे तर, हिब्रू भाषेत यहोवा हे नाव अशा शाब्दिक रूपात आहे जे साध्य करण्याच्या क्रियेतील एक कार्य सूचित करते. होय, यहोवा आजही आपल्या उद्देशांचा पूर्तीकर्ता व्हावयास कारणीभूत ठरत आहे. तो एक जिवंत देव आहे!
यहोवाचे लक्षणीय गुण
“दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध आणि प्रेमदया व सत्य यांत उदंड, हजारोंवर दया करणारा, अन्याय व अपराध आणि पाप यांची क्षमा करणारा,” असे बायबलमध्ये निर्माणकर्त्याचे वर्णन करण्यात आले आहे. (निर्गम ३४:६, ७, पं.र.भा.) “प्रेमदया” असे भाषांतर करण्यात आलेला इब्री शब्द अतिशय अर्थपूर्ण आहे. तो शब्द अशी दया सूचित करतो जी एखाद्या वस्तूला तोपर्यंत प्रेमळपणे जडून राहते जोपर्यंत त्या वस्तूकरता असलेला उद्देश पूर्ण होत नाही. त्याचे “निष्ठावंत प्रीती” असेही भाषांतर केले जाऊ शकते. यहोवाची दया त्याच्या प्राण्यांना प्रेमळपणे जडून राहते व त्याचे आश्चर्यकारक उद्देश साध्य करते. ज्याने तुम्हाला जीवन दिले आहे त्याच्याकडून येणारी अशाप्रकारची प्रीती तुम्ही जतन करून ठेवणार नाही का?
यहोवा मंदक्रोध व आपल्या चुका क्षमा करण्यास तत्पर आहे. अशा व्यक्तीच्या जवळ असणे आनंदविणारे आहे. म्हणजे, तो चुका करायला सूट देतो असा याचा अर्थ होत नाही. त्याने असे म्हटले: “मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे.” (यशया ६१:८) न्यायी देव या नात्याने तो, दुष्टपणा आचरणाऱ्या उर्मट पातक्यांचे सहन करीत राहणार नाही. यावरून आपल्याला खात्री मिळते की यहोवा त्याच्या उचित समयी जगातील सर्व अन्याय दूर करील. आणि पीडितांकडे तो पाठ फिरवणार नाही.
प्रेम आणि न्याय यांच्यामध्ये अचूक समतोल राखणे म्हणावे तितके सोपे नाही. तुम्ही पालक आहात तर, तुमचे मूल बेशिस्तपणे वागते त्यावेळेस त्याची सुधारणूक केव्हा, कशी व किती प्रमाणात करायची हे ठरवायला तुम्हाला जड जाते का? प्रेमळ दया आणि न्याय यांच्यामध्ये समतोल राखण्यासाठी बुद्धीची आवश्यकता आहे. यहोवा जेव्हा मानवांबरोबर व्यवहार करतो तेव्हा तो उंदड प्रमाणात हा गुण प्रदर्शित करतो. (रोमकर ११:३३-३६) खरेच, निर्माणकर्त्याची सुज्ञता सर्वत्र दिसून येते; जसे की आपल्या सभोवतालच्या सृष्टीच्या किमयेतच पाहा.—स्तोत्र १०४:२४; नीतिसूत्रे ३:१९.
पण, नुसतीच सुज्ञता असणे पुरेसे नाही. सृष्टीकर्त्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्तीची आवश्यकता आहे, आणि तो शक्तिशाली आहे हे बायबल प्रकट करते: “आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वास नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.” (यशया ४०:२६) आपल्या ‘महासामर्थ्याद्वारे’ यहोवा गोष्टी घडवून आणतो. या गुणामुळे तुम्ही त्याच्याकडे आकर्षित होणार नाही का?
सर्व राष्ट्रांचा देव
तुम्हाला वाटेल, ‘पण यहोवा देव तर “जुन्या कराराचा,” प्राचीन इस्राएलचा देव आहे ना?’ यहोवाने स्वतःला इस्राएल लोकांना प्रकट केले होते हे खरे आहे. तरीसुद्धा, पहिल्या मानवी जोडप्याला निर्माण केल्यामुळे ‘ज्या पित्यावरून प्रत्येक वंशास नाव देण्यात आले आहे,’ तो यहोवा देव आहे. (इफिसकर ३:१४, १५) पूर्वजांचा आदर करणे उचित आहे असा तुमचा विश्वास असल्यास, आज पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व वंशांचा मूळ अर्थात आपला समाईक पूर्वज, पहिला मनुष्य याला जीवन देणाऱ्याला दंडवत करणे उचित नाही का?
मानवजातीचा सृष्टीकर्ता संकुचित मनाचा नाही. हे खरे की एके काळी त्याने इस्राएल राष्ट्राशी एक खास नातेसंबंध प्रस्थापित केला होता. तरीसुद्धा, त्याने त्याच्या नावाचा धावा करणाऱ्या सर्वांचा स्वीकार केला होता. इस्राएलमधील एक सुज्ञ राजा प्रार्थनेत यहोवाला म्हणाला होता: ‘तुझ्या इस्राएल लोकातला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील ते कर; म्हणजे या भूतलावरील सर्व देशाचे लोक तुझे नाम ओळखतील.’ (१ राजे ८:४१-४३) आजही, सर्व राष्ट्रांतील लोक यहोवाला ओळखू शकतात व त्याच्याशी एक अर्थपूर्ण नातेसंबंध प्रस्थापित करू शकतात. पण याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?
यहोवाला ओळखण्याचे फायदे
मागील लेखातील उदाहरणाचा आपण पुन्हा एकदा विचार करू या; तुम्हाला एखादे छानसे वेष्टन असलेले पुडके मिळाल्यावर, ते बक्षीस आपल्याला कशासाठी देण्यात आले आहे हे जाणण्यास तुम्ही स्वाभाविकच उत्सुक असाल. त्या पुडक्याचा वापर व त्याची काळजी कशी घेतली पाहिजे? तसेच, देवाने आपल्यासाठी पृथ्वी बनवली तेव्हा त्याच्या मनात काय होते हे आपण जाणू इच्छितो. बायबल म्हणते, की “त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही,” तर तिजवर मानवांची “लोकवस्ती व्हावी” म्हणून निर्मिली.—यशया ४५:१८.
परंतु, अनेक मानवांनी निर्माणकर्त्याचे हे बक्षीस जपून ठेवले नाही. ते पृथ्वीची नासाडी करत आहेत; यामुळे यहोवाला अतिशय वाईट वाटते. पण यहोवाने, त्याच्या नावाचा जो अर्थ होतो त्यानुसार मानव आणि पृथ्वीच्या संबंधाने त्याचा मूळ उद्देश पूर्ण करण्याचे ठरवले आहे. (स्तोत्र ११५:१६; प्रकटीकरण ११:१८) तो पृथ्वीला दुरुस्त करील आणि त्याची आज्ञाधारक मुले या नात्याने जे जगू इच्छितात अशांना ती वतन म्हणून प्रदान करील.—मत्तय ५:५.
असे होईल तेव्हा परिस्थिती कशी असेल याचे वर्णन बायबलचे शेवटले पुस्तक अर्थात प्रकटीकरणाचे पुस्तक असे करते: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील . . . तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) तेव्हा कोणाच्याही डोळ्यांतून दुःखाश्रू वाहणार नाहीत किंवा मरण पावलेल्या आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी कोणी शोक करणार नाही. कोणीही उद्विग्न होऊन मदतीसाठी याचना करणार नाही किंवा घातक आजारांच्या यातना भोगणार नाही. तेव्हा, ‘मृत्यू नाहीसा केला जाईल.’ (१ करिंथकर १५:२६; यशया २५:८; ३३:२४) यावरून तुम्हाला कल्पना येईल, की आपल्या पहिल्या पूर्वजांना यहोवाने निर्माण केले तेव्हा आपल्या सर्वांच्या सुखाकरता त्याने कशाप्रकारचे जीवन उद्देशिले होते.
होय, तुम्हाला यहोवाच्या उपासकांमध्ये आताही परादीसमय परिस्थितीची पूर्व झलक पाहायला मिळू शकेल. तो त्यांना म्हणतो: “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” (यशया ४८:१७) यहोवा एक दयाळू पिता आहे जो आपल्या मुलांना जीवनाचा उत्तम मार्ग शिकवतो. त्याची मार्गदर्शने मानवांवर अवाजवी बंधने लादत नाहीत तर त्यांचे प्रेमळपणे संरक्षण करतात. त्यांचे अनुकरण केल्याने, “प्रभु आत्मा आहे; आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे” या वचनाप्रमाणे त्यांना खरे स्वातंत्र्य व आनंद मिळेल. (२ करिंथकर ३:१७) बायबलमधील मार्गदर्शनांचे अनुकरण करण्याद्वारे, त्याचे शासकत्व स्वीकारणारे ती मनाची शांती अनुभवत आहेत जी एके दिवशी संपूर्ण मानवजगतात पसरेल.—फिलिप्पैकर ४:७.
केवढा परोपकारी आहे आपला पिता यहोवा! सृष्टीच्या किमयेमागे जो आहे त्याविषयी तुम्ही आणखी शिकू इच्छिता का? जे तयार आहेत त्यांना आताही मौल्यवान लाभ होतात. आणि भविष्यात चिरकालासाठी आशीर्वाद मिळतील.
[५ पानांवरील चित्र]
चार हिब्रू अक्षरांमध्ये लिहिलेले ईश्वरी नाव पुष्कळ जुन्या चर्चेसच्या भिंतींवर पाहायला मिळते