वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ८/१ पृ. २१-२५
  • दृष्टी आणि अंतःकरण प्रतिफळावर लावणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दृष्टी आणि अंतःकरण प्रतिफळावर लावणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पूर्ण वेळेची सेवा
  • आमच्या नेमणुकीमध्ये
  • नवीन नेमणुका
  • अमेरिकेत परतणे
  • पुन्हा एका गिलियड प्रशालेत
  • अर्जेंटिनात नेमणूक
  • पुन्हा एकदा अमेरिकेत येणे
  • पहिल्याने राज्य मिळवण्यास झटणे—सुरक्षित व आनंदी जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • आमच्या आईवडिलांनी आम्हाला देवावर प्रेम करायला शिकवलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • माझ्या पालकांचे अनुकरण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • “तुझी प्रेमदया जीवनापेक्षा उत्तम आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ८/१ पृ. २१-२५

दृष्टी आणि अंतःकरण प्रतिफळावर लावणे

एडीथ मायकल यांच्याद्वारे कथित

आम्ही सन १९३० च्या दशकाच्या प्रारंभाला, सेंट लुईस, मिसूरी, अमेरिका, याच्या जवळ राहत असतानाच एक यहोवाची साक्षीदार आमच्याकडे आली. तेवढ्यात, कपडे सुकवण्यासाठी लावलेली दोर तुटली व आईचे पांढरे शुभ्र कपडे मातीने माखले. ती स्त्री तेथून लवकर निघून जावी म्हणून तिने सादर केलेली पुस्तके आईने स्वीकारली आणि कपाटावर ठेवून, त्यांच्याबद्दल पूर्णपणे विसरून गेली.

तोमंदीचा काळ होता व बाबांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. एके दिवशी त्यांनी, घरामध्ये वाचण्यासाठी काही आहे का, असे विचारले. आईने त्यांना त्या पुस्तकांबद्दल सांगितले. त्यांनी ती वाचावयास सुरवात केली आणि थोड्याच वेळात म्हणाले: “आई, हेच सत्य आहे!”

“अहो, ह्‍या धर्माला पण दुसऱ्‍या धर्मांप्रमाणे पैसे हवे आहेत,” असे ती उत्तरली. परंतु, बाबांनी तिला खाली बसून त्यांच्यासोबत शास्त्रवचने पाहण्यास गळ घातली. ती त्यांच्यासोबत बसली आणि पाहता पाहता तिची देखील खात्री पटली. नंतर ते दोघे साक्षीदारांना शोधू लागले व सेंट लुईसच्या मध्यभागी असलेल्या एका सभागृहात साक्षीदार एकत्र येत असल्याचा त्यांना पत्ता लागला. या सभागृहात नृत्य व इतर समारंभ देखील होत असत.

आई व बाबांनी मलाही त्यांच्यासोबत नेले—मी तेव्हा जवळजवळ तीन वर्षांची होते—आम्हाला ते सभागृह सापडले, परंतु तेथे नृत्य चालले होते. बाबांनी सभांच्या वेळांची चौकशी केली व त्यानुसार आम्ही पुन्हा आलो. आम्ही राहत होतो तेथे जवळपास होणाऱ्‍या साप्ताहिक बायबल अभ्यासाला देखील आम्ही उपस्थित राहू लागलो. आमच्या घरी पहिल्यांदा आलेल्या त्या स्त्रीच्या घरामध्ये हा अभ्यास चालवला जात होता. “तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा का आणत नाही?,” तिने विचारले. मुलांना बूट नव्हते हे सांगण्यासाठी आईला लाज वाटली. शेवटी तिने सांगून टाकले आणि बूट देण्यात आले व माझे भाऊसुद्धा आमच्याबरोबर सभांना येऊ लागले.

आईला आमच्या घराशेजारीच प्रचारासाठी क्षेत्र देण्यात आले आणि तिने घरोघरची सेवा सुरू केली. मीही तिच्या मागे लाजतलाजत जाऊ लागले. ती कार चालवण्यास शिकण्याआधी, आम्ही सेंट लुईस येथील सभांना बसने जात असू आणि ही बस घेण्यासाठी आम्ही जवळजवळ एक किलोमीटर पायी जात. बर्फ असो हिम असो, आम्ही सभा कधीही चुकवल्या नाहीत.

१९३४ मध्ये आई आणि बाबांचा बाप्तिस्मा झाला. मलाही बाप्तिस्मा घेण्याची इच्छा होती व मी आईच्या मागे तसा हट्ट केला, शेवटी तिने एका वृद्ध साक्षीदाराला माझ्यासोबत याबद्दल बोलण्यास सांगितले. त्या वृद्ध साक्षीदाराने मला समजतील अशाप्रकारे अनेक प्रश्‍न विचारले. मग त्यांनी माझ्या पालकांना सांगितले, की त्यांनी मला बाप्तिस्म्यासाठी अडवू नये; नाहीतर त्यामुळे कदाचित माझ्या आध्यात्मिक वाढीवर दुष्परिणाम घडतील. म्हणून पुढील उन्हाळ्यात, मी सहा वर्षांचीच होते तेव्हा माझा बाप्तिस्मा झाला.

मला गृह व आनंद (इंग्रजी), ही पुस्तिका खूप आवडत असे, मी ती सतत माझ्याजवळ बाळगत असे, झोपताना सुद्धा माझ्या उशीखाली ती ठेवत असे. ती पुस्तिका मला जोपर्यंत तोंडपाठ होत नाही तोपर्यंत ती मोठ्याने वाचून दाखवण्यासाठी मी आईला वारंवार सांगत असे. त्या पुस्तिकेच्या पार्श्‍वपृष्ठावर, एक चिमुकली सिंहासोबत असल्याचे चित्र होते. मी म्हणत असे, ती मुलगी मी आहे. त्या चित्राने मला, माझी दृष्टी देवाच्या नवीन जगातील प्रतिफळावर लावण्यास मदत केली आहे.

माझा स्वभाव अतिशय लाजरा होता, मी घाबरून थरथरत असले तरी, मंडळीच्या टेहळणी बुरूज अभ्यासातील प्रश्‍नांची उत्तरे नेहमी देत होते.

एक दुःखाची गोष्ट अशी, की बाबांना वाटले, साक्षीदार झाल्याने त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागेल म्हणून त्यांनी साक्षीदारांबरोबर सहवास राखण्याचे सोडून दिले. माझ्या भावांनीसुद्धा असेच केले.

पूर्ण वेळेची सेवा

आईने, आमच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या रिकाम्या जागी पायनियरांना किंवा पूर्ण वेळेच्या सेवकांना त्यांच्या जोडगाड्या ठेवण्याची परवानगी दिली होती, आणि शाळेनंतर मी त्यांच्यासोबत सेवेत जात असे. लवकरच मलाही पायनियर व्हावयाचे होते, पण मी आणखी लौकिक शिक्षण घ्यावे असे बाबांना वाटत असल्यामुळे त्यांनी याला विरोध केला. मला पायनियरींग करू द्यावे म्हणून आईने कशीतरी त्यांची समजूत काढली. यास्तव, जून १९४३ मध्ये मी १४ वर्षांची झाले तेव्हा पूर्ण वेळेच्या सेवेस सुरवात केली. घरखर्चास हातभार लावण्यासाठी, मी अर्ध-वेळेची नोकरी केली, व काही वेळा पूर्ण वेळेची नोकरी देखील केली. तरीही, मी प्रचारकार्यात महिन्याला १५० तासांचे ध्येय गाठले.

कालांतराने मला एक पायनियर सोबतीण, डॉरथी क्रेडनची साथ मिळाली. तिने जानेवारी १९४३ मध्ये ती जेव्हा १७ वर्षांची होती तेव्हा पायनियरींगला सुरवात केली होती. ती पूर्वी एक भक्‍तीमान कॅथलिक होती, पण बायबलचा सहा महिने अभ्यास केल्यानंतर तिचा बाप्तिस्मा झाला. अनेक वर्षांसाठी आम्ही दोघी एकमेकींकरीता उत्तेजनाचा व शक्‍तीचा स्रोत होतो. आम्ही सख्ख्या बहिणींपेक्षा अधिक जवळ झालो.

सन १९४५ मध्ये आम्ही एकत्र मिळून मंडळी नसलेल्या मिसूरीमधील लहान शहरांमध्ये पायनियरींगला सुरवात केली. बाऊलिंग ग्रीन येथे आम्ही एक सभागृह ठीकठाक केले; आई आम्हाला मदत करण्यासाठी आली होती. मग आम्ही दर आठवडी शहरातील प्रत्येक घरी जाऊन, लोकांना जाहीर व्याख्यानाचे आमंत्रण देत असू, हे व्याख्यान देण्यासाठी आम्ही सेंट लुईस येथील बांधवांना आमच्याकडे येऊन जाहीर व्याख्यान देण्याची व्यवस्था करत असू. आमच्या येथे आठवड्याला ४० ते ५० च्या दरम्यान उपस्थिती असे. त्यानंतर आम्ही लुईझियाना येथे एक मेसनीक मंदिर भाड्याने घेतले व असेच केले. सभागृहाचे भाडे भरण्यासाठी आम्ही दानपेट्या ठेवल्या, आणि प्रत्येक आठवडी सर्व खर्च भागवला जाई.

मग आम्ही मेक्सिको, मिसूरी येथे गेलो. तेथे आम्ही, दुकाने असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील एक खोली भाड्याने घेतली. आमच्या लहानशा मंडळीच्या वापरासाठी आम्ही त्यामध्ये काही व्यवस्था केल्या. इमारतीलगत खोल्या होत्या, आम्ही तेथे राहत होतो. मेक्सिकोत सुद्धा आम्ही जाहीर भाषणांची व्यवस्था केली. त्यानंतर आम्ही राज्याची राजधानी, जेफरसन सिटीत गेलो. तेथे आठवड्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी, आम्ही सार्वजनिक अधिकाऱ्‍यांना त्यांच्या कार्यालयांत जाऊन भेटत असू. राज्यसभागृहाच्या अगदी वर असलेल्या एका खोलीत आम्ही स्टेल्ला विली यांच्यासमवेत राहत होतो. त्या आम्हाला अगदी आईसारख्या होत्या.

तेथून मग आम्ही तिघी, जवळजवळ असलेल्या फेसटस, क्रिस्टल सिटीमध्ये गेलो. आम्ही एका आस्थेवाईक कुटुंबाच्या घराच्या मागील बाजूला, आधी कोंबड्यांचे खुराडे असलेल्या ठिकाणी झालेल्या घरात राहत होतो. तेथे कोणीही बाप्तिस्माप्राप्त पुरुष नसल्यामुळे आम्हीच सर्व सभा चालवत असू. अर्ध-वेळेच्या नोकरीसाठी आम्ही सौंदर्यप्रसाधनांची विक्री करत होतो. आम्ही आर्थिकरीत्या गरीब होतो. खरे पाहता, बुटांना तळ लावण्यासही आम्हाला परवडत नसल्यामुळे दररोज सकाळी आम्ही आमच्या बुटांमध्ये पुठ्याचा नवीन तुकडा घालत व रोज रात्री आमचा एकच ड्रेस धुवून टाकत असू.

१९४८ च्या सुरवातीला, मी १९ वर्षांची होते तेव्हा, डॉरथी व मला मिशनऱ्‍यांसाठी असलेल्या वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १२ व्या वर्गाचे आमंत्रण आले. पाच महिन्यांच्या सत्रानंतर, शंभर विद्यार्थ्यांना फेब्रुवारी ८, १९४९ रोजी पदवीदान मिळाले. तो अतिशय आनंदाचा दिवस होता. माझे पालक कॅलिफोर्नियात राहावयास गेले होते, आणि या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी माझी आई तेथून येथपर्यंत आली होती.

आमच्या नेमणुकीमध्ये

अठ्ठावीस पदवीधारकांना इटली येथे नेमण्यात आले—डॉरथी, मी आणि आणखी सहा जणांना मिलान नावाच्या शहरात नेमण्यात आले. मार्च ४, १९४९ रोजी वुलकॉनियॉ नावाच्या एका इटालियन जहाजाने आम्ही न्यूयॉर्क शहर सोडले. हा प्रवास ११ दिवसांचा होता, आणि आमच्यातील बहुतेकांना हा तुफानी समुद्रप्रवास मानवला नाही. जिनोआच्या बंदरावर बंधू बेनंटी आम्हाला ट्रेनने मिलानला पुन्हा नेण्यासाठी आले.

मिलान येथील मिशनरी गृहात पोहंचल्यावर, आमच्या प्रत्येकीच्या खोलींमध्ये एका तरुण इटालियन मुलीने फुले ठेवल्याचे आम्हाला दिसले. अनेक वर्षांनंतर ही मुलगी, म्हणजे मरिया मेरॅफिना गिलियडला जाऊन इटलीत आली. आम्ही दोघींनी मिशनरी गृहात सोबत काम केले!

मिलानला पोहंचल्याच्या दुसऱ्‍या दिवशी सकाळी, आम्ही न्हाणीच्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले. आमच्या घराच्या मागील बाजूला रस्त्यावर एक भली मोठी निवासी इमारत होती, जी बाँबच्या माऱ्‍यामुळे उद्‌ध्वस्त झाली होती. एका अमेरिकी बाँबफेकी विमानाने या इमारतीवर चुकून बाँब फेकला होता व त्यामधील ८० कुटुंबे ठार झाली होती. दुसऱ्‍या वेळेस, एका कारखान्याऐवजी शाळेवर बाँब फेकण्यात आला आणि त्यामध्ये ५०० मुले ठार झाली. यास्तव, लोकांना अमेरिकी लोक मुळीच आवडत नव्हते.

लोकांना युद्धाचा कंटाळा आला होता. अनेक जण म्हणत असत, की आता दुसरे एखादे युद्ध सुरु झाले तर आम्ही बाँबसंरक्षकांमध्ये पळून जाण्याऐवजी घरातच राहू व गॅसचे झाकण उघडून आतच मरून पडू. आम्ही संयुक्‍त संस्थानांचे किंवा कोणत्याही मानव निर्मित सरकारचे प्रतिनिधीत्व करीत नसून, सर्व युद्धांचा व त्यामुळे होणाऱ्‍या पीडांचा नाश करणाऱ्‍या देवाच्या राज्याचे प्रतिनिधीत्व करीत आहोत, याची आम्ही त्यांनी खात्री दिली.

मिलानच्या इतक्या मोठ्या शहरात, जवळजवळ २० लोकांची एकच लहानशी मंडळी मिशनरी गृहात एकत्र येत होती. तेथे प्रचारासाठी क्षेत्रांची योजना केली नसल्यामुळे आम्ही एका मोठ्या निवासी इमारतीत साक्षकार्य चालू केले. पहिल्याच दारी आम्ही श्री. गिअनडीनॉट्टी यांना भेटलो. आपल्या पत्नीने चर्चला जाणे सोडून द्यावे अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी आमची प्रकाशने स्वीकारली. श्रीमती गिअनडीनॉट्टी अतिशय प्रामाणिक होत्या, व त्यांचे अनेक प्रश्‍न होते. त्या आम्हाला म्हणाल्या, “तुम्ही इटालियन शिकल्यावर मला खूप आनंद होईल, म्हणजे तुम्ही मला बायबल शिकवू शकाल.”

त्यांच्या घराचे छत खूप उंच होते, व प्रकाश अंधुक होता. म्हणून रात्रीच्या वेळी त्या आपली खुर्ची टेबलावर ठेवून त्यावर बसत, जेणेकरून त्यांना बायबल वाचण्यासाठी पुरेसा प्रकाश मिळे. त्या म्हणाल्या, “मी जर तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास केला, तरीसुद्धा मी चर्चला जाऊ शकेन ना?” ती तुमची मर्जी, असे आम्ही त्यांना सांगितले. रविवारी सकाळी त्या चर्चला जात आणि दुपारी आमच्या सभांना येत. मग एके दिवशी त्या म्हणाल्या, “मी आता इथूनपुढे चर्चला जाणार नाही.”

आम्ही त्यांना विचारले, “का बरे?”

“कारण ते बायबल शिकवत नाहीत, मला तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास केल्यामुळे सत्य मिळाले आहे.” त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्यांनी, दररोज चर्चला जाणाऱ्‍या अनेक स्त्रियांबरोबर अभ्यास केला. काही दिवसांनंतर त्यांनी आम्हाला सांगितले, की जर आम्ही तिला चर्चला जाऊ नका असे सांगितले असते तर तिने अभ्यास करण्याचे थांबवले असते व कदाचित सत्य कधीच शिकले नसते.

नवीन नेमणुका

कालांतराने, डॉरथी, मी व इतर चार मिशनरी, आम्हाला त्र्येस्ते या इटालियन शहरात नेमण्यात आले. या शहरावर नंतर ब्रिटिश व अमेरिकी सैन्याने कब्जा केला. तेथे केवळ दहा साक्षीदार होते, पण मग त्यांची संख्या वाढली. आम्ही त्र्येस्ते येथे तीन वर्षांसाठी प्रचार केला, व ते शहर सोडताना तेथे ४० राज्य प्रचारक होते, ज्यांच्यापैकी १० पायनियर होते.

आमची पुढील नेमणूक व्हेरोना शहरात होती. येथे एकही मंडळी नव्हती. परंतु, चर्चने लौकिक अधिकाऱ्‍यांवर दबाव आणला तेव्हा आम्हाला ते शहर सोडणे भाग पडले. डॉरथी व मला रोमला नेमण्यात आले. तेथे आम्ही सामानसुमान असलेली एक खोली भाड्याने घेतली, व व्हेटिकनच्या शेजारील क्षेत्रात कार्य केले. तेथे असतानाच, जॉन खिमिक्लीस नावाच्या बांधवाबरोबर विवाह करण्यासाठी डॉरथी लेबननला गेली. आम्ही दोघी १२ वर्षांपर्यंत एकमेकींसोबत होतो, व ती गेल्यावर मला खरोखरच तिची उणीव भासली.

सन १९५५ मध्ये, रोमच्या दुसऱ्‍या भागात, अर्थात न्यू अप्पीयन वे नावाच्या रस्त्यावर एक नवीन मिशनरी गृह खुले करण्यात आले. या गृहातील चार जणींपैकी एक, मरिया मेरॅफिना होती, जिने मिलान येथे आम्ही ज्या रात्री पोहंचलो त्या रात्री आमच्या खोल्यांमध्ये फुले ठेवली होती. शहराच्या या भागात एक नवीन मंडळी स्थापन करण्यात आली. त्या वर्षाच्या उन्हाळ्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनानंतर, मला न्यूरेम्बुर्घ, जर्मनी येथील अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा सुहक्क प्राप्त झाला. हिटलरच्या राजवटीखाली छळ सहन केलेल्या बंधू आणि भगिनींना भेटणे केवढे रोमांचकारी होते!

अमेरिकेत परतणे

सन १९५६ मध्ये आरोग्याच्या समस्यांमुळे मी रजा घेऊन पुन्हा अमेरिकेत आले. परंतु यहोवाची, आता आणि त्याच्या नवीन जगामध्ये कायम सेवा करण्याच्या प्रतिफळावरील माझे लक्ष मात्र विचलित होऊ दिले नाही. इटलीला पुन्हा जाण्याच्या मी योजना आखल्या. परंतु ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात सेवा करणाऱ्‍या ओरवेल मायकलची आणि माझी भेट घडली. सन १९५८ मध्ये न्यूयॉर्क शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनानंतर आम्ही विवाह केला.

त्यानंतर लगेचच आम्ही, फ्रन्ट रॉयल, व्हर्जिनिया येथे राहावयास गेलो. तेथे एका छोट्याशा मंडळीबरोबर कार्य करण्यास आम्हाला आवडले. राज्य सभागृहाच्या मागील बाजूला असलेल्या एका लहानशा घरात आम्ही राहत होतो. शेवटी, मार्च १९६० मध्ये बिले भरण्यासाठी आम्हाला लौकिक नोकरी शोधण्यासाठी ब्रुकलिनला परत जावे लागले. आम्ही वेगवेगळ्या बँकांमध्ये रात्रीच्या वेळी काम केले जेणेकरून आम्ही पूर्णवेळेच्या सेवेत राहू शकू.

ब्रुकलिनमध्ये असताना, माझे बाबा वारले, आणि माझ्या सासूला ॲपॉप्लेक्सचा सौम्य झटका आला. म्हणून आम्ही ऑरेगॉनला जाण्याच्या विचार केला जेणेकरून आम्ही आमच्या दोघांच्या आईसोबत राहू शकू. आम्हा दोघांना अर्धवेळेच्या नोकऱ्‍या मिळाल्या ज्यामुळे आम्ही तेथेच पायनियर सेवा करू शकलो. सन १९६४ च्या शरदऋतुत, आम्ही दोघे आणि आमच्या माता, पिट्‌सबर्ग, पेन्सिल्व्हानिया येथील वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीच्या वार्षिक सभेला उपस्थित राहण्यासाठी गेलो.

ऱ्‍होड आयलंडच्या आमच्या भेटीदरम्यान, एका विभागीय पर्यवेक्षकांनी, ऑरलन मेईर आणि त्यांच्या पत्नीने आम्हाला, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या राज्य राजधानीत म्हणजेच प्राव्हिडन्समध्ये जाऊन कार्य करण्याचे उत्तेजन दिले. आमच्या दोघांच्या आयांनी आम्हाला ही नेमणूक स्वीकारण्यास आर्जवले. म्हणून ऑरेगॉनला आल्यावर आम्ही आमच्या घरातील बहुतेक सामानसुमान विकले व तेथे राहावयास गेलो.

पुन्हा एका गिलियड प्रशालेत

सन १९६५ च्या उन्हाळ्यात आम्ही यांकी स्टेडियममध्ये झालेल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. तेथे आम्ही विवाहित जोडपे या नात्याने गिलियड प्रशालेसाठी अर्ज दिला. एक महिन्यानंतर, आम्हाला गिलियडचे अर्ज पाहून आश्‍चर्य झाले, हे अर्ज ३० दिवसांच्या आत पुन्हा पाठवायचे होते. आईची तब्येत चांगली नसल्यामुळे एका दूरवरच्या राष्ट्रात जाण्याबद्दल मला चिंता लागली होती. परंतु तिने असे म्हणून मला उत्तेजन दिले: “ते अर्ज भर. यहोवा, सेवेचा कोणताही सुहक्क आपल्याला देतो तेव्हा आपण तो नेहमी स्वीकारला पाहिजे हे तुला माहीत आहे ना!”

माझी चिंता मिटली. आम्ही अर्ज भरून पाठवून दिले. आणि काय आश्‍चर्य, एप्रिल २५, १९६६ रोजी सुरु झालेल्या ४२ व्या वर्गाचे आम्हाला आमंत्रण मिळाले! त्या काळी गिलियड प्रशाला ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे होती. जवळजवळ पाच महिन्यांपेक्षा कमी काळानंतर, १०६ जणांना सप्टेंबर ११, १९६६ रोजी पदवीदान मिळाले.

अर्जेंटिनात नेमणूक

पदवीदान समारंभानंतर आम्ही पेरुवियन एअरलाईन्सने अर्जेंटिनाला जाण्यासाठी निघालो. ब्वेनोस आइरेस येथे पोहंचल्यावर शाखा पर्यवेक्षक, चार्ल्स आयसनहावर, हे आम्हाला विमानतळावर भेटले. त्यांनी आम्हाला सीमाशुल्काच्या बाबतीत मदत केली व शाखेत नेले. सर्व सामान उघडून आवराआवर करण्यास आम्हाला पूर्ण एक दिवस लागला; त्यानंतर आमचे स्पॅनिश वर्ग चालू झाले. पहिल्या महिन्यात आम्ही दिवसाला ११ तासांसाठी स्पॅनिशचा अभ्यास केला. दुसऱ्‍या महिन्यात, दिवसाला चार तासांसाठी भाषेचा अभ्यास केला व मग क्षेत्र सेवेत भाग घेऊ लागलो.

ब्वेनोस आइरेस येथे आम्ही पाच महिन्यांसाठी होतो, तिकडून आम्हाला ट्रेनने चार तास लागतील इतक्या अंतरावर असलेल्या पूर्वेकडील एका मोठ्या शहरात, रोझारिओत नेमणूक मिळाली. १५ महिन्यांसाठी तेथे सेवा केल्यानंतर आम्हाला पूर्वेकडील दूरवर, सान्तिआगो देल एस्तेरो या उष्ण वाळवंटी प्रदेशात पाठवण्यात आले. तेथे असताना, जानेवारी १९७३ मध्ये माझी आई वारली. मी तिला चार वर्षे पाहिले नव्हते. पुनरुत्थानाची निश्‍चित आशा तसेच मी माझ्या नेमणुकीतच राहावे यामुळे आईला जे समाधान मिळत होते, या दोन गोष्टींनी मला माझ्या दुःखात टिकून राहण्यास साहाय्य केले.—योहान ५:२८, २९; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

सान्तिआगो देल एस्तेरो येथील लोक स्नेही होते, व बायबल अभ्यास सहजतेने चालू करता येत होते. आम्ही १९६८ मध्ये येथे आलो तेव्हा जवळजवळ २० किंवा ३० लोक उपस्थित राहत होते, पण आठ वर्षांनंतर आमच्या मंडळीत शंभरपेक्षा अधिक जण झाले. याशिवाय, जवळपासच्या शहरांमध्ये २५ ते ५० प्रचारक असलेल्या दोन नवीन मंडळ्या होत्या.

पुन्हा एकदा अमेरिकेत येणे

आरोग्याच्या समस्यांमुळे, १९७६ मध्ये आम्हाला खास पायनियर म्हणून अमेरिकेत—फेयट्टेविल, उत्तर कॅलिफोर्निया येथे नेमण्यात आले. तेथे, मध्य व दक्षिण अमेरिका, डोमिनिकन रिपब्लिक, प्वेर्त रिको आणि स्पेनमधील स्पॅनिश भाषिक राहत होते. आमच्याकडे अनेक बायबल अभ्यास होते व कालांतराने तेथे स्पॅनिश भाषेची एक मंडळी देखील स्थापन झाली. त्या नेमणुकीत आम्ही जवळजवळ आठ वर्षे कार्य केले.

परंतु, आता आम्हाला माझ्या सासूबाईंजवळ राहणे आवश्‍यक होते कारण त्या दिवसेंदिवस वृद्ध व आजारी होत होत्या. त्या पोर्टलंड, ऑरेगॉन येथे राहत असल्यामुळे आम्हाला पोर्टलंडपासून जवळच असलेल्या वँखूवर, वॉशिंग्टन येथील स्पॅनिश मंडळीत नेमणूक मिळाली. डिसेंबर १९८३ मध्ये आम्ही तेथे आलो तेव्हा ती मंडळी अतिशय लहान होती, पण पुष्कळ नवोदितांना येताना आम्ही पाहत आहोत.

जून १९९६ मध्ये मी पूर्णवेळेची ५३ वर्षे पूर्ण केली, व जानेवारी १, १९९६ मध्ये माझ्या पतीने ५५ वर्षे पूर्ण केली. या अनेक वर्षांदरम्यान, देवाच्या वचनाच्या सत्याचे ज्ञान मिळवण्यास व आपले जीवन यहोवाला समर्पित करण्यास शेकडो लोकांना मदत करण्याचा सुहक्क मला लाभला. यातील अनेक जण आता वडील व पूर्ण वेळेचे सेवक या नात्याने कार्य करीत आहेत.

मला मुले नसल्याचे दुःख होते का असे कधीकधी मला विचारले जाते. पण वस्तुस्थिती अशी आहे, की यहोवाने मला पुष्कळ आध्यात्मिक मुले, नातवंडे देऊन आशीर्वादित केले आहे. होय, यहोवाच्या सेवेतील माझे जीवन समृद्ध व समाधानी ठरले आहे. आपले पूर्ण आयुष्य मंदिरात सेवा करणाऱ्‍या व या सेवेच्या मोठ्या सुहक्कामुळे मुले नसलेल्या इफ्ताहच्या मुलीसोबत मी माझी तुलना करू शकेन.—शास्ते ११:३८-४०.

मी लहान होते तेव्हा यहोवाला केलेले समर्पण मला अजूनही आठवते. परादीसचे ते चित्र माझ्या मनामध्ये पूर्वी होते तसेच ठळक आहे. माझी दृष्टी आणि माझे अंतःकरण देवाच्या नवीन जगातील अनंत जीवनाच्या प्रतिफळावर अजूनही खिळून आहे. होय, मला यहोवाची सेवा, फक्‍त ५० वर्षांसाठीच नव्हे तर त्याच्या राज्यशासनामध्ये चिरकालासाठी करण्याची इच्छा आहे.

[२३ पानांवरील चित्रं]

सन १९४३ मध्ये, जिचे हात माझ्या खांद्यांवर आहेत ती डॉरथी क्रेडन, आणि सहपायनियर

[२३ पानांवरील चित्रं]

सन १९५३ मध्ये, सहमिशनऱ्‍यां बरोबर रोम, इटलीत

[२५ पानांवरील चित्रं]

माझ्या पतीसमवेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा