वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१५ पृ. ५-८
  • तुमचे भविष्य काय असेल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे भविष्य काय असेल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पूर्वलिखित भविष्य
  • देवाला सर्व गोष्टींचे पूर्वज्ञान आहे का?
  • मानवाचे दोन भवितव्य
  • पूर्वनियतीचा समेट देवाच्या प्रीतीसोबत होऊ शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • चांगल्या लोकांसोबत वाईट होते असे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • यहोवा “आरंभीच शेवट” कळवितो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • तुमचे भविष्य तुमच्या हाती
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१५ पृ. ५-८

तुमचे भविष्य काय असेल?

सर्वशक्‍तिमान देव जर सर्वज्ञ आहे, त्याला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाची सर्व माहिती आहे, तर देवाने आधीच ताडल्याप्रमाणे सर्वकाही तसेच्या तसे घडले हे पूर्वनियोजित नाही का? प्रत्येक मानवाचे मार्गाक्रमण आणि अंतिम भवितव्य हे देवाने आधीच ताडले असले आणि ठरवले असले, तर आपल्याला आपला जीवनक्रम अथवा आपले भविष्य निवडण्याचे स्वातंत्र्य आहे असे खरेच म्हणता येईल का?

या प्रश्‍नांवर शतकानुशतके वाद झाला आहे. अद्यापही या वादविवादामुळे मुख्य धर्मांमध्ये विभाजन आहे. भविष्याचे पूर्वज्ञान करून घेण्याची देवाची क्षमता आणि मानवाचे इच्छा स्वातंत्र्य या दोहोंची सांगड घालता येईल का? यांची उत्तरे आपण कोठून मिळवावीत?

जगभरात लाखो लोक याबाबतीत सहमत असतील की, देवाने आपले प्रतिनिधी अर्थात संदेष्ट्यांद्वारे आपल्या लिखित वचनातून मानवजातीशी दळणवळण केले आहे. उदाहरणार्थ, कुरआनमध्ये, प्रकटरूपे ही अल्लाहकडून होतात असे म्हटले आहे: तौरात (तोराह, नियमशास्त्र किंवा मोशेची पाच पुस्तके), जबूर (स्तोत्रे), आणि इंजील (शुभवर्तमान, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने किंवा “नवा करार”) त्याचप्रमाणे इस्राएलच्या संदेष्ट्यांना प्रकट केलेले.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये आपल्याला असे वाचायला मिळते: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍यांकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) त्याअर्थी, आपल्याला मिळणारे कोणतेही मार्गदर्शन अथवा ज्ञानप्रबोधन हे सरतेशेवटी खुद्द देवाकडून आले पाहिजे हे स्पष्ट होते. तर मग, देवाच्या प्रारंभिक संदेष्ट्यांच्या लिखाणांचे परीक्षण करणे हे सुज्ञतेचे नव्हे का? त्यांच्यामध्ये आपल्या भविष्याविषयी काय सांगितले आहे?

पूर्वलिखित भविष्य

पवित्र शास्त्रवचने वाचलेल्या व्यक्‍तीला ठाऊक आहे की, त्यांच्यामध्ये अक्षरशः शेकडो भविष्यवाण्या आहेत. प्राचीन बॅबिलोनचा पाडाव, यरुशलेमेची पुनर्बांधणी (सा.यु.पू. सहाव्या ते पाचव्या शतकापर्यंत) आणि मेदय-पारस आणि ग्रीसच्या प्राचीन राजांचा उदय आणि पाडाव हे सर्वकाही तपशीलवार पूर्वभाकीत करण्यात आले होते. (यशया १३:१७-१९; ४४:२४-४५:१; दानीएल ८:१-७, २०-२२) अशा भविष्यवाण्यांची पूर्णता म्हणजे पवित्र शास्त्रवचने वास्तविकपणे देवाचे वचन आहेत याचा सर्वात प्रबळ पुरावा आहे, कारण केवळ देवालाच भविष्यातल्या गोष्टी ताडून काय घडणार हे निश्‍चित करण्याची शक्‍ती आहे. त्याअर्थी, पवित्र शास्त्रवचनांमध्ये आधीपासूनच लिहिलेल्या भविष्याचा अहवाल मिळतो.

देव स्वतः म्हणतो: “मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मजसमान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्‍या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे; माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन. . . . मी बोलतो तसे घडवूनहि आणितो, मी योजितो ते शेवटास नेतो.” (यशया ४६:९-११; ५५:१०, ११) देवाने, यहोवा या नावाने आपल्या प्राचीन संदेष्ट्यांना स्वतःची ओळख पटवून दिली; या नावाचा शब्दशः अर्थ, “तो व्हावयास कारणीभूत ठरतो” असा होतो.a (उत्पत्ति १२:७, ८; निर्गम ३:१३-१५; स्तोत्र ८३:१८) आपल्या वचनाचा पूर्तीकर्ता होणारा, नेहमी आपले उद्देश सिद्धीस नेणारा अशारीतीने देव स्वतःला प्रकट करतो.

अशातऱ्‍हेने, देव आपले उद्देश पूर्ण करण्याकरता आपल्या पूर्वज्ञानाच्या शक्‍तीचा उपयोग करतो. त्याने दुष्टांना, येणाऱ्‍या न्यायाची सूचना त्याचप्रमाणे आपल्या सेवकांना तारणाची आशा देण्यासाठी बहुतेक वेळा तिचा उपयोग केला आहे. परंतु देव तिचा उपयोग अमर्यादित पद्धतीने करतो का? काही गोष्टींविषयी देवाने पूर्वज्ञान करून घेण्याचे इच्छिले नाही असा कोणता पुरावा पवित्र शास्त्रवचनांमध्ये आहे का?

देवाला सर्व गोष्टींचे पूर्वज्ञान आहे का?

पूर्वनियोजनाचे समर्थन करणारे सर्व वाद या धारणेवर आधारित आहेत की, देवाला निःसंशये पूर्वज्ञान प्राप्त करण्याची आणि भविष्यातील घटना निश्‍चित करण्याची शक्‍ती असल्याने त्याला सर्व गोष्टींचे पूर्वज्ञान असलेच पाहिजे, अगदी प्रत्येक व्यक्‍तीच्या भावी कार्यांचे पूर्वज्ञान सुद्धा. तथापि, ही धारणा साधार आहे का? आपल्या पवित्र शास्त्रवचनांतून देव जे प्रकट करतो ते याच्या उलटच आहे.

उदाहरणार्थ, शास्त्रवचने म्हणतात की, आपला पुत्र इसहाक याला होमार्पण म्हणून सादर करायला आज्ञा देऊन “देवाने अब्राहामास कसोटीस लाविले.” अब्राहाम इसहाकाला अर्पण करणार होता इतक्यात देवाने त्याला थांबवले व म्हटले: “कारण आता मला समजले की, तू देवाला भितोस.” (तिरपे वळण आमचे.) (उत्पत्ती २२:१-१२, [प्रारंभ, पं.र.भा.]) अब्राहाम ही आज्ञा पाळणार आहे असे देवाला आधीच ठाऊक असते तर देवाने असे म्हटले असते का? ती खरोखरची कसोटी ठरली असती का?

शिवाय, आपण केलेल्या किंवा करणार असलेल्या गोष्टीविषयी आपल्याला ‘अनुताप झाला’ असे वारंवार देवाने स्वतःविषयी बोलून दाखवल्याचे वृत्त प्राचीन संदेष्टे देतात. उदाहरणार्थ, देव म्हणाला, “शौलास इस्राएलावर राजा केले याचा परमेश्‍वरास अनुताप [इब्री शब्द नाकाम यापासून] झाला.” (१ शमुवेल १५:११, ३५; पडताळा यिर्मया १८:७-१०; योना ३:१०.) देव परिपूर्ण असल्यामुळे, शौलाला इस्राएलचा पहिला राजा नेमण्यात देवाने चूक केली असा या वचनांचा अर्थ होऊ शकत नाही. त्याउलट, शौल अविश्‍वासू आणि अवज्ञाकारी ठरला याचा देवाला खेद झाला असा त्यांचा अर्थ होतो. शौलाच्या कार्यांविषयी देवाला पूर्वज्ञान असते, तर स्वतःविषयी बोलताना अशी अभिव्यक्‍ती वापरण्यात काहीच अर्थ झाला नसता.

तीच संज्ञा अति प्राचीन शास्त्रवचनांमध्ये आढळते जेथे नोहाच्या दिवसांचा उल्लेख करताना असे म्हटले आहे: “मानव पृथ्वीवर उत्पन्‍न केल्याचा परमेश्‍वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला तेव्हा परमेश्‍वर म्हणाला, मी उत्पन्‍न केलेल्या मानवांस भूतलावरून नष्ट करीन; . . . कारण त्यांस उत्पन्‍न केल्याचा मला अनुताप झाला आहे.” (उत्पत्ति ६:६, ७) येथे देखील हे सूचित होते की मानवांची कार्ये देव पूर्वनियोजित करत नाही. देवाला अनुताप, दुःख आणि खेद झाला, आपली स्वतःची कृत्ये चुकली म्हणून नव्हे तर मानवांची दुष्टता विपुल झाली म्हणून. आपल्याला नोहा आणि त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्‍त बाकी सर्व मानवजातीचा नाश करणे आवश्‍यक झाले आहे याचा निर्माणकर्त्याला अनुताप झाला होता. देव आपल्याला आश्‍वासन देतो: “कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही.”—यहेज्केल ३३:११; पडताळा अनुवाद ३२:४, ५.

तर मग, आदाम पापात पडणार आणि मानवी कुटुंबावर याचा जो विनाशकारी परिणाम होणार याचे पूर्वज्ञान देवाला होते आणि त्याने तसे निश्‍चित केले होते असे आहे का? आपण जे मुद्दे विचारात घेतले त्यांच्यानुसार हे खरे असू शकत नाही असे दिसते. इतकेच काय तर, देवाला या सर्वाचे पूर्वज्ञान असते, तर मानवाला निर्माण केले तेव्हा तोच पापाची सुरवात करणारा ठरला असता आणि सर्व मानवी दुष्टता आणि दुःख यांच्यासाठी तो मुद्दामहून जबाबदार ठरला असता. स्पष्टतः, याचा मेळ देवाने शास्त्रवचनांमध्ये स्वतःबद्दल जे प्रकट केले आहे त्याजशी बसत नाही. तो प्रीती आणि न्यायाचा देव आहे ज्याला दुष्टतेचा वीट येतो.—स्तोत्र ३३:५; नीतिसूत्रे १५:९; १ योहान ४:८.

मानवाचे दोन भवितव्य

आपल्या प्रत्येकाचे भविष्य देवाने आधीच ठरवले आहे अथवा पूर्वनियोजित करून ठेवले आहे असे पवित्र शास्त्रवचने प्रकट करत नाहीत. त्याऐवजी, देवाने मानवाकरता केवळ दोन संभवनीय भवितव्य पूर्वभाकीत करून ठेवले आहेत असे ते प्रकट करतात. देव प्रत्येक मानवाला आपले भवितव्य ठरवण्याची स्वतंत्र इच्छा देऊ करतो. संदेष्ट्या मोशेने फार आधी इस्राएलांना म्हटले होते: “जीवन व मरण . . . मी तुझ्यापुढे ठेवली आहेत; . . . म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील. आपला देव परमेश्‍वर ह्‍याच्यावर प्रीति कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे व त्यामुळेच तू दीर्घायु होशील.” (तिरपे वळण आमचे.) (अनुवाद ३०:१९, २०) देवाचा संदेष्टा येशू याने पूर्व इशारा दिला: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) दोन मार्ग, दोन भवितव्य. आपले भविष्य आपल्याच कार्यांवर निर्भर आहे. देवाची आज्ञा पाळणे म्हणजे जीवन, त्याची अवज्ञा करणे म्हणजे मृत्यू.—रोमकर ६:२३.

देव, “सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी . . . माणसांना आज्ञा करितो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे.” (प्रेषितांची कृत्ये १७:३०, ३१) नोहाच्या दिवसातल्या बहुतांश मानवजातीने देवाची अवज्ञा करण्याचे निवडले आणि नाश पावले त्याचप्रमाणे आजही बहुतांश लोक देवाच्या आज्ञांचे पालन करत नाहीत. तरीही, कोणाचा नाश होईल आणि कोणाला तारण प्राप्त होईल हे काही देवाने आधीच ठरवून ठेवलेले नाही. उलट, देवाचे वचन म्हणते की, “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) अगदी दुष्टातले दुष्ट लोकही पश्‍चात्ताप करू शकतात, आज्ञाकारी बनू शकतात आणि देवाची कृपापसंती प्राप्त करण्यासाठी आवश्‍यक ते बदल करू शकतात.—यशया १:१८-२०; ५५:६, ७; यहेज्केल ३३:१४-१६; रोमकर २:४-८.

आज्ञाधारकांना, दुष्टता, हिंसा आणि युद्ध यांपासून मुक्‍त केलेल्या पृथ्वीवर उपासमार, दुःख, आजारपण आणि मृत्यू नसेल अशा जगात एका शांतीमय परादीसमध्ये सार्वकालिक जीवनाचे अभिवचन देव देतो. (स्तोत्र ३७:९-११; ४६:९; यशया २:४; ११:६-९; २५:६-८; ३५:५, ६; प्रकटीकरण २१:४) मृतांचेही पुनरुत्थान होऊन त्यांना देवाची सेवा करण्याचा मोका दिला जाईल.—दानीएल १२:२; योहान ५:२८, २९.

“पूर्ण माणसाकडे तू लक्ष दे, आणि सरळाला पाहा,” असे स्तोत्रकर्ता म्हणतो, कारण “त्या शांतीच्या पुरुषाला चांगला शेवट आहे.” (स्तोत्र ३७:३७, ३८, पं.र.भा.) तुमचे भविष्य काय असेल? ते संपूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे. या नियतकालिकाच्या प्रकाशकांना तुम्हाला स्वतःचे आनंदी, शांतीमय भविष्य नक्की मिळवायला मदत करण्यासाठी अधिक माहिती पुरवण्यास आनंद होईल.

[तळटीप]

a यहोवा हे नाव पवित्र शास्त्रवचनांमध्ये ७,००० पेक्षा अधिक वेळा आढळते; १९९५ मध्ये वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित सर्वश्रेष्ठ नाव (इंग्रजी) ही पत्रिका पाहा.

[६ पानांवरील संक्षिप्त आशय]

आपले उद्देश सिद्धीस नेण्याकरता देव आपल्या पूर्वज्ञानाच्या शक्‍तीचा उपयोग करतो

[८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“कोणाचा नाश व्हावा अशी [देवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” २ पेत्र ३:९

[७ पानांवरील चित्र]

अब्राहाम आपल्या मुलाला अर्पण करायला तयार असेल हे देवाला आधीच ठाऊक असते, तर ती प्रामाणिक परीक्षा ठरली असती का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा