तुमचे भविष्य तुमच्या हाती
“प्राचीन समाजांत [शकुनविचार] ही मोठी बौद्धिक साध्यता” मानली जात असली, तरी “इब्री संदेष्टे या कलेला तुच्छ मानत होते,” असे पुरातत्त्वशास्त्रज्ञ जोन ओट्स लिहितात. का बरे?
सभोवतालची राष्ट्रे जीवनाविषयी दैववादी दृष्टिकोन बाळगत होती; मात्र प्राचीन इस्राएली लोकांनी आपल्या जीवनावर एखाद्या अज्ञात शक्तीचा प्रभाव असतो ही कल्पना कधीच स्वीकारली नाही. त्यांना दिलेल्या नियमांमध्ये देवाने त्यांना म्हटले होते: “चेटक्या, शकुन पाहणारा, दैवज्ञ, जादूटोणा करणारा, . . . ज्योतिषी . . . तुमच्यात आढळता कामा नये.”—अनुवाद १८:१०, ११, मराठी कॉमन लँग्वेज.
इस्राएली लोकांना आपल्या भविष्याबद्दल खात्री होती; त्यासाठी त्यांना नशिबाच्या कल्पनेची किंवा ज्योतिषांची गरज नव्हती. याचे कारण स्पष्ट करताना फ्रेंच कॅथोलिक विश्वकोश टेओ म्हणतो की, “मानव आणि जग एखाद्या अज्ञात शक्तीच्या कह्यात नव्हते, तर मानवासाठी देवाचा एक खास उद्देश होता” असा त्या राष्ट्राचा विश्वास होता. तो उद्देश काय होता?
भाग्य आणि स्वतंत्र इच्छा
इस्राएलांनी देवाचे नियम पाळले तर त्यांना शांती आणि संपन्नता प्राप्त होईल असे अभिवचन देवाने त्यांना दिले होते. (लेवीय २६:३-६) त्याशिवाय, मशीहाद्वारे पृथ्वीवर नीतिमान राज्य स्थापन होण्याची ते आस लावून होते. (यशया, अध्याय ११) परंतु, देवाने या गोष्टींचे वचन दिले होते याचा अर्थ त्यांनी हातावर हात ठेवून बसून राहायचे नव्हते आणि जे काही घडत होते ते फक्त पाहत राहायचे नव्हते. उलट, त्यांना असे सांगितले होते: “जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर.”—उपदेशक ९:१०.
हे, स्वतंत्र इच्छेच्या कल्पनेवर आधारित होते. इस्राएली लोक देवाची सेवा करण्यास आणि स्वतःचे भविष्य घडवण्यास स्वतंत्र होते. देवाने त्यांना अभिवचन दिले: “मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल व पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने त्याची सेवा करीत राहाल, तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन. म्हणजे तुम्हाला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करिता येईल.” (अनुवाद ११:१३, १४) इस्राएल राष्ट्र देवाच्या आज्ञेत राहिले तोपर्यंत त्यांनी देवाचा आशीर्वाद अनुभवला.
देवाने इस्राएल राष्ट्राला वचन दिलेल्या देशात प्रवेश करण्याआधी त्यांच्यासमोर एक निवड ठेवली: “पाहा, जीवन व सुख, आणि मरण व दुःख, ही आज मी तुझ्यापुढे ठेवली आहेत.” (अनुवाद ३०:१५) प्रत्येक व्यक्तीचे भविष्य त्याच्या कार्यांवर आणि निर्णयांवर अवलंबून होते. देवाची सेवा त्यांच्याकरता जीवन आणि आशीर्वाद ठरणार होती पण ती नाकारल्यास त्यांना हाल सोसावे लागणार होते. पण आज काय?
कारण आणि परिणाम
आज आपल्या भल्यासाठीच कित्येक नैसर्गिक नियमांचे बंधन आपल्यावर आहे. यांपैकी, कारण आणि परिणाम हा एक नियम आहे, किंवा बायबलच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) हे तत्त्व आपल्याला नीट समजल्यास भविष्यातील काही घटनांची शक्यता जाणून घेता येते.
कशाचीही पर्वा न करता भरधाव वेगाने गाडी चालवली तर अपघात होण्याची अधिक शक्यता असते; तेच सावधानतेने गाडी चालवली तर ती शक्यता कमी असते. धूम्रपान केले तर कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते; तेच धूम्रपान केले नाही तर ती शक्यता कमी असते. या लेखमालेच्या सुरवातीच्या लेखात उल्लेखिलेले अतिरेकी हल्ले आपल्यावरही होतील असा विचार आपण सहसा करत नाही आणि म्हणून त्यांची केवढी शक्यता आहे हे जाणून घेण्यात काही अर्थ नाही. परंतु त्यासाठी नशिबावर विश्वास केला तरीही काही फायदा होणार नाही. त्याने वर्तमानाविषयी किंवा भविष्याविषयी काहीच ज्ञान प्राप्त होत नाही. खोट्या गोष्टीवर विश्वास केल्याने भविष्याविषयी खरीखुरी खात्री मिळत नाही. शिवाय, प्रत्येक घटनेमागे देवाचा हात आहे असा विश्वास केल्यानेही खरीखुरी खात्री मिळत नाही.
तुमचे भविष्य काय असेल?
आपले भविष्य आधीच लिहून ठेवलेले नाही तर ते वर्तमानाने घडते. जीवन हे देवाकडील बक्षीस असले, तरीही आपले वर्तमान आणि भविष्य घडवण्यामध्ये आपली स्वतःची मुख्य भूमिका आहे असे बायबल स्पष्टपणे दाखवून देते. आपण देवाला खुश करू शकतो किंवा नाखुश करू शकतो यावरून त्याने आपल्या जीवनावर आपल्याला थोडाफार ताबा देऊ केला आहे हे दिसून येते.—उत्पत्ति ६:६; स्तोत्र ७८:४०; नीतिसूत्रे २७:११.
शिवाय, पवित्र शास्त्रवचने वारंवार यावर जोर देतात की, आपले भविष्य धीर धरून राहण्यावर आणि आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे; जर सगळेकाही आधीच पूर्वनियत असते तर याला काही अर्थच राहिला नसता. (मत्तय २४:१३; लूक १०:२५-२८) तर मग, देवाच्या अधीन राहिल्याने आणि त्याला विश्वासू राहण्याचा निश्चय केल्याने आपण कोणत्या भविष्याची अपेक्षा करू शकतो?
बायबल प्रकट करते, की मानवजातीपुढे एक उज्ज्वल भविष्य आहे. पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये होईल जेथे शांती आणि सुरक्षिततेचे राज्य असेल. (स्तोत्र ३७:९-११; ४६:८, ९) ते भविष्य ठरलेले आहि कारण सर्वशक्तिमान निर्माणकर्ता आपली अभिवचने पूर्ण करील. (यशया ५५:११) पण परादीसमधील जीवनाचा आशीर्वाद आपल्याला नशिबामुळे मिळणार नाही, तर सध्या देवाला आज्ञाधारकपणा दाखवल्याचा तो परिणाम असेल. (२ थेस्सलनीकाकर १:६-८; प्रकटीकरण ७:१४, १५) देवाने आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती देऊ केली आहे आणि तो आपल्याला उत्तेजन देतो: ‘तू जीवन निवडून घे म्हणजे तू जिवंत राहशील.’ (अनुवाद ३०:१९) तर तुमची निवड काय असेल? तुमचे भविष्य नशिबाच्या हाती नाही तर तुमच्या हाती आहे.
[१० पानांवरील चित्रं]
देवाने आज्ञाधारक मानवजातीकरताएक अद्भुत भविष्य उद्देशिले आहे