पूर्वनियतीचा समेट देवाच्या प्रीतीसोबत होऊ शकेल का?
“ती देवाची चिरकालिक योजना आहे, जेणेकरून प्रत्येक मनुष्यासोबत तो काय करू इच्छितो हे त्याने आधीच ठरवले आहे, अशी पूर्वनियतीविषयीची आमची व्याख्या आहे. कारण त्याने सर्वांना एकाच परिस्थितीत निर्माण केले नाही, तर काहींना सार्वकालिक जीवनासाठी आणि इतरांना चिरकालिक नाशासाठी अगोदर योजून ठेवतो.”
अशाप्रकारे प्रोटेस्टंट धर्मसुधारक जॉन कॅल्वीन यांनी पूर्वनियतीबद्दलच्या त्यांच्या शिकवणीची व्याख्या ख्रिस्ती धर्माचे मूलतत्त्वसार संग्रह (इंग्रजी) या त्यांच्या पुस्तकात केली. ही शिकवण, देव सर्वज्ञ आहे आणि त्याच्या प्राण्यांचे कृत्य त्याच्या उद्देशांना संशयास्पद बनवू शकत नाही किंवा त्याला बदल करण्यास भाग पाडू शकत नाही या कल्पनेवर आधारित आहे.
परंतु वास्तविकतेत बायबल देवाविषयी असेच सुचवते का? त्याहूनही अधिक म्हणजे, अशाप्रकारचे वर्णन देवाच्या गुणांच्या विशेषकरून—प्रीती या त्याच्या प्रमुख गुणानुरूप आहे का?
भविष्य भाकीत करू शकणारा देव
देव भविष्य भाकीत करू शकतो. तो स्वतःचे वर्णन असे देतो, “मी आरंभीच शेवट कळवितो. होणाऱ्या गोष्टी घडविण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे; माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.” (यशया ४६:१०) संपूर्ण मानवी इतिहासात, देव त्याचे पूर्वज्ञान वापरू शकतो आणि घटना घडण्यापूर्वीच त्यांना भाकीत करू शकतो हे दाखवण्यासाठी त्याने त्याच्या सर्व भविष्यवाण्यांची नोंद करून ठेवली आहे.
अशाप्रकारे, बॅबिलॉनचा राजा बेलशस्सर याच्या दिवसांमध्ये, संदेष्टा दानीएलाला एक श्वापद दुसऱ्याला हुसकून लावणाऱ्या दोन जंगली श्वापदांचे स्वप्न पडले तेव्हा, यहोवाने त्याला त्याचा अर्थ सांगितला: “दोन शिंगे असलेला एडका तू पाहिला; ते मेदय व पारस यांचे राजे. तो दांडगा बकरा ग्रीसचा राजा.” (दानीएल ८:२०, २१) स्पष्टपणे, देवाने जागतिक साम्राज्यांच्या क्रम प्रकट करण्यासाठी त्याचे पूर्वज्ञान वापरले. तेव्हा सत्तेवर असलेल्या बॅबिलॉन साम्राज्यानंतर मेदय-पारस आणि त्यानंतर ग्रीस साम्राज्य येणार होते.
एखाद्या व्यक्तिबद्दल देखील भविष्यवाद असू शकतात. उदाहरणार्थ, संदेष्टा मीखाने मशीहाचा जन्म बेथलेहेमेमध्ये होईल असे घोषित केले. (मीखा ५:२) पुन्हा एकदा, या बाबतीतही देवाने आपल्या पूर्वज्ञानाचा वापर केला. परंतु, या घटनेची घोषणा एका खास उद्देशास्तव करण्यात आली होती—मशीहाची ओळख होण्यासाठी. तो प्रसंग, प्रत्येक व्यक्तीचा समावेश असलेल्या पूर्वनियतीच्या शिकवणीचा अनुमान काढण्यासाठी समर्थन करीत नाही.
उलटपक्षी, शास्त्रवचने प्रकट करतात, की असे काही प्रसंग आहेत जेथे देव त्यांच्या परिणामांविषयीचे पूर्वज्ञान करू इच्छित नाही. सदोम आणि गमोराच्या नाशाआधी त्याने घोषित केले: “म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे, तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहावयास मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.” (उत्पत्ती १८:२१) हे वचन स्पष्टपणे दाखवून देते, की देवाला त्या शहरांची तपासणी करेपर्यंत त्यांची नीतिभ्रष्टता किती प्रमाणात वाढली आहे हे आगाऊच समजले नाही.
हे खरे की देव विशिष्ट घटनांना आगाऊ पाहू शकतो, परंतु अनेक बाबतीत, त्याने त्याच्या पूर्वज्ञानाचा उपयोग करण्याचे इच्छिले नाही. देव सर्वसमर्थ असल्यामुळे त्याला अपरिपूर्ण मानवांच्या इच्छेनुसार नव्हे तर त्याच्या मर्जीनुसार त्याच्या क्षमतांचा वापर करण्याची मोकळीक आहे.
गोष्टी व्यवस्थित करू शकणारा देव
कॅल्वीनप्रमाणेच काही म्हणतात, की देवाने मनुष्याच्या निर्मितीआधीच त्याचे पापात पडणे ठरवले होते आणि तसे होण्याआधीच त्या ‘निवडलेल्यांना’ पूर्वनियत केले होते. परंतु जर ही गोष्ट खरी आहे तर मग, आदाम आणि हव्वा सार्वकालिक जीवनाची आशा मिळवू शकणार नाहीत याची देवाला पूर्ण जाणीव असताना देखील त्यांच्यासमोर ती आशा ठेवणे त्याला दांभिक शाबीत करणार नाही का? शिवाय, पहिल्या मानवी जोडप्याला: ईश्वरी मार्गदर्शनानुसार चालून सदासर्वकाळ जगण्याची किंवा त्यांचा धिक्कार करून मरण्याची निवड समोर मांडली होती याला शास्त्रवचने कोठेही नाकारत नाहीत.—उत्पत्ती अध्याय २.
पण आदाम आणि हव्वेच्या पापामुळे देवाचा उद्देश खरोखरच निष्फळ ठरला का? नाही, कारण त्यांनी पाप केल्यानंतर लगेचच देवाने घोषित केले की तो सैतान आणि त्याच्या प्रतिनिधींचा नाश करण्यासाठी एक “संतती” तयार करील व तो पुन्हा एकदा पृथ्वीवरील सर्व गोष्टी व्यवस्थित करील. एखाद्या माळ्याला विपुल उत्पन्न काढण्यास थोडेसे किटक बांध घालू शकत नाहीत, त्याचप्रमाणे आदाम आणि हव्वेची अवज्ञा देवाला पृथ्वीस नंदनवन बनवण्यापासून परावृत्त करणार नाही.—उत्पत्ती अध्याय ३.
दाविद राजाच्या वंशाला एक राज्य सरकार सोपवले जाईल आणि इतर या राज्यासोबत सहवास राखतील हे देवाने काही काळानंतर प्रकटविले. या इतरांना “परात्पर देवाचे पवित्र जन” असे संबोधले आहे.—दानीएल ७:१८; २ शमुवेल ७:१२; १ इतिहास १७:११.a
भाकीत करणे म्हणजे पूर्वनियती ठरवणे नव्हे
मानवजात कोणता मार्ग स्वीकारेल हे जाणून घेण्याची इच्छा न दाखवण्याच्या वस्तुस्थितीने देवाला मानवाच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांच्या परिणामांविषयी भविष्यवाणी करण्यापासून परावृत्त केले नाही. एका मेकॅनिकने वाहनात बिघाड असल्याची ताकीद चालकाला दिल्यावर कोणतीही दुर्घटना घडली तर मेकॅनिक त्याला जबाबदार ठरणार नाही किंवा ते त्याने पूर्व-नियतीने ठरवले होते असा त्याच्यावर आरोप लावता येणार नाही. अशाचप्रकारे, एखाद्या व्यक्तीच्या कृत्यांमुळे जे दुःखद परिणाम होतात ते पूर्व-नियतीने ठरवल्याप्रमाणे होते असा देवावर आरोप लावता येत नाही.
हीच गोष्ट पहिल्या मानवी जोडप्याच्या संतती बाबतीत खरी होती. काइनाने त्याच्या भावाचा वध करण्याआधी देवाने त्याच्यासमोर निवड मांडली होती. तो पापावर स्वामीत्व मिळवेल की पाप त्याच्यावर स्वामीत्व मिळवेल? काइन वाईटाची निवड करून आपल्या भावाचा वध करील असे यहोवाने आधीच ठरवले ते सूचित करणारी कोणतीच गोष्ट त्या अहवालात सापडत नाही.—उत्पत्ती ४:३-७.
नंतर मोशेच्या नियमशास्त्राने उदाहरणार्थ, मूर्तीपूजक राष्ट्रांमधील स्त्रियांसोबत विवाह करून इस्त्राएलांनी यहोवाची सेवा करण्याचे सोडले तर काय होईल याची त्यांना ताकीद दिली होती. जे भाकीत केले होते तेच घडले. शलमोन राजाच्या उदाहरणावरुन ते दिसून येते. तो त्याच्या उतारवयात त्याच्या विदेशी बायकांच्या प्रभावामुळे मूर्तीपूजक बनला. (१ राजे ११:७, ८) होय, देवाने त्याच्या लोकांना ताकीद दिली, परंतु त्या प्रत्येकाची कृत्ये काय असतील हे त्याने पूर्वनियत केले नाही.
निवडलेल्यांना ख्रिस्ताबरोबर स्वर्गामध्ये राज्य करण्याचे अभिवचन दिलेले प्रतिफळ गमवायचे नसेल, तर त्यांना शेवटपर्यंत टिकून राहण्याचे उत्तेजन दिले जाते. (२ पेत्र १:१०; प्रकटीकरण २:५, १०, १६; ३:११) गतकाळातील काही वेदांत्तवाद्यांनी विचारले, निवडलेल्यांचे पाचारण शेवटचे होते तर अशाप्रकारच्या स्मरणिका का दिल्या जात होत्या?
पूर्वनियती आणि देवाची प्रीती
मानवाला स्वतंत्र इच्छा देऊन, त्याला ‘देवाच्या प्रतिरूपात’ निर्माण केले होते. (उत्पत्ती १:२७) मानवांनी यंत्रमानवांप्रमाणे सर्व हालचाली आधीच ठरवल्यानुसार नव्हे तर देवाचा सन्मान व त्याची सेवा प्रीतीने प्रवृत्त होऊन करण्यासाठी स्वतंत्र इच्छा आवश्यक होती. बुद्धिमान, स्वतंत्र प्राण्यांनी प्रदर्शित केलेली प्रीती देवाला अन्यायी आरोपांचे खंडन करणे शक्य करील. तो म्हणतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीतीसूत्रे २७:११.
लाक्षणिकरीत्या बोलायचे झाले तर, देवाचे सेवक पूर्व-नियतीने ठरवलेले असते किंवा त्यांचा कार्यक्रम आधीच आखला असता तर सृष्टीकर्त्याबद्दलच्या त्यांच्या प्रीतीच्या विश्वसनीयतेची शंका आली नसती का? तसेच, काही लोकांना त्यांची योग्यता न पाहता त्यांना स्वर्गीय महिमा आणि आनंदासाठी पूर्वनियत करणे देवाच्या निपक्षपातीपणाच्या विरूद्धतेत ठरणार नाही का? शिवाय, काहींना अशा पसंतीची वागणूक मिळते, व इतरांना चिरकालिक दंडासाठी पूर्वनियत केले जाते तर जे ‘निवडलेले जन’ आहेत अशा लोकांच्या मनात कृतज्ञतेच्या प्रामाणिक भावना उत्पन्न होणे अशक्य होईल.—उत्पत्ती १:२७; ईयोब १:८; प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
शेवटी, ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सर्व मानवजातीस सुवार्तेचा प्रचार करण्यास सांगितले. देवाने आधीच बचावणाऱ्यांना निवडले आहे तर यामुळे सुवार्तिक कार्यातील ख्रिस्ती लोकांचा आवेश कमी होणार नाही का? ते प्रचारकार्याला मूलतः अर्थहीन करणार नाही का?
देवाकडून येणारी निःपक्षपाती प्रीती, लोकांना त्याच्यावर प्रीती करण्यास प्रवृत्त करणारी सर्वात सामर्थ्यशाली शक्ती आहे. पापी मानवजातीसाठी त्याच्या पुत्राचे बलिदान देणे ही देवाच्या प्रीतीची सर्वात मोठी अभिव्यक्ती होती. त्याच्या पुत्राबद्दलचे देवाचे पूर्वज्ञान असाधारण उदाहरण आहे, परंतु ते आपल्याला खात्री देते, की येशूवर आधारलेली पुनर्स्थापनेची अभिवचने निश्चित पूर्ण होतील. यास्तव आपण त्या पुत्रावर विश्वास ठेवून देवाजवळ जाऊ या. आमच्या सृष्टीकर्त्यासोबतच्या उत्तम नातेसंबंधात येण्याच्या देवाच्या आमंत्रणाला स्वीकारून आपण आपली गुणग्राहकता दाखवू या. आज, जे सर्व स्वतंत्र इच्छा दाखवू इच्छितात व त्याच्यावर त्यांची प्रीती प्रकट करू इच्छितात त्या सर्वांना देव हे आमंत्रण देतो.
[तळटीपा]
a येशू जेव्हा “जगाच्या स्थापनेपासून” (मत्तय २५:३४) तयार केलेल्या राज्याविषयी बोलतो, तेव्हा तो कदाचित पहिले पाप झाल्यानंतर काही काळाचा उल्लेख करीत असावा. लूक ११:५०, ५१, “जगाच्या स्थापनेपासून” किंवा खंडणीद्वारे सोडवू शकणाऱ्या मानवजातीची स्थापना हाबेलाच्या काळाला सूचित करते.
[७ पानांवरील चौकट]
गट या नात्याने पूर्वनियत
“ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान (पूर्वनियती) होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतु हा, की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने अगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणहि केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानहि ठरविले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवहि केले.” (रोमकर ८:२९, ३०) पौलाने या वचनांमध्ये ‘पूर्वनियती’ ही संज्ञा वापरली तर आपण ती कशी समजावी?
पौलाने येथे केलेला तर्क एखाद्याच्या पूर्वनियतीच्या कल्पनेला आधार देणारा निश्चयी वादविवाद नाही. आमच्या शतकाच्या सुरवातीला, डिक्शन्रे डी थिओलॉजी कॅथलिकने पौलाच्या युक्तिवादाचे (रोमकर ९-११ अध्याय) अशाप्रकारे स्पष्टीकरण दिले: “सार्वकालिक जीवनासाठी असलेली पूर्वनियतीची वास्तविक शिकवण ठरवण्यात आलेली नाही हे मत वाढत्या प्रमाणात कॅथलिक विद्वानांमध्ये सर्वत्र आहे.” तेच पुस्तक पुढे एम. लॅगरेंज यांना असे म्हणताना उद्धृत करते: “पौलाने उपस्थित केलेला प्रश्न पूर्वनियतीचा व नापसंत करण्याबद्दलचा मुळीच नाही, तर ख्रिस्ती विश्वासाच्या कृपेमुळे विदेश्यांना दिलेल्या आमंत्रणाबद्दलचा आहे आणि यहुद्यांच्या विश्वासाची उणीव याच्या अगदीच विरुद्ध आहे. . . . . ते थेटपणे एखाद्या विशिष्ट व्यक्तिला लागू न होता गटांना, विदेश्यांना आणि यहुद्यांतील कोणासही लागू होते.”—अक्षराला तिरपे वळण आमचे.
अलीकडेच, द जरूशलेम बायबलने या अध्यायांविषयी (९-११) तोच समारोप केला. त्यात म्हटले होते: “तथापि, या अध्यायांचा विषय, एखाद्या व्यक्तीच्या गौरवासाठी किंवा विश्वासासाठी पूर्वनियतीच्या समस्येबद्दलचा नाही तर मानवजातीच्या तारणाच्या इतिहासाच्या वाढीमध्ये इस्त्राएलच्या हिस्स्याचा आहे, जु[न्या] क[रारातील] विधानांमुळे निर्माण झालेली ही समस्या आहे.”
रोमकरास पत्राच्या ८ व्या अध्यायाचे शेवटले वचन त्याच संदर्भाला लागू होते. अशाप्रकारे, ही वचने आपल्याला न्याय्यपणे आठवण करून देऊ शकतात की देवाने मानवजातीतून ख्रिस्तासोबत राज्य करण्यासाठी ज्यांना बोलावण्यात येईल त्या एका वर्गाच्या किंवा गटाच्या अस्तित्वाबद्दल तसेच त्यांना ज्या गरजा पूर्ण कराव्या लागतील त्याबद्दल आगाऊ पाहिले—आणि हे, ज्या लोकांना निवडले जाईल त्यांना आगाऊ न संबोधता करण्यात आले, नाहीतर ते देवाची प्रीती आणि न्याय याच्या विरूद्धतेत झाले असते.