वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ४/१५ पृ. ३-४
  • आपले भविष्य पूर्वलिखित आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपले भविष्य पूर्वलिखित आहे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • मिळती जुळती माहिती
  • देवाने आपले नशीब आधीच ठरवले आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • शोध मानवाच्या पूर्वनियतीचा
    सावध राहा!—१९९९
  • तुमच्या जीवनावर नशीबावरील विश्‍वास नियंत्रण करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • नशीब म्हणायचे की योगायोग?
    सावध राहा!—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ४/१५ पृ. ३-४

आपले भविष्य पूर्वलिखित आहे का?

ख्रिश्‍चन, मुस्लिम, ज्यू, हिंदू किंवा इतर कोणत्याही धर्माचा अनुयायी असो, सर्व धर्माच्या लोकांना दुर्घटनेचा सामना करावा लागतो आणि सर्वांना त्याचे दुःख होते.

उदाहरणार्थ, डिसेंबर ६, १९९७ रोजी इर्कुट्‌स्क या सैबेरियन शहरात एक भयंकर दुर्घटना घडली. एका मोठाल्या AN-124 वाहतुकीच्या विमानाचे उड्डाण झाले न झाले तोच त्याची दोन यंत्रे बंद पडली. इंधनाने भरलेले हे विमान एका निवास संकुलावर कोसळले. अपार्टमेंटमधली कित्येक घरे अग्नीच्या ज्वालेत झोकली गेली आणि कितीतरी असहाय रहिवाशी, अगदी निष्पाप मुले देखील एकतर मृत्युमुखी पडली किंवा जखमी झाली.

तो अपघात सैबेरियाच्या ज्या भागात घडला तेथे विभिन्‍न धार्मिक मते जोपासणारे लोक आहेत. काहीजण कदाचित ख्रिश्‍चन धर्माचे अनुयायी असण्याचा दावा करतील पण तरीही ही दुर्घटना नशीबामुळे घडली असा ते विचार करत असावेत. त्यांना तसेच इतरांना कदाचित असे वाटेल की, ‘ही अल्लाहची इच्छा होती, आणि त्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले अशा तऱ्‍हेने मरण पावले नसते, तर दुसऱ्‍या पद्धतीने तरी मरण पावले असते—ते त्यांच्या नशीबातच होते.’

अशी ही विचारसरणी व्यक्‍त केली किंवा नाही, तरी त्यावरून जगभरातल्या अनेक धर्मांमध्ये सर्वसामान्य असलेली एक धारणा प्रकट होते—ती म्हणजे नशीब. अनेक लोकांचा असा विश्‍वास आहे की, आपला जन्म होतो त्या दिवसापासून आपला मृत्यू होतो त्या दिवसापर्यंतचे आपले भविष्य हे पूर्वलिखित असते.

नशीबावरच्या विश्‍वासाचे अनेक प्रकार आहेत ज्यामुळे सर्वांना जुळेल अशी त्याची एकच व्याख्या करणे कठीण आहे. नशीबावरून हे सूचित होते की, जे काही घडते अर्थात प्रत्येक कृत्य, प्रत्येक घटना—चांगले असो अगर वाईट—हे अनिवार्य असते; ते पूर्वनियोजित असते कारण मानवाच्या नियंत्रणापलीकडील श्रेष्ठ शक्‍तीकडून ते घडणार असे आधीच ठरवलेले असते. अशी ही कल्पना फलज्योतिषशास्त्रात, हिंदू आणि बौद्ध धर्माच्या कर्मवादात त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगताच्या पूर्वनियोजनाच्या सिद्धान्तात आढळते. प्राचीन बॅबिलोनियातही, लोकांचा अशा विश्‍वास होता की, नशीबावर आणि भविष्यावर एका लिखित पुस्तकाद्वारे देवांचे नियंत्रण होते. असा समज होता की, या “नशीबाच्या पाट्या” ज्या देवाच्या हातात होत्या त्या देवाला मनुष्यांचे, राज्यांचे आणि खुद्द देवांचे नशीब देखील ठरवता येत होते.

अनेक अनुयायांचा असा विश्‍वास आहे की, मानवांचा जन्म होण्याआधी दैवी निवाड्यानुसार लोकांना जे काही होणार ते सर्वकाही, त्यांची आयुर्मर्यादा, ते नर असतील की नारी, श्रीमंत की गरीब, दुःखी की सुखी हे सर्वकाही देव ठरवतो. हे सर्वकाही देवाच्या मनात असते किंवा ते घडण्याआधीच एका पुस्तकात लिहिलेले असते असे म्हटले जाते. म्हणून विपत्ती कोसळल्यावर, एखादा अनुयायी सहसा “मक्‍तूब,”—हे लिहिलेले आहे—असे म्हणतो! देवाला पूर्वीपासूनच सर्वकाही ठाऊक असल्याने, कोण त्याची आज्ञा पाळील आणि कोण अवज्ञा करील हे देखील तोच ठरवत असला पाहिजे असा तर्क केला जातो. म्हणूनच पुष्कळ अनुयायांचा असा विश्‍वास आहे की, एखादी व्यक्‍ती जन्मण्याआधीच, त्या व्यक्‍तीला फिरदोसमधील सर्वकाळच्या अत्यानंदासाठी की सर्वकाळच्या नाशासाठी पूर्वनियोजित केले आहे हे देवाने आधीच ठरवलेले असते.

तुम्हाला वाटेल की, ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या पूर्वनियोजनाच्या सिद्धान्तासारखेच हे आहे. जॉन कॅल्व्हिन हा १६ व्या शतकातला फ्रेंच धर्मसुधारक, पूर्वनियोजनाचा सर्वात पहिला प्रोटेस्टंट समर्थक होता. त्याने पूर्वनियोजनाची व्याख्या अशी केली, “देवाचा अंतिम निवाडा ज्याद्वारे प्रत्येक मनुष्याचे काय करायचे हे त्याने ठरवले. सर्वजण एकाच स्थितीत निर्माण केले जात नाहीत, पण काहींना सार्वकालिक जीवनासाठी नियोजित केले जाते आणि इतरांना हमेशाच्या नरकवासासाठी नियोजित केले जाते.” कॅल्व्हिनने ठामपणे असेही म्हटले: “पहिला मानव पाप करणार आणि त्याच्या वंशजाची अधोगती होणार हे देवाने आधी ताडले होते इतकेच नव्हे, तर त्याने आपल्या इच्छेनुसार तसे नियोजितही केले होते.”

तरीही, पूर्वनियोजन किंवा दैववादाची शिकवण देणाऱ्‍या धर्मांचे सर्वच सदस्य व्यक्‍तिगतपणे यावर विश्‍वास करत नाहीत. काहीजण अचूकपणे हे दाखवून देतात की, धार्मिक लिखाणांमध्ये मानवाच्या इच्छा स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला आहे. खरे म्हणजे, मानवी कार्ये ही मनुष्याच्या इच्छा स्वातंत्र्याचा परिणाम आहेत की देवाने ती पूर्वनियोजित केली आहेत यावर बराच वाद आहे. उदाहरणार्थ, काहीजण असे म्हणतात की, मानवाला निवड करण्याची आणि कार्य करण्याची मोकळीक असली पाहिजे कारण देव जो न्यायी आहे तो मानवाला त्याच्या कार्यांसाठी जबाबदार धरतो. इतरजण असे म्हणतात की, देव मनुष्याची कार्ये निर्माण करतो पण मनुष्य ती कसेतरी “प्राप्त” करतो आणि त्यांच्यासाठी जबाबदार ठरतो. तथापि, सर्वसाधारणपणे अनेकांचा असा विश्‍वास आहे की, आपल्या दैनिक जीवनातली प्रत्येक लहान-मोठी घटना देवाने आधीच ठरवून ठेवली आहे.

तुमचा काय विश्‍वास आहे? तुमचे भविष्य देवाने आधीच ठरवून ठेवलेले आहे का? मानवांना खरोखरचे इच्छा स्वातंत्र्य अर्थात आपल्या भविष्याविषयी व्यावहारिक निर्णय घेण्याची क्षमता आहे का? आपले भवितव्य आपल्या कार्यांवर कितपत निर्भर आहे? पुढील लेख या प्रश्‍नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करील.

[Picture Credit Line on page 3]

SEL/Sipa Press

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा