पुष्कळांपर्यंत सुवार्ता पोंहचवणे
मी माझ्या देशांतील लोकांचा विचार केला तेव्हा, त्यांना तर यहोवाच्या साक्षीदारांची केवळ प्रसार माध्यमांतूनच ओळख होती हे माझ्या लक्षात आले. मी विचार केला, की यहोवाचे साक्षीदार कोण आहेत आणि त्यांचा काय विश्वास आहे हे या लोकांनी शिकण्याकरता त्यांच्यापर्यंत पोहंचणे तर आवश्यक आहे. पण मी मदत कशी करू शकेन? माझे पती एक ख्रिस्ती वडील आहेत आणि त्यांनी मला याबाबत सुज्ञ मार्गदर्शन व सूचना दिल्या.
जानेवारी ८, १९९५ च्या इंग्रजीतील सावध राहा! नियतकालिकातील “व्यावहारिक सांत्वन देणारी नियतकालिके,” या लेखात आम्हाला एक महत्त्वपूर्ण कल्पना मिळाली. एका साक्षीदार भगिनीच्या कार्याविषयी तो लेख म्हणतो: “इतर साक्षीदारांच्या घरात जमलेल्या विशिष्ट सावध राहा! नियतकालिकांचे जुने अंक गोळा करण्याचे तिने ठरवले. त्यानंतर, ती अशा एजेन्सींना भेटी देते ज्यांना तिच्या मते काही विशिष्ट विषय जास्त आवडतील.”
माझ्या पतीच्या मदतीने मीही शेकडो नियतकालिके गोळा केली. या गोळा केलेल्या नियतकालिकांतून योग्य लोकांकरता मी विविध विषय निवडले आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागले.
टेलिफोन डिरेक्टरी आणि पब्लिक रेकॉर्ड यांचा वापर करून मी, इस्पितळे, युवकांचे वसतिगृह आणि नर्सिंग होम्सची यादी तयार केली. याशिवाय, मी अंत्यसंस्कार संचालक, शाळेचे सुपरव्हाईसर आणि सल्लागार, वैद्यकीय परीक्षक आणि तुरुंग तसेच न्यायालय यांचे अधिकारी यांचीही यादी केली. माझ्या यादीत, मद्यासक्त आणि मादक पदार्थांचे व्यसन लागलेल्यांसाठी असलेल्या संस्थेचे संचालक, पर्यावरण विषय संबंधित, विकलांग आणि युद्धाचे बळी असलेल्यांसाठी व पोषणविषयक संशोधन मंडळांचा समावेश होता. कल्याण कार्यालयांचे, सामाजिक सेवांचे आणि कौटुंबिक बाबींच्या कार्यालयांच्या व्यवस्थापकांकडेही मी दुर्लक्ष केले नाही.
मी काय म्हणणार?
भेट देताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, मी माझी स्पष्टपणे ओळख करून देत असे. मग मी त्यांना सांगत असे की मी त्यांचा फार वेळ घेणार नाही.
तेथील जबाबदार व्यक्तीशी प्रत्यक्षात भेटल्यावर मी म्हणत असे: “मी एक यहोवाची साक्षीदार आहे. पण मी येथे कोणत्याही स्वरूपाची धार्मिक चर्चा करायला आलेली नाही; कारण कार्यालयीन वेळात असे करणे योग्य नाही.” बहुतेकवेळा वातावरण अगदी शांत व्हायचे. मग, परिस्थितीनुरूप मी म्हणत असे: “माझ्या भेटीचे कारण दुहेरी आहे. एक, तुमचे कार्यालय करीत असलेल्या कामाची मी प्रशंसा करते. कारण, सामान्य जनतेसाठी कोणी आपला वेळ आणि शक्ती खर्च करतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे उचित नाही. तुमचे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे.” या अशा संभाषणाने समोरचा माणूस पुष्कळदा आश्चर्यचकित व्हायचा.
आणि माझ्या भेटीचे दुसरे कारण जाणून घ्यायची त्याची जिज्ञासा तोपर्यंत वाढलेली असायची. मग मी म्हणायचे: “माझ्या भेटीचे दुसरे कारण: आंतरराष्ट्रीय प्रमाणावर प्रकाशित केल्या जाणाऱ्या आमच्या सावध राहा! नियतकालिकातून मी, कामाबद्दल व त्यासंबंधाने उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल संबंधित असलेले काही लेख निवडले आहेत. एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे या समस्यांविषयी काय मत आहे हे जाणून घ्यावयास तुम्हाला नक्कीच आवडेल असे मला वाटते. मी तुम्हाला या प्रती देऊ इच्छिते.” माझे प्रयत्न प्रशंसनीय आहेत असे अनेकदा मला सांगण्यात आले.
आश्चर्यकारक आणि समाधानकारक प्रतिफळ
अशाप्रकारे सुरवात केल्यावर अनेक लोक माझे ऐकत; १७ पैकी केवळ एकच माझे ऐकत नसे. माझ्याकडे अनेक आश्चर्यकारक आणि समाधानकारक अनुभव आहेत.
जसे की, एका जिल्हा शाळा निरीक्षकाला भेटण्याकरता माझ्या चार खेपा झाल्या, थांबून राहावे लागले; पण सरतेशेवटी मला ते भेटले. ते अत्यंत व्यस्त होते. तरीसुद्धा, ते स्वभावाने स्नेही होते आणि ते माझ्याबरोबर काही वेळ बोलले. मी निघण्याआधी ते मला म्हणाले: “मी तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो आणि तुम्ही दिलेले साहित्य मी नक्की काळजीपूर्वक वाचून काढेन.”
दुसऱ्या प्रसंगी मी जिल्हा न्यायालयात गेले, मुख्य न्यायाधीशांना भेटले. ते मध्यम वयाचे गृहस्थ होते. मी त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला तेव्हा, अगदी त्रासून त्यांनी टेबलावरील कागदात लपवलेले डोके वर करून माझ्याकडे पाहिले.
“कार्यालयीन वेळ फक्त मंगळवार सकाळची असते, त्यानंतरच मी तुम्हाला हवी असलेली माहिती देईन,” असे त्यांनी वैतागून मला सांगितले.
“मी अनुचित वेळी आल्याबद्दल मला क्षमा करावी, पण मी दुसऱ्या वेळेला पुन्हा येऊ इच्छिते, आणि मला तुमच्याशी काही खासगी गोष्टी बोलायच्या आहेत,” असे मी लागलीच म्हणाले.
आता या न्यायाधीशाची जिज्ञासा वाढली. जरा नरम होऊनच त्यांनी मला काय हवंय असे विचारले. मी त्यांना म्हणाले की मी पुढच्या मंगळवारी पुन्हा येईन.
“नाही, तुम्ही बसा ना. सांगा, तुम्हाला काय हवंय?” असे त्यांनी मला आर्जवून विचारले तेव्हा तर मला आश्चर्यच वाटले.
त्यानंतर आमची उत्साहपूर्ण चर्चा झाली; ते कामामध्ये अत्यंत व्यस्त असल्यामुळे सुरवातीला ते माझ्याशी जरा त्रासून बोलल्याबद्दल त्यांनी माझी क्षमा मागितली.
थोड्या वेळाने ते मला म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे का, की यहोवाच्या साक्षीदारांबद्दल मला काय आवडते? त्यांची तत्त्वे इतकी भक्कम असतात की त्यांपासून ते कधीच परावृत्त होत नाहीत. हिटलरने सर्व प्रयत्न पणाला लावले, पण साक्षीदारांनी मात्र शेवटपर्यंत युद्धात भाग घेतला नाही.”
आम्ही दोघींनी एका कार्यालयात प्रवेश केल्यावर तिथल्या सेक्रेटरींनी आम्हाला ओळखले. मग, कार्यकारी सेक्रेटरी अगदी शांतपणे म्हणाली, “अध्यक्ष कोणत्याही पार्टीला कधीच भेटत नाहीत.”
मीही शांतपणे तिला उत्तर दिले, “पण ते आम्हाला भेटतील. कारण आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत. आम्ही विनंती अर्जदार नाहीत, शिवाय आम्ही केवळ तीनच मिनिटं त्यांच्याशी बोलू.” मी मनातल्या मनातच प्रार्थना केली, “यहोवा, कृपया माझ्या ह्या प्रयत्नाला यश दे!”
सेक्रेटरीने उदास होऊन उत्तर दिले, “बरं तर मी प्रयत्न करते.” ती निघून गेली. दोनच मिनिटांनंतर, तिच्याबरोबर अध्यक्ष आले; पण मला ती दोन मिनिटे युगांसारखी वाटली. काही न बोलता त्यांनी आम्हाला दोन खोल्या ओलांडून त्यांच्या कार्यालयात नेले.
आम्ही जसजसे बोलू लागलो तसतसे ते अधिकाधिक स्नेही बनले. आम्ही त्यांना दाखवलेल्या सावध राहा! नियतकालिकाच्या खास प्रती त्यांनी अगदी आनंदाने स्वीकारल्याही. आमच्या कार्याच्या उद्देशाविषयी उत्तम साक्ष देण्याकरता यहोवाने आम्हाला संधी दिल्याबद्दल आम्ही त्याचे फार आभार मानले.
मी अनुभवलेल्या प्रसंगांची मला आठवण होते तेव्हा, प्रेषित पेत्राने जे म्हटले ते मला अधिक चांगल्याप्रकारे समजले की, “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) सर्व पार्श्वभूमीच्या, भाषेच्या किंवा सामाजिक स्थराच्या लोकांना, मानवजात आणि पृथ्वी यांबद्दलचा आपला उद्देश जाणण्याची संधी मिळावी अशीच देवाची इच्छा आहे.—सौजन्याने.