लोकांना विशेष आकर्षक वाटणारे लेख निवडा
१ आपल्या लक्ष्यावर काळजीपूर्वक नेम धरणाऱ्या तिरंदाजांप्रमाणेच मंडळीतील अनेक प्रचारक आणि पायनियर त्यांच्या क्षेत्रातील लोकांच्या विशेष आस्था आकर्षित करण्यासाठी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! यांतील निवडक लेखांचा उपयोग करून उत्तम यश अनुभवत आहेत. कुठल्या व्यक्तीला नियतकालिकातील विशिष्ट लेख वाचण्यास आवडतील हे ते निश्चित करतात आणि अशा लेखांचा उपयोग करून आपल्या नियतकालिकांचे वर्गणीदार होण्यास विशिष्ट लोकांना ते उत्तेजित करतात. ते हे कसे करतात बरे?
२ प्रथम ते संपूर्ण अंक वाचून काढतात. मग स्वतःस असे विचारतात, की यातला प्रत्येक लेख कोणत्या व्यक्तीस आकर्षक वाटेल? तो लेख वाचण्यास जे लोक बहुधा आस्था दाखवतील अशांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांची आस्था जागविण्यासाठी तो विशिष्ट लेख दाखवल्यानंतर वर्गणी सादर केली जाते. एखाद्या विशिष्ट अंकास त्यांच्या क्षेत्रात बहुधा भरघोस प्रतिसाद मिळेल असा अंदाज बांधल्यानंतर त्याचा अतिरिक्त साठा ते मागवतात.
३ आपली नियतकालिके आदरणीय आहेत: मोठ्या प्रमाणात वाचल्या जाणाऱ्या नायजेरियातील एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकासाठी काम करणाऱ्या आपल्या एका वर्गणीदाराने सावध राहा! नियतकालिकाबद्दल म्हटले: “सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय हाताळणाऱ्या जगातील सर्वोत्कृष्ट अशा या नियतकालिकासाठी अभिनंदन.” आपल्या नियतकालिकाच्या एका उत्सुक वाचकाने निरीक्षिले: “अमूल्य सुविचाराची किती ही उत्कृष्ट रत्ने! यात [नियतकालिकांत] माझ्या आवडीचा एखादा लेख मला हमखास आढळतोच.”
४ काहींचाच उल्लेख करायचा झाल्यास बायबल, जागतिक घटना, कौटुंबिक चिंता, सामाजिक समस्या, इतिहास, विज्ञान, प्राणी आणि वनस्पती जीवन असे अनेकानेक वैविध्यपूर्ण विषय ही नियतकालिके हाताळतात. आपल्या गरजांशी, परिस्थितींशी किंवा व्यवसायाशी संबंधित असलेले काही वाचण्यास निश्चित एखाद्या व्यक्तीला अधिक आवडते. विशिष्ट आवडीनिवडी व समस्या असलेल्या अनेक लोकांशी आपण बोलत असतो त्यामुळे आपण भेटत असलेल्या लोकांना खास आकर्षित करण्यासाठी लेखांची निवड करणे अतिशय प्रभावशाली ठरते.
५ दोन साक्षीदारांनी वृत्तपत्राच्या एका स्तंभलेखकास सावध राहा! नियतकालिकाचा सप्टेंबर ८, १९९६ हा अंक दिला तेव्हा काय घडले ते लक्षात घ्या. त्याने लिहिले: “मला यात काही रस नाही, असं मी म्हणण्याआधीच त्यांच्यापैकी एकानं म्हटलं: ‘त्यात अमेरिकन इंडियन्सबद्दल एक लेख आहे. आम्हाला ठाऊक आहे, की या विषयावर तुम्ही बरंच लिखाण केलंय.’” त्याने ते नियतकालिक घेतले आणि नाष्टा करताना इंडियन्सबद्दलची माहिती वाचून काढली; नंतर त्याने कबूल केले की, “ती माहिती सर्वोत्तम” आणि “प्रामाणिक होती.”
६ तुमच्या क्षेत्रातील लोकांना कशात रुची आहे? या नियतकालिकांच्या अलीकडील अंकात, तुमच्या क्षेत्रातील दुकानदारांना आणि व्यावसायिकांना किंवा तुमच्या शेजाऱ्यांना, सहकर्मचाऱ्यांना आणि वर्गसोबत्यांना आकर्षक वाटेल असे काही तुम्हाला आढळले आहे? वकील, शिक्षक, प्राध्यापक व मुख्याध्यापक; कुटुंब तसेच शाळा सल्लागार, युवा सल्लागार आणि समाज सेवक; तसेच डॉक्टर्स व नर्सेस यांना खासकरून काय आकर्षक वाटू शकेल? प्रत्येक अंकाचे परीक्षण करताना तुम्ही कोणत्या प्रकारच्या लोकांना प्रचार करता ते लक्षात ठेवल्याने, सत्याच्या वचनाचा फैलाव करण्याचे सर्वोत्कृष्ट मार्ग तुम्हाला सुचतील.
७ टेहळणी बुरूज अथवा सावध राहा! नियतकालिकातील एखादा विशिष्ट लेख वाचण्यास विशेष आस्था दाखविणारी एखादी व्यक्ती भेटली व तिने नियतकालिक स्वीकारल्यास तुम्ही असे म्हणू शकता: “पुढील अंकात तुम्हाला आवडेल असा एखादा लेख असल्यास त्याची एक प्रत मी तुमच्यासाठी जरूर आणीन.” आपल्या नियतकालिक मार्गात तुम्ही या व्यक्तीला समाविष्ट करू शकाल व अलीकडील नियतकालिके देऊन वेळोवेळी त्यांची पुन्हा भेट घेऊ शकाल. आपल्या नियतकालिकांत आढळणाऱ्या विशिष्ट लेखांविषयी आस्था व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना पुन्हा भेट देण्याविषयी जे उघड उघड सांगितले जायचे त्यासारखे हे देखील आहे.
८ आध्यात्मिक ध्येय राखा: काही वर्षांपूर्वी कारकीर्द बनवण्यात विशेष रस असणाऱ्या एका मनुष्याने आपल्या आवडीच्या विषयावरील एक सावध राहा! नियतकालिक घेतले. तथापि, या धार्मिक मनुष्याने त्यासोबतचा टेहळणी बुरूज अंक देखील वाचला; त्यातील एका लेखाने, कित्येक वर्षांपासून तो मानत आलेल्या त्रैक्यावरील विश्वासाचे काळजीपूर्वक परीक्षण करण्यास त्याला प्रवृत्त केले. सहा महिन्यांनंतर त्याचा बाप्तिस्माही झाला! यास्तव, आपल्या नियतकालिकांच्या वाचकांसोबत आध्यात्मिक विषयावर चर्चा करण्यास कचरू नका. देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक तुम्ही दाखवू शकता आणि नवनवीन नियतकालिके देण्यासाठी तुम्ही पुन्हा त्यांची भेट घेता त्या प्रत्येक वेळी सदर माहितीपत्रकातील एका पाठाची केवळ काही मिनिटे चर्चा कराल असे सांगा.
९ तुमच्या पुनर्भेटींपैकी किंवा व्यवसाय संपर्कांपैकी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांची वर्गणी करण्याची कोणाला बहुधा अधिक आवड असेल हे काळजीपूर्वक ठरवा. मग त्यांची भेट घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. ही मूल्यवान नियतकालिके घेऊन होता होईल तितक्या अधिकांची भेट घ्या. त्यांनी वर्गणी केली नाही पण आस्था दाखवली तर नियमितपणे त्यांची भेट घेऊन त्यांना अलीकडील अंक द्या आणि प्रत्येक वेळी त्यांना विशेष आकर्षक वाटतील असे विषय दाखवा. आणि आपल्या नियतकालिकांचे वाचन करण्यासाठी अधिकतर लोकांना मदत करण्याची तुम्ही धडपड करता तेव्हा, ‘आपले अन्न जलाशयावर सोडत आहात’ याचा विसर पडू देऊ नका. कालांतराने कदाचित, भावी सहशिष्य शोधून काढण्यात तुम्हाला यश मिळेल.—उप. ११:१, ६.