वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१५ पृ. २३-२७
  • विभूतिमत्व—मनुष्याची स्तुती किंवा देवाची महिमा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विभूतिमत्व—मनुष्याची स्तुती किंवा देवाची महिमा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सार्वकालिक जीवन
  • सेवा विशेषाधिकार
  • इतरांना सांगण्यासाठी आध्यात्मिक देणग्या
  • देवाच्या महिमेचा आणखी विचार करणे
  • यहोवाचा आशीर्वाद आपल्याला समृद्ध बनवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • “मनुष्यांतील दाने” यांची कदर बाळगणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • शोध सर्वात चांगल्या भेटवस्तूचा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • देण्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१५ पृ. २३-२७

विभूतिमत्व—मनुष्याची स्तुती किंवा देवाची महिमा?

एका शासनकर्त्याला त्याच्या प्रजेपेक्षा चांगलेच असता कामा नये, तर त्याने त्यांना मंत्रमुग्ध देखील केले पाहिजे, असे प्रसिद्ध झेनोफोन नामक एका ग्रीक जनरलने लिहिले. “अशा मंत्रमुग्धतेला” आज अनेक जण विभूतिमत्व म्हणतील.

सर्व मानवी शासनकर्त्यांकडे विभूतिमत्व नसते, हे खरे आहे. पण ज्यांच्याकडे ते असते, ते लोक उपासना प्रेरित करण्यासाठी आणि मोठ्या चतुरपणे आपले काम साधण्यासाठी त्या व्यक्‍तिमत्त्वाचा उपयोग करतात. कदाचित सर्वात कुप्रसिद्ध उदाहरण मांडले ते अडॉल्फ हिटलर याने. “[१९३३ मध्ये] बहुतेक जर्मन लोकांना हिटलर—एक खरोखरच वेधक नेता असल्याचे वाटत होते—किंवा त्यांना तसे लवकरच वाटणार होते,” असे तिसऱ्‍या राइखची भरभराट आणि पतन (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात विल्यम एल. शिरर लिहितात. “त्यांना पुढील १२ कठीण वर्षांत डोळे बंद करून त्याच्या मागोमाग जायचे होते जणू काय तो ईश्‍वरी न्यायदंड बजावणार होता.”

धार्मिक इतिहास अशा वेधक नेत्यांनी पूर्णपणे भरलेला आहे ज्यांनी लोकांना स्वतःचे उपासक होण्यासाठी प्रेरित केले पण त्यांनी त्यांच्या अनुयायांवर संकटच आणले. येशूने इशारा दिला: “तुम्हास कोणी फसवू नये, म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांस फसवितील.” (मत्तय २४:४, ५) वैयक्‍तिक आकर्षण असणारे खोटे ख्रिस्ती केवळ पहिल्या शतकातच नव्हते. सन १९७० च्या दशकादरम्यान जिम जोन्स याने स्वतःला “पीपल्स टेंपलचा मशीहा” असे म्हणवून घेतले. त्याचे वर्णन “वैयक्‍तिक आकर्षण असणारा पाळक” असे करण्यात आले आणि त्याच्याकडे “लोकांना हिकमतीत ठेवण्याची दिव्य शक्‍ती” होती तसेच १९७८ मध्ये त्याने इतिहासातील सर्वात जास्त लोकांची आत्महत्या घडवून आणली.a

विभूतिमत्व एक धोकेदायक देणगी होऊ शकते, हे उघड आहे. पण बायबल एका दुसऱ्‍या प्रकारच्या देणगी किंवा देणग्यांविषयी बोलते ज्या देवाकडून सर्वांच्या चांगल्याकरता देण्यात येतात. या देणगीचा ग्रीक शब्द आहे खरिस्मा आणि बायबलमध्ये त्याचा १७ वेळा उल्लेख करण्यात आला आहे. एक ग्रीक तज्ज्ञ याची व्याख्या अशा प्रकारे करतात, ‘मोफत आणि अनर्जित देणगी, असे काहीतरी जे मनुष्याला कमावल्याविना किंवा योग्य नसतानाही देण्यात येते, ही अशी गोष्ट आहे जी देवाच्या कृपेमुळे प्राप्त होते आणि ती देणगी मनुष्य आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने प्राप्त करू शकत नाही किंवा स्वतःकडे ठेवू शकत नाही.’

म्हणून शास्त्रवचनीय दृष्टिकोनातून खरिस्मा अशी देणगी आहे जी देवाच्या अपात्री कृपेमुळे मिळते. यांपैकी काही देणग्या कोणत्या आहेत ज्या देवाने आपल्याला कृपेने दिल्या आहेत? आणि त्या देणग्यांचा देवाची स्तुती करण्यासाठी आपण कसा उपयोग करू शकतो? आपण तीन कृपामय देणग्यांचा विचार करू या.

सार्वकालिक जीवन

सार्वकालिक जीवनाची देणगी निश्‍चितच सर्वात महान देणगी आहे. पौलाने रोमकरांच्या मंडळीला लिहिले: “पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान [खरिस्मा] आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे.” (रोमकर ६:२३) याठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवणे उचित आहे, की “वेतन” (मरण) ही अशी गोष्ट आहे जी आपण आपल्या पापी स्वभावामुळे कमावली आहे, आणि तीही आपली कोणतीही इच्छा नसताना. दुसऱ्‍या बाजूला पाहता, सार्वकालिक जीवन देव उपलब्ध करून देतो जे पूर्णपणे अनर्जित आहे ज्यास आपण स्वतः होऊन केव्हाही कमावू शकत नाही.

सार्वकालिक जीवनाला आपण मौल्यवान समजले पाहिजे आणि त्याविषयी इतरांना देखील सांगितले पाहिजे. यहोवाविषयी जाणून घेण्यासाठी, त्याची सेवा करण्यात आणि अशा प्रकारे लोकांना सार्वकालिक जीवनाची देणगी मिळावी म्हणून त्यांना योग्य बनवण्यासाठी आपण त्यांना मदत करू शकतो. प्रकटीकरण २२:१७ म्हणते: “आत्मा व वधू ही म्हणतात, ये. ऐकणाराहि म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.”

आपण या जीवनदायक पाण्याला दुसऱ्‍यांकडे कसे घेऊन जाऊ शकतो? विशेषतः आपल्या सेवाकार्यात बायबलचा प्रभावीपणे उपयोग करण्याद्वारे आपण असे करू शकतो. हे खरे आहे, की जगाच्या काही भागांत, लोक आध्यात्मिक गोष्टींविषयी अभावानेच काही वाचतात किंवा विचार करतात तरी देखील एखाद्या व्यक्‍तीचे ‘कान उघडण्याच्या’ संधी नेहमी मिळत असतात. (यशया ५०:४) याबाबत आपल्याला बायबलच्या प्रेरक शक्‍तीची खात्री असण्यास हवी “कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे. (इब्री लोकांस ४:१२) मग ती बायबलची व्यावहारिक बुद्धी असो, त्यामध्ये देण्यात आलेले सांत्वन किंवा आशा असो अथवा जीवनाच्या उद्देशाविषयी त्याचे वर्णन असो, देवाचे वचन हृदयस्पर्शी असू शकते आणि जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी लोकांना प्रेरित करू शकते.—२ तीमथ्य ३:१६, १७.

याशिवाय, बायबलवर आधारित असलेले साहित्य आपल्याला “ये” असे म्हणण्यात मदत करू शकते. यशया संदेष्ट्याने भाकीत केले, की या आध्यात्मिकरीत्या अंधःकारमय काळादरम्यान आपल्या लोकांवर “परमेश्‍वर उदय” पावेल. (यशया ६०:२) वॉच टावर संस्थेची प्रकाशने यहोवापासून मिळणाऱ्‍या या आशीर्वादाला प्रकट करतात आणि प्रत्येक वर्षी या प्रकाशनांमुळे हजारो लोक यहोवाकडे येतात जो आध्यात्मिक ज्ञानाचा उगम आहे. या प्रकाशनांमध्ये लोकांना महत्त्व दिले जात नाही. जसे टेहळणी बुरूजाच्या प्रस्तावनेत सांगण्यात आले आहे: “टेहळणी बुरूज याचा उद्देश यहोवा देवास विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधारी प्रभू या नात्याने उंचावणे हा आहे. . . . सध्या राज्य करीत असलेला देवाचा राजा येशू ख्रिस्त, ज्याने ओतलेल्या रक्‍ताद्वारे मानवजातीस सार्वकालिक जीवनप्राप्तीचा मार्ग मोकळा होत आहे त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यास ते प्रोत्साहन देते.”

एका पूर्ण-वेळेच्या सेविकेला अनेक वर्षांपासून सेवाकार्यात उल्लेखनीय यश मिळाले आहे; देवाच्या जवळ आणण्यात लोकांना मदत करण्यासाठी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या नियतकालिकांच्या महत्त्वतेवर ती विवेचन करते: “जेव्हा माझे बायबल विद्यार्थी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! वाचण्यास सुरवात करतात आणि त्यांना ही नियतकालिके वाचनीय वाटतात तेव्हा ते वेगाने प्रगती करतात. मला दिसते, की ही नियतकालिके यहोवाला जाणून घेण्यासाठी लोकांची मदत करण्यासाठी एक अनमोल साहाय्य आहे.”

सेवा विशेषाधिकार

तीमथ्य एक ख्रिस्ती शिष्य होता ज्याला आणखी एक देणगी देण्यात आली होती ज्या देणगीवर विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. प्रेषित पौलाने त्याला म्हटले: “तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान [खरिस्मा] तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको.” (१ तीमथ्य ४:१४) ही देणगी कोणती होती? यामध्ये तीमथ्याची प्रवासी पर्यवेक्षक या नियुक्‍तीचा समावेश होता; हा अशा प्रकारचा सेवा विशेषाधिकार होता ज्याची त्याला जबाबदारीने देखरेख करावयाची होती. त्याच उताऱ्‍यात पौलाने तीमथ्याला असा उपदेश केला: “वाचन, बोध व शिक्षण ह्‍याकडे लक्ष ठेव. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.”—१ तीमथ्य ४:१३, १६.

आज वडिलांनी त्यांच्या सेवा विशेषाधिकाराचे मोल जाणले पाहिजे. जसे पौल सांगतो त्यानुसार असे करण्याचा एक मार्ग आहे, ‘आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेवणे.’ जगीक वैयक्‍तिक आकर्षण असणाऱ्‍या नेत्यांचे अनुकरण करण्याऐवजी ते देवाकडे लक्ष देऊ शकतात, आपल्या स्वतःकडे नव्हे. त्यांचा कित्ता, येशू उल्लेखनीय शिक्षक होता ज्याचे निःसंशये एक आकर्षक व्यक्‍तिमत्त्व होते, पण त्याने ही महिमा नम्रपणे त्याच्या पित्याला दिली. “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.”—योहान ५:४१; ७:१६.

येशूने त्याच्या शिकवणीकरता अधिकार म्हणून देवाच्या वचनाचा उपयोग करण्याद्वारे त्याच्या स्वर्गीय पित्याची महिमा केली. (मत्तय १९:४-६; २२:३१, ३२, ३७-४०) त्याचप्रमाणे पौलाने पर्यवेक्षकांनी ‘त्यांच्या शिक्षणानुसार जे विश्‍वसनीय वचन त्याला धरून राहण्याच्या’ गरजेवर जोर दिला. (तीत १:९) आपली भाषणे शास्त्रवचनांवर आधारित करण्याद्वारे वडील खरे तर येशूने जे म्हटले तेच म्हणतील: “ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या मनच्या सांगत नाही.”—योहान १४:१०.

वडील कशा प्रकारे ‘विश्‍वसनीय वचनाला धरून’ ठेवू शकतात? त्यांची भाषणे आणि सभेतील नेमणुका देवाच्या वचनावर केंद्रित करण्याद्वारे तसेच ज्या शास्त्रवचनाचा ते उपयोग करतात त्यास समजावण्याद्वारे आणि त्यावर जोर देण्याद्वारे ते असे करू शकतात. नाट्यमय दृष्टान्त किंवा हसू येईल असे कथाप्रसंग, विशेषतः तिखट मीठ लावून सांगितल्यावर ते श्रोत्यांचे लक्ष देवाच्या वचनापासून विकर्षित करून वक्‍ता स्वतःच्या कौशल्यावर लोकांचे लक्ष आकर्षित करील. दुसऱ्‍या बाजूला पाहता, बायबलची वचनेच केवळ श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतील आणि त्यांना प्रेरित करतील. (स्तोत्र १९:७-९; ११९:४०; पडताळा लूक २४:३२.) अशा प्रकारची भाषणे मनुष्याकडे कमी लक्ष आकर्षित करतात आणि देवाला जास्त महिमा देतात.

एकमेकांपासून शिकणे, या एक आणखी मार्गाद्वारे वडील प्रभावशाली शिक्षक होऊ शकतात. जसे पौलाने तीमथ्याला मदत केली त्याचप्रमाणे वडील दुसऱ्‍याला मदत करू शकतात. “तिखे तिख्याला पाणीदार करिते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करितो.” (नीतिसूत्रे २७:१७; फिलिप्पैकर २:३) कल्पना आणि सूचना एकमेकांना सांगण्याद्वारे वडिलांना लाभ मिळतो. अलीकडेच वडील म्हणून नियुक्‍ती मिळालेल्या एका बांधवाने म्हटले: “जाहीर भाषणाची तयारी ते कशी करतात, हे मला सांगण्यासाठी एका अनुभवी वडिलांनी वेळ काढला. त्यांनी तयारी करताना, अलंकारिक प्रश्‍न, दृष्टान्त, उदाहरणे किंवा संक्षिप्त अनुभव तसेच शास्त्रवचनीय उतारे समाविष्ट केले होते आणि त्यावर त्यांनी चांगले संशोधन देखील केले होते. कंटाळवाणे भाषण टाळण्यासाठी माझ्या भाषणात विविधता आणण्यासाठी मी त्यांच्याकडून पुष्कळ काही शिकलो.”

आपण सर्व जण सेवा विशेषाधिकारांचा आनंद लुटतो, मग आपण वडील असू, सहायक सेवक असू किंवा पायनियर असू; आपणा सर्वांना आपल्याला देण्यात आलेल्या देणगीचे मोल जाणण्याची गरज आहे. आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी पौलाने तीमथ्याला स्मरण करून दिले की, तो ‘देवाचे जे कृपादान [खरिस्मा] तुझ्या ठायी आहे ते प्रज्वलित कर;’ तीमथ्याच्या बाबतीत आत्म्याची काही खास देणगी समाविष्ट होती. (२ तीमथ्य १:६) इस्राएल लोकांच्या घरांत आग म्हणजे बहुतेकवेळा जळणारे निखारे होते. या निखाऱ्‍यांना ‘प्रज्वलित करून’ आग अधिक पेटवणे शक्य होते. अशा प्रकारे आपल्या नेमणुका पूर्ण अंतःकरणाने आणि पूर्ण शक्‍तीने करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करण्यात आले आहे आणि आपल्याला सोपवण्यात आलेल्या कोणत्याही आध्यात्मिक देणगीमध्ये आपण अग्नीप्रमाणे प्रज्वलित झाले पाहिजे.

इतरांना सांगण्यासाठी आध्यात्मिक देणग्या

आपल्या रोममधील बांधवांप्रती असलेल्या प्रेमामुळे पौल त्यांना असे लिहिण्यास प्रेरित झाला: “तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान [खरिस्मा] द्यावे, ह्‍यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; म्हणजे मी तुमच्या सन्‍निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्‍वासाच्या योगाने आपण उभयतास, मला तुम्हाविषयी, व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.” (रोमकर १:११, १२) इतरांसोबत चर्चा करण्याद्वारे त्यांच्या विश्‍वासाला दृढ करण्याच्या आपल्या क्षमतेकडे पौलाने एक आध्यात्मिक देणगी या दृष्टिकोनातून पाहिले. अशा प्रकारच्या आध्यात्मिक देणग्यांच्या देवाण-घेवाणीचा परिणाम विश्‍वासाची उभारणी करण्यात आणि एकमेकांना उत्तेजन देण्यात होतो.

आणि याची निश्‍चितच आवश्‍यकता आहे. आपण जगत असलेल्या या दुष्ट व्यवस्थीकरणामध्ये आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दबावाला तोंड द्यावे लागते. पण नियमितरीत्या एकमेकांना उत्तेजन दिल्यामुळे आपल्याला तग धरण्यात मदत मिळू शकते. देवाण-घेवाण याची कल्पना—देणे आणि घेणे दोन्ही—आध्यात्मिक शक्‍ती टिकवून ठेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हे खरे आहे, की आपल्या सर्वांना वेळोवेळी उत्तेजनाची गरज असते, पण आपण त्यासोबत इतरांची देखील उभारणी करू शकतो.

जर आपण निराश झालेल्या सहविश्‍वासूंकडे लक्ष देण्यात तत्पर आहोत तर ‘देवाकडून आपल्याला जे सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आपणही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन’ करू. (२ करिंथकर १:३-५) सांत्वन (पाराक्लेसिस) यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अक्षरशः अर्थ आहे “एखाद्याच्या बाजूला बोलावणे.” आपल्या भाऊ-बहिणींना गरज असते तेव्हा आपण त्यांना मदतीचा हात देतो, तर आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याला देखील निश्‍चितपणे प्रेमळ साहाय्य प्राप्त होईल.—उपदेशक ४:९, १०; पडताळा प्रेषितांची कृत्ये ९:३६-४१.

वडिलांद्वारे देण्यात येणाऱ्‍या प्रेमळ मेंढपाळकत्वाच्या भेटीमुळे देखील मोठा फायदा होतो. लक्ष देण्याची गरज असणाऱ्‍या विषयावर शास्त्रवचनीय सल्ला देण्यासाठी अशा प्रकारच्या भेटी दिल्या जातात तरी सुद्धा मेंढपाळकत्वाच्या बहुतेक भेटी प्रोत्साहन, “मनास उत्तेजन [“सांत्वन,” NW]” देणाऱ्‍या असतात. (कलस्सैकर २:२) जेव्हा पर्यवेक्षक विश्‍वासाची उभारणी करणाऱ्‍या अशा प्रकारच्या भेटी देतात तेव्हा त्या भेटी वास्तविकरीत्या आध्यात्मिक देणगी देत असतात. पौलाप्रमाणे त्यांना देखील देण्याच्या या प्रकारामुळे प्रतिफळ लाभेल आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या बांधवांप्रती “उत्कंठा” विकसित होईल.—रोमकर १:११.

ही गोष्ट स्पेनमधील एका वडिलांच्या बाबतीत खरी ठरली जे खालील अनुभव सांगतात: “रिकारडो नामक ११ वर्षांचा एक मुलगा सभांमध्ये आणि सामान्यतः मंडळीमध्ये रस घेत असल्याचे वाटत होते. म्हणून मी रिकारडोच्या पालकांकडे त्यांच्या मुलाला भेटण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी ती दिलीही. ते माझ्या घरापासून सुमारे एका तासाच्या अंतरावर दूर डोंगरात राहत होते. मी रिकारडोमध्ये घेत असलेली आस्था पाहून त्याला फार आनंद झाला आणि त्याने लगेचच योग्य ती प्रतिक्रिया दाखवली. लवकरच तो बाप्तिस्मा न झालेला प्रचारक बनला आणि मंडळीचा एक उत्साही सदस्य झाला. त्याची संकोचवृत्ती नाहीशी झाली आणि तो अधिक मैत्रिपूर्ण होऊन अधिक आनंदी बनला. मंडळीतील अनेकांनी विचारले: ‘रिकारडोला नक्की झालं तरी काय? जणू ते सर्व रिकारडोला पहिल्यांदाच पाहत होते. त्या महत्त्वपूर्ण मेंढपाळकत्वाच्या भेटीचा विचार केल्यास मला असे वाटते, की त्या भेटीचा रिकारडोपेक्षा मलाच जास्त फायदा झाला आहे. जेव्हा तो राज्यसभागृहात येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्‍यावर एक प्रकारचे तेज असते आणि तो मला भेटण्यासाठी धावतच येतो. त्याची आध्यात्मिक प्रगती पाहणे ही आनंदाची गोष्ट राहिली आहे.”

निश्‍चितच, अशा प्रकारच्या मेंढपाळकत्वाच्या भेटींवर मोठा आशीर्वाद मिळतो. अशा प्रकारच्या भेटी येशूच्या आज्ञेच्या एकवाक्यतेत आहेत: “माझी मेंढरे पाळ.” (योहान २१:१६) अर्थात, अशा प्रकारच्या आध्यात्मिक देणग्या फक्‍त वडीलच देऊ शकतात असे नाही. मंडळीतील प्रत्येकाने दुसऱ्‍यांना प्रेम आणि चांगली कामे करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. (इब्री लोकांस १०:२३, २४) डोंगर चढताना गिर्यारोहक जसे एकमेकांना रश्‍शीने बांधलेले असतात त्याप्रमाणे आपण सर्व जण एकदुसऱ्‍यांना आध्यात्मिक बंधनांद्वारे बांधलेलो आहोत. आपण जे काही बोलतो किंवा करतो त्याचा इतरांवर परिणाम होतो यात कोणतीही शंका नाही. टोमणा मारणे किंवा कटू शब्द, आपण ज्या बंधनात बांधले गेलो आहोत त्या बंधनाला दुर्बळ करू शकतात. (इफिसकर ४:२९; याकोब ३:८) दुसऱ्‍या बाजूला पाहता, आपल्या बांधवांना त्यांच्या डोंगरासमान कठीण परिस्थितींतून पार होण्यास उत्तेजनाच्या निवडलेल्या शब्दांमुळे आणि प्रेमळ साहाय्यामुळे मदत होऊ शकते. अशा प्रकारे आपण अक्षय मोलाच्या आध्यात्मिक देणग्या इतरांना देत असू.—नीतिसूत्रे १२:२५.

देवाच्या महिमेचा आणखी विचार करणे

हे स्पष्ट आहे, की प्रत्येक ख्रिश्‍चनाकडे काही प्रमाणात वैयक्‍तिक आकर्षण असते. आपल्याला सार्वकालिक जीवनाची अनमोल आशा देण्यात आली आहे. आपल्याकडे आध्यात्मिक देणग्या देखील आहेत ज्या आपण एकमेकांना देऊ शकतो. आणि आपण योग्य त्या ध्येयाकडे इतरांना उत्तेजन देण्याचा किंवा प्रेरित करण्याचा प्रयत्न करू शकतो. काही जनांकडे सेवा विशेषाधिकारांच्या रूपात अधिक देणग्या आहेत. या सर्व देणग्या देवाच्या अपात्री कृपेचा पुरावा आहे. आणि आपल्याकडे जी कोणती देणगी आहे ती देवाकडून प्राप्त झालेली आहे त्यामुळे त्यासंबंधाने शेखी मिरवण्याची काहीएक आवश्‍यकता नाही.—१ करिंथकर ४:७.

ख्रिस्ती या नात्याने आपण स्वतःला असे विचारणे चांगले ठरेल की, ‘मला जे काही विभूतिमत्व मिळाले आहे त्याचा उपयोग “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान” देणारा यहोवा याची महिमा करण्यासाठी करणार का? (याकोब १:१७) मी येशूचे अनुकरण करत असताना स्वतःच्या क्षमता आणि परिस्थितींनुसार इतरांची सेवा करणार का?’

या बाबतीत प्रेषित पेत्र आपल्या जबाबदारीचा सारांश सांगतो: “प्रत्येकाला जसे कृपादान [खरिस्मा] मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा; भाषण करणाऱ्‍याने, आपण देवाची वचने बोलत आहो, असे बोलावे; सेवा करणाऱ्‍याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्‍तीने करीत आहो, अशी करावी; ह्‍यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे.”—१ पेत्र ४:१०, ११.

[तळटीप]

a जिम जोन्स सहित एकूण ९१३ लोक मरण पावले होते.

[२३ पानांवरील चित्राचे श्रेय]

UPI/Corbis-Bettmann

Corbis-Bettmann

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा