उदारतेमुळे आशीर्वाद
उदार मनाने आणि प्रेमाने, कोणत्याही प्रकारे कंजूषपणा न करता सढळ हाताने इतरांना देण्यातील तत्परता म्हणजे उदारता होय. पण, ज्याला उदारता दाखवण्यात आली आहे त्यापासून आणि यहोवापासून उदारता दाखवणाऱ्याला कित्येक आशीर्वाद प्राप्त होतात. हिब्रू शब्द नादिव यास यशया ३२:८ येथे “थोर” असे भाषांतरित करण्यात आले आहे, त्याचे ‘उत्सुक’ आणि ‘उदार’ असेही भाषांतर करण्यात आले आहे. (स्तोत्र ५१:१२; गणना २१:१८, NW, तळटीप) ग्रीक नाम हाप्लोतेस यास २ करिंथकर ८:२ आणि ९:११ येथे ‘औदार्य;’ रोमकर १२:८, पंडिता रमाबाई भाषांतरामध्ये ‘उदार’ आणि इफिसकर ६:५ मध्ये “सरळ” असे भाषांतर करण्यात आले आहे. स्वतः यहोवा उदारतेचे प्रत्यक्ष स्वरूप असून तो आज्ञाधारक प्राणीमात्रांच्या सर्व गरजा “त्याच्या इच्छेप्रमाणे” पूर्ण करतो. (१ योहान ५:१४; फिलिप्पैकर ४:१९) प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान त्याच्यापासून मिळते ज्यामध्ये ज्ञानासारखी अमूर्त देणगी देखील आहे.—याकोब १:५, १७.
मोशेने आपल्या सहइस्राएलांना उदारतेचा हा ईश्वरी गुण विकसित करण्याचे आर्जवले, किंबहुना अशा वेळी सुद्धा जेव्हा उसने देण्याची बाब येते. “दरिद्री बांधवाबाबत आपले हृदय कठोर करू नको; किंवा आपला हात आखडू नको; तर तू आपला हात त्याच्यासाठी सैल सोड, . . . तू त्याला अवश्य दे, व त्याला देताना तुझ्या मनाला वाईट वाटू देऊ नको; . . . म्हणून मी तुला आज्ञा देतो की तुझ्या देशातल्या गरजवंत आणि गरीब बांधवांना सढळ हाताने मदत कर.” (अनुवाद १५:७-११) या ईश्वरी सल्ल्याचे पालन केल्यामुळे वाईट दिवस आलेल्या इस्राएलांना आशीर्वाद प्राप्त होणार होते.
परंतु इतरांना उदारता दाखवणाऱ्यांना कोणते आशीर्वाद मिळतील? नीतिसूत्रे ११:२५ येथे आपण वाचतो: “उदार मनाचा [शब्दशः इतरांकरता आशीर्वाद ठरलेला जीव] समृद्ध होतो; जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.” येशू ख्रिस्ताने यास अशा प्रकारे व्यक्त केले: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) त्याने पुन्हा म्हटले: “द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्या मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.” (लूक ६:३८) अशा प्रकारे उदारतेचा दुहेरी फायदा होतो—देणाऱ्याला आणि घेणाऱ्यालाही आशीर्वाद प्राप्त होतात.
ख्रिस्ती मंडळीत उदारता
प्रेषित पौलाने उदारतेविषयी पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीला पुष्कळ काही सांगितले. तो म्हणतो: “जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.” असे असल्यामुळे प्रेषित असा तर्क करतो, “प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.” तो नंतर यहोवाच्या उदारतेच्या सर्वोत्तम उदाहरणाकडे लक्ष वेधतो, ज्याने केवळ पेरणाऱ्याला बीज आणि खाण्यासाठी मुबलक अन्न दिले नाही, तर करिंथमधील बांधवांना “सर्व प्रकारच्या औदार्यासाठी” संपन्न केले जेणेकरून ते एकमेकांना उदारता दाखवतील. पौलाने असे सांगितले, की अशा प्रकारच्या उदारतेच्या भावनेमुळे “देवाचे आभार प्रदर्शन” होते. (२ करिंथकर ९:६-१३) यामुळे उदार ख्रिश्चनांकरता यहोवाकडून आशीर्वाद देखील प्राप्त होतील.
अशा प्रकारची ईश्वरी उदारता दाखवण्याकरता रोमच्या ख्रिश्चनांना उत्तेजन देतेवेळी पौलाने असे लिहिले: “दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे.” (रोमकर १२:८) आणि हिब्रू ख्रिश्चनांना त्याने लिहिले: “चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (इब्री लोकांस १३:१६) मासेदोनियातील मंडळ्यांनी उदारता दाखविण्यात उल्लेखणीय उदाहरण मांडले. ‘शक्तीपलीकडे’ असताना अर्थात कमालीच्या दारिद्र्यात आनंदाने दान दिल्यामुळे “त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.”—२ करिंथकर ८:१-४.
सर्व लोकांप्रती उदारता?
तथापि, असे काही लोक आहेत जे उदारता आणि औदार्य दाखविण्याच्या पात्र नसतील. कृतघ्न, सुस्त आणि आळशी लोकांना बायबलमध्ये निंद्य म्हणण्यात आले आहे. उदाहरणार्थ, आळशी मनुष्याने हिवाळ्यात नांगरले नाही, तर हंगामाच्या वेळी त्याने भीक जरी मागितली तरी तो काही मिळवण्याच्या पात्र राहत नाही; जो काम करण्यास तयार होत नाही तो दुसऱ्याच्या उदारतेस पात्र नाही. (नीतिसूत्रे २०:४; २ थेस्सलनीकाकर ३:१०) विधवा उदारता प्राप्त करण्यास पात्र ठरत नाहीत तोपर्यंत त्यांची नावे यादीत लिहिण्यात येत नसत. (१ तीमथ्य ५:९, १०) गलती, मासेदोनिया आणि अखयामधील मंडळ्यांद्वारे देणग्या दिल्या जात; त्या देणग्या सामान्यतः गरज असलेल्या मूर्तिपूजक उपासकांसाठी नव्हत्या, तर गरज असलेल्या “पवित्र जनांसाठी” त्या देणग्या होत्या.—१ करिंथकर १६:१; २ करिंथकर ९:१, २.
उदारतेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादांचा आनंद लुटा
आज खरे ख्रिस्ती, उदारतेने आणि औदार्याने देणाऱ्या यहोवाच्या सर्वोत्तम उदाहरणाचे अनुकरण करतात. गरज असलेल्यांना कोणत्याही प्रकारचा कंजूषपणा न करता आपली भौतिक संपत्ती देतात. यहोवाच्या राज्याच्या गोष्टींना पुढे नेणाऱ्या प्रकल्पांमध्ये ते मोठ्या औदार्याने भाग घेतात. आणि ते पूर्ण मनाने आध्यात्मिक सत्ये ‘सर्व माणसांना’ सांगतात.—१ तीमथ्य २:४.
यास्तव, गरजवंतांना आशीर्वाद मिळण्याकरता ते जेव्हा आपला भाग पूर्ण करतात तेव्हा त्याच्या मोबदल्यात त्यांना स्वतःला आशीर्वाद प्राप्त होण्याचे फार मोठे प्रतिफळ प्राप्त होते.