वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१ पृ. २९-३१
  • ही प्रशंसा आहे की तोंडपूजा?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ही प्रशंसा आहे की तोंडपूजा?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रशंसा आणि तोंडपूजा यांची व्याख्या
  • शास्त्रवचनीय दृष्टिकोन
  • तोंडपूजा—एक पाश
  • तोंडपूजेविरुद्ध संरक्षण
  • उचित प्रसंगी प्रशंसा
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाचा जयजयकार करा!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मुलांची योग्य प्रशंसा कशी कराल?
    सावध राहा!—२०१६
  • बालकांनो, यहोवाची स्तुती करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१ पृ. २९-३१

ही प्रशंसा आहे की तोंडपूजा?

तुम्हाला कोणीतरी म्हणते, “तुझी नवी हेअरस्टाईल काय छान आहे!” ही प्रशंसा आहे की तोंडपूजा? “हा सूट तुला किती शोभून दिसतो!” प्रशंसा की तोंडपूजा? “मी आजपर्यंत इतकं चविष्ट जेवण खाल्लंच नव्हतं!” प्रशंसा की तोंडपूजा? आपली जेव्हा अशाप्रकारे कोणी प्रशंसा करतो तेव्हा, ते प्रामाणिकपणे, मनापासून करत आहेत की उगाच आपले आपल्याला खूष करण्याकरता करत आहेत असा आपल्याला कधी कधी प्रश्‍न पडतो.

एखादी व्यक्‍ती आपली प्रशंसा करत आहे की तोंडपूजा करत आहे हे आपण कसे जाणू शकतो बरे? ते महत्त्वाचे आहे का? जे म्हटले जाते ते नुसते ऐकून त्यातून मिळणाऱ्‍या आनंदात आपण रमून जाऊ शकत नाही का? आपण इतरांची प्रशंसा करतो तेव्हा? आपण कधी आपल्या उद्दिष्टांचे परीक्षण केले का? या प्रश्‍नांचा विचार केल्याने आपण समजूतदार होऊ आणि यहोवा देवाची स्तुती होईल अशाच प्रकारे आपल्या जिभेचा वापर करू.

प्रशंसा आणि तोंडपूजा यांची व्याख्या

प्रशंसेची व्याख्या, पसंतीचा किंवा स्तुतीचा आविर्भाव अशी केली जाते आणि हा शब्द उपासना देण्याला किंवा गौरव करण्यालाही सूचित होऊ शकतो. स्पष्टपणे, नंतरचे दोन्ही अर्थ यहोवा देवाला उद्देशून केलेल्या स्तुतीलाच लागू होतात. हा खऱ्‍या उपासनेचा आंतरिक भाग आहे; जसे ईश्‍वरप्रेरित स्तोत्रकर्त्याने आर्जवले: “स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे, . . . शुभच आहे.” “प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो.”—स्तोत्र १४७:१; १५०:६.

परंतु, मग मानवांचे गौरव करता येत नाही असा याचा अर्थ होत नाही. प्रशंसा, पसंती किंवा अनुकूल मत कळवताना ते करता येते. येशूने दिलेल्या दृष्टान्तात एक धनी आपल्या सेवकाला म्हणतो: “शाबास, भल्या व विश्‍वासू दासा!”—मत्तय २५:२१.

दुसरीकडे पाहता तोंडपूजेची व्याख्या, बहुधा स्वार्थी हेतू बाळगून केलेली खोटी किंवा फाजील स्तुती अशी करण्यात आली आहे. मर्जी संपादण्याकरता किंवा दुसऱ्‍याकडून भौतिक लाभ मिळण्याकरता किंवा तोंडपूजा करणाऱ्‍याप्रती कर्तव्याची भावना निर्माण करण्याकरता कावेबाज प्रशंसा किंवा हांजी हांजी केली जाते. म्हणजे तोंडपूजक स्वार्थापोटी तोंडपूजा करीत असतात. यहुदा १६ प्रमाणे, “लाभांसाठी ते तोंडपूजेपणा करितात.”

शास्त्रवचनीय दृष्टिकोन

सहमानवांची प्रशंसा करण्याबाबत शास्त्रवचनीय दृष्टिकोन काय आहे? याबाबतीत यहोवाने आपल्या सर्वांसाठी एक कित्ता घालून दिला आहे. आपण जर यहोवाची इच्छा पूर्ण केली तर आपली प्रशंसा केली जाईल असे आपल्याला बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. प्रेषित पौल म्हणतो: “प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.” आपल्या विश्‍वासाचा पारखलेला गुण ‘प्रशंसेस कारणीभूत व्हावे’ असे पेत्र आपल्याला सांगतो. तेव्हा, यहोवा मानवांची प्रशंसा करील ही वस्तुस्थितीच दाखवून देते, की प्रामाणिकपणे प्रशंसा करणे दयाळू, प्रेमळ आणि लाभदायक कृत्य आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.—१ करिंथकर ४:५; १ पेत्र १:७.

बायबलनुसार आणखी एका स्रोताकडून आपली प्रशंसा होऊ शकते व तो स्रोत, आपले चांगले वर्तन आणि प्रामाणिकपणा पाहून आपली प्रशंसा करणारे सरकारी अधिकारी होत. “चांगले ते कर म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल” असे आपल्याला सांगण्यात आले आहे. (रोमकर १३:३) मनापासून बोलणाऱ्‍या आणि कोणताही अंतःस्थ हेतू नसलेल्या लोकांकडूनही आपली प्रशंसा होऊ शकते. नीतिसूत्रे २७:२ मध्ये ईश्‍वरप्रेरित शास्त्रवचने म्हणतात: “आपल्या तोंडाने नव्हे तर परक्यांनी तुझी प्रशंसा करावी.” यावरून, मानवांकडून प्रशंसा स्वीकारणे उचित आहे हेच सूचित होते.

परंतु, तोंडपूजा करण्याबाबत किंवा तोंडपूजा करवून घेण्याबाबत हे खरे नाही. यहोवाला तोंडपूजेचा इतका द्वेष का? एक कारण म्हणजे ती कपटी असते आणि कपटाचा यहोवा धिक्कार करतो. (पडताळा नीतिसूत्रे २३:६, ७.) याशिवाय ती प्रामाणिक नसते. देव ज्यांना ठामपणे नापसंत करतो अशांबद्दल बोलताना स्तोत्रकर्ता म्हणतो: “ते एकमेकांशी असत्य भाषण करितात, ते दुजाभाव ठेवून खुशामतीचे शब्द बोलतात, खुशामत करणारे सर्व ओठ, . . . परमेश्‍वर कापून टाको.”—स्तोत्र १२:२, ३.

इतकेच नव्हे तर तोंडपूजा प्रेमळपणा नव्हे. ती स्वार्थापोटी केली जाते. तोंडपूजकांविषयी बोलून झाल्यावर स्तोत्रकर्ता दावीद, “आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण?” या त्यांच्या बोलण्याचा उल्लेख करतो. अशा स्वार्थी लोकांचे वर्णन ‘दीनांवर जुलूम करणारे,’ असे यहोवा करतो. तोंडपूजा करणारे त्यांच्या जिभांचा, दुसऱ्‍यांची उभारणी करण्याकरता नव्हे तर त्यांच्यावर जुलूम करण्याकरता, त्यांना पीडा देण्याकरता उपयोग करतात.—स्तोत्र १२:४, ५.

तोंडपूजा—एक पाश

“जो आपल्या शेजाऱ्‍याची खुशामत [तोंडपूजा] करितो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरितो.” असे सुज्ञ राजा शलमोनाने लिहिले, आणि हे किती खरे आहे! (नीतिसूत्रे २९:५) परुशांनी येशूची तोंडपूजा करून त्याला पाशात अडकवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले: “गुरुजी, आम्हास ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्‍वराचा मार्ग खरेपणाने शिकविता व कोणाची भीड धरीत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही.” किती मवाळपणा वाटत होता तो! पण येशू मात्र त्यांच्या या गोड भासणाऱ्‍या बोलण्याला भाळला नाही. त्याला माहीत होते की ते त्याच्या खऱ्‍या शिकवणुकी मानतबिनत नव्हते तर कैसराला कर देण्याविषयी त्याला त्याच्या बोलण्यात पकडण्याचा प्रयत्न करीत होते.—मत्तय २२:१५-२२.

येशूच्या अगदी उलट पहिल्या शतकातील हेरोद राजा होता. कैसरिया गावात त्याने भाषण दिले तेव्हा लोकांनी त्याची पुढीलप्रमाणे प्रशंसा केली: “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” अशा दिखाऊ, खोट्या प्रशंसेबद्दल लोकांना खडसावण्याऐवजी हेरोदने स्वतःची तोंडपूजा करवून घेतली. यहोवाच्या देवदूताने तत्क्षणी त्याला शिक्षा दिली, किडे पडून त्याचा मृत्यू झाला.—प्रेषितांची कृत्ये १२:२१-२३.

एक प्रौढ ख्रिस्ती, तोंडपूजेविषयी जागृत राहील. मंडळीच्या वडिलांनी खासकरून, न्यायिक प्रकरणात गोवलेला एखादा खूपच पुढेपुढे करत असेल, इतके की, तो ज्या वडिलांबरोबर बोलत आहे ते वडील दुसऱ्‍या वडिलांपेक्षा किती दयाळू आणि सहानुभूती दाखवणारे आहेत असे म्हणून त्यांच्या पुढेपुढे करतो तेव्हा त्यांनी दक्ष असणे आवश्‍यक आहे.

तोंडपूजेमुळे निर्माण होणारा आणखी एक पाश बायबल स्पष्टपणे दाखवून देते; फितवणाऱ्‍या स्त्रीकडून एक तरुण अनैतिकतेत कसा गुरफटतो त्याचे वर्णन ते देते. (नीतिसूत्रे ७:५, २१) हा इशारा आजच्या परिस्थितीनुरूप आहे. प्रत्येक वर्षी ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत होणाऱ्‍यांपैकी अनेकांना अनैतिक वर्तनामुळे काढण्यात येते. एखाद्याचे अघोरी पापात पडण्याचे कारण तोंडपूजेनेच तर सुरू झाले नसावे ना? मानव स्तुतिप्रिय असल्यामुळे तोंडपूजा करणाऱ्‍या लोकांच्या गोड बोलण्यामुळे एखाद्या ख्रिश्‍चनाची प्रतिकार शक्‍ती कमी होऊन तो अनुचित वर्तनात पडू शकतो. अशा वेळी सावधगिरी न बाळगल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

तोंडपूजेविरुद्ध संरक्षण

तोंडपूजेमुळे, ज्याची तोंडपूजा केली जाते त्याचा अहंभाव तृप्त होतो. त्यामुळे एखादा गर्वाने फुगू लागतो, कोणत्या न कोणत्याप्रकारे तो इतरांपेक्षा वरचढ आहे असे त्याला वाटू लागते. तत्त्ववेत्ता फ्रांस्वा द ला रॉशफूको यांनी तोंडपूजेची तुलना नकली पैशाबरोबर केली, “जिचे केवळ अहंभावामुळे चलन होते.” यास्तव, स्वतःचे संरक्षण करण्याचा एक मार्ग म्हणजे, प्रेषित पौलाचा व्यावहारिक सल्ला अनुसरणे: “मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्‍वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.”—रोमकर १२:३.

आपल्याला सुखावह वाटणाऱ्‍या गोष्टी ऐकण्याची आपली स्वाभाविक प्रवृत्ती असली तरी, बहुतेक वेळा आपल्याला बायबल आधारित सल्ला आणि शिस्त यांचीच खरी गरज असते. (नीतिसूत्रे १६:२५) राजा अहाबाला त्याला आवडणाऱ्‍या गोष्टी ऐकायच्या होत्या; त्याच्या सेवकांनी तर संदेष्टा मीखाया याला “त्यांच्याप्रमाणेच [अहाबाच्या तोंडपूजा करणाऱ्‍या संदेष्ट्यांप्रमाणे] शुभसंदेश कथन” करण्यास सांगितले. (१ राजे २२:१३) अहाबाने प्रामाणिकपणे ऐकून घेण्याची इच्छा दाखवली असती आणि आपला बंडखोर मार्ग बदलला असता तर युद्धामुळे इस्राएलची झालेली प्रचंड हानी आणि त्याचा स्वतःचा मृत्यू टळला असता. आपल्याच आध्यात्मिक कल्याणासाठी आपण, नियुक्‍त ख्रिस्ती वडिलांच्या कडक परंतु प्रेमळ सल्ल्याला प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे; आपण किती चांगले आहोत, आपल्या कानांची खाज जिरवण्यासाठी तोंडपूजक गोष्टी बोलणारे लोक शोधण्याऐवजी आपण सत्याच्या सरळ मार्गावर राहावे म्हणून ते आपली मदत करू इच्छितात!—पडताळा २ तीमथ्य ४:३.

ख्रिश्‍चनांना चुकूनही तोंडपूजेचा अवलंब करण्याची इच्छा होणार नाही. विश्‍वासू एलीहूप्रमाणे ते निश्‍चयी होऊन प्रार्थना करतात: “मी कोणाचा पक्ष धरणार नाही, कोणाची खुशामत [तोंडपूजेपणा] करणार नाही. खुशामत [तोंडपूजा] करण्याचे मला ठाऊक नाही, असेल तर माझा उत्पन्‍नकर्ता मला तत्काळ घेऊन जाईल.” मग पौलाप्रमाणे ते म्हणू शकतील: “आम्ही आर्जवाचे भाषण कधी करीत नव्हतो, . . . तसेच लोभाने कपटवेष धारण करीत नव्हतो.”—ईयोब ३२:२१, २२; १ थेस्सलनीकाकर २:५, ६.

उचित प्रसंगी प्रशंसा

ईश्‍वरप्रेरित नीतिसूत्र, “रुप्यासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय” असे म्हणून प्रशंसा ही कसोटीसमान ठरू शकते हे दाखवून देते. (नीतिसूत्रे २७:२१) होय, प्रशंसेमुळे एखादा त्याच्या मनात श्रेष्ठत्वाची किंवा गर्वाची भावना वागवू शकतो आणि शेवटी त्याचे अधःपतन होऊ शकते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, त्याने एखादे स्तवनीय कृत्य केले असल्यास तो सर्व श्रेय यहोवाला देऊ इच्छितो असे जर त्याने कबूल केले तर त्यावरून त्याची विनयशीलता आणि नम्रता प्रकट होऊ शकते.

योग्य वर्तनाबद्दल किंवा साध्यतांबद्दल केलेली मनापासूनची प्रशंसा, प्रशंसा करणाऱ्‍याची आणि प्रशंसा घेणाऱ्‍याची उभारणी करते. ते एकमेकांबद्दल हार्दिक आणि हितकारक गुणग्राहकता बाळगू लागतील. स्तुतीयोग्य ध्येय गाठण्याकरता झटण्यास उत्तेजन मिळते. तरुणांची योग्य प्रशंसा केल्यास त्यांना आणखी प्रयत्न करावेसे वाटतील. त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या दर्जांनुरूप जीवन व्यतीत करण्याचे ध्येय ते गाठत असताना त्यांचे चारित्र्य घडवण्यास यामुळे मदत मिळू शकते.

तेव्हा, तोंडपूजा करण्याचे किंवा तोंडपूजा करवून घेण्याचे आपण टाळू या. प्रशंसा स्वीकारताना आपण नम्र असू या. आपल्या उपासनेत यहोवाची नियमित स्तुती करून व “आपल्या तोंडच्या समर्पक उत्तराने आनंद” मिळतो हे ध्यानात ठेवून हितकारक तारीफ तसेच गुणग्राहकतेच्या रूपाने इतरांची प्रामाणिकपणे प्रशंसा करून आपण उदार व पूर्ण मनाने प्रशंसा करू या.—नीतिसूत्रे १५:२३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा