वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१ पृ. २४-२८
  • “तुझी प्रेमदया जीवनापेक्षा उत्तम आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुझी प्रेमदया जीवनापेक्षा उत्तम आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सेवेचे मार्गदर्शन
  • कायमच्या कारकीर्दीची सुरवात
  • सेवेचे विशेष हक्क
  • कॅनडा आणि मग बेल्जियम
  • तीव्र झालेले युद्धोत्तर कार्य
  • परिस्थितीनुरूप जुळवून घेणे
  • तरुणपणापासून यहोवाने शिकवले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • आमच्या आईवडिलांनी आम्हाला देवावर प्रेम करायला शिकवलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • माझ्या पालकांचे अनुकरण करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाने माझ्या निर्णयावर भरभरून आशीर्वाद दिला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१ पृ. २४-२८

“तुझी प्रेमदया जीवनापेक्षा उत्तम आहे”

कॅलवीन एच. होम्स यांच्याद्वारे कथित

सन १९३० मधील तो डिसेंबरचा महिना होता; गायींचे दूध काढून झाले इतक्यात बाबा घरी आले. ते एका शेजाऱ्‍याला भेटायला गेले होते. आपल्या खिश्‍यातून एक लहानसं निळं पुस्तक बाहेर काढत ते म्हणाले, “वायमनने मला हे दिले.” वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेल्या त्या इंग्रजीतील पुस्तकावर डिलिव्हरन्स असे लिहिले होते. कधीही वाचन न करणाऱ्‍या बाबांनी रात्री उशिरापर्यंत बसून ते पुस्तक वाचून काढले.

त्यानंतर, बाबांनी त्याच प्रकाशकांनी छापलेली प्रकाश आणि समेट नावाची आणखी इंग्रजीतील पुस्तके मागवली. त्यांना आईचे एक जुने बायबल सापडले आणि रात्री उशिरापर्यंत रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात त्यांनी ती पुस्तके वाचून काढली. बाबांमध्ये खूप बदल झाले. त्या हिवाळ्यात, आम्ही सर्व आमच्या जुन्या लाकूड जाळायच्या शेगडीभोवती बसून होतो तेव्हा ते, आई, माझ्या तीन बहिणी आणि माझ्याबरोबर खूप वेळपर्यंत बोलले.

ही पुस्तकं छापणाऱ्‍या लोकांना बायबल विद्यार्थी म्हणतात आणि त्यांच्या मते, आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत असे बाबा म्हणाले. (२ तीमथ्य ३:१-५) ते म्हणाले, की ह्‍या जगाचा अंत होईल तेव्हा पृथ्वीचा नाश होणार नाही तर देवाच्या राज्याखाली तिचे परादीसमध्ये रूपांतर होईल. (२ पेत्र ३:५-७, १३; प्रकटीकरण २१:३, ४) हे मला खूपच आवडले.

मी आणि बाबा एकत्र काम करताना ते माझ्याशी नेहमी हे विषय बोलायचे. मला आठवतं एकदा आम्ही मक्याची कणसं सोलत होतो तेव्हा त्यांनी मला देवाचं नाव यहोवा असल्याचं सांगितलं. (स्तोत्र ८३:१८) म्हणून, सन १९३१ च्या वसंत ऋतुत, जेव्हा मी फक्‍त १४ वर्षांचा होतो तेव्हा यहोवा आणि त्याच्या राज्याची बाजू घेण्याचे ठरवले. आमच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या सफरचंदाच्या बागेत मी यहोवाला प्रार्थना केली आणि मी त्याची अनंतकाळपर्यंत सेवा करीन असे त्याला वचन दिले. आपल्या विस्मयजनक देवाच्या कृपेमुळे आधीच माझे अंतःकरण स्पर्शून गेले होते.—स्तोत्र ६३:३.

अमेरिकेच्या संयुक्‍त संस्थानांतील मिसूरी येथील सेंट जोझफ पासून ३० किलोमीटर आणि कान्सास सिटीपासून ६५ पेक्षा कमी किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात आम्ही राहत होतो. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात माझ्या पणजोबांनी शेतावरच बनवलेल्या एका लहानशा लाकडी घरात माझ्या बाबांचा जन्म झाला होता.

सेवेचे मार्गदर्शन

सन १९३१ च्या उन्हाळ्यात आमच्या कुटुंबातील सर्वांनी, ओहायोतील कोलंबस येथे भरलेल्या एका अधिवेशनात वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष जोझफ रदरफोर्ड यांनी, “राज्य, जगाची आशा” ह्‍या नावाचे दिलेले भाषण रेडिओवर ऐकले. माझे अंतःकरण उत्तेजित झाले, या भाषणाची छापील पुस्तिका आमच्या ओळखीच्या लोकांना जाऊन देण्याकरता मलाही बाबांबरोबर जायला आवडले.

सन १९३२ च्या वसंत ऋतुत मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला पहिल्यांदा उपस्थित राहिलो. आमच्या शेजाऱ्‍यांनी मला आणि बाबांना सेंट जोझफला यहोवाच्या साक्षीदारांचे प्रवासी पर्यवेक्षक जॉर्ज ड्रेपर यांचे भाषण ऐकण्यासाठी बोलावले. आम्ही तिथे पोहंचलो तेव्हा सभा अर्ध्यावर आली होती; अंगाने दणकट आणि रुंद पाठ असलेल्या व भविष्यात माझ्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे जे. डी. ड्रायर यांच्या मागे मला बसायला जागा मिळाली.

सप्टेंबर १९३३ मध्ये मी बाबांबरोबर कान्सास सिटीमध्ये भरलेल्या संमेलनाला गेलो; तेथे मी पहिल्यांदाच जाहीर प्रचार कार्यात भाग घेतला. बाबांनी मला तीन पुस्तिका दिल्या आणि मला असे म्हणायला सांगितले: “मी एक यहोवाचा साक्षीदार आहे व देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत आहे. तुम्ही जज रदरफोर्ड यांचे भाषण रेडिओवर नक्कीच ऐकले असेल. त्यांची भाषणे दर आठवडी ३०० पेक्षा अधिक केंद्रांवरून प्रसारित केली जातात.” आणि मग मी पुस्तिका देत असे. त्या संध्याकाळी शेतावर, गायींचे दूध काढता काढता मी विचार करू लागलो, की आजचा दिवस माझ्या जीवनातील सर्वात संस्मरणीय दिवस आहे.

काही दिवसातच हिवाळा आला आणि थंडीमुळे आम्ही जास्त प्रवास करू शकत नव्हतो. पण मग, बंधू ड्रायर आणि त्यांची पत्नी आमच्या घरी आले आणि त्यांनी मला शनिवारी संध्याकाळी येऊन रात्री त्यांच्याच घरी राहायला आवडेल का असे विचारले. त्यांच्या घरी जाण्यासाठी मला दहा किलोमीटर चालावे लागले, पण माझी ही पायपीट वाया गेली नाही कारण मी दुसऱ्‍या दिवशी त्यांच्याबरोबर सेवेला आणि सेंट जोझफ येथे टेहळणी बुरूज अभ्यासासाठी जाऊ शकलो. तेव्हापासून आजपर्यंत मी क्वचितच रविवारची सेवा चुकवली. बंधू ड्रायर यांचे मार्गदर्शन आणि सल्ला अतुलनीय ठरला.

कान्सास सिटीमध्ये भरलेल्या संमेलनात सप्टेंबर २, १९३५ रोजी पाण्याने बाप्तिस्मा घेऊन मी यहोवाला माझे जीवन समर्पित केले.

कायमच्या कारकीर्दीची सुरवात

सन १९३६ च्या सुरवातीला मी, पायनियर किंवा पूर्ण वेळेचा सेवक होण्याकरता अर्ज भरला आणि माझं नाव पायनियर सोबत्याच्या शोधात असलेल्यांच्या यादीत जोडण्यात आलं. काही दिवसातच मला व्ह्योमिंगच्या आरवाडा येथील एडवर्ड स्टेड यांच्याकडून एक पत्र आले. त्यांनी पत्रात म्हटले होते, की ते एका व्हीलचेअरला बंदिस्त होते आणि पायनियरींग करण्याकरता त्यांना मदत हवी होती. मी त्यांची ऑफर एका पायावर स्वीकारली आणि एप्रिल १८, १९३६ रोजी मला पायनियर म्हणून नेमण्यात आले.

बंधू स्टेड यांच्याकडे जाण्याआधी आईने मला खाजगीत विचारले, “लेका, तुला नक्की हेच करायचं आहे का?”

मी तिला म्हणालो: “होय, नाहीतर जीवनात काही अर्थच उरणार नाही.” यहोवाची कृपा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची आहे हे मला आतापर्यंत कळून चुकलं होतं.

बंधू स्टेड यांना आम्ही टेड म्हणत असू; तर त्यांच्याबरोबर पायनियरींग केल्यामुळे मला उत्तम मार्गदर्शन मिळाले. त्यांच्यात अतिशय आवेश होता व राज्य संदेश सादर करण्याची आकर्षक कला होती. टेड यांचे सर्व सांधे संधिवातामुळे आकडल्यामुळे ते फक्‍त लिहू व बोलू शकत होते. मी सकाळी लवकर उठून त्यांची दाढी करून त्यांना आंघोळ घालीत असे आणि त्यांच्यासाठी नाश्‍ता तयार करून त्यांना भरवत असे. मग सेवेत जाण्याकरता त्यांना तयार करीत असे. त्या उन्हाळ्यात आम्ही व्ह्योमिंग आणि मॉन्टाना येथे पायनियरींग केली; रात्रीच्या वेळी आम्ही बाहेरच झोपायचो. टेड त्यांच्या ट्रकमधील खास कॅबिनमध्ये झोपत आणि मी खाली जमिनीवर झोपत असे. नंतर, त्या वर्षी मी दक्षिणेकडे टेनेसी, अर्कान्सास आणि मिसीसिपी येथे पायनियरींग करण्याकरता गेलो.

सन १९३७ च्या सप्टेंबरमध्ये, ओहायोमधील कोलंबस येथे भरलेल्या अधिवेशनाला मी उपस्थित राहिलो; इतक्या मोठ्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. ग्रामोफोनच्या माध्यमाद्वारे प्रचार कार्य करण्याच्या व्यवस्था करण्यात आल्या होत्या. घरमालक जेव्हा जेव्हा ग्रामोफोन ऐकत त्या प्रत्येक प्रसंगाला आम्ही एक सेटअप म्हणजे, ग्रामोफोन लावणे असा रिपोर्ट घालत असू. एका महिन्यात तर मी ५०० सेटअप्सचा रिपोर्ट दिला; ८०० पेक्षा अधिक लोकांनी संदेश ऐकला होता. पूर्वेकडील टेनेसी, व्हर्जिनिया आणि पश्‍चिम व्हर्जिनिया यांच्या अनेक शहरांत साक्ष दिल्यानंतर मला एक नवीन पदवीवर खास पायनियर म्हणून कार्य करण्याचे आमंत्रण मिळाले; पूर्वी प्रवासी पर्यवेक्षकांना परिमंडल सेवक म्हटले जायचे, तर त्यांच्याबरोबर काम करण्याचे आमंत्रण मिळाले.

मी पश्‍चिम व्हर्जिनियातील मंडळ्या आणि एकाकी गटांना भेटी देत असे; प्रत्येकाबरोबर दोन ते चार आठवडे राहत असे आणि क्षेत्र सेवेत पुढाकार घेत असे. मग, १९४१ च्या जानेवारीत माझी परिमंडल सेवक म्हणून नेमणूक झाली. यावेळेपर्यंत आई आणि माझ्या तीन बहिणी क्लॅरा, लोईस आणि रूथ यांनी राज्याची बाजू घेतली होती. म्हणून, त्या उन्हाळ्यात आम्ही सर्वजण सेंट लुई येथील मोठ्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो.

अधिवेशनानंतर काही दिवसांतच, १९४१ च्या नोव्हेंबरपर्यंत सर्व परिमंडल कार्य समाप्त करण्यात येईल असे सर्व परिमंडल सेवकांना कळवण्यात आले. पुढील महिन्यातच संयुक्‍त संस्थाने दुसऱ्‍या महायुद्धात सामील झाले. मला खास पायनियर सेवेसाठी नेमण्यात आले, तेव्हा सेवेत १७५ तास भरावे लागत असत.

सेवेचे विशेष हक्क

सन १९४२ च्या जुलै महिन्यात मला एक पत्र मिळाले; त्यात परदेशात जाऊन सेवा करण्यास मला आवडेल का असे विचारले होते. मी माझा होकार कळवल्यानंतर मला न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात म्हणजे बेथेलला येण्याचे आमंत्रण मिळाले. त्याचवेळी आणखी २० अविवाहित बांधवांना खास प्रशिक्षणाकरता बोलवण्यात आले होते.

वॉच टावर संस्थेचे तेव्हाचे अध्यक्ष नेथन एच. नॉर यांनी सांगितले, की प्रचाराचे कार्य मंद झाले होते व मंडळ्यांना आध्यात्मिकरीत्या मजबूत करण्याकरता आम्हाला प्रशिक्षण दिले जाणार होते. ते म्हणाले: “मंडळ्यांमधील नुसत्या समस्या आम्हाला जाणून घ्यायच्या नाहीत तर प्रवासी प्रतिनिधी या नात्याने तुम्ही काय केले ते जाणून घ्यायचे आहे.”

बंधू नॉर यांच्यानंतर १९७७ मध्ये अध्यक्ष बनलेले फ्रेड फ्रान्झ यांनी आम्ही बेथेलमध्ये असताना एक भाषण दिले ज्यात त्यांनी असे म्हटले: “दुसरे महायुद्ध संपेल आणि प्रचाराच्या मोठ्या कार्याची सुरवात होईल. आणि कोट्यवधी लोक यहोवाच्या संघटनेत येतील यात काहीच शंका नाही!” त्या भाषणामुळे माझा संपूर्ण दृष्टिकोनच बदलला. नेमणूका दिल्यानंतर, मला टेनेसी आणि केनटक्कीच्या राज्यातील सर्व मंडळ्यांना भेटी द्यायच्या आहेत असे मला समजले. तेव्हा आम्हाला बांधवांचे सेवक असे संबोधले जाई; आता त्यास विभागीय पर्यवेक्षक म्हणून ओळखले जाते.

मी अवघ्या २५ वर्षांचा होतो तेव्हा म्हणजे, ऑक्टोबर १, १९४२ रोजी मंडळ्यांची सेवा करू लागलो. त्यावेळी मंडळ्यांपर्यंत केवळ दोनच मार्गांनी पोहंचता येऊ शकत होते, एकतर पायी नाहीतर घोड्यावरून. कधीकधी, ज्या कुटुंबाने मला त्यांच्या घरी राहावयास बोलावलेले असायचे त्यांच्याच खोलीत मला रात्र काढावी लागत असे.

सन १९४३ च्या जुलै महिन्यात टेनेसीमधील ग्रिनविली मंडळीला भेट देत असताना मला वॉच टावर बायबल गिलियड प्रशालेच्या दुसऱ्‍या वर्गासाठी निमंत्रण मिळाले. तेथे मी, ‘ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे’ आणि “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करण्याचा नेमका काय अर्थ होतो ते शिकलो. (इब्री लोकांस २:१; १ करिंथकर १५:५८) प्रशालेचे पाच महिने आले तसे भराभर निघून गेले आणि १९४४ चा जानेवारी ३१, हा पदवीदानाचा दिवस उजडला.

कॅनडा आणि मग बेल्जियम

आमच्यातील बहुतेकांना कॅनडात नेमण्यात आले, तेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावरील बंदी अलीकडेच उठवण्यात आली होती. मला प्रवासी कार्यासाठी नेमण्यात आले, यामुळे एका मंडळीतून दुसऱ्‍या मंडळीला जाण्याकरता मला पुष्कळ प्रवास करावा लागणार होता. पण या दरम्यान, कॅनडात बंदी असतानाही आपले प्रचाराचे कार्य कसे चालूच होते त्याबद्दलचे अनेक अनुभव ऐकून मला आनंद वाटला. (प्रेषितांची कृत्ये ५:२९) अनेकांनी मला वीजवेगी मोहीमेविषयी सांगितले जेव्हा कॅनडाच्या एका टोकापासून दुसऱ्‍या टोकापर्यंत एका रात्रीत अक्षरशः प्रत्येक घरात एक पुस्तिका वाटण्यात आली होती. सन १९४५ च्या मेमध्ये युरोपमधील युद्ध संपुष्टात आल्याची चांगली बातमी ऐकून आम्हाला केवढा आनंद झाला होता!

त्या उन्हाळ्यात, सॅस्कॅचेवानमधील ओसेजच्या एका लहानशा गावातील मंडळीत सेवा करत असताना मला बंधू नॉर यांच्याकडून एक पत्र मिळाले, त्यात म्हटले होते: “मी आपल्याला बेल्जियमला जाण्याचा सुहक्क देत आहे. . . . त्या देशात पुष्कळ कार्य करणे बाकी आहे. तो युद्ध-ग्रस्त देश आहे आणि आपल्या बंधूसमाजाला मदत हवी आहे, म्हणून, त्यांना हवे असलेले उचित साहाय्य आणि सांत्वन देण्याकरता अमेरिकेहून कोणाला तरी पाठवणे इष्ट आहे.” मी लागलीच ती नेमणूक स्वीकारून माझा होकार कळवला.

सन १९४५ च्या नोव्हेंबरमध्ये मी ब्रुकलीन बेथेलमध्ये एक वयोवृद्ध अलसेशियन बंधूकडून, चार्ल्स इकर यांच्याकडून फ्रेंच शिकत होतो. शाखा कामकाजाविषयीसुद्धा मला जलद प्रशिक्षण मिळाले. युरोपला जाण्यापूर्वी मी मिसूरी, सेंट जोझफ येथे राहणाऱ्‍या माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना धावती भेट देऊन आलो.

डिसेंबर ११ रोजी मी क्वीन एलिझाबेथ नावाच्या जहाजाने न्यूयॉर्कहून निघालो आणि चार दिवसांनंतर इंग्लंडमधील साऊथॅम्पटन येथे पोहंचलो. ब्रिटन शाखेत एक महिनाभर राहिलो, तेथेही मला आणखी मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर, सन १९४६ च्या जानेवारी १५ रोजी मी इंग्लिश खाडी पार करून बेल्जियमच्या ऑसटेन्ड बंदरावर उतरलो. तेथून मग मी ब्रुसेल्सला ट्रेनने गेलो; मला भेटायला संपूर्ण बेथेल परिवार रेल्वे स्टेशनवर आला होता.

तीव्र झालेले युद्धोत्तर कार्य

माझं काम, बेल्जियममधील राज्य कार्यावर देखरेख करण्याचं होतं; पण मला तेथील भाषा धड बोलता येत नव्हती. सहा महिन्यात मी काम भागवण्यापुरती फ्रेंच बोलू लागलो होतो. नात्सींच्या पाच वर्षांच्या शासनादरम्यानच्या काळात प्रचार चालू ठेवण्याकरता आपले जीवन धोक्यात घातलेल्यांबरोबर काम करण्याचे सुख मला लाभले. त्यांतील काहींची तर अलीकडेच छळछावण्यांतून सुटका झाली होती.

कार्य सुसंघटित करण्यास व बायबलच्या सत्याविषयी क्षुधित असलेल्यांना मदत करण्याची बांधवांची उत्कट इच्छा होती. म्हणून, संमेलने भरवण्याकरता व मंडळ्यांना भेटी देण्याकरता प्रवासी पर्यवेक्षकांची व्यवस्था करण्यात आली. नेथन नॉर, मिल्टन हेन्शल, फ्रेड फ्रान्झ, ग्रान्ट सूटर आणि जॉन बूथ—हे सर्व ब्रुकलिन मुख्यालयाचे प्रतिनिधी, यांनी आम्हाला उत्तेजनकारक भेटी दिल्या. त्या दिवसांत मी विभागीय पर्यवेक्षक, प्रांतीय पर्यवेक्षक आणि शाखा पर्यवेक्षक या नात्याने कार्य केले. बेल्जियममध्ये जवळजवळ सात वर्ष सेवा केल्यानंतर, सन १९५२ च्या डिसेंबर ६ रोजी मी ईमिलिया वॉनोप्स्लाख, हिच्याबरोबर विवाह केला; तीही बेल्जियम शाखेत काम करीत होती.

काही महिन्यांनंतर, एप्रिल ११, १९५३ रोजी मला स्थानीय पोलिस स्टेशनात हजर राहण्याचे फर्मावण्यात आले व बेल्जियमच्या सुरक्षेला माझ्यामुळे धोका होता असे मला सांगण्यात आले. माझ्या केसची अपील राज्यसभेत होईपर्यंत मी लक्झेम्बर्ग येथे राहावयास गेलो.

फेब्रुवारी १९५४ मध्ये बेल्जियम राज्यसभेने हा हुकूमनामा दिला, की माझी उपस्थिती देशासाठी धोक्याची आहे. यासाठी पुरावा काय तर, मी बेल्जियममध्ये आल्यापासून तेथील साक्षीदारांच्या संख्येत नाट्यमयरीत्या वाढ झाली होती म्हणजे, १९४६ मध्ये ८०४ पासून १९५३ पर्यंत ३,३०४ इतके साक्षीदार वाढले होते आणि या वाढीमुळे अनेक तरुण साक्षीदार ख्रिस्ती तटस्थता दाखवत असल्यामुळे बेल्जियमच्या सुरक्षिततेला धोका होता. या कारणामुळे ईमिलिया आणि मला स्वीत्झर्लंडला नेमण्यात आले; तेथील फ्रेंच भाषिकांच्या भागात आम्ही आमचे विभागीय कार्य चालू केले.

ख्रिस्ती वडिलांना सुधारित प्रशिक्षण देणाऱ्‍या राज्य सेवा प्रशालेची सन १९५९ मध्ये न्यूयॉर्कच्या साऊथ लॅनसिंग येथे स्थापना झाली. युरोपमध्ये या शाळेच्या वर्गांना शिकवण्याकरता प्रशिक्षणासाठी मला तेथे बोलावण्यात आले. संयुक्‍त संस्थानांत असताना, मी मिसूरीतील सेंट जोझफला जाऊन माझ्या कुटुंबाला भेटून आलो. तेव्हाच मी माझ्या लाडक्या आईला शेवटचे पाहिले. जानेवारी १९६२ मध्ये तिचे निधन झाले तर तिच्याआधी १९५५ च्या जून महिन्यात बाबांचे निधन झाले होते.

फ्रान्सच्या पॅरिस येथील राज्य सेवा प्रशाला मार्च १९६१ मध्ये सुरू झाली आणि ईमिलिया पण माझ्याबरोबर आली. या शाळेला उपस्थित राहण्याकरता फ्रान्स, बेल्जियम आणि स्वीत्झर्लंडहून प्रांतीय पर्यवेक्षक, विभागीय पर्यवेक्षक, मंडळी पर्यवेक्षक आणि खास पायनियर आले होते. पुढील १४ महिन्यांदरम्यान, या चार आठवड्यांच्या कोर्सचे १२ वर्ग मी चालवले. आणि एप्रिल १९६२ मध्ये आम्हाला कळले की ईमिलियाला दिवस गेले होते.

परिस्थितीनुरूप जुळवून घेणे

आम्ही स्वीत्झर्लंडच्या जिनेव्हा येथे परतलो, तेथे राहण्याचा आमच्याकडे कायम परवाना होता. परंतु तेथे घरांची टंचाई असल्यामुळे आम्हाला सहजासहजी घर मिळाले नाही. शिवाय कामही मिळणे कठीण होते. कसेतरी मला जिनेव्हाच्या मध्यभागी असलेल्या एका मोठ्या डिपार्टमेंट स्टोरमध्ये काम मिळाले.

मी पूर्ण वेळेच्या सेवेत २६ वर्ष घालवल्यामुळे आता आम्हाला आमच्या परिस्थितीत पुष्कळ फेरफार करावे लागणार होते. मी २२ वर्ष त्या डिपार्टमेंट स्टोरमध्ये काम केले, त्या दरम्यान आमच्या दोन मुली, लोईस आणि युनिस यांचे संगोपन आम्ही केले आणि आमच्या कुटुंबाने नेहमीच राज्य आस्थेला प्रथम स्थान दिले. (मत्तय ६:३३) सन १९८५ मध्ये मी निवृत्त झाल्यानंतर मी बदली विभागीय पर्यवेक्षक या नात्याने कार्य करू लागलो.

ईमिलियाची तब्येत फारच बिघडत चालली आहे, पण तरीही ती सेवेत होईल तितका प्रयत्न करत असते. लोईसने जवळजवळ दहा वर्षांपर्यंत पायनियरींग केले. १९९३ च्या उन्हाळ्यात मॉस्को येथे भरलेल्या सर्वात उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला तिच्याबरोबर उपस्थित राहण्याचा तो आध्यात्मिक प्रसंग संस्मरणीय होता! त्यानंतर, आफ्रिकेच्या सेनेगलला ती सुटीवर गेली होती आणि महासागरात पोहत असताना लोईस आम्हाला कायमची सोडून गेली. दफनविधीसाठी मी सेनेगलला गेलो तेव्हा तेथील आफ्रिकन बांधवांनी आणि मिशनऱ्‍यांनी दाखवलेली प्रीती आणि दया यामुळे मला पुष्कळ सांत्वन मिळाले. लोईसला पुनरुत्थानात पाहण्याची आमची केवढी उत्कट इच्छा आहे म्हणून सांगू!—योहान ५:२८, २९.

चार दशकांपर्यंत माझ्या प्रिय सोबतीणीने तिचे एकनिष्ठ सहकार्य मला दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. खरेच, माझ्या सर्व दुःखात आणि कष्टातही यहोवाची कृपा आम्हाला सुखावह वाटली व आमचे जीवन सार्थ केले. स्तोत्रकर्त्याच्या शब्दांत मला आपला देव, यहोवा याजविषयी असे बोलावेसे वाटते की: “तुझी प्रेमदया जीवनापेक्षा उत्तम आहे; यामुळे माझे ओठ तुझे स्तवन करतील.”—स्तोत्र ६३:३.

[२६ पानांवरील चित्र]

ग्रामोफोनच्या साहाय्याने आम्ही प्रचार कार्यात आगेकूच केली

[२६ पानांवरील चित्र]

सन १९३६ मध्ये माझे पालक

[२६ पानांवरील चित्र]

सन १९४८ मध्ये बेल्जियम येथे रस्त्यावरील साक्षकार्य करत असताना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा