वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१ पृ. ८-१३
  • यहोवा करारांचा देव आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा करारांचा देव आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अब्राहामासोबत एक करार
  • “जुना करार”
  • नियमशास्त्राच्या कराराद्वारे आशीर्वाद
  • इस्राएलमधील यहुदीय मतानुसारी
  • अब्राहामाच्या संततीस यहोवाचा आशीर्वाद
  • नव्या कराराची गरज
  • नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • करार देवाचा चिरकालिक उद्देश असणारे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • तुम्ही “याजकराज्य” व्हाल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • देवाच्या करारांपासून तुम्ही लाभ प्राप्त करणार का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१ पृ. ८-१३

यहोवा करारांचा देव आहे

“इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन.”—यिर्मया ३१:३१.

१, २. (अ) सा. यु. ३३ निसान १४ च्या रात्री येशूने कोणत्या समारंभाची सुरवात केली? (ब) आपल्या मृत्यूसंबंधी येशूने कोणत्या कराराचा उल्लेख केला?

सा.यु.३३च्या निसान १४ च्या रात्री येशूने आपल्या १२ प्रेषितांसोबत वल्हांडणाचा सण साजरा केला. त्यांच्यासोबतचे आपले हे शेवटले भोजन असणार आणि आपण शत्रूंच्या हाती आता मारले जाणार हे येशूला ठाऊक असल्यामुळे, आपल्या जवळच्या शिष्यांना अनेक महत्त्वाच्या बाबी समजावण्याकरता त्याने या प्रसंगाचा फायदा घेतला.—योहान १३:१-१७:२६.

२ या वेळी, अर्थात यहूदा इस्कर्योताला घालवून दिल्यावर, येशूने आपल्या मृत्यूच्या स्मारकाची सुरवात केली; हा वर्षातील असा एकमेव धार्मिक सण होता जो पाळायची आज्ञा त्याने ख्रिश्‍चनांना दिली होती. अहवाल सांगतो: “मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, ‘घ्या, खा. हे माझे शरीर आहे.’ आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुति करून तो त्यांस दिला व म्हटले, ‘तुम्ही सर्व ह्‍यातून प्या. हे माझे “नव्या कराराचे रक्‍त” आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.’” (मत्तय २६:२६-२८) येशूच्या अनुयायांनी अगदी साध्या, सन्माननीय पद्धतीने त्याच्या मृत्यूचे स्मरण करायचे होते. तसेच, आपल्या मृत्यूच्या संबंधाने येशूने एका कराराचा उल्लेख केला. लूकच्या अहवालातही त्यास “नवा करार” म्हटले आहे.—लूक २२:२०.

३. नव्या कराराविषयी कोणते प्रश्‍न विचारले आहेत?

३ नवा करार काय आहे? जर हा नवा करार आहे तर जुना करारही आहे का? त्याच्याशी इतर करारांचा काही संबंध आहे का? हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत कारण येशू म्हणाला की कराराचे रक्‍त “पापांची क्षमा होण्यासाठी” ओतले जाईल. आपणा सर्वांना अशा क्षमेची अत्यंत गरज आहे.—रोमकर ३:२३.

अब्राहामासोबत एक करार

४. कोणते प्राचीन अभिवचन आपल्याला नव्या कराराचा अर्थ समजण्यास मदत करते?

४ नव्या कराराचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला येशूच्या पार्थिव सेवेच्या काळाआधी जवळजवळ २,००० वर्षे मागे जावे लागेल, जेव्हा तेरह आणि त्याच्या कुटुंबाने—त्याचप्रमाणे अब्राम (नंतर, अब्राहाम) आणि अब्रामाची बायको साराय (नंतर, सारा) यांनी—खास्द्यांचा सुसंपन्‍न प्रदेश ऊर येथून उत्तर मेसोपोटामियातील हारान येथे स्थलांतर केले. तेरहचा मृत्यू होईस्तोवर ते तेथेच राहिले. मग, यहोवाच्या आज्ञेवरून, ७५ वर्षांच्या अब्राहामाने इफ्रात नदी पार केली आणि नैर्‌ऋत्येकडे कनानाच्या देशात गेला आणि छावण्यांमध्ये राहून भटके जीवन जगू लागला. (उत्पत्ति ११:३१-१२:१, ४, ५; प्रेषितांची कृत्ये ७:२-५) ही सा. यु. पू. १९४३ ची गोष्ट होती. अब्राहाम अद्याप हारान येथे असतानाच, यहोवा त्याला म्हणाला होता: “मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्याचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.” नंतर, अब्राहाम कनान देशात पोहंचल्यावर यहोवाने पुढे म्हटले: “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.”—उत्पत्ति १२:२, ३, ७.

५. अब्राहामाला दिलेले यहोवाचे अभिवचन कोणत्या ऐतिहासिक भविष्यवाणीशी संबंधित आहे?

५ अब्राहामाला दिलेले वचन यहोवाच्या आणखी इतर वचनांशी संबंधित होते. अर्थात, यामुळे अब्राहाम ही व्यक्‍ती मानवी इतिहासात महत्त्वपूर्ण ठरली; नमूद केलेल्या सर्वात पहिल्या भविष्यवाणीच्या पूर्णत्वामधील तो एक दुवा बनला. आदाम आणि हव्वेने एदेन बागेत पाप केल्यावर यहोवाने त्या दोघांवरही दंड बजावला आणि त्याच वेळी हव्वेला ज्याने फसवले होते त्या सैतानाला उद्देशून तो म्हणाला: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) अब्राहामासोबत यहोवाने केलेल्या करारावरून हे स्पष्ट झाले की, सैतानाची कृत्ये ज्या संततीद्वारे नष्ट केली जातील ती संतती याच कुलपित्याच्या वंशावळीतून येणार होती.

६. (अ) यहोवाने अब्राहामाला दिलेले अभिवचन कोणाद्वारे पूर्ण केले जाणार होते? (ब) अब्राहामासोबत केलेला करार कोणता आहे?

६ यहोवाचे वचन एका संतानाशी संबंधित असल्यामुळे अब्राहामाला एका पुत्राची गरज होती ज्याद्वारे ही संतती येऊ शकणार होती. परंतु, तो व सारा म्हातारे झाले, तरीही त्यांना मूल झालेले नव्हते. सरतेशेवटी, यहोवाने त्यांना आशीर्वादित केले, चमत्कारिकरित्या त्यांची प्रजनन शक्‍ती क्रियाशील केली आणि साराने अब्राहामाला इसहाक नावाचा एक पुत्र दिला आणि अशाप्रकारे संतती देण्याविषयीचे वचन खरे ठरले. (उत्पत्ति १७:१५-१७; २१:१-७) कित्येक वर्षांनंतर, अगदी आपला प्रिय पुत्र इसहाक याला बळी देण्यास तयारी दाखवण्याइतपत अब्राहामाच्या विश्‍वासाची परीक्षा घेतल्यानंतर यहोवाने अब्राहामाला पुन्हा एकदा वचन दिले: “मी तुला आशीर्वादित करीन व वृद्धिच वृद्धि करून तुझी संतति आकाशातील ताऱ्‍यांइतकी, समुद्रतीरीच्या वाळूइतकी होईल असे करीन; तुझी संतति आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्याद्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१५-१८) या विस्तारित अभिवचनाला सहसा अब्राहामासोबत केलेला करार म्हटले जाते, आणि नंतरच्या नव्या कराराचा त्याच्याशी अगदी जवळचा संबंध असणार होता.

७. अब्राहामाच्या संततीची संख्या कशी वाढू लागली, आणि कोणत्या परिस्थितींमुळे ते इजिप्तमध्ये रहिवासी झाले?

७ कालांतराने, इसहाकाला जुळे झाले, एसाव आणि याकोब. यहोवाने, वचनदत्त संततीचा पूर्वज म्हणून त्यातील याकोबाची निवड केली. (उत्पत्ति २८:१०-१५; रोमकर ९:१०-१३) याकोबाला १२ मुले होती. स्पष्टतः, अब्राहामाच्या संततीची वाढ होण्याची हीच वेळ होती. याकोबाची सर्व मुले प्रौढ झाली, त्यांची आपापली कुटुंबे होती तेव्हा एका दुष्काळामुळे त्या सर्वांना इजिप्तला स्थलांतर करणे भाग पडले, जेथे ईश्‍वरी तरतुदीनुसार याकोबाचा पुत्र योसेफ याने मार्ग तयार केला होता. (उत्पत्ति ४५:५-१३; ४६:२६, २७) काही वर्षांनंतर, कनानमधला दुष्काळ संपला. पण, याकोबाचे कुटुंब मात्र इजिप्तमध्येच राहिले—सुरवातीला पाहुणे म्हणून परंतु नंतर दास म्हणून. मोशेने याकोबाच्या वंशजाला इजिप्तमधून बाहेर नेऊन स्वतंत्र केले ते सा. यु. पू. १५१३ साली, अर्थात अब्राहामाने इफ्रात नदी पार करून ४३० वर्षे उलटल्यानंतरच. (निर्गम १:८-१४; १२:४०, ४१; गलतीकर ३:१६, १७) अब्राहामासोबत केलेल्या कराराकडे यहोवा आता विशेष लक्ष देणार होता.—निर्गम २:२४; ६:२-५.

“जुना करार”

८. यहोवाने सिनाय येथे याकोबाच्या संतानासोबत कोणता करार केला आणि अब्राहामासोबत केलेल्या कराराशी याचा काय संबंध होता?

८ याकोब आणि त्याच्या पुत्रांनी इजिप्तला स्थलांतर केले तेव्हा त्यांचे विस्तृत कुटुंब होते, परंतु इजिप्त सोडून जाताना मात्र त्यांच्या वंशजांच्या मोठमोठ्या जमाती होत्या. (निर्गम १:५-७; १२:३७, ३८) यहोवाने त्यांना कनान येथे आणण्याआधी, दक्षिणेकडे अरेबियातल्या होरेब (अथवा, सिनाय) पर्वताच्या पायथ्यापाशी आणले. तेथे, त्याने त्यांच्यासोबत एक करार केला. तर, ‘नव्या कराराच्या’ तुलनेत याला “जुना करार” म्हणण्यात आले. (२ करिंथकर ३:१४) जुन्या कराराद्वारे यहोवाने, अब्राहामासोबत केलेल्या कराराची लाक्षणिक पूर्णता केली.

९. (अ) अब्राहामासोबत केलेल्या कराराद्वारे यहोवाने कोणत्या चार गोष्टींचे अभिवचन दिले? (ब) इस्राएलसोबत यहोवाने केलेल्या कराराद्वारे कोणत्या भावी आशा उपलब्ध झाल्या आणि कोणत्या अटीवर?

९ यहोवाने या कराराच्या अटी इस्राएलला समजावून सांगितल्या: “म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. पण तुम्ही मला याजकराज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” (निर्गम १९:५, ६) यहोवाने वचन दिले होते की, अब्राहामाची संतती (१) एक मोठे राष्ट्र बनेल, (२) तिला तिच्या शत्रूंवर विजय दिला जाईल, (३) ती कनान देशाचे वतन पावेल, आणि (४) तिच्याद्वारे राष्ट्रांना आशीर्वादित केले जाईल. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या तर, त्याचे खास लोक, इस्राएल, “याजकराज्य, पवित्र राष्ट्र” म्हणून त्यांना स्वतःला हे सर्व आशीर्वाद प्राप्त होतील असे आता त्याने प्रकट केले. इस्राएल लोकांना हा करार मंजूर होता का? त्यांनी एकमुखाने उत्तर दिले: “परमेश्‍वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.”—निर्गम १९:८.

१०. यहोवाने इस्राएल लोकांना एका राष्ट्रात कसे संघटित केले आणि त्यांच्याकडून त्याने काय अपेक्षिले?

१० म्हणून, यहोवाने इस्राएलांना एकत्र करून त्यांचे एक राष्ट्र बनवले. त्याने त्यांना उपासना आणि दररोजच्या व्यवहारांसंबंधी नियम घालून दिले. त्याने निवासमंडपाची (नंतर, जेरूसलेममध्ये मंदिर) आणि निवासमंडपात पवित्र सेवा सादर करण्यासाठी याजकवर्गाचीही तरतूद केली. करार पाळण्याचा अर्थ, यहोवाच्या नियमांचे पालन करणे आणि खासकरून केवळ त्याचीच उपासना करणे असा होता. त्या नियमांचा सार असलेल्या दहा आज्ञांमधली पहिली आज्ञा अशी होती: “ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणिले तो मी परमेश्‍वर [“यहोवा,” NW] तुझा देव आहे. माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत.”—निर्गम २०:२, ३.

नियमशास्त्राच्या कराराद्वारे आशीर्वाद

११, १२. कोणत्या पद्धतींनी जुन्या करारातली अभिवचने इस्राएलप्रती पूर्ण करण्यात आली?

११ नियमशास्त्राच्या करारातली अभिवचने इस्राएलसंबंधी पूर्ण करण्यात आली का? इस्राएल हे “पवित्र राष्ट्र” बनले का? आदामाचे वंशज असल्याकारणाने इस्राएल लोक पापी होते. (रोमकर ५:१२) तरीपण, नियमशास्त्राखाली त्यांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून बलिदाने अर्पिली जात. वार्षिक प्रायश्‍चित्ताच्या दिवशी चढवल्या जाणाऱ्‍या बलिदानांविषयी यहोवा म्हणाला: “त्या दिवशी तुम्हाला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल. परमेश्‍वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल.” (लेवीय १६:३०) यास्तव, इस्राएल विश्‍वासू होते तेव्हा ते एक पवित्र राष्ट्र होते, यहोवाच्या सेवेसाठी शुद्ध केलेले राष्ट्र. परंतु, त्यांची ती शुद्ध अवस्था नियमशास्त्राचे पालन करण्यावर आणि नियमितपणे बलिदान अर्पण करण्यावर अवलंबून होती.

१२ इस्राएल “याजकराज्य” बनले का? अगदी सुरवातीपासून ते एक राज्य होते आणि यहोवा त्याचा स्वर्गीय राजा होता. (यशया ३३:२२) पुढे, नियमशास्त्राच्या करारात मानवी राज्यपदाची तरतूद करण्यात आली जेणेकरून कालांतराने जेरूसलेममध्ये राज्य करणाऱ्‍या राजांद्वारे यहोवाचे प्रतिनिधीत्व केले गेले. (अनुवाद १७:१४-१८) पण इस्राएल हे याजकराज्य होते का? निवासमंडपात पवित्र सेवा सादर करणारा त्याचा एक याजकवर्ग होता. निवासमंडप (नंतर, मंदिर) हे इस्राएल लोकांकरता त्याचप्रमाणे गैर-इस्राएली लोकांकरता शुद्ध उपासनेचे केंद्र होते. आणि हे राष्ट्रच मानवजातीला प्रकट केलेल्या सत्याचे एकमेव माध्यम होते. (२ इतिहास ६:३२, ३३; रोमकर ३:१, २) केवळ लेवीय याजकच नव्हे, तर सर्व विश्‍वासू इस्राएली यहोवाचे “साक्षी” होते. इस्राएल, यहोवाचा “सेवक” होते आणि ‘त्याचे स्तवन करण्यासाठी’ निर्माण केले होते. (यशया ४३:१०, २१) अनेक नम्र विदेशांनी आपल्या लोकांप्रीत्यर्थ यहोवाची शक्‍ती पाहिली आणि ते शुद्ध उपासनेकडे आकर्षिले गेले. ते यहुदीय मतानुसारी बनले. (यहोशवा २:९-१३) परंतु, केवळ एक वंश अभिषिक्‍त याजक या नात्याने सेवा करत होता.

इस्राएलमधील यहुदीय मतानुसारी

१३, १४. (अ) यहुदीय मतानुसारींची नियमशास्त्राच्या करारात भागीदारी नव्हती असे का म्हटले जाऊ शकते? (ब) यहुदीय मतानुसारी नियमशास्त्राच्या कराराच्या अधीन कसे आले?

१३ अशा यहुदीय मतानुसारींचा दर्जा कोणता होता? यहोवाने करार केला तेव्हा तो फक्‍त इस्राएलसोबत केला; तेथे ‘मोठ्या मिश्र समुदायातले’ लोक उपस्थित होते, तरी त्यांना भागीदार म्हटले गेले नाही. (निर्गम १२:३८; १९:३, ७, ८) इस्राएलच्या ज्येष्ठ पुत्राच्या खंडणीची किंमत मोजण्यात आली तेव्हा त्यांच्यातल्या ज्येष्ठ पुत्रांना सामील करण्यात आले नव्हते. (गणना ३:४४-५१) कित्येक दशकांनंतर, कनान देशाची विभागणी जेव्हा इस्राएलाच्या गोत्रांमध्ये करण्यात आली तेव्हा गैर-इस्राएली विश्‍वासधारकांना काहीच देण्यात आले नाही. (उत्पत्ति १२:७; यहोशवा १३:१-१४) का बरे? कारण नियमशास्त्राचा करार यहुदीय मतानुसारींसोबत केला गेला नव्हता. पण, नियमशास्त्रानुसार यहुदीय मतानुसारी पुरुषांची सुंता करण्यात आली होती. त्यांनी त्याच्या नियमांचे पालन केले आणि त्याच्या तरतुदींचा फायदा त्यांना मिळाला. यहुदीय मतानुसारी त्याचप्रमाणे इस्राएली हे नियमशास्त्राच्या कराराच्या अधीन होते.—निर्गम १२:४८, ४९; गणना १५:१४-१६; रोमकर ३:१९.

१४ उदाहरणार्थ, एखाद्या यहुदीय मतानुसारीच्या हातून अपघाताने कोणाचा खून झाला तर एखाद्या इस्राएलाप्रमाणे तोही शरणपुरात धावून जाऊ शकत होता. (गणना ३५:१५, २२-२५; यहोशवा २०:९) प्रायश्‍चित्ताच्या दिवशी, “इस्राएलाच्या सर्व मंडळीसाठी” एक बलिदान अर्पिले जात होते. मंडळीचा भाग या नात्याने यहुदीय मतानुसारी, सर्व कार्यक्रमात भाग घ्यायचे आणि बलिदानाचा फायदा त्यांनाही व्हायचा. (लेवीय १६:७-१०, १५, १७, २९; अनुवाद २३:७, ८) नियमशास्त्राधीन, यहुदीय मतानुसारींचा इस्राएलसोबत इतका जवळचा संबंध होता की, सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट रोजी यहुद्यांप्रीत्यर्थ ‘राज्याची पहिली किल्ली’ वापरण्यात आली तेव्हा यहुदीय मतानुसारींनाही त्याचा फायदा झाला. परिणामस्वरूप, “यहुदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर” हा ख्रिस्ती बनला आणि तो जेरूसलेम येथील मंडळीची देखभाल करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलेल्या ‘सात प्रतिष्ठित पुरुषांपैकी’ एक होता.—मत्तय १६:१९; प्रेषितांची कृत्ये २:५-१०; ६:३-६; ८:२६-३९.

अब्राहामाच्या संततीस यहोवाचा आशीर्वाद

१५, १६. नियमशास्त्राच्या कराराधीन यहोवाने अब्राहामासोबत केलेला करार कसा पूर्ण झाला?

१५ अब्राहामाचे वंशज नियमशास्त्राखाली राष्ट्र म्हणून संघटित झाल्यानंतर, यहोवाने त्यांच्या कुलपित्याला दिलेल्या अभिवचनानुसार त्यांना आशीर्वादित केले. सा. यु. पू. १४७३ मध्ये मोशेचा उत्तराधिकारी, यहोशवा, इस्राएल लोकांना कनानमध्ये घेऊन गेला. त्यानंतर, वंशांमध्ये झालेल्या जमिनीच्या विभागणीकरवी अब्राहामाच्या संततीला देश देण्याचे यहोवाचे अभिवचन पूर्ण झाले. इस्राएल विश्‍वासू होते तेव्हा यहोवाने त्यांना त्यांच्या शत्रूंवर विजय मिळवून देण्याचे जे अभिवचन दिले होते ते पूर्ण केले. हे विशेषतः राजा दावीदाच्या शासनादरम्यान घडले. दावीदाचा पुत्र शलमोन याच्या काळापर्यंत अब्राहामासोबत केलेल्या कराराचा तिसरा पैलू पूर्ण करण्यात आला. “यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनाऱ्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.”—१ राजे ४:२०.

१६ तथापि, अब्राहामाची संतती, इस्राएल याद्वारे राष्ट्रे स्वतःला आशीर्वादित कशी करणार होती? आधीच सांगितल्यानुसार, इस्राएल, यहोवाचे खास लोक, राष्ट्रांमध्ये त्याचे प्रतिनिधी होते. इस्राएलने कनानमध्ये प्रवेश करण्याच्या काही काळाआधीच मोशे म्हणाला: “राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा.” (अनुवाद ३२:४३) पुष्कळ विदेश्‍यांनी प्रतिसाद दिला. “एक मोठा मिश्र समुदाय” तर इस्राएलसोबत इजिप्तमधून बाहेर निघालाच होता, त्याने अरण्यात यहोवाच्या शक्‍तीचे प्रदर्शन पाहिले होते आणि आनंद मानण्याचे मोशेचे निमंत्रणही ऐकले होते. (निर्गम १२:३७, ३८) नंतर, मवाबी रूथने इस्राएली बवाजशी विवाह केला आणि ती मशीहाची पूर्वज बनली. (रूथ ४:१३-२२) कित्येक नैसर्गिक इस्राएली अविश्‍वासू ठरले परंतु केनी योनादाब आणि त्याचा वंशज त्याचप्रमाणे कुशी एबद-मलेख यांनी योग्य तत्त्वांना अधीनता दाखवून स्वतःला त्यांच्यापासून वेगळे केले. (२ राजे १०:१५-१७; यिर्मया ३५:१-१९; ३८:७-१३) पर्शियन सत्तेखाली, पुष्कळ विदेशी लोक यहुदीय मतानुसारी झाले आणि इस्राएलसोबत त्याच्या शत्रूंविरुद्ध लढले.—एस्तेर ८:१७, तळटीप, NW.

नव्या कराराची गरज

१७. (अ)यहोवाने इस्राएलच्या उत्तर आणि दक्षिण राज्यांना का नाकारले? (ब) सरतेशेवटी यहुद्यांना कशामुळे नाकारण्यात आले?

१७ तरीही, देवाच्या अभिवचनाची संपूर्ण पूर्णता होण्याकरता देवाच्या खास राष्ट्राला विश्‍वासू असण्याची गरज होती. पण ते तसे नव्हते. हो, उल्लेखनीय विश्‍वास असणारे इस्राएली तर होतेच. (इब्री लोकांस ११:३२-१२:१) तरीपण, हे राष्ट्र भौतिक लाभाच्या आशेने अनेक प्रसंगी मूर्तिपूजक दैवतांकडे वळाले. (यिर्मया ३४:८-१६; ४४:१५-१८) काही व्यक्‍तींनी नियमशास्त्राचा विपर्यास केला किंवा त्याकडे चक्क दुर्लक्ष केले. (नहेम्या ५:१-५; यशया ५९:२-८; मलाखी १:१२-१४) शलमोनाच्या मृत्यूनंतर, इस्राएलाची उत्तर आणि दक्षिण राज्यात विभागणी झाली. उत्तर राज्य ज्यावेळी अतिशय बंडखोर बनले त्यावेळी यहोवाने घोषित केले: “तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीहि तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही.” (होशेय ४:६) दक्षिणेच्या राज्याने देखील करार न पाळल्याने त्यास कडक शिक्षा देण्यात आली. (यिर्मया ५:२९-३१) यहुद्यांनी येशूला मशीहा म्हणून नाकारले तेव्हा यहोवाने देखील त्यांना नाकारले. (प्रेषितांची कृत्ये ३:१३-१५; रोमकर ९:३१–१०:४) सरतेशेवटी, अब्राहामासोबत केलेला करार सर्वार्थाने पूर्णत्वास नेण्यासाठी यहोवाने एक नवीन व्यवस्था केली.—रोमकर ३:२०.

१८, १९. अब्राहामासोबत केलेला करार सर्वार्थाने पूर्ण व्हावा म्हणून यहोवाने कोणती नवीन व्यवस्था केली?

१८ ती नवीन व्यवस्था म्हणजे नवा करार. यहोवाने पुढीलप्रमाणे म्हटले तेव्हा त्याचे भाकीत केले होते: “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन; . . . परमेश्‍वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा: मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.”—यिर्मया ३१:३१-३३.

१९ सा. यु. ३३ च्या निसान १४ रोजी, येशूने याच नव्या कराराचा उल्लेख केला. त्या प्रसंगी, त्याने प्रकट केले की, हा वचनदत्त करार त्याच्या शिष्यांमध्ये आणि यहोवामध्ये केला जाणार होता आणि येशू त्यांच्यात मध्यस्थ असणार होता. (१ करिंथकर ११:२५; १ तीमथ्य २:५; इब्री लोकांस १२:२४) या नव्या कराराकरवी, यहोवाने अब्राहामाला दिलेल्या अभिवचनाची भव्य आणि कायमस्वरूपी पूर्णता होणार होती जसे आपण पुढील लेखात पाहणारच आहोत.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?

◻ अब्राहामासोबत केलेल्या करारात यहोवाने कशाचे अभिवचन दिले?

◻ यहोवाने अब्राहामासोबत केलेल्या कराराची पूर्णता नैसर्गिक इस्राएलच्या बाबतीत कशी केली?

◻ यहुदीय मतानुसारींना जुन्या करारापासून लाभ कसा झाला?

◻ नव्या कराराची का गरज होती?

[९ पानांवरील चित्र]

नियमशास्त्राच्या कराराद्वारे यहोवाने अब्राहामासोबत केलेल्या कराराची लाक्षणिक पूर्णता घडवून आणली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा