वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१ पृ. १३-१८
  • नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नवा करार
  • अब्राहामाच्या संततीद्वारे राष्ट्रे आशीर्वादित
  • पूर्ण झालेली भविष्यवाणी
  • जुना आणि नवा करार
  • देवाचे राज्य—अंतिम पूर्णता
  • यहोवा करारांचा देव आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुम्ही “याजकराज्य” व्हाल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • देवाच्या करारांपासून तुम्ही लाभ प्राप्त करणार का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • करार देवाचा चिरकालिक उद्देश असणारे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१ पृ. १३-१८

नव्या कराराकरवी मोठे आशीर्वाद

“[येशू] . . . अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ आहे.”—इब्री लोकांस ८:६.

१. एदेनमध्ये वचन दिल्याप्रमाणे ‘स्त्रीची संतती’ कोण असल्याचे दिसून आले आणि ‘तिची टाच फोडली’ ती कशी?

आदाम आणि हव्वेने पाप केल्यानंतर, हव्वेला फसवलेल्या सैतानावर न्यायदंड घोषित करत यहोवाने असे म्हटले: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) सा. यु. २९ मध्ये यार्देन नदीत येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हा एदेनमध्ये जिच्याविषयी वचन दिले होते ती संतती शेवटी सामोरी आली. सा. यु. ३३ मध्ये, वधस्तंभावर त्याचा मृत्यू झाला त्यावेळी त्या प्राचीन भविष्यवाणीचा काही अंश पूर्ण झाला. सैतानाने संततीची ‘टाच फोडली’ होती.

२. येशूच्या स्वतःच्या शब्दांनुसार, त्याचा मृत्यू मानवजातीला फायदेकारक ठरतो तो कसा?

२ ती जखम, अतिशय यातनामय होती तरी आनंदाची गोष्ट म्हणजे ती कायमची नव्हती. येशूला मृतांमधून अमर आत्मिक व्यक्‍ती म्हणून उठवण्यात आले आणि तो स्वर्गात आपल्या पित्यापाशी गेला जेथे त्याने “पुष्कळांच्या खंडणीसाठी” म्हणून आपल्या सांडलेल्या रक्‍ताचे मोल सादर केले. अशाप्रकारे, त्याचे स्वतःचे शब्द खरे ठरले: “मनुष्याच्या पुत्रालाहि उंच केले पाहिजे; ह्‍यासाठी की, जो कोणी विश्‍वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (मत्तय २०:२८; योहान ३:१४-१६; इब्री लोकांस ९:१२-१४) येशूच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेत नव्या कराराची महत्त्वाची भूमिका आहे.

नवा करार

३. नवा करार सर्वप्रथम केव्हा कार्यरत झाला?

३ आपल्या मृत्यूच्या काही काळाआधीच येशूने आपल्या अनुयायांना सांगितले की, त्याने सांडलेले रक्‍त हे “नव्या कराराचे रक्‍त” होते. (मत्तय २६:२८; लूक २२:२०) तो स्वर्गात गेल्याच्या दहा दिवसांनंतर, जेरूसलेममध्ये माडीवरच्या खोलीत जमलेल्या १२० शिष्यांवर पवित्र आत्मा उतरला तेव्हा नवा करार कार्यरत झाल्याचे दिसून आले. (प्रेषितांची कृत्ये १:१५; २:१-४) या १२० शिष्यांना नव्या करारात सामील केल्याने ‘पहिला’ करार, अर्थात नियमशास्त्राचा करार जुना ठरला असे दिसून आले.—इब्री लोकांस ८:१३.

४. जुना करार उणा पडला का? स्पष्टीकरण द्या.

४ जुना करार उणा पडला का? मुळीच नाही. त्याची रदबदली झाल्यामुळे, नैसर्गिक इस्राएल देवाचे खास लोक उरले नाहीत हे खरे. (मत्तय २३:३८) परंतु, हा इस्राएलच्या अवज्ञेचा आणि यहोवाच्या अभिषिक्‍त जनाचा नकार केल्याचा परिणाम होता. (निर्गम १९:५; प्रेषितांची कृत्ये २:२२, २३) तथापि, नियमशास्त्राची रदबदली होण्याआधी त्याकरवी पुष्कळ काही साध्य करण्यात आले. कित्येक शतकांपर्यंत त्याने देवाकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला आणि खोट्या धर्मापासून संरक्षण मिळवून दिले. त्यात नव्या कराराच्या पूर्वछटा होत्या आणि त्याच्या वारंवार कराव्या लागणाऱ्‍या अर्पणांनी मानवाला पाप आणि मृत्यूपासून सुटका मिळवण्याची अत्यंत गरज आहे हे प्रदर्शित केले. खरोखर, नियमशास्त्र हे “ख्रिस्ताकडे पोहंचविणारे बालरक्षक होते.” (गलतीकर ३:१९, २४; रोमकर ३:२०; ४:१५; ५:१२; इब्री लोकांस १०:१, २) तथापि, अब्राहामाला वचन दिलेल्या आशीर्वादाची सर्वार्थाने पूर्णता केवळ नव्या कराराद्वारेच होणार होती.

अब्राहामाच्या संततीद्वारे राष्ट्रे आशीर्वादित

५, ६. अब्राहामासोबत केलेल्या कराराच्या मूलभूत आत्मिक पूर्णतेत अब्राहामाची संतती कोण आहे आणि तिच्याद्वारे सर्वप्रथम आशीर्वाद प्राप्त करणारे राष्ट्र कोणते?

५ यहोवाने अब्राहामाला वचन दिले: “पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१८) जुन्या कराराखाली, नम्र अंतःकरणाच्या अनेक विदेश्‍यांना इस्राएलसोबत अर्थात अब्राहामाच्या राष्ट्रीय संततीसोबत सहवास राखल्याने आशीर्वादित करण्यात आले. परंतु, त्याच्या मूलभूत आत्मिक पूर्णतेत अब्राहामाची संतती म्हणजे एक परिपूर्ण पुरुष होती. पौलाने पुढीलप्रमाणे म्हटले तेव्हा त्याचे स्पष्टीकरण दिले: “अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही; तर ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे.”—गलतीकर ३:१६.

६ होय, अब्राहामाची संतती येशू आहे, आणि त्याच्याद्वारे राष्ट्रांना असा आशीर्वाद प्राप्त होतो की जो नैसर्गिक इस्राएलला मिळणाऱ्‍या इतर कोणत्याही आशीर्वादापेक्षा श्रेष्ठ आहे. अर्थात, हा आशीर्वाद सर्वप्रथम इस्राएललाच मिळाला होता. सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टनंतर लगेचच प्रेषित पेत्र यहुद्यांच्या एका गटाला म्हणाला: “तुम्ही संदेष्ट्यांचे पुत्र आहा, आणि ‘तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीतील सर्व कुळे आशीर्वादित होतील’ असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांबरोबर केलेल्या कराराचेहि तुम्ही पुत्र आहा. देवाने आपल्या सेवकाला उठून प्रथम तुम्हाकडे पाठविले, ह्‍यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”—प्रेषितांची कृत्ये ३:२५, २६.

७. अब्राहामाची संतती येशू, याच्याद्वारे कोणत्या राष्ट्रांना आशीर्वाद प्राप्त झाला?

७ लवकरच, हा आशीर्वाद शोमरोनी लोकांना आणि नंतर विदेश्‍यांनाही देण्यात आला. (प्रेषितांची कृत्ये ८:१४-१७; १०:३४-४८) सा. यु. ५० आणि ५२ च्या दरम्यान केव्हातरी, पौलाने आशिया मायनर येथील गलतीकर ख्रिश्‍चनांना लिहिले: “देव परराष्ट्रीयांना विश्‍वासाने नीतिमान ठरविणार, ह्‍या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल, म्हणून जे विश्‍वासाचे आहेत त्यांना विश्‍वास ठेवणाऱ्‍या अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो.” (गलतीकर ३:८, ९; उत्पत्ति १२:३) गलती येथील पुष्कळ ख्रिस्ती ‘परराष्ट्रीय’ असले, तरी त्यांच्या विश्‍वासामुळे त्यांना आशीर्वादित केले गेले. कशाप्रकारे?

८. पौलाच्या दिवसातल्या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत, अब्राहामाच्या संततीद्वारे आशीर्वादित होण्यामध्ये काय सामील होते आणि सरतेशेवटी किती जणांना हा आशीर्वाद मिळतो?

८ पौलाने सगळ्या पार्श्‍वभूमीच्या गलतीकर ख्रिश्‍चनांना म्हटले: “तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारे वारीस आहा.” (गलतीकर ३:२९) त्या गलतीकरांच्या बाबतीत अब्राहामाच्या संततीकरवी आशीर्वाद मिळण्यामध्ये त्यांनी नव्या कराराचे भागीदार असणे तसेच येशूसोबत वारस असणे अर्थात अब्राहामाच्या संततीमध्ये येशूचे सहकारी असणे सामील होते. प्राचीन इस्राएलची लोकसंख्या आपल्याला ठाऊक नाही. ते “समुद्रकिनाऱ्‍याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत,” होते एवढेच आपल्याला ठाऊक आहे. (१ राजे ४:२०) तथापि, आत्मिक संततीमध्ये येशूच्या सहकाऱ्‍यांची अंतिम संख्या आपल्याला ठाऊक आहे—ती म्हणजे, १,४४,०००. (प्रकटीकरण ७:४; १४:१) हे १,४४,००० लोक “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे” ह्‍यांमधून आहेत आणि अब्राहामासोबत केलेल्या कराराचे आशीर्वाद आणखी इतरांना प्राप्त करून देण्यात ते भाग घेतात.—प्रकटीकरण ५:९.

पूर्ण झालेली भविष्यवाणी

९. नव्या करारातल्या लोकांच्या अंतर्यामी यहोवाचा नियम आहे तो कसा?

९ नव्या कराराविषयी पूर्वभाकीत करताना, यिर्मयाने लिहिले: “तर परमेश्‍वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा: मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन.” (यिर्मया ३१:३३) यहोवाची सेवा प्रेमापोटी करणे हे नव्या करारातल्या लोकांचे ओळखचिन्ह आहे. (योहान १३:३५; इब्री लोकांस १:९) यहोवाचा नियम त्यांच्या हृदयपटलावर लिहिला आहे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची ते उत्कट इच्छा बाळगतात. हे खरे की, प्राचीन इस्राएलमध्ये काही विश्‍वासू व्यक्‍तींना यहोवाचा नियम अतिशय प्रिय होता. (स्तोत्र ११९:९७) पण, अनेकांना तो प्रिय वाटला नाही. तरीही, ते त्या राष्ट्राचे भाग होतेच. देवाचा नियम जर हृदयपटलावर लिहिलेला नसला, तर नव्या कराराचे भाग होता येत नाही.

१०, ११. नव्या करारातल्या लोकांच्या बाबतीत, यहोवा कोणत्या प्रकारे “त्यांचा देव” होतो आणि ते सर्व त्याला कसे जाणतील?

१० यहोवाने नव्या करारातल्या लोकांविषयी पुढे म्हटले: “मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील.” (यिर्मया ३१:३३) प्राचीन इस्राएलमध्ये अनेकजण राष्ट्रांच्या दैवतांची उपासना करत तरीही ते इस्राएलीच राहिले. नव्या कराराच्या आधारावर, यहोवाने, नैसर्गिक इस्राएलची रदबदली करण्यासाठी एक आत्मिक राष्ट्र, “देवाचे इस्त्राएल” निर्माण केले. (गलतीकर ६:१६; मत्तय २१:४३; रोमकर ९:६-८) तथापि, जो कोणी यहोवा आणि केवळ यहोवाचीच उपासना करण्याचे सोडून देतो तो नव्या आत्मिक राष्ट्राचा भाग राहत नाही.

११ यहोवाने असेही म्हटले: “लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील.” (यिर्मया ३१:३४) इस्राएलमध्ये अनेकांनी यहोवाकडे दुर्लक्ष केले व ते जणू असे म्हणत होते: “परमेश्‍वर बरे करीत नाही व वाईटहि करीत नाही.” (सफन्या १:१२) जर कोणी यहोवाकडे दुर्लक्ष करतो किंवा शुद्ध उपासना भ्रष्ट करतो तो देवाच्या इस्राएलचा भाग राहत नाही. (मत्तय ६:२४; कलस्सैकर ३:५) आत्मिक इस्राएली, ‘आपल्या देवास ओळखणारे’ लोक आहेत. (दानीएल ११:३२) ‘एकच खरा देव आणि येशू ख्रिस्ताचे ज्ञान घेण्यात’ त्यांना आनंद वाटतो. (योहान १७:३, NW) येशूला जाणल्याने देवाविषयी त्यांचे ज्ञान अधिक वाढते कारण येशूने एका अनोख्या मार्गाने “[देवाला] प्रगट केले आहे.”—योहान १:१८; १४:९-११.

१२, १३. (अ) नव्या करारातल्या लोकांची पापे यहोवा कोणत्या आधारावर माफ करतो? (ब) पापांच्या क्षमेबाबतीत, नवा करार जुन्या करारापेक्षा श्रेष्ठ आहे तो कसा?

१२ शेवटी, यहोवाने वचन दिले: “मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.” (यिर्मया ३१:३४ब) मोशेच्या नियमशास्त्रात लिखित असलेल्या शेकडो नियमांचे इस्राएलांनी पालन करावयाचे होते. (अनुवाद २८:१, २, १५) नियमशास्त्राचे उल्लंघन करणारे सर्व आपल्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी बलिदाने अर्पण करत. (लेवीय ४:१-७; १६:१-३१) अनेक यहुदी असे मानू लागले, की नियमशास्त्रानुसार केलेल्या आपल्या स्वतःच्या कर्मांद्वारे आपण नीतिमान ठरतो. तथापि, ख्रिश्‍चनांना याची चांगली जाणीव आहे की ते स्वतःच्या कर्मांद्वारे नीतिमत्व कधीच मिळवू शकत नाहीत. ते पाप करण्याचे टाळू शकत नाहीत. (रोमकर ५:१२) नव्या कराराखाली, केवळ येशूच्या बलिदानाच्या आधारे देवासमक्ष नीतिमान असणे शक्य आहे. परंतु, देवापुढील हे नीतिमत्व देवाकडले एक बक्षीस, अपात्री कृपा आहे. (रोमकर ३:२०, २३, २४) अर्थात, यहोवा अजूनही आपल्या सेवकांकडून आज्ञाधारकतेची मागणी करतो. पौल म्हणतो की, नव्या करारातले लोक “ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन” आहेत.—१ करिंथकर ९:२१.

१३ यास्तव, ख्रिश्‍चनांच्याही पापासाठी एक बलिदान आहे पण ते नियमशास्त्राच्या कराराधीन दिल्या जाणाऱ्‍या बलिदानांपेक्षा फार मूल्यवान आहे. पौलाने लिहिले: “[नियमशास्त्राच्या कराराखालचा] प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो; परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा [येशू] ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे.’” (इब्री लोकांस १०:११, १२) नव्या करारातले ख्रिस्ती येशूच्या बलिदानावर विश्‍वास करत असल्याने, यहोवा त्यांना नीतिमान, पापरहित असे घोषित करतो आणि म्हणून ते त्याचे आत्मिक पुत्र या नात्याने अभिषिक्‍त होण्याच्या पात्रतेचे आहेत. (रोमकर ५:१; ८:३३, ३४; इब्री लोकांस १०:१४-१८) मानवी अपरिपूर्णतेमुळे ते पाप करतात तेव्हा, ते यहोवाच्या क्षमेसाठी याचना करू शकतात आणि येशूच्या बलिदानाच्या आधारे यहोवा त्यांना क्षमा करतो. (१ योहान २:१, २) तथापि, जाणूनबुजून पापी मार्ग स्वीकारल्यास, ते आपली स्थिती आणि नव्या करारातले भागीदार होण्याचा विशेषाधिकार गमावतात.—इब्री लोकांस २:२, ३; ६:४-८; १०:२६-३१.

जुना आणि नवा करार

१४. नियमशास्त्राच्या कराराखाली कोणत्या सुंतेची गरज होती? आणि नव्या कराराखाली कोणत्या?

१४ जुन्या करारातल्या पुरुषांची, नियमशास्त्राखाली असल्याचे चिन्ह म्हणून सुंता केली जात होती. (लेवीय १२:२, ३; गलतीकर ५:३) ख्रिस्ती मंडळी सुरू झाल्यावर, काहींना असे वाटले की, गैर-यहुदी ख्रिश्‍चनांनी देखील सुंता करायला हवी. परंतु, जेरूसलेममधील प्रेषितांना आणि वडिलांना देवाच्या वचनाच्या आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने हे आवश्‍यक नसल्याचे आढळले. (प्रेषितांची कृत्ये १५:१, ५, २८, २९) काही वर्षांनंतर, पौल म्हणाला: “जो बाह्‍यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्‍यात्कारी सुंता ती सुंता नव्हे; परंतु जो अंतरी यहूदी तो यहूदी होय; आणि लेखाप्रमाणे व्हावयाची ती सुंता नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुंता होय.” (रोमकर २:२८, २९) नैसर्गिक यहुद्यांच्या बाबतीत देखील वास्तविक सुंतेचे यहोवाच्या नजरेत त्यापुढे काहीच आध्यात्मिक मूल्य राहिले नव्हते. नव्या कराराधीन असलेल्यांच्या शरीराची नव्हे, तर अंतःकरणाची सुंता होण्यास हवी. यहोवाच्या नजरेत असंतुष्टकारक किंवा अशुद्ध असलेला कोणताही विचार, कामना आणि प्रेरणा काढून टाकण्यास हवी.a अशाप्रकारे, विचारपद्धतीत परिवर्तन घडवून आणण्याच्या पवित्र आत्म्याच्या शक्‍तीचा आज अनेकजण जिवंत पुरावा आहेत.—१ करिंथकर ६:९-११; गलतीकर ५:२२-२४; इफिसकर ४:२२-२४.

१५. नैसर्गिक इस्राएल आणि देवाचे इस्राएल यांच्यात राजकीय अधिकारासंबंधाने कशी तुलना करता येईल?

१५ नियमशास्त्राच्या कराराच्या व्यवस्थेत, यहोवा इस्राएलचा राजा होता आणि कालांतराने जेरूसलेममध्ये त्याने मानवी राजांद्वारे आपले सार्वभौमत्व गाजवले. (यशया ३३:२२) यहोवा हा देवाच्या इस्राएलचा अर्थात आत्मिक इस्राएलचा देखील राजा आहे आणि सा. यु. ३३ पासून “स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” ज्याला मिळाला आहे त्या येशू ख्रिस्ताद्वारे त्याने राज्य केले आहे. (मत्तय २८:१८; इफिसकर १:१९-२३; कलस्सैकर १:१३, १४) आज, देवाचे इस्राएल, येशूला देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा म्हणून ओळखते की जे राज्य १९१४ मध्ये स्थापन झाले होते. हिज्कीया, योशीया आणि प्राचीन इस्राएलातल्या इतर विश्‍वासू राजांपेक्षा येशू हा फार उत्तम राजा आहे.—इब्री लोकांस १:८, ९; प्रकटीकरण ११:१५.

१६. देवाचे इस्राएल कोणत्या प्रकारचे याजकगण आहे?

१६ इस्राएल केवळ राज्यच नव्हते तर त्याचे एक अभिषिक्‍त याजकपद देखील होते. सा. यु. ३३ मध्ये देवाच्या इस्राएलने नैसर्गिक इस्राएलची जागा घेतली आणि यहोवाचा “सेवक,” त्याचे “साक्षी” बनले. (यशया ४३:१०) यशया ४३:२१ आणि निर्गम १९:५, ६ येथे नमूद केलेले यहोवाचे इस्राएलला उद्देशून बोललेले शब्द तेथून पुढे देवाच्या आत्मिक इस्राएलला लागू होऊ लागले. आता देवाचे नवीन आत्मिक राष्ट्र “निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक” असून ‘यहोवाचे गुण प्रसिद्ध’ करण्यास ते जबाबदार आहेत. (१ पेत्र २:९) देवाच्या इस्राएलातले स्त्री-पुरुष अशा सर्वांचा मिळून एक संयुक्‍त याजकगण बनतो. (गलतीकर ३:२८, २९) अब्राहामाच्या संततीचा दुय्यम भाग म्हणून ते आता म्हणतात: “राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा.” (अनुवाद ३२:४३) आत्मिक इस्राएलपैकी अद्याप पृथ्वीवर असलेले लोक ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ आहेत. (मत्तय २४:४५-४७) केवळ त्यांच्याच सोबत राहून देवाला ग्रहणीय पवित्र सेवा सादर केली जाऊ शकते.

देवाचे राज्य—अंतिम पूर्णता

१७. नव्या करारातले लोक कोणता जन्म अनुभवतात?

१७ सा. यु. पू. १५१३ नंतर जन्मलेले इस्राएल लोक जन्मतःच नियमशास्त्राच्या कराराधीन असत. यहोवा ज्यांना नव्या करारात सामील करतो त्यांचा देखील जन्म होतो—त्यांच्या बाबतीत तो आत्मिक जन्म असतो. येशूने परुशी निकदेमला याविषयी सांगितले: “मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाहि देवाचे राज्य पाहता येत नाही.” (योहान ३:३) सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टचे १२० शिष्य हा नवा जन्म अनुभवणारे पहिले अपरिपूर्ण मानव होते. नव्या कराराखाली नीतिमान गणले गेल्याने त्यांना त्यांच्या राजकीय वारशासाठी “विसार” म्हणून पवित्र आत्मा प्राप्त झाला. (इफिसकर १:१४) देवाचे दत्तक पुत्र बनण्यासाठी ते “आत्म्यापासून जन्मलेले” होते आणि यामुळे ते येशूचे भाऊ आणि म्हणून “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” बनले. (योहान ३:६; रोमकर ८:१६, १७) त्यांच्या ‘नव्याने जन्मल्यामुळे’ अद्‌भुत आशांचा मार्ग मोकळा झाला.

१८. नव्या करारातल्या लोकांकरता नव्याने जन्मल्यामुळे कोणत्या अद्‌भुत प्रत्याशांचा मार्ग मोकळा होतो?

१८ नव्या कराराची मध्यस्थी करताना येशूने आपल्या अनुयायांसोबत आणखी एक करार केला व म्हटले: “जसे माझ्या पित्याने माझ्यासोबत राज्यासाठी करार केला आहे तसे मीही तुम्हासोबत करार करतो.” (लूक २२:२९, NW) या राज्य कराराद्वारे दानीएल ७:१३, १४, २२, २७ येथे नमूद केलेल्या एका अद्‌भुत दृष्टान्ताच्या पूर्णतेसाठी मार्ग तयार करण्यात आला. ‘पुराणपुरुष’ अर्थात, यहोवा देव ‘मानवपुत्रासारख्या कोणाला’ तरी राजकीय अधिकार देत असल्याचे दानीएलाने पाहिले. मग, दानीएलाने पाहिले की, “पवित्र जनांस राज्याचे स्वामित्व” मिळाले. येशू हा “मानवपुत्रासारखा” आहे ज्याला १९१४ मध्ये, यहोवा देवाकडून स्वर्गीय राज्य प्राप्त झाले. आत्म्याने अभिषिक्‍त झालेले त्याचे शिष्य हे ‘पवित्र जन’ असून ते त्याच्यासोबत त्या राज्यात भागीदार आहेत. (१ थेस्सलनीकाकर २:१२) कसे?

१९, २०. (अ) नव्या करारातल्या लोकांच्या बाबतीत, यहोवाने अब्राहामाला दिलेल्या अभिवचनाची कोणती अंतिम, भव्य पूर्णता आहे? (ब) पुढे कोणता प्रश्‍न विचारात घेण्याची गरज आहे?

१९ मृत्यूनंतर हे अभिषिक्‍त जन, येशूप्रमाणे, अमर आत्मिक प्राणी म्हणून मृतांमधून उठवले जातात व त्याच्यासोबत राजे आणि याजक या नात्याने स्वर्गात सेवा करतात. (१ करिंथकर १५:५०-५३; प्रकटीकरण २०:४, ६) केवढी ही भव्य आशा! ते केवळ कनान देशावरच नव्हे, तर सबंध “पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण ५:१०) ते “शत्रूची नगरे हस्तगत” करतील का? (उत्पत्ति २२:१७) होय आणि तेही निर्णायक पद्धतीने जेव्हा शत्रूसमान धार्मिक वेश्‍या, मोठी बाबेल हिचा नाश होताना ते पाहतात आणि हे पुनरुत्थित अभिषिक्‍त जन येशूसोबत राष्ट्रांवर “लोहदंडाने” अधिकार गाजवतात व सैतानाचे डोके फोडतात तेव्हा. तर अशाप्रकारे, उत्पत्ति ३:१५ येथील भविष्यवाणीतला शेवटचा तपशील पूर्ण करण्यात त्यांचा भाग असेल.—प्रकटीकरण २:२६, २७; १७:१४; १८:२०, २१; रोमकर १६:२०.

२० तरी, आपल्याला असा प्रश्‍न पडेल, अब्राहामासोबत केलेल्या करारात आणि नव्या करारात केवळ या १,४४,००० विश्‍वासू लोकांचाच समावेश आहे का? नाही, या करारांमध्ये प्रत्यक्षात सामील नसलेल्या इतरांनाही त्यांच्याद्वारे आशीर्वाद मिळेल; हे आपल्याला पुढील लेखात पाहायला मिळेल.

[तळटीप]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड १, पृष्ठ ४७० पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ नवा करार पहिल्यांदा कार्यरत झाला तो केव्हा?

◻ जुन्या कराराद्वारे काय साध्य करण्यात आले?

◻ अब्राहामाचे प्रथम संतान कोण आहे, आणि त्या संतानाद्वारे राष्ट्रांना कोणत्या क्रमाने आशीर्वादित करण्यात आले?

◻ अब्राहामासोबत केलेल्या कराराची आणि नव्या कराराची अंतिम पूर्णता १,४४,००० लोकांच्या बाबतीत कोणती आहे?

[१५ पानांवरील चित्र]

जुन्या कराराधीन असलेल्या लोकांपेक्षा नव्या कराराधीन असलेल्या लोकांसाठी पापांच्या क्षमेचा अधिक खोल अर्थ होतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा