राज्य घोषकांचा वृत्तान्त
मलावीमध्ये सहनशीलतेमुळे देवाचे आशीर्वाद प्राप्त झाले
योसेफ यहोवाचा विश्वासू सेवक होता. (इब्री लोकांस ११:२२) सहनशीलतेचे तो उल्लेखनीय उदाहरण देखील होता. आपल्याच भावांनी त्याला फसवले, दोनदा त्याला दास म्हणून विकण्यात आले, खोट्या आरोपांखाली त्याला कैदेत टाकण्यात आले तरी, योसेफाचा धीर खचला नाही. उलट, त्याने संकटाची ती वर्षे धीराने सहन केली, यहोवाच्या आशीर्वादांकरता नम्रपणे थांबून राहिला.—उत्पत्ति ३७:२३-२८, ३६; ३९:११-२०.
आजही, मलावीतील यहोवाचे साक्षीदार देवाच्या आशीर्वादांकरता धीराने थांबून राहिले आहेत. गेल्या २६ वर्षांपर्यंत या ख्रिस्ती साक्षीदारांनी सरकारी बंदी, कडक विरोध आणि इतर अनेक अत्याचार सहन केले. पण त्यांच्या धीराचे त्यांना प्रतिफळ मिळाले!
सन १९६७ च्या अंताला मलावीत जेव्हा छळाची लाट उसळली तेव्हा तेथे सुमारे १८,००० राज्य प्रचारक होते. सन १९९७ च्या सेवा वर्षाची सुरवात ३८,३९३ इतक्या प्रचारकांच्या नव्या उच्चांकाने झाली, हे ऐकून तेथील साक्षीदारांना झालेल्या आनंदाची कल्पना करा! ही संख्या बंदी येण्याच्या सुरवातीच्या संख्येच्या दुप्पटीहून अधिक आहे. याशिवाय, मलावीत झालेल्या १३ “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” प्रांतीय अधिवेशनांची उपस्थिती १,१७,००० पर्यंत गेली. खरेच, यहोवाने त्यांच्या विश्वासाचे व सहनशीलतेचे प्रतिफळ दिले आहे.
या आशीर्वादाचे एक उदाहरण, माचाका नावाच्या तरुणाचा अनुभव आहे. माचाकाने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करण्याचे निमंत्रण स्वीकारले तेव्हा त्याच्या पालकांना ते काही आवडले नाही. ते म्हणाले: “तुला साक्षीदार व्हायचे तर हे घर सोडावे लागेल.” या धमकीमुळे मात्र त्याने त्याचा अभ्यास काही सोडला नाही. म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्याचे सर्व कपडे लपवून ठेवले. साक्षीदारांनी त्याला नवीन जोड विकत घेऊन दिले. माचाकाच्या पालकांना हे समजल्यावर ते त्याला म्हणाले: “साक्षीदार जर तुझी काळजी घेणार असतील तर हे घर सोड आणि त्यांच्याबरोबरच राहा.” माचाकाने यावर विचार केला आणि घर सोडले; स्थानीय मंडळीतील एका साक्षीदार कुटुंबाने त्याला आपल्या घरात आश्रय दिला.
यावर माचाकाच्या पालकांना इतका राग आला, की साक्षीदारांबरोबर काहीही संबंध नको म्हणून ते दुसरीकडे राहावयास गेले. अर्थातच, माचाकाला दुःख झालेच, पण बांधवांनी त्याच्याबरोबर स्तोत्र २७:१० या वचनाची चर्चा केली तेव्हा त्याला सांत्वन मिळाले; त्यात असे लिहिले आहे: “माझ्या आईबापांनी मला सोडिले तरी परमेश्वर मला जवळ करील.”
कालांतराने, माचाकाचे पालक नरम झाले आणि माचाकाने पुन्हा घरी जाण्याचा निश्चय केला. यहोवाची सेवा करण्याचा त्यांच्या मुलाच्या दृढनिश्चयाचा प्रभाव खरोखरच शक्तिशाली म्हणता येईल कारण त्यांनीही यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्याची तयारी दर्शवली! याशिवाय, “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” प्रांतीय अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी ते उपस्थित राहिले आणि त्यानंतर ते असे म्हणण्यास प्रवृत्त झाले की: “खरेच, हीच देवाची संघटना आहे.”
होय, विरोध परीक्षासमान होऊ शकतो पण देवाचे एकनिष्ठ संदेशवाहक हार मानत नाहीत. “संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते” हे माहीत असल्यामुळे ते धैर्याने पुढे चालत राहतात. (रोमकर ५:३, ४) सहनशीलतेमुळे देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात याची ग्वाही मलावीतील यहोवाचे साक्षीदार उचितपणे देऊ शकतात.