उजेडात आलेले गुप्तधन माकार्योस बायबलचा इतिहास
सेंट पीटर्सबर्ग येथील रशियन नॅशनल लायब्ररीत, १९९३ साली एका संशोधकाला ऑर्थोडॉक्स रिव्ह्यू नियतकालिकांचा एक गठ्ठा सापडला; गठ्ठ्यातील नियतकालिकांची पाने जुनाट, पिवळट झालेली होती. या नियतकालिकाच्या १८६० ते १८६७ दरम्यान प्रकाशित झालेल्या अंकांत असे एक धन होते जे तब्बल एका शतकापर्यंत रशियन जनतेपासून गुप्त ठेवण्यात आलेले होते. हे धन म्हणजे बायबलमधील सबंध हिब्रू शास्त्रवचनांचे अर्थात, “जुन्या कराराचे” रशियन भाषेत केलेले भाषांतर!
आर्खिमॅन्ड्राइट माकार्योस या नावाने ओळखले जाणारे मिखाईल याकोव्हलेव्हिच ग्लुखारेफ आणि गिरास्यिम पेट्रोव्हिच पाव्हस्की हे दोघे या शास्त्रवचनांचे भाषांतरकार होते. दोघेही रशियन ऑर्थोडॉक्स चर्चचे नामवंत सदस्य आणि भाषापंडित होते. गत शतकाच्या सुरवातीला या दोघांनी आपले कार्य हाती घेतले तेव्हा सबंध बायबलचे रशियन भाषेत भाषांतर अद्याप झालेले नव्हते.
आधुनिक काळातील रशियन भाषेच्या अग्रगामी स्लॅव्हॉनिक भाषेत बायबल उपलब्ध होते खरे; पण या भाषेत धार्मिक विधी चालवणाऱ्या पाळकवर्गाचा एक अपवाद वगळल्यास, १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत स्लॅव्हॉनिक भाषेचा सर्वसामान्य वापर बंद होऊन बराच काळ लोटला होता. एकेकाळी पश्चिमेतही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती; कारण लॅटिन भाषेचा लोप होऊन बराच काळ लोटल्यानंतरही, लॅटिनशिवाय आणखी कोणत्याही भाषेत बायबलचे भाषांतर होऊ देण्यास रोमन कॅथलिक चर्च तयार नव्हते.
माकार्योस आणि पाव्हस्की या दोघांनीही सर्वसामान्य लोकांना बायबल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. स्मरणाआड झालेल्या त्यांच्या भाषांतरांचा आता शोध लागल्यामुळे रशियाच्या साहित्यिक आणि धार्मिक परंपरेतील एका महत्त्वाच्या अंगाचे पुनरुज्जीवन होऊ शकले आहे.
पण, माकार्योस आणि पाव्हस्की होते तरी कोण? शिवाय, सर्वसामान्य माणसाच्या भाषेत बायबल उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा इतका विरोध का करण्यात आला? त्यांच्या कार्याचा हवाला बायबलच्या चाहत्यांसाठी केवळ मनोवेधकच नव्हे, तर विश्वास बळकट करणारा देखील आहे.
रशियन बायबलची आवश्यकता
सामान्य माणसाच्या भाषेत बायबल उपलब्ध करून देण्याची आवश्यकता केवळ माकार्योस आणि पाव्हस्की यांनाच जाणवली, असे नाही. शंभर वर्षांपूर्वीच, रशियाचा झार, पहिला पीटर किंवा पीटर द ग्रेट याला देखील ही आवश्यकता भासली होती. एक लक्षवेधक बाब अशी, की त्याला बायबलविषयी आदर होता; एकदा तो म्हणाला, “बायबल हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, देव आणि शेजारी यांच्याप्रती मनुष्याचे जे कर्तव्य आहे त्याविषयीची सर्व आवश्यक माहिती यात आहे.”
परिणामी, पीटरने १७१६ साली आपल्या शाही दरबाराला ॲमस्टरडॅम येथे एक बायबल मुद्रित करण्याचा आदेश दिला; याचा खर्च तो स्वतः उचलणार होता. प्रत्येक पानावर एका रकान्यात रशियन भाषेत आणि दुसऱ्यात डच भाषेत मजकूर असावा असे ठरवण्यात आले. अवघ्या एका वर्षातच म्हणजे १७१७ साली ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने किंवा “नवा करार” तयार झालेला होता.
हिब्रू शास्त्रवचनांच्या चार खंडांतील भाषांतरापैकी डच भाषेतील मजकूर देखील १७२१ सालापर्यंत मुद्रित करून तयार होता. एक रकाना रिकामाच ठेवण्यात आला; यात नंतर रशियन भाषेतील मजकूर भरावयाचा होता. पीटरने या भाषांतरीत बायबल्सचे मुद्रण पूर्ण करण्याची आणि वितरणाची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी चर्चच्या सर्वोच्च धार्मिक अधिकाऱ्यांना, अर्थात रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या “पवित्र धर्मसभेला” सोपून दिली. पण धर्मसभेने हे कार्य पूर्णत्वास नेलेच नाही.
त्यानंतर चार वर्षांच्या आत, पीटर मृत्यू पावला. आणि त्याच्या बायबल्सचे काय झाले? रशियन भाषेतील भाषांतरीत मजकूर जेथे भरावयाचा होता, तो रिकामा भाग शेवटी रिकामाच राहिला. त्या बायबलच्या प्रतींचा ढीगचा ढीग एका तळघरात ठेवण्यात आला आणि तेथे ती सगळी पुस्तके कुजून गेली—खराब न झालेली अक्षरशः एकही प्रत नंतर हाती लागू शकली नाही! धर्मसभेने, “उरलेले जे काही होते ते व्यापाऱ्यांना विकून टाकण्याचे” ठरवले होते.
भाषांतराच्या प्रयत्नांना आरंभ
ब्रिटिश ॲण्ड फॉरेन बायबल सोसायटीचे एक सदस्य, जॉन पॅटरसन, १८१२ साली रशियात आले. एक बायबल सोसायटी स्थापन करण्यास सेंट पीटर्सबर्ग येथील बुद्धिजीवी वर्गाला प्रवृत्त करण्यात पॅटरसन यशस्वी झाले. रशियन सैन्याने पहिला नेपोलियन याच्या आक्रमण करणाऱ्या सैन्यांना पिटाळून लावले होते त्याच वर्षी, डिसेंबर ६, १८१२ रोजी—झार ॲलेक्झँडर पहिला याने रशियन बायबल सोसायटी स्थापन करण्याच्या लेखी करारास मान्यता दिली. १८१५ साली झारने या सोसायटीचे अध्यक्ष प्रिन्स अल्यिक्सान्डर गल्यीट्सिन यांना आदेश दिला की, “रशियन लोकांनासुद्धा आपल्या स्वतःच्या मातृभाषेत देवाचे वचन वाचण्याची संधी मिळाली पाहिजे,” असे त्यांनी सत्ताधीश धर्मसभेला सुचवावे.
प्रशंसास्पद बाब अशी की हिब्रू शास्त्रवचनांचे रशियन भाषेत थेट मूळ हिब्रू भाषेतून भाषांतर करण्याची परवानगी देण्यात आली. स्लॅव्हॉनिक भाषेतील हिब्रू शास्त्रवचनांच्या भाषांतराकरता आधारभूत ग्रंथ म्हणून जुने ग्रीक सेप्टुअजिन्ट वापरण्यात आले होते. रशियन भाषेत बायबलचे भाषांतर करणाऱ्यांना अचूकता, स्पष्टता, आणि शुद्धता या तीन मुख्य तत्त्वांच्या आधारावर भाषांतर करण्यास सांगण्यात आले. पण रशियन भाषेत बायबल उपलब्ध करून देण्याच्या या आरंभीच्या प्रयत्नांचे पुढे काय झाले?
बायबलच्या भाषांतर कार्याला खीळ?
चर्च आणि सरकार यांतील रूढीप्रिय सदस्य लवकरच धार्मिक आणि राजकीय क्षेत्रावर पडू लागलेल्या परदेशी प्रभावाविषयी सतर्क झाले. काही चर्च पुढाऱ्यांनी पुन्हा असा दावा केला की बायबलचा संदेश हा रशियन भाषेपेक्षा—चर्चच्या धार्मिक विधींत वापरल्या जाणाऱ्या—स्लॅव्हॉनिक भाषेतच अधिक प्रभावीपणे व्यक्त होतो.
परिणामी, १८२६ साली रशियन बायबल सोसायटी विसर्जित करण्यात आली. या बायबल सोसायटीने काढलेल्या हजारो भाषांतराच्या प्रती जाळून टाकण्यात आल्या. अशारितीने, बायबलपेक्षा रूढीपरंपरांना अधिक महत्त्वाचे स्थान देण्यात आले. रोमन कॅथलिक चर्चच्या पावलावर पाऊल ठेवून, रशियन धर्मसभेनेही १८३६ साली असा आदेश जारी केला की: “चर्चच्या कोणत्याही प्रांजळ सदस्याने शास्त्रवचनांवरील कथन ऐकण्यास हरकत नाही, पण शास्त्रवचनांतील विशिष्ट भाग, विशेषतः जुना करार, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय त्याने स्वतःहून वाचता कामा नये.” यामुळे बायबलच्या भाषांतर कार्याला जणू कायमची खीळ बसली होती.
पाव्हस्की यांचे कार्य
दरम्यान, हिब्रू भाषेचे प्राध्यापक गिरास्यिम पाव्हस्की यांनी हिब्रू शास्त्रवचनांचा रशियन भाषेत अनुवाद करण्याचे कार्य हाती घेतले. १८२१ साली त्यांचे स्तोत्रसंहितेचे भाषांतर करून पूर्ण झाले होते. झारने लगेच त्याला स्वीकृती दिली आणि १८२२ सालच्या जानेवारी महिन्यात हे स्तोत्रसंहितेचे पुस्तक सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आले. हे भाषांतर लवकरच लोकांच्या पसंतीस उतरले आणि तब्बल १२ वेळा त्याचे पुनर्मुद्रण करावे लागले—आणि एकूण १,००,००० प्रती मुद्रित करण्यात आल्या!
पाव्हस्की यांच्या अशा विद्वत्तापूर्ण प्रयासांमुळे अनेक भाषापंडित आणि धर्मशास्त्रज्ञ त्यांचा आदर करू लागले. कटकारस्थानांचा स्वतःवर काहीएक परिणाम न होऊ देता खंबीर राहिलेला परखड आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाचा माणूस, या शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. रशियन बायबल सोसायटीला चर्चचा विरोध होता; शिवाय ही सोसायटी परदेशी स्वार्थासाठी स्थापित करण्यात आली आहे असे काहींचे मत होते, पण हे सर्व असूनही प्राध्यापक पाव्हस्की यांनी आपल्या व्याख्यानांतून बायबलच्या वचनांचे रशियन भाषेत भाषांतर करणे सुरूच ठेवले. प्रशंसेपोटी त्यांचे विद्यार्थी ही भाषांतरीत वचने लिहून घेत, आणि कालांतराने त्यांनी पाव्हस्की यांच्या लिखाणाचा एक संग्रहच तयार केला. १८३९ साली, सेंसॉर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवायच—अकॅडेमी मुद्रणालयात या लिखाणाच्या १५० प्रती मुद्रित करण्याचे त्यांनी धाडस केले.
पाव्हस्की यांच्या भाषांतराचा वाचकांवर विलक्षण प्रभाव पडला आणि त्यांच्या भाषांतराची मागणी वाढतच गेली. पण १८४१ साली धर्मसभेकडे एक निनावी तक्रार आली; पाव्हस्की यांचे भाषांतर “धोकेदायक” आणि ऑर्थोडॉक्स सिद्धान्तांपासून दिशाभूल करणारे आहे असा या तक्रारीचा आशय होता. दोन वर्षांनंतर धर्मसभेने हुकूम सोडला: “जी. पाव्हस्की यांच्या जुन्या कराराच्या भाषांतराची जितकी हस्तलिखिते आणि मुद्रित प्रतिकृती असतील त्या सर्व जप्त करून नष्ट करण्यात याव्या.”
देवाच्या नावाला गौरव
काही झाले तरी, पाव्हस्की यांनी बायबलचे भाषांतर करण्याच्या इच्छेला पुन्हा एकवार जागृत केले होते. भविष्यातील भाषांतरकारांसाठी एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावर ते आपला उत्तम आदर्श मागे ठेवून गेले, मुद्दा होता—देवाचे नाव.
रशियन संशोधक कॉर्सुनस्की यांच्या स्पष्टीकरणानुसार: ‘देवाचे नेमके नाव, त्याचे सर्वाधिक पवित्र नाव יהוה या चार हिब्रू व्यंजनांनी बनलेले होते, आणि आता त्याचा उच्चार यहोवा असा आहे.’ बायबलच्या प्राचीन प्रतिकृतींत देवाचे हे आगळेवेगळे नाव केवळ हिब्रू शास्त्रवचनांतच हजारो वेळा आढळते. तथापि, यहुद्यांची अशी गैरसमजूत झाली होती की ईश्वराचे नाव अत्यंत पवित्र असल्यामुळे ते लिहिण्यात किंवा उच्चारण्यात येऊ नये. यासंबंधी, कॉर्सुनस्की यांनी सांगितले, की ‘बोलताना अथवा लिहिताना, या नावाऐवजी “प्रभू” या अर्थाचा अदोनाई हा शब्द वापरला जात असे.’
स्पष्टपणे, देवाच्या नावाला वर्ज्य मानण्यात आले ते देवाबद्दल असलेल्या श्रद्धापूर्ण भीतीमुळे नव्हे, तर अंधविश्वासातून उत्पन्न झालेल्या भीतीमुळे होते. बायबल स्वतः देवाचे नाव न वापरण्याचे कोठेही सुचवत नाही. देवाने स्वतः मोशेला सांगितले: “तू इस्राएल लोकांस सांग, तुमच्या पूर्वजांचा देव, . . . परमेश्वर [“यहोवा,” NW] याने मला तुम्हाकडे पाठविले आहे; हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.” (निर्गम ३:१५) वारंवार, बायबल देवाच्या उपासकांना प्रोत्साहन देते: “परमेश्वराचा [“यहोवाचा”] धन्यवाद करा! त्याच्या नामाचा जयघोष करा.” (यशया १२:४) तरीसुद्धा, बहुतेक बायबल भाषांतरकारांनी यहुदी परंपरेचे अनुसरण करण्याचे पसंत करून देवाचे नाव वापरण्याचे टाळले.
पाव्हस्की यांनी मात्र या परंपरांना जुमानले नाही. केवळ स्तोत्रसंहितेच्या त्यांच्या भाषांतरातच यहोवा हे नाव ३५ पेक्षा अधिक वेळा आढळते. त्यांच्या अशा धाडशीपणाचा एका समकालीन भाषांतरकारावर मोठा प्रभाव पडणार होता.
आर्खिमॅन्ड्राइट माकार्योस
पाव्हस्की यांच्या धाडसाने प्रभावित झालेले समकालीन भाषांतरकार होते, आर्खिमॅन्ड्राइट माकार्योस. भाषाशास्त्रात अत्यंत निष्णात असलेले रशियन ऑर्थोडॉक्स मिशनरी. सात वर्षांच्या कोवळ्या वयातच ते लहान लहान रशियन वचनांचे लॅटिन भाषेत भाषांतर करू लागले होते. विशी गाठेपर्यंत त्यांनी हिब्रू, जर्मन आणि फ्रेंचवरही प्रभुत्त्व मिळवले होते. पण नम्र स्वभावामुळे आणि देवापुढील जबाबदारीची पुरेपूर जाणीव असल्यामुळे ते फाजील आत्मविश्वासी बनले नाहीत. त्यांनी सदोदीत इतर भाषा तज्ज्ञांकडून आणि अभ्यासकांकडून मदत घेतली.
माकार्योस यांना रशियातील मिशनरी कार्यांत सुधार घडवून आणायचा होता. रशियातील मुस्लिम आणि यहुदी लोकांकडे ख्रिस्ती धर्म घेऊन जाण्याआधी, चर्चने “लोकसमुदायांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने शाळा स्थापन कराव्या, रशियन भाषेतून बायबलच्या प्रती वितरीत कराव्यात,” असे त्यांचे मत होते. १८३९ सालच्या मार्च महिन्यात, हिब्रू शास्त्रवचनांचे रशियन भाषेत भाषांतर करण्याकरता परवानगी मिळवण्यासाठी माकार्योस सेंट पीटर्सबर्ग येथे आले.
बायबलमधील यशया आणि ईयोब या पुस्तकांचे भाषांतर माकार्योस यांनी केव्हाच पूर्ण केलेले होते. पण, धर्मसभेने त्यांना हिब्रू शास्त्रवचनांचे रशियन भाषेत भाषांतर करण्याची परवानगी दिली नाही. उलट, माकार्योस यांना सांगण्यात आले की रशियन भाषेत हिब्रू शास्त्रवचनांचे भाषांतर करण्याचा विचारही त्यांनी आपल्या मनातून काढून टाकावा. धर्मसभेने एप्रिल ११, १८४१ रोजी असा निर्णय घेतला की माकार्योस यांनी, “गुडघे टेकून प्रार्थना करण्याद्वारे आपल्या विवेकाच्या शुद्धीकरणाकरता टॉम्स्क येथील एका बिशपच्या घरी राहून तीन ते सहा आठवड्यांपर्यंत प्रायश्चित्त करावे.”
माकार्योस यांची खंबीर भूमिका
डिसेंबर १८४१ पासून जानेवारी १८४२ पर्यंत माकार्योस यांनी हे प्रायश्चित्त केले. पण त्यानंतर अजिबात वेळ न घालवता ते राहिलेल्या हिब्रू शास्त्रवचनांच्या भाषांतराच्या कामाला लागले. त्यांनी पाव्हस्की यांच्या भाषांतराची एक प्रत मिळवली होती आणि आपले भाषांतर तपासून पाहण्याकरता ते तिचा उपयोग करीत असत. पाव्हस्की यांच्यासारखेच त्यांनी देखील देवाचे नाव अंधारात ठेवण्यास नाकार दिला. खरे तर, माकार्योस भाषांतरात यहोवा हे नाव ३,५०० पेक्षा अधिक वेळा आढळते!
माकार्योस यांनी आपल्या विश्वासातील परिचितांना या लिखाणाच्या प्रती पाठवल्या. काही मोजक्या हस्तलिखित प्रतींचे वितरण होऊ शकले, पण त्यांच्या लिखाणाचे प्रकाशन होऊ नये म्हणून चर्चने आपले प्रयत्न चालूच ठेवले. माकार्योस यांनी आपले बायबल परदेशात प्रसिद्ध करण्याच्या योजना आखल्या. प्रवासाला निघण्याच्या दिवशीच ते आजारी पडले आणि त्यानंतर अवघ्या काही काळातच, १८४७ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जिवंतपणी त्यांचे बायबलचे भाषांतर प्रकाशित होऊच शकले नाही.
शेवटी प्रकाशित!
कालांतराने राजकीय आणि धार्मिक परिस्थिती बदलली. देशभरात एक उदारमतवादी लाट उसळली आणि १८५६ साली धर्मसभेने पुन्हा एकदा बायबलचे रशियन भाषेत भाषांतर करण्याची परवानगी दिली. पूर्वीपेक्षा अनुकूल अशा या वातावरणात, माकार्योस बायबल ऑर्थोडॉक्स रिव्ह्यू या पत्रिकेत रशियन भाषेतून भाषांतराचा एक प्रयोग या शीर्षकाखाली, १८६० आणि १८६७ सालांदरम्यान क्रमाक्रमाने प्रकाशित करण्यात आले.
रशियन धार्मिक साहित्याचे अभ्यासक चर्निगोव्हचे आर्चबिशप फीलारे यांनी माकार्योस बायबलचे वर्णन करताना म्हटले: “त्यांचे भाषांतर हिब्रू मूळग्रंथाशी निष्ठावान असून, भाषा शुद्ध आणि विषयाला शोभेल अशीच आहे.”
तथापि, माकार्योस बायबल सामान्य जनतेपर्यंत पोचू शकलेच नाही. उलट ते जणू कायमचेच विस्मरणाच्या पडद्याआड गेले. १८७६ साली, धर्मसभेच्या परवानगीने हिब्रू आणि ग्रीक शास्त्रवचनांसहित सबंध बायबलचे शेवटी रशियन भाषेत भाषांतर पूर्ण झाले. या संपूर्ण बायबलला काहीवेळा धर्मसभेचे भाषांतर म्हणतात. आणि गंमत म्हणजे, रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या या “अधिकृत” भाषांतराकरता आधार म्हणून माकार्योस, तसेच पाव्हस्की यांचीच भाषांतरे वापरण्यात आली. पण या भाषांतरात, हिब्रू भाषेत देवाचे नाव जेथे वापरण्यात आले आहे अशा ठिकाणांपैकी मोजक्याच ठिकाणांत ते आढळते.
सध्याचे माकार्योस बायबल
माकार्योस बायबल १९९३ सालापर्यंत अंधारातच राहिले. सुरवातीला सांगण्यात आल्याप्रमाणे, त्यावर्षी रशियन नॅशनल लायब्ररीतील दुर्मिळ पुस्तकांच्या विभागात ऑर्थोडॉक्स रिव्ह्यू नियतकालिकांत या भाषांतराची एक प्रत गवसली होती. यहोवाच्या साक्षीदारांनी हे बायबल जनतेला उपलब्ध करून देण्याचे महत्त्व ओळखले. सदर ग्रंथालयाने यहोवाच्या साक्षीदारांच्या धार्मिक संघटनेला प्रकाशनाकरता, माकार्योस बायबलची एक प्रत घेण्याची परवानगी दिली.
यहोवाच्या साक्षीदारांनी मग सबंध रशियात आणि रशियन भाषा प्रचारात आहे अशा इतर अनेक देशांत वितरण करण्याकरता या बायबलच्या ३,००,००० प्रती इटली येथे मुद्रित करण्याची व्यवस्था केली. हिब्रू शास्त्रवचनांच्या आधिकांश भागाच्या माकार्योस यांच्या भाषांतराव्यतिरिक्त, या आवृत्तीत पाव्हस्की यांचे स्तोत्रसंहितेचे भाषांतर तसेच ग्रीक शास्त्रवचनांचे ऑर्थोडॉक्स चर्च-अधिकृत धर्मसभेचे भाषांतर देखील सामील आहे.
या वर्षी जानेवारी महिन्यात, ही आवृत्ती रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात एका पत्रकार परिषदेत प्रसिद्ध करण्यात आली. (पृष्ठ २६ पाहा.) या नवीन बायबलमुळे रशियन वाचकांच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल.
या बायबलच्या प्रकाशनामुळे धार्मिकदृष्ट्या आणि साहित्यिकदृष्ट्या जणू एक गड जिंकला गेला आहे! तसेच यशया ४०:८ येथील हे पुढील शब्द किती खरे आहेत याची पुन्हा एकवार खात्री पटून आमच्या विश्वासास बळ मिळाले आहे: “गवत सुकते; फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.”
[२६ पानांवरील चौकट]
समीक्षकांच्या पसंतीस उतरलेले बायबल
“ग्रंथदालनात आणखी एक महान साहित्यिक कलाकृती: माकार्योस बायबल.” या शब्दांत, कॉम्सॉमॉल्स्काया प्राव्दा या वर्तमानपत्राने माकार्योस बायबलची प्रसिद्धी जाहीर केली.
रशियन भाषेत हे बायबल जवळजवळ “१२० वर्षांआधी” पहिल्यांदा निघाले होते याची आठवण करून देताना सदर वर्तमानपत्राने खेद व्यक्त करीत म्हटले: “पवित्र ग्रंथाचे सरळसोप्या भाषेत भाषांतर करण्याला चर्चचा वर्षानुवर्षे विरोध होता. कितीतरी भाषांतरांना धुडकावून लावल्यानंतर, १८७६ साली शेवटी चर्चने एका भाषांतराला मंजूरी दिली; आणि या भाषांतराला धर्मसभेचे भाषांतर म्हणण्यात आले. पण या बायबलला चर्चमध्ये मज्जाव होता. तेथे तर, आजतागायत केवळ स्लॅव्हॉनिक बायबललाच मान्यता आहे.”
सेंट पीटर्सबर्ग ईको नामक वृत्तपत्राने देखील माकार्योस बायबलच्या प्रकाशनाचे फायदे लक्षात घेऊन म्हटले, की “सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी, हर्टसन पेडॅगॉजिकल युनिव्हर्सिटी, आणि स्टेट म्युझियम ऑफ रिलिजियस हिस्ट्री येथील मान्यवर अभ्यासकांनी बायबलच्या या नविनतम आवृत्तीला उच्च गुणांक बहाल केले आहेत.” गत शतकातील पूर्वार्धात माकार्योस आणि पाव्हस्की यांनी केलेल्या बायबलच्या भाषांतराविषयी सांगताना सदर वृत्तपत्राने असे म्हटले: “त्यापूर्वी, रशियात बायबल हे केवळ स्लॅव्हॉनिक भाषेत वाचणे शक्य होते; आणि ही भाषा केवळ पाळकवर्गाला समजत होती.”
यहोवाच्या साक्षीदारांकरवी माकार्योस बायबल प्रसिद्ध केल्या जाण्याविषयी चालू वर्षाच्या सुरवातीला सेंट पीटर्सबर्ग येथे एका पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. न्येफस्कॉया व्रेम्या या स्थानिक दैनिकाने म्हटले: “रशिया आणि सेंट पीटर्सबर्ग यांच्या सांस्कृतिक इतिहासात सदर बायबल आवृत्तीला अतिशय महत्त्वाचा दर्जा देण्यात यावा यावर वरिष्ठ अभ्यासकांनी जोर दिला. या विशिष्ट धार्मिक संस्थेच्या कार्याविषयी कोणाची काहीही मते असोत, पण आजवर अंधारात राहिलेल्या या बायबलचे भाषांतर प्रकाशात येणे हे निःसंशये अतिशय श्रेयस्कर आहे.”
देवाचे वचन सामान्य माणसाच्या भाषेत उपलब्ध करून दिले जाते तेव्हा, देवावर प्रेम करणाऱ्या सर्वांना निश्चितच आनंद होतो. आणखी एक बायबल भाषांतर जगभरातील लक्षावधी रशियन भाषिकांना उपलब्ध झाले आहे याविषयी सर्वत्र बायबलच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
[चित्र]
माकार्योस बायबलच्या प्रसिद्धीची जेथे घोषणा करण्यात आली ती पत्रकार परिषद
[२३ पानांवरील चित्र]
बायबलरूपी गुप्तधन जेथे गवसले ती रशियन नॅशनल लायब्ररी
[२३ पानांवरील चित्र]
पीटर द ग्रेट, याने रशियन भाषेत बायबल प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला
[Picture Credit line on page 23]
Corbis-Bettmann
[२४ पानांवरील चित्र]
गिरास्यिम पाव्हस्की, यांनी रशियन भाषेत बायबलच्या भाषांतराला हातभार लावला
[२५ पानांवरील चित्र]
आर्खिमॅन्ड्राइट माकार्योस, यांच्या नावावरून नवीन रशियन बायबलचे नाव पडले