देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते
“आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.”—यशया ४०:८.
१. (अ) येथे “आमच्या देवाचे वचन” याचा काय अर्थ होतो? (ब) मानवी अभिवचने आणि देवाचे वचन यांच्यामध्ये कोणती तुलना केली जाऊ शकते?
मानव बहुधा प्रसिद्ध स्त्री-पुरुषांनी दिलेल्या वचनांवर भरवसा करतात. परंतु, आपल्या जीवनात सुधारणा होण्याची अपेक्षा धरणाऱ्या लोकांना ही अभिवचने कितीही इष्ट वाटली तरी, आपल्या देव वचनाच्या तुलनेत ती जणू कोमेजणाऱ्या फुलांसारखी आहेत. (स्तोत्र १४६:३, ४) २,७०० पेक्षा अधिक वर्षांआधी, यहोवा देवाने संदेष्ट्या यशयाला असे लिहायला प्रेरित केले: “सर्व मानवजाति गवत आहे, तिची सर्व शोभा वनांतल्या फुलासारखी आहे. . . . गवत सुकते; फूल कोमेजते, पण आमच्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.” (यशया ४०:६, ८) ते सर्वकाळ कायम राहणारे “वचन” आहे तरी काय? तो देवाच्या उद्देशाचा शब्द आहे. आज ते “वचन” बायबलमध्ये लिखित स्वरूपात आपल्याजवळ आहे.—१ पेत्र १:२४, २५.
२. कसल्या मनोवृत्ती व कसली कार्ये प्रदर्शित होत असताना यहोवाने प्राचीन इस्राएल आणि यहुदासंबंधी आपले वचन पूर्ण केले?
२ यशयाने नोंदलेल्या गोष्टींची सत्यता प्राचीन इस्राएलाच्या दिवसातील लोकांनी अनुभवली. यहोवाने आपल्या संदेष्ट्यांद्वारे हे भाकीत केले की, आपला उघडउघड विश्वासघात केल्यामुळे प्रथम इस्राएलाच्या दहा वंशाचे राज्य आणि त्यामागोमाग यहुदाच्या दोन वंशाचे राज्य बंदिवासात जाईल. (यिर्मया २०:४; आमोस ५:२, २७) त्यांनी यहोवाच्या संदेष्ट्यांचा छळ केला, एवढेच नव्हे तर त्यांना जिवे मारले, देवाच्या इशारेवजा संदेशाची गुंडाळी जाळून टाकली आणि भविष्यवाणीची पूर्णता होऊ नये म्हणून इजिप्तकडे लष्करी मदत देण्यासाठी अपील केले तरीही यहोवाचे वचन विफल ठरले नाही. (यिर्मया ३६:१, २, २१-२४; ३७:५-१०; लूक १३:३४) पुढे जाऊन, पश्चात्तापी शेष यहुदीयांची आपल्या मायदेशी पुनर्स्थापना करण्यासंबंधी देवाच्या वचनाची उल्लेखनीय पूर्णता घडून आली.—यशया, अध्याय ३५.
३. (अ) यशयाने नोंदलेली कोणती अभिवचने आपल्यासाठी विशेषतः आस्थेची आहेत? (ब) या गोष्टी नक्की होतील याची तुम्हाला खात्री का आहे?
३ यहोवाने यशयाद्वारे, मशीहाची मानवजातीवरील धार्मिक सत्ता, पाप आणि मृत्यूपासून सुटका आणि पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर यांविषयी देखील भाकीत केले. (यशया ९:६, ७; ११:१-९; २५:६-८; ३५:५-७; ६५:१७-२५) या गोष्टीसुद्धा पूर्णत्वास येतील का? प्रश्नच नाही! “देव . . . असत्य बोलत नाही.” त्याने आपल्या भल्यासाठी आपले भविष्यसूचक वचन लिहून ठेवले, आणि ते टिकून राहील याची त्याने खात्री केली आहे.—तीत १:२, सुबोध भाषांतर; रोमकर १५:४.
४. बायबलची मूळ हस्तलिखिते राहिली नाहीत, तरी देवाचे वचन “सजिव” आहे हे कसे खरे आहे?
४ आपल्या प्राचीन लेखकांनी त्या भविष्यवाण्या ज्या हस्तलिखितांवर लिहिल्या ती मूळ हस्तलिखिते यहोवाने टिकूवन ठेवली नाहीत. पण त्याचे “वचन,” अर्थात त्याचा प्रकट केलेला उद्देश जिवंत वचन शाबीत झाले आहे. तो उद्देश अखंडितपणे पूर्णत्वास जात आहे आणि तो पूर्ण होत असता, ज्या लोकांचे जीवन त्याने स्पर्शून जाते त्यांचे आंतरिक विचार आणि त्यांचे हेतू प्रकट होतात. (इब्री लोकांस ४:१२) शिवाय, ऐतिहासिक अहवाल दाखवून देतो की, प्रेरित शास्त्रवचनांचे टिकून राहणे आणि त्यांचे भाषांतर हे सर्व ईश्वरी मार्गदर्शनानुरूप पार पडले.
त्यावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले असता
५. (अ) प्रेरित इब्री शास्त्रवचने नष्ट करण्यासाठी एका सिरियन राजाने कोणता प्रयत्न केला? (ब) तो अपयशी का ठरला?
५ एकदाच नव्हे तर अनेकदा शासकांनी प्रेरित लिखाणांचा नाश करण्याचा प्रयत्न केला आहे. सा.यु.पू. १६८ मध्ये, ॲन्टियोकस इपिफनीस या सिरियन राजाने (पृष्ठ १० वर दाखवलेल्या) यहोवाला समर्पित केलेल्या मंदिरात झियससाठी एक वेदी बांधली. त्याने ‘नियमशास्त्राची पुस्तकेदेखील शोधून काढली’ व ती जाळून टाकली आणि अशी शास्त्रवचने बाळगणाऱ्या कोणालाही मृत्यूदंड दिला जाईल अशी घोषणा केली. जेरूसलेम आणि यहुदियात कित्येक प्रती त्याने जाळून टाकल्यावरही, शास्त्रवचनांवर तो पूर्णतः दडपण आणू शकला नाही. त्या वेळी ज्यू लोकांच्या वसाहती अनेक देशांमध्ये विखुरलेल्या होत्या आणि प्रत्येक सभास्थानात आपापल्या गुंडाळ्या होत्या.—पडताळा प्रेषितांची कृत्ये १३:१४, १५.
६. (अ) प्रारंभिक ख्रिश्चन वापरत असलेली शास्त्रवचने नष्ट करण्यासाठी कोणता जोरदार प्रयत्न करण्यात आला होता? (ब) त्याचा परिणाम काय झाला?
६ सा.यु. ३०३ मध्ये, डायोक्लेशियन या रोमी सम्राटाने देखील ख्रिस्ती सभांचा नायनाट करावा आणि त्यांची ‘शास्त्रवचने आगीत भस्म करावीत’ असा आदेश दिला होता. हा विनाश एका दशकापर्यंत चालू राहिला. हा छळ भयानक होता, तरी देखील डायोक्लेशियन ख्रिस्ती धर्माचा समूळ नाश करू शकला नाही आणि देवानेही सम्राटाच्या प्रतिनिधींना त्याच्या प्रेरित वचनाच्या केवळ एका भागाच्याही सर्व प्रतींचा नाश करायला दिले नाही. पण, देवाच्या वचनाच्या वाटपाप्रती आणि प्रचाराप्रती विरोधकांनी दाखवलेल्या प्रतिक्रियेवरून त्यांच्या अंतःकरणात काय होते ते प्रकट केले. सैतानाने अंध केलेले आणि त्याची इच्छा पूर्ण करत असलेले म्हणून त्यांनी आपली ओळख पटवून दिली.—योहान ८:४४; १ योहान ३:१०-१२.
७. (अ) पश्चिम युरोपमध्ये बायबलचे ज्ञान दाबून टाकण्यासाठी कोणते प्रयत्न केले गेले? (ब) बायबलचे भाषांतर आणि प्रकाशन केल्याने काय साध्य झाले?
७ बायबलचे ज्ञान दाबून टाकण्याच्या प्रयत्नांनी इतरही स्वरूपे धारण केली. लॅटिन भाषा प्रचारातून नाहीशी झाली तेव्हा, मूर्तिपूजक शासकांनी नव्हे तर तथाकथित ख्रिश्चनांनीच—सातवे पोप ग्रेगरी (१०७३-८५) आणि तिसरे पोप इनोसंट यांनी (११९८-१२१६)—सामान्य लोकांच्या भाषेत बायबलचे भाषांतर करण्याला कडा विरोध केला. चर्चच्या अधिकाराविरुद्ध होणारे दुमत संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात, १२२९ मध्ये, फ्रान्सच्या तुलुझ रोमन कॅथलिक मंडळाने आदेश दिला की, सामान्य माणसाने जनसामान्यांच्या भाषेतल्या बायबलची कोणतीच पुस्तके जवळ बाळगू नयेत. हा आदेश अंमलात आणण्यासाठी इन्क्विझिशनचा क्रूरतेने उपयोग करण्यात आला. पण, इन्क्विझिशनचा ४०० वर्षांचा दरारा समाप्त झाला तेव्हा, देव वचनावर प्रेम करणाऱ्यांनी सुमारे २० भाषांमध्ये शिवाय अतिरिक्त पोटभाषांमध्ये संपूर्ण बायबलचे भाषांतर केले होते आणि त्याचे तसेच आणखी १६ भाषांमधील अधिकतर भागांच्या छापील आवृत्तींचे वाटप ते करत होते.
८. एकोणीसाव्या शतकादरम्यान, रशियात बायबलचे भाषांतर आणि वितरणासंबंधी काय घडत होते?
८ सामान्य लोकांपर्यंत बायबल पोहंचू नये म्हणून केवळ रोमन कॅथलिक चर्चच प्रयास करत नव्हते. १९ व्या शतकाच्या सुरवातीला, सेंट पीटर्सबर्ग ॲकॅडमी ऑफ डिव्हिनिटी येथील प्राध्यापक, पॉवस्की यांनी मत्तयाचे शुभवर्तमान ग्रीकमधून रशियन भाषेत भाषांतरित केले होते. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या इतर पुस्तकांचेही रशियनमध्ये भाषांतर झाले होते आणि पॉवस्की त्याचे संपादक होते. यांचे मोठ्या प्रमाणावर वितरण झाले, परंतु चर्चने जेव्हा अतिशय चलाखीने १८२६ मध्ये झारला, रशियन बायबल संस्था, रशियन कर्मठ चर्चच्या “होली सायनॉडच्या” स्वाधीन करायला लावली, तेव्हा कालांतराने तिच्या कार्यांवर पूर्णतः दडपण आणले. नंतर, पॉवस्की यांनी इब्री शास्त्रवचनांचे इब्रीतून रशियन भाषेत भाषांतर केले. जवळजवळ त्याच कालावधीत, कर्मठ चर्चचे मिशनरी माकारियॉस यांनी देखील इब्री शास्त्रवचनांचे इब्रीतून रशियन भाषेत भाषांतर केले. त्या दोघांनाही त्यासाठी शिक्षा देण्यात आली आणि त्यांची भाषांतरे चर्चच्या दफ्तरखान्यात ठेवण्यात आली. चर्चला जुन्या स्लॅव्हॉनिक भाषेतलेच बायबल ठेवायचे होते; त्यावेळी सामान्य लोकांना ती भाषा वाचायला येत नव्हती किंवा कळतही नव्हती. बायबलचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी लोकांचे प्रयत्न दाबून टाकणे जमेनासे झाले तेव्हा कुठे, म्हणजे १८५६ मध्ये “होली सायनॉडने” स्वतः मान्यता दिलेल्या भाषांतराचे काम हाती घेतले; आणि त्यातल्या अभिव्यक्ती चर्चच्या मतांनुरूप असतील याची खात्री करण्यासाठी त्यांनी अत्यंत कावेबाजपणे काही नियम तयार केले. म्हणून, देव वचनाच्या प्रसाराबाबत धार्मिक नेत्यांचा बाह्य दिखावा आणि त्यांच्या शब्दांवरून आणि कार्यांवरून दिसणारा खरा हेतू यांमध्ये साम्य नसल्याचे प्रकट होत होते.—२ थेस्सलनीकाकर २:३, ४.
दूषित होण्यापासून वचनाचे संरक्षण
९. बायबलच्या काही भाषांतरकारांनी देवाच्या वचनाप्रती आपले प्रेम कसे प्रदर्शित केले?
९ शास्त्रवचनांचे भाषांतर आणि नक्कल करणाऱ्या लोकांमध्ये असे काही लोक होते ज्यांना देवाच्या वचनाबद्दल मनस्वी प्रेम होते आणि सर्वांना ते उपलब्ध व्हावे या हेतूने ते जिवापाड प्रयत्न करत होते. विल्यम टिंडेलने इंग्रजीमध्ये बायबल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याला (१५३६ मध्ये) ठार मारण्यात आले. फ्रॉन्थीस्को दी एन्थीनॉसने ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे स्पॅनिशमध्ये भाषांतर करून प्रकाशन केल्यामुळे कॅथलिक इन्क्विझिशनने त्याला (१५४४ नंतर) तुरुंगात टाकले. रॉबर्ट मॉरीसनने आपला जीव धोक्यात घालून (१८०७ पासून १८१८ पर्यंतच्या कालावधीत) चिनी भाषेत बायबलचे भाषांतर केले.
१०. काही भाषांतरकारांना देवाच्या वचनाप्रती असलेल्या प्रेमाने नव्हे तर इतर प्रभावांनी चालना मिळाली होती हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?
१० परंतु, कधी कधी देवाच्या वचनावरील प्रेमाखातर नव्हे तर इतर कारणांमुळे लोक नकलाकार आणि भाषांतरकार म्हणून काम करायचे. चार उदाहरणे पाहा: (१) शोमरोनी लोकांनी जेरूसलेममधल्या मंदिराशी बरोबरी करण्यासाठी गेरीझीम पर्वतावर एक मंदिर बांधले. त्याचे समर्थन करण्यासाठी, समॅरिटन पेन्टट्यूकमधील निर्गम २०:१७ येथे फेरबदल करण्यात आला. गेरीझीम पर्वतावर दगडाची वेदी बांधून त्यावर बलिदान अर्पण करण्याची आज्ञा, जणू दहा आज्ञांचा भाग असल्यासारखी, त्यात सामील करण्यात आली. (२) ग्रीक सेप्टुअजिंटसाठी ज्याने पहिल्यांदा दानीएलाच्या पुस्तकाचे भाषांतर केले त्याने सर्व नियम झुगारून भाषांतर केले. इब्री मजकुराचे स्पष्टीकरण होईल किंवा त्यास खुलवेल असे त्याला वाटणारी वाक्ये त्याने त्यात जोडली. त्याच्या मते वाचकांना अस्वीकारणीय ठरतील अशी वाक्ये त्याने गाळली. दानीएल ९:२४-२७ येथे आढळते त्यानुसार, त्याने मशीहाच्या येण्याच्या वेळेसंबंधीची भविष्यवाणी भाषांतरित केली तेव्हा, त्याने दिलेला कालावधी बदलला आणि त्यात काही शब्दांची भर घातली, काहींच्यात फेरबदल केला तर काही शब्द इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे केले; आणि जणू ही भविष्यवाणी मॅकबीसच्या लढाईला पुरावा देत असल्यासारखी वाटावी ह्या हेतूने हे सगळे काही केले असे स्पष्ट होते. (३) सा.यु. चौथ्या शतकात एका लॅटिन प्रबंधात, त्रैक्यवादाच्या एका अतिउत्सुक सर्मथकाने, स्पष्टतः, “स्वर्गामध्ये, पिता, शब्द आणि पवित्र आत्मा; आणि हे तीन एक आहेत” हे शब्द जणू १ योहान ५:७ या वचनातून उद्धृत केल्यासारखे सामील केले. नंतर तो उतारा चक्क लॅटिन बायबलच्या हस्तलिखितात नमूद करण्यात आला. (४) फ्रान्समध्ये, तेरावे लुई यांनी (१६१०-४३) प्रोटेस्टंटांची मेहनत पुसून टाकण्यासाठी झॉक कोरबान यांना बायबलचे भाषांतर फ्रेंचमध्ये करण्यासाठी अनुमती दिली. तो हेतू मनात बाळगून कोरबान यांनी वचनात भर घातली; यामध्ये प्रेषितांची कृत्ये १३:२ येथील ‘मासच्या पवित्र अर्पणाचा’ संदर्भही सामील होतो.
११. (अ) काही भाषांतरकारांनी अप्रामाणिकता केल्यावरही देवाचे वचन कसे टिकून राहिले? (ब) बायबलमध्ये मूलतः काय होते हे सिद्ध करण्यासाठी प्राचीन हस्तलिखातांचा केवढा पुरावा आहे? (पेटी पाहा.)
११ यहोवाने आपल्या वचनात केली जाणारी ही फेरफार थांबवली नाही आणि त्यामुळे त्याच्या उद्देशात किंचित फरकही झाला नाही. त्यांचा काय परिणाम झाला? गेरीझीम पर्वताच्या संदर्भांची भर घातल्याने समॅरिटन धर्म, मानवजातीला आशीर्वादित करण्याचे देवाचे साधन ठरला नाही. त्याउलट, हे सिद्ध झाले की, समॅरिटन धर्म पेन्टट्यूकवर विश्वास ठेवत असल्याचा दावा करत असला, तरी सत्य शिकवण्यासाठी त्याच्यावर भरवसा केला जाऊ शकत नाही. (योहान ४:२०-२४) सेप्टुअजिंटमधील शब्दांचा विपर्यास केल्याने दानीएल संदेष्ट्याने भाकीत केलेल्या वेळी मशीहाचे येणे काही थांबले नाही. शिवाय, सेप्टुअजिंटचा पहिल्या शतकात उपयोग होत असला, तरी पुराव्यांनुसार यहुदी लोकांना आपल्या सभास्थानांत इब्री भाषेतच शास्त्रवचने ऐकण्याची सवय होती. परिणामस्वरूप, भविष्यवाणीच्या पूर्णतेची वेळ जवळ आली तेव्हा “लोक वाट पाहत” होते. (लूक ३:१५) त्रैक्यवादाचे समर्थन करण्यासाठी १ योहान ५:७ आणि मासचे स्पष्टीकरण देण्यासाठी प्रेषितांची कृत्ये १३:२ येथे भर घातल्यामुळे सत्यात तिळमात्रही फरक झाला नाही. आणि कालांतराने, ही लबाडी पूर्णतः उघडकीस आली. बायबलच्या मूळ भाषेतील अमाप हस्तलिखितांवरून कोणत्याही भाषांतराची सत्यता पारखली जाऊ शकते.
१२. (अ) काही बायबल भाषांतरकारांनी कोणते गंभीर बदल केले? (ब) यांचा कोठवर परिणाम झाला?
१२ शास्त्रवचने बदलण्याचे इतर प्रयत्न, केवळ काही वचने वेगळ्या पद्धतीने मांडण्यावरच थांबले नाहीत. या प्रयत्नांमध्ये चक्क खऱ्या देवाच्या ओळखीवरच हल्ला चढवण्यात आला. या बदलांचे स्वरूप आणि त्यांचा अवाका पाहूनच साफ साफ पुरावा मिळतो की यामागे एखाद्या मानवापेक्षा अथवा मानवी संघटनेपेक्षा शक्तिशाली असे काहीतरी होते—होय, यहोवाच्या प्रमुख शत्रूचा अर्थात दियाबल सैतानाचा प्रभाव. त्या प्रभावाला वश होऊन भाषांतरकारांनी आणि नकलाकारांनी—काहींनी उत्साहाने तर इतरांनी नाखुषीने—देवाचे वैयक्तिक नाव त्याच्या प्रेरित वचनातल्या हजारो ठिकाणांहून वगळून टाकायला सुरवात केली. अगदी सुरवातीला, इतर भाषांतरांपैकी इब्रीमधून ग्रीक, लॅटिन, जर्मन, इंग्रजी, इटालियन आणि डचमध्ये भाषांतरण केलेल्या काही भाषांतरांनी एकतर देवाचे नाव संपूर्णतः काढून टाकले किंवा फक्त काही ठिकाणांमध्ये ते राहू दिले. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या प्रतींमधूनही ते काढून टाकण्यात आले.
१३. बायबलमध्ये फेरबदल करण्याच्या सर्वदूर प्रयत्नांमुळे देवाचे नाव मानवी स्मरणातून नाहीसे का झाले नाही?
१३ तरीही, ते गौरवी नाम मानवी स्मरणातून पुसून टाकता आले नाही. इब्री शास्त्रवचनांचे स्पॅनिश, पोर्तुगीज, जर्मन, इंग्रजी, फ्रेंच आणि इतर अनेक भाषांतरांमध्ये देवाचे वैयक्तिक नाव प्रामाणिकपणे सामील करण्यात आले. देवाचे वैयक्तिक नाव, १६ व्या शतकापासून ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या इब्री भाषांतरांमध्ये पुन्हा एकदा दिसून येऊ लागले; १८ व्या शतकापर्यंत जर्मनमध्ये; १९ व्या शतकात क्रोएशियन आणि इंग्रजीमध्ये. लोकांनी देवाचे नाव लपवण्याचा प्रयत्न केला तरी ‘यहोवाचा दिवस’ येईल तेव्हा देव म्हणतो त्याप्रमाणे, ‘त्यांस समजेल की मी यहोवा आहे.’ हा देवाचा बोलून दाखवलेला उद्देश निष्फळ ठरणार नाही.—२ पेत्र ३:१०; यहेज्केल ३८:२३; यशया ११:९; ५५:११.
संदेश जगभर होतो
१४. (अ) विसाव्या शतकापर्यंत, युरोपच्या किती भाषांमध्ये बायबलचे भाषांतर झाले होते आणि त्याचा काय परिणाम झाला? (ब) सन १९१४ च्या शेवटापर्यंत बायबल आफ्रिकेतल्या किती भाषांमध्ये उपलब्ध झाले होते?
१४ विसावे शतक उदयास आले, तेव्हा युरोपच्या ९४ भाषांमध्ये बायबल छापण्याचे काम केव्हाच सुरू झाले होते. जगाच्या त्या भागातल्या बायबल विद्यार्थ्यांना या घटनेचा इशारा मिळाला की, १९१४ मध्ये विदेश्यांचा काळ समाप्त झाल्यावर जगाला हादरून सोडणाऱ्या घटना घडतील आणि अगदी तसेच घडले! (लूक २१:२४) हे १९१४ चे स्मरणीय वर्ष समाप्त होण्याआधीच बायबलचे संपूर्ण अथवा त्यातील काही पुस्तकांचे प्रकाशन आफ्रिकेच्या १५७ भाषांमध्ये त्याचप्रमाणे प्रचलित इंग्रजी, फ्रेंच आणि पोर्तुगीज या भाषांमध्ये झाले होते. तर अशाप्रकारे, तेथे राहणाऱ्या अनेक जमातींमधील आणि राष्ट्रीय गटांमधील विनम्य लोकांकरता आध्यात्मिकरित्या बंधमुक्त करणारी बायबल सत्ये शिकवण्यासाठी पाया घालण्यात आला.
१५. शेवटला काळ सुरू झाला तेव्हा, अमेरिकन देशांतल्या किती भाषांमध्ये बायबल उपलब्ध होते?
१५ भाकीत केलेल्या शेवटल्या दिवसांमध्ये जगाने पदार्पण केले तसे बायबल अमेरिकन देशांमध्ये प्रचलित झाले होते. युरोपमधून देशांतर केलेल्या लोकांनी आपल्या निरनिराळ्या भाषांमध्ये ते त्यांच्यासोबत आणले होते. जाहीर भाषणे व आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांतर्फे—त्यावेळी यहोवाच्या साक्षीदारांना त्या नावाने ओळखले जायचे—प्रकाशित होणाऱ्या बायबल साहित्याचे नेटाने होणारे वितरण, अशाप्रकारे बायबल प्रशिक्षणाचा विस्तारित कार्यक्रम राबवण्यात येत होता. त्या व्यतिरिक्त, पश्चिम गोलार्धातल्या बहुराष्ट्रीय रहिवाश्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बायबल संस्था ५७ अन्य भाषांमध्ये बायबल छापण्याचे काम करतच होत्या.
१६, १७. (अ) जागतिक प्रचार करण्याची वेळ आली तेव्हा बायबल केवढ्या प्रमाणात उपलब्ध होते? (ब) बायबल खरोखर टिकणारे आणि अत्यंत प्रभावशाली पुस्तक कसे सिद्ध झाले आहे?
१६ ‘शेवट येण्याआधी’ सुवार्तेच्या जागतिक प्रचाराची वेळ आली तेव्हा, आशियासाठी आणि पॅसिफिक बेटांसाठी बायबल अज्ञात गोष्ट राहिली नव्हती. (मत्तय २४:१४) जगाच्या त्या भागातल्या २३२ विशिष्ट भाषांमध्ये ते आधीच प्रकाशित होत होते. काही बायबल पूर्ण होते; तर पुष्कळसे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची भाषांतरे होती; इतर भाषांतरे पवित्र शास्त्रवचनांतल्या केवळ एकाच पुस्तकाची होती.
१७ स्पष्टतः, बायबल हे फक्त संग्रहालयातली वस्तू म्हणून टिकून राहिले नव्हते. बाकीच्या सर्व पुस्तकांमध्ये ते सर्वात अधिक भाषांतरित आणि वितरित केलेले पुस्तक होते. ईश्वरी कृपेच्या त्या पुराव्यानुरूप, त्या पुस्तकात जे नोंदले होते ते पूर्ण होत होते. त्यातील शिकवणींचा आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पवित्र आत्म्याचाही पुष्कळ देशांतल्या अनेक लोकांच्या जीवनांवर कायमस्वरूपी परिणाम होत होता. (१ पेत्र १:२४, २५) पण पुढे आणखी पुष्कळ काही व्हायचे होते.
तुम्हाला आठवते का?
◻ कायम राहणारे “आमच्या देवाचे वचन” हे काय आहे?
◻ बायबल दाबून टाकण्यासाठी कोणते प्रयत्न केले गेलेत आणि त्यांचा काय परिणाम झाला?
◻ बायबलची निर्भेळता कशी सुरक्षित राहिली आहे?
◻ देवाचा बोलून दाखवलेला उद्देश जिवंत वचन कसे शाबीत झाले आहे?
[१२ पानांवरील चौकट]
बायबलमधला मूळ मजकूर काय होता ते आपल्याला खरेच माहीत आहे का?
हाताने लिहिलेली सुमारे ६,००० इब्री हस्तलिखिते इब्री शास्त्रवचनांतला मजकूर खरा असल्याचा पुरावा देतात. यातील काही हस्तलिखिते ख्रिस्त-पूर्व काळातली आहेत. संपूर्ण इब्री शास्त्रवचनांची सध्या अस्तित्वात असलेली निदान १९ हस्तलिखिते तरी चलित छपाईचा शोध लागण्यापूर्वीच्या काळातली आहेत. शिवाय, त्याच काळातली २८ अन्य भाषांतरे देखील हयात आहेत.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांच्या बाबतीत पाहता, ग्रीकमधील सुमारे ५,००० हस्तलिखितांची नोंद आहे. यातील एक तर सा.यु. १२५ पूर्वीचे असल्याचे म्हटले जाते; म्हणजे, मूळ लिखाण झाले त्यानंतर केवळ काही वर्षांनंतरची ही गोष्ट झाली. आणि काही भाग पुष्कळ पुरातन असल्याचे मानले जाते. २७ ईश्वरप्रेरित पुस्तकांमधल्या २२ पुस्तकांसाठी १० ते १९ पूर्ण अन्सीयल हस्तलिखिते आहेत. बायबलच्या ह्या भागातल्या पुस्तकांसाठी जर सर्वात कमी संपूर्ण अन्सीयल हस्तलिखिते असतील तर ती फक्त तीन आहेत—प्रकटीकरणाच्या पुस्तकासाठी. संपूर्ण ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे एक हस्तलिखित तर सा.यु. चौथ्या शतकाचे आहे.
इतर कोणत्याही प्राचीन साहित्याला अशा भरमसाट प्राचीन लिखित पुराव्याची खात्री मिळालेली नाही.