वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १२/१५ पृ. १६-२१
  • तारणासाठी जाहीर घोषणा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तारणासाठी जाहीर घोषणा करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “शेवटल्या काळी”
  • तारणासाठी प्रार्थना
  • ‘विश्‍वासाचे वचन’ कबूल करणे
  • यहोवाच्या नावाचा धावा करणे
  • प्रचारकांचे ‘मनोरम चरण’
  • “तारणाची आशा” क्षणभरही नजरेआड होऊ देऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • कोणाला ‘तारले’ जाईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तारण—याचा खरा अर्थ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “संकटसमयी” कोण वाचेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १२/१५ पृ. १६-२१

तारणासाठी जाहीर घोषणा करा

‘जो कोणी यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’—रोमकर १०:१३.

१. संपूर्ण इतिहासात कोणत्या सूचना देण्यात आल्या?

इतिहास अनेक ‘यहोवाच्या दिवसांचे’ वर्णन करतो. नोहाच्या दिवसातील जलप्रलय, सदोम आणि गमोराचा नाश, सा.यु.पू. ६०७ आणि सा.यु. ७० मधील जेरुसलेमवर आलेले नाश, हे यहोवाचे मोठे व भयंकर दिवस होते. यहोवाविरुद्ध बंड पुकारणाऱ्‍यांचा सूड घेणारे ते दिवस होते. (मलाखी ४:५; लूक २१:२२) त्या दिवसांत अनेक लोक त्यांच्या दुष्टपणामुळे नाश पावले. पण काही बचावले. यहोवाने सूचना दिल्या, येऊन ठेपलेल्या संकटाची दुष्टांना चेतावणी दिली आणि सात्विकांना स्वतःचा बचाव करण्याची संधी दिली.

२, ३. (अ) पेन्टेकॉस्टला कोणता भविष्यसूचक इशारा उद्धृत करण्यात आला होता? (ब) सा.यु. ३३ पेन्टेकॉस्टपासून, यहोवाच्या नावाचा धावा करण्यास कशाची आवश्‍यकता होती?

२ सा.यु. ७० मध्ये झालेल्या जेरुसलेमचा नाश याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. होणाऱ्‍या त्या घटनेचे सुमारे ९०० वर्षांआधी भाकीत करीत संदेष्टा योएलने लिहिले: “मी आकाशात व पृथ्वीवर रक्‍त, अग्नि व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन. परमेश्‍वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्‍तमय होईल.” अशा भयावह समयातून एखाद्याचा बचाव कसा होऊ शकत होता? ईश्‍वरप्रेरणेने योएलने लिहिले: “तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्‍वराचा [“यहोवाचे,” NW] धावा करील तो तरेल; कारण परमेश्‍वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्‍वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील.”—योएल २:३०-३२.

३ सा.यु. ३३ पेन्टेकॉस्टला प्रेषित पेत्राने जेरुसलेममध्ये यहुदी आणि यहुदीमतानुसारी यांच्या समूहाला उद्देशून योएलची भविष्यवाणी उद्धृत करीत त्याच्या श्रोतृगणाला दाखवून दिले, की ते पुढील भविष्यवाणीची पूर्णता त्यांच्या दिवसात पाहू शकतील: “वर आकाशात अद्‌भुते, व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्‍त अग्नि व धुम्ररूप वाफ अशी मी दाखवीन; परमेश्‍वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्‍तमय होईल; तेव्हा असे होईल की, जो कोणी परमेश्‍वराच्या [“यहोवाच्या”] नावाने त्याचा धावा करील तो तरेल.” (प्रेषितांची कृत्ये २:१६-२१) पेत्राचा श्रोतृगण मोशेच्या नियमशास्त्राधीन असल्यामुळे त्यांना यहोवाचे नाव माहीत होते. पेत्राने स्पष्टीकरण दिले, की अशाप्रकारे, यहोवाच्या नावाचा धावा करण्यात आणखी पुष्कळ काही गोवलेले आहे. मुख्य म्हणजे यात, ज्याला ठार मारण्यात आले व नंतर अमर स्वर्गीय जीवनाकरिता पुनरुत्थित करण्यात आले त्या येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेणे समाविष्ट होते.—प्रेषितांची कृत्ये २:३७, ३८.

४. ख्रिश्‍चनांनी कोणता संदेश ऐकवला?

४ पेन्टेकॉस्टपासून पुढे, ख्रिश्‍चनांनी पुनरुत्थित येशूचा प्रचार केला. (१ करिंथकर १:२३) मानवांना आता यहोवा देवाचे आध्यात्मिक पुत्र म्हणून दत्तक घेता येऊ शकते, व त्यांना ‘यहोवाचे गुण प्रसिद्ध करणाऱ्‍या’ एका आध्यात्मिक राष्ट्राचे अर्थात एका नवीन ‘देवाच्या इस्राएलचे’ भाग बनता येते हे ख्रिश्‍चनांनी जगाला माहीत करून दिले. (गलतीकर ६:१६; १ पेत्र २:९) मृत्यूपर्यंत विश्‍वासू राहणारे, येशूच्या स्वर्गीय राज्यात त्याचे सहवारीस या नात्याने अमर स्वर्गीय जीवनाचा वारसा प्राप्त करतील. (मत्तय २४:१३; रोमकर ८:१५, १६; १ करिंथकर १५:५०-५४) याशिवाय, या ख्रिश्‍चनांना यहोवाच्या येणाऱ्‍या महान व भयंकर दिवसाची घोषणा करावयाची होती. जेरुसलेमवर आणि देवाचे लोक असल्याचा दावा करणाऱ्‍या लोकांवर असे एक संकट येणार आहे ज्याचा त्यांनी त्यांच्या अख्ख्या जीवनात कधी अनुभव घेतला नसेल, हा इशारा ख्रिश्‍चनांनी त्या यहुदी जगाला द्यावयाचा होता. परंतु, त्या संकटातून काही लोक जरूर वाचणार होते. कोण बरे? जे यहोवाच्या नावाचा धावा करतील.

“शेवटल्या काळी”

५. आज कोणत्या भविष्यवाणीच्या पूर्णता झाल्या आहेत?

५ अनेक प्रकारे, तेव्हाच्या परिस्थितीने आज आपण जे काही पाहतो ते पूर्वचिन्हित केले. १९१४ पासून, मानवजात एका खास समयात जगत आहे ज्याला बायबलमध्ये ‘अंतसमय,’ ‘युगाची समाप्ती,’ व ‘शेवटला काळ,’ असे संबोधले आहे. (दानीएल १२:१, ४; मत्तय २४:३-८; २ तीमथ्य ३:१-५, १३) आपल्या शतकात, क्रूर युद्धे, अनिर्बंध हिंसा आणि समाजाचा तसेच पर्यावरणाचा नाश, यांनी बायबल भविष्यवाणीची उल्लेखनीय पूर्णता केली आहे. ह्‍या सर्व गोष्टी येशूने भाकीत केलेल्या चिन्हाचा भाग आहेत; मानवजात यहोवाच्या अंतिम, अटळ भयजनक दिवस अनुभवण्याच्या मार्गावर आहे, हे सूचित करतात. ते, ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही, व पुढे कधीही येणार नाही अशा मोठ्या संकटाचा’ कळस असलेल्या हर्मगिदोनाच्या लढाईत समाप्त होते.—मत्तय २४:२१; प्रकटीकरण १६:१६.

६. (अ) नम्र लोकांच्या बचावासाठी यहोवा कोणते कार्य करीत आहे? (ब) बचाव कसा मिळवावा याबाबत पौलाचा सल्ला आपल्याला कोठे मिळतो?

६ नाशाचा तो दिवस जसजसा जवळ येतो तसतसा यहोवा नम्र लोकांच्या बचावासाठी कार्य करीत आहे. या ‘अंतसमयात’ त्याने देवाच्या आध्यात्मिक इस्राएलच्या उरलेल्यांना गोळा केले आहे आणि त्याच्या पार्थिव सेवकांचे लक्ष, १९३० च्या दशकापासून, ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्‍यांपैकी कोणाला मोजता आला नाही अशा मोठ्या लोकसमुदायाच्या’ एकत्रीकरणाकडे वळवले आहे. गट या नात्याने ते “मोठ्या संकटातून” जिवंत बचावतात. (प्रकटीकरण ७:९, १४) पण प्रत्येक व्यक्‍ती तिचा किंवा त्याचा बचाव होण्याची खात्री नक्की कशी करू शकते? प्रेषित पौल या प्रश्‍नाचे उत्तर देतो. रोमकराच्या १० अध्यायात तो बचावाकरता उत्तम सल्ला देतो—असा सल्ला जो त्याच्या दिवसांतही लागू होत होता आणि आज आपल्या दिवसांतही तितकाच लागू होतो.

तारणासाठी प्रार्थना

७. (अ) रोमकर १०:१, २ मध्ये कोणत्या आशेची ओळख करून देण्यात आली आहे? (ब) यहोवा आता सुवार्तेची घोषणा मोठ्या प्रमाणावर का करवून घेत असावा बरे?

७ पौलाने रोमकराचे पुस्तक लिहिले त्यावेळेपावेतो तर यहोवाने इस्राएल राष्ट्राला नाकारले होते. तरीसुद्धा, प्रेषित ठासून सांगतो: “त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की, त्यांचे तारण व्हावे.” त्याला वाटत होते, की सर्व यहुदी देवाच्या इच्छेचे अचूक ज्ञान प्राप्त करतील जेणेकरून त्यांचा बचाव होऊ शकेल. (रोमकर १०:१, २) याशिवाय, मानवजातीच्या संपूर्ण जगात विश्‍वास प्रकट करणाऱ्‍यांना तारण प्राप्त व्हावे अशी यहोवाची इच्छा आहे; योहान ३:१६ मध्ये तेच म्हटले आहे: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” येशूच्या खंडणी बलिदानाने या महान तारणाचे द्वार खोलले. नोहाच्या आणि त्यानंतर आलेल्या इतर न्यायाच्या दिवसांत, यहोवाने “सुवार्तेची” घोषणा करवून तारणाचा मार्ग दाखवून दिला.—मार्क १३:१०, १९, २०.

८. पौलाचे उदाहरण गिरवत खरे ख्रिस्ती आज कोणाबद्दल मनीषा दाखवतात व का?

८ यहुदी आणि विदेशी या दोघांबद्दलची आपली मनीषा प्रकट करीत पौलाने पदोपदी मिळणाऱ्‍या संधीत प्रचार केला. तो “यहूद्यांची व हेल्लेण्यांची खात्री करून देत असे.” इफिसच्या वडिलांना त्याने सांगितले: “जे हितकारक ते तुम्हाला सांगण्यात आणि चार लोकात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. पश्‍चात्ताप करून देवाकडे वळणे व आपल्या प्रभु येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवणे ह्‍यासंबंधाने यहूदी व हेल्लेणी ह्‍यांस मी साक्ष देत होतो.” (प्रेषितांची कृत्ये १८:४; २०:२०, २१) तसेच, आज यहोवाच्या साक्षीदारांनी, तथाकथित ख्रिश्‍चनांनाच नव्हे तर सर्व लोकांना, “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” प्रचार कार्यात स्वतःला कामी लावले आहे.—प्रेषितांची कृत्ये १:८; १८:५.

‘विश्‍वासाचे वचन’ कबूल करणे

९. (अ) रोमकर १०:८, ९ कोणत्या प्रकारच्या विश्‍वासास उत्तेजन देते? (ब) आपण आपला विश्‍वास कधी व कशाप्रकारे प्रकट करणे आवश्‍यक आहे?

९ तारणासाठी सहनशील विश्‍वास आवश्‍यक आहे. अनुवाद ३०:१४ चा उल्लेख करून पौल म्हणाला: ‘ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे; आम्ही गाजवीत असलेले विश्‍वासाचे वचन हेच होय.’ (रोमकर १०:८) आपण जितके त्या ‘विश्‍वासाच्या वचनाचा’ प्रचार करू तितके अधिक ते आपल्या हृदयात कोरले जाते. पौलाच्या बाबतीत असेच झाले व त्याच्या पुढील शब्दांमुळे आपल्याला, इतरांना त्या विश्‍वासाबद्दल सांगण्याचा त्याच्यासारखा आपला निश्‍चय बळकट करता येईल: “येशू प्रभु आहे असे जर ‘तू आपल्या मुखाने’ कबूल करिशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा ‘आपल्या अंतःकरणात’ विश्‍वास ठेवशील तर तुझे तारण होईल.” (रोमकर १०:९) फक्‍त बाप्तिस्म्याच्या वेळी सर्वांसमक्षच असे कबूल करणे नव्हे तर ते निरंतर कबूल करणे, सत्याच्या सर्व महान पैलूंविषयीची आवेशी जाहीर साक्ष असणे आवश्‍यक आहे. अशाप्रकारचे सत्य सार्वभौम प्रभू यहोवाच्या मौल्यवान नावावर; आपला मशिही राजा आणि खंडणीदाता प्रभू येशू ख्रिस्तावर; आणि भव्य राज्य अभिवचनांवर केंद्रित आहे.

१०. रोमकर १०:१०, ११ नुसार, ‘विश्‍वासाचा विषय असलेले वचन’ आपण कसे हाताळणे आवश्‍यक आहे?

१० ‘विश्‍वासाचे वचन’ जो कोणी स्वीकारत नाही व अनुसरत नाही त्याला तारण नाही, त्याबद्दल प्रेषित पुढे म्हणतो: “जो अंतकरणाने विश्‍वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करितो त्याचे तारण होते. कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्‍वास ठेवणारा कोणीहि फजित होणार नाही.’” (रोमकर १०:१०, ११) ‘विश्‍वासाचा विषय असलेल्या वचनाचे’ अचूक ज्ञान मिळवून आपल्या अंतःकरणात त्याचे संवर्द्धन करीत राहणे आवश्‍यक आहे जेणेकरून इतरांना सांगण्यास आपण प्रेरित होऊ शकू. स्वतः येशूने आपल्याला आठवण करून दिली: “ह्‍या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाहि वाटेल.”—मार्क ८:३८.

११. सुवार्तेची घोषणा किती प्रमाणावर होणे आवश्‍यक आहे व का?

११ संदेष्टा दानीएल याने भाकीत केल्याप्रमाणे, या अंतसमयात, “सुज्ञ” जन पृथ्वीच्या टोकापर्यंत राज्याची साक्ष दिली जाते तसे ‘अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकताना’ दिसत आहेत. ते “पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे” वळवत आहेत आणि खऱ्‍या ज्ञानाची खरोखरच वृद्धी होत चालली आहे; कारण यहोवा या अंतसमयाविषयीच्या भविष्यवाणींवर आणखी प्रकाश टाकत आहे. (दानीएल १२:३, ४) हा आहे, सत्य आणि धार्मिकतेवर प्रेम करणाऱ्‍या सर्वांच्या बचावासाठी महत्त्वपूर्ण असलेला तारणाचा संदेश.

१२. रोमकर १०:१२ चा प्रकटीकरण १४:६ मध्ये वर्णन केलेल्या देवदूताच्या कामगिरीशी कसा मेळ बसतो?

१२ प्रेषित पौल पुढे म्हणतो: “यहूदी व हेल्लेणी ह्‍यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभु तोच आणि जे त्याचा धावा करितात त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्‍न आहे.” (रोमकर १०:१२) आज, सर्व लोकांना, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत—विश्‍वव्यापी प्रमाणावर ‘सुवार्तेचा’ प्रचार करण्याची आवश्‍यकता आहे. प्रकटीकरण १४:६ मधील देवदूताचे अंतराळाच्या मध्यभागी उडणे चालूच आहे, “पृथ्वीवर राहणाऱ्‍यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यास सांगावयास सार्वकालिक सुवार्ता” त्याने आपल्याजवळ दिली आहे. प्रतिसाद देणाऱ्‍यांना याचा लाभ कसा होईल?

यहोवाच्या नावाचा धावा करणे

१३. (अ) वर्ष १९९८ चे आपले वार्षिक वचन काय आहे? (ब) हे वार्षिक वचन आज अगदी उचित का आहे?

१३ योएल २:३२ चा उल्लेख करून पौल म्हणतो: ‘जो कोणी यहोवाचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’ (रोमकर १०:१३) १९९८ वर्षाकरता यहोवाच्या साक्षीदारांच्या वार्षिक वचनाकरता या शब्दांची निवड किती उचित आहे! यहोवावर भरवसा ठेवण्यास, त्याचे नाव आणि ते सूचित करत असलेले महान उद्देश लोकांना सांगण्यास पुढे येणे पूर्वी कधीही नव्हते तितके आज महत्त्वपूर्ण आहे! पहिल्या शतकाप्रमाणे, सध्याचे भ्रष्ट व्यवस्थीकरण असलेल्या शेवटल्या दिवसांतही, “ह्‍या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या” ही निकडीची विनंती सर्वत्र दुमदुमत आहे. (प्रेषितांची कृत्ये २:४०) जगभरातील सर्व देव-भीरू लोकांना हे खणखणीत आमंत्रण दिले जाते, की त्यांनी स्वतःला आणि सुवार्तेची जाहीर घोषणा ऐकणाऱ्‍यांना तारण मान्य करावे म्हणून यहोवाच्या नावाचा धावा करावा.—१ तीमथ्य ४:१६.

१४. तारणासाठी कोणत्या दुर्गाचा आपण धावा करणे आवश्‍यक आहे?

१४ या पृथ्वीवर यहोवाच्या महान दिवसाचा उद्रेक होईल तेव्हा काय घडेल? पुष्कळजण तारणासाठी यहोवाकडे पाहणार नाहीत. सामान्यपणे मानवजात ‘डोंगरास व खडकास म्हणतील, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टीपुढून व कोकऱ्‍याच्या क्रोधापासून आम्हास लपवा.’ (प्रकटीकरण ६:१५, १६) या व्यवस्थीकरणातील डोंगरासमान संघटनांवर आणि संस्थांवर त्यांचा भरवसा आहे. तेच त्यांनी सर्वात महान दुर्ग अर्थात यहोवा देवावर भरवसा ठेवला असता, तर किती बरे झाले असते! (अनुवाद ३२:३, ४) यहोवाविषयी राजा दावीद म्हणाला: “परमेश्‍वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा” आहे. यहोवा आपला ‘तारणदुर्ग’ आहे. (स्तोत्र १८:२; ९५:१) त्याचे नाव “बळकट दुर्ग आहे,” येणाऱ्‍या संकटातून आपला बचाव करण्यास समर्थ असलेला एकमेव “दुर्ग.” (नीतिसूत्रे १८:१०) म्हणूनच, आज हयात असलेल्या सुमारे सहाशे कोटी मानवांना होता होईल तेवढे यहोवाच्या नावाचा धावा विश्‍वासाने व प्रामाणिकपणे करण्यास शिकवणे महत्त्वाचे आहे.

१५. रोमकर १०:१४ विश्‍वासाविषयी काय सूचित करते?

१५ उचितपणे, प्रेषित पौल विचारतो: “तर ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील?” (रोमकर १०:१४) असे अनेक लोक आहेत ज्यांना तारणासाठी यहोवाच्या नावाचा धावा करण्याकरता ‘विश्‍वासाचे वचन’ आपलेसे करण्यास अजूनही मदत करता येऊ शकते. विश्‍वास सर्वात महत्त्वाचा आहे. पौल दुसऱ्‍या एका पत्रात म्हणतो: “विश्‍वासावाचून [देवाला] संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्‍याने असा विश्‍वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” (इब्री लोकांस ११:६) परंतु आणखी लाखो लोक देवावर विश्‍वास कसा ठेवू शकतील बरे? रोमकरांना लिहिलेल्या पत्रात पौल विचारतो: “ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील?” (रोमकर १०:१४) त्यांच्या ऐकण्यासाठी यहोवाने काही व्यवस्था केली आहे का? होय! पौलाचे पुढील शब्द ऐका: “घोषणा करणाऱ्‍यावाचून ते कसे ऐकतील?”

१६. ईश्‍वरीय व्यवस्थेत प्रचारकांची आवश्‍यकता का आहे?

१६ पौलाच्या या युक्‍तिवादावरून हे अगदी स्पष्ट होते की प्रचारकांची आवश्‍यकता आहे. येशूने सूचित केले, की “युगाच्या समाप्तीपर्यंत” हे असे असणार होते. (मत्तय २४:१४; २८:१८-२०) प्रचार कार्य, बचावासाठी यहोवाच्या नावाचा धावा करण्यास लोकांना मदत करण्याकरता ईश्‍वरी व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. ख्रिस्ती धर्मजगतातील देखील पुष्कळ जण देवाच्या मौल्यवान नावाचा आदर करण्याकरता काहीही करत नाहीत. पुष्कळांनी यहोवाविषयी आणि अवर्णनीय त्रैक्याच्या सिद्धान्तामधील इतर दोघांबरोबर गोंधळ करून टाकला आहे. तसेच, पुष्कळ जण स्तोत्र १४:१ आणि ५३:१ मध्ये म्हटल्यानुसार, “मूढ आपल्या मनात म्हणतो, देव नाही,” असे म्हणणाऱ्‍यांच्या वर्गात मोडले जातात. यहोवा जिवंत देव आहे हे त्यांना माहीत होणे आवश्‍यक आहे, शिवाय येणाऱ्‍या मोठ्या संकटातून बचाव मिळवायचा आहे तर त्याच्या नावाचा धावा करणे आवश्‍यक आहे हे त्यांनी समजून घेणे जरूरीचे आहे.

प्रचारकांचे ‘मनोरम चरण’

१७. (अ) पौलाने पुनःस्थापनेची भविष्यवाणी उद्धृत करणे उचित का आहे? (ब) ‘मनोरम चरण’ असण्यात काय गोवले आहे?

१७ प्रेषित पौल आणखी एक महत्त्वाचा प्रश्‍न विचारू इच्छितो: “त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील? ‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्‍याचे चरण किती मनोरम आहेत!’ असा शास्त्रलेख आहे.” (रोमकर १०:१५) पौलाने येथे यशया ५२:७ चा संदर्भ घेतला आहे; हे वचन पुनःस्थापनेच्या भविष्यवाणीचा एक भाग आहे जे १९१९ पासून लागू होते. आज परत एकदा यहोवा “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो,” त्याला पाठवतो. देवाचे अभिषिक्‍त ‘पहारेकरी’ आणि त्यांचे सहकर्मी आज्ञाधारकपणे उच्च स्वराने जयघोष करतात. (यशया ५२:७, ८) तारण जाहीर करणाऱ्‍यांचे चरण आज थकू शकतात, घरोघरी जाताना मातीने माखू शकतात पण त्यांचे चेहरे मात्र किती आनंदाने फुललेले असतात! शांतीची सुवार्ता घोषित करण्याची व शोक करणाऱ्‍यांना सांत्वन देण्याची व अशांचे तारण दृष्टीपथात ठेवून यहोवाच्या नावाचा धावा करण्यास मदत करण्याची कामगिरी यहोवाने त्यांच्यावर सोपविली आहे हे त्यांना माहीत आहे.

१८. सुवार्तेची घोषणा झाल्यानंतरच्या शेवटल्या परिणामाविषयी रोमकर १०:१६-१८ वचन काय सांगते?

१८ “ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्‍वास” ठेवो अगर त्याच्याकडे दुर्लक्ष करो, पौलाचे पुढील शब्द खरे आहेत: “त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. त्याचा नाद सर्व पृथ्वीवर व त्यांचे शब्द दिगंतरी पोहोंचले.” (रोमकर १०:१६-१८) त्याची सृष्ट कार्ये प्रकट करतात त्यानुसार जसे “आकाश देवाचा महिमा वर्णिते,” तसेच पृथ्वीवरील त्याच्या साक्षीदारांनी ‘सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करण्यासाठी यहोवाच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा.’—स्तोत्र १९:१-४; यशया ६१:२.

१९. आज ‘यहोवाच्या नावाने धावा’ करणाऱ्‍यांना काय मिळेल?

१९ यहोवाचा मोठा व भयंकर दिवस अधिक जवळ येत आहे. “त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्‍वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.” (योएल १:१५; २:३१) आणखी पुष्कळांनी निकडीने सुवार्तेला प्रतिसाद द्यावा, यहोवाच्या संघटनेकडे झुंडीने यावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. (यशया ६०:८; हबक्कूक २:३) नोहाच्या दिवसात, लोटाच्या दिवसात आणि धर्मत्यागी इस्राएल व यहुदाच्या दिवसात आलेल्या यहोवाच्या दिवसांनी दुष्टांचा नाश केला याची आठवण करा. आपण सर्वात मोठ्या संकटाच्या कडेवर उभे आहोत, आता यहोवाकडून येणारे वावटळीचे वारे या पृथ्वीच्या पाठीवरून दुष्टाईला वाहून नेऊन चिरकालिक शांतीच्या परादीससाठी मार्ग मोकळा करील. विश्‍वासूपणे ‘यहोवाच्या नावाचा धावा’ करणाऱ्‍यांपैकी तुम्ही एक असाल का? असाल तर, आनंद करा! तुमचा बचाव होईल असे स्वतः देव तुम्हाला वचन देतो.—रोमकर १०:१३.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ सा.यु. ३३ पेन्टेकॉस्ट नंतर कोणत्या नवीन गोष्टींची घोषणा करण्यात आली?

◻ ‘विश्‍वासाचा विषय असलेल्या वचनाच्या’ बाबतीत ख्रिश्‍चनांनी लक्ष कसे दिले पाहिजे?

◻ ‘यहोवाच्या नावाचा धावा’ करणे म्हणजे नेमके काय?

◻ कोणत्या अर्थाने राज्य संदेशवाहकांचे ‘चरण मनोरम’ आहेत?

[१८ पानांवरील चित्र]

देवाचे लोक प्वेर्तो रिको, सेनेगल, पेरू, पापुआ-न्यू-गिनी—होय, संपूर्ण विश्‍वभर त्याचे गुण प्रसिद्ध करीत आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा