वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १२/१५ पृ. २८-२९
  • यहोवा दयेने राज्य करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा दयेने राज्य करतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाच्या दयेचे अनुकरण करणे
  • निर्दयी जगात दया
  • यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • कनवाळू व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवा—आमचा कनवाळू पिता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “कनवाळू” असा
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १२/१५ पृ. २८-२९

यहोवा दयेने राज्य करतो

संपूर्ण इतिहासात मानवी राज्यकर्त्यांनी त्यांच्या प्रजेच्या दुःखाकडे निर्दयीपणे कानाडोळा करत राज्य केले आहे. पण यहोवाने एक राष्ट्र—इस्राएल—निवडून त्यावर दयेने राज्य करण्याद्वारे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे दाखवले.

इस्राएल लोक अद्यापही प्राचीन इजिप्तच्या दास्यत्वात होते तेव्हा त्यांनी मदतीकरता केलेला आक्रोश यहोवाने ऐकला. “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला, . . . त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने [“दयेने,” NW] त्यांस उद्धारिले.” (यशया ६३:९) यहोवाने इस्राएलचा बचाव केला, चमत्कारिकपणे त्यांच्या अन्‍नाची व्यवस्था केली आणि त्यांच्या स्वतःच्या देशात त्यांना पोहंचते केले.

यहोवाने या राष्ट्राला दिलेल्या नियमाद्वारेही त्याच्या दयेच्या गुणाचे दर्शन घडले. अनाथ, विधवा आणि अन्यदेशीयांसोबत दयेने व्यवहार करण्याची आज्ञा त्याने इस्राएलांना दिली. त्यांना कोणत्याही निःशक्‍त व्यक्‍तीचा गैरफायदा घ्यायचा नव्हता.

गरजवंताना दया दाखविण्याची अपेक्षा नियमशास्त्रात करण्यात आली होती. कापणी झाल्यानंतर गरिबांना शेतातील सरवा वेचण्याची मुभा होती. शब्बाथ (सातव्या) वर्षी कर्ज माफ केली जात. वारशाने प्राप्त झालेली जमीन विकली असल्यास ती योबेल (५० व्या) वर्षी परत केली जात असे. प्राचीन इस्राएल—त्याचे जीवन आणि त्याची स्थापना (इंग्रजी) अहवाल देते: “त्यावेळी इस्राएलमध्ये आजच्याप्रमाणे सामाजिक वर्ग नव्हते.” “देशात वास्तव्य करण्याच्या आरंभीच्या दिवसांत सर्व इस्राएलांचे राहणीमान जवळजवळ सारखेच होते.”—लेवीय २५:१०; अनुवाद १५:१२-१४; २४:१७-२२; २७:१८.

यहोवाच्या दयेचे अनुकरण करणे

देवाचे सेवक त्याच्या दयेमुळे प्रेरित होतात. उदाहरणार्थ, संपूर्ण इतिहासात गादीवर आलेल्या नवीन राजांनी त्यांच्या आधीच्या राजघराण्यातील बचावलेल्या सदस्यांना ठार मारले आहे. पण यहोवाचा सेवक दावीद याने मात्र तसे केले नाही. शौल राजाच्या मृत्यूनंतर त्याचा बचावलेला नातू आणि वारस अर्थात भफीबोशेथ याला दावीदाने शरण दिली. “शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र भफीबोशेथ याची राजाने गय [दया] केली.”—२ शमुवेल २१:७.

यहोवाच्या दयेचे येशूप्रमाणे इतर कोणत्याही मानवांनी अनुकरण केले नाही. ईश्‍वरी दयेने प्रवृत्त होऊन त्याने अनेक चमत्कार केले. एकदा एका कुष्ठरोग्याने त्याला विनंती केली: “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा.” येशूला त्याचा कळवळा आला आणि त्याने त्याला असे म्हणून स्पर्श केला: “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” (मार्क १:४०-४२) दुसऱ्‍या एके प्रसंगी मोठा लोकसमुदाय येशूच्या मागे चालला होता. या लोकांच्या गडबडीत देखील येशूने दोन अंध व्यक्‍तींकडे लक्ष दिले जे असे ओरडत होते: “हे प्रभो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा. . . . येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांस स्पर्श केला; तेव्हा त्यांस तत्काळ दिसू लागले.”—मत्तय २०:२९-३४.

मोठ्या लोकसमुदायांमुळे येशूच्या इतरांप्रती असणाऱ्‍या भावना नाहीशा झाल्या नाहीत. काही दिवसांपासून ते उपाशी असल्यामुळे त्याने म्हटले: “मला ह्‍या लोकांचा कळवळा येतो.” म्हणून त्याने त्यांना चमत्कारिकरीत्या खाऊ घातले. (मार्क ८:१-८) येशू जेव्हा प्रचाराला जात असे तेव्हा लोकांना शिकवण्यासोबत त्यांच्या आवश्‍यकतांकडे देखील बारकाईने लक्ष देत असे. (मत्तय ९:३५, ३६) अशा प्रचारानंतर येशूला आणि त्याच्या शिष्यांना जेवणाची देखील उसंत मिळत नसे. बायबलमधील अहवाल आपल्याला सांगतो: “तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी त्यांस निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले; आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्या अगोदर तिकडे पोहंचले. येशू मचव्यातून उतरला नव्हता तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांस बऱ्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.”—मार्क ६:३१-३४.

येशूला केवळ लोकांच्या आजारांमुळे आणि गरिबीमुळे कळवळा आला नाही, तर त्यांच्या आध्यात्मिक परिस्थितीमुळे देखील त्याला त्यांचा कळवळा आला. या लोकांचे पुढारी त्यांचा फायदा घेत होते, यामुळे येशूला “त्यांचा कळवळा आला.” ‘कळवळा येणे’ याकरता ग्रीक शब्दाचा अर्थ आहे “पोटातील आंतडी गोळा होणे.” येशू खरोखरच दयाळू मनुष्य होता!

निर्दयी जगात दया

येशू ख्रिस्त आता यहोवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा आहे. यहोवाने प्राचीन इस्राएलाच्या बाबतीत केले त्याप्रमाणे आजही तो त्याच्या लोकांवर दयेने राज्य करतो. “सेनाधीश परमेश्‍वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधि होतील. . . . मी त्यांजवर दया करीन.”—मलाखी ३:१७.

ज्यांना यहोवाची दया हवी आहे त्यांना त्याचे अनुकरण करणे नितान्त गरजेचे आहे. हे खरे आहे, की आपण अशा जगात जगत आहोत जेथे गरजवंताना मदत करण्यापेक्षा स्वतःचीच जीवनशैली कायम ठेवण्यात लोकांना अधिक रस आहे. अधिकार पदावर असलेले लोक बहुतेक वेळा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या कामगारांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करतात. २ तीमथ्य ३:१-४ येथे एका अशा नैतिक वातावरणाविषयी बायबल अगदी अचूकपणे सांगते ज्या वातावरणामुळे अनेक लोकांच्या हृदयातील दया लोप पावली आहे.

तरी देखील, दया दाखविण्यासाठी आपल्याला संधी मिळू शकते. आपल्या शेजाऱ्‍यांना आवश्‍यक ती मदत करणे आपल्याला शक्य आहे का? एखादी व्यक्‍ती आजारी असल्यास आपण तिला भेटू शकतो का? “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या. अशक्‍तांना आधार द्या,” या सल्ल्याच्या एकवाक्यतेत आपण उदास असलेल्यांचे सांत्वन करू शकतो का?—१ थेस्सलनीकाकर ५:१४.

इतर जण चुका करतात तेव्हा कठोरपणे प्रतिक्रिया दाखविण्याचे टाळण्याकरताही दया आपल्याला नक्की मदत करील. आपल्याला सांगण्यात आले आहे: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा.”—इफिसकर ४:३१, ३२.

आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्याच्या प्रवृत्तीवर मात करण्याकरता दया आपल्याला मदत करील. बायबल म्हणते: “करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.” (कलस्सैकर ३:१२) आपल्या देखरेखीखाली असणाऱ्‍या लोकांच्या ठिकाणी स्वतःला ठेवण्यासाठी लीनता आपल्याला मदत करते. दयाळू होणे म्हणजे कठोर होण्यापेक्षा नम्र आणि समजूतदार होणे होय. कार्यक्षम होण्यासाठी लोकांसोबत एखाद्या यंत्राप्रमाणे व्यवहार ठेवणे योग्य नाही. याशिवाय कुटुंबातील दयाळू पतींनी हे लक्षात ठेवण्यास हवे की त्यांच्या पत्नी नाजूक व्यक्‍ती आहेत. (१ पेत्र ३:७) येशूच्या दयाळू उदाहरणावर मनन केल्याने आपल्याला या सर्व बाबतींत मदत होऊ शकते.

येशूने पृथ्वीवरील आपल्या सेवाकार्याच्या दरम्यान लोकांसाठी मनःपूर्वक दया दाखवली यामुळे आपण असा विश्‍वास बाळगू शकतो, की तो आता आणि पुढे देखील एक दयाळू शासनकर्ता राहील. स्तोत्र ७२ येथे भविष्यसूचकपणे असे म्हणते: “तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्‌यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणाऱ्‍यांस चिरडून टाको. समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्र्‌यांचे जीव तो तारील.”—स्तोत्र ७२:४, ८, १३.

देवाचे वचन भाकीत करते: “तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; . . . दुर्जनांचा संहार करील.” काही निर्दयी आणि पाशवी लोक कशा प्रकारे मार्ग बदलतील हे सांगितल्यानंतर ही भविष्यवाणी पुढे म्हणते: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:४-९) ही भविष्यवाणी खात्रीने अभिवचन देते, की संपूर्ण पृथ्वीवर यहोवाला ओळखणारा आणि त्याच्या दयाळू मार्गांचे अनुकरण करणारा समाज असेल!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा