“एपिक्यूरियन” लोकांपासून सावध राहा
“तो फार चांगला आहे! त्याचे नैतिक दर्जे पण खूप उच्च स्तराचे आहेत. तो धुम्रपान करत नाही, मादक पदार्थ घेत नाही की गलिच्छ भाषा वापरत नाही. उलट, ख्रिस्ती म्हणविणाऱ्या लोकांपेक्षा तोच कितीतरी पटीनं चांगला आहे!”
काहीजण आपल्या अनुचित मैत्रींसाठी ती सबब देत असल्याचे तुम्ही ऐकले आहे का? शास्त्रवचनीय परीक्षण केल्यावर ते खरं ठरतं का? एका प्रारंभिक ख्रिस्ती मंडळीचे उदाहरण याबद्दल काही स्पष्टीकरण देते.
पहिल्या शतकात, प्रेषित पौलाने करिंथ मंडळीला इशारा दिला: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” कदाचित काही ख्रिश्चन, ग्रीक तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेल्या लोकांशी बहुतेक एपिक्यूरीयन लोकांसोबतही जवळीक ठेवत होते. हे एपिक्यूरियन कोण होते? करिंथमधल्या ख्रिश्चनांना त्यांचा आध्यात्मिक धोका का होता? त्यांच्यासारखे लोक आजही आहेत का ज्यांच्यापासून आपण सावध राहावयास हवे?—१ करिंथकर १५:३३.
एपिक्यूरियन कोण होते?
एपिक्यूरियन लोक, सा.यु.पू. ३४१ ते २७० च्या काळादरम्यान राहत असलेल्या एपिक्यूरस नामक ग्रीक तत्त्ववेत्त्याचे अनुयायी होते. जीवनात सुख हीच एकमेव किंवा प्रमुख गोष्ट आहे अशी शिकवण तो देत असे. पण म्हणून, एपिक्यूरीयन लोक सुख शोधण्याच्या सतत प्रयत्नात निंदास्पद पद्धतीने, सर्व तत्त्वे झुगारून आणि नीच जीवनशैली जगत होते का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एपिक्यूरसने आपल्या अनुयायांना ती शिकवण दिली नाही! त्याउलट, दूरदर्शीपणा, धैर्य, आत्म-संयम आणि न्यायीपणाने जीवन जगून सुख मिळवणे ही सर्वात उत्तम पद्धत आहे अशी त्याची शिकवण होती. त्याने तत्काळ आणि क्षणिक सुखोपभोगाचा नव्हे तर संपूर्ण जीवनभर उपभोगू शकणाऱ्या सुखाचा पिच्छा करायला सांगितले. म्हणून गंभीर पाप करणाऱ्यांच्या तुलनेत एपिक्यूरियन लोक सद्गुणी दिसत असतील.—पडताळा तीत १:१२.
ख्रिस्ती धर्माशी साम्य?
तुम्ही प्रारंभिक करिंथकर मंडळीचे सदस्य असता तर एपिक्यूरियन लोकांना पाहून तुम्ही प्रभावित झाला असता का? एपिक्यूरियन लोकांची उच्च नैतिक मूल्ये पाहून ख्रिस्ती लोक बिनधास्तपणे त्यांच्यासोबत जवळीक ठेवू शकतात असा कदाचित काहींनी तर्क केला असावा. आणखी पुढे तर्क करत, करिंथकर लोकांना कदाचित एपिक्यूरियन आणि देवाच्या वचनाच्या दर्जांमध्ये साम्य असल्यासारखे वाटले असावे.
उदाहरणार्थ, एपिक्यूरियन लोक मौज करायचे पण प्रमाणात. शारीरिक सुखांपेक्षा मानसिक सुखांना ते अधिक महत्त्व द्यायचे. आपण काय खातोय यापेक्षा ज्या व्यक्तीसोबत खात आहोत तिच्यासोबतचे नाते त्यांच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होते. एपिक्यूरियन लोक राजकारणात भाग घेत नव्हते की गुप्ततेत अपराधही करत नव्हते. “त्यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही!” असा निष्कर्ष काढणे इतके कठीण वाटले नसते.
तथापि, एपिक्यूरियन लोक खरंच प्रारंभिक ख्रिश्चनांसारखे होते का? मुळीच नाही. चांगले आणि वाईट समजण्याचा सराव केलेल्यांना काही महत्त्वपूर्ण भेद दिसू शकले. (इब्री लोकांस ५:१४) तुम्हालाही दिसतात का? एपिक्यूरसच्या शिकवणींना जरा जवळून पडताळून पाहू या.
एपिक्यूरियनीझमची प्रतिकूल बाजू
लोकांच्या मनातून दैवतांची आणि मृत्यूची भीती घालवण्यासाठी एपिक्यूरसने शिकवले की देवांना मानवजातीमध्ये काही रुची नाही आणि ते मानवांच्या कारभारात पडतही नाहीत. एपिक्यूरसनुसार, देवांनी विश्वाची निर्मिती केली नव्हती आणि जीवन हे आकस्मिकपणे अस्तित्वात आले होते. ही शिकवण, “एकच देव” अर्थात निर्माणकर्ता आहे आणि त्याला आपल्या मानवप्राण्यांविषयी काळजी आहे या बायबलच्या शिकवणीच्या स्पष्ट विरोधात नाही का?—१ करिंथकर ८:६; इफिसकर ४:६; १ पेत्र ५:६, ७.
एपिक्यूरसने असेही शिकवले की मरणानंतर कोणत्याही प्रकारचे जीवन असू शकत नाही. ही शिकवण, बायबलच्या पुनरुत्थानाच्या शिकवणीच्या निश्चितच विरोधात होती. प्रेषित पौल अरीयपगामध्ये बोलला तेव्हा पुनरुत्थानाच्या सिद्धान्तावरून पौलाशी असहमत असलेल्यांपैकी कदाचित एपिक्यूरियन लोक असले असतील.—प्रेषितांची कृत्ये १७:१८, ३१, ३२; १ करिंथकर १५:१२-१४.
एपिक्यूरसच्या तत्त्वज्ञानातला सर्वात हानीकारक घटक सर्वात धूर्तही असला असावा. मरणानंतर जीवन नाही या कल्पनेवरून त्याने असा निष्कर्ष काढला की, पृथ्वीवरील आपल्या अल्पावधीत त्याने होता होईल तितक्या आनंदात जगावे. आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, पापी जीवनशैली असावी ही त्याची कल्पना नव्हती तर वर्तमानाचा पुरेपूर आनंद लुटावा; कारण माणूस आज आहे तर उद्या नाही अशी त्याची धारणा होती.
म्हणूनच, गुप्ततेत अपराध करू नये असे त्याने शिकवले कारण तसे केल्यास पकडले जाण्याची भीती असते आणि त्यामुळे निश्चितच वर्तमान आनंदावर विरजण पडू शकते. कोणत्याही गोष्टीच्या अतिरेकाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्याने मर्यादशील असावे असे सांगितले; नाहीतर यामुळेही वर्तमान आनंद उपभोगता येत नाही. इतरांसोबत चांगले नातेसंबंध राखावेत कारण तेही चांगुलपणा दाखवतील तेव्हा फायदा होईल असेही तो सांगे. गुप्त अपराध टाळणे, मर्यादशील असणे आणि मैत्रिपूर्ण असणे या सर्व गोष्टी चांगल्याच आहेत. तर मग, एपिक्यूरसचे तत्त्वज्ञान ख्रिस्ती व्यक्तीसाठी हानीकारक का होते? कारण त्याचा हा सल्ला बेभरवशाच्या दृष्टिकोनावर आधारित होता: “आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे.”—१ करिंथकर १५:३२.
लोकांना सध्या आनंदात कसे राहता येईल हे बायबल दाखवते हे मान्य आहे. परंतु ते सल्ला देते: “सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहा, आणि आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.” (यहूदा २१) होय, बायबल, क्षणभंगुर वर्तमानावर नव्हे तर अनंतकालिक भवितव्यावर अधिक भर देते. एखाद्या ख्रिश्चनासाठी, देवाची सेवा करणे हीच मुख्य गोष्ट आहे, आणि जेव्हा तो देवाला प्रथम स्थान देतो तेव्हा तो आनंदी आणि संतृप्त असतो असे त्याला आढळते. अशाच रीतीने, येशूने देखील स्वहित पाहण्यात नव्हे तर यहोवाची निःस्वार्थाने सेवा करण्यात आणि लोकांना मदत करण्यात आपली शक्ती खर्च केली. त्याने आपल्या शिष्यांना, इतरजणही आपल्याला चांगले वागवतील म्हणून नव्हे; तर खऱ्या प्रेमापोटी त्यांच्याशी चांगले व्यवहार करायला शिकवले. तर स्पष्ट होते की, एपिक्यूरियनीझम आणि ख्रिस्ती धर्म यांच्यामागचे मूलभूत हेतू पूर्णपणे वेगवेगळे होते.—मार्क २१:२८-३१; लूक ६:३२-३६; गलतीकर ५:१४; फिलिप्पैकर २:२-४.
धूर्त धोका
उपरोधिक गोष्ट अशी की, एपिक्यूरियन लोक आनंदी असण्यावर इतका भर देऊनही अनुकूल परिस्थितीत त्यांचा आनंद मर्यादित होता. ‘यहोवाविषयीचा आनंद’ नसल्यामुळे एपिक्यूरियसने जीवन हे “दुःखमय दान” आहे असे म्हटले. (नहेम्या ८:१०) त्यांच्या तुलनेत प्रारंभिक ख्रिस्ती कितीतरी पटीने आनंदी होते! आत्मत्यागाचे उदासीन जीवन जगण्यास येशू उत्तेजन देत नव्हता. उलट, त्याचा मार्ग अनसुरणे हा सर्वस्वी आनंदाकडे नेणारा मार्ग आहे.—मत्तय ५:३-१२.
एपिक्यूरियन विचारसरणीने प्रभावित झालेल्या लोकांसोबत जवळीक राखून आपल्या विश्वासाला काही धोका नाही असा काही करिंथ मंडळीतल्या सदस्यांनी विचार केला असला तर त्यांचे चुकत होते. पौलाने करिंथकरांना पहिले पत्र लिहिले तेव्हा काहींचा पुनरुत्थानावरून विश्वास केव्हाच उडाला होता.—१ करिंथकर १५:१२-१९.
एपिक्यूरियनीझम आज?
एपिक्यूरियनीझमचा सा.यु. चौथ्या शतकात अंत झाला, तरी खा-प्या-मजा-करा अशा दृष्टिकोनाचे लोक आजही आहेत. या लोकांना देवाने दिलेल्या सार्वकालिक जीवनाच्या अभिवचनावर विश्वास नसतो. पण तरीही, त्यांच्यापैकी काहींचे वर्तन तुलनात्मकरित्या उच्च दर्जाचे आहे.
एखाद्या ख्रिश्चनाला अशांसोबत जवळीक ठेवावीशी वाटेल; त्यांच्या चांगल्या गुणांमुळे मैत्री ठेवता येते असा कदाचित तो तर्क करील. परंतु, आपण स्वतःला श्रेष्ठ समजत नसलो, तरी लक्षात ठेवले पाहिजे की सर्व प्रकारच्या “कुसंगतीने”—ज्यांचा प्रभाव धूर्त असतो अशा सोबत्यांमुळे देखील—“नीती बिघडते.”
खा-प्या-मजा-करा हे तत्त्वज्ञान काही बिझनेस सेमिनार, मार्गदर्शक पुस्तके, कादंबऱ्या, चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम आणि संगीतामध्येही आढळू लागले आहे. यामुळे पापी वर्तनाला प्रत्यक्ष उत्तेजन मिळत नसले तरी, या बेभरवशाच्या दृष्टिकोनाचा आपल्यावर धूर्त मार्गांनी प्रभाव पडू शकतो का? उदाहरणार्थ, यहोवाच्या सार्वभौमत्वाचा वादविषय आपल्या नजरेआड होईल इतके आपण आत्मतृप्ती मिळवण्यात दंग होऊ का? “प्रभूच्या कामात . . . अधिकाधिक” करण्याऐवजी ‘काही घाई नाही’ या दृष्टिकोनाने आपण मार्गभ्रष्ट झालो आहोत का? किंवा आपण यहोवाच्या दर्जांच्या योग्यतेबद्दल आणि फायद्यांबद्दल शंका बाळगू लागलो आहोत? प्रत्यक्ष अनैतिकता, हिंसा आणि भूतविद्या तसेच जगिक दृष्टिकोनांनी प्रभावित असलेल्या लोकांपासूनही आपण सावध राहिले पाहिजे!—१ करिंथकर १५:५८; कलस्सैकर २:८.
म्हणून, प्रथम आपण यहोवाच्या मार्गदर्शनाचे संपूर्ण अंतःकरणाने अनुसरण करणाऱ्यांसोबत जवळीक ठेवू या. (यशया ४८:१७) परिणामी, आपल्या उपयुक्त सवयी अधिक मुळावतील. आपला विश्वास बळकट होईल. आपण आताच नव्हे तर, भवितव्यातील सार्वकालिक जीवनाचा विचार करून आनंदी जीवन जगू.—स्तोत्र २६:४, ५; नीतिसूत्रे १३:२०.
[२४ पानांवरील चित्र]
एपिक्यूरसने शिकवले की देवांना मानवांची पर्वा नाही
[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]
Courtesy of The British Museum