वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ११/१ पृ. १९-२२
  • “जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र” होताना मी पाहिले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र” होताना मी पाहिले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अरिझोनात पायनियरींग
  • गिलियड प्रशाला आणि खास सेवा
  • क्यूबा आणि मग प्वेर्तो रिकोला
  • डॉमिनिकन रिपब्लिकमधलं वास्तव्य
  • आता बलाढ्य राष्ट्र
  • आपल्याजवळील मौल्यवान गोष्ट इतरांना देण्यामध्ये जो आनंद आहे, तो मी अनुभवला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • पहिल्याने राज्य मिळवण्यास झटणे—सुरक्षित व आनंदी जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • दृष्टी आणि अंतःकरण प्रतिफळावर लावणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाचे मार्गदर्शन आनंदाने स्वीकारणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ११/१ पृ. १९-२२

“जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र” होताना मी पाहिले

विल्यम डिंगमन यांच्याद्वारे कथित

ते १९३६ चं वर्ष होतं; आणि अमेरिकेच्या संयुक्‍त संस्थानांतील ओरेगन, सालेम हे ते ठिकाण होतं. मी यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेत उपस्थित होतो. तेव्हा असा प्रश्‍न विचारण्यात आला: “प्रचंड समुदाय कुठंय?” (प्रकटीकरण ७:९, सुबोध भाषांतर) मी एकटाच तिथं नवीन होतो म्हणून सगळेच माझ्याकडं बोट दाखवत “तो, तिकडं आहे!” असं म्हणाले.

एकोणीसशे तीसच्या दशकातील मध्यंतरात, यहोवाच्या साक्षीदारांपैकी फार कमी लोकांना पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवन जगण्याची बायबलमधील आशा होती. (स्तोत्र ३७:२९; लूक २३:४३) तेव्हापासून फार बदल झाले आहेत. पण ओरेगन, सालेम इथल्या सभेत मी कसा पोंचलो ते मी आधी सांगतो.

माझ्या वडिलांनी द गोल्डन एज नियतकालिकाची वर्गणी केली होती; हे सावध राहा! नियतकालिकाचे आधीचे नाव होते. मी किशोरावस्थेत होतो तेव्हा मला ती पत्रिका खूप आवडायची आणि मला खात्री पटली की त्यात महत्त्वपूर्ण बायबल सत्य आहे. म्हणून एकदा गोल्डन एजच्या मागच्या पानावर आलेलं कुपन भरून मी पाठवलं. ते पाठवल्यावर वाचकाला २० पुस्तिका, एक पुस्तक आणि यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीचा जवळपासचा पत्ता मिळणार होता. ते सगळं साहित्य मिळाल्यावर मी घरोघरी जाऊन सगळ्या पुस्तिका आणि पुस्तकंसुद्धा वाटप करून आलो.

त्या वेळी माझ्यासोबत कुणीही बायबलचा अभ्यास केला नव्हता. मी तर कुणा यहोवाच्या साक्षीदाराशी बोललोसुद्धा नव्हतो. पण, आता सर्वात जवळच्या राज्य सभागृहाचा पत्ता मिळाल्यावर मी ओरेगन, सालेम इथल्या सभेत पोहंचण्यासाठी ४० किलोमीटर प्रवास करून गेलो. त्या तिथंच मला “प्रचंड समुदाय” म्हणण्यात आलं; त्या वेळी मी फक्‍त १८ वर्षांचा होतो.

सेवाकार्यासाठी तसं पाहिलं तर माझी काहीच तयारी नव्हती, तरीपण मी सालेम मंडळीबरोबर प्रचार करू लागलो. माझ्या साक्षकार्यात मी तीन मुद्दे सांगावेत असं त्यांनी मला सांगितलं. पहिला, यहोवा हा देव आहे; दुसरा म्हणजे येशू ख्रिस्त नियुक्‍त राजा आहे; आणि तिसरा म्हणजे देवाचं राज्य हेच जगासाठी एकमेव आशेचा किरण आहे. प्रत्येक घरी जाऊन तो संदेश सांगण्याचा मी प्रयत्न केला.

सालेममधल्या यहोवाच्या साक्षीदारांसोबत दोन वर्षं घालवल्यावर मी एप्रिल ३, १९३८ मध्ये बाप्तिस्मा घेतला. सालेममधल्या आमच्या मित्रांना, ‘प्रचंड समुदायातल्या’ पुष्कळ जणांना बाप्तिस्मा घेताना पाहून खूप आनंद झाला. फेब्रुवारी १९३९ मध्ये, मी पायनियर किंवा पूर्ण-वेळेचा सेवक बनलो. त्याच वर्षाच्या डिसेंबर महिन्यात, मी अरिझोनाला जायचं निमंत्रण स्वीकारलं; तिथं राज्य उद्‌घोषकांची फार मोठी गरज होती.

अरिझोनात पायनियरींग

अरिझोनात यहोवाच्या साक्षीदारांचं कार्य नुकतंच सुरू झालं होतं, आणि आमच्याबद्दल पुष्कळसा गैरसमज होता, म्हणून संयुक्‍त संस्थानांनी दुसऱ्‍या महायुद्धात भाग घेतला तेव्हा आमचा खूप छळ झाला. उदाहरणार्थ, अरिझोनातील स्टॅफोर्ड इथं मी १९४२ मध्ये सेवा करत असताना काही मॉर्मन पंथीय आमच्यावर हल्ला करणार असं आमच्या कानावर आलं. पण झालं असं की, माझे पायनियर सोबती आणि मी एका मॉर्मन बिशपच्या अगदी घराजवळ राहायचो आणि त्यांना आमच्याबद्दल आदर होता व ते म्हणाले: “मॉर्मन मिशनरी साक्षीदारांसारखे आवेशी असते तर निदान मॉर्मन चर्चमध्ये काहीतरी प्रगती झाली असती.” म्हणून चर्चमध्ये ते म्हणाले: “त्या साक्षीदार मुलांवर हल्ला करणार आहात असं मी ऐकलंय. मी त्यांच्या शेजारीच राहतो आणि हल्ला झाला तर माझी बंदूक आहेच. त्या साक्षीदारांवर मी गोळी नाही चालवणार. हल्ला करायला आलेल्या लोकांवर गोळी चालवीन. म्हणून, तुम्हाला हल्ला करायचा असेल तर काय होईल हे तुम्हाला माहीत आहे.” ते दंगेखोर तिकडे फिरकलेच नाहीत.

अरिझोनात घालवलेल्या तीन वर्षांमध्ये आम्हाला पुष्कळदा तुरुंगाच्या वाऱ्‍या कराव्या लागल्या. एकदा मला ३० दिवस डांबून ठेवलं होतं. आमच्या सेवेदरम्यान पोलिसांचा हा छळ चुकवायला आम्ही फ्लाईंग स्क्वॉड (धावता गट) तयार केला. पुढाकार घेणाऱ्‍या साक्षीदारानं आम्हाला सांगितलं: “आपल्या नावासारखंच वागायचं. सकाळी पाच किंवा सहाला काम सुरू करायचं, प्रत्येक दरवाजावर एक पत्रिका किंवा पुस्तिका ठेवायची आणि धावायचं.” आमच्या ‘धावत्या गटानं’ अरिझोनातलं पुष्कळसं क्षेत्र पूर्ण केलं. पण, नंतर मात्र ते बंद करण्यात आलं कारण त्या प्रकारच्या प्रचारामुळं आस्थेवाईकांना हवी तितकी मदत देता आली नाही.

गिलियड प्रशाला आणि खास सेवा

डिसेंबर १९४२ मध्ये, अरिझोनातल्या अनेक पायनियरांना आणि मला सुद्धा एका नवीन मिशनरी प्रशालेचे निमंत्रण मिळाले की जी यहोवाच्या साक्षीदारांनी स्थापन केली होती. सुरवातीला त्या प्रशालेचं नाव वॉचटावर बायबल गिलियड कॉलेज असं होतं. मागाहून ते नाव वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला असं बदलण्यात आलं. ही प्रशाला सुमारे ४,८०० किलोमीटर दूर, न्यूयॉर्कच्या उत्तरेकडील इथाका शहरानजीक होती.

जानेवारी १९४३ मध्ये ओरेगनला धावती भेट दिल्यावर आम्हापैकी पुष्कळ पायनियरांनी ग्रेहाऊँड नामक बसमधून रवाना होत अरिझोनाच्या वाळवंटातल्या उष्णतेचा निरोप घेतला. पुष्कळ दिवसांनंतर आम्ही आमच्या ठिकाणी पोहंचलो आणि आम्हाला उत्तरीय न्यूयॉर्कच्या हिवाळ्यातील बर्फाचं दर्शन झालं. फेब्रुवारी १, १९४३ रोजी प्रशाला सुरू झाली आणि त्या वेळी तिचे अध्यक्ष नेथन एच. नॉर आपल्या उद्‌घाटन प्रसंगी दिलेल्या भाषणात, उपस्थित असलेल्या शंभर विद्यार्थ्यांना म्हणाले: “तुम्हाला नियुक्‍त सेवक बनवणं हा या कॉलेजचा उद्देश नाही. तुम्ही सेवक तर आहातच आणि अनेक वर्षांपासून सेवेत क्रियाशील राहिला आहात. . . . तुम्ही पुढे जाल त्या क्षेत्रांसाठी तुम्हाला अधिक कार्यक्षम सेवक बनवणं हा या कॉलेजचा एकमेव उद्देश आहे.”

माझं शिक्षण फार कमी असल्यामुळं सुरवातीला मला खूप विचित्र वाटलं. पण तिथले शिक्षक माझ्याशी फार चांगले वागले आणि मग मला अभ्यास आवडू लागला. पाच महिने जबर प्रशिक्षण दिल्यानंतर आमचा वर्ग पदवीधर झाला. त्यानंतर, आमच्यापैकी काहींना न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात पाठवण्यात आलं; तिथं आम्हाला विभागीय पर्यवेक्षकांच्या प्रवासी कार्याचं आणखीन प्रशिक्षण देण्यात आलं. माझी पहिली नियुक्‍ती उत्तर आणि दक्षिण कॅरोलिनामध्ये होती.

त्या आरंभिक दिवसांमध्ये, विभागीय पर्यवेक्षकाला आराम नव्हताच. लहान मंडळीसोबत एक दिवस आणि मोठी मंडळी असली की दोन दिवस त्यांच्यासोबत आम्ही राहायचो. त्या वेळी बहुतेक सगळ्या मंडळ्या लहानच होत्या. भेटी देत आणि प्रश्‍नांची उत्तरं देता देताच बहुतेकदा मध्यरात्र व्हायची; तर असा एक पूर्ण दिवस घालवल्यावर दुसऱ्‍या दिवशी लगेच दुसऱ्‍या मंडळीला जायला मी पहाटे पाचच्या दरम्यान उठायचो. मी जवळजवळ एक वर्ष विभागीय कार्य केलं आणि मग टेनेसीमध्ये आणि त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये पायनियरींग केली.

क्यूबा आणि मग प्वेर्तो रिकोला

मे १९४५ मध्ये, मला इतर अनेकांसोबत माझ्या पहिल्या परदेशी मिशनरी नियुक्‍तीसाठी क्यूबामध्ये रवाना करण्यात आलं! क्यूबाची राजधानी हवाना इथं आम्ही ज्या रात्री पोहंचलो त्याच रात्री नियतकालिक कार्यासाठी गेलो. सान्ता क्लारामध्ये घर मिळेपर्यंत आम्ही हवानातच राहिलो. आमच्या खर्चासाठी, आम्हाला फक्‍त २५ डॉलर महिन्याचा भत्ता मिळायचा; यातच अन्‍न आणि घर भाड्याचाही खर्च होता. आमच्याजवळ असलेल्या साहित्यातून आम्ही पलंग आणि फर्निचर बनवलं आणि सफरचंदाच्या पेट्यांचा कपाट म्हणून वापर केला.

त्यानंतरच्या वर्षी मला विभागीय कार्य नेमून देण्यात आलं. त्या वेळी सबंध क्यूबात एकच विभाग होता. माझ्या आधीचे विभागीय पर्यवेक्षक उंच होते आणि त्यांना चालणं फार आवडायचं म्हणून बंधू-बहिणींना त्यांच्यासोबत अक्षरशः पळावं लागायचं. त्यांना वाटलं, मीही त्यांच्यासारखाच असेन, म्हणून त्यांनी सगळ्याची आधीच व्यवस्था करून ठेवली होती. सर्वजण एकाच दिवशी सेवा कार्यात जायचे नाहीत तर गट पाडून आळीपाळीनं माझ्याबरोबर काम करायचे. पहिल्या दिवशी एका गटानं मला दूरवरच्या क्षेत्रात नेलं, दुसऱ्‍या दिवशी दुसऱ्‍या एका गटानं पुन्हा दूरवरच्या क्षेत्रात नेलं आणि असंच चालत राहिलं. भेट संपली तेव्हा मी पार गळून गेलो होतो तरीही मला खूप मजा आली. त्या मंडळीच्या खूप गोड आठवणी माझ्याजवळ आहेत.

क्यूबामध्ये १९५० पर्यंत ७,००० पेक्षा अधिक प्रचारक होते आणि मेक्सिकोमध्येही तेवढेच होते. त्या वर्षाच्या जुलै महिन्यात मी न्यूयॉर्क शहरातल्या याँकी स्टेडियममधल्या ईश्‍वरी शासन पद्धतीत वाढ या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहिलो. त्यानंतर मला प्वेर्तो रिकोची नवीन मिशनरी नियुक्‍ती मिळाली. गिलियडच्या १२ व्या वर्गातल्या एस्टेल आणि थेल्मा वीक्ली या नवीन मिशनरी माझ्यासोबत प्वेर्तो रिकोच्या हवाई प्रवासात होत्या.

आठ वर्षांनंतर, प्वेर्तो रिकोतल्या बायामोन इथं विभागीय संमेलनाच्या मधल्या सुटीत, व्यासपीठावर एस्टेल आणि माझा साध्यासुध्या पद्धतीत विवाह पार पडला. लग्नाआधी आणि लग्नानंतरही मी विभागीय कार्य केलं. प्वेर्तो रिकोत घालवलेल्या दहाहून अधिक वर्षांत आम्ही दोघांनी खूप वाढ पाहिली—सुरवातीला फक्‍त ५०० प्रचारक होते पण नंतर २,००० पेक्षा अधिक प्रचारक झाले. आम्ही अनेकांना समर्पण आणि बाप्तिस्म्याचं पाऊल उचलायला मदत केली, तसंच पुष्कळ नवीन मंडळ्या स्थापन करण्यातही आमचा हातभार लागला.

डिसेंबर १९६० मध्ये, यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथील जागतिक मुख्यालयातून मिल्टन हेन्शल यांनी प्वेर्तो रिकोला भेट दिली आणि तिथल्या मिशनऱ्‍यांशी बोलले. तुमच्यातले काहीजण एका वेगळ्या नियुक्‍तीसाठी तयार व्हाल का असं त्यांनी विचारलं. इतरांसोबत आम्ही दोघंही तयार झालो.

डॉमिनिकन रिपब्लिकमधलं वास्तव्य

डॉमिनिकन रिपब्लिक ही आमची नवीन नियुक्‍ती होती आणि आम्ही जून १, १९६१ रोजी तिकडं जायचं ठरवलं. मे ३० रोजी डॉमिनिकन हुकूमशहा, रफायल ट्रुहियो यांचा खून करण्यात आला आणि त्या देशात जाणारी विमाने रद्द करण्यात आली. पण, विमानांची सेवा पुन्हा सुरू झाली आणि ठरवल्यानुसार आम्ही जून १ रोजी डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये पोहंचू शकलो.

आम्ही पोहंचलो त्या वेळी देशात सगळीकडं दंगल चालू होती आणि लष्कराचा ताबा होता. क्रांती होण्याची भीती होती म्हणून सैनिक रस्त्यावरच्या प्रत्येक व्यक्‍तीला तपासून पाहत होते. आम्हाला पुष्कळ चेकपॉईंट्‌सवर रोखण्यात आलं आणि या प्रत्येक पॉईंटवर आमचं सामान तपासून पाहिलं. आमच्या बॅगेतली लहानातली लहान वस्तू सुद्धा काढून तपासली होती. डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये अशारीतीने आमचं स्वागत झालं.

आमची पहिली नियुक्‍ती लॉ रोमॉना इथं जाण्याआधी पुष्कळ आठवडे आम्ही डॉमिनिकन रिपब्लिकची राजधानी सान्तो डोमिंगो इथं राहिलो. ट्रुहियोचं हुकूमशाही राज्य असताना लोकांना असं सांगितलं होतं की यहोवाचे साक्षीदार हे कम्युनिस्ट लोक आहेत आणि ते सर्वात वाईट लोक आहेत. म्हणून, साक्षीदारांचा खूप छळ झाला. पण, हळूहळू आम्ही त्यांचा हा पूर्वग्रह दूर करू शकलो.

लॉ रोमॉनामध्ये आम्ही जास्त सेवा केली नाही; तिथून आम्ही पुन्हा विभागीय कार्य करू लागलो. मग १९६४ मध्ये, आम्हाला सान्तियागोच्या शहरात मिशनरी म्हणून पाठवण्यात आलं. त्यानंतरच्या वर्षी डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये क्रांती झाली आणि पुन्हा एकदा सगळीकडं गोंधळ माजला. त्या परिस्थितीतच आमची बदली सॅन फ्रॅन्सिस्को दी माकोरीस इथं झाली; हे नगर राजकीय चळवळींसाठी प्रसिद्ध होतं. पण तरीही, आम्ही अगदी स्वातंत्र्यानं प्रचार करू शकलो, आम्हाला कसलाच अडथळा आला नाही. राजकीय गोंधळ चालू असतानाही आम्ही एक नवीन मंडळी स्थापन केली. त्यानंतरच्या वर्षांमध्ये आम्हाला वेगवेगळ्या नियुक्‍ती मिळाल्या आणि त्यानंतर आम्हाला पुन्हा सान्तियागोमध्ये पाठवण्यात आलं आणि सध्या आमचं तेच निवासस्थान आहे.

डॉमिनिकन रिपब्लिकमधल्या कार्यावर यहोवानं आशीर्वाद दिलेलं आम्ही निश्‍चितच पाहिलंय. आम्ही १९६१ मध्ये इथं आलो होतो तेव्हा सुमारे ६०० साक्षीदार आणि २० मंडळ्या होत्या. पण आता, जवळजवळ २०,००० प्रचारक ३०० पेक्षा अधिक मंडळ्यांमधून देव राज्याच्या प्रचाराचे कार्य करत आहेत. १९९६ मधल्या ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकाच्या ६९,९०८ उपस्थितीवरून दिसतं त्याप्रमाणे भावी वाढीला अजूनही पुष्कळ वाव आहे. ही संख्या प्रचारकांच्या संख्येच्या साडेतीन पट जास्त आहे!

आता बलाढ्य राष्ट्र

जगाचे दृश्‍य बदलत असले, तरी यहोवाचे साक्षीदार ज्या बायबल संदेशाचा प्रचार करत आहेत तो संदेश काही बदललेला नाही. (१ करिंथकर ७:३१) यहोवाच अजूनही देव आहे, ख्रिस्तच अजूनही राजा आहे आणि राज्य हा जगाचा एकमेव आशाकिरण असल्याचे आता आधीपेक्षा अधिक स्पष्ट होत आहे.

पण त्याचबरोबर, मी ओरेगन, सालेम इथल्या सभेला सुमारे ६० वर्षांआधी उपस्थित होतो तेव्हापासून यहोवाच्या लोकांमध्ये अद्‌भुत परिवर्तन झालं आहे. प्रचंड समुदाय किंवा मोठा लोकसमुदाय मोठा झाला आहे; आता तर त्याची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्‍वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन,” असं जे यहोवानं आपल्या लोकांबद्दल भाकीत केलं होतं तेच वास्तवात उतरलं आहे.—यशया ६०:२२.

पूर्ण-वेळेत जवळजवळ ६० वर्षं घालवल्यावर, आजही मी माझ्या मिशनरी नियुक्‍तीत राहून प्रचार आणि शिकवण्याचं काम करू शकतो याचा मला आनंद वाटत आहे. त्या कार्यात सहभागी होऊन “जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र” होत असल्याचं पाहायला मिळणं हा केवढा मोठा सुहक्क आहे!

[२१ पानांवरील चित्र]

डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये माझ्या पत्नीसोबत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा