वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ९/१५ पृ. २१-२४
  • पूर्ण-वेळेच्या सेवेतील आनंद कसा टिकवून ठेवावा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूर्ण-वेळेच्या सेवेतील आनंद कसा टिकवून ठेवावा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • निराशेशी संघर्ष करणे
  • इतरांसोबत सलोखा वाढवणे
  • निकृष्ट आरोग्य असते तेव्हा
  • लोकांमध्ये औदासीन्य असतानाही आनंद टिकवून ठेवणे
  • इतरांकडून उत्तेजन
  • यहोवाविषयीचा आनंद —आपला आश्रयदुर्ग
  • पूर्णवेळेच्या सेवकांची आठवण ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • पायनियर सेवेचे वरदान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • पवित्र सेवेच्या विशेषाधिकारांची नितान्त कदर करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • नवीन नेमणुकीमुळे होणाऱ्‍या बदलांशी जुळवून घेणं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ९/१५ पृ. २१-२४

पूर्ण-वेळेच्या सेवेतील आनंद कसा टिकवून ठेवावा

बायबलच्या भविष्यवादाची पूर्णता स्पष्टतः दाखवून देते, की आपण या अधार्मिक व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात जगत आहोत. याची जाणीव असल्यामुळेच, यहोवा देवाचे सेवक त्यांच्या परीने होता होईल तितका वेळ त्याच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करण्यात खर्च करतात. पूर्ण-वेळेच्या सेवेत सहभागी होण्याच्या उद्देशाने, ६,००,००० पेक्षा अधिक यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या जीवनांत तसे फेरबदल केले आहेत. यांपैकी काही जण पूर्ण-वेळेचे राज्य उद्‌घोषक असून त्यांना पायनियर म्हटले जाते. इतर जण, वॉच टावर संस्थेच्या मुख्यालयांत अथवा त्याच्या शाखा दफ्तरांत बेथेल स्वयंसेवक आहेत. आणि आणखीन इतर जण मिशनरी व प्रवासी पर्यवेक्षक आहेत.

शेवटल्या काळी “कठीण दिवस” येतील असे बायबल सूचित करते. (२ तीमथ्य ३:१-५) ग्रीक बायबल वचन अशा एका अभिव्यक्‍तीचा प्रयोग करते ज्याचा अनुवाद, “नियुक्‍त समय भयंकर” असा केला जाऊ शकतो. यास्तव, आपल्या काळात कोणीही एखाद्या निश्‍चिंत जीवनाची अपेक्षा करू नये. काही ख्रिस्ती सेवकांसाठी समस्या इतक्या गंभीर असतील, की ते कदाचित स्वतःस विचारतील, ‘मी पूर्ण-वेळेच्या सेवेत राहू शकेल का, की मी ती सोडून द्यावी?’

एक पायनियर, बेथेल स्वयंसेवक, प्रवासी पर्यवेक्षक किंवा मिशनरी असलेल्या एखाद्या व्यक्‍तीस कोणकोणत्या परिस्थितींमुळे आपल्या सेवेचा पुनर्विचार करावा लागेल बरे? कदाचित आरोग्याची एखादी गंभीर समस्या असेल. एका वयोवृद्ध अथवा दुर्बल नातलगास कदाचित सतत काळजीची गरज असेल. असेही असेल, की एका विवाहित जोडप्यास आता मूल हवे असेल. जे कोणी अशा कारणांसाठी व शास्त्रवचनीय कर्तव्यांसाठी पूर्ण-वेळेची सेवा सोडून देतात, त्यांनी असा फेरबदल करण्यात दोषी भावना बाळगण्याची गरज नाही.

तथापि, पूर्ण-वेळेच्या सेवेतला आनंद गमावल्यामुळे ती सोडून देण्याच्या बेतात कोणी असल्यास काय? कदाचित, एखाद्या पायनियरास आपल्या सेवेत अतिशय नगण्य प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्याच्यासमोर असे एक प्रश्‍नचिन्ह असेल की, ‘जर इतके कमी लोक ऐकत असतील तर मी एक आत्म-समर्पित जीवनशैली जगण्यात काय अर्थ आहे?’ असेही असेल, की एखादा बेथेल स्वयंसेवक आपल्या कार्यनियुक्‍तीसंबंधी इतका काही खुश नसेल. किंवा असे असेल, की त्रासदायक निकृष्ट आरोग्य जरी पायनियर सेवेस बांध घालत नसले तरी सरतेशेवटी एखाद्या व्यक्‍तीचा आनंद पार आटवून टाकते. असे लोक आपला आनंद कसा टिकवून ठेवू शकतात बरे? काही अनुभवी सेवकांचे काय म्हणणे आहे त्याकडे आपण लक्ष देऊ या.

निराशेशी संघर्ष करणे

स्वित्झर्लंडमधील ॲनी, १९५० साली वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेस उपस्थित राहिली. आता परदेशातील मिशनरी कार्यनियुक्‍तीची ती आस धरून होती. परंतु, पुन्हा एकदा तिला बेथेल सेवेतच नेमले गेले तेव्हा ती खूपच निराश झाली. तरीसुद्धा, भाषांतर विभागातील कार्यनियुक्‍ती तिने स्वीकारली व अद्यापही ती तेच कार्य करत आहे. तिने या निराशेवर कशी मात केली बरे? ती स्पष्टीकरण देते: “पुष्कळ काम करणं बाकी होतं आणि अजूनही पुष्कळसं काम बाकी आहे. काम जितकं महत्त्वाचं आहे तितक्या माझ्या भावना व आवडीनिवडी महत्त्वाच्या नाहीत.”

आपणही आपल्या कार्यनियुक्‍तीमुळे निराश झालो असल्यास आपण ॲनीसारखी मनोवृत्ती विकसित करू शकतो. आपली वैयक्‍तिक आवडनिवड सर्वात महत्त्वाची नाही. तर राज्याच्या संदेशाचा प्रसार करण्याशी निगडित असलेल्या विविध जबाबदाऱ्‍या उत्तमप्रकारे हाताळणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. नीतिसूत्रे १४:२३ आपल्याला सांगते: “सर्व श्रमांत लाभ आहे.” आपली कार्यनियुक्‍ती कोणतीही असो, परंतु ती विश्‍वासूपणे पूर्ण केल्याने राज्याचे कार्य साधले जाते. आणि अशा देव-प्रदत्त कार्यात नितान्त समाधान—होय, एकप्रकारचा आनंदच असू शकतो.—पडताळा १ करिंथकर १२:१८, २७, २८.

इतरांसोबत सलोखा वाढवणे

पूर्ण-वेळेची सेवा म्हणजे—क्षेत्र सेवा, बेथेल, मिशनरी गृह येथे अथवा एक प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने एका पाठोपाठ एका मंडळीची भेट घेताना सर्व प्रकारच्या लोकांसोबत निकटच्या संपर्कात येणे. यास्तव, आनंद हा एका मोठ्या प्रमाणात एकमेकांसोबतच्या आपला सलोख्यावर आधारित असतो. तथापि, या शेवटल्या काळासाठी भाकीत केलेले ‘भयंकर समय’ मानवी संबंधांमध्ये प्रचंड ताणतणाव निर्माण करतात. एखाद्या सेवकास कोणी प्रक्षुब्ध केले असले तरी त्याला आपला आनंद कसा टिकवून ठेवता येईल बरे? कदाचित, विल्हेल्मकडून आपल्याला काही शिकता येईल.

सन १९४७ मध्ये विल्हेल्म हा युरोपमधील बेथेल कुटुंबाचा एक सदस्य बनला. त्यानंतर पायनियर कार्यात व प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवेमध्ये त्याने वेळ खर्च केला. विल्हेल्म पुढील स्पष्टीकरण देतो: “जर मला आणि माझ्या पत्नीला काही गोष्टी आमच्या मते चुकीच्या वाटल्या किंवा त्यामुळं जर आम्हाला व्यक्‍तिगतपणे त्रास होत असला तर त्याविषयी आम्हाला कसं वाटतं ते आम्ही यहोवापाशी बोलतो आणि मग गोष्टी यथास्थित होण्यासाठी त्या यहोवाच्या हातात सोपवून देतो.”—स्तोत्र ३७:५.

कदाचित, तुमच्याशी अनादराचे किंवा अविचाराचे भाष्य केलेल्या एखादा सहख्रिश्‍चनाच्या आचरणामुळे तुम्हाला देखील त्रास झाला असेल. कदापि विसरू नका, की आपण सगळेच अनेक वेळा बोलण्यात चुकतो. (याकोब ३:२) तर मग, जो “प्रार्थना ऐकणारा” आहे त्याच्या समीप येण्यास या परिस्थितीचा फायदा का घेऊ नये बरे? (स्तोत्र ६५:२; पं.र.भा.) याविषयी यहोवाशी बोला आणि मग सर्व काही त्याच्या हातात सोडून द्या. देवाची जर इच्छा असेल तर तो त्यात परिवर्तन घडवून आणील. अशा प्रकारच्या समस्या उद्‌भवल्यास मिशनरी गृहात राहणारे, वरील बाब लक्षात ठेवू शकतात, कारण त्यामुळेच यहोवाच्या सेवेतील आपला आनंद टिकवून ठेवण्यास त्यांना मदत मिळेल.

निकृष्ट आरोग्य असते तेव्हा

मूठभरच लोक असे आहेत जे नेहमीच निरोगी असतात. अगदी भरज्वानीतील लोकांना देखील औदासीन्यता किंवा आजाराचा तडाखा बसू शकतो. आजारपणामुळे काहींना, पूर्ण-वेळेच्या सेवेतून अंग काढणे अपरिहार्य वाटते पण तरी त्यानंतर राज्य प्रचारक या नात्याने ते एक अत्युत्तम कामगिरी बजावतात. इतरांना मात्र, निकृष्ट आरोग्य असतानाही पूर्ण-वेळेच्या सेवेत राहणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ, हॉर्टमॉट व गिस्लिंड यांचेच उदाहरण विचारात घ्या.

हॉर्टमॉट व गिस्लिंड एक विवाहित दांपत्य आहे ज्यांनी पायनियर, मिशनरी व प्रवासी कार्यात ३० वर्षे घालवली आहेत. या दोघांनीही गंभीर स्वरूपाच्या आजाराचे तडाखे सोसले आहेत ज्यांमुळे काही वेळा ते शारीरिक व भावनिकरित्या देखील पार शुष्क होऊन गेले. असे असले तरी, त्यांनी उत्तम कार्य केले व अशाप्रकारच्या संकटप्रसंगातून वाटचाल करणाऱ्‍यांना धीर दिला. ते कोणता सल्ला देतात बरे? “भूतकाळाकडे नाही तर भविष्यकाळाकडे दृष्टी लावा. प्रत्येक परिस्थितीचा सर्वोत्तम फायदा करून घ्या. यहोवाची स्तुती करण्यासाठी कदाचित प्रती दिवशी केवळ एकच संधी मिळेल. पण त्या संधीचाही उपयोग करा व तिचा मनसोक्‍त आनंद लुटा.”

हॉनेलोरीचे उदाहरण विचारात घ्या. आपल्या पतीसोबत प्रवासी कार्यात, एक पायनियर, एक मिशनरी म्हणून व बेथेल सेवा या ३० वर्षांच्या काळादरम्यान पुनःपुन्हा उद्‌भवणाऱ्‍या आजारामुळे ती अत्यंत त्रासून गेलेली आहे. हॉनेलोरी म्हणते: “मनुष्य केवळ चांगल्या परिस्थितींतच यहोवाची सेवा करू शकतो, सैतानाने मांडलेला हा वादविषय मी नेहमी लक्षात ठेवतो. संकटप्रसंग सहन केल्यानं सैतानाला दोषी ठरविण्यात मलाही वाटा मिळतो.” हीच एक शक्‍तिशाली प्रेरणा असू शकते. लक्षात असू द्या, की यहोवाप्रती तुमची वैयक्‍तिक निष्ठा संकटप्रसंगीच त्याला सर्वात महत्त्वाची वाटते.—ईयोब १:८-१२; नीतिसूत्रे २७:११.

आपल्या आरोग्यासंबंधी एक संतुलित निर्णय घेण्याचा प्रयत्न करताना, येशू ख्रिस्ताने युगाच्या समाप्तीविषयी जो भविष्यवाद केला त्याची दोन वैशिष्ट्ये विचारात घ्या. येशूने भाकीत केले, की जागोजागी मऱ्‍या होतील. त्याने असेही म्हटले: “राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:३, १४; लूक २१:११) शेवटल्या काळी आपले अनुयायी आजाराशी संघर्ष करतील हे येशूला माहीत होते. परंतु, ज्या व्यक्‍ती निरोगी आहेत केवळ असेच लोक नव्हे, तर गंभीर आजार असलेल्या व्यक्‍ती देखील प्रचाराचे कार्य करतील याची त्याला जाणीव होती. अशी तो अपेक्षा करतो. निकृष्ट आरोग्य असतानाही आपण पूर्ण-वेळेच्या सेवेत राहिल्यास आपण यहोवाच्या नावासाठी दाखविलेली प्रीती तो विसरून जाणार नाही.—इब्री लोकांस ६:१०.

लोकांमध्ये औदासीन्य असतानाही आनंद टिकवून ठेवणे

राज्य प्रचाराच्या कार्याप्रती लोक कशी प्रतिक्रिया दाखवतात याचा आपल्या प्रवृत्तीवर परिणाम होऊ शकतो. एक अनुभवी सेवक म्हणतात: “घरमालकासोबत संभाषण सुरू करणं हे पायनियरांनासुद्धा कठीण वाटतं. आपला आनंद टिकवून ठेवण्याकरता आपणा सर्वांनाच संघर्ष करावा लागतो.” होय, लोकांमधील उदासीनतेमुळे, क्षेत्र सेवेतील आपला आनंद कमी होऊ शकतो. तर मग, नियमितपणे औदासीन्यतेला सामोरा जाणारा एखादा पायनियर आपला आनंद कसा काय टिकवून ठेवू शकतो बरे? अनुभवी सेवक पुढील सूचना पुरवतात; या अशा सूचना आहेत ज्या प्रयोगसिद्ध असून त्यांची पारख केली गेली आहे.

औदासीन्यता एक आव्हान उभे करत असले तरी त्याचा अर्थ पराजय असा होत नाही. खरे तर, सर्वव्याप्त उदासीनता ही पूर्ण-वेळेची सेवा सोडून देण्याची काही एक सबब नव्हे. शास्त्रवचनांचा मेहनती अभ्यास करण्यासाठी आपण पुरेसा वेळ काढल्यास, औदासीन्यता असली तरी आपणास आपला आनंद टिकवून ठेवणे शक्य होईल. ही शास्त्रवचने ‘प्रत्येक चांगल्या कामासाठी आपल्याला सज्ज’ करतात आणि यात, जे लोक सुवार्तेकडे कान देत नाहीत अशांशी बोलणे हे देखील समाविष्ट आहे. (२ तीमथ्य ३:१६, १७) लोक, संदेष्टा यिर्मयाचे ऐकू इच्छित नव्हते पण त्यामुळे तो काही निपचित बसून राहिला नाही. (यिर्मया ७:२७) ख्रिस्ती प्रकाशनांच्या मदतीने बायबलचा अभ्यास करत असताना, आपल्या विश्‍वासास प्रबळ करणाऱ्‍या व औदासीन्यतेला तोंड देण्यास आपली मदत करणाऱ्‍या विचारांची नोंद घेतल्याने आपल्याला मोठा लाभ होऊ शकतो. औदासीन्यता एक आव्हानच आहे हे मान्य करून आपण ज्यांना प्रचार करतो अशांप्रती आपली काय प्रवृत्ती आहे याचे आपण परीक्षण करू या. ते उदास का आहेत बरे? उदाहरणार्थ, युरोपच्या काही भागातील सर्वव्याप्त औदासीन्यतेचे एक कारण म्हणजे तेथील खोट्या धर्माचा शोचनीय पूर्वेतिहास. आपल्या जीवनांत धर्माला एक स्थान आहे असे आता लोकांना मुळीच वाटत नाही, शिवाय त्यांना धर्माशी कोणतीही देवाणघेवाण नाही. आपण लवचिक असले पाहिजे, म्हणजे लोकांवर प्रभाव पाडणाऱ्‍या बाबींविषयी जसे, की बेकारी, आरोग्य, गुन्हेगारी, सहिष्णुता, पर्यावरण आणि युद्धाचे भय यांविषयी आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे.

घरमालकाशी बोलताना आपल्या सुरवातीच्या शब्दांत आपण स्थानिक चिंतेच्या एखाद्या विषयाचा उल्लेख करू शकतो. तुटपुंजे यश मिळत असलेल्या एका गावात प्रचार करत असताना डीटमॉरने हेच करण्याचा प्रयत्न केला. आदल्या दिवशीच गावात घडलेल्या शोकांतिकेचा एका रहिवाश्‍याने उल्लेख केला होता. त्यानंतर प्रत्येक दारात, घडलेल्या शोकांतिकेबद्दल डीटमॉरने हळहळ व्यक्‍त केली. डीटमॉर म्हणतात: “अचानक लोक बोलू लागले. ती शोकांतिका सगळ्यांच्याच मनांत ताजी होती. त्यांच्या जीवनाविषयी मला आस्था असल्याचं मी दाखवलं त्यामुळं त्या दिवशी मी कित्येक लोकांशी चांगले संभाषण करू शकलो.”

आपल्याला जेथे कोठे लोक भेटतात तेथे त्यांना राज्याची साक्ष देणे जरूरीचे आहे. अनौपचारिक साक्षकार्य फलदायी ठरू शकते आणि बायबल आधारित प्रकाशनांमध्ये दिलेल्या सूचनांचा उपयोग केल्याने आपण या क्षेत्रात स्वतःला प्रशिक्षित करू शकतो. स्नेहभावाचे चार शब्द बोलल्याने अथवा टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांच्या प्रतींचे वाटप केल्यानेही आनंद मिळू शकतो. आपण पुनर्भेटी करून एखाद्या आस्थेवाईक व्यक्‍तीसोबत बायबल अभ्यास संचालित करू लागलो असल्यास, “बायबलचा अभ्यास करण्यास आवडेल असं कोणी तुम्हाला माहीत आहे का?” असा प्रश्‍न विचारून अभ्यास करू इच्छिणाऱ्‍या आणखीन एका व्यक्‍तीची माहिती तुम्हाला मिळू शकेल. याचा परिणाम, आणखीन एक बायबल अभ्यास प्रस्थापित होऊ शकेल. औदासीन्यतेमुळे निरुत्साही न होता आपण कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक असून प्रार्थनापूर्वक यहोवावर विसंबून राहू या.

इतरांकडून उत्तेजन

युरजेन व क्रिस्टियॉ हे दोघे ३० पेक्षा अधिक वर्षांपासून पायनियरींग करत असून आता ते प्रवासी कार्यात आहेत. एकदा, त्यांना अशा एका क्षेत्रात कार्य करण्याची कार्यनियुक्‍ती मिळाली जेथे बहुतेक लोक उदास व दुराग्रही होते. युरजेन व त्याची पत्नी उत्तेजनाची किती आस धरून होते! तथापि, काही कारणामुळे मंडळीतील इतरांनी त्यांच्या गरजेला प्रतिसाद दिला नाही.

म्हणूनच, युरजेनला स्वानुभवावरून हे कळाले आहे, की “काही पायनियरांसाठी हे फार कठीण आहे. त्यांना वडिलांकडून व इतर प्रचारकांकडून अधिक उत्तेजनाची गरज असते.” देवाने मोशेला यहोशवास उत्तेजन देण्यास व त्याला बळकट करण्यास सांगितले. (अनुवाद ३:२६-२८) आणि ख्रिस्ती लोक एकमेकांसाठी उत्तेजनाचे स्रोत असले पाहिजेत. (रोमकर १:११, १२) राज्य प्रचारकांनी पूर्ण-वेळेच्या सेवेत असलेल्यांना उभारणीकारक शब्द बोलून व वेळोवेळी त्यांच्यासोबत सेवेत सहभागी होऊन त्यांना उत्तेजन देण्यास हवे.

यहोवाविषयीचा आनंद —आपला आश्रयदुर्ग

पायनियर किंवा मिशनरी, बेथेल सेवेत अथवा प्रवासी कार्यात मंडळ्यांच्या भेटी घेण्यात आपले उभे आयुष्य घालवलेल्या ख्रिश्‍चनांना याचा प्रत्यय आला आहे, की बहुतेक समस्या क्षणभंगुर असल्या तरी काही प्रदीर्घ काळाच्या असतात. कधीही सुटणार नाहीत अशा भासणाऱ्‍या मोजक्या समस्यांमुळेही आपला आनंद हरपला जाऊ नये. जेव्हा केव्हा समस्यांमुळे आपण उदास होतो तेव्हा “आपल्याला असलेल्या अगणित आशीर्वादांचा, शिवाय आपल्यापेक्षा अधिक खडतर समस्या सोसणाऱ्‍या इतर हजारो जणांचा आपण विचार करावा” असे रेमन सुचवतो, ज्याने ४५ वर्षे एका परदेशी कार्यनियुक्‍तीत घालवली आहेत. खरेच, जगभरातील आपले सहविश्‍वासू जण हालअपेष्टा सोसत आहेत, तरी यहोवा आपल्या सर्वांची काळजी वाहतो.—१ पेत्र ५:६-९.

तर मग, आपल्या व्यक्‍तिगत परिस्थिती आपल्याला पूर्ण-वेळेच्या सेवेत सहभागी होण्यास व त्यातच राहण्यास वाव देत असतील तर आपल्या स्वर्गीय पित्यावर विसंबून राहून आपण आपला आनंद टिकवून ठेवू या. तो त्याच्या सेवकांस दृढ करतो व आपण सर्वांनी हे लक्षात ठेवण्यास हवे, की ‘यहोवाविषयीचा आनंद आमचा आश्रयदुर्ग आहे.’—नहेम्या ८:१०.

[२१ पानांवरील चित्र]

“काम जितकं महत्त्वाचं आहे तितक्या माझ्या भावना व आवडीनिवडी महत्त्वाच्या नाहीत”

[२२ पानांवरील चित्र]

“आम्हाला कसं वाटतं ते आम्ही यहोवापाशी बोलतो आणि मग गोष्टी यथास्थित होण्यासाठी त्या यहोवाच्या हातात सोपवून देतो”

[२३ पानांवरील चित्र]

“प्रत्येक परिस्थितीचा सर्वोत्तम उपयोग करा. यहोवाची स्तुती करण्यासाठी कदाचित प्रती दिवशी केवळ एकच संधी मिळेल”

[२३ पानांवरील चित्र]

“संकटप्रसंग सहन केल्यानं सैतानाला दोषी ठरविण्यात मलाही वाटा मिळतो”

[२४ पानांवरील चित्र]

“काही पायनियरांसाठी हे फारच कठीण आहे. त्यांना वडिलांकडून व इतर प्रचारकांकडून अधिक उत्तेजनाची गरज असते”

[२४ पानांवरील चित्र]

‘आपल्याला असलेल्या अगणित आशीर्वादांचा आपण विचार करावा’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा