‘यहोवाच्या दिवसातून’ कोणाचा बचाव होईल?
“पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?”—२ पेत्र ३:११.
१. एलीयाच्या आत्म्यासह आणि सामर्थ्यासह कोणी काम केले आहे?
यहोवा देवाने मानवजातीतून काहींची निवड केली आहे आणि हे निवडलेले लोक त्याच्या पुत्राचे अर्थात येशू ख्रिस्ताचे स्वर्गीय राज्यात सहवारिस होतील. (रोमकर ८:१६, १७) पृथ्वीवर असताना अभिषिक्त ख्रिश्चनांनी एलीयाच्या आत्म्यासह आणि सामर्थ्यासह काम केले आहे. (लूक १:१७) मागील लेखामध्ये आपण त्यांच्या आणि एलीया संदेष्ट्याच्या कार्यांतील काही विशिष्ट समानता पाहिल्या आहेत. परंतु एलीयानंतर आलेल्या अलीशा नामक संदेष्ट्याने केलेल्या कार्याबद्दल काय?—१ राजे १९:१५, १६.
२. (अ) एलीयाचा शेवटचा आणि अलीशाचा पहिला चमत्कार कोणता होता? (ब) एलीया स्वर्गात गेला नाही याचा कोणता पुरावा आहे?
२ एलीयाने आपला झगा काढून पाण्यावर मारला तेव्हा यार्देन नदीचे पाणी दुभंगले हा त्याचा शेवटचा चमत्कार होता. त्यामुळे एलीयाला आणि अलीशाला कोरड्या जमिनीवरून नदी पार करता आली. ते नदीच्या पूर्व दिशेला जात असताना जोराचे वादळ आले आणि एलीयाला पृथ्वीच्या दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले. (पृष्ठ १५ वरील “एलीया कोणत्या स्वर्गात गेला?” हे शीर्षक असलेली पेटी पाहा.) एलीया तेथून गेला पण त्याचा झगा मात्र तेथेच राहिला. अलीशाने जेव्हा तो झगा यार्देन नदीच्या पाण्यावर मारला तेव्हा त्या नदीचे पाणी पुन्हा दुभंगले त्यामुळे त्याला नदी पार करता आली. एलीयानंतर इस्राएलमध्ये खऱ्या उपासनेला उत्तेजन देणारा अलीशाच होता, हे या चमत्कारावरून स्पष्ट झाले.—२ राजे २:६-१५.
ईश्वरी गुण आवश्यक
३. येशूच्या उपस्थितीविषयी आणि ‘यहोवाच्या दिवसाविषयी’ पौलाने आणि पेत्राने काय म्हटले?
३ एलीया आणि अलीशा यांच्यानंतर कित्येक शतकांनी प्रेषित पौलाने आणि प्रेषित पेत्राने येणाऱ्या ‘यहोवाच्या दिवसाचा’ संबंध येशू ख्रिस्ताची उपस्थिती तसेच भविष्यातील “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांच्याशी लावला. (२ थेस्सलनीकाकर २:१, २; २ पेत्र ३:१०-१३) यहोवाच्या महान दिवसातून—देव त्याच्या शत्रूंना गारद करतो आणि आपल्या लोकांचा बचाव करतो—स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला यहोवाचा शोध घेतला पाहिजे तसेच नम्रतेचा आणि धार्मिकतेचा अवलंब केला पाहिजे. (सफन्या २:१-३) अलीशा संदेष्ट्याशी संबंधित घटनांचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला आणखी काही गुण पाहण्यास मिळतात.
४. आवेश यहोवाच्या सेवेत कोणती भूमिका पार पाडतो?
४ ‘यहोवाच्या दिवसातून’ आपला बचाव व्हायचा असल्यास देवाच्या सेवेप्रती आपला आवेश फार महत्त्वाचा आहे. एलीया आणि अलीशा यहोवाच्या सेवेत आवेशी होते. त्याच आवेशाने अभिषिक्त जनांचा शेष आज यहोवाला पवित्र सेवा सादर करत आहे आणि राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात पुढाकार घेत आहे.a सन १९३० च्या दशकाच्या मध्यापासून त्यांनी, देवाच्या राज्याचा संदेश स्वीकारणाऱ्यांना व या पृथ्वीवर अनंत काळ जगण्याची आशा बाळगणाऱ्यांना यहोवाला समर्पण करण्याचे आणि बाप्तिस्मा घेण्याचे उत्तेजन दिले आहे. (मार्क ८:३४; १ पेत्र ३:२१) लाखो जनांनी या उत्तेजनाला अनुकूल प्रतिक्रिया दाखवली आहे. ते एकेकाळी आध्यात्मिक अंधारात आणि पापामुळे अगदी मृतवत होते, पण आता देवाचे सत्य शिकून घेऊन पार्थिव परादीसवर अनंत काळ जगण्याची आशा त्यांनी मनी बाळगली आहे आणि ते यहोवाच्या सेवेत आवेशीही आहेत. (स्तोत्र ३७:२९; प्रकटीकरण २१:३-५) त्यांचा आवेश, सहकार्य, आदरातिथ्य आणि इतर चांगल्या कामांमुळे पृथ्वीवर हयात असलेल्या ख्रिस्ताच्या आध्यात्मिक बांधवांना फार हायसे वाटते.—मत्तय २५:३१-४६.
५. येशूच्या ‘बांधवांसाठी’ चांगल्या गोष्टी करणे इतके महत्त्वाचे का आहे आणि अलीशाच्या दिवसांतील कोणते उदाहरण आपल्याकडे आहे?
५ येशूच्या ‘बांधवांसाठी’ चांगल्या गोष्टी करणाऱ्यांना ‘यहोवाच्या दिवसातून’ बचावण्याची आशा आहे कारण हे अभिषिक्त जन त्याचे अनुयायी आहेत. शूनेम गावातील एका विवाहित जोडप्याने अलीशाला आणि त्याच्या सेवकाला दया दाखवल्यामुळे आणि त्यांचे आदरातिथ्य केल्यामुळे त्यांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त झाला होता. या दांपत्याला मूलबाळ तर नव्हतेच शिवाय पती वयोवृद्ध झाला होता. परंतु अलीशाने या शूनेमकरीण स्त्रीला असे अभिवचन दिले, की ती एका मुलाला जन्म देईल आणि त्याने म्हटल्याप्रमाणेच झाले. नंतरच्या वर्षांत जेव्हा हा एकुलता एक मुलगा मरण पावला तेव्हा अलीशा शूनेमला परत आला आणि त्याने त्या मुलाचे पुनरुत्थान केले. (२ राजे ४:८-१७, ३२-३७) अलीशाच्या आदरातिथ्यामुळे किती मोठ्या आशीर्वादाची प्राप्ती!
६, ७. नामानाने कोणते उदाहरण मांडले आणि ‘यहोवाच्या दिवसातून’ बचाव होण्याच्या बाबतीत याचा काय संबंध आहे?
६ यहोवाच्या दिवसातून बचाव व्हायचा असेल तर ख्रिस्ताच्या ‘बांधवांपासून’ मिळणाऱ्या बायबल आधारित मार्गदर्शनाचा स्वीकार करण्यासाठी नम्रता आवश्यक आहे. कोड झालेला अरामाचा सेनापती नामान याला एका बंदिवान मुलीच्या सूचनेचा अवलंब करण्यासाठी नम्र व्हावे लागले आणि बरे होण्यासाठी अलीशाच्या शोधार्थ त्याला इस्राएलमध्ये जावे लागले. नामानाला भेटण्यासाठी घरातून बाहेर न येता अलीशाने त्याला असा संदेश पाठवला: “यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.” (२ राजे ५:१०) यामुळे नामानाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहंचली आणि त्याची तळपायाची आग मस्तकाला पोहंचली, पण नंतर तो नम्र झाला आणि यार्देन नदीत त्याने सात वेळा डुबक्या मारल्या “तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.” (२ राजे ५:१४) घरी परतण्यापूर्वी नामान शोमरोन येथे आला आणि यहोवाच्या संदेष्ट्याचे आभार मानले. अलीशा नामानाला भेटण्यासाठी बाहेर आला खरा पण त्याने त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे बक्षीस स्वीकारले नाही कारण देवाने दिलेल्या शक्तीचा स्वतःचे घर भरण्यासाठी उपयोग न करण्याचे त्याने ठरवले होते. नामानाने अलीशाला नम्रपणे असे सांगितले: “यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय [“यहोवाशिवाय,” NW] दुसऱ्या कोणत्याहि देवास होमबलि अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही.”—२ राजे ५:१७.
७ आज देखील अभिषिक्त जनांच्या शास्त्रवचनीय सल्ल्याचे नम्रपणे पालन केल्यामुळे लाखो लोकांना आशीर्वाद प्राप्त झाला आहे. याशिवाय, येशूच्या खंडणी यज्ञार्पणावर विश्वास ठेवण्याद्वारे हे प्रामाणिक अंतःकरणाचे लोक आध्यात्मिकरीत्या शुद्ध झाले आहेत. ते आता यहोवा देवाचे आणि येशू ख्रिस्ताचे मित्र होण्याच्या विशेषाधिकाराचा आनंद घेत आहेत. (स्तोत्र १५:१, २; लूक १६:९) तसेच देवाप्रती आणि त्याच्या सेवेप्रती त्यांच्या भक्तीचे प्रतिफळ, वेगाने जवळ येत असलेल्या ‘यहोवाच्या दिवशी’ होणाऱ्या सार्वकालिक विनाशापासून त्यांचा बचाव होण्याद्वारे मिळेल; परंतु गर्विष्ठ, अपश्चात्तापी लोकांसाठी हा नाश तोंडावर येऊन ठेपला आहे.—लूक १३:२४; १ योहान १:७.
“माझ्या पक्षाचा कोणी आहे काय?”
८. (अ) ‘यहोवाच्या दिवसातून’ बचावणाऱ्यांची ईश्वरी इच्छेप्रमाणे करण्याप्रती कोणती मनोवृत्ती असेल? (ब) येहूवर कोणते काम सोपवण्यात आले होते? (क) ईजबेलचे काय होणार होते?
८ ‘यहोवाच्या दिवसातून’ स्वतःचा बचाव होण्याची आशा बाळगणाऱ्यांनी ईश्वरी इच्छेप्रमाणे वागण्यात निर्णायक देखील असले पाहिजे. अहाब राजाच्या खुनी, बआल-उपासक घराण्याच्या विनाशाविषयी एलीयाने धैर्याने भाकीत केले होते. (१ राजे २१:१७-२६) तथापि, हा न्यायदंड बजावण्यात येण्यापूर्वी एलीयानंतर येणाऱ्या अलीशाला अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करायचे होते. (१ राजे १९:१५-१७) यहोवाची नियुक्त वेळ आली तेव्हा अलीशाने त्याच्या शिष्याला अशी सूचना दिली, की त्याने येहू नामक सेनापतीकडे जावे व त्याचा इस्राएलाचा नवीन राजा म्हणून अभिषेक करावा. येहूच्या मस्तकावर तेल ओतल्यानंतर या संदेशवाहकाने त्याला असे म्हटले: “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्राएलांचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे; ईजबेलीच्या हातून माझे सेवक जे संदेष्टे आणि परमेश्वराचे दुसरे सर्व सेवक यांचा रक्तपात झाला आहे त्याचा मला सूड घेणे आहे, म्हणून आपला धनी अहाब याच्या घराण्याचा तू संहार कर. अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल.” दुष्ट राणी ईजबेल हिला कुत्र्यांसमोर टाकण्यात येणार होते आणि तिच्यावर सन्माननीय अंत्यसंस्कार होणार नव्हता.—२ राजे ९:१-१०.
९, १०. ईजबेलबद्दल केलेल्या एलीयाच्या शब्दांची पूर्णता कशी झाली?
९ येहूच्या लोकांनी त्याच्या अभिषेकाचे महत्त्व जाणले आणि इस्राएलाचा नवा राजा म्हणून त्याची घोषणा केली. बआल उपासनेच्या धर्मत्यागी नेत्यांचा संहार करण्यासाठी इज्रेलाच्या दिशेने रवाना होऊन येहूने निर्णायक कार्यवाही केली. अहाबाचा पुत्र, योराम राजा, येहूच्या विनाशरूपी बाणाचे पहिले भक्ष्य ठरला. योराम, सर्वकाही ठीक आहे किंवा कसे अशी विचारपूस करण्यासाठी येहूकडे शहराबाहेर आला. तेव्हा येहूने त्याला असे म्हणून प्रत्युत्तर दिले, “तुझी आई ईजबेल हिचे व्यभिचार व गारुडे यांचा सपाटा जोपर्यंत चालला आहे तोपर्यंत ठीक कसे असणार?” असे म्हटल्यावर येहूचा बाण योरामाच्या हृदयाच्या आरपार गेला.—२ राजे ९:२२-२४.
१० ईश्वरी स्त्रिया ईजबेलप्रमाणे किंवा तिच्यासारख्या इतर स्त्रियांप्रमाणे होण्याचे टाळतात. (प्रकटीकरण २:१८-२३) येहू इज्रेलापर्यंत येण्यापूर्वी तिने स्वतःला आकर्षक बनविले. खिडकीतून खाली पाहात, अप्रत्यक्ष धमकी देत तिने त्याचे स्वागत केले. त्याने तिच्या सेवकांना विचारले: “माझ्या पक्षाचा कोणी आहे काय?” तेव्हा दोघा-तिघा खोज्यांनी त्याच्याकडे खिडकीतून डोकावले. ते येहूच्या बाजूने होते का? “तिला खाली टाका!” येहूने त्यांना सांगितले. त्यांनी त्याचप्रमाणे केले, त्यांनी निर्णायक कृती केली, त्या दुष्ट ईजबेलला खिडकीतून खाली टाकले. तिला जमिनीवर तुडवण्यात आले, ती घोड्यांच्या पायाखाली आली होती, असे वाटते. लोक जेव्हा तिला मूठमाती देण्यास आले तेव्हा त्यांना ‘तिची करोटी, पाय व हातांचे तळवे याखेरीज काही सापडले नाही.’ एलीयाच्या शब्दांची किती नाट्यमय पूर्णता: “कुत्री ईजबेलीचे मांस खातील.”!—२ राजे ९:३०-३७.
खऱ्या उपासनेला मनःपूर्वक पाठिंबा
११. यहोनादाब कोण होता आणि त्याचा खऱ्या उपासनेला पाठिंबा होता हे त्याने कसे दाखवले?
११ ‘यहोवाच्या दिवसातून’ बचावण्याची आणि पृथ्वीवर अनंत काळ जगण्याची आशा बाळगणाऱ्यांनी खऱ्या उपासनेला मनःपूर्वक पाठिंबा दिला पाहिजे. यहोवाचा गैर-इस्राएली उपासक यहोनादाब किंवा योनादाब याच्याप्रमाणे त्यांनी असले पाहिजे. आपल्यावर सोपवलेले काम येहूने मोठ्या आवेशाने करण्याचे चालू ठेवले, त्याला मान्यता आणि पाठिंबा देण्याची यहोनादाबची इच्छा होती. म्हणून तो इस्राएलाच्या नवीन राजाला भेटण्यासाठी गेला, त्यावेळी येहू, अहाबाच्या घराण्यातील उरलेल्या लोकांचा संहार करण्यासाठी शोमरोनला जात होता. यहोनादाबला पाहिल्यानंतर येहूने त्याला विचारले: “तुझ्याविषयी माझे मन जसे शुद्ध आहे तसे तुझे आहे काय?” यहोनादाबने दिलेल्या होकारार्थी उत्तरामुळे येहूने त्याला आपला हात दिला आणि त्याला असे म्हणत आपल्या युद्धरथात घेतले: “मजबरोबर चल, परमेश्वराप्रीत्यर्थ मला किती उत्कट आस्था आहे ती पाहा.” यहोवाच्या अभिषिक्त दंडाधिकाऱ्याला आपला पाठिंबा असल्याचे दाखविण्याचा विशेषाधिकार यहोनादाबने विनाविलंब स्वीकारला.—२ राजे १०:१५-१७.
१२. यहोवा उचितपणे एकनिष्ठ भक्तीची अपेक्षा का करतो?
१२ खऱ्या उपासनेला देण्यात येणारा मनःपूर्वक पाठिंबा निश्चितच उचित आहे कारण यहोवा निर्माणकर्ता आणि विश्वाचा सार्वभौम राजा आहे जो आपल्याकडून एकनिष्ठ भक्ती मागतो आणि तो त्या भक्तीच्या पात्र आहे. त्याने इस्राएल लोकांना अशी आज्ञा दिली: “आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीहि प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान [“एकनिष्ठ भक्तीची मागणी करणारा,” NW] देव आहे.” (निर्गम २०:४, ५) ‘यहोवाच्या दिवसातून’ बचावण्याची आशा बाळगणाऱ्यांनी “आत्म्याने आणि खरेपणाने” त्याची एकनिष्ठ भक्ती केली पाहिजे. (योहान ४:२३, २४) एलीया, अलीशा आणि यहोनादाब यांच्याप्रमाणे त्यांनी खऱ्या उपासनेप्रती दृढ असले पाहिजे.
१३. यहोनादाबचे हृदय येहूबरोबर होते त्याप्रमाणे मशिही राजाला कोण मान्य करतात आणि हे, ते कसे दाखवतात?
१३ अहाबच्या घराण्यावर दंडाज्ञा बजावल्यानंतर बआलच्या उपासकांची ओळख पटविण्यासाठी आणि इस्राएलमधून खोट्या धर्माचे उच्चाटन करण्यासाठी राजा येहूने आणखी एक पाऊल उचलले. (२ राजे १०:१८-२८) आज, स्वर्गीय राजा येशू ख्रिस्त याला यहोवाच्या शत्रूंवर दंडाज्ञा बजावण्यासाठी तसेच त्याच्या सार्वभौम सत्तेचे समर्थन करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. यहोनादाबचे हृदय जसे येहूबरोबर होते तसे येशूच्या ‘दुसऱ्या मेंढराचा’ “मोठा लोकसमुदाय” ख्रिस्ताला मशिही राजा म्हणून आज मनःपूर्वक मान्य करतो आणि पृथ्वीवरील त्याच्या आध्यात्मिक बांधवांना सहकार्य करतो. (प्रकटीकरण ७:९, १०; योहान १०:१६) खऱ्या धर्माचा अवलंब करण्याद्वारे आणि ख्रिस्ती सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेण्याद्वारे ते या गोष्टीचा पुरावा देतात. वेगाने येत असलेल्या ‘यहोवाच्या दिवसाबद्दल’ देवाच्या शत्रूंना इशारा देणे यांद्वारे देण्यात येतो.—मत्तय १०:३२, ३३; रोमकर १०:९, १०.
हाकेच्या अंतरावर नाट्यमय घटना!
१४. खोट्या धर्माचे थोड्याच कालावधीत काय होणार आहे?
१४ येहूने कार्यवाही करून इस्राएलमधील बआल उपासनेचे उच्चाटन केले. आपल्या दिवसांतही, महान येहू अर्थात येशू ख्रिस्ताद्वारे देव मोठ्या बाबेलचा म्हणजे खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा नाश करील. प्रेषित योहानाला देवदूताने जे म्हटले त्या शब्दांची पूर्णता आपल्याला लवकरच पाहण्यास मिळेल: “जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कलावंतिणीचा [मोठ्या बाबेलचा] द्वेष करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील. त्यांनी एकविचाराने वागून देवाची वचने पूर्ण होईपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्यावे अशा इराद्याने कृति करण्याचे देवाने त्यांच्या मनात घातले.” (प्रकटीकरण १७:१६, १७; १८:२-५) “दहा शिंगे” पृथ्वीला कह्यात ठेवणाऱ्या लष्करी राजकीय शक्तींना सूचित करतात. जरी त्यांचा मोठ्या बाबेलशी आध्यात्मिकरीत्या व्यभिचारी संबंध असला तरी तिचा फार कमी काळ उरला आहे. या जगाचे राजकीय घटक खोट्या धर्माचा नाश करतील आणि ‘श्वापदाची’—संयुक्त राष्ट्रसंघाची—बाबेलचा विनाश करण्यात ‘दहा शिंगांबरोबर’ प्रमुख भूमिका असेल.b यहोवाची स्तुती करण्याचा तो किती महान प्रसंग!—प्रकटीकरण १९:१-६.
१५. देवाच्या पार्थिव संघटनेचा नाश करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा काय होईल?
१५ राजा येहूने बआल उपासनेच्या विरोधात जोरदार हल्ला चढवल्यानंतर त्याच्या राजेशाही घराण्याने इस्राएलाच्या राजकीय शत्रूंकडे आपले लक्ष केंद्रित केले. राजा येशू ख्रिस्त देखील तशाच प्रकारची कार्यवाही करील. बआलप्रमाणे असणाऱ्या खोट्या धर्मांचा विनाश झाल्यानंतर राजकीय शक्तींचे अस्तित्व असेल. दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली यहोवाच्या सार्वभौम सत्तेचे हे शत्रू देवाच्या पार्थिव संघटनेचा नाश करण्यासाठी जोरदार हल्ला करतील. (यहेज्केल ३८:१४-१६) पण यहोवा, राजा येशू ख्रिस्ताद्वारे हर्मगिदोनमध्ये—‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईत’ त्यांचा नाश करून त्यांना पूर्णपणे निष्प्रभ करील आणि अशा प्रकारे यहोवाच्या सार्वभौम सत्तेचे समर्थन करण्यात येईल.—प्रकटीकरण १६:१४, १६; १९:११-२१; यहेज्केल ३८:१८-२३.
अलीशाच्या आवेशासह सेवा करणे
१६, १७. (अ) अलीशा त्याच्या जीवनाच्या अखेरपर्यंत आवेशी होता हे आपल्याला कसे कळते? (ब) आपण सत्याच्या बाणांचे काय केले पाहिजे?
१६ ‘यहोवाचा दिवस’ सैतानाच्या संपूर्ण दुष्ट व्यवस्थीकरणाचा जोपर्यंत अंत करीत नाही तोपर्यंत देवाचे सेवक अलीशाप्रमाणे धैर्यशील आणि आवेशी राहतील. एलीयाचा मदतनीस म्हणून केलेल्या कामाखेरीज अलीशाने स्वतः यहोवाचा संदेष्टा या नात्याने ५० पेक्षा अधिक वर्षे काम केले! अलीशा त्याला लाभलेल्या दीर्घ काळाच्या अगदी शेवटपर्यंत आवेशी होता. येहूच्या मृत्यूच्या काही काळाआधी त्याचा नातू, राजा योवाश याने त्याला भेट दिली. अलीशाने त्याला खिडकीतून बाण सोडण्यास सांगितले. सांगण्यात आलेल्या दिशेने त्याने बाण सोडला आणि अलीशा उद्गारला: “हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे अरामापासून सुटण्याचे चिन्ह होय; तू अफेक येथे अराम्यांस असा मार देशील की त्यांचा धुव्वा उडेल.” अलीशाने विनंती केल्याप्रमाणे योवाश याने जमिनीवर बाण मारले. त्याने केवळ तीन वेळा बाण मारले परंतु त्यावेळी तो इतका आवेशी नव्हता. तेव्हा अलीशाने म्हटले, की याचा परिणाम म्हणून योवाश केवळ तीन वेळा अरामावर विजय मिळवील आणि नेमके तसेच झाले. (२ राजे १३:१४-१९, २५) राजा योवाश याने अराम्यांचा “धुव्वा उडेल” असा पूर्णपणे नाश केला नाही.
१७ तथापि, अलीशाच्या आवेशासह, उरलेल्या अभिषिक्त जनांनी खोट्या उपासनेच्या विरोधातील त्यांचा लढा अद्यापही चालू ठेवला आहे. पार्थिव आशा बाळगणारे त्यांचे साथीदारही त्यांचेच अनुकरण करत आहेत. शिवाय, ‘यहोवाच्या दिवसातून’ बचाव होण्याची आशा बाळगणाऱ्या सर्वांनी या पृथ्वीला बसणाऱ्या तडाख्याविषयी आवेशी अलीशाने सांगितलेले शब्द मनी बाळगणे केव्हाही चांगलेच आहे. आता आपण सत्याचे बाण घेऊ या आणि आवेशाने त्यांचा मारा— वारंवार करू या—होय, त्यांच्यासोबतचे आपले काम आता संपले आहे, असे यहोवा आपल्याला सांगत नाही तोपर्यंत आपण असे करत राहू या.
१८. २ पेत्र ३:११ येथील शब्दांना आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे?
१८ ‘यहोवाचा दिवस’ लवकरच सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करील. त्यामुळे आपण प्रेषित पेत्राच्या पुढील उत्तेजक शब्दांनी प्रोत्साहित होऊ या. “तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?” (२ पेत्र ३:११) येशू ख्रिस्ताद्वारे येणाऱ्या देवाच्या क्रोधाच्या अग्नीमुळे या व्यवस्थीकरणाचा प्रत्येक भाग लयास जातो, पण केवळ प्रामाणिक वर्तन असलेल्यांचा आणि ईश्वरी भक्ती आचरणाऱ्यांचा बचाव होईल. नैतिक आणि आध्यात्मिक शुद्धता महत्त्वाची आहे. सहमानवांच्या गरजा विशेषतः आपल्या ख्रिस्ती सेवाकार्यात आध्यात्मिक मार्गाद्वारे पूर्ण करण्याद्वारे त्यांच्यावर आपले प्रेम असल्याचे आपल्याला दाखवता येते.
१९. ‘यहोवाच्या दिवसातून’ बचाव होण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
१९ तुम्ही देवाचे विश्वासू आणि आवेशी सेवक आहात हे तुमचे शब्द आणि कार्य दाखवून देतात का? तसे असल्यास तुम्ही ‘यहोवाच्या दिवसातून’ बचाव होण्याची आणि देवाने अभिवचन दिलेल्या नवीन जगात जाण्याची आशा बाळगू शकता. होय, शूनेमकरीण दांपत्याने अलीशाचे आदरातिथ्य केल्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताच्या बांधवांसाठी चांगली कामे केल्यास तुमचा बचाव होऊ शकतो कारण ते ख्रिस्ताचे अनुयायी आहेत. बचाव होण्यासाठी तुम्ही नामानाप्रमाणे देखील होणे गरजेचे आहे ज्याने नम्रपणे ईश्वरी सूचना स्वीकारली आणि यहोवाचा उपासक झाला. पार्थिव परादीसवर राहण्याची तुमची इच्छा असल्यास तुम्ही यहोनादाबप्रमाणे खऱ्या उपासनेला मनःपूर्वक पाठिंबा दिला पाहिजे. तेव्हा तुम्ही यहोवाच्या विश्वासू सेवकांमध्ये असाल जे लवकरच येशूच्या पुढील शब्दांची पूर्णता अनुभवतील: “अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.”—मत्तय २५:३४.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित पुस्तक, “तुझे नाव पवित्र मानले जावो,” (इंग्रजी) अध्याय १८ आणि १९ पाहा.
b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित पुस्तक, प्रकटीकरण याचा भव्य कळस जवळ आहे!, या पुस्तकाची पृष्ठे २५४-६ पाहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ ‘यहोवाच्या दिवसातून’ बचाव होण्यासाठी कोणत्या काही गुणांची आवश्यकता आहे?
◻ अलीशाच्या दिवसातील शूनेमकरीण दांपत्याने कोणते उदाहरण मांडले होते?
◻ नामानापासून आपण कोणता धडा शिकू शकतो?
◻ यहोनादाबचे उदाहरण आपण कसे अनुसरू शकतो?
◻ २ पेत्र ३:११ या वचनाचा आपल्यावर कसा परिणाम होण्यास हवा?