वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ९/१५ पृ. २५-२९
  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग दोन

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल आपल्या हातात कसे आले—भाग दोन
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एका आद्यप्रवर्तकाचा प्रवेश
  • चर्चचे प्रत्युत्तर
  • मुद्रणतंत्राचा प्रभाव
  • विल्यम टिंडेल आणि इंग्रजी बायबल
  • संशोधनामुळे स्पष्टीकृत समज
  • टिंडेल यांचे हिब्रू शास्त्रवचनांचे भाषांतर
  • बायबल आणि टिंडेलवर बंदी
  • विल्यम टिंड्‌ल दूरदर्शी मनुष्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • देवाचं वचन तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • “आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ९/१५ पृ. २५-२९

बायबल आपल्या हातात कसे आले—भाग दोन

पुन्हा पुन्हा इंधन टाकले जात होते तसतसे त्या आगीचे लोट आकाशाला भिडत होते; पण ही काही साधीसुधी आग नव्हती. अनेक पाळकांच्या आणि वरिष्ठ धर्माधिकाऱ्‍यांच्या साक्षीने त्या भयंकर जाळात कितीतरी बायबलची होळी केली जात होती. पण, जाळून टाकण्याच्या उद्देशाने बायबलच्या प्रती विकत घेतल्यामुळे बिशप ऑफ लंडनने ध्यानीमनी नसताना, विल्यम टिंडेल या भाषांतरकाराला आणखी आवृत्त्या प्रकाशित करण्यासाठी एका अर्थाने अर्थसाहाय्यच केले!

या संघर्षात सामील असलेल्या दोन्ही पक्षांनी एवढी निग्रही भूमिका का घेतली होती? यापूर्वीच्या एका लेखात, आपण मध्ययुगाच्या उत्तरार्धापर्यंतचा बायबल प्रकाशनाचा इतिहास पाहिला होता. आता एका नव्या युगाचा जन्म झाला आहे आणि देवाच्या वचनाचा संदेश आणि त्याची अधिकारवाणी लवकरच समाजावर कशाप्रकारे एक जबरदस्त प्रभाव पाडतात ते आता आपण पाहणार आहोत.

एका आद्यप्रवर्तकाचा प्रवेश

ऑक्सफर्डचे एक नामी अभ्यासक, जॉन विक्लिफ कॅथलिक चर्चच्या गैरबायबलीय चालीरितींच्या विरोधात त्वेषी प्रचार व लिखाण करीत असत; त्यांच्या प्रचार व लिखाणांचा आधार होता ‘देवाचा नियम,’ अर्थात बायबल. त्यांच्या विद्यार्थ्यांना लॉलड्‌र्स म्हटले जात असे; या विद्यार्थ्यांना त्यांनी इंग्लंडच्या खेडोपाडी जो कोणी ऐकू इच्छित असेल त्याला इंग्रजीतून बायबलच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी पाठवले. १३८४ साली त्यांचा मृत्यू होण्याआधी, त्यांनी लॅटिनमधून त्याकाळी प्रचारात असलेल्या इंग्रजीत बायबलचे भाषांतर करण्याच्या कामाला सुरवात करून दिली.

विक्लिफ यांचा तिरस्कार करण्यासाठी चर्चजवळ काही एकच कारण नव्हते. एकतर, ते पाळकवर्गाच्या ऐषआरामाच्या आणि ऐयाश जीवनशैलीची खुलेआम निंदा करीत असत. पण याशिवाय, विक्लिफ यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्या शिकवणुकींचा विपर्यास करून सशस्त्र उठाव केले होते. या भयंकर उठावांना विक्लिफ यांनी कधीच बढावा दिलेला नव्हता; तरीसुद्धा, पाळकवर्गाने यासाठी त्यांनाच जबाबदार ठरवले, अगदी त्यांचा मृत्यू झाल्यावर देखील.

आर्चबिशप ॲरन्डल यांनी तेविसावे पोप जॉन यांना १४१२ साली लिहिलेल्या पत्रात, “तो नीच, तापदायक जॉन विक्लिफ, त्याची आठवणही अभद्र वाटते, सैतानाचा वंशज, अक्षरशः ख्रिस्तविरोधकाचा दूत, नव्हे पुत्रच आहे,” असे विक्लिफ यांना उद्देशून म्हटले. आपल्या या निंदात्मक पत्राच्या शेवटी ॲरन्डल यांनी लिहिले: “आपल्या पापाचे माप भरण्यासाठी आता त्याने मातृभाषेत बायबलचे नवे भाषांतर काढण्याची शक्कल लढवली आहे.” चर्च पुढाऱ्‍यांना सर्वात जास्त याचाच संताप आला होता की विक्लिफ यांना, लोकांना त्यांच्या भाषेत बायबल उपलब्ध करून द्यायचे होते.

तरीसुद्धा, काही मोजक्या प्रमुख व्यक्‍तींजवळ प्रादेशिक भाषांमध्ये बायबल होते. त्यांपैकी एक होती बोहिमियाची ॲन; ही १३८२ साली इंग्लंडचे भावी दुसरे राजा रिचर्ड यांच्याशी विवाहबद्ध झाली. तिच्याजवळ विक्लिफ यांची, शुभवर्तमानांची इंग्रजीतील भाषांतरे होती आणि ती सतत यांचा अभ्यास करीत असे. ती राणी झाल्यावर, तिची ही अनुकूल अभिवृत्ती बायबलच्या कार्यास वृद्धिंगत करणारी ठरली—आणि हे फक्‍त इंग्लंडपुरतेच मर्यादित राहिले नाही. ॲनने बोहिमिया येथील प्राग युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना ऑक्सफर्डला येण्याचे प्रोत्साहन दिले. येथे, त्यांनी विक्लिफ यांच्या लिखाणांचा मोठ्या उत्साहाने अभ्यास केला आणि प्रागला परतताना यांपैकी काही त्यांनी आपल्यासोबत नेली. प्राग युनिव्हर्सिटीत विक्लिफ यांच्या शिकवणुकींना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे येथेच शिकलेल्या व नंतर शिकवू लागलेल्या यॉन हूस यांना खूप मदत मिळाली. हूस यांनी जुन्या स्लॅव्हॉनिक भाषांतराच्या आधारावर एक सुवाच्य झेक आवृत्ती तयार केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे बोहिमिया आणि जवळपासच्या देशांत सर्वसामान्य लोक बायबल वापरू लागले.

चर्चचे प्रत्युत्तर

विक्लिफ आणि हूस यांच्यावर पाळकवर्गाचा रोष ओढवण्याचे आणखी एक कारण होते; ते कारण म्हणजे, चर्चने मान्यता दिलेल्या वेगवेगळ्या बायबलमध्ये समासांत दिलेल्या क्लिष्ट पारंपरिक स्पष्टीकरणांच्या अर्थात ‘टिप्पण्यांच्या’ तुलनेत, कोणतीही भेसळ न केलेल्या मूळ प्रेरित शास्त्रवचनांत, अर्थात ‘विशुद्ध मजकुरात’ अधिक अधिकारवाणी आहे असे ते शिकवत होते. या प्रचारकांना सामान्य माणसाला देवाच्या वचनाचा हाच निर्भेळ स्वरूपातील संदेश उपलब्ध करून द्यायचा होता.

सुरक्षितपणे घेऊन जाण्याचे खोटे आश्‍वासन देऊन, हूस यांना स्वतःच्या मतांचा बचाव करण्याकरता १४१४ साली जर्मनी येथील कॅथलिक कौन्सिल ऑफ कॉन्सटन्सपुढे उपस्थित व्हायला कुटिलतेने भाग पाडण्यात आले. सदर काउन्सिलमध्ये २,९३३ पाळक, बिशप आणि कार्डिनल होते. हूस यांनी एका अटीवर आपल्या शिकवणुकी मागे घेण्याचे कबूल केले, ती अशी की या शिकवणुकी चुकीच्या आहेत हे त्यांना शास्त्रवचनांतून सिद्ध करून दाखवण्यात यावे. कौन्सिलच्या नजरेत हा मुद्दा महत्त्वाचा नव्हता. केवळ त्यांच्या अधिकाराला आव्हान दिले गेले, या कारणामुळे, त्यांनी हूस यांना १४१५ साली खांबाला बांधून जिवंत जाळले; शेवटल्या क्षणी हूस मोठ्याने प्रार्थना करीत होते.

याच कौन्सिलने जॉन विक्लिफ यांच्या अस्थी पुन्हा बाहेर काढून इंग्लंडमध्ये जाळून टाकण्यात याव्यात असा आदेश काढून निर्भर्त्सनेचा आणि मानहानीचा कहर केला. हा आदेश इतका काही निंद्य होता, की १४२८ साली पोप यांनी खास मागणी केली तेव्हा कोठे शेवटी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. हे सर्व झाले तरीसुद्धा, नेहमीप्रमाणे, इतका कडवा विरोध होऊनही सत्यप्रेमींचा आवेश मंदावला नाही. उलटपक्षी, यामुळे देवाचे वचन प्रकाशित करण्याचा त्यांचा निर्धार आणखीनच बळावला.

मुद्रणतंत्राचा प्रभाव

हूस यांच्या मृत्यूनंतर केवळ ३५ वर्षांनंतर, म्हणजे १४५० सालापर्यंत योहॅन्‍नस गुटेनबर्ग याने जर्मनीत चल खिळ्यांच्या साहाय्याने मुद्रण करण्याचे सुरू केले होते. त्याची पहिली उल्लेखनीय कार्यसिद्धी म्हणजे, १४५५ सालाच्या सुमारास पूर्ण झालेली लॅटिन व्हल्गेटची आवृत्ती. १४९५ सालापर्यंत पूर्ण बायबल किंवा त्याचे निदान काही भाग तरी, अनुक्रमे जर्मन, इटॅलियन, फ्रेंच, झेक, डच, हिब्रू, कॅटलॅन, ग्रीक, स्पॅनिश, स्लॅव्हॉनिक, पोर्तुगीज आणि सर्बियन भाषांत मुद्रित झालेले होते.

डेसीडर्युस इरॅस्मस नामक डच अभ्यासकाने १५१६ साली ग्रीक मूळग्रंथाची पहिली संपूर्ण मुद्रित आवृत्ती काढली. बायबलचा “सर्व लोकांच्या सर्व भाषांत अनुवाद झाला पाहिजे,” अशी इरॅस्मसची इच्छा होती. तथापि, आपली मोठी लोकप्रियता गमावण्याच्या भीतीमुळे तो स्वतः त्याचे भाषांतर करण्यासाठी धजत नव्हता. तथापि कालांतराने इतरजण पुढे आले जे यापेक्षा अधिक धैर्य दाखवणार होते. या लोकांपैकी एक उल्लेखनीय नाव आहे विल्यम टिंडेल यांचे.

विल्यम टिंडेल आणि इंग्रजी बायबल

टिंडेल यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथे झाले आणि १५२१ च्या सुमारास ते सर जॉन वॉल्श यांच्या घरी त्यांच्या मुलांना शिकवण्या देऊ लागले. वॉल्श यांच्या घरच्या जेवणावळींमध्ये त्यांचा औदार्यपूर्ण पाहुणचार घेताना, सहसा तरुण टिंडेल स्थानिक पाळकांशी शब्दयुद्धे खेळत असत. टिंडेल, बायबल उघडून त्यातील वचने दाखवून त्यांच्या मतांना अगदी सडेतोड शब्दांत आव्हान देत असत. कालांतराने वॉल्श दांपत्याला टिंडेलचे म्हणणे पटले, आणि त्यांनी पूर्वीसारखे पाळकांना आमंत्रित करण्याचे कमी केले, शिवाय त्यांच्या घरी या पाळकांची आता पूर्वीसारखी सरबराई देखील होत नसे. यामुळे साहजिकच टिंडेल आणि त्यांच्या मतांविषयी, पाळकांच्या मनात कटुता आणखीनच वाढली.

असाच एकदा वादविवाद चालू असताना, टिंडेल यांच्या एका धार्मिक विरोधकाने असे विधान केले: “देवाचे नियम एखाद्या वेळेस नसले तरी चालेल पण पोप यांचे नियम हवेच.” टिंडेल यांनी त्या विरोधकाला दिलेल्या प्रत्युत्तरातून त्यांच्या करारी भूमिकेची कल्पना येते: “मला न पोपची पर्वा आहे न त्यांच्या कोणत्या नियमांची. देवाने आणखी थोडे आयुष्य पदरी घातले तर काही वर्षांतच मी असे करीन, की तुमच्यापेक्षा नांगर चालवणाऱ्‍या पोराला शास्त्रवचनांची अधिक समज असेल.” टिंडेल यांचा निर्धार आता पक्का झाला होता. त्यांनी नंतर लिहिले: “सामान्य लोकांना बायबलचा मुख्य आशय, घटनाक्रम, आणि त्यातील मजकुराचा अर्थ कळावा म्हणून त्यांना त्यांच्या मातृभाषेत जोपर्यंत बायबल उपलब्ध करून दिले जात नाही, तोपर्यंत त्यांच्या मनांत सत्य बिंबवता येणे शक्यच नाही हे मला अनुभवाने कळून चुकले होते.”

त्या वेळी, अद्याप इंग्रजीतून एकही बायबल मुद्रित करण्यात आलेले नव्हते. म्हणून १५२३ साली, एका भाषांतर उपक्रमासाठी बिशप टंस्टल यांची परवानगी मागण्याच्या उद्देशाने टिंडेल लंडनला आले. पण, परवानगी नाकारण्यात आल्यामुळे त्यांनी आपले कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी इंग्लंड सोडले, ते कायमचेच. जर्मनीतील कोलोन शहरात त्यांच्या पहिल्या मुद्रणालयावर धाड घालण्यात आली; तेव्हा, अद्याप बाइंडिंग न केलेली काही अमूल्य कागदे घेऊन ते मोठ्या मुश्‍किलीने पळ काढण्यात यशस्वी झाले होते. तथापि, वर्म्स या जर्मनीतील शहरात इंग्रजीतील “नव्या कराराच्या” जवळजवळ ३,००० प्रती मुद्रित करण्यात आल्या. १५२६ सालाच्या सुरवातीला या प्रती इंग्लंडला पाठवण्यात आल्या आणि तेथे त्यांचे वितरण सुरू झाले. यांपैकीच काही बायबलच्या प्रती बिशप टंस्टल यांनी विकत घेऊन जाळून टाकल्या आणि अशारितीने ध्यानीमनी नसताना टिंडेल यांना त्यांचे कार्य सुरू ठेवण्यासाठी एका अर्थाने साहाय्यच केले!

संशोधनामुळे स्पष्टीकृत समज

टिंडेल यांचे आपल्या कामावर मनस्वी प्रेम होते, हे उघडच आहे. बायबलचा केंब्रिज इतिहास (इंग्रजी) या ग्रंथानुसार, “शास्त्रवचनांपासून त्यांना एक प्रकारचा आनंद प्राप्त होत असे; त्यांच्या लेखनशैलीत देखील, उत्साहपूर्ण आणि चैतन्यप्रद असे काहीतरी आहे ज्यावरून त्यांना प्राप्त होणाऱ्‍या आनंदाचा प्रत्यय येतो.” शास्त्रवचनांना स्वतःच सामान्य माणसाशी शक्य होईल तितक्या बिनचूक आणि साध्यासोप्या शब्दांत बोलू द्यावे हे टिंडेल यांचे अंतिम उद्दिष्ट होते. चर्चच्या सिद्धान्तांमुळे शतकानुशतके अंधारात राहिलेला बायबलमधील शब्दांचा अर्थ, आता त्यांना त्यांच्या अभ्यासातून हळूहळू उलगडू लागला होता. मृत्यूची टांगती तलवार आणि त्यांचा कट्टर शत्रू, सर थॉमस मोर यांची आक्रमक लिखाणे यांपैकी कशानेही हतबल न होता टिंडेल यांनी नव्याने समजलेल्या गोष्टी त्यांच्या भाषांतरात सामील केल्या.

लॅटिन भाषेच्या आधारावर भाषांतर करण्याऐवजी इरॅस्मस यांच्या ग्रीक मूळग्रंथाचा आधार घेऊन, टिंडेल यांनी अगापे या ग्रीक शब्दाचे तात्पर्य आणखी स्पष्टपणे व्यक्‍त व्हावे म्हणून “परोपकार” या शब्दाऐवजी “प्रीती” हा शब्द निवडला. तसेच, “चर्च” ऐवजी “मंडळी,” “प्रायश्‍चित्त करणे” ऐवजी “पश्‍चात्ताप,” आणि “पाळक” ऐवजी “वडील” हे शब्द त्यांनी उपयोगात आणले. (१ करिंथकर १३:१-३; कलस्सैकर ४:१५, १६; लूक १३:३, ५; १ तीमथ्य ५:१७, टिंडेल) या फेरबदलांमुळे चर्चच्या अधिकाराला जबर धक्का बसला, शिवाय, पाळकांजवळ पापाची कबूली देणे यांसारख्या परंपरेनुसार चालत आलेल्या धार्मिक चालीरिती देखील पार धुळीस मिळाल्या.

टिंडेल यांनी परगेटरी आणि मृत्योपरांत सचेतन अवस्था यांसारख्या शिकवणुकींना बायबलनुसार निराधार ठरवून त्यांचे खंडन केले, आणि “पुनरुत्थान” हा शब्द तसाच राहू दिला. मृतांविषयी त्यांनी मोर यांना आपले विचार कळवले: “त्यांना स्वर्गात, नरकात आणि परगेटरीत पाठवून [तुम्ही] पुनरुत्थान सिद्ध करून दाखवण्यासाठी ख्रिस्त आणि पौल यांनी वापरलेले युक्‍तिवाद निकामी करता.” यासंबंधाने, टिंडेल यांनी मत्तय २२:३०-३२ आणि १ करिंथकर १५:१२-१९ या वचनांचा संदर्भ दिला. मृत्यूनंतर भविष्यात पुनरुत्थान होईपर्यंत, मृतजन बेशुद्धावस्थेत राहतात हा त्यांचा विश्‍वास बिनचूक होता. (स्तोत्र १४६:४; उपदेशक ९:५; योहान ११:११, २४, २५) त्याअर्थी, मरिया आणि “संतांना” प्रार्थना करण्याची संपूर्ण संकल्पनाच व्यर्थ होती, कारण ते बेशुद्धावस्थेत असल्यामुळे न ऐकू शकत होते न आपल्या प्रार्थना करणाऱ्‍यांसाठी मध्यस्थी करू शकत होते.

टिंडेल यांचे हिब्रू शास्त्रवचनांचे भाषांतर

टिंडेल यांनी १५३० साली, हिब्रू शास्त्रवचनांतील पहिल्या पाच पुस्तकांची अर्थात पेन्टट्यूकची एक आवृत्ती तयार केली. त्याअर्थी, ते थेट हिब्रू भाषेतून इंग्रजीत बायबलचे भाषांतर करणारे पहिलेच भाषांतरकार ठरले. यहोवा हे नाव वापरणारेही टिंडेल हे पहिलेच इंग्रज भाषांतरकार होते. लंडनचे विद्वान डेव्हिड डॅन्यल यांनी लिहिल्याप्रमाणे: “देवाचे नाव नव्याने उजेडात आलेले पाहून टिंडेल यांच्या वाचकांच्या मनावर जबरदस्त प्रभाव पडला असेल यात शंकाच नाही.”

स्पष्ट भाषांतर करण्याच्या उद्देशाने, टिंडेल यांनी एकाच हिब्रू शब्दाचे भाषांतर करताना त्याठिकाणी अनेक इंग्रजी शब्द वापरले. तरीसुद्धा, ते हिब्रू भाषेच्या मूळ रचनेपासून अजिबातच वाहवत गेले नाही. परिणामतः हिब्रू भाषेच्या मुद्देसूदपणातील ताकद कायम राहिली आहे. त्यांनी स्वतःच सांगितले: “हिब्रू भाषेच्या गुणधर्मांचे लॅटिनपेक्षा इंग्रजीशी हजारपटीने सामंजस्य आहे. बोलण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे; म्हणून कितीतरी वेळा तर एखाद्या विशिष्ट मजकुराचे सरळ शब्दशः भाषांतर केले तरीसुद्धा काम भागते.”

प्रामुख्याने शब्दशः पद्धतीने भाषांतरित केलेल्या टिंडेल यांच्या भाषांतरात निरनिराळ्या हिब्रू शब्दप्रयोगांची छटा होती. यांपैकी काही शब्दप्रयोग पहिल्यांदा वाचताना काहीसे विचित्र वाटले असतील. तरीपण, कालांतराने बायबल लोकांच्या इतक्या परिचयाचे झाले, की यांपैकीचे बरेच शब्दप्रयोग आता इंग्रजी भाषेत सामील झाले आहेत. उदाहरणार्थ, “अ मॅन आफ्टर हिज ओन हार्ट” (१ शमुवेल १३:१४ येथे आहे त्याप्रमाणे), “पासओव्हर” आणि “स्केपगोट.” याहून महत्त्वाचे म्हणजे, इंग्रजी बायबल वाचणाऱ्‍यांना हिब्रू विचारसरणीची ओळख घडली, आणि यामुळे त्यांना देवप्रेरित शास्त्रवचनांची आणखी सखोल मर्मदृष्टी लाभली.

बायबल आणि टिंडेलवर बंदी

आपल्या स्वतःच्या भाषेत बायबल वाचता येऊ शकणे आनंदविणारे होते. इंग्रज जनसामान्यांनी उत्तम प्रतिसाद दिला; कापडांच्या तागांतून किंवा इतर मालासोबत देशांत बायबलच्या जितक्या प्रती चोरून आणता आल्या त्या सर्वच्या सर्व विकल्या गेल्या. दरम्यान, बायबलला सर्वोच्च अधिकार मानण्यात येऊ लागल्यास निश्‍चितच आपले स्थान आपल्या हातून जाईल, याची पाळकवर्गाला जाणीव होऊ लागली होती. यामुळे, टिंडेल आणि त्यांच्या समर्थकांसाठी हा जीवन मरणाचाच प्रश्‍न बनला.

चर्च आणि सरकारकडून अहोरात्र पाठलाग होत असल्यामुळे टिंडेल बेल्जियम येथील ॲन्टवर्प शहरातच गुप्तपणे काम करीत राहिले. अशातही, ते आठवड्यातील दोन दिवस इतर इंग्रज निर्वासितांची, गोरगरिबांची आणि आजारी लोकांची सेवा करण्यासाठी खर्च करीत असत—यास ते आपला विरंगुळा समजायचे. त्यांनी आपली बरीचशी संपत्ती अशा कामासाठीच खर्च केली. हिब्रू शास्त्रवचनांच्या उर्वरित भागाचे भाषांतर करू शकण्याआधी, स्वतःला टिंडेल यांचा मित्र म्हणवणाऱ्‍या एका इंग्रजाने पैशासाठी त्यांचा विश्‍वासघात करून त्यांना धरून दिले. बेल्जियम येथील वील्वोर्ड नावाच्या ठिकाणी १५३६ साली त्यांना मृत्यूदंड देण्यात आला; शेवटी, ते कळवळून एवढेच फक्‍त म्हणाले, “हे प्रभो! इंग्लंडच्या राजाचे डोळे उघड.”

सन १५३८ पर्यंत, आठवे राजा हेन्री यांनी असा हुकूम दिला की इंग्लंडमधील प्रत्येक चर्चमध्ये बायबलच्या प्रती ठेवण्यात याव्यात; असा हुकूम त्याने का दिला हे त्याचे त्यालाच माहीत. अर्थात याचे श्रेय टिंडेल यांना देण्यात आले नसले तरीसुद्धा, चर्चेसमध्ये ठेवण्यासाठी भाषांतर मात्र त्यांचेच निवडण्यात आले हे विशेष. अशारितीने टिंडेल यांचे लिखाण इतके काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले की त्यांनी इंग्रजीतील “पुढच्या सर्व भाषांतर आवृत्तींसाठी एक पायंडा घातला.” (बायबलचा केंब्रिज इतिहास) १६११ साली प्रकाशित झालेल्या किंग जेम्स व्हर्शन यात तर टिंडेल यांच्या भाषांतरातून जवळजवळ ९० टक्के भाग थेटपणे घेण्यात आला.

बायबल सहज उपलब्ध होऊ लागल्यामुळे इंग्लंडमधील परिस्थितीत आमूलाग्र बदल झाले. चर्चेसमध्ये, कधीकधी बायबलवर केंद्रित असणाऱ्‍या चर्चा इतक्या काही रंगात यायच्या की त्यांमुळे चर्चच्या उपासना कार्यक्रमांत व्यत्यय यायचे! “थेट बायबलमधून स्वतःहून वाचता यावे म्हणून वृद्ध लोक वाचावयास शिकू लागले आणि लहान मुलेही मोठ्यांजवळ बसून ऐकू लागली.” (इंग्रजी बायबलचा संक्षिप्त इतिहास, इंग्रजी) याच दरम्यान इतर युरोपीय देशांत आणि भाषांतही बायबलच्या वितरणात लक्षणीय वृद्धी झाली. पण, इंग्लंडमधील बायबल समर्थक चळवळीचे सबंध जगात पडसाद उमटणार होते. हे कसे घडून आले? शिवाय, अन्य शोध आणि संशोधने यांचा आपण आज जे बायबल वापरतो त्यांवर कसा प्रभाव पडला? यासंबंधीचा आमचा अहवाल याच लेखमालिकेतील पुढच्या अंकात संपुष्टात येईल.

[२६ पानांवरील चित्र]

टिंडेल यांचा १५२६ सालचा “नवा करार”—आगीच्या लोटांतून बचावलेली एकमात्र संपूर्ण ज्ञात प्रत

[Credit Line]

© The British Library Board

[२६, २७ पानांवरील तक्‍ता]

(For fully formatted text, see publication)

बायबलच्या संचारणातील प्रमुख तारखा

सामान्य युग

विक्लिफ यांच्या बायबलचे भाषांतर सुरू (१३८४ च्या आधी)

१४००

हूस यांना मृत्यूदंड १४१५

गुटेनबर्ग —पहिले मुद्रित बायबल सु. १४५५

१५००

मुद्रित केलेल्या सुरवातीच्या प्रादेशिक भाषांतील आवृत्त्या

इरॅस्मस यांच्या ग्रीक ग्रंथातील भाग १५१६

टिंडेल यांचा “नवा करार” १५२६

टिंडेल यांना मृत्यूदंड १५३६

आठवे हेन्री यांचा चर्चेसमध्ये बायबल ठेवण्याचा १५३८ मधील आदेश

१६००

किंग जेम्स व्हर्शन १६११

[चित्रं]

विक्लिफ

हूस

टिंडेल

आठवे हेन्री

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा