वाचकांचे प्रश्न
शेम-टोब बेन आयझक इब्न शॉपरुत या १४ व्या शतकातील यहुदी वैद्याने नक्कल केलेल्या मत्तयातील हिब्रू लिखाणात टेट्राग्रॅमेटॉन (देवाच्या नावाचे चार हिब्रू वर्ण) आढळते का?
नाही, ते आढळत नाही. तथापि, टेहळणी बुरूजच्या ऑगस्ट १५, १९९६ अंकात पृष्ठ १३ वर दाखवण्यात आल्याप्रमाणे, मत्तयाच्या या लिखाणात हॅशशेम (पूर्ण लिहिलेले किंवा संक्षिप्त रूपात) हा शब्दप्रयोग १९ वेळा आढळतो.
हिब्रू भाषेतील हॅशशेम म्हणजे “नाव,” आणि ते देवाच्या नावाच्या संदर्भात आहे याविषयी वाद नाही. उदाहरणार्थ, शेम-टोबच्या लिखाणातील, मत्तय ३:३ येथे मत्तयाने यशया ४०:३ येथील शब्द उद्धृत केलेल्या उताऱ्यात हॅशशेमचे संक्षिप्त रूप आढळते. इब्री शास्त्रवचनांतून एखादे वचन उद्धृत करताना, जेथे टेट्राग्रेमॅटॉन आढळते तेथे मत्तयाने आपल्या शुभवर्तमानात देवाचे नाव घातले असेल असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत ठरेल. यामुळे, शेम-टोबच्या हिब्रू लिखाणात जरी टेट्राग्रेमॅटॉन उपयोगात आणलेले नसले तरीसुद्धा, मत्तय ३:३ याप्रमाणेच इतर ठिकाणी “नाव” हा शब्दप्रयोग वापरण्यात आल्यामुळे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत “यहोवा” नावाच्या वापरास समर्थन मिळते.
शेम-टोब याने एव्हेन बोखान या आपल्या वादग्रस्त लिखाणात मत्तयाच्या हिब्रू मूळग्रंथातून नक्कल केलेली आहे. तथापि हा हिब्रू मूळग्रंथ आला कोठून? याविषयावर व्यापक अभ्यास केलेले प्राध्यापक जॉर्ज हॉवर्ड यांनी असे सुचविले आहे की “शेम-टोबचे हिब्रू भाषेतील मत्तय हे ख्रिस्ती युगाच्या पहिल्या चार शतकांदरम्यान केव्हातरी लिहिण्यात आले असावे.”a काही त्याच्या या म्हणण्यावर कदाचित आक्षेप घेतील.
हॉवर्ड लिहितात: “या लिखाणात समाविष्ट केलेल्या हिब्रू भाषेतील मत्तयाचे वैशिष्ट्य हे आहे की प्रमाणित ग्रीक मत्तयाच्या तुलनेत त्यात अनेक तफावती आढळतात.” उदाहरणार्थ, शेम-टोबच्या लिखाणानुसार, येशूने योहानाविषयी असे म्हटले: “मी तुम्हास खचित सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यात बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही.” पण त्यात येशूचे हे पुढचे शब्द गाळलेले आहेत: “तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” (मत्तय ११:११) काहीशा अशाच प्रकारे, इब्री शास्त्रवचनांच्या उपलब्ध असलेल्या हिब्रू लिखाणांतील विशिष्ट मजकुरात आणि ग्रीक सेप्टुअजिंट आवृत्तीतील त्याच मजकुराच्या भाषेत बरेचसे फरक आहेत. आम्ही हे फरक असल्याचे मान्य करीत असलो तरीसुद्धा, अशाप्रकारच्या प्राचीन लिखाणांचा तुलनात्मक अभ्यासात काही प्रमाणात उपयोग होतो हेही खरे.
आधी उल्लेखिल्याप्रमाणे, ज्याठिकाणी मत्तयाने वस्तुतः टेट्राग्रेमॅटॉन वापरले होते असे मानण्यास ठोस कारण आहे, त्याठिकाणी शेम-टोबच्या मत्तयाच्या लिखाणात ‘नावाचा’ उल्लेख आढळतो. अशाप्रकारे, १९५० सालापासून शेम-टोबचे लिखाण, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत देवाचे नाव वापरण्यासाठी एक आधार म्हणून उपयोगात आणले जात, आणि न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—विथ रेफरेन्सेस यात अजूनही त्याचा उल्लेख केला जातो.b
[तळटीपा]
a न्यू टेस्टामेंट स्टडीज, खंड ४३, क्रमांक १, जानेवारी १९९७, पृष्ठे ५८-७१ देखील पाहा.
b वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे १९८४ साली प्रकाशित.