येशूचे येणे किंवा येशूची उपस्थिती—कोणते?
“आपल्या उपस्थितीचे व व्यवस्थीकरणाच्या समाप्तीचे चिन्ह काय असेल?”—मत्तय २४:३, NW.
१. येशूच्या सेवेमध्ये प्रश्नांनी कोणती भूमिका बजावली?
येशू, प्रश्नांचा कौशल्यपूर्ण वापर करत असल्यामुळे त्याचे श्रोते विचार करण्यास प्रवृत्त होत, गोष्टींकडे नवीन दृष्टिकोनातूनही ते पाहत असत. (मार्क १२:३५-३७; लूक ६:९; ९:२०; २०:३, ४) त्याने प्रश्नांची उत्तरे देखील दिली असल्यामुळे आपण त्याचे आभार मानू शकतो. त्याची उत्तरे, आपण कदाचित विचार केला नसता किंवा समजू शकलो नसतो अशा सत्यांवर प्रकाशझोत टाकतात.—मार्क ७:१७-२३; ९:११-१३; १०:१०-१२; १२:१८-२७.
२. आपण आता कोणत्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे?
२ मत्तय २४:३ मध्ये आपल्याला, येशूने उत्तर दिलेला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न आढळतो. येशूच्या पार्थिव जीवनाची समाप्ती जवळ असताना नुकतेच त्याने, जेरुसलेमचा नाश होईल व हे यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंताला चिन्हित करील, असा इशारा दिला होता. मत्तयाचा अहवाल पुढे म्हणतो: “तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले: ‘ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या उपस्थितीचे [“येण्याचे,” मराठी, संदर्भासहित भाषांतर] व व्यवस्थीकरणाच्या समाप्तीचे चिन्ह काय असेल, हे आम्हास सांगा.’”—मत्तय २४:३.
३, ४. मत्तय २४:३ मध्ये आढळणाऱ्या एका मुख्य शब्दाचा अनुवाद विविध बायबल ज्याप्रमाणे करतात, त्यांमध्ये कोणता महत्त्वपूर्ण फरक आहे?
३ बायबलच्या कोट्यवधी वाचकांना, ‘शिष्यांनी हा प्रश्न का विचारला, व येशूने दिलेल्या उत्तराचा माझ्या स्वतःवर कोणता परिणाम झाला पाहिजे,’ असे वाटले आहे. याचे उत्तर देताना येशूने, झाडाला नवीन पालवी फुटल्यावर त्यावरून उन्हाळा “जवळ” आल्याचे दिसते याविषयी सांगितले. (मत्तय २४:३२, ३३) यास्तव प्रेषित, येशूच्या येण्याचे, त्याचे पुनरागमन जवळ असल्याचे सिद्ध करणारे चिन्ह मागत होते, अशी शिकवण अनेक चर्च देतात. त्यांचा असा विश्वास आहे, की तो ख्रिश्चनांना स्वर्गात घेईल व या जगावर नाश आणील तो क्षण म्हणजे त्याचे ‘येणे’ असेल. हे बरोबर असल्याचे तुम्हाला वाटते का?
४ ‘येणे’ या शब्दाचे भाषांतर करण्याऐवजी काही बायबल अनुवाद तसेच पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी), ‘उपस्थिती’ हा शब्द वापरतात. येशूच्या शिष्यांनी जे विचारले व त्याने उत्तरात जे सांगितले ते, चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्या शिकवणीपासून भिन्न असू शकते का? नेमके काय विचारण्यात आले होते? तसेच येशूने काय उत्तर दिले होते?
ते काय विचारत होते?
५, ६. मत्तय २४:३ येथे प्रेषितांनी विचारलेला प्रश्न आपण वाचतो तेव्हा त्यांच्या विचारसरणीबद्दल कोणता निष्कर्ष काढू शकतो?
५ मंदिराविषयी येशूने जे काही सांगितले त्याचा विचार केल्यास, शिष्यांनी ‘त्याच्या उपस्थितीचे [वा “येण्याचे”] व व्यवस्थीकरणाच्या [खरोखरचे “युग”] समाप्तीचे चिन्ह’ मागितले तेव्हा ते कदाचित यहुदी व्यवस्थेचा विचार करत होते.—१ करिंथकर १०:११ आणि गलतीकर १:४, KJ मधील “जग,” पडताळून पाहा.
६ या क्षणी प्रेषितांना येशूच्या शिकवणुकींची केवळ मर्यादित समज होती. “देवाचे राज्य एव्हांच प्रगट होणार” अशी त्यांची पूर्वी कल्पना होती. (लूक १९:११; मत्तय १६:२१-२३; मार्क १०:३५-४०) शिवाय, जैतुनांच्या डोंगरावरील चर्चेनंतरही परंतु पवित्र आत्म्याने अभिषिक्त होण्याआधी त्यांनी येशूला, तो तेव्हा इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापित करणार आहे का, असे विचारले होते.—प्रेषितांची कृत्ये १:६.
७. प्रेषितांनी येशूला त्याच्या भावी भूमिकेबद्दल का विचारावे बरे?
७ तरीदेखील, तो त्यांना सोडून जाणार होता हे त्यांना माहीत होते, कारण अलीकडेच तो म्हणाला होता: “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे. . . . तुम्हाजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला.” (योहान १२:३५; लूक १९:१२-२७) तेव्हा त्यांनी नक्कीच असा विचार केला असावा, की ‘जर येशू सोडून जाणार आहे तर आपण त्याचे पुनरागमन कसे ओळखणार बरे?’ तो मशीहा म्हणून प्रकट झाला तेव्हा बहुतेकांनी त्याला ओळखले नाही. आणि एक वर्षानंतर, मशीहाला ज्या गोष्टी करावयाच्या होत्या त्या सर्व तो पूर्ण करील किंवा कसे याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रश्न आले. (मत्तय ११:२, ३) म्हणूनच प्रेषितांकडे भवितव्याबद्दलची विचारपूस करण्याचे कारण होते. पण मग, तो लवकर येईल का याचे, की काही तरी दुसऱ्या गोष्टीचे ते चिन्ह मागत होते?
८. प्रेषित, येशूबरोबर कदाचित कोणत्या भाषेमध्ये बोलत असावेत?
८ समजा तुम्ही एक पक्षी आहात आणि जैतुनांच्या डोंगरावर चाललेली चर्चा ऐकत आहात. (पडताळा उपदेशक १०:२०.) तुम्ही कदाचित येशू आणि त्याच्या प्रेषितांना इब्री भाषेत बोलताना ऐकले असावे. (मार्क १४:७०; योहान ५:२; १९:१७, २०; प्रेषितांची कृत्ये २१:४०) तरीदेखील, त्यांना कदाचित ग्रीक भाषाही येत होती.
ग्रीकमध्ये—मत्तयाने काय लिहिले
९. मत्तयाचे बहुतेक आधुनिक अनुवाद कशावर आधारित आहेत?
९ मत्तयाने त्याचे शुभवर्तमान पहिल्यांदा इब्री भाषेत लिहिले, असे सा. यु. दुसऱ्या शतकातील अहवाल सूचित करतात. स्पष्टपणे, त्याने ते नंतर ग्रीकमध्ये लिहिले. ग्रीकमधील अनेक हस्तलिखिते आपल्या दिवसांपर्यंत शाबूत राहिल्यामुळे आजच्या भाषांमध्ये त्याच्या शुभवर्तमानाचे भाषांतर करण्यासाठी आधार मिळाला. जैतुनांच्या डोंगरावर झालेल्या संभाषणाबद्दल मत्तयाने ग्रीकमध्ये काय लिहिले? शिष्यांनी ‘येणे’ किंवा ‘उपस्थिती’ याबद्दल जे विचारले आणि येशूने त्यावर जे उत्तर दिले त्याविषयी त्याने काय लिहिले?
१०. (अ) मत्तयाने बहुतेकवेळा ‘येणे’ यासाठी कोणता ग्रीक शब्द वापरला व त्याचे कोणकोणते अर्थ होऊ शकतात? (ब) आणखी कोणता ग्रीक शब्द आस्थेचा आहे?
१० मत्तयाच्या पहिल्या २३ अध्यायांमध्ये आपल्याला, “येणे” यासाठी एरखोमाय हे सामान्य ग्रीक क्रियापद ८० पेक्षा अधिक वेळा आढळते. ते बहुधा जवळ किंवा समीप येणे असा अर्थ देते, जसे की, योहान १:४७ मध्ये ‘येशूने नथनेलाला आपणाकडे येताना पाहिले.’ एरखोमाय हे क्रियापद ज्याप्रमाणे वापरले जाते त्याप्रमाणे त्याचा अर्थ “आगमन,” “जाणे,” “येणे” “पोहंचणे,” किंवा “मार्गावर असणे” असा होऊ शकतो. (मत्तय २:८, ११; ८:२८; योहान ४:२५, २७, ४५; २०:४, ८; प्रेषितांची कृत्ये ८:४०; १३:५१) पण मत्तय २४:३, २७, ३७, ३९ मध्ये मत्तयाने एक वेगळाच शब्द वापरला आहे, शुभवर्तमानांमध्ये इतरत्र कोठेही आढळणार नाही असे ते नाम आहे: पराऊसिया. बायबल लिहिण्यासाठी देवाने प्रेरणा दिली असल्यामुळे ग्रीकमध्ये शुभवर्तमान लिहिताना या वचनांमध्ये हा ग्रीक शब्द निवडण्यास त्याने मत्तयाला का प्रवृत्त केले असावे बरे? त्याचा अर्थ काय होतो, व आपण तो जाणून घेण्याची इच्छा का प्रदर्शित केली पाहिजे?
११. (अ) पराऊसिया याचा अर्थ काय? (ब) जोसीफसच्या लिखाणांतील उदाहरणे पराऊसिया याबद्दल असलेल्या आपल्या समजेला कशाप्रकारे समर्थन देतात? (तळटीप पाहा.)
११ स्पष्टपणे, पराऊसिया याचा अर्थ “उपस्थिती” असा होतो. वाईन यांचा नव्या करारातील शब्दांवर टीकात्मक शब्दकोश (इंग्रजी), म्हणतो: ‘पराऊसिया . . . वास्तविक, उपस्थिती, परा, सोबत व आऊसिया, असणे (ईमी यातून, असणे) हे आगमन तसेच त्यानंतर लगेच सोबतची उपस्थिती दाखवून देतो. उदाहरणार्थ, एका पपायरस पत्रामध्ये एक स्त्री, एका विशिष्ट ठिकाणी तिच्या जागेसंबंधाने होणाऱ्या बोलणीला हजर राहण्यासाठी तिच्या पराऊसियाच्या गरजेविषयी सांगते.’ इतर शब्दकोश स्पष्टीकरण देतात, की पराऊसिया ‘एखाद्या शासकाची भेट’ दर्शवते. यास्तव, ते केवळ येण्याचा क्षण नव्हे तर आल्यानंतरच्या काळापासूनची उपस्थिती आहे. अशाचप्रकारे यहुदी इतिवृत्तकार जोसीफस, जो प्रेषितांचा एक समकालीन होता, त्याने पराऊसियाचा वापर केला ही आस्थेची गोष्ट आहे.a
१२. पराऊसिया याच्या अर्थाचे समर्थन करण्यासाठी स्वतः बायबल आपल्याला कशी मदत करते?
१२ प्राचीन साहित्य स्पष्टपणे ‘उपस्थितीच्या’ अर्थाला समर्थन देत असले तरी, देवाचे वचन पराऊसिया या शब्दाचा वापर कसा करते याबद्दल ख्रिश्चनांना विशेष आस्था आहे. उत्तर तेच आहे—उपस्थिती. हे आपण पौलाच्या पत्रांमधील उदाहरणांतून पाहतो. उदाहरणार्थ, त्याने फिलिप्पैकरांना लिहिले: ‘तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही, केवळ माझ्या उपस्थितीतच नव्हे तर विशेषकरून आता, म्हणजे माझ्या अनुपस्थितीतही, आपले तारण साधून घ्या.’ शिवाय ‘त्याच्या उपस्थितीमुळे [पराऊसिया] त्यांना’ आणखी आनंद करता येईल याकारणासाठी तो त्यांच्यासोबत राहणार असेही बोलला होता. (फिलिप्पैकर १:२५, २६; २:१२) इतर अनुवादांमध्ये असे आहे, “माझे तुमच्याबरोबर पुन्हा असणे” (वेमाऊथ; न्यू इंटरनॅशनल व्हर्शन); “मी तुमच्याबरोबर पुन्हा असेन तेव्हा” (जेरुसलेम बायबल; न्यू इंग्लिश बायबल); व “तुमच्यामध्ये मला तुम्ही पुन्हा एकदा पाहाल तेव्हा.” (ट्वेंटीयथ सेंचुरी न्यू टेस्टमेंट) पौलाने २ करिंथकर १०:१०, ११ मध्ये ‘व्यक्तिगतपणे त्याची उपस्थिती’ व ‘अनुपस्थिती’ यांमधील फरक दाखवला आहे. या उदाहरणांमध्ये तो स्पष्टपणे त्याच्या आगमनाविषयी किंवा येण्याविषयी बोलत नव्हता; त्याने पराऊसिया, अर्थात उपस्थित असणे, या अर्थाने त्याचा उपयोग केला.b (पडताळा १ करिंथकर १६:१७.) परंतु येशूच्या पराऊसियाच्या संदर्भांबद्दल काय? ते, त्याच्या ‘येण्याच्या’ अर्थाने आहेत की त्याच्या विस्तृत उपस्थितीला सूचित करतात?
१३, १४. (अ) पराऊसिया काही कालावधीचा आहे असा निष्कर्ष आपण का काढला पाहिजे? (ब) येशूच्या पराऊसियाच्या पल्ल्याविषयी काय म्हटले पाहिजे?
१३ पौलाच्या दिवसांतील आत्म्याने अभिषिक्त ख्रिश्चनांना येशूच्या पराऊसियात रस होता. परंतु पौलाने त्यांना ‘त्यांच्या तर्कामुळे दचकण्याविरुद्ध’ इशारा दिला. पहिल्यांदा ‘धर्मत्यागी पुरूष’ प्रकट झाला पाहिजे, व तो ख्रिस्ती धर्मजगताचा पाळक वर्ग असल्याचे शाबीत झाले आहे. पौलाने लिहिले, की ‘सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त अशी त्या धर्मत्यागी पुरुषाची उपस्थिती आहे.’ (२ थेस्सलनीकाकर २:२, ३, ९) त्या ‘धर्मत्यागी पुरुषाचे’ पराऊसिया किंवा त्याची उपस्थिती, केवळ क्षणिक आगमनाची नव्हती; ती काही काळासाठी असणार होती ज्या दरम्यान खोटी चिन्हे प्रकट होणार होती. हे महत्त्वपूर्ण का आहे?
१४ त्याआधीच्याच वचनाचा विचार करा: ‘तो अनीतिमान पुरूष प्रगट होईल, त्याला प्रभु येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील, आणि तो येताच आपल्या उपस्थितीने त्याला नष्ट करील.’ ज्याप्रमाणे ‘अनीतिमान पुरुषाची’ उपस्थिती एका कालावधीसाठी असणार होती त्याचप्रमाणे येशूची उपस्थिती काही काळासाठी असणार होती व ती, त्या अनीतिमान ‘नाशाच्या पुत्राचा’ अंत केल्यावर कळसास पोहंचणार होती.—२ थेस्सलनीकाकर २:८.
इब्री भाषेचे पैलू
१५, १६. (अ) इब्रीमध्ये भाषांतर केलेल्या मत्तयाच्या अनेक अनुवादांमध्ये कोणता विशिष्ट शब्द वापरण्यात आला आहे? (ब) शास्त्रवचनांमध्ये बोह या शब्दाचा कसा वापर करण्यात आला आहे?
१५ आधी नोंद केल्याप्रमाणे, मत्तयाने आपले शुभवर्तमान पहिल्यांदा इब्री भाषेत लिहिले हे उघड आहे. तेव्हा, मत्तय २४:३, २७, ३७, ३९ मध्ये त्याने कोणता इब्री शब्द वापरला? आधुनिक इब्री भाषेत अनुवादित केलेल्या मत्तयाच्या भाषांतरांत, प्रेषितांनी विचारलेल्या प्रश्नात व येशूने दिलेल्या उत्तरात बोह या क्रियापदाचा एक प्रकार आहे. त्यामुळे ती वचने अशी वाचली जाऊ शकतात: “तुमच्या [बोहचे] व व्यवस्थीकरणाच्या समाप्तीचे चिन्ह काय?” तसेच, “नोहाच्या दिवसांप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे [बोह] असेल.” बोहचा अर्थ काय होतो?
१६ त्याचे विविध अर्थ होत असले तरी, इब्री क्रियापद बोहचा मुळात “येणे” असा अर्थ होतो. थिओलॉजिकल डिकश्नरी ऑफ द ओल्ड टेस्टमेंट म्हणते: ‘बोह हे सर्रासपणे वापरले जाणारे क्रियापद इब्री शास्त्रवचनांमध्ये २,५३२ वेळा आले आहे व हे क्रियापद हालचाल व्यक्त करणारे प्रमुख क्रियापद आहे.’ (उत्पत्ति ७:१, १३; निर्गम १२:२५; २८:३५; २ शमुवेल १९:३०; २ राजे १०:२१; स्तोत्र ६५:२; यशया १:२३; यहेज्केल ११:१६; दानीएल ९:१३; आमोस ८:११) येशू आणि त्याच्या प्रेषितांनी इतके अर्थ असलेला शब्द वापरला असता तर मूळ अर्थ विवाद्य ठरला असता. पण त्यांनी तो वापरला का?
१७. (अ) मत्तयाचे आधुनिक इब्री अनुवाद, येशू आणि त्याचे प्रेषित काय म्हणाले ते इतक्या खासपणे का सूचित करू शकणार नाहीत? (ब) येशू आणि त्याच्या शिष्यांनी कोणता शब्द कदाचित वापरला असेल याचा आणखी एक सुगावा आपल्याला कोठे लागू शकतो, व आणखी कोणत्या कारणास्तव हा उगम आपल्याला आस्थेचा वाटतो? (तळटीप पाहा.)
१७ लक्षात असू द्या, की आधुनिक इब्री अनुवाद, मत्तयाने इब्रीमध्ये जे लिहिले, त्याचा कदाचित अचूक अर्थ देऊ न शकणारे अनुवाद आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की येशूने, पराऊसियाचा उचित अर्थ देणारा बोह या शब्दाव्यतिरिक्त दुसरा कोणताही शब्द वापरला असावा. हे आपण प्राध्यापक जॉर्ज हॉवर्ड यांचे मत्तयाचे इब्री शुभवर्तमान (इंग्रजी), या १९९५ च्या पुस्तकाद्वारे पाहू शकतो. या पुस्तकाने, यहुदी वैद्य शेम-टोब बेन आयझक इब्न शॉपरुत यांनी, १४ व्या शतकात ख्रिस्ती धर्माविरुद्ध केलेल्या वाग्युद्धावर लक्ष केंद्रित केले. त्या लेखाने मत्तयाच्या शुभवर्तमानाचा एक इब्री पाठ सादर केला. शेम-टोबच्या काळामध्ये लॅटिन किंवा ग्रीकमधून अनुवाद करण्याऐवजी मत्तयाचा हा पाठ अतिशय जुना व मूळ इब्रीमध्ये रचल्याचा पुरावा आहे.c अशाप्रकारे हे आपल्याला जैतुनांच्या डोंगरावर जे काही म्हटले होते त्याच्या समीप आणू शकेल.
१८. शेम-टोब कोणता उल्लेखनीय शब्द वापरतात, व त्याचा अर्थ काय होतो?
१८ मत्तय २४:३, २७, ३९ येथे शेम-टोबचे मत्तय, बोह या क्रियापदाचा वापर करीत नाही. त्याऐवजी ते बायआह या संबंधित नामाचा वापर करते. हे नाम इब्री शास्त्रवचनांमध्ये केवळ यहेज्केल ८:५ येथे आढळते, जेथे त्याचा अर्थ ‘प्रवेशमार्ग’ असा होतो. येण्याच्या क्रियेला व्यक्त करण्याऐवजी, तेथे बायआह एखाद्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला सूचित करते; तुम्ही प्रवेशमार्गात किंवा उंबरठ्यावर असता, याचा अर्थ तुम्ही इमारतीत आहात. त्याचप्रमाणे, मृत समुद्राच्या गुंडाळ्यांमधील बायबलवर आधारित नसलेले धार्मिक लेख बहुधा, आगमन किंवा याजकीय सेवेच्या सुरवातीच्या बाबतीत बायआह वापरतात. (पाहा १ इतिहास २४:३-१९; लूक १:५, ८, २३) तसेच प्राचीन सिरियाक (किंवा, अरामीक) पेशीट्टाचे १९८६ मधील इब्री भाषांतर मत्तय २४:३, २७, ३७, ३९ येथे बायआहचा वापर करते. यास्तव, प्राचीन काळामध्ये बायआह या नामाचा अर्थ, बायबलमध्ये वापरण्यात आलेल्या बोह या क्रियापदापासून काहीसा वेगळा असावा, असा पुरावा आहे. हे आस्थेचे का आहे बरे?
१९. येशू आणि त्याच्या प्रेषितांनी बायआह हा शब्द वापरला तर आपण कोणता निष्कर्ष काढला असता?
१९ प्रेषितांनी प्रश्न विचारताना व येशूने त्यांना उत्तर देताना कदाचित बायआह या नामाचा उपयोग केला असावा. जरी प्रेषितांच्या मनामध्ये केवळ येशूच्या भावी आगमनाची कल्पना होती तरी ख्रिस्ताने कदाचित ते जो विचार करत होते त्यामध्ये अधिक कशाची तरी भर घालण्यासाठी बायआहचा उपयोग केला असावा. येशू एक नवीन पद हाती घेण्यास येत असल्याचे तो दाखवत असावा; त्याचे आगमन त्याच्या नवीन भूमिकेची सुरवात असणार होते. हे पराऊसियाच्या अर्थाशी जुळणारे होते, ज्याचा मत्तयाने नंतर वापर केला. बायआहचा अशा प्रकारे उपयोग, येशूने दिलेले संयुक्त चिन्ह त्याच्या उपस्थितीला प्रतिबिंबित करणारे होते अशी जी शिकवण यहोवाचे साक्षीदार अनेक वर्षांपासून देत आले आहेत तिला आधार देणार होता हे समजण्याजोगे आहे.
त्याच्या उपस्थितीच्या कळसाची वाट पाहणे
२०, २१. नोहाच्या दिवसांबद्दल येशूने केलेल्या विवेचनांपासून आपण काय शिकू शकतो?
२० येशूच्या उपस्थितीविषयी आपण करत असलेल्या अभ्यासाचा थेट परिणाम आपल्या जीवनावर व आपल्या अपेक्षांवर झाला पाहिजे. येशूने आपल्या शिष्यांना जागृत राहण्यास आर्जवले. अनेक जण याबद्दलची खबरदारी घेणार नसले तरी त्याने त्याची उपस्थिती ओळखण्यासाठी एक चिन्ह दिले: ‘नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राची उपस्थिती असेल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यास समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचीहि उपस्थिती असेल.’—मत्तय २४:३७-३९.
२१ नोहाच्या दिवसांमध्ये, त्या पिढीच्या बहुतेक लोकांचे नेहमीचे कामकाज चालू होते. ‘मनुष्याच्या पुत्राच्या उपस्थितीदरम्यान’ असेच होईल असे येशूने भाकीत केले. नोहाच्या सभोवतालच्या लोकांना काहीही होणार नाही असे कदाचित वाटले असेल. पण काय घडले ते तुम्हाला ठाऊकच आहे. एका कालावधीपर्यंत असणारे ते दिवस कळसास पोहंचले, ‘जलप्रलय आला आणि त्याने त्या सर्वांस वाहवून नेले.’ लूकही अशाच प्रकारचा अहवाल देतो ज्यामध्ये येशूने, ‘नोहाच्या दिवसांची’ तुलना ‘मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांसोबत’ केली आहे. येशूने सल्ला दिला: “मनुष्याचा पुत्र प्रगट होईल त्या दिवशी असेच होईल.”—लूक १७:२६-३०.
२२. मत्तयाच्या २४ व्या अध्यायातील येशूच्या भविष्यवाणीत आपण खास रस का घेतला पाहिजे?
२२ या सर्व गोष्टींचा आपल्यासाठी खास अर्थ आहे, कारण आपण अशा काळात जगत आहोत ज्यामध्ये येशूने भाकीत केल्याप्रमाणे—युद्धे, भूमिकंप, मऱ्या, अन्नटंचाई आणि त्याच्या शिष्यांचा छळ, या घटना होत असल्याचे आपण पाहतो. (मत्तय २४:७-९; लूक २१:१०-१२) बहुतेक लोक, या परिस्थितींना इतिहासाचा सर्वसामान्य भाग असे समजत असले तरी पहिले महायुद्ध म्हटल्या जाणाऱ्या इतिहासाला पालटणाऱ्या झगड्यांपासून त्या प्रकट झाल्या आहेत. परंतु, अंजिराच्या झाडावर नवीन पालवी फुटल्यावर उन्हाळा जवळ आला हे जसे जागृत लोक समजून घेतात त्याचप्रमाणे खरे ख्रिस्ती, या महत्त्वपूर्ण घटनांचा अर्थ समजून घेतात. “तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे,” असा येशूने सल्ला दिला.—लूक २१:३१.
२३. मत्तयाच्या २४ व्या अध्यायातील येशूचे शब्द कोणासाठी विशेष अर्थ राखून आहेत, व का?
२३ येशूने जैतुनांच्या डोंगरावर बसून दिलेल्या उत्तराचा बहुतांश भाग आपल्या शिष्यांना उद्देशून दिला. अंत येण्याआधी संपूर्ण पृथ्वीवर जीवन वाचवणाऱ्या सुवार्तेच्या प्रचारकार्यात हेच भाग घेणार होते. ‘पवित्रस्थानात उभ्या असलेल्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाला’ हेच ओळखणार होते. मोठ्या संकटाआधी “पळून” जाऊन तेच प्रतिसाद देणार होते. तसेच, “ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील,” या पुढील शब्दांचा यांच्यावरच विशेषकरून परिणाम होणार होता. (मत्तय २४:९, १४-२२) परंतु या विचारशील शब्दांचा अर्थ काय होतो, व आता आपल्याला अधिक आनंद, आत्मविश्वास व आवेश मिळवण्यासाठी ते आधार पुरवतात असे का म्हटले जाऊ शकते? मत्तय २४:२२ चा पुढील अभ्यास यांची उत्तरे देईल.
[तळटीपा]
a जोसीफसकडची उदाहरणे: सीनाय पर्वतावर विजा व गर्जनांनी “देव तेथे उपस्थित [पराऊसिया] असल्याची घोषणा केली.” निवासमंडपातील चमत्कारिक प्रकटणाने “देवाची उपस्थिती [पराऊसिया] प्रकट केली.” अलीशाच्या सेवकाला डोंगरांच्या सभोवताली रथ दाखवून देवाने “त्याच्या सेवकाला आपली शक्ती व उपस्थिती [पराऊसिया] प्रकट केली.” रोमी अधिकारी पेट्रोनियसने यहुद्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, पाऊस पाडून ‘देवाने पेट्रोनियसला आपली उपस्थिती [पराऊसिया] दाखवली,’ असा जोसीफसने दावा केला. जोसीफसने पराऊसिया हा शब्द, केवळ आगमनाला किंवा क्षणिक येण्याला लागू केला नाही. त्याचा अर्थ सतत, अदृश्य उपस्थिती असा होत होता. (निर्गम २०:१८-२१; २५:२२; लेवीय १६:२; २ राजे ६:१५-१७)—पडताळा यहुद्यांच्या चालीरीती (इंग्रजी), पुस्तक ३ अध्याय ५, परिच्छेद २ [८०]; अध्याय ८, परिच्छेद ५ [२०२]; पुस्तक ९ अध्याय ४, परिच्छेद ३ [५५]; पुस्तक १८ अध्याय ८, परिच्छेद ६ [२८४].
b ई. डब्ल्यू. बुलींगर, इंग्रजी व ग्रीक नव्या कराराचा टिकात्मक शब्दकोश व विषयसूची (इंग्रजी), या पुस्तकात असे निदर्शनास आणतात, की पराऊसियाचा अर्थ, ‘उपस्थित असणे किंवा होणे, यास्तव उपस्थिती, आगमन; ते असे येणे आहे ज्यामध्ये आल्यापासून कायम राहण्याच्या कल्पनेचा समावेश होतो.’
c एक पुरावा हा आहे, की त्यामध्ये “नाव” ही इब्री अभिव्यक्ती, १९ वेळा पूर्ण किंवा संक्षिप्त रुपात दिलेली आहे. प्राध्यापक हॉवर्ड लिहितात: “एका यहुदी वादविवादकाने एका ख्रिस्ती लेखात उल्लेखलेले ईश्वरी नाव उद्धृत करणे लक्षणीय आहे. हे जर ग्रीक किंवा लॅटिन ख्रिस्ती लेखाचा इब्री अनुवाद असते तर पाठामध्ये एखाद्याने YHWH या अनिर्वचनीय ईश्वरी नावाचे संकेतचिन्ह नव्हे तर अडोनाय [प्रभू] या शब्दाची अपेक्षा केली असती. . . . त्याने हे अनिर्वचनीय नाव कसे जोडले ते एक गूढ आहे. पुरावा सबळरीत्या सूचित करतो, की शेम-टोबला मिळालेल्या मत्तयाच्या प्रतीतील पाठात ईश्वरी नाव आधीच होते व त्याने कदाचित ते नाव काढून टाकण्याबद्दल दोषी ठरण्याचा धोका स्वतःवर ओढवून घेण्याऐवजी ते त्यातच राहू दिले.” पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर—संदर्भासहित (इंग्रजी), ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये ईश्वरी नाव वापरण्यास आधार म्हणून शेम-टोबच्या मत्तयाचा (जे२) उपयोग करते.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ विविध बायबल मत्तय २४:३ चा अनुवाद कसे करतात त्यातील फरक पाहणे महत्त्वाचे का आहे?
◻ पराऊसिया याचा अर्थ काय, व त्याबद्दल चिंता करण्याचे कारण काय?
◻ ग्रीक आणि इब्रीमध्ये मत्तय २४:३ ची कोणती संभाव्य समांतरता असू शकते?
◻ वेळेबाबतचा कोणता घटक मत्तयाचा २४ वा अध्याय समजण्यासाठी आपल्याला माहीत असणे जरूरीचे आहे?
[१० पानांवरील चित्रं]
जैतुनांचा डोंगर, जेथून जेरूसलेम दिसते