वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१५ पृ. २६-३०
  • जे वाईट आहे त्याबद्दल का कळवावे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जे वाईट आहे त्याबद्दल का कळवावे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • वाग्दंडाचे मोल समजणे
  • कोणाची जबाबदारी आहे?
  • बाब हाताळणे
  • मंडळीत पावित्र्य टिकवून ठेवणे
  • अपराध्यांना साहाय्य
  • तत्त्वबद्ध प्रीतीचे कृत्य
  • दुसऱ्‍यांचा पापकर्मात सहभागी होऊ नका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • यहोवाची शिक्षा नेहमी स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • गंभीर पाप करणाऱ्‍यांना वडील प्रेम आणि दया कशी दाखवतात?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१५ पृ. २६-३०

जे वाईट आहे त्याबद्दल का कळवावे?

“जो कोणी एखादी बाब प्रकट करतो तो लोकांचा शत्रू बनतो,” असे पश्‍चिम आफ्रिकेतील काही म्हणतात. ओलूने जेव्हा आपल्या थोरल्या भावावर धाकट्या बहिणीशी गोत्रगमन केल्याचा आरोप केला तेव्हा ओलूच्या बाबतीत असेच घडले. “तू लबाड आहेस!” त्याचा भाऊ त्याच्यावर खेकसला. मग ओलूला त्याने अगदी वाईटरीतीने झोडपले, त्याला आपल्या घरातून हाकलून दिले आणि त्याचे सर्व कपडे जाळून टाकले. गावकऱ्‍यांनीही थोरल्या भावाला साथ दिली. गावात कोणीच त्याला थारा देत नसल्यामुळे त्याला नाईलाजाने गाव सोडून जावे लागले. मग, ओलूच्या बहिणीला दिवस गेल्याचे दिसल्यावर, ओलूने सांगितलेले सर्व खरे असल्याचे गावकऱ्‍यांच्या लक्षात आले. भावानेही आपला गुन्हा कबूल केला आणि ओलूला पुन्हा गावात घेतले गेले. काही तरी विपरीतही घडले असते. ओलूचा खूनही झाला असता.

यहोवाबद्दल प्रीती नसलेल्यांना, आपला गुन्हा उजेडात आणल्याचे सहसा आवडत नसते हे अगदी स्पष्ट आहे. वाग्दंडाचा प्रतिकार करणे आणि वाग्दंड देणाऱ्‍यावर संतापणे ही पापी मानवी प्रवृत्तीच आहे. (पडताळा योहान ७:७.) म्हणूनच तर, सुधारणूक करण्याचा अधिकार असलेल्यांसमोर इतरांच्या चुका प्रकट करण्याची वेळ येते तेव्हा पुष्कळ जण तोंडातून ब्र देखील काढत नाहीत.

वाग्दंडाचे मोल समजणे

परंतु, यहोवाच्या लोकांचा सुधारणुकीविषयी वेगळा दृष्टिकोन आहे. ईश्‍वरी स्त्रीपुरुष ख्रिस्ती मंडळीत चुका करणाऱ्‍यांना साहाय्य देण्यासाठी यहोवाने जी योजना केली आहे तिच्याबद्दल मनापासून कृतज्ञ आहेत. अशा प्रकारची शिक्षा त्याच्या प्रेमळ दयेचे वक्‍तव्य असल्याचे त्यांना माहीत आहे.—इब्री लोकांस १२:६-११.

राजा दाविदाच्या जीवनात घडलेल्या एका घटनेद्वारे याचे स्पष्टीकरण देता येईल. तरुणपणापासून तो एक धार्मिक मनुष्य असला तरीसुद्धा एके प्रसंगी त्याच्या हातून गंभीर गुन्हा घडला. पहिल्यांदा त्याने व्यभिचार केला. मग, आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करताना त्याने त्या स्त्रीच्या नवऱ्‍याचा वध करवला. पण, यहोवाने संदेष्टा नाथानाद्वारे दाविदाचे पाप उघडकीस आणले; संदेष्टा नाथानाने अगदी धैर्याने ही बाब त्याच्या नजरेस आणून दिली. एका जोरदार उदाहरणाचा उपयोग करून नाथानाने दाविदाला विचारले, की एखाद्या धनी मनुष्याकडे पुष्कळ मेंढ्या असतानाही त्याने आपल्या मित्राचा पाहुणचार करण्याकरता एका गरीब मनुष्याचे एकुलते एक लाडके कोकरू कापल्यावर त्या धनी मनुष्याबाबत काय केले जावे. पूर्वी मेंढपाळ असलेला दावीद हे उदाहरण ऐकून लालेलाल झाला. म्हणाला: “ज्या मनुष्याने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे.” मग नाथानाने ते उदाहरण दाविदाला लागू करीत म्हटले: “तो मनुष्य तूच आहेस!”—२ शमुवेल १२:१-७.

दाविदाला नाथानाचा राग आला नाही; किंवा त्याने स्वतःची सफाई देण्याचा किंवा प्रत्त्यारोप करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. उलट नाथानाच्या खरडपट्टीमुळे त्याचा विवेक त्याला बोचू लागला. घायाळ अंतःकरणाने दाविदाने कबूल केले: “मी परमेश्‍वराविरुद्ध पातक केले आहे.”—२ शमुवेल १२:१३.

नाथानने दाविदाचे पाप उघड केल्यानंतर ईश्‍वरी वाग्दंडामुळे चांगले परिणाम झाले. दावीद आपल्या पापाच्या परिणामांपासून वाचला नसला तरी, त्याने पश्‍चात्ताप केला आणि यहोवाबरोबर समेट केला. अशा सुधारणुकीबद्दल दाविदाला कसे वाटले? त्याने लिहिले: “नीतिमान्‌ मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल, तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही.”—स्तोत्र १४१:५.

आपल्या दिवसांतही यहोवाचे सेवक, अनेक वर्षांपर्यंत विश्‍वासू सेवा करणारे देखील गंभीर पाप करू शकतात. वडील जन मदत करू शकतात या जाणिवेने बहुतेक जण त्यांच्याकडून मदत प्राप्त करण्यासाठी त्यांना भेटतात. (याकोब ५:१३-१६) परंतु कधीकधी एखादा पापी, राजा दाविदाप्रमाणे आपले पाप झाकण्याचा प्रयत्न करील. मंडळीत घडलेल्या एखाद्या गंभीर पापाबद्दल आपल्याला माहीत होते तेव्हा आपण काय केले पाहिजे?

कोणाची जबाबदारी आहे?

वडिलांना जेव्हा गंभीर पापाबद्दल समजते तेव्हा ते अपराध्याला मदत करण्यासाठी व त्याला सुधारण्यासाठी भेटतात. ख्रिस्ती मंडळीमध्ये अशा लोकांची चौकशी करून निर्णय देण्याची जबाबदारी वडिलांची आहे. मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीकडे जागरूकतेने लक्ष देऊन, अविचारी किंवा चुकीचे पाऊल उचलणाऱ्‍याला ते साहाय्य व सल्ला पुरवतात.—१ करिंथकर ५:१२, १३; २ तीमथ्य ४:२; १ पेत्र ५:१, २.

पण समजा, तुम्ही वडील नाही आणि तुम्हाला दुसऱ्‍या एखाद्या ख्रिश्‍चनाची गंभीर चूक कळते तेव्हा काय? याविषयी यहोवाने इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रात मार्गदर्शन आहे. नियमशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्‍तीने धर्मत्यागी कृत्य, राजद्रोह, खून, किंवा इतर गंभीर गुन्हे प्रत्यक्षात पाहिल्यास, त्यांच्याविषयी जाऊन सांगण्याची व ठाऊक असलेल्या गोष्टीची साक्ष देण्याची त्या व्यक्‍तीची जबाबदारी होती. लेवीय ५:१ म्हणते: “साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबीविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.”—पडताळा अनुवाद १३:६-८; एस्तेर ६:२; नीतिसूत्रे २९:२४.

आज ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राधीन नसले तरीसुद्धा, त्या नियमांमागील तत्त्वांतून त्यांना मार्गदर्शन मिळू शकते. (स्तोत्र १९:७, ८) मग, एखाद्या सहख्रिश्‍चनाने केलेले गंभीर पाप तुम्हाला कळाल्यावर तुम्ही काय करावे?

बाब हाताळणे

प्रामुख्याने, गंभीर गुन्हा खरोखरच घडला हे मानण्यासाठी सबळ कारण असणे महत्त्वाचे आहे. एका सुज्ञ मनुष्याने लिहिले: “आपल्या शेजाऱ्‍याविरुद्ध विनाकारण साक्ष देऊ नको; तू आपल्या वाणीने ठकवू नको.”—नीतिसूत्रे २४:२८.

तुम्हाला थेट वडिलांना भेटावेसे वाटेल. असे करणे चुकीचे नाही. पण सहसा, पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीला जाऊन भेटणे प्रेमळ मार्ग होय. कदाचित, वस्तुस्थिती दिसते तशी नसेल. किंवा कदाचित वडिलांनी ती बाब आधीच हाताळली असेल. त्या व्यक्‍तीबरोबर शांतीने बोला. गंभीर पाप झालेले आहे असे मानण्यासाठी सबळ कारण असल्यास वडिलांचे साहाय्य घेण्याकरता तिला किंवा त्याला उत्तेजन द्या व असे करण्यात सुज्ञता आहे याचे स्पष्टीकरण द्या. तुम्हाला माहीत असलेली गोष्ट इतरांना सांगू नका, नाहीतर ती चहाडी होईल.

उचित समयादरम्यान ती व्यक्‍ती वडिलांना आपले पाप कबूल करीत नसल्यास, तुम्ही ते जाऊन सांगा. मग एक अथवा दोन वडील पाप करणाऱ्‍यासोबत बोलतील. पाप करणाऱ्‍याने पाप केले होते की नाही याविषयी वडिलांनी “पुसतपास करावा, शोध करावा, व बारकाईने पत्ता काढावा.” पाप घडले आहे तर, शास्त्रवचनीय मार्गदर्शनानुसार ते ती बाब हाताळतील.—अनुवाद १३:१२-१४.

अपराधाचा आरोप शाबीत करण्याकरता निदान दोन साक्षीदारांची तरी आवश्‍यकता असते. (योहान ८:१७; इब्री लोकांस १०:२८) अपराध्याने आरोप नाकारला आणि केवळ तुम्हीच साक्षीदार असल्यास ती बाब यहोवाच्या हाती सोपवली जाईल. (१ तीमथ्य ५:१९, २४, २५) सर्व गोष्टी यहोवासमोर ‘उघड्या’ आहेत आणि जर व्यक्‍ती खरोखरच दोषी आहे तर कालांतराने तिचे पाप तिला नक्की “भोवेल” या विश्‍वासाने ती बाब यहोवाच्या हाती सोपवली जाते.—इब्री लोकांस ४:१३; गणना ३२:२३.

पण समजा, त्या व्यक्‍तीने त्याच्यावर केलेला आरोप नाकारला आणि तुमचीच एक साक्ष त्याच्याविरूद्ध आहे. निंदानालस्तीच्या प्रत्त्यारोपास तुम्ही आता जबाबदार ठरू शकता का? जर तुम्ही याबाबीची चहाडी, पापाशी काहीही संबंध नसलेल्यांजवळ केलेली नसेल तर तुम्ही जबाबदार ठरणार नाही. मंडळीवर परिणाम करणाऱ्‍या बाबींविषयी, चुकांची सुधारणूक करण्याचा अधिकार असलेल्यांना व जबाबदारी असलेल्यांना सांगणे म्हणजे निंदा करणे नाही. उलट, जे योग्य आहे ते करण्यास व एकनिष्ठ राहण्याची आपली इच्छा आहे, हे त्यावरून प्रकट होते.—पडताळा लूक १:७४, ७५.

मंडळीत पावित्र्य टिकवून ठेवणे

अपराध सांगण्याचे एक कारण असे आहे, की त्यामुळे मंडळीतील शुद्धता टिकून राहण्यास मदत होते. यहोवा शुद्ध आणि पवित्र देव आहे. त्याची उपासना करणाऱ्‍यांनी आध्यात्मिकरीत्या व नैतिकरीत्या शुद्ध असले पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. त्याचे प्रेरित वचन बोध करते: “तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका; तर तुम्हांस पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणांत पवित्र व्हा; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.’” (१ पेत्र १:१४-१६) अशुद्धता आचरणाऱ्‍या किंवा अपराध करणाऱ्‍या लोकांना वाग्दंड देण्यासाठी किंवा त्यांना बहिष्कृत करण्यासाठी पावले उचलली नाहीत तर त्यांच्यामुळे संपूर्ण मंडळी दूषित होऊ शकते व तिजवर यहोवाची अवकृपा राहते.—पडताळा यहोशवा, ७ अध्याय.

करिंथमधील ख्रिस्ती मंडळीला प्रेषित पौलाने लिहिलेल्या पत्रांवरून, अपराधाची हकीकत सांगितल्यामुळे तेथील देवाचे लोक कसे शुद्ध राहिले ते दिसून येते. आपल्या पहिल्या पत्रात पौलाने लिहिले: “मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्ये देखील आढळत नाही; म्हणजे तुम्हातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.”—१ करिंथकर ५:१.

प्रेषित पौलाला ही खबर कोणाकडून मिळाली ते बायबल आपल्याला सांगत नाही. कदाचित, पौल जेथे राहत होता त्या इफिसला करिंथचा प्रवास करून आलेल्या स्तेफना, फर्तूनात व अखायिक यांच्याकडून त्याला ती मिळाली असावी. करिंथमधील ख्रिस्ती मंडळीकडून पौलाला चौकशीचे एक पत्र देखील मिळाले होते. पौलाला माहिती कोठूनही मिळो, विश्‍वसनीय साक्षीदारांनी त्याला परिस्थितीची हकीकत सांगितल्यामुळे तो त्या मुद्द्‌यावर मार्गदर्शन देऊ शकला. त्याने लिहिले: “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.” आणि त्या मनुष्याला मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले.—१ करिंथकर ५:१३; १६:१७, १८.

पौलाच्या सूचनेचा काही लाभ झाला का? अर्थात! अपराध्याला आपली चूक कळून आली. करिंथकरांना लिहिलेल्या आपल्या दुसऱ्‍या पत्रात पौलाने मंडळीला पश्‍चात्तापी मनुष्याला “क्षमा करून त्याचे सांत्वन” करण्यास आर्जवले. (२ करिंथकर २:६-८) अशाप्रकारे, अपराध कळवल्यामुळे कार्य घडले ज्याचा परिणाम मंडळीचे शुद्धीकरण झाले व देवाबरोबर आपला नातेसंबंध खराब करणारा मनुष्य देवाची मर्जी पुन्हा प्राप्त करू शकला.

करिंथमधील ख्रिस्ती मंडळीला पौलाने लिहिलेल्या त्याच्या पहिल्या पत्रात आपल्याला आणखी एक उदाहरण मिळते. यावेळेला, प्रेषिताने अपराधाची साक्ष देणाऱ्‍या साक्षीदारांची नावे नमूद केली. त्याने लिहिले: “माझ्या बंधूनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसाकडून कळले आहे.” (१ करिंथकर १:११) मनुष्यांचा फाजील सन्मान व कलह यांमुळे मंडळीमध्ये पक्षाभिमानी मनोवृत्ती निर्माण झाली होती ज्यामुळे मंडळीतील ऐक्याचा आत्मा नष्ट होण्याची भीती होती हे पौलाला माहीत होते. म्हणूनच, तेथील सहविश्‍वासूंच्या आध्यात्मिक कल्याणाच्या गाढ आदरामुळे पौलाने लागलीच पावले उचलली आणि मंडळीला सुधारणा करणारा सल्ला लिहिला.

आज, संपूर्ण पृथ्वीवरील मंडळ्यांमधील बहुतेक बंधूभगिनी, व्यक्‍तिगतरीत्या देवासमोर स्वीकृत भूमिका राखण्याद्वारे मंडळीतील आध्यात्मिक शुद्धता टिकवण्यासाठी परिश्रम करतात. असे करताना काहींना त्रास सहन करावा लागतो; काहींना तर एकनिष्ठ राहण्याकरता आपला प्राण गमवावा लागला. निश्‍चितच मग, अपराधाला सूट दिल्याने किंवा झाकून टाकल्याने वरील सर्व प्रयत्नांबद्दल गुणग्राहकतेची उणीव दिसून येईल.

अपराध्यांना साहाय्य

गंभीर पाप करणारे काही अपराधी मंडळीतील वडिलांकडे का जात नाहीत? वडिलांकडे गेल्यामुळे मिळणाऱ्‍या फायद्यांची बहुधा त्यांना जाणीव नसते. काहींचा असा चुकीचा समज असतो, की आपण आपले पाप कबूल केले तर ते संपूर्ण मंडळीला समजेल. काहींना त्यांच्या मार्गाक्रमणाचे गांभीर्य नसल्यामुळे ते स्वतःची फसवणूक करीत असतात. आणि काहींना वाटेल की वडिलांच्या साहाय्याविना ते स्वतःला सुधारू शकतात.

पण, अशा अपराध्यांना मंडळीच्या वडिलांकडून प्रेमळ साहाय्याची आवश्‍यकता असते. याकोबाने लिहिले: “तुम्हांपैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्‍वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला उठवील, आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल.”—याकोब ५:१४, १५.

अपराध्यांना त्यांची आध्यात्मिकता पुन्हा प्राप्त करण्याची ही किती उत्तम योजना आहे! देवाच्या वचनातील सांत्वनदायक सल्ला अनुसरल्याने व आध्यात्मिकरीत्या दुखणाईतांसाठी प्रार्थना केल्याने वडीलजन त्यांना त्यांच्या चुकीच्या मार्गापासून मागे वळण्यास मदत करू शकतात. अशा प्रकारे, दोषी असल्यासारखे वाटण्याऐवजी, पश्‍चात्तापी लोकांना, प्रेमळ वडिलांना भेटल्यावर टवटवीत आणि निश्‍चिंत वाटते. पश्‍चिमी आफ्रिकेच्या एका तरुणाने जारकर्म करून काही महिन्यांपर्यंत आपले पाप गुपित ठेवले. त्याचे पाप स्पष्ट दिसू लागल्यावर तो वडिलांना म्हणाला: “त्या मुलीसोबत चाललेल्या माझ्या प्रकरणाविषयी कुणी हरकत घेतली असती तर किती बरे झाले असते! पण आता मी माझी चूक कबूल करीत असल्यामुळे मला किती हलके हलके वाटते.”—पडताळा स्तोत्र ३२:३-५.

तत्त्वबद्ध प्रीतीचे कृत्य

देवाचे बाप्तिस्मा प्राप्त सेवक “मरणातून निघून जीवनात” आले आहेत. (१ योहान ३:१४) पण त्यांनी गंभीर पातक केल्यास, ते पुन्हा मृत्यूच्या मार्गाकडे वळतात. त्यांना साहाय्य केले नाही तर अपराध करण्यासंबंधी त्यांचे अंतःकरण इतके बधिर होईल की पश्‍चात्ताप करून खऱ्‍या देवाच्या उपासनेकडे पुन्हा वळण्याची त्यांची इच्छा होणार नाही.—इब्री लोकांस १०:२६-२९.

अपराध कळवल्याने, अपराध करणाऱ्‍या व्यक्‍तीबद्दल खरोखरची काळजी व्यक्‍त होते. याकोबाने लिहिले: “माझ्या बंधूनो, तुम्हांमधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारे फिरविले, तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवितो तो त्याचा जीव मरणापासून वाचवील व पापांची रास झाकील, हे ध्यानात ठेवा.”—याकोब ५:१९, २०.

मग, जे वाईट आहे त्याबद्दल का कळवावे? कारण त्यामुळे फायदा होतो. खरेच, अपराध कळवणे म्हणजे देवाप्रती, मंडळीप्रती आणि अपराध्याप्रती ख्रिस्ती तत्त्वबद्ध प्रीती दाखवणे होय. मंडळीचा प्रत्येक सदस्य जेव्हा देवाच्या धार्मिक दर्जांना उंचावून धरतो, तेव्हा यहोवा संपूर्ण मंडळीवर आशीर्वादांचा वर्षाव करील. प्रेषित पौलाने लिहिले: “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही अदूष्य ठरावे म्हणून तोच [यहोवा] शेवटपर्यत तुम्हास दृढ राखील.”—१ करिंथकर १:८.

[२६ पानांवरील चित्र]

अपराधी साक्षीदाराला वडिलांशी जाऊन बोलण्याचे उत्तेजन देताना प्रीती व्यक्‍त होते

[२८ पानांवरील चित्र]

वडीलजन अपराध्याला देवाची मर्जी पुन्हा प्राप्त करण्यास मदत करतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा