अंत जवळ येत असता ‘मर्यादशीलपणा’
‘सर्वांचा शेवट जवळ आला आहे. म्हणून मर्यादशील रहा.’—१ पेत्र ४:७.
१. ‘मर्यादशील’ असण्यामध्ये काय गोवले आहे?
प्रेषित पेत्राच्या वरील शब्दांचा, ख्रिस्ती लोकांच्या जीवन व्यतीत करण्यावर मोठा प्रभाव पडला पाहिजे. परंतु, पेत्राने आपल्या वाचकांना सांसारिक जबाबदाऱ्या व जीवनाच्या चिंता यांपासून अंग काढून घेण्यास सांगितले नाही; किंवा येणाऱ्या नाशाचा विचार करून गर्भगळीत होण्याचेही उत्तेजन दिले नाही. उलट तो म्हणाला: ‘मर्यादशील रहा.’ ‘मर्यादशील’ राहण्यात योग्य निर्णयशक्ती दाखवणे, आपल्या बोलण्यात व कृतीत शहाणे, बुद्धिमान व समजूतदार असणे गोवलेले आहे. याचा अर्थ, देवाच्या वचनाला आपल्या विचारसरणीवर व कृतींवर ताबा ठेवू देणे असा होतो. (रोमकर १२:२) आपण एका “कुटिल व विपरीत पिढीत” जगत असल्यामुळे समस्या व संकटे टाळण्यासाठी मर्यादशील मनाची आवश्यकता आहे.—फिलिप्पैकर २:१५.
२. यहोवाच्या सहनशीलतेचा ख्रिश्चनांना आज कसा फायदा होतो?
२ ‘मर्यादशीलपणा’ आपल्याला स्वतःविषयी विचारी, वास्तविक दृष्टिकोन बाळगण्यास देखील मदत करतो. (तीत २:१२, १३; रोमकर १२:३) हे, २ पेत्र ३:९ मधील शब्दांच्या अनुषंगाने आवश्यक आहे: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु [“यहोवा,” NW] आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” यहोवा, विश्वास न ठेवणाऱ्यांचेच नव्हे तर “तुमचे”—ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांचे देखील धीराने सहन करतो याकडे लक्ष द्या. का बरे? कारण “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही.” कदाचित काहींना, सार्वकालिक जीवनाचे दान प्राप्त करण्याकरता स्वतःला पात्र ठरवण्यासाठी अजूनही सुधारणा व फेरबदल करण्याची आवश्यकता असेल. तेव्हा, ज्यांत फेरबदल करायची गरज असलेले काही क्षेत्र आपण पाहू या.
आपल्या व्यक्तिगत नातेसंबंधात ‘मर्यादशीलपणा’
३. पालक आपल्या मुलांच्या बाबतीत कोणती प्रश्ने विचारू शकतात?
३ घर शांतीचे आश्रयस्थान असले पाहिजे. पण काहींच्या घरात “कलह” असतो. (नीतिसूत्रे १७:१) तुमचे कुटुंब कसे आहे? तुमचे घर “क्रोध, गलबला व निंदा” यांपासून मुक्त आहे का? (इफिसकर ४:३१) तुमच्या मुलांबद्दल काय? आपल्यावर प्रेम केले जाते, आपली प्रशंसा केली जाते असे त्यांना वाटते का? (पडताळा लूक ३:२२.) त्यांना शिकवण्यासाठी व प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही वेळ काढता का? राग आणि क्रोधाऐवजी तुम्ही त्यांना “नीतिशिक्षण” देत आहात का? (२ तीमथ्य ३:१६) मुले “परमेश्वराने दिलेले धन” असल्यामुळे त्यांना कशाप्रकारे वागवले जाते हे यहोवाला जाणून घ्यायचे आहे.—स्तोत्र १२७:३.
४. (अ) पती आपल्या पत्नीला निष्ठुरतेने वागवत असल्यास काय होऊ शकते? (ब) पत्नी देवासोबतच्या शांतीला आणि संपूर्ण कुटुंबाच्या सौख्यानंदाला कशा हातभार लावू शकतात?
४ तुमच्या वैवाहिक सोबत्याविषयी काय? “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी जो आपल्या पत्नीवर प्रीति करितो तो स्वतःवरच प्रीति करितो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करितो, जसे ख्रिस्तहि मंडळीचे पालनपोषण करितो तसे तो करितो.” (इफिसकर ५:२८, २९) अपमान करणारा, हुकूम गाजवणारा किंवा असमंजस मनुष्य आपल्या घराची शांतता केवळ धोक्यातच घालत नसतो तर देवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत करत असतो. (१ पेत्र ३:७) पत्नींविषयी काय? त्यांनीही ‘जसे प्रभुच्या अधीन तसे आपआपल्या पतीच्या अधीन’ असले पाहिजे. (इफिसकर ५:२२) पत्नीने देवाला संतुष्ट करण्याचा विचार मनात बाळगला तर पतीच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करून रूसवा न बाळगता त्याच्या अधीन राहण्यास तिला शक्य होते. कधीकधी पत्नीला तिचे मत सांगणे आवश्यक वाटेल. नीतिसूत्रे ३१:२६ सद्गुणी पत्नीविषयी असे म्हणते: “तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिव्हेच्या ठायी दयेचे शिक्षण असते.” आपल्या पतीशी दयापूर्ण, आदराने वागवून ती देवासोबत शांती टिकवून ठेवते आणि संपूर्ण कुटुंबाच्या सौख्यानंदाला हातभार लावते.—नीतिसूत्रे १४:१.
५. तरुणांनी त्यांच्या पालकांशी कसा व्यवहार केला पाहिजे याविषयी बायबलमधील सल्ल्याचे अनुसरण का करावे?
५ तरुणांनो, तुम्ही तुमच्या पालकांशी कसा व्यवहार करता? जगात सर्रासपणे वापरली जाणारी बोचक, अनादरणीय भाषा तुम्ही वापरता का? किंवा, “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. ‘आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख, ह्यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.’ अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे” या बायबलच्या आज्ञेचे पालन तुम्ही करता का?—इफिसकर ६:१-३.
६. सहउपासकांसोबत आपण शांतीने कसे राहू शकतो?
६ सहउपासकांसोबत आपण ‘शांतीच्या प्राप्तीसाठी झटतो व तिचा मार्ग धरतो’ तेव्हाही ‘मर्यादशीलपणा’ दर्शवत असतो. (१ पेत्र ३:११) मतभेद आणि अपसमज तर वेळोवेळी होतातच. (याकोब ३:२) वैरभावाला चालना दिल्यास, संपूर्ण मंडळीच्या शांतीला धोका संभवू शकतो. (गलतीकर ५:१५) त्यासाठी, होता होईल तितक्या लवकर वादविवाद मिटवा; शांतीपूर्ण उपाय शोधा.—मत्तय ५:२३-२५; इफिसकर ४:२६; कलस्सैकर ३:१३, १४.
‘मर्यादशीलपणा’ आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या
७. (अ) घरकामासारख्या सांसारिक बाबींमध्ये ‘मर्यादशीलपणा’ दाखवण्यास पौलाने कसे उत्तेजन दिले? (ब) ख्रिस्ती पती व पत्नींनी घरातल्या जबाबदाऱ्यांबद्दल कोणती मनोवृत्ती बाळगावी?
७ प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना ‘मर्यादशीलपणे वागण्याचा’ सल्ला दिला. (तीत २:१२, १३) या संदर्भात पौल स्त्रियांना ‘आपल्या पतींवर व मुलाबाळांवर प्रेम करण्यास; मर्यादशील, शुद्धाचरणी, घरचे काम पाहण्यास’ आर्जवतो हे विशेष आस्थेचे आहे. (तीत २:४, ५) पौलाने हे सा.यु. ६१-६४ या वर्षांदरम्यान म्हणजे, यहुदी व्यवस्थीकरणाचा अंत होण्याच्या काही वर्षांआधी लिहिले. पण, घरकामासारख्या सांसारिक बाबी देखील महत्त्वाच्या होत्या. यास्तव, दोघा पतीपत्नींनी त्यांच्या घरातील जबाबदाऱ्यांविषयी हितकर, सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा जेणेकरून “देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.” एका कुटुंब प्रमुखाने एकदा आपल्या घरातील पसाऱ्याबद्दल त्याच्या घरी भेट देणाऱ्या व्यक्तीकडे क्षमा मागितली. तो म्हणाला की “तो पायनियरींग करत असल्यामुळे” घर अस्ताव्यस्त झाले होते. राज्याकरता आपण त्याग करतो हे प्रशंसनीय आहे पण आपल्या कुटुंबाच्या कल्याणाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी आपण बाळगली पाहिजे.
८. कुटुंब प्रमुख संतुलित मार्गाने आपल्या कुटुंबांची काळजी कशी वाहू शकतात?
८ पित्यांनी प्रथम आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे असा आर्जव करीत ते म्हणते, की ज्या मनुष्याला आपल्या कुटुंबाची काळजी घेता येत नाही “त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) जगामध्ये लोकांच्या राहणीमानात फरक असू शकतो. आणि बेताची भौतिक अपेक्षा बाळगणे उचित आहे. “दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको,” अशी नीतिसूत्रे ३०:८ च्या लेखकाने प्रार्थना केली. परंतु, पालकांनी आपल्या मुलांच्या आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष करता कामा नये. उदाहरणार्थ, ईश्वरशासित सुहक्क प्राप्त करण्याकरता स्वतःच्या कुटुंबाला मुद्दामहून जीवनाच्या आवश्यकतांपासून वंचित ठेवणे सुज्ञपणाचे ठरेल का? यामुळे मुलांचे मन कटू होणार नाही का? दुसऱ्या बाजूस पाहता, नीतिसूत्रे २४:२७ म्हणते: “तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते आधी कर, मग आपले घर बांध.” होय, भौतिक गोष्टींविषयी चिंता करणे, याला स्थान असले तरीसुद्धा, आध्यात्मिकरीत्या आणि भावनिकरीत्या ‘घर बांधणे’ महत्त्वपूर्ण आहे.
९. कुटुंब प्रमुखांनी त्यांच्या मृत्यूच्या अथवा आजारपणाच्या संभाव्यतेचा विचार करणे सुज्ञपणाचे का आहे?
९ समजा, तुमचा अकाली मृत्यू झाला तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या काळजीसाठी तुम्ही काही तरतूद केली आहे का? नीतिसूत्रे १३:२२ म्हणते: “चांगला मनुष्य आपल्या पुत्रपौत्रांस वतन ठेवितो.” यहोवाविषयीचे ज्ञान देणे व त्याच्यासोबत नातेसंबंध प्रस्थापित करण्यास शिकवणे याबरोबरच पालक आपल्या मुलांना भौतिकरीत्या साहाय्य देण्याचीही तरतूद करतील. अनेक देशांत, जबाबदार कुटुंब प्रमुख बँकेत पैसा साठविण्याचा, कायदेशीर मृत्यूपत्र तयार करण्याचा व विमा उतरवण्याचा प्रयत्न करतील. कारण देवाच्या लोकांवरही “आपत्तीचा काल” येऊ शकतो. (उपदेशक ९:११, सुबोध भाषांतर) पैसा “आश्रय देणारा आहे,” व काळजीपूर्वक योजना केल्याने अनेकदा संकटे टाळता येऊ शकतात. (उपदेशक ७:१२) ज्या देशांत वैद्यकीय खर्च सरकार देत नाही तेथे काही जण आरोग्याच्या गरजांसाठी पैसे बाजूला काढून ठेवतील किंवा एकप्रकारचा आरोग्य विमा उतरवतील.a
१०. ख्रिस्ती पालक कशाप्रकारे आपल्या मुलांसाठी “संग्रह” करू शकतात?
१० शास्त्रवचने असेही म्हणतात: “आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे, मुलांनी आईबापांसाठी नव्हे.” (२ करिंथकर १२:१४) मुलांना त्यांच्या जीवनाची चांगली सुरवात करून देण्याकरता त्यांच्या भावी शिक्षणासाठी किंवा विवाहासाठी पैसा साठवणे ही जगात पालकांसाठी एक सामान्य बाब आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या आध्यात्मिक भवितव्यासाठी पैसा साठविण्याचा विचार केला आहे का? समजा, तुमचे एखादे अपत्य पूर्ण वेळेच्या सेवेत आहे. पूर्ण वेळेच्या सेवकांनी इतरांकडून आर्थिक मदतीची मागणी करू नये किंवा अपेक्षा करू नये हे खरे असले तरी, प्रेमळ पालक, त्यास पूर्ण वेळेच्या सेवेमध्ये टिकून राहण्यास मदत व्हावी म्हणून ‘त्याच्या गरजा भागवतील.’—रोमकर १२:१३; १ शमुवेल २:१८, १९; फिलिप्पैकर ४:१४-१८.
११. पैशाबद्दल वास्तविक दृष्टिकोन बाळगणे आपल्यामध्ये विश्वासाची उणीव आहे असे सूचित करते का? स्पष्ट करा.
११ पैशाविषयी वास्तविक दृष्टिकोन बाळगल्याने, सैतानाच्या दुष्ट व्यवस्थेचा अंत जवळ आहे या गोष्टीवरचा विश्वास कमी होत नसतो. ती केवळ ‘व्यवहारज्ञान’ व योग्य निर्णयशक्तीची बाब आहे. (नीतिसूत्रे २:७; ३:२१) येशूने एकदा म्हटले: पैसा वापरण्यासंबंधाने “ह्या युगाचे लोक . . . प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे” आहेत. (लूक १६:८) म्हणूनच, काहींना आपल्या कुटुंबांच्या गरजांची आणखी चांगल्यारीतीने काळजी घेण्याकरता पैसा खर्च करण्याच्या त्यांच्या पद्धतीमध्ये फेरबदल करण्याची गरज भासली असावी.
शिक्षणाबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनात ‘मर्यादशीलपणा’
१२. येशूने आपल्या शिष्यांना नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यास कसे शिकवले?
१२ “ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे” व विशाल आर्थिक बदल आणि तंत्रज्ञानविषयक विकास जलदगतीने होत आहे. (१ करिंथकर ७:३१) परंतु, येशूने आपल्या शिष्यांना अनुकूल होण्यास शिकवले. त्याने त्यांना त्यांच्या पहिल्या प्रचार मोहीमेला पाठवताना असे सांगितले: “सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका; वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकऱ्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे.” (मत्तय १०:९, १०) पण नंतरच्या एका प्रसंगी, येशू म्हणाला: “ज्याच्याजवळ पिशवी आहे त्याने ती घ्यावी; तसेच झोळीहि घ्यावी.” (लूक २२:३६) असा फरक का बरे? कारण आता परिस्थिती बदलली होती. तेथील धार्मिक वातावरण खूपच प्रतिकूल झाले होते आणि आता त्यांना स्वतःसाठी तरतूदी करण्याची आवश्यकता होती.
१३. शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे व याबाबतीत पालक आपल्या मुलांना आधार कसा देऊ शकतात?
१३ अशाचप्रकारे आज, पालकांना आजची आर्थिक वास्तविकता विचारात घेण्याची गरज भासेल. उदाहरणार्थ, तुमच्या मुलांना बऱ्यापैकी शिक्षण मिळत आहे की नाही याकडे तुमचे लक्ष आहे का? शिक्षणाचा खास उद्देश एखाद्या तरुणास यहोवाचा प्रभावी सेवक होण्यास सज्ज करण्याचा असला पाहिजे. आणि सर्वांहून महत्त्वपूर्ण शिक्षण आध्यात्मिक शिक्षण आहे. (यशया ५४:१३) आर्थिकरीत्या स्वतःची काळजी घेण्याची क्षमता मुलांमध्ये आहे की नाही याविषयी देखील पालकांना काळजी असते. यास्तव, तुमच्या मुलांना मार्गदर्शन द्या; शाळेतील योग्य विषय निवडण्यास त्यांना साहाय्य करा; आणि जादा शिक्षण घेणे सुज्ञपणाचे आहे की नाही याविषयीची त्यांच्याबरोबर चर्चा करा. अशा प्रकारचे निर्णय कौटुंबिक जबाबदारी आहे व निवडलेल्या मार्गाक्रमणाची इतरांनी टीका करू नये. (नीतिसूत्रे २२:६) आपल्या मुलांना घरीच शिक्षण देण्याचे ठरवलेल्यांबाबत काय?b पुष्कळांनी चांगली कामगिरी बजावली आहे पण काहींना, हे काम त्यांनी कल्पना देखील केली नव्हती इतके कठीण वाटले आहे; शिवाय त्यांच्या मुलांनाही हवा तसा फायदा झालेला नाही. तेव्हा, मुलांना घरीच शिक्षण देण्याचा तुमचा विचार आहे तर किंमत मोजण्यासही तयार रहा; असे करण्यासाठी तुमच्याजवळ कला आणि आत्म-शिस्त आहे का याचे यथार्थ मूल्यमापन करा.—लूक १४:२८.
‘मोठ्या गोष्टींची इच्छा करू नका’
१४, १५. (अ) बारूखाने आपले आध्यात्मिक संतुलन कसे गमावले? (ब) ‘मोठ्या गोष्टींची इच्छा’ बाळगणे त्याच्यासाठी मूर्खपणाचे का होते?
१४ या युगाची समाप्ती अजूनही न झाल्यामुळे काहींना प्रतिष्ठित उपजीविका, किफायतशीर नोकऱ्या आणि संपत्ती, या जगिक गोष्टींची ओढ लागू शकते. बारूख नामक यिर्मयाच्या चिटणीसाचे उदाहरण घ्या. “हाय हाय! परमेश्वराने माझ्या क्लेशात दुःखाची भर घातली आहे. मी कण्हून कण्हून थकलो आहे, मला काही चैन पडत नाही,” अशाप्रकारे त्याने विलाप केला. (यिर्मया ४५:३) बारूख थकून गेला होता. यिर्मयाचा चिटणीस म्हणून काम करणे कठीण, तणावपूर्ण होते. (यिर्मया ३६:१४-२६) हा तणाव अखंड असल्यासारखा वाटत होता. जेरुसलेमचा नाश व्हावयाच्या १८ वर्षांपूर्वीची ही गोष्ट होती.
१५ यहोवाने बारूखास सांगितले: “पाहा, मी जे उभारिले ते मोडून टाकीन, मी जे लाविले ते उपटून टाकीन; सर्व पृथ्वीची हीच वाट. तू आपणासाठी मोठाल्या गोष्टीची वांच्छा करितोस काय? ती करू नको.” बारूखाने आपला तोल गमावला होता. तो स्वतःसाठी कदाचित धनसंपत्ती, प्रतिष्ठा किंवा भौतिक सुरक्षा या ‘मोठ्या गोष्टींची इच्छा’ करू लागला होता. यहोवा ‘संपूर्ण देशाचे सुद्धा निर्मूलन’ करणार असल्यामुळे अशा गोष्टींमागे धावण्यात काय अर्थ होता? म्हणूनच यहोवाने बारूखाला ही विचारप्रवर्तक आठवण करून दिली: “मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन . . . पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.” भौतिक संपत्ती जेरुसलेमच्या नाशातून बचावणार नव्हती! यहोवाने केवळ त्याच्या ‘जीवाच्या’ तारणाची गॅरंटी दिली होती.—यिर्मया ४५:४, ५.
१६. यहोवाचे लोक बारूखाच्या अनुभवावरून आज कोणता धडा शिकू शकतात?
१६ बारूखाने यहोवाचा सल्ला मानला आणि यहोवाने दिलेल्या वचनानुसार बारूख आपल्या जिवानिशी वाचला. (यिर्मया ४३:६, ७) यहोवाच्या आजच्या लोकांकरता किती जोरदार धडा! स्वतःसाठी ‘मोठ्या गोष्टींची इच्छा’ बाळगण्याचा हा समय नाही. का बरे? कारण “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत.”—१ योहान २:१७.
उरलेल्या वेळेचा सदुपयोग
१७, १८. (अ) निनवेकरांनी पश्चात्ताप केला तेव्हा योनाची प्रतिक्रिया काय होती? (ब) यहोवाने योनाला कोणता धडा शिकवला?
१७ मग उरलेल्या वेळेचा आपण सदुपयोग कसा करू शकतो बरे? संदेष्टा योनाच्या अनुभवावरून शिका. तो ‘निनवेस गेला आणि अशी घोषणा करीत व म्हणत राहिला, की चाळीस दिवसांचा अवकाश आहे. मग निनवे धुळीस मिळेल.’ निनवेकरांनी त्याचा संदेश ऐकून पश्चात्ताप केल्याचे योनाने पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले! यहोवाने त्या शहराचा नाश करण्यापासून स्वतःला आवरले. योनाची प्रतिक्रिया काय होती? “तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंति ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.”—योना ३:३, ४; ४:३.
१८ यहोवाने तेव्हा योनाला एक महत्त्वपूर्ण धडा शिकवला. त्याने “तुंबीचा एक वेल उगविला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी . . . असे केले या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला.” पण, योनाचा आनंद जास्त काळ टिकला नाही कारण तो वेल लगेच वाळून गेला. त्याला झालेल्या गैरसोयीमुळे योनाचा ‘क्रोध भडकला.’ तेव्हा यहोवाने आपला मुद्दा जोर देऊन सांगितला: “या तुंबीची तू इतकी पर्वा करितोस तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही अशी एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”—योना ४:६, ७, ९-११.
१९. कोणती आत्मकेंद्रित विचारसरणी आपण टाळली पाहिजे?
१९ योनाचा तर्क किती आत्मकेंद्रित होता! त्याला त्या वेलीबद्दल वाईट वाटले पण ज्या लोकांना आध्यात्मिकरीत्या बोलायचे झाल्यास ‘उजव्याडाव्या हाताचा भेद कळत नाही’ अशा निनवेकरांबद्दल मात्र त्याला तिळमात्र दया वाटली नाही. या दुष्ट जगाचा होता होईल तितका लवकर नाश व्हावा असे आपल्यालाही वाटेल आणि तसेच वाटणे योग्य आहे. (२ थेस्सलनीकाकर १:८) पण, नाशाची वाट पाहत असताना, आध्यात्मिक अर्थाने, ज्या नम्र अंतःकरणाच्या लोकांना ‘उजव्याडाव्या हाताचा भेद कळत नाही’ अशांना मदत करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे. (मत्तय ९:३६; रोमकर १०:१३-१५) यहोवाचे बहुमोल ज्ञान घेण्यास शक्य तितक्यांना मदत करण्यासाठी उरलेल्या अल्प समयाचा तुम्ही उपयोग कराल का? एखाद्याला जीवन प्राप्त करण्यास मदत करताना मिळणारा आनंद दुसऱ्या कोणत्याही कार्याद्वारे मिळेल का?
‘मर्यादशीलपणे’ जीवन जगत राहा
२०, २१. (अ) येणाऱ्या दिवसांदरम्यान ‘मर्यादशीलपणा’ दर्शवण्याचे काही मार्ग कोणते आहेत? (ब) ‘मर्यादशीलपणे’ जीवन जगल्यामुळे कोणते आशीर्वाद आपल्याला मिळतील?
२० सैतानाचे व्यवस्थीकरण त्याच्या नाशाकडे जसजसे झेपावत जाते तसतसे आपल्याला नवनवीन आव्हाने झेलावी लागतील हे मात्र अगदी निश्चित आहे. दुसरे तीमथ्य ३:१३ भाकीत करते: “दुष्ट व भोंदू माणसे . . . दुष्टपणात अधिक सरसावतील.” पण “मने खचून तुम्ही थकून जाऊ” नका. (इब्री लोकांस १२:३) शक्तीसाठी यहोवावर विसंबून राहा. (फिलिप्पैकर ४:१३) लवचीक असण्यास, व झालेल्या गोष्टींचा विचार करत बसण्याऐवजी या दुष्ट परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिका. (उपदेशक ७:१०) व्यावहारिक बुद्धीचा उपयोग करा आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ पुरवत असलेल्या मार्गदर्शनानुसार चाला.—मत्तय २४:४५-४७.
२१ किती वेळ बाकी आहे हे आपल्याला माहीत नाही. पण “सर्वांचा शेवट जवळ आला आहे,” हे आपण अगदी आत्मविश्वासाने म्हणू शकतो. तो शेवट येईपर्यंत, एकमेकांबरोबर व्यवहार करण्यात, आपल्या कुटुंबांची काळजी वाहण्यात व आपल्या लौकिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात आपण ‘मर्यादशीलपणे’ जीवन जगू या. असे केल्यावर आपण सर्व जण खात्री बाळगू शकतो की आपण “निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले” आढळू!—२ पेत्र ३:१४.
[तळटीपा]
a उदाहरणार्थ, अमेरिकेत अनेकांकडे आरोग्य विमा असतो; तो अतिशय महाग असला तरीसुद्धा त्यांनी तो उतरवलेला असतो. काही साक्षीदार कुटुंबांना असे आढळून आले आहे, की काही विशिष्ट डॉक्टर, वैद्यकीय विमा असलेल्या कुटुंबांना रक्त नसलेली पर्यायी औषधे देण्यास अधिक इच्छुक असतात. पुष्कळ डॉक्टर मर्यादित विमा योजनेखाली किंवा सरकारी आरोग्य विम्याखाली परवानगी असलेली रक्कम स्वीकारतील.
b घरीच शिक्षण देणे हा एक व्यक्तिगत निर्णय आहे. सावध राहा! एप्रिल ८, १९९३ (इंग्रजी) मध्ये आलेला “होम स्कूलिंग—इज इट फॉर यू?” हा लेख पाहा.
उजळणीकरता मुद्दे
◻ आपल्या व्यक्तिगत नातेसंबंधामध्ये आपण ‘मर्यादशीलपणा’ कसा दाखवू शकतो?
◻ आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांची काळजी वाहण्यामध्ये आपण संतुलन कसे दाखवू शकतो?
◻ पालकांनी आपल्या मुलांच्या लौकिक शिक्षणाविषयी आस्था का बाळगली पाहिजे?
◻ बारूख व योना यांच्यापासून आपण कोणते धडे शिकतो?
[१८ पानांवरील चित्र]
पती व पत्नी एकमेकांना गैरवागणूक देतात तेव्हा ते यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत बनवतात
[२० पानांवरील चित्र]
पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाविषयी आस्था घेतली पाहिजे