वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१५ पृ. २३-२५
  • नावाहो प्रदेशातील मेंढरासमान लोकांसाठी कुरण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नावाहो प्रदेशातील मेंढरासमान लोकांसाठी कुरण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • नावाहो प्रदेशात सुवार्ता आणणे
  • “कुरण” तयार करणे
  • राज्य संदेशाला मोठा प्रतिसाद
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१५ पृ. २३-२५

नावाहो प्रदेशातील मेंढरासमान लोकांसाठी कुरण

हझोनी अर्थात “अतिसुंदर,” असे नावाहो इंडियन्स आपल्या भाषेत या प्रदेशाचे वर्णन करतात. १८६८ पासून संयुक्‍त संस्थान सरकारने नावाहोंसाठी अरिझोना, कोलोरॅडो, न्यू मेक्सिको आणि उटा हे चार प्रांत जेथे एककेंद्राभिमुख होतात व ज्याला चार कोपरे असेही संबोधले जाते त्या ईशान्येकडील ॲरिझोनात जवळजवळ ६२,००० चौरस किलोमीटरचा प्रदेश राखून ठेवला आहे. पाश्‍चिमात्य चित्रपटांमुळे प्रसिद्धी मिळालेली मॉन्यूमेंट व्हॅली आता नावाहो ट्रायबल पार्क म्हणून आरक्षित असून संपूर्ण जगातील पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या दरीत तीनशे मीटर उंच, लाल वालुकाश्‍म विखुरलेले आहेत ज्यांच्यासमोर उंच वाळवंटी पठारे देखील ठेंगणी वाटतात. म्हणूनच, या दरीला दिलेल्या नावाहो संज्ञेचा अर्थ “खडकांमधील अंतर” असा होतो.

एकंदरीत नावाहोतील लोक स्वभावाने नम्र, आदरातिथ्य दाखवणारे व घनिष्ट विस्तृत कुटुंबे असलेले आहेत असे सांगितले जाते. राखीव प्रदेशातील १,७०,००० रहिवासी पारंपरिक चालीरीतीनुसार दूरदूर वस्त्या करून राहतात. काही लोक अजूनही मेंढ्या पाळतात व मातीने लिंपलेल्या होगन्स नामक लाकडी झोपड्यांत राहतात. नावाहो कलाकृती नावाजलेली आहे. येथील मेंढ्यांच्या लोकरीपासून बनवलेले व भूमितीय आकार आकृती किंवा पारंपरिक डिझाईन्स असलेले रंगीबेरंगी गालिचे व ब्लँकेट्‌सना खूप मागणी आहे. तसेच, नीलमणी किंवा इतर नैसर्गिक द्रव्यांनी जडलेली नावाहो रुपेरी दागदागिने देखील तेवढेच प्रसिद्ध आहेत.

नावाहो प्रदेशात सुवार्ता आणणे

यहोवाच्या साक्षीदारांनी ३० पेक्षा अधिक वर्षांपासून नावाहो प्रदेशाला केवळ स्थलदर्शनासाठी नव्हे तर या दूरवरच्या क्षेत्रातील लोकांपर्यंत देव राज्याची सुवार्ता आणण्याकरता भेटी दिल्या आहेत. (मत्तय २४:१४) यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमित व खास पायनियर सेवकांनी प्रचारकार्यात पुढाकार घेतला आहे. पुष्कळ जण प्रवासी पर्यवेक्षक व स्थानिक साक्षीदारांनी बोलावल्यामुळे जास्त गरज असलेल्या ठिकाणी आले आहेत. काही जण जवळपासच्या मंडळीतून आले आहेत; तर काही विविध नेटीव अमेरिकन जातींचे सदस्य आहेत जे संयुक्‍त संस्थानांतील विविध भागांतून आले आहेत.

या आत्मत्यागी स्त्रीपुरुषांनी त्यांच्या सेवेची तुलना एखाद्या मिशनरी नेमणूकीशी केली आहे. असे का? एक कारण, स्थानीय भाषांतील जटिल ध्वनी, रचना व शब्द अभिव्यक्‍ती यांमुळे ती शिकण्यास महाकठीण आहे. दुसरे कारण, स्थानीय लोक धर्म, कौटुंबिक रचना आणि उपजीविकेसाठी शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याबाबत आपल्या पारंपरिक रीतीरिवाजांना खूपच जडून आहेत. याशिवाय, इंडियन नसलेल्यांना घर व नोकरी सहजासहजी मिळत नसल्यामुळे तेथे राहण्यासाठी गेलेल्यांना खूप त्रास होतो. तसेच, गोऱ्‍या माणसाने या लोकांवर केलेल्या अत्याचाराचे व्रण अजूनही शाबूत असल्यामुळे इतर राष्ट्रांतील लोकांवरचा त्यांचा विश्‍वास उडाला आहे.a

सुरवातीला साक्षीदार जेव्हा सूट-बूट घालून, टाय लावून घरोघरच्या कार्याला गेले तेव्हा हे मॉरमन्स आहेत असा तेथील लोकांचा गैरसमज झाला त्यामुळे पुष्कळ जण दारच उघडत नसत. पण मग, जेव्हा साक्षीदारांनी स्थानीय लोकांसारखा पेहराव केला तेव्हा मात्र लोकांनी त्यांना तास्‌ न तास आपल्या घरात बसवले. आता यहोवाचे साक्षीदार सूटा-बूटात सेवेला गेले तरी लोक त्यांना ओळखू लागले आहेत.

नावाहो राखीव भागात राहणाऱ्‍या लोकांपर्यंत पोहंचण्यात खरी कसब आहे. दगडी, वालुकामय व मातीच्या वाटेवरून अनेक किलोमीटर प्रवास करणे काही नवीन नव्हते. साहजिकच यामुळे वाहनांचे नुकसान व्हायचे आणि प्रवासी वैतागून जायचे. काही वेळा तर वाहने रूतून बसत असत पण येणारे जाणारे लोक मदत करायला नेहमी तत्पर असत. आस्थेवाईक लोकांकडे जाण्यासाठी, एखाद्या बायबल अभ्यासाला जाण्यासाठी किंवा कोणाला ख्रिस्ती सभांना नेण्यासाठी, जाण्या-येण्यास बरेच तास खर्च करावे लागतात. पण साक्षीदार स्वखुशीने हे सर्व करायला तयार असतात व अशा प्रकारे स्थानीय लोकांबद्दल आपली प्रीती व्यक्‍त करतात.—पडताळा १ थेस्सलनीकाकर २:८.

नावाहो लोकांना बायबलवर चर्चा करायला खूप आवडते. सहसा, संपूर्ण कुटुंब—मुले, आईवडील आणि आजी-आजोबा—एकत्र बसून मानवजातीसाठी असलेल्या भावी परादीस गृहाची आशा ऐकण्याकरता जमते. परादीस म्हणजे त्याला काय वाटते असे एका नावाहो मनुष्याला विचारल्यावर तो म्हणाला, “पुष्कळ मेंढ्या आणि हिरवेगार कुरण.” यावरून त्यांना त्यांचा देश आणि त्यांच्या कळपाविषयी किती प्रेम आहे हे दिसून येते. बायबल आधारित साहित्यांची देखील ते प्रशंसा करतात, मणी, साबणाची एखादी वडी, दूधाचा भरलेला एखादा कॅन आणि अशा प्रकारच्या इतर वस्तू देऊन राज्य सेवेला आधार देऊन ही प्रशंसा ते व्यक्‍त करतात. एका खास पायनियरने एका वर्षात टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या सुमारे २०० वर्गण्या प्राप्त केल्या. तसेच एका घोडेस्वाराकडून दोन वर्गण्या प्राप्त केल्या.

“कुरण” तयार करणे

उन्हाळा आल्यावर नावाहो मेंढपाळ त्याचा किंवा तिचा कळप एखाद्या ‘कुरणाकडे’ नेतो. मेंढ्यांसाठी असलेले हे उन्हाळी कुरण, हिरव्यागार गवतामुळे व पाण्याच्या उत्तम सोयीमुळे निवडले जाते ज्यामुळे कळपाची भरभराट होण्यासही मदत होते. लाक्षणिक अर्थाने, राज्य सभागृहाची तुलना अशा कुरणाशी करता येऊ शकते जेथे आध्यात्मिक चारा विपुल मिळतो व सत्याच्या पाण्याचा स्रोत तेथे आहे. येथे येणाऱ्‍या लोकांना आध्यात्मिक आहार मिळू शकतो जो त्यांना आध्यात्मिकरीत्या निरोगी व बळकट बनवतो.

काही काळापर्यंत अरिझोना, केयन्ट येथील एका शाळेच्या वर्गात सभा भरत होत्या. मग, ऑगस्ट १९९२ मध्ये, अनेक प्रांतातून आलेल्या शेकडो साक्षीदार स्वयंसेवकांच्या साहाय्याने केयन्टमध्ये एक नवीन राज्य सभागृह बांधण्यात आले. ह्‍या आणि या भागातील इतर अनेक राज्य सभागृहांमुळे स्थानीय लोकांना याची जाणीव होते, की यहोवाचे साक्षीदार त्यांच्या भागात कायमचे राहण्यासाठी आले आहेत. या विशाल क्षेत्रात कार्य करणाऱ्‍या इतर राज्य सभागृहांमध्ये, राखीव क्षेत्रावरील ट्यूबा शहर आणि चिन्ली येथील सभागृह तसेच नावाहो राखीव भागातील होपी जातीय प्रदेशावर किम्स केन्यॉन मधील एक सभागृह आणि राखीव क्षेत्राच्या हद्दीवर असलेल्या शहरांतील इतर अनेक सभागृहांचा समावेश होतो. याचा परिणाम काय झाला बरे?

राज्य संदेशाला मोठा प्रतिसाद

केयन्टमध्ये राज्य सभागृह बांधल्यापासून डझनपेक्षा अधिक लोकांनी बाप्तिस्मा घेऊन खऱ्‍या उपासनेच्या या स्थानावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे सूचित केले. सभागृहावरून, यहोवाचे साक्षीदार तेथे राहण्यासाठी आले आहेत याचा पुरावा मिळतो आणि ते प्रचार करत असलेल्या राज्याच्या सुवार्तेवर लोकांचा विश्‍वास आणखी वाढतो. अलीकडेच तेथे पहिल्यांदा नावाहो भाषेत बायबल आधारित जाहीर भाषण देण्यात आले. मंडळीतील ४० सभासदांना, भाषणासाठी २४५ लोकांचे स्वागत करण्यात आनंद वाटला; हे भाषण पालकत्वाच्या जबाबदारींवर होते. कृतज्ञ अंतःकरण असलेल्या आठ सदस्यांच्या एका कुटुंबाला हे भाषण ऐकण्यासाठी सभागृहाला येताना तीन तास प्रवास करावा लागला—राज्य सभागृहाला ही त्यांची पहिलीच भेट होती.

नावाहो भाषेतील भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा! नामक माहितीपत्रक यहोवाने पुरवलेले आणखी एक उपयोगी साधन आहे. अगदीच जटिल असलेल्या नावाहो भाषेत या माहितीपत्रकाचे भाषांतर करणे आव्हानात्मक होते. माहितीपत्रकात राज्य संदेश योग्यपणे मांडण्यात आला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी भाषांतरकारांनी सामुदायिकरीत्या १,००० पेक्षा अधिक तास खर्च केले. १९९५ च्या उत्तरार्धात ते प्रकाशित केल्यापासून स्थानीय साक्षीदारांनी हजारो प्रतींचे वाटप केले आहे ज्यामुळे सत्य शोधकांसोबत बरेच बायबल अभ्यास चालू करता आले.

राज्य प्रचारक नावाहो भाषा शिकत असल्यामुळे सेवेत तिचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या क्षेत्रातील मंडळ्यांनी नावाहो भाषेत ईश्‍वरशासित सेवा सभा चालवण्यास सुरवात केली असून प्रचारकांना प्रशिक्षित करण्यासाठी नावाहो भाषेचे वर्ग चालवले जातात. याशिवाय, स्थानीय संमेलनांमधील कार्यक्रम सुद्धा नावाहो भाषेत भाषांतरीत केला जातो. या सर्व प्रयत्नांमुळे राखीव क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद जरूर मिळेल.

या इंडियन राखीव क्षेत्रातील राज्य प्रतिफळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; आपले नावाहो बांधव उत्कृष्ट आध्यात्मिक गुण प्रदर्शित करत आहेत. जिमी आणि सॅन्ड्राने सात वर्षें, आपल्या पाच मुलांसहित साप्ताहिक सभांना उपस्थित राहण्याकरता १२० किलोमीटरचा एकीकडचा प्रवास केला. या कुटुंबाकडे, ह्‍या लांब प्रवासादरम्यान राज्य गीते गाण्याच्या व एकत्र बायबल अभ्यास करण्याच्या गोड आठवणी आहेत. सत्याबद्दल असलेल्या पालकांच्या प्रीतीने व आवेशाने मुलांना त्यांच्या पालकांप्रमाणे यहोवाचे समर्पित स्तुतीकर्ते होण्यास प्रवृत्त केले. या मुलांपैकी चार सध्या नियमित पायनियर म्हणून सेवा करीत आहेत आणि जिमी एक वडील आहे. या कुटुंबाच्या आनंदात भरीत भर तेव्हा पडली जेव्हा, जिमीच्या थोरल्या बहिणीने, एल्सीने अलीकडेच बाप्तिस्मा घेतला, ती फक्‍त नावाहो भाषा जाणणारी पहिलीच व्यक्‍ती आहे.

स्थानीय मेंढपाळ आणि त्यांचे कळप यांमुळे, नावाहो राखीव भागाला सुशोभित करणाऱ्‍या दगडी स्तंभाना कुरणातील निरव शांततेची छटा लाभते. संदेष्टा यशयाने फार पूर्वी यहोवाविषयी भाकीत केले: “मेंढपाळासारखा तो आपला कळप चारील; तो आपल्या हाताने कोकरे एकवटील आणि ती आपल्या उराशी धरून वाहील, व ज्यांना तान्ही पिल्ले आहेत त्यांना तो जपून नेईल.” (यशया ४०:११) यहोवा, उत्तम मेंढपाळ येशू ख्रिस्ताद्वारे नावाहो राखीव क्षेत्रातील राज्य सुवार्ता ऐकून त्याच्याकडून येणारे सार्वकालिक आशीर्वाद मिळवू इच्छिणाऱ्‍यांना आपल्या आध्यात्मिक कुरणात एकत्र करीत आहे.

[तळटीप]

a मे ८, १९४८; फेब्रुवारी २२, १९५२; जून २२, १९५४ आणि सप्टेंबर ८, १९९६ चे सावध राहा! (इंग्रजी) अंक पाहा.

[२४ पानांवरील चित्र]

नावाहो धनगरीण सुवार्ता ऐकत आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा