योनाला यहोवाची दया प्रत्ययास येते
यहोवाकडे आपला संदेष्टा योना यासाठी एक नेमणूक आहे. सा. यु. पू. नवव्या शतकाचा हा काळ आहे व इस्राएलावर यराबाम दुसरा याचे राज्य आहे. योना हा गथ-हेफेर या जबुलून शहराचा आहे. (यहोशवा १९:१०, १३; २ राजे १४:२५) देव योनाला त्याच्या नगरापासून ८०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर असलेल्या निनवे या अश्शुरी राजधानीला पाठवत आहे. निनवेच्या लोकांवर देवाकरवी नाश येणार आहे याबाबत त्याला इशारा द्यावयाचा होता.
योनाला वाटले असावे: ‘त्या नगरात व राष्ट्रात जायचे? ते तर देवाचे उपासकही नाहीत. इस्राएलाप्रमाणे ते रक्तपिपासू अश्शुरी लोक यहोवासोबत कधीही करारबद्ध झाले नाहीत. मी दिलेल्या इशाऱ्यास धमकी समजून त्या दुष्ट राष्ट्राच्या लोकांनी इस्राएलास काबीज केले तर! नको बुवा! मी जाणार नाही. मी याफोस पळून जाईन व विरुद्ध दिशेला समुद्रातून प्रवास करून महासागराच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे थेट तार्शिशास जाईन. मी अगदी असेच करीन!’—योना १:१-३.
समुद्रात संकट!
लवकरच योना मध्य सागराच्या किनारपट्टीवर असलेल्या याफोस येतो. तेथे तो भाड्याची रक्कम देऊन तार्शिशास जाणाऱ्या जहाजात जाऊन बसतो. तार्शिशला सहसा, निनवेच्या पश्चिमेस ३,५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या स्पेनसोबत जोडले जाते. प्रवास सुरू होताच, थकून गेलेला संदेष्टा जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोपी जातो. लवकरच यहोवा समुद्रावर सुसाट वारा सोडतो व घाबरलेल्या खलाशांपैकी प्रत्येक जण मदतीसाठी आपल्या दैवताचा धावा करू लागतो. जहाज इतके हेलकावे खात असते की त्यास हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देण्यात येतो. तथापि, जहाज नक्कीच फुटणार असे भासते व जहाजाचा तांडेल कावराबावरा होऊन योनाला म्हणतो: “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हावयाचा नाही.” योना उठून जहाजाच्या वरील भागात जातो.—योना १:४-६.
खलाशी एकमेकांना म्हणतात, “चला आपण चिठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल.” योनाच्या नावाची चिठी निघते. “कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग; तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?,” अशा अनेक प्रश्नांचा खलाशी योनावर भडिमार करतात तेव्हा तो किती घाबरून गेला असेल याची कल्पना करा. उत्तर देताना योना म्हणतो की तो ‘स्वर्गीय देवाचा’ उपासक असून, ‘समुद्र व कोरडी भूमी निर्माण करणाऱ्या यहोवाचे’ भय मानणारा इब्री आहे. आज्ञाधारकपणे देवाचा संदेश निनवेला पोहंविण्याऐवजी तो यहोवासमोरून पळून जात असल्यामुळे हे संकट त्यांच्यावर आले आहे.—योना १:७-१०.
खलाशी विचारतात: “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे?” समुद्र आणखी खवळतो तेव्हा योना म्हणतो: “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.” यहोवाच्या सेवकाला समुद्रात व त्याकरवी मृत्यूच्या दाढेत ढकलून देण्याची खलाशांची इच्छा नसते आणि म्हणून ते जहाज किनाऱ्याला लावण्याचा प्रयत्न करतात. शेवटी हार मानून खलाशी म्हणतात: “हे परमेश्वरा, [यहोवा, NW] आम्ही तुला विनंति करितो की या माणसाच्या जिवामुळे आम्हास मारू नको व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर आणू नको; कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करितोस.”—योना १:११-१४.
समुद्रात!
आता खलाशी योनाला समुद्रात फेकून देतात. जसजसा तो प्रक्षुब्ध समुद्राच्या तळाशी जाऊ लागतो तसतसा समुद्र खवळायचा थांबतो. हे पाहून ‘त्या माणसास यहोवाचा फार धाक वाटतो; ते त्यास यज्ञ करतात व नवसही करतात.’—योना १:१५, १६.
पाण्यात पूर्णपणे बुडल्यावर योना प्रार्थना करत आहे यात शंकाच नाही. मग त्याला एका गुळगुळीत मार्गातून जात असल्याचा भास होतो व यातून घसरत तो एका मोठ्या पोकळीत शिरतो. नवल म्हणजे, तो अजूनही श्वासोच्छ्वास करू शकतो! योना आपल्या डोक्यात अडकलेले समुद्रशेवाळ काढत असतो तेव्हा त्यास जाणीव होते की आपण एका खरोखरच विचित्र ठिकाणी आहोत. याचे कारण असे की, “परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता; योना त्या मत्स्याच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता.”—योना १:१७.
योनाची कळकळीची प्रार्थना
या प्रचंड माशाचा पोटात योनाला प्रार्थना करण्यास वेळ मिळतो. त्याचे काही उद्गार विशिष्ट स्तोत्रांसारखे आहेत. नंतर योनाने, दुःख तसेच पश्चात्ताप व्यक्त करणाऱ्या आपल्या प्रार्थना अभिलिखित केल्या. उदाहरणार्थ, माशाचे पोट शिओल, अर्थात त्याची कबर बनेल असे त्याला भासले. या कारणास्तव त्याने प्रार्थना केली: “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या [शिओल] उदरातून मी आरोळी केली: तेव्हा तू माझा शब्द ऐकला.” (योना २:१, २) जेरूसलेमला वार्षिक उत्सवांसाठी जात असताना इस्राएल लोक कदाचित गात होते त्या आरोहणस्तोत्रांपैकी दोन गीते देखील जवळजवळ यासारखेच भाव व्यक्त करतात.—स्तोत्रसंहिता १२०:१; १३०:१, २.
समुद्रात बुडण्याचा विचार करून योना प्रार्थना करतो: “तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकिले, प्रवाहाने मला व्यापिले; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजवरून गेले.”—योना २:३; पडताळा स्तोत्र ४२:७; ६९:२.
योनाला वाटते की आपल्या अवज्ञेमुळे आपण देवाची कृपादृष्टी कायमची गमावू व आता आपल्याला देवाचे मंदिर कधीच पाहायला मिळणार नाही. तो प्रार्थना करतो: “मी म्हणालो, तुझ्या दृष्टीवेगळे मला फेकून दिले आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुनः कसे डोळे लावीन?” (योना २:४; पडताळा स्तोत्र ३१:२२.) योनाला आपली अवस्था इतकी वाईट असल्याचे भासते की तो म्हणतो: “जलांनी मला प्राण जाईपर्यंत [त्याचे जीवन धोक्यात घालून] व्यापिले, डोहाने चोहोकडून मला घेरिले; समुद्रातील शेवाळीने माझे डोके वेष्टिले.” (योना २:५; पडताळा स्तोत्र ६९:१.) पुढील शब्दांवरून योनाच्या केविलवाण्या दशेची कल्पना करा: “मी खाली पर्वतांच्या तळी [माशाच्या पोटात] गेलो होतो; [कबरेला असतात तशा] पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकिले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून [तिसऱ्या दिवशी] माझा जीव उद्धरिला आहे.”—योना २:६; पडताळा स्तोत्र ३०:३.
माशाच्या पोटात असूनसुद्धा, ‘मी इतका खिन्न आहे की माझ्याने प्रार्थना करवत नाही,’ असा योनाने विचार केला नाही. उलटपक्षी तो प्रार्थना करतो: “माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ [मरणासन्न] झाला तेव्हा मी परमेश्वराचे [तो अतुलनीयपणे सामर्थ्यशाली व करूणामय आहे या विश्वासाने] स्मरण केले. माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहंचली.” (योना २:७) स्वर्गीय मंदिरातून देवाने योनाची विनवणी ऐकली व त्याला तारले.
आपल्या प्रार्थनेत शेवटी योना म्हणतो: “जे [खोट्या दैवतांच्या निर्जीव प्रतिमांवर भरवसा ठेवून] निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास [अर्थात दया दाखविणाऱ्याचा त्याग करून] सोडून देतात; पण [यहोवा देवा] मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी [या अनुभवातून जाताना व इतर प्रसंगी] केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.” (योना २:८, ९; पडताळा स्तोत्र ३१:६; ५०:१४.) मृत्यूच्या विळख्यातून केवळ देवच आपल्याला सोडवू शकतो याची जाणीव असल्यामुळे, (त्याच्यापूर्वीचे राजे, दावीद व शलमोन यांनी केल्याप्रमाणे) हा पश्चात्तापी संदेष्टा तारणाचे श्रेय यहोवाला देतो.—स्तोत्र ३:८; नीतिसूत्रे २१:३१.
योना आज्ञा पाळतो
पुष्कळ विचार व कळकळीची प्रार्थना केल्यावर योनाला, आपण खोबणीतून बाहेर ढकलले जात आहोत असे भासते. शेवटी एकदाचा तो कोरड्या भूमीवर फेकला जातो. (योना २:१०) बचावण्यात आल्याबाबत कृतज्ञ असलेला योना देवाचा पुढील शब्द पाळतो: “उठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग.” (योना ३:१, २) तेव्हा योना उठून अश्शुरी राजधानीला जाण्यास निघतो. कोणता दिवस आहे हे त्याला कळते तेव्हा त्याला जाणीव होते की आपण तीन दिवस माशाच्या पोटात होतो. मग हा संदेष्टा फरात नदीचे पश्चिमेकडील प्रचंड वळण ओलांडतो, उत्तरी मेसोपोटेमिया पलीकडे पूर्वेकडे प्रवास करतो, टायग्रिस नदीला पोहंचतो व शेवटी त्या मोठ्या शहरी येतो.—योना ३:३.
योना, निनवे या मोठ्या शहरात प्रवेश करतो. तो एक संपूर्ण दिवस त्या शहरातून चालतो व मग घोषणा करतो: “चाळीस दिवस अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.” योनाला चमत्कारिकपणे अश्शुरी भाषेचे ज्ञान करून देण्यात येते का? आपल्याला हे सांगण्यात आलेले नाही. तथापि, तो इब्री भाषेत बोलत असला व कोणीतरी अनुवाद करत असले तरीसुद्धा त्याची घोषणा मात्र प्रभावशाली ठरते. निनवेतील लोक यहोवावर विश्वास करू लागतात. ते उपास नेमतात व त्यांच्यातील लहानथोर सारेच, गोणताट नेसतात. निनवेच्या राजास हे वृत्त मिळते तेव्हा तो आपल्या राजासनावरून उठतो व आपल्या अंगातला शाही झगा काढतो व गोणताट नेसून राखेत बसतो.—योना ३:४-६.
योनाला केवढे आश्चर्य होते! अश्शुरी राजा जाहीरनामा काढून असा ठराव प्रसिद्ध करतो की, “कोणी माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडामेढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”—योना ३:७-९.
निनवेचे लोक आपल्या राजाच्या ठरावानुरूप वागतात. ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे देव पाहतो तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला त्याविषयी त्याला अनुताप होतो व तो अरिष्ट आणत नाही. (योना ३:१०) त्यांचा पश्चात्ताप, नम्रता व विश्वास पाहून यहोवा त्यांच्यावर आपण आधी ठरवलेला न्यायदंड न आणण्याचा नाही असा निर्णय घेतो.
असंतुष्ट संदेष्टा
चाळीस दिवस उलटून जातात तरी निनवे जसेच्या तसेच राहते. (योना ३:४) निनवेच्या लोकांचा नाश होणार नाही हे जाणून योनाला फार वाईट वाटते व तो क्रोधित होऊन प्रार्थनेत म्हणतो: “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शिशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणिल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस. तर आता, हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक, माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते.” देव प्रत्युत्तरात विचारतो: “तुला क्रोध येणे हे बरे आहे काय?”—योना ४:१-४.
हे ऐकून योना पाय आपटत शहराबाहेर जातो. पूर्वेस जाऊन, छायेत बसून शहराचे काय होते ते पाहण्यासाठी तो एक मंडप बांधतो. यहोवा कनवाळूपणे ‘तुंबीचा एक वेल उगवितो व तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे करतो.’ तुंबीचा वेल पाहून योनाला केवढा आनंद होतो! पण देव पहाटे एक किडा उत्पन्न करतो जो त्या तुंबीला लागतो व लगेच वेल सुकू लागते. काही वेळातच वेल पूर्णपणे सुकून गेलेली असते. तसेच, देव पूर्वेचा झळईचा वारा वाहवितो. कडक ऊन संदेष्ट्याच्या डोक्याला लागते व तो मूर्छित होऊ लागतो. तो मृत्यू येवो अशी वारंवार विनवणी करतो. होय, योना पुन्हापुन्हा म्हणतो: “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”—योना ४:५-८.
आता यहोवा बोलतो. तो योनाला प्रश्न करतो: “तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय?” योना उत्तर देतो: “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले.” थोडक्यात यहोवा आता संदेष्ट्यास सांगतो: “या तुंबीसाठी तुला काही श्रम लागले नाहीत तू हिला वाढविले नाही, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करितोस!” देव पुढे तर्क करतो: “उजव्याडाव्या हाताचा ज्यांस भेद कळत नाही अशी एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?” (योना ४:९-११) योग्य उत्तर, न सांगताही स्पष्टच आहे.
योना पश्चात्तापी होतो व कालांतराने तो स्वतःच्या नावाचे बायबलचे पुस्तक लिहितो. खलाशांनी यहोवाचे भय धरले, त्याला यज्ञ केला व नवस केले हे त्यास कसे कळले? दैवी प्रेरणेने, किंवा मंदिरात एखाद्या खलाशाकडून नाहीतर प्रवाशाकडून त्याला कळले असावे.—योना १:१६; २:४.
‘योनाचे चिन्ह’
शास्त्री व परूशी लोकांनी येशू ख्रिस्ताकडे चिन्हाची मागणी केली, तेव्हा तो म्हणाला: “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही.” येशूने पुढे म्हटले: “कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.” (मत्तय १२:३८-४०) यहुदी दिवस सूर्यास्ताच्या वेळेस सुरू होई. सा. यु. ३३, निसान १४ च्या शुक्रवारी दुपारी ख्रिस्त मरण पावला. त्या दिवशी सूर्यास्त व्हावयाच्या आत त्याचे शरीर कबरेत ठेवण्यात आले. त्या संध्याकाळी निसान १५ सुरू झाला व आठवड्याच्या सातव्या आणि शेवटल्या दिवसाच्या, अर्थात शनिवारच्या सूर्यास्तापर्यंत चालला. मग निसान १६ सुरू झाला व आपण ज्याला रविवार म्हणतो त्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत तो सुरू होता. परिणामतः येशू निसान १४ ला कमीतकमी काही वेळ मृतावस्थेत कबरेत होता, निसान १५ हा पूर्ण दिवस तो कबरेत होता व निसान १६ च्या रात्री तो कबरेत राहिला. रविवारी सकाळी काही स्त्रिया कबरेत आल्या तेव्हा येशूचे पुनरुत्थान झालेले होते.—मत्तय २७:५७-६१; २८:१-७.
येशू तीन दिवसांचा काही काळ कबरेत होता. अशा रितीने त्याच्या शत्रूंना ‘योनाचे चिन्ह’ मिळाले, तथापि ख्रिस्त म्हणाला: “निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवितील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.” (मत्तय १२:४१) खरोखरच! यहुद्यांच्या सहवासात येशू ख्रिस्त, म्हणजेच योनापेक्षा कितीतरी थोर असलेला संदेष्टा होता. निनवेच्या लोकांसाठी योना हा चिन्हाच्या रूपात पुरेसा होता तरीसुद्धा येशूने त्या संदेष्ट्यापेक्षा कितीतरी वरचढ अशा अधिकारवाणीने व अधिक पुरावा देऊन प्रचार केला. मात्र, स्थूलमानाने बोलल्यास यहुद्यांनी विश्वास ठेवला नाही.—योहान ४:४८.
राष्ट्र या नात्याने यहुद्यांनी, हा संदेष्टा योनापेक्षा थोर आहे हे स्वीकारले नाही व त्यांनी त्याजवर विश्वास ठेवला नाही. तथापि, त्यांच्या पूर्वजांबद्दल काय? त्यांच्यात देखील विश्वासाची व नम्र आत्म्याची उणीव होती. निनवेचे पश्चात्तापी लोक व दुसरीकडे विश्वास आणि नम्रतेच्या बाबतीत अत्यंत उणे असलेले हट्टी इस्राएली लोक यांत किती विरोधाभास आहे हे दाखवण्यासाठीच खरे तर, यहोवाने योनाला निनवेस पाठवले होते हे स्पष्ट आहे.—पडताळा अनुवाद ९:६, १३.
स्वतः योनाच्या बाबतीत काय? त्याला देवाची करूणा किती अगाध आहे हे प्रत्ययास आले. शिवाय, निनवेच्या पश्चात्तापी लोकांना दाखवण्यात आलेल्या करूणेबद्दल योनाने कुरकूर केली असता यहोवाने जी प्रतिक्रिया दाखवली ती पाहता, आपल्या दिवसात आपला स्वर्गीय पिता लोकांना करूणा दाखवतो तेव्हा आपण कुरकूर करण्याचे टाळले पाहिजे. उलटपक्षी, दर वर्षी हजारो लोक विश्वासाने व नम्र अंतःकरणाने यहोवाकडे वळतात याबद्दल आपण हर्षित होऊ या.