सध्यापुरते जगायचे की चिरकालिक भवितव्याकरता जगायचे?
‘आपण ही आशा धरून तरलो.’—रोमकर ८:२४.
१. एपिक्युरियन लोकांची शिकवण काय होती व त्या तत्त्वज्ञानाचा काही ख्रिश्चनांवर कसा परिणाम झाला?
“मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?” असे करिंथमध्ये राहणाऱ्या ख्रिश्चनांना प्रेषित पौलाने लिहिले. (१ करिंथकर १५:१२) एपिक्युरस नामक ग्रीक ऋषीच्या विषारी तत्त्वज्ञानाचा पहिल्या शतकातील ख्रिश्चनांवर काही प्रमाणात प्रभाव पडल्याचे स्पष्ट दिसत होते. म्हणूनच पौलाने, “चला आपण खाऊ, पिऊ कारण उद्या मरावयाचे आहे” या एपिक्युरियन शिकवणुकीकडे लक्ष वेधले. (१ करिंथकर १५:३२) या तत्त्वज्ञान्याच्या अनुयायांनी मृत्यूनंतरच्या जीवनाच्या आशेला झिडकारले व शारीरिक सुखविलासच एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील एकमात्र किंवा प्रमुख कल्याण असल्याचा विश्वास बाळगला. (प्रेषितांची कृत्ये १७:१८, ३२) एपिक्युरियन तत्त्वज्ञान आत्म-केंद्रित, उपहास करणारे व पूर्णपणे भ्रष्ट होते.
२. (अ) पुनरूत्थानाचा नकार करणे इतके घातक का होते? (ब) पौलाने करिंथमधील ख्रिश्चनांचा विश्वास कसा बळकट केला?
२ पुनरूत्थानाच्या या नाकारण्याला गहन अर्थ होते. पौलाने याप्रमाणे तर्क केला: “जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तहि उठविला गेला नाही; आणि ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासहि व्यर्थ. . . . आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहो.” (१ करिंथकर १५:१३-१९) होय, चिरकालिक भवितव्याच्या आशेविना ख्रिस्ती विश्वास “व्यर्थ” ठरला असता. तो उद्देशहीन झाला असता. म्हणूनच, या मूर्तिपूजक विचारसरणीच्या प्रभावाखाली आल्यामुळे करिंथकर मंडळी समस्यांचे पोषस्थान बनली होती. (१ करिंथकर १:११; ५:१; ६:१; ११:२०-२२) यास्तव, पुनरूत्थानावर त्यांचा विश्वास बळकट करणे हे पौलाचे ध्येय होते. यात काहीच शंका नाही, की पुनरूत्थानाची आशा काल्पनिक नव्हे तर निश्चितपणे पूर्ण होणारी वास्तविकता आहे हे त्याने जबरदस्त तर्काचा, शास्त्रवचनीय संदर्भांचा आणि उदाहरणांचा उपयोग करून शाबीत केले. याच आधारावर तो विश्वास करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना आर्जवू शकला: “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.”—१ करिंथकर १५:२०-५८.
“जागृत राहा”
३, ४. (अ) पेत्रानुसार, शेवटल्या काळादरम्यान काही जण कोणत्या मनोवृत्तीच्या विळख्यात सापडतील? (ब) आपण स्वतःला सतत कशाची आठवण देत राहणे आवश्यक आहे?
३ आज अनेकांचे नैराश्यपूर्ण, आजपुरते-जगा धोरण आहे. (इफिसकर २:२) हे प्रेषित पेत्राच्या भाकीताप्रमाणेच आहे. तो ‘थट्टेखोर लोकांविषयी’ बोलला जे ‘थट्टा करीत म्हणतात: त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.’ (२ पेत्र ३:३, ४) खऱ्या उपासकांनी हे धोरण अंगीकारले तर ते कदाचित “निष्क्रिय व निष्फळ” ठरतील. (२ पेत्र १:८) परंतु, आज देवाचे बहुतेक लोक तसे करत नाहीत.
४ सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या येणाऱ्या अंताविषयी कुतूहल बाळगण्यात काही गैर नाही. स्वतः येशूच्या प्रेषितांना जे कुतूहल वाटत होते त्याची आठवण करा: “प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” तेव्हा येशूने उत्तर दिले: “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही.” (प्रेषितांची कृत्ये १:६, ७) या शब्दांवरून, जैतुनांच्या डोंगरावर येशूने जो संदेश दिला होता तोच मूलभूत संदेश प्रकट होतो; जैतुनांच्या डोंगरावर त्याने म्हटले होते: “कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही. . . . तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्तय २४:४२, ४४) या सल्ल्याचे स्मरण आपण स्वतःला देत राहिले पाहिजे! ‘मला आता जरा धीमे झाले पाहिजे आणि अंताची इतकी काळजी करण्याची काही गरज नाही,’ अशी मनोवृत्ती विकसित करण्याचा काहींना मोह होऊ शकतो. पण ते किती चुकीचे ठरेल! “गर्जनेचे पुत्र,” अर्थात याकोब आणि योहान यांचेच उदाहरण घ्या.—मार्क ३:१७.
५, ६. याकोब आणि योहान या दोघांच्या उदाहरणांवरून आपण कोणते धडे शिकू शकतो?
५ याकोब अतिशय आवेशी प्रेषित होता हे आपल्याला माहीतच आहे. (लूक ९:५१-५५) ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाल्यावर त्याने सक्रिय भूमिका पार पाडली असेल. पण हेरोद अग्रिप्पा पहिला याने, याकोब ऐन तारुण्यात असतानाच त्याची हत्या घडवून आणली. (प्रेषितांची कृत्ये १२:१-३) आपल्या जीवनाचा अनपेक्षित अंत होणार आहे हे याकोबाला माहीत झाल्यावर, मी किती आवेशी होतो, मी सेवेमध्ये किती झटलो होतो, यांचा विचार करत तो खेद करीत बसला असेल असे आपल्याला वाटते का? तसे मुळीच झाले नाही! यहोवाच्या सेवेत आपण आपल्या अल्प जीवनातील सर्वात उत्तम वर्षे खर्च केली होती याचा त्याला निश्चितपणे आनंद वाटत होता. आपल्या जीवनाचा अनपेक्षितपणे अंत होईल हे आपल्यातील कोणालाही आता माहीत नाही. (उपदेशक ९:११; पडताळा लूक १२:२०, २१.) तेव्हा, यहोवाच्या सेवेत अगदी आवेशी व सक्रिय राहणे सुज्ञपणाचे ठरेल. अशा प्रकारे आपण यहोवासमोर चांगले नाव कमवू आणि चिरकालिक भवितव्य दृष्टिपथात ठेवून जिवंत राहू.—उपदेशक ७:१.
६ “जागृत राहा,” असे येशूने आग्रहाने आर्जवले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या प्रेषित योहानासंबंधीचा एक वस्तुपाठ येथे आहे. (मत्तय २५:१३; मार्क १३:३७; लूक २१:३४-३६) योहानाने हा आग्रह स्वीकारून अनेक दशकांपर्यंत आवेशाने सेवा केली. खरे पाहता, इतर प्रेषितांपैकी तोच जास्त काळ जिवंत राहिला होता. योहान जेव्हा म्हातारा झाला व आपल्या विश्वासू कार्यांच्या दशकांचे सिंहावलोकन करू शकला तेव्हा त्याला, आपण चूक केली, आपले जीवन भलत्याच दिशेला लागले होते किंवा असंतुलित होते असे वाटले का? मूळीच नाही! तो अजूनही भवितव्याची उत्सुकतेने वाट पाहत होता. पुनरूत्थित येशूने जेव्हा, “मी लवकर येतो,” असे म्हटले तेव्हा योहानाने लागलीच “आमेन. ये प्रभू येशू ये,” असे उत्तर दिले. (प्रकटीकरण २२:२०) योहान निश्चितच सध्यापुरता, धीमे आणि शांत ‘सामान्य जीवन’ जगत नव्हता. प्रभू केव्हाही येवो, योहान मात्र त्याच्या संपूर्ण जीवाने व शक्तीने सेवा करीत राहण्याबाबत दृढनिश्चयी होता. आपल्या बाबतीत काय?
सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवण्याकरता आधार
७. (अ) कशाप्रकारे सार्वकालिक जीवनाची आशा “युगाच्या काळापूर्वी देऊ” करण्यात आली होती? (ब) येशूने चिरकालिक जीवनाच्या आशेवर कशाप्रकारे प्रकाश टाकला?
७ सार्वकालिक जीवनाची आशा मानव-निर्मित स्वप्न वा कल्पना नाही याविषयी खात्री बाळगा. तीत १:२ म्हणते त्याप्रमाणे आपली ईश्वरी भक्ती ‘सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेवर’ आधारित आहे. सर्व आज्ञाधारक मानवांनी अनंतकाळ जगावे हा देवाचा मूळ उद्देश होता. (उत्पत्ति १:२८) कोणतीही गोष्ट, आदाम आणि हव्वेची बंडाळी देखील हा उद्देश निष्फळ ठरवू शकत नाही. उत्पति ३:१५ मध्ये लिहिल्याप्रमाणे देवाने मानवजातीला पीडित करणाऱ्या दुःखास नाहीसे करणाऱ्या एका ‘संततीचे’ लागलीच अभिवचन दिले. ती “संतति” किंवा मशीहा अर्थात येशू याचे आगमन झाले तेव्हा त्याने, त्याच्या मूळ शिकवणुकीत चिरकालिक जीवनाच्या आशेचीही शिकवण दिली. (योहान ३:१६; ६:४७, ५१; १०:२८; १७:३) ख्रिस्ताने आपले परिपूर्ण जीवन खंडणी म्हणून देण्याद्वारे मानवजातीला सार्वकालिक जीवन बहाल करण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त केला. (मत्तय २०:२८) त्याचे काही शिष्य म्हणजे, एकूण १,४४,००० शिष्य स्वर्गामध्ये अनंतकाळ जगतील. (प्रकटीकरण १४:१-४) अशा प्रकारे एकेकाळी मर्त्य असलेले काही मानव “अमरत्व परिधान” करतील!—१ करिंथकर १५:५३.
८. (अ) “अमरत्व” म्हणजे काय, व यहोवाने ते १,४४,००० जणांना का देऊ केले? (ब) येशूने ‘दुसऱ्या मेंढरांसाठी’ कोणती आशा दिली?
८ “अमरत्व” याचा अर्थ, कधीही न मरणे एवढाच नाही. त्यात ‘अक्षय जीवनाचे सामर्थ्य’ गोवले आहे. (इब्री लोकांस ७:१६; पडताळा प्रकटीकरण २०:६.) पण असे विलक्षण बक्षीस देऊन देव काय साध्य करतो? देवाचा एकही प्राणी भरवसालायक असू शकत नाही, हा सैतानाने केलेला दावा आठवा. (ईयोब १:९-११; २:४, ५) देवाने १,४४,००० जणांना अमरत्व बहाल करण्याद्वारे सैतानाच्या दाव्याला चांगलेच उत्तर देणाऱ्या या गटावर आपला पूर्ण भरवसा असल्याचे सूचित केले आहे. पण बाकीच्या मानवजातीबद्दल काय? राज्य वारिसांच्या या ‘लहान कळपाच्या’ पहिल्या सदस्यांना येशूने सांगितले, की ते “राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय” करतील. (लूक १२:३२; २२:३०) यावरून, इतरांना त्याच्या राज्याची प्रजा या नात्याने पृथ्वीवरील सार्वकालिक जीवन मिळेल असे सूचित होते. या ‘दुसऱ्या मेंढरांना’ अमरत्व बहाल केलेले नसले तरीसुद्धा त्यांना “सार्वकालिक जीवन” मिळते. (योहान १०:१६; मत्तय २५:४६) म्हणजेच, सर्व ख्रिश्चनांना सार्वकालिक जीवनाची आशा आहे. ते काल्पनिक नसून ‘सत्यप्रतिज्ञ देवाने’ गांभीर्यपूर्वकतेने अभिवचन दिले आहे व येशूच्या मौल्यवान रक्ताने त्याची किंमत दिली आहे.—तीत १:२.
भवितव्यात पूर्ण होईल?
९, १०. आपण अंताजवळ असल्याच्या कोणत्या स्पष्ट सूचना आहेत?
९ प्रेषित पौलाने भाकीत केले होते, की “कठीण दिवस” आपण निर्विवादपणे ‘शेवटल्या काळात’ येऊन ठेपल्याचे सूचित करणार होते. चहुकडचा मानवी समाज प्रीतीहीनता, लोभ, आत्म-संतोष आणि अभक्तपणा या किडीमुळे ढासळत चाललेला आपण पाहतो तेव्हा, या दुष्ट व्यवस्थीकरणावर यहोवाचा न्यायदंड बजावण्याचा दिवस जलदगतीने जवळ येत असल्याची जाणीव आपल्याला होत नाही का? हिंसा आणि द्वेषाची तीव्रता वाढत असल्याचे आपण पाहतो तेव्हा “दुष्ट व भोंदू माणसे . . . दुष्टपणात अधिक सरसावतील” या पौलाच्या शब्दांची पूर्णता आपण पाहत नाही का? (२ तीमथ्य ३:१-५, १३) काहीजण आशावादीपणे “शांती आहे, निर्भय आहे,” असे ओरडतील पण शांतीच्या सर्व आशा नाहीशा होतील कारण “गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात् वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात् नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.” आपल्या काळाचा काय अर्थ होतो याविषयी आपण अजाण नाही. यास्तव, आपण “जागे व सावध” राहू या.—१ थेस्सलनीकाकर ५:१-६.
१० तसेच, बायबल सूचित करते, की शेवटला काळ ‘थोड्या कालावधीचा’ आहे. (प्रकटीकरण १२:१२; पडताळा १७:१०.) त्या ‘थोड्या कालावधीचा’ बहुतांश काळ सरून गेला आहे हे स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, दानीएलाची भविष्यवाणी अगदी अचूकपणे ‘उत्तरेचा राजा’ आणि ‘दक्षिणेचा राजा’ यांच्यात या शतकापर्यंत चाललेल्या झगड्याचे वर्णन करते. (दानीएल ११:५, ६) दानीएल ११:४४, ४५ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे ‘उत्तरेकडच्या राजाचा’ शेवटला हल्लाच तेवढा पूर्ण व्हावयाचा बाकी आहे.—या भविष्यवाणीची चर्चा टेहळणी बुरूज (इंग्रजी) जुलै १, १९८७ आणि नोव्हेंबर १, १९९३ यांमध्ये पाहा.
११. (अ) मत्तय २४:१४ ची पूर्णता किती प्रमाणात झाली आहे? (ब) मत्तय १०:२३ मधील येशूचे शब्द काय सूचित करतात?
११ याशिवाय, येशूनेही भाकीत केले, की “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) आज यहोवाचे साक्षीदार त्यांचे हे कार्य २३३ देशांत, बेटांवर आणि क्षेत्रांमध्ये पार पाडत आहेत. हे खरे की काही क्षेत्रांत अजूनही सुवार्ता ऐकवण्यात आलेली नाही आणि कदाचित यहोवाच्या उचित समयी संधीचे द्वार खुले होईल. (१ करिंथकर १६:९) तरीसुद्धा, “मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलाची सगळी गावे तुमच्याने फिरून होणार नाहीत,” हे मत्तय १०:२३ मधील येशूचे शब्द विचारप्रवर्तक आहेत. सुवार्ता दिगंतरी घोषित केली जाईल यात काही शंकाच नसली तरीसुद्धा न्यायदंड बजावणारा या नात्याने येशूच्या ‘आगमनापूर्वी’ राज्याचा संदेश आपण सर्व पृथ्वीवर व्यक्तिगतरीत्या पोहंचवू शकणार नाही.
१२. (अ) प्रकटीकरण ७:३ मध्ये कोणत्या ‘शिक्कामोर्तबाचा’ उल्लेख करण्यात आला आहे? (ब) पृथ्वीवरील अभिषिक्तांच्या संख्येत होणारी घट तिचा काय अर्थ होतो?
१२ प्रकटीकरण ७:१, ३ वचनाचा विचार करा ज्यात म्हटले आहे की नाशाच्या ‘चार वाऱ्यांना’ “आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत” अडवून धरण्यात आले आहे. हे, १,४४,००० जणांच्या स्वर्गीय पाचारणानंतर झालेल्या पहिल्या शिक्कामोर्तबाला सूचित करीत नाही. (इफिसकर १:१३) तर, त्यांना आमच्या देवाचे परीक्षिलेले व विश्वासू ‘दास’ म्हणून ठामपणे ओळखले जाते त्या शेवटल्या शिक्कामोर्तबाला सूचित होते. आज, पृथ्वीवर हयात असलेल्या देवाच्या खऱ्या अभिषिक्त पुत्रांची एकूण संख्या बरीच घटली आहे. याशिवाय, बायबल स्पष्टपणे सांगते, की “निवडलेल्यांसाठी” मोठ्या संकटाचा सुरवातीचा टप्पा “कमी” केला जाईल. (मत्तय २४:२१, २२) अभिषिक्त असल्याचे जाहीर करणारे बहुतेक जण वयोवृद्ध आहेत. मग, यावरून अंत अगदी जवळ येऊन ठेपला आहे हे सूचित होत नाही का?
विश्वासू पहारेकरी
१३, १४. पहारेकरी वर्गाची जबाबदारी काय आहे?
१३ तोपर्यंत, आपण ‘विश्वासू दासाकरवी’ येणाऱ्या मार्गदर्शनाचे पालन करतो तेव्हा सुज्ञता दाखवतो. (मत्तय २४:४५) शंभरपेक्षा अधिक वर्षांपासून आधुनिक दिवसांतील ‘दासाने’ विश्वासूपणे “पहारेकरी” म्हणून सेवा केली आहे. (यहेज्केल ३:१७-२१) जून १, १९८४ चे टेहळणी बुरूज असे स्पष्टीकरण देते: “हा पहारेकरी, पवित्र शास्त्र भविष्यवादांच्या पूर्णतेस अनुलक्षून पृथ्वीवर घटना कशा घडताहेत ते निरिक्षितो, तसेच ‘जगाच्या स्थापनेपासून पूर्वी कधी आले नाही व पुढे कधी येणार नाही अशा मोठ्या संकटाचा’ इशारा वदवितो आणि ‘चांगल्या गोष्टीची सुवार्ता घोषित करतो.’”—मत्तय २४:२१; यशया ५२:७.
१४ लक्षात ठेवा: “नजरेस पडेल ते” कळवण्याचे काम पहारेकऱ्याचे आहे. (यशया २१:६-८) बायबल काळांत, एखादा पहारेकरी संभाव्य धोका अतिशय दूर असला आणि तो स्पष्टपणे जरी त्याला ओळखता येत नसला तरी त्याबद्दल इशारा देत असे. (२ राजे ९:१७, १८) परंतु, तेव्हासुद्धा कधीकधी चुकीचा इशारा दिला जात असे. पण चांगला पहारेकरी भीतीपोटी इशारा देण्यास कुचराई करत नसे. समजा तुमच्या घराला आग लागली आहे आणि अग्निशामक दलाला वाटले की तो कदाचित चुकीचा इशारा असेल व म्हणून ते आले नाहीत तर तुम्हाला कसे वाटेल? धोक्याच्या कोणत्याही इशाऱ्याकडे या लोकांनी लक्ष दिलेच पाहिजे असेच तुम्हाला वाटेल! याचप्रकारे, पहारेकरी वर्गाला परिस्थितीने खात्री दिल्यावर त्याने बोलून दाखवले आहे.
१५, १६. (अ) भविष्यवाणीविषयी आपल्याला असलेल्या समजुतीत फेरफार का केले जातात? (ब) विशिष्ट भविष्यवाण्यांचा चुकीचा समज झालेल्या देवाच्या विश्वासू सेवकांकडून आपण काय शिकू शकतो?
१५ परंतु, घटना जसजशा घडत जातात तसतशी भविष्यवाणीविषयी आपल्याला असलेली समज अधिक स्पष्ट होते. ईश्वरी भविष्यवाण्यांची समज, त्यांची पूर्णता होण्याआधीच प्राप्त होणाऱ्या घटना फारच तुरळक असल्याचे इतिहास दाखवतो. अब्रामाची संतती नक्की किती काळापर्यंत म्हणजे सुमारे ४०० वर्षांपर्यंत ‘जो देश स्वतःचा नाही अशा देशात उपरी होऊन राहील’ हे देवाने त्याला सांगितले. (उत्पत्ति १५:१३) परंतु, मोशेने स्वतःहून अकालीच मुक्तिदाता होण्याची तयारी दर्शवली.—प्रेषितांची कृत्ये ७:२३-३०.
१६ मशीहाविषयीच्या भविष्यवाणींचा देखील विचार करा. झालेल्या गोष्टींचा विचार केल्यावर मशीहाचा मृत्यू आणि पुनरूत्थान भाकीत करण्यात आले होते हे अगदीच स्पष्ट वाटते. (यशया ५३:८-१०) पण, स्वतः येशूच्या शिष्यांना या वस्तुस्थितीचे आकलन झाले नाही. (मत्तय १६:२१-२३) दानीएल ७:१३, १४ ची पूर्णता, ख्रिस्ताची भावी पराऊसिया किंवा “उपस्थिती” दरम्यान पूर्ण होणार होती हे त्यांनी पाहिले नाही. (मत्तय २४:३, NW) म्हणजे त्यांनी जेव्हा येशूला “प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” असे विचारले तेव्हा त्यांच्या गणतीत जवळजवळ २,००० वर्षांची तफावत होती. (प्रेषितांची कृत्ये १:६) ख्रिस्ती मंडळीची मुळे चांगली रोवल्यानंतरही चुकीच्या कल्पना व खोट्या अपेक्षा वर डोकावू लागल्या. (२ थेस्सलनीकाकर २:१, २) काही ख्रिश्चनांनी अधूनमधून चुकीचे दृष्टीकोन बाळगले असले तरीसुद्धा यहोवाने या पहिल्या शतकातील विश्वासू लोकांच्या कार्यावर निर्विवादपणे आशीर्वाद दिला.
१७. शास्त्रवचनांविषयी आपल्याला असलेल्या समजुतीत फेरफार होतात तेव्हा आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
१७ आजच्या पहारेकरी वर्गाला देखील वेळोवेळी आपल्या चुकीच्या दृष्टिकोनात सुधारणा करावी लागली. पण मग, यहोवाने ‘विश्वासू दासाला’ आशीर्वादित केले आहे याविषयी कोणी शंका बाळगू शकतो का? याशिवाय, संदर्भानुसार पाहिल्यास झालेले फेरफार काहीसे अल्प नाहीत का? बायबलविषयीच्या आपल्या मूलभूत समजेत बदल झालेला नाही. आपण शेवटल्या काळात जगत आहोत हे आपले मत पूर्वीपेक्षा अधिक ठाम झाले आहे!
चिरकालिक भवितव्यासाठी जगणे
१८. आपण केवळ आजपुरते जगण्याचे का टाळले पाहिजे?
१८ ‘चला आपण खाऊपिऊ, कारण उद्या तर आपल्याला मरायचे आहे,’ असे जग म्हणेल पण आपले असे धोरण नसावे. तुम्ही चिरकालिक भवितव्यासाठी कार्य करू शकता तर सद्य जीवनात कोणते सुख मिळवता येऊ शकते यासाठी निरर्थक प्रयत्न का करावेत बरे? स्वर्गातील अमर जीवनाची अथवा पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा स्वप्न किंवा कल्पना नाही. “सत्यप्रतिज्ञ” देवाने वचन दिलेली ती एक वास्तविकता आहे. (तीत १:२) आपल्या आशेची पूर्ती निकट असल्याचा मुबलक पुरावा आहे! “काळाचा संक्षेप करण्यात आला आहे.”—१ करिंथकर ७:२९.
१९, २०. (अ) राज्याकरता आपण केलेल्या त्यागांविषयी यहोवाचा दृष्टिकोन कसा आहे? (ब) चिरकालिक जीवनाचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आपण जीवन का जगावे?
१९ हे व्यवस्थीकरण अनेकांच्या कल्पनेपेक्षा अधिक काळपर्यंत टिकले हे मात्र खरे आहे. आम्हाला हे आधीच कळाले असते तर आम्ही विशिष्ट त्याग केले नसते असे काहींना कदाचित आता वाटेल. पण एखाद्याने त्याग केल्याचा पस्तावा करू नये. कारण, त्याग करणे ख्रिस्ती असण्याचा एक मूलभूत भाग आहे. ख्रिस्ती “स्वतःचा त्याग” करतात. (मत्तय १६:२४) देवाला संतुष्ट करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न व्यर्थ गेले असा आपण कधीच विचार करू नये. येशूने वचन दिले: ‘ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी शंभरपटीने मिळेल आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही.’ (मार्क १०:२९, ३०) आतापासून हजार वर्षांनंतर, तुमच्या नोकरीचे, तुमच्या घराचे किंवा बँक खात्याचे काही मूल्य राहील का? पण, यहोवासाठी तुम्ही केलेले त्याग आतापासून दहा लाख वर्षांनंतर, नव्हे अरब वर्षांनंतरही अर्थपूर्ण ठरतील! ‘कारण तुमचे कार्य विसरून जाण्यास देव अन्यायी नाही.’—इब्री लोकांस ६:१०.
२० यास्तव, चिरकालिक जीवनाचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आपण जगू या, आपले लक्ष ‘दृश्य गोष्टीकडे नाही तर अदृश्य गोष्टीकडे लावू या; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.’ (२ करिंथकर ४:१८) संदेष्टा हबक्कूकने असे लिहिले: “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) अंताची ‘वाट पाहण्याचा’ परिणाम, आपण ज्या व्यक्तिगत व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडतो त्यांच्यावर कसा होतो? आमचा पुढील लेख हे प्रश्न विचारात घेईल.
उजळणीकरता मुद्दे
◻ युगाच्या समाप्तीचा अंत येण्यास विलंब होत आहे असे काहींना वाटत असल्यामुळे त्यांच्यावर कसा प्रभाव पडत आहे?
◻ आपण बाळगत असलेल्या सार्वकालिक जीवनाच्या आशेचा आधार काय आहे?
◻ राज्य आस्थेसाठी आपण केलेले त्याग कसे लेखावेत?
[१५ पानांवरील चित्र]
अंत येण्याआधी विश्वव्यापी प्रचार कार्य पूर्ण झाले पाहिजे