वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१ पृ. २६-२९
  • संतोषविणारा कौटुंबिक अभ्यास

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संतोषविणारा कौटुंबिक अभ्यास
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण कशाचा अभ्यास करावा?
  • वातावरण शांत राखा
  • बायबल सजीव करा
  • सहभागी होण्यास सर्वांना मदत करा
  • दळणवळण राखा—चिरडीस आणू नका!
  • ते श्रम वायफळ नाहीत
  • कुटुंब मिळून देवाच्या वचनाचा अभ्यास नियमितपणे करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • कौटुंबिक आराखडा—कौटुंबिक अभ्यास
    आमची राज्य सेवा—२००५
  • देवाच्या नव्या जगात तुमचे कुटुंब बचावून जाण्यासाठी परिश्रम घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • अर्थभरीत कौटुंबिक पवित्र शास्त्राभ्यास चालविणे
    आमची राज्य सेवा—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१ पृ. २६-२९

संतोषविणारा कौटुंबिक अभ्यास

“ज्ञानाच्या योगे त्याच्या खोल्या सर्व प्रकारच्या मोलवान व मनोरम वस्तूंनी भरून जातात” असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे २४:४) अमूल्य असलेल्या या बहुमोल वस्तूंचा अवाका केवळ भौतिक धनसंपत्तीपर्यंतच सीमित नाही तर प्रेम, ईश्‍वरी भय आणि अतूट विश्‍वास यांसही तो सामावून घेतो. असे गुण निश्‍चितच एका समृद्ध कौटुंबिक जीवनास जन्म देतात. (नीतिसूत्रे १५:१६, १७; १ पेत्र १:७) तथापि, हे गुण आत्मसात करावयाचे असल्यास आपल्याला आपल्या घराण्यात देवाचे ज्ञान आणले पाहिजे.

कुटुंबातील सदस्यांच्या मनांवर हे ज्ञान बिंबवण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर पडते. (अनुवाद ६:६, ७; इफिसकर ५:२५, २६; ६:४) एक नियमित कौटुंबिक अभ्यास हा असे करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग होय. एका बोधपर व संतोषकारक मार्गाने अभ्यास संचालित केल्यास सहभागी होणाऱ्‍या सर्वांनाच ते किती आल्हाददायक ठरेल बरे! तर मग, एक परिणामकारक कौटुंबिक अभ्यासa संचालित करण्याच्या काही आवश्‍यक बाबींवर आपण विचार करू या.

एक कौटुंबिक अभ्यास नियमित असतो तेव्हाच काय तो सगळ्यात परिणामकारक ठरतो. योगायोगावर अथवा एखाद्या लहरी निर्णयावर अभ्यास विसंबून असल्यास तो बहुधा अनियमित होण्याचीच शक्यता अधिक असते. यास्तव, अभ्यासासाठी तुम्ही ‘वेळ काढली’ पाहिजे. (इफिसकर ५:१५-१७) सर्वांकरता सोईस्कर असेल अशी एक नियमित वेळ निवडणे एक मोठे आव्हान असू शकते. एक कुटुंब प्रमुख कबूल करतो: “नियमितपणे कौटुंबिक अभ्यास करणं हे आमच्यासाठी फारसं सोपं नव्हतं. आम्ही निरनिराळ्या वेळी अभ्यास करून पाहिला व शेवटी संध्याकाळी थोडंसं उशिरा अभ्यास करणं हीच एक वेळ आम्हाला सोईस्कर वाटली. आता मात्र आमचा अभ्यास नियमितपणे होतो.”

एकदा का तुम्ही एक सोईस्कर वेळ ठरवली मग विकर्षणांना अभ्यासात डोकावू न देण्याची खबरदारी घ्या. सध्या ३३ वर्षांची मारियाb आठवणी ताज्या करते: “आम्ही नेमकं अभ्यास करत असतानाच जर कोणी पाहुणे टपकले तर आमचा अभ्यास पूर्ण होईस्तोवर बाबा त्यांना थांबवून ठेवत असत. आणि फोन कॉल्स जर आले तर बाबा सरळ त्या व्यक्‍तीस सांगत, की मी तुम्हाला पुन्हा फोन करीन.”

तथापि, याचा अर्थ कोणत्याही प्रकारे लवचिकतेला थारा नसणे असा होत नाही. अत्यंत निकडीचे प्रसंग अथवा आकस्मिक घटना घडू शकतात आणि वेळप्रसंगी अभ्यास रद्द करणे किंवा लांबणीवर टाकणे अनिवार्य असेल. (उपदेशक ९:११) परंतु, यांपैकी कशामुळेही आपला नित्यक्रम विस्कळीत होऊ न देण्याविषयी सावध असा.—फिलिप्पैकर ३:१६.

अभ्यासाची समय-मर्यादा किती असावी बरे? आपल्या मुलामुलीचे यशस्वीरित्या संगोपन केलेला रॉबर्ट म्हणतो: “आम्ही बहुधा एक तास अभ्यास करत असू. मुलं लहान होती तेव्हा, टेहळणी बुरूज नियतकालिकामधील अभ्यासाच्या लेखातले एखाददोन परिच्छेद, बायबलचे काही निवडक उतारे आणि इतर प्रकाशनांतील काही भाग विचारात घेणं अशा निरनिराळ्या गोष्टी करून आम्ही त्या एका तासाभरादरम्यान त्यांची आस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असू.” मारियाला आठवते: “मी आणि माझ्या दोघी बहिणी लहानग्या होतो तेव्हा आठवड्यातून दोनतीन वेळा काही २० मिनीटं आमचा अभ्यास व्हायचा. आम्ही जसजसं वयात येऊ लागलो तसतसा आमचा साप्ताहिक कौटुंबिक अभ्यास तासाभरापर्यंत चालायचा.”

आपण कशाचा अभ्यास करावा?

अभ्यासासाठी सर्वजण एकत्र आले असता हा प्रश्‍न विचारात घेतल्यास त्याचा परिणाम, पदरी निराशा पाडणे व अभ्यासाचा बहुमोल वेळ वाया घालवणे असाच होईल. अशी परिस्थिती असल्यास मुलांची आस्था जिवंत ठेवू शकेल असे काहीच नसेल व लवकरच त्यांची आस्था थंडावेल. यास्तव, अभ्यासण्याकरता संस्थेच्या एखाद्या प्रकाशनाची आगाऊ निवड करा.

‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दासाने’ आपल्या निवडीसाठी विपुल प्रकाशने पुरवलेली आहेत. (मत्तय २४:४५-४७) कदाचित, कुटुंबाने अद्याप अभ्यासिले नसेल असे एखादे पुस्तक तुम्ही वापरू शकता. शिवाय, शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी याचे खंड तुमच्या भाषेत उपलब्ध असल्यास त्यातील काही निवडक भाग विचारात घेणे किती संतोषपर आहे बरे! उदाहरणार्थ, स्मारक विधीपूर्व सप्ताहांदरम्यान तुम्ही प्रभूच्या सांजभोजनावरील लेखाची उजळणी करू शकता. अनेक कुटुंबाना सप्ताहाच्या टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करण्यात एक आगळाच आनंद वाटतो. परंतु, टेहळणी बुरूज यांतील इतर लेखही अभ्यासासाठी तितकेच सर्वोत्कृष्ट साहित्य पुरवतात. अभ्यासासाठी कोणती प्रकाशने विचारात घेतली जावीत हा निर्णय घेण्यास कुटुंबांची आध्यात्मिक भूक जाणणारा कुटुंब प्रमुखच सर्वोत्तम स्थितीत असतो.

मारिया आठवणींना उजाळा देते: “आम्ही नेहमी आधीच ठरवलेल्या प्रकाशनांचा अभ्यास करत असू. परंतु, एखादा प्रश्‍न टांगणीस असला अथवा शाळेत एखादा प्रसंग उद्‌भवला की मग सदर व्यावहारिक माहिती आम्ही विचारात घेत असू.” युवक शाळेत तोंड देत असलेल्या समस्या, संकेतभेटी, पाठ्येतर कार्यक्रम आदींसारख्या खास चिंतेच्या बाबी तर हमखास उद्‌भवतातच. अशावेळी, या समस्येची चर्चा करणाऱ्‍या लेखांची अथवा प्रकाशनांची निवड करा. टेहळणी बुरूज किंवा सावध राहा! याच्या ताज्या अंकात तुम्हास आढळलेल्या माहितीची चर्चा तुम्हाला लागलीच आपल्या कुटुंबासोबत करावयाची असल्यास तशी व्यवस्था करण्यास मागे पुढे पाहू नका. अर्थात, केलेल्या या फेरविचाराची कल्पना कौटुंबिक सदस्यांनाही देण्याची तुमची इच्छा असेल. पण एकदा का गरज भागवली गेली की मग पुन्हा एकदा नियोजित केलेल्या साहित्याकडे वळण्याची खात्री करा.

वातावरण शांत राखा

शांत परिस्थितींत अध्ययन उत्तमप्रकारे होते. (याकोब ३:१८) यास्तव, एक स्वस्थ तरी तितकेच आदरणीय वातावरण विकसित करा. संयुक्‍त संस्थाने येथील एक कुटुंब प्रमुख म्हणतो: “बैठकीच्या खोलीत किंवा भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या व्हरांड्यात अर्थात आम्ही जेथे कोठे बसून अभ्यास करतो तिथं एकमेकांपासून दूर बसण्यापेक्षा जवळजवळच बसण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यामुळं आमच्यामध्ये एक उबदार भावना निर्माण होते.” मारिया मोठ्या कौतुकाने आठवून सांगते: “मला आणि माझ्या बहिणींना त्या आठवड्याच्या अभ्यासासाठी घरातील कोणतंही स्थान निवडण्याची मोकळीक होती. यामुळं आम्हाला अगदी सुखावह वाटायचं.” लक्षात असू द्या, की योग्य प्रकाश, बैठकीची एक योग्य सोय आणि खेळीमेळीचा व सुव्यवस्थित परिसर ह्‍या गोष्टी एक शांत वातावरण तयार करण्यात हातभार लावतात. अभ्यासानंतर कुटुंबाकरता अल्पोपहाराचा बेत असला म्हणजे ती सायंकाळ आनंददायक बनविण्यातही मदत होईल.

वेळप्रसंगी, काही कुटुंबे आपल्या अभ्यासात इतर कुटुंबांनाही समाविष्ट करण्याचे निवडतात; यामुळे आस्थेला तसेच वैविध्यपूर्ण विवेचनांनाही खतपाणी मिळते. या व्यवस्थेत, सत्यातील नवोदितांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले जाते तेव्हा कौटुंबिक अभ्यास संचालित करणाऱ्‍या अनुभवी कुटुंब प्रमुखाचे निरीक्षण करून त्यांना फायदाच होईल.

बायबल सजीव करा

मुलांकरता अभ्यासाचे समय सजीव करा म्हणजे ती आतुरतेने त्यांची वाट पाहत राहतील. लहानग्यांना बायबल दृश्‍यांची चित्रे काढण्यास प्रोत्साहित करून तुम्ही हे करू शकता. उचित असल्यास मुलांना बायबल घटना व नाटके प्रत्यक्ष करावयास लावा. लहान मुलांच्या बाबतीत, प्रश्‍नोत्तरांच्या एका औपचारिक पद्धतीस जडून राहणे आवश्‍यक नसते. बायबल पात्रांच्या कथा वाचणे अथवा त्या कथित करणे, ईश्‍वरी तत्त्वे बिंबवण्याचा एक सुखकारक मार्ग होय. आधी उल्लेखिलेल्या रॉबर्टला आठवते: “कधीकधी आम्ही आळीपाळीनं बायबल वाचायचो; त्यातील ‘पात्राचा’ भाग नियुक्‍त केल्यानुसार आम्ही वाचत असू.” आपल्या वाचनात मुलांना हुबेहूब रेखाटण्यास आवडेल ते पात्र निवडण्यास त्यांना आमंत्रण दिले जाऊ शकते.

नकाशे व तक्‍ते यांचा उपयोग केल्याने, चर्चिल्या जात असलेल्या घटना जेथे घडल्या त्या प्रदेशातील क्षेत्रे व वैशिष्ट्ये डोळ्यांपुढे उभे करण्यास मोठ्या मुलांना मदत होईल. स्पष्टतः, थोडीशी कल्पना करून एक कौटुंबिक अभ्यास वैविध्यपूर्ण व सजीव होईल. आणि मग मुलेही देवाच्या वचनाची इच्छा धरतील.—१ पेत्र २:२, ३.

सहभागी होण्यास सर्वांना मदत करा

अभ्यासाचा आनंद लुटायचा असल्यास आपल्यालाही त्यात समाविष्ट केले आहे असे मुलांना वाटले पाहिजे. तथापि, वेगवेगळ्या वयोगटांतील मुलांना सहभाग घेण्यास लावणे एक आव्हानच ठरू शकते. परंतु, बायबल तत्त्व म्हणते: “अधिकाऱ्‍याने आपले काम आस्थेने करावे.” (रोमकर १२:८) उत्साह हा संसर्गजन्य असल्यामुळे उत्साही असणे मदतगार ठरते.

रॉनल्ड, आपली पाच वर्षांची मुलगी डायना हिला अभ्यासाच्या लेखातील उपशीर्षके वाचण्यास व चित्रांवर विवेचने मांडण्यास सांगून तिला अभ्यासात समाविष्ट करतो. मागील वर्षी ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी नजीक आला तसा त्याने सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्यc या पुस्तकातील समर्पक चित्रांवर तिचे लक्ष केंद्रित केले. तो अशी टिपणी करतो: “यामुळं घटनेचं महत्त्व समजण्यास तिला मदत मिळाली.”

आपली दहा वर्षांची मुलगी मीशा हिच्याबाबतीत रॉनल्ड आणखी एक पाऊल पुढे जातो. तो म्हणतो: “मीशानं इथपर प्रगती केली आहे की, ती चित्रं कशाची आहेत एवढंच तिला कळतं असं नाही तर ती कशाचं वर्णन करतात हे देखील तिला कळतं. म्हणूनच, प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!,* हे पुस्तक विचारात घेताना आम्ही त्या चित्रांच्या अर्थावर लक्ष केंद्रित केलं आणि यामुळं तिला निश्‍चितच मदत झालीय.”

मुले आपल्या कुमारवयात पदार्पण करतात तेव्हा चर्चिल्या जात असलेल्या साहित्याचा व्यावहारिक प्रयोग करण्यास त्यांना आमंत्रित करा. अभ्यासादरम्यान प्रश्‍न निर्माण होतात तेव्हा संशोधन करण्याचे भाग नेमून द्या. आपला १२ वर्षांचा मुलगा पॉल याने, शाळेतील नवीनच स्थापन झालेल्या व डन्जन्स ॲण्ड ड्रॅगन्स हा खेळ समाविष्ट असलेल्या क्लबविषयी विचारणा केली असता रॉबर्टने हेच पाऊल उचलले. पॉलने व कुटुंबांतील इतरांनी टेहळणी बुरूज प्रकाशनांची सूची (इंग्रजी) याचा उपयोग करून सदर विषयावरील माहिती शोधून काढली व आपल्या कौटुंबिक अभ्यासात त्यांनी याची उजळणी केली. रॉबर्ट म्हणतो: “याचा परिणाम असा झाला, की हा खेळ ख्रिश्‍चनांसाठी योग्य नाही हे समजण्यास पॉलला जास्त वेळ लागला नाही.”

रॉबर्टने इतर वेळीही संशोधन करण्यास एकेकाला नियुक्‍त केले. त्याची पत्नी नॅन्सी आठवणी ताज्या करून म्हणते: “आम्ही प्रेषितांविषयीच्या माहितीवर संशोधन केलं तेव्हा आम्हापैकी प्रत्येकाला दर आठवडी एका प्रेषितावरील माहितीचं संशोधन करण्यास नेमलं होतं. कौटुंबिक अभ्यासात मुलं आपला अहवाल उत्साहानं सादर करत असल्याचं पाहणं किती रोमहर्षक होतं!” मुलांनी स्वतःहून संशोधन करून कुटुंबासोबत त्या माहितीची सहभागिता केल्याने ‘यहोवासमोर वाढत जाण्यात’ त्यांना मदत मिळते.—१ शमुवेल २:२०, २१.

दृष्टिकोनात्मक तथा सूचक प्रश्‍न विचारणे हा मुलांना समाविष्ट करण्याचा एक उत्तम मार्ग होय. “तुला काय वाटतं?” अशासारखे दृष्टिकोनात्मक प्रश्‍न वाकबगार शिक्षक, येशू याने विचारले. (मत्तय १७:२५) मारिया आठवून सांगते: “आम्हापैकी कोणाला काही प्रश्‍न असल्यास आमचे आईबाबा केव्हाही त्याचं थेट उत्तर देऊन मोकळे होत नसत. ते नेहमी सूचक प्रश्‍न विचारून सदर बाबीवर तर्क करण्यास आम्हाला मदत करत असत.”

दळणवळण राखा—चिरडीस आणू नका!

उपस्थित असलेले सर्वजण थट्टा होण्याच्या भयाशिवाय आपापली मते व भावना मनमोकळेपणाने विदित करू शकतात तेव्हा कौटुंबिक अभ्यासाचा आनंद शतगुणित होतो. परंतु, एक पिता असे कबूल करतो: “दळणवळणाचा मार्ग इतर वेळीही खुला असला तरच कौटुंबिक अभ्यासादरम्यान उत्तमप्रकारचं दळणवळण राखणं शक्य होतं. केवळ अभ्यासाच्या वेळीच ते असल्याचा देखावा तुम्ही करू शकत नाही.” तलवार भोसकावी असे अविचाराचे भाष्य टाळा जसे की, ‘तितकंच? मला वाटलं काहीतरी महत्त्वाचं सांगतोयस की काय’; ‘काय मूर्खासारखं बोललास;’ ‘नाहीतरी तुला यापेक्षा आणखी काय येईल?’ ‘तू अजूनही एक कुकुलंबाळंच आहेस.’ (नीतिसूत्रे १२:१८) आपल्या मुलांशी ममतेने व दयेने वागा. (स्तोत्र १०३:१३; मलाखी ३:१७) त्यांच्यामध्ये हर्ष माना व शिकत असलेल्या गोष्टी ती लागू करतात तेव्हा त्यांच्या पाठीशी असा.

कौटुंबिक अभ्यासाचे वातावरण असे असण्यास हवे, की शिक्षणासंबंधी मुलांचे मन ग्रहणशील असेल. चार अपत्यांचा एक यशस्वी पिता स्पष्टीकरण देतो: “तुम्ही मुलांची कानउघडणी करू लागता तेव्हा मुलं काहीशी चिडखोर बनतात.” असे वातावरण असल्यास त्यांच्या मनांत माहितीचा शिरकावच होणार नाही. यास्तव, अभ्यासाच्या वेळांना शिस्त लावण्याच्या अथवा शासन लावण्याच्या सत्राचे स्वरूप येऊ देऊ नका. तसे करण्याची आवश्‍यकता असेलच तर ती इतर कोणत्यातरी वेळी व्यक्‍तिगतरित्या करावी.

ते श्रम वायफळ नाहीत

आध्यात्मिकरित्या समृद्ध असलेल्या कुटुंबाची उभारणी करण्यासाठी नक्कीच वेळेची व श्रमाची कास धरावी लागते. पण स्तोत्रकर्ता घोषित करतो: “पाहा, संतति ही परमेश्‍वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.” (स्तोत्र १२७:३) शिवाय, ‘मुलांना यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवण्याची’ जबाबदारी पालकांना देण्यात आली आहे. (इफिसकर ६:४) तर मग, एक परिणामकारक व आनंददायक कौटुंबिक अभ्यास संचालित करण्याची कुशलता विकसित करा. ‘वचनरूपी निरे दुध’ पुरवण्याच्या प्रयत्नांत काहीच कसर ठेवू नका; परिणामतः, तुमच्या मुलांची ‘तारणासाठी वृद्धि होईल.’—१ पेत्र २:२, ३; योहान १७:३.

[तळटीपा]

a या लेखात दिलेल्या बहुतेक सूचना कौटुंबिक अभ्यासात मुलांना मदत करण्यासंबंधीच्या असल्या तरी ज्या कौटुंबिक अभ्यासात मुले नाहीत तेथे देखील यातील विचार लागू होतात.

b काही नावे बदललेली आहेत.

c वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा