माझ्या तारुण्यापासून मी सबुराईनं यहोवाची आस धरली
रुडॉल्फ ग्रायकन यांच्याद्वारे कथित
मी अवघ्या १२ वर्षांचा होतो तेव्हा वीज कडाडल्याप्रमाणं अचानक शोकांतिकेचा एक जबरदस्त तडाखा माझ्या कुटुंबाला बसला. प्रथम, माझ्या बाबांना तुरुंगात डांबण्यात आलं. मग मला आणि माझ्या बहिणीला जबरीनं घराबाहेर काढून अनोळखी व्यक्तींकडं राहण्यास पाठवलं गेलं. त्यानंतर, गेस्टापोनं मला आणि माझ्या आईला अटक केली. मला तुरुंगात टाकण्यात आलं आणि एका छळ छावणीत माझ्या आईची जीवनज्योत मालवली.
एका पाठोपाठ एक ओढवणाऱ्या या घटनांना खरं तर, एक यहोवाचा साक्षीदार म्हणून तारुण्यापासूनच मी सोसलेल्या यातनामय छळाच्या लाटेची केवळ एक सुरवातच म्हणावी लागेल. कुविख्यात नात्सी गेस्टापो आणि मग पूर्व जर्मन श्टॉझी [गुप्त पोलिस] यांनी देवाप्रती असलेली माझी सचोटी भंग करण्याचा यत्न केला. आता त्याला समर्पित सेवा सादर केल्याची ५० वर्षे उलटल्यानंतर मी देखील स्तोत्रकर्त्याप्रमाणं म्हणू शकतो: “माझ्या तरुणपणापासून त्यांनी मला फार पीडिले आहे; तरी माझ्याविरुद्ध त्याचे काही चालले नाही.” (स्तोत्र १२९:२) मी यहोवाचा किती आभारी आहे म्हणून सांगू!
जून २, १९२५ साली लीप्झिग, जर्मनीजवळच्या लूकॉ या नगरात माझा जन्म झाला. माझा जन्म होण्याच्या खूप आधी माझे आईबाबा म्हणजे टेरेझा आणि ऑल्फ्रेट यांना, त्यावेळी बायबल विद्यार्थी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांतून बायबल सत्य हाती लागले. आमच्या घराच्या भिंतींवर लावलेली बायबल दृश्यांची चित्रे मी दररोज डोळे भरून पाहत असल्याचं मला अजूनही आठवतं. एका चित्रात लांडगा व कोकरा, करडू व चित्ता, वासरू व सिंह—ही सर्व शांतीत नांदतायत व एक लहान मूल त्यांना वळवतंय असं दृश्य रेखाटलं होतं. (यशया ११:६-९) अशी चित्रे माझ्या मनावर एक कायमस्वरूपी छाप पाडून गेली.
शक्य होते त्या सर्व प्रसंगी माझे आईबाबा मला मंडळीच्या कार्यहालचालींत समाविष्ट करुन घेत असत. उदाहरणार्थ, फेब्रुवारी १९३३ साली म्हणजे हिटलरनं सत्तेची सूत्रे हाती घेतली त्याच्या काही दिवसांनंतर लगेचच आमच्या छोट्याशा नगरात स्लाईड्स, चलचित्रे आणि ध्वनिमुद्रित वृत्तान्ताचा “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” दाखवण्यात आला. मी सात वर्षांचा चिमुकला होतो तेव्हा ‘फोटो ड्रामाची’ जाहिरातबाजी करणाऱ्या मोहिमेचा एक हिस्सा म्हणून एका ट्रकच्या मागे उभा राहून सबंध नगरातून मिरवणं हा माझ्याकरता किती रोमहर्षक अनुभव होता! या आणि इतर प्रसंगी, मी एक लहानगा असतानाही मी मंडळीचा एक उपयुक्त सदस्य असल्याचं बांधवांनी मला भासवून दिलं. अशाप्रकारे, अगदी कोवळ्या वयापासूनच यहोवाकडून मी शिक्षण घेतलं व त्याच्या वचनानं प्रभावित झालो.
यहोवावर भरवसा ठेवण्यास प्रशिक्षित
कडक ख्रिस्ती तटस्थतेमुळं यहोवाचे साक्षीदार नात्सी राजकारणाच्या वादळात गुरफटले नाहीत. याचे पर्यवसान १९३३ साली नात्सी लोकांनी, प्रचार करणे, सभा भरवणे आणि आमचे स्वतःचे बायबल साहित्य वाचणे यांवर बंदी घालणारे कायदे काढले. सप्टेंबर १९३७ या वर्षी, माझ्या बाबांसह आमच्या मंडळीतील सर्व बांधवांना गेस्टापोनं अटक केली. यामुळं मी अतिशय दुःखी झालो. माझ्या बाबांना पाच वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
घरातील परिस्थिती आमच्यासाठी अतिशय बिकट झाली. पण, लवकरच आम्ही यहोवावर भाव ठेवण्याचं शिकलो. एके दिवशी मी शाळेतून घरी आलो तेव्हा आई टेहळणी बुरूज नियतकालिक वाचत होती. तिला माझ्यासाठी पटकन साधं जेवण तयार करायचं होतं त्यामुळे तिनं ते नियतकालिक एका लहानशा कपाटावर ठेवून दिलं. दुपारचं जेवण आटोपल्यानंतर, आम्ही भांडी स्वच्छ करून मांडत असता कोणीतरी अगदी जोरानं दार ठोठावलं. तो एक पोलिस असून बायबल साहित्य शोधण्यासाठी त्याला आमच्या घराची झडती घ्यायची होती. तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
त्या दिवशी नेहमीपेक्षा काही जास्तंच उकडत होतं. त्यामुळं पोलिसानं आल्या आल्या आपलं हेल्मेट काढून टेबलावर ठेवलं. मग तो झडती घेऊ लागला. तो टेबलाखाली पाहत होता तोच त्याचं हेल्मेट निसटू लागलं. यास्तव, आईनं पटकन ते हेल्मेट घेऊन बरोबर कपाटावर ठेवलेल्या त्या टेहळणी बुरूज नियतकालिकावरच ठेवून दिलं! पोलिसानं घराचा कानाकोपरा पालथा घातला पण कोणतंही साहित्य त्याच्या हाती लागलं नाही. अर्थात, हेल्मेटखाली पाहण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता. निरोप घेण्याआधी, हेल्मेट घेण्याकरता हात लांब करत असताना त्यानं पुटपुटत आईला दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा कुठं माझा जीव भांड्यात पडला!
अशा प्रकारच्या अनुभवांनीच मला अधिक खडतर परीक्षांकरता सुसज्जित केलं. उदाहरणार्थ, मी शाळेत असताना, मुलांना लष्करी शिस्तीत प्रशिक्षित करणाऱ्या व त्यांच्या मनावर नात्सी तत्त्वज्ञान बिंबवणाऱ्या हिटलर युथ संघात सामील होण्याचा दबाव माझ्यावर आला. १०० टक्के विद्यार्थ्यांना यात सहभागी करण्याचं काही शिक्षकांचं व्यक्तिगत ध्येय होतं. माझे शिक्षक, श्री. श्नाईडर यांना वाटलं असावं जणू आपण संपूर्णतः अपयशी झालोत; याचं कारण इतर शिक्षकांच्या विषमतेत १०० टक्के सहभागिता मिळविण्यासाठी त्यांना केवळ एका विद्यार्थ्याची कमी होती. आणि तो विद्यार्थी नेमका मीच होतो.
मग एके दिवशी श्री. श्नाईडर यांनी संपूर्ण वर्गाला असं सांगितलं: “मुलांनो, उद्या आपला वर्ग सहलीला जाणार आहे.” सगळ्यांनाच ही कल्पना रुचली. मग त्यांनी पुढे म्हटलं: “तुम्ही सर्वांनी आपापला हिटलर युथ गणवेष परिधान करावं जेणेकरून आपण रस्त्यावरनं कवाईत करत जाऊ तेव्हा सगळ्यांनाच हे समजेल की तुम्ही गुणी हिटलर मुलं आहात.” दुसऱ्या दिवशी सकाळी मला एकट्याला सोडून इतर सर्व मुलं आपापला गणवेष परिधान करून हजर होती. शिक्षकानं मला वर्गासमोर बोलावून विचारलं: “वर्गातील इतर मुलांवर एक नजर टाक आणि मग स्वतःकडं पाहा.” तो आणखी म्हणाला: “मला ठाऊक आहे, की तुझे आईबाबा अतिशय गरीब आहेत आणि तुझ्यासाठी एक गणवेष खरेदी करणं त्यांच्या खिशाला काही परवडणार नाही, पण मला तुला काहीतरी दाखवायचं.” त्यांनी मला त्यांच्या डेस्कजवळ नेऊन ड्रॉअर उघडला आणि म्हटलं: “हा नवाकोरा गणवेष तुला देण्याची माझी इच्छा आहे. किती छान आहे ना?”
तो नात्सी गणवेष परिधान करण्यापेक्षा मी मृत्यूला मिठी मारली असती. गणवेष घालण्याचा माझा काही विचार दिसत नसल्याचं शिक्षकांच्या लक्षात आलं, तशी त्यांच्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि वर्गानंही मला पाण्यातच पाहिलं. मग शिक्षकांनी आम्हाला सहलीला नेलं. परंतु, गणवेष परिधान केलेल्या इतर मुलांच्या मधोमध चालायला लावून मला नजरेआड ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तथापि, माझ्या वर्गसोबत्यांत मी उठून दिसत असल्यामुळं नगरातील अनेक लोकांच्या नजरेतून मी निसटू शकलो नाही. मी आणि माझे आईवडील यहोवाचे साक्षीदार असल्याचं इथूनतिथून जवळजवळ सगळ्यांनाच ठाऊक होतं. मी तरुण असताना हवं असणारं आध्यात्मिक बळ मला दिल्याबद्दल मी यहोवाचा आभारी आहे.
छळ आणखी पेट घेतो
सन १९३८ च्या सुरवातीस मला आणि माझ्या बहिणीला शाळेतून पळवून ८० किलोमीटर दूर असलेल्या श्टॉट्रोडामधील एका सुधारशाळेत पोलिसाच्या मोटारीनं पाठवण्यात आलं. का बरं? आमच्या आईवडिलांच्या प्रभावापासून आमची ताटातूट करून आम्हाला नात्सी मुलं बनण्याची खुणगाठ न्यायालयांनी बांधली होती. आम्ही दोघं बहीणभावंडं आपल्या ख्रिस्ती सचोटीसंबंधी खंबीर असलो तरी आम्ही आदरशील तसेच आज्ञांकित आहोत हे पाहण्यास मात्र तिथल्या कर्मचारीवर्गाला फारसा वेळ लागला नाही. तिथली व्यवस्थापिका तर इतकी प्रभावित झाली, की ती व्यक्तिगतरित्या माझ्या आईला भेटू इच्छित होती. तशी सूट देण्यात आली आणि आईला आम्हाला भेटण्याची मुभा दिली गेली. एक संपूर्ण दिवस एकमेकांना उत्तेजन देण्याची सुवर्णसंधी यहोवानं दिल्याबद्दल माझी बहीण, आई आणि मी स्वतः देखील खूप आनंदी आणि त्याचे अत्यंत आभारी होतो. खरं तर, उत्तेजनाची आम्हाला खूप खूप गरज होती.
सुमारे चार महिने आम्ही या सुधारशाळेत राहिलो. मग, आम्हाला पॉनॉ येथील एका कुटुंबासोबत राहण्यास पाठवण्यात आलं. आम्हाला आमच्या भाऊबंधांपासून अलिप्त ठेवण्याची ताकीद त्यांना देण्यात आली होती. माझ्या आईला तर आम्हाला भेटण्याचीही मुभा नव्हती. तरी देखील एखाददोन प्रसंगी आमच्याशी संपर्क साधण्याचा तिनं मार्ग काढला होता. अशा दुर्मिळ क्षणी, यहोवा अनुमती देत असलेल्या कोणत्याही संकटप्रसंगात यहोवाशी विश्वासू राहण्याच्या आमच्या निर्धारास खतपाणी घालण्यासाठी ती जिवाच्या आकांतानं यत्न करत असे.—१ करिंथकर १०:१३.
अपेक्षिल्याप्रमाणे परीक्षा आल्या. डिसेंबर १५, १९४२ साली मी अवघ्या १७ वर्षांचा होतो तेव्हा गेस्टापोनं मला ताब्यात घेतलं आणि गेरामधील स्थानबद्धांच्या केंद्रात डांबलं. जवळजवळ एका आठवड्यानंतरच माझ्या आईला देखील अटक करण्यात आलं आणि तीही तुरुंगात येऊन मला सामील झाली. मी अद्यापही लहान असल्यामुळं न्यायालय माझी न्यायचौकशी करू शकत नव्हते. मी १८ वर्षांचा होण्याची न्यायालये प्रतीक्षा करत असताना मी आणि आईनं स्थानबद्धांच्या केंद्रात सहा महिने एकत्र घालवली. ज्या दिवशी मी अठराव्या वर्षात पदार्पण केलं त्याच दिवशी मला आणि आईला न्यायचौकशीसाठी आणलं गेलं.
काय होतंय याचा सुगावा लागण्याआधी सगळं काही संपलंही होतं. मी आईला पुन्हा केव्हाही पाहणार नाही अशी टिचभरही कल्पना मला शिवून गेली नव्हती. न्यायालयात एका काळसर लाकडी बाकावर अगदी माझ्या शेजारी तिला बसलेली पाहणं हीच तिच्याबद्दल असणारी माझी अखेरची आठवण. आम्हा दोघांनाही दोषी घोषित करण्यात आलं होतं. मला चार वर्षांची तर आईला दीड वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
त्या काळी हजारो यहोवाच्या साक्षीदारांना तुरुंगांत व छावण्यांत डांबण्यात आलं होतं. तथापि, मला स्टॉल्बर्ग येथील तुरुंगात धाडण्यात आलं जिथं मी केवळ एकटाच साक्षीदार होतो. एका वर्षाहून अधिक काळ मी अंधारकोठडीत खितपत पडलो पण, यहोवानं मात्र मला वाऱ्यावर सोडलं नाही. माझ्या तारुण्याच्या दिवसात मी त्याच्यासाठी विकसित केलेलं प्रेमच मला आध्यात्मिकरित्या तग धरून राहण्यास कारणीभूत होतं.
मे ९, १९४५ साली म्हणजे अडीच वर्षे तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर आमच्या कानी आनंदाची बातमी आली—युद्ध संपलं होतं! त्याच दिवशी मला मुक्त करण्यात आलं. ११० किलोमीटरची मजल चालून जाऊन, भयंकर शिणवटा व उपासमारी यांमुळं सपशेल रोगी होऊनच मी घरी परतलो. माझी तब्येत पूर्ववत करण्यासाठी कित्येक महिने लागले.
घरी आल्या आल्या अत्यंत निराशाजनक बातम्यांचा तडाखा मला बसला. प्रथम माझ्या आईबद्दल. दीड वर्षे तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर नात्सींनी तिला यहोवासंबंधी असणाऱ्या तिच्या विश्वासाचा त्याग करण्यासाठी एका दस्तऐवजावर हस्ताक्षर करण्यास सांगितलं. तिनं नकार दर्शविला. म्हणून, गेस्टापोनं तिला रेवन्सब्रुकमधील महिलांच्या छळछावणीत धाडलं. तिथं, युद्ध संपायच्या आधीच आंतरज्वरामुळं तिची जीवनयात्रा संपली. ती एक अत्यंत धैर्यवान ख्रिस्ती—एक खंबीर लढवय्यी होती जी कदापि हतबल झाली नाही. यहोवा प्रेमळपणे तिचं स्मरण करो.
माझा थोरला भाऊ, वर्नर ज्याने कधीच यहोवाला स्वतःचं समर्पण केलं नव्हतं त्याचीही बातमी माझ्या कानी आली. तो जर्मन सैन्यात सामील झाला होता व शेवटी रशियात त्याची हत्या झाली. आणि माझ्या बाबांचं काय झालं? ते घरी आले खरं, पण दुःखाची बाब अशी, की दस्तऐवजावर हस्ताक्षर करून आपल्या विश्वासाचा त्याग करणाऱ्या त्या मूठभर साक्षीदारांपैकी तेही एक होते. मी त्यांना भेटलो तेव्हा ते अत्यंत हताश व मानसिक तोल गमावल्यासारखे वाटले.—२ पेत्र २:२०.
जोशपूर्ण आध्यात्मिक कार्याचा अल्पावधी
मार्च १०, १९४६ रोजी लीप्झिगमध्ये भरवण्यात आलेल्या युद्धोत्तर काळातल्या माझ्या पहिल्याच संमेलनास मी उपस्थित राहिलो. त्याच दिवशी बाप्तिस्मा होणार असल्याची घोषणा केली गेली तेव्हा ते किती शिरशिरी भरणारं होतं! कित्येक वर्षांपूर्वी मी यहोवाला माझं जीवन समर्पित केलं होतं तरी माझ्यासाठी, बाप्तिस्मा घेण्याची ही पहिली संधी चालून आली होती. तो दिवस मी कधीच विसरणार नाही.
मार्च १, १९४७ साली महिनाभर पायनियरींग केल्यानंतर मॅडबर्ग येथील बेथेलमध्ये मला बोलावण्यात आलं. बाँबवर्षावामुळं संस्थेच्या दफ्तरांची बरीच पडझड झाली होती. त्यांची डागडुजी करण्याच्या कामात हातभार लावण्याचा काय हा विशेषाधिकार! त्या उन्हाळ्यानंतर खास पायनियर म्हणून विटेन्बर्ग शहरात मला नियुक्त करण्यात आलं. देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यात काही महिने तर मी चक्क २०० हून अधिक तास घालवले. पुन्हा एकदा बंधनमुक्त झाल्याबद्दल—युद्ध नाही, छळ नाही, तुरुंगं नाहीत याबद्दल मी किती खुश होतो!
दुःखाची गोष्ट अशी की ही बंधनमुक्ती अधिक काळ टिकली नाही. युद्धानंतर जर्मनीची फाळणी झाली आणि मी राहत असलेलं क्षेत्र कम्युनिस्ट लोकांच्या नियंत्रणाखाली आलं. सप्टेंबर १९५० मध्ये श्टॉझी म्हणून ओळखले जाणारे पूर्व जर्मन गुप्त पोलिस आटोपशीरपणे बांधवांना अटक करत होते. माझ्यावर लावलेले दोषारोप हास्यास्पद होते. मी अमेरिकन सरकारचा खबऱ्या असल्याचा आरोप माझ्यावर लावण्यात आला. ब्रॅन्डनबर्ग इथं असलेल्या देशातल्या सर्वात जुलमी श्टॉझी तुरुंगात मला पाठवण्यात आलं.
माझ्या आध्यात्मिक बांधवांकडून आधार
तिथं श्टॉझी दिवसा मला अंथरुणाला पाठ लावू देत नसत. मग, रात्रभर ते माझी उलटतपासणी करत असत. काही दिवस या यातनेचा शिकार बनल्यानंतर परिस्थिती आणखीन बिकट झाली. एके दिवशी सकाळी मला माझ्या कोठडीत नेण्याऐवजी त्यांनी मला त्यांच्या कुविख्यात यु-बोट सेलेन (तळघरात अतिशय खोलवर पाणबुडीसारख्या असलेल्या कोठड्यांना असं संबोधलं जात असे) इथं आणलं. त्यांनी एक जुनाट, गंजलेला पोलादी दरवाजा उघडून आत पाऊल टाकण्यास मला सांगितलं. एक अतिशय उंच असा उंबरठा मला ओलांडायचा होता. माझं पाऊल खाली टेकल्या टेकल्या जमीन संपूर्णतः पाण्यानं भरली असल्याचं मला जाणवलं. एक भयंकर कर्कश आवाज होऊन दरवाजा धाडकन बंद झाला. तिथं दिवे तर नव्हतेच पण साधी खिडकीही नव्हती. सर्वत्र निबीड काळोख होता.
जमिनीवर कित्येक इंच पाणी असल्यामुळं, बसणं उठणं व निजणंही महाकठीण होऊन बसलं होतं. आता काळ जणू थांबला आहे असं भासत असतानाच, अतिशय लख्ख प्रकाशात उलटतपासणीसाठी मला नेण्यात आलं. दिवसभर पाण्यात उभं राहणं आणि तेही जवळजवळ संपूर्ण काळोखात, अथवा रात्रभर थेट माझ्यावर सोडलेला तेजस्वी यातनामय प्रकाश सहन करणं या दोहोंपैकी कोणतं सर्वात खडतर होतं ते मी सांगू शकत नाही.
अनेक प्रसंगी त्यांनी माझ्यावर गोळ्या झाडण्याच्या धमक्या दिल्या. माझी उलटतपासणी करण्यात काही रात्री उलटल्यानंतर एके दिवशी सकाळी एका उच्च रशियन लष्करी अधिकाऱ्यानं मला भेट दिली. नात्सी गेस्टापोनं मला दिलेल्या वागणुकीपेक्षा कठोर अशी वागणूक जर्मन श्टॉझी मला देत आहेत हे त्याला सांगण्याची एक संधी मला मिळाली. यहोवाचे साक्षीदार, नात्सी सरकार तसेच कम्युनिस्ट सरकार यांच्या अधीन तटस्थ असल्याचं, शिवाय जगाच्या पाठीवर कोणत्याही राजकारणात आम्ही उचापती केली नव्हती हे देखील मी त्याला सांगितलं. याच्या विषमतेत, सध्या श्टॉझी अधिकारी असलेले अनेकजण एकेकाळी हिटलर युथ संघाचे सदस्य होते; आणि निरपराधी लोकांचा पाशवीरित्या छळ कसा करावा याचे धडे त्यांनी बहुधा तिथून घेतले असावेत असंही मी म्हणालो. मी बोलत असताना थंडी, उपासमार आणि ग्लानी यांमुळं माझं शरीर थरथर कापत होतं.
आश्चर्य म्हणजे तो रशियन अधिकारी माझ्यावर मुळीच रागावला नाही. उलटपक्षी, त्यानं माझ्या अंगावर एक ब्लँकेट टाकलं आणि माझ्याशी अतिशय प्रेमळपणे वागला. त्याच्या भेटीनंतर लगेचच मला अधिक चांगल्या अशा कोठडीत हलवण्यात आलं. काही दिवसांनंतर, मला जर्मन न्यायालयांच्या हवाली करण्यात आलं. माझ्यावरील खटला अद्याप प्रलंबित असल्यामुळं, ज्यात इतर पाच साक्षीदार होते त्या कोठडीत राहण्याच्या विशेषाधिकाराचा मी मनसोक्त आनंद घेतला. अत्यंत क्रूर वागणूक सोसल्यानंतर माझ्या आध्यात्मिक बांधवांच्या सहवासात मला किती तजेला मिळाला होता!—स्तोत्र १३३:१.
माझ्यावर हेरगिरी करण्याचा दोषारोप लावून न्यायालयात मला दोषी घोषित केलं गेलं व चार वर्षे सुधारगृहात राहण्याचा शिक्षादेश देण्यात आला. ही शिक्षा तशी सौम्य समजली जात होती. काही बांधवांना तर दहापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मला अधिक कडक सुरक्षा सुधारगृहात पाठवण्यात आलं. ती सुरक्षा इतकी कडक होती की मला असं वाटतं, एखादा उंदीरही तुरुंगातून आतबाहेर करू शकत नव्हता. तरी यहोवाच्या मदतीनं काही बांधव नजर चुकवून एक संपूर्ण बायबल आत आणू शकले. त्याची पानं विलग करून व एकेक पुस्तकांत त्याची विभागणी करून तुरुंगातील बांधवांमध्ये ते फिरवलं गेलं.
आम्ही हे कसं केलं बरं? ते खरोखरच कठीण होतं. दर दोन आठवड्यांनंतर आम्हाला अंघोळीसाठी नेलं जात असे तेव्हाच काय आम्ही एकमेकांना भेटत असू. एके प्रसंगी मी अंघोळ करत असताना एक बांधव माझ्या कानात कुजबुजला, की बायबलची काही पानं त्यानं त्याच्या टॉवेलमध्ये लपवली आहेत. माझी अंघोळ आटोपल्यानंतर माझा टॉवेल घेण्याऐवजी मला त्याचा टॉवेल घ्यायचा होता.
तो बांधव माझ्या कानात कुजबुजत असताना एका रक्षकानं पाहिलं व एका लाकडी सोडग्यानं त्याला बेदम मारलं. मला पटकन तो टॉवेल घेऊन इतर कैद्यांमध्ये मिसळायचं होतं. मी आभारी होतो, की बायबलच्या पानांसकट मी काही पकडलो गेलो नाही. नाहीतर, आमच्या आध्यात्मिक भरवणुकीच्या कार्यक्रमास धोका पोहंचला असता. अशा अनेक अनुभवांमधून आम्ही वाटचाल केली. आमचं बायबल वाचन नेहमी गुप्तपणे व मोठ्या जोखिमेत केलं जात असे. “सावध असा, जागे राहा,” हे प्रेषित पेत्राचे शब्द खरंच खूप यथोचित होते.—१ पेत्र ५:८.
काही कारणामुळं, आम्हापैकी काहींना सातत्यानं एका सुधारगृहातून दुसऱ्या सुधारगृहात पाठवण्याचं अधिकाऱ्यांनी ठरवलं. चार वर्षांच्या कालावधीत मला जवळजवळ दहा वेगवेगळ्या सुधारगृहांत पाठवण्यात आलं. तरी, बांधवांशी माझी नेहमीच गाठ पडायची. अगदी मनापासून मी या बांधवांवर प्रेम करू लागलो आणि प्रत्येक वेळा मला हलवण्यात यायचं तेव्हा त्यांचा निरोप घेताना माझं काळीज पिळवटून निघायचं.
शेवटी, मला लीप्झिग इथं पाठवण्यात आलं व तिथं मला तुरुंगातून मुक्त केलं गेलं. ज्या तुरुंग रक्षकानं मला मुक्त केलं त्यानं मला शेवटचा निरोप तर दिला नाहीच उलट “पुन्हा भेटू या” असं म्हटलं. मी पुन्हा गजाआड व्हावं असं त्या दुष्ट माणसाला वाटत होतं. मी नेहमीच स्तोत्र १२४:२, ३ याचा विचार करतो जिथं म्हटलं आहे: “लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमचा पक्षाचा नसता, तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकिले असते.”
यहोवा आपल्या निष्ठावंत सेवकांचा उद्धार करतो
आता पुन्हा मी एक मुक्त मनुष्य होतो. माझी जुळी बहीण रुथ आणि हरटा श्लेन्झोग ही आध्यात्मिक बहीण या दोघी गेटपाशी माझी वाट पाहत होत्या. तुरुंगात घालवलेल्या त्या सबंध काळादरम्यान हरटानं, प्रत्येक महिना एका लहानशा पाकिटात मला भोजन पाठवलं होतं. ह्या लहान पाकिटांशिवाय तुरुंगातच माझा शेवट झाला असता हे मी निश्चितपणे जाणतो. यहोवा प्रेमळपणे तिचं स्मरण करो.
माझी सुटका झाल्यापासून यहोवानं अनेक विशेषाधिकारांनिशी मला आशीर्वादित केलं आहे. पुन्हा एकदा मी ग्रोनाऊ, जर्मनी इथं एक खास पायनियर म्हणून, तर जर्मन आल्प्स इथं एक विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा केली. नंतर मिशनऱ्यांसाठी असलेली वॉचटावर बायबल गिलियड प्रशाला याच्या ३१ व्या वर्गात नाव नोंदवण्याचं आमंत्रण मला मिळालं. १९५८ साली झालेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनादरम्यान यांकी स्टेडियम इथं आमचा पदवीदान समारंभ पार पडला. बंधुभगिनींच्या त्या मोठ्या समूहासमोर बोलण्याचा व माझे काही अनुभव कथित करण्याचा विशेषाधिकार मला मिळाला.
पदवीधर झाल्यानंतर मिशनरी म्हणून सेवा करण्यासाठी मी चिली या ठिकाणी प्रयाण केलं. तिथं चिलीच्या अगदी दक्षिणीय भागात पुन्हा एकदा एक विभागीय पर्यवेक्षक म्हणून मी सेवा केली; मला खरोखरच पृथ्वीच्या दिगंतांपर्यंत पाठवण्यात आलं होतं. १९६२ साली, सॅन ॲनटोनियो, टेक्सास, अमेरिका इथल्या पॅटसी बॉईटनॉगल या सुंदर मिशनरीशी मी विवाह केला. यहोवाची सेवा करण्यात तिच्याबरोबर घालवलेल्या त्या अनेक विस्मयकारक वर्षांचा मी खूप खूप आनंद घेतला.
माझ्या ७० पेक्षा अधिक वर्षांच्या आयुष्यात मी अनेक सुखाचे क्षण व अनेक हालअपेष्टा अनुभवल्या. स्तोत्रकर्त्यानं म्हटलं: “नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो.” (स्तोत्र ३४:१९) १९६३ मध्ये, आम्ही अजूनही चिलीमध्ये राहत असताना आमच्या लहान मुलीचा शोकांतिक मृत्यू आम्ही अनुभवला. नंतर, पॅटसी खूपच आजारी पडली आणि आम्ही टेक्सासला स्थलांतर केलं. वयाच्या केवळ ४३ व्या वर्षी अत्यंत शोकांतिक परिस्थितींत तिचीही जीवनज्योत मालवली. यहोवानं प्रेमळपणे माझ्या सुंदर पत्नीचं स्मरण करावं यासाठी मी नित्य त्याच्याकडं प्रार्थना करतो.
आज, अतिशय आजारी व वयोवृद्ध असतानाही, ब्रॅडी, टेक्सास या ठिकाणी एक नियमित पायनियर आणि एक वडील म्हणून सेवा करण्याच्या विशेष हक्काचा आनंद मी घेत आहे. हे खरं, की जीवन नेहमी सुरळीत नव्हतं आणि मला अद्याप तोंड द्यावयाचं आहे असे इतर परीक्षाप्रसंगही पुढे येतीलच. तथापि, स्तोत्रकर्त्याप्रमाणं मी म्हणू शकतो: “हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस; आणि मी आजपर्यंत तुझी अद्भुत कृत्ये वर्णिली आहेत.”—स्तोत्र ७१:१७.
[२३ पानांवरील चित्र]
(१) सध्या एक वडील आणि नियमित पायनियर म्हणून सेवा करत आहे, (२) आमच्या विवाहाच्या काही समयापुर्वीच पॅटसीसोबत, (३) श्री. श्नाईडर यांच्या वर्गात, (४) माझी आई, टेरेझा जी रेवन्सब्रुक इथं मरण पावली