एपफ्रास “ख्रिस्ताचा विश्वासू सेवक”
करिंथ इफिस आणि फिलिप्पैमधील ख्रिस्ती मंडळ्यांचा पाया कोणी घातला? कदाचित तुम्ही अगदी ठामपणे उत्तर द्याल: ‘पौल, “परराष्ट्रीयांचा प्रेषित.”’ (रोमकर ११:१३) तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे.
कलस्सै, हेरापली आणि लावदिकीयामध्ये मंडळ्यांची स्थापना कोणी केली? आपल्याला आपल्या उत्तराची खात्री नसली तरी, ती व्यक्ती एपफ्रास असावी. तर मग, “ख्रिस्ताचा विश्वासू सेवक” असा त्याचा उल्लेख करण्यात आलेला असल्यामुळे या सुवार्तिकाविषयी अधिक जाणून घ्यायला तुम्हाला निश्चितच आवडेल.—कलस्सैकर १:७.
लूकस व्हॅलीचा सुवार्तिक
एपफ्रास हे नाव एपफ्रदीतचे संक्षिप्त रूप आहे. परंतु फिलिप्पैचा एपफ्रदीत आणि हा एपफ्रास या दोघांमध्ये संभ्रमित होऊ नका. एपफ्रास हा कलस्सैचा रहिवासी होता जे शहर आशिया मायनरमधील लूकस रिव्हर व्हॅलीत वसलेले होते आणि ते ख्रिस्ती मंडळींच्या तीन केंद्रांपैकी एक होते. कलस्सै हे शहर प्राचीन परुगिया प्रांतातील लावदिकीया शहरापासून १८ किलोमीटरवर आणि हेरापलीपासून १९ किलोमीटरवर वसलेले होते.
देवाच्या राज्याची सुवार्ता परुगियामध्ये कशा प्रकारे पोहंचली याविषयी बायबल स्पष्टपणे सांगत नाही. तथापि, सा.यु. ३३ मधील पेन्टेकॉस्ट या दिवशी जेरुसलेममध्ये परुगियाचे रहिवासी उपस्थित होते आणि कदाचित त्यांच्यातील काही जण कलस्सैचे रहिवासी राहिले असतील. (प्रेषितांची कृत्ये २:१, ५, १०) पौलाच्या इफिसमधील सेवाकार्याच्या दरम्यान (सुमारे सा. यु. ५२-५५) त्या क्षेत्रात देण्यात आलेली साक्ष इतकी जोमदार आणि प्रभावी होती, की केवळ इफिसकरांनीच नव्हे तर “आशियात राहणाऱ्या सर्व यहूदी व हेल्लेणी लोकांनी प्रभूचे वचन ऐकले.” (प्रेषितांची कृत्ये १९:१०) पौलाने संपूर्ण लूकस व्हॅलीमध्ये सुवार्तेचा प्रचार केला नव्हता असे दिसते कारण त्या क्षेत्रातील ख्रिस्ती झालेल्यांपैकी अनेक जणांनी त्याला कधीही पाहिले नव्हते.—कलस्सैकर २:१.
पौलाच्या अनुसार कलस्सैकरांना ‘देवाच्या कृपेविषयी खरेपणाने’ शिकवणारा एपफ्रास होता. वास्तविकता ही आहे, की पौल या सहकामगाराला आमच्या “वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक” असे संबोधतो यावरून हे कळते, की एपफ्रास त्या क्षेत्रात सक्रिय सुवार्तिक होता.—कलस्सैकर १:६, ७.
प्रेषित पौल आणि सुवार्तिक एपफ्रास या दोघांनाही लूकस व्हॅलीतील त्यांच्या सहविश्वासूजणांच्या आध्यात्मिक कल्याणाची फार मोठी चिंता लागून होती. “परराष्ट्रीयांचा प्रेषित” या नात्याने पौलाला त्यांच्या प्रगतीचे वर्तमान ऐकून नक्कीच आनंद झाला असावा. कलस्सैच्या आध्यात्मिक स्थितीविषयी पौलाला ज्याच्याकडून ऐकायला मिळाले तो दुसरा तिसरा कोणी नसून एपफ्रासच होता.—कलस्सैकर १:४, ८.
एपफ्रासचा अहवाल
कलस्सैकरांची समस्या इतकी गंभीर होती की एपफ्रासने त्या गोष्टींची चर्चा पौलाबरोबर करावी म्हणून त्याला रोमच्या लांबच्या प्रवासाला पाठविणे त्यांना भाग पडले. एपफ्रासने सादर केलेल्या विस्तृत अहवालामुळेच अज्ञात असलेल्या बांधवांना दोन पत्रे लिहिण्यासाठी पौल प्रेरित झाला. त्याने एक पत्र कलस्सैकरांना लिहिले. तर दुसरे पत्र लावदिकीयाच्या रहिवाश्यांना लिहिण्यात आले होते जे नामशेष झालेले आहे. (कलस्सैकर ४:१६) एपफ्रासच्या मते ख्रिश्चनांच्या गरजांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने ही पत्रे लिहिण्यात आली होती, असा विचार करणे समंजसपणाचे आहे. कोणत्या गोष्टींची आवश्यकता असल्याचे त्याने पाहिले? यावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी काय प्रकट होते?
वैराग्य अंगीकारणे, भूतविद्या आणि मूर्तिपूजक अंधश्रद्धा यांसारख्या मूर्तिपूजक तत्त्वज्ञानाचा कलस्सैमधील ख्रिश्चनांना धोका असल्यामुळे एपफ्रासला त्यांची चिंता लागून राहिली होती, हे कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्रावरून असे दिसते. याशिवाय अन्न वर्ज्य करण्याची यहुदी शिकवण आणि विशिष्ट दिवस पाळण्याची प्रथा या गोष्टींचा देखील मंडळीतील काही सदस्यांवर प्रभाव पडला असावा.—कलस्सैकर २:४, ८, १६, २०-२३.
ज्याअर्थी पौल या विषयांविषयी लिहितो, हीच वास्तविकता आपल्याला हे दाखवून देते, की सहख्रिश्चनांच्या गरजांविषयी एपफ्रास किती दक्ष आणि संवेदक होता. ते ज्या धोकेदायक परिस्थितीत जगत होते त्याचे भान ठेवून त्याने त्यांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी प्रेमळ काळजी व्यक्त केली. एपफ्रासने पौलाकडे सल्ला मागितला आणि यावरून तो नम्र असल्याचे दिसून येते. अधिक अनुभवी व्यक्तीकडून सल्ला प्राप्त करण्याची गरज कदाचित त्याला वाटली असावी. काहीही असले तरी एपफ्रास मात्र सुज्ञपणे वागला.—नीतिसूत्रे १५:२२.
त्याने प्रार्थनेला मौल्यवान मानले
पौलाने कलस्सैकरांना लिहिलेल्या पत्राच्या समाप्तीला असे म्हटले: “खिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण व दृढनिश्चयी असे स्थिर राहावे. तुम्हासाठी व जे लावदिकीयात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे, त्याच्याविषयी मी साक्षी आहे.”—कलस्सैकर ४:१२, १३.
होय, रोममध्ये पौलासोबत “सहबंदिवान” असतानाही कलस्सै, हेरापली आणि लावदिकीयामधील आपल्या प्रिय बांधवांचा एपफ्रास विचार करत होता आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. (फिलमोन २३) प्रार्थनेमध्ये त्याने त्यांच्यासाठी अक्षरशः ‘संघर्ष केला.’ विद्वान डी. एडमंड हायबर्ट यांच्यानुसार या ठिकाणी वापरण्यात आलेली ग्रीक संज्ञा “तणावपूर्ण आणि किंमत मोजावी लागणाऱ्या कार्याला” सूचित होते; जसे गेथशेमाने बागेत येशू ख्रिस्ताने मानसिकरीत्या “विव्हळ” होऊन प्रार्थना केली होती जवळजवळ तशाच प्रकारच्या स्थितीलाही ही संज्ञा सूचित होते. (लूक २२:४४) आपल्या आध्यात्मिक भाऊबहिणींनी स्थैर्य आणि पूर्ण ख्रिस्ती प्रौढता प्राप्त करावी असे एपफ्रासला मनःपूर्वक वाटत होते. अशा प्रकारचा आध्यात्मिक मनोवृत्तीचा मनुष्य लाभणे मंडळ्यांसाठी किती आशीर्वादाचे होईल!
“सोबतीचा प्रिय दास” असा एपफ्रासचा उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे त्याने आपल्या सहख्रिश्चनांसाठी कष्ट उपसले होते यात कोणतीही शंका नाही. (कलस्सैकर १:७) ज्या ज्यावेळी शक्य आहे त्या त्यावेळी मंडळीच्या सर्व सदस्यांनी आपल्या परीने स्नेहभाव आणि प्रेम प्रदर्शित केले पाहिजे. उदाहरणार्थ, आजारी, वृद्ध किंवा मदतीचा हात हवा असणाऱ्यांना साह्य करण्यासाठी लक्ष दिले जाऊ शकते. मंडळीमध्ये पार पाडण्यासाठी विविध जबाबदाऱ्या असू शकतात किंवा ईश्वरशासित बांधकाम प्रकल्पांमध्ये हातभार लावणेही शक्य असेल.
एपफ्रासप्रमाणे इतरांसाठी प्रार्थना करणे हा पवित्र सेवेचा एक प्रकार असून आपण सर्वजण ही पवित्र सेवा सादर करू शकतो. अशा प्रार्थनांमध्ये आपण यहोवाच्या अशा सर्व उपासकांबद्दल चिंता व्यक्त करू शकतो ज्यांना नाना तऱ्हेच्या धोक्यांना किंवा आध्यात्मिक अथवा शारीरिक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे आपण आपल्या परीने प्रयत्न केल्यास आपण देखील एपफ्रासप्रमाणे होऊ शकतो. यहोवाच्या विश्वासू सेवकांच्या कुटुंबात “सोबतीचा प्रिय दास” होण्याचा विशेषाधिकार आणि तसे सिद्ध करण्याचा आनंद प्राप्त होऊ शकतो.