वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 १२/१५ पृ. ८-१३
  • यहोवा तुम्हाला सामर्थ्यशाली बनवू शकतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा तुम्हाला सामर्थ्यशाली बनवू शकतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्याच्या पुत्राकरवी सामर्थ्य
  • कलस्सैमध्ये समर्थ केले गेले
  • आज देखील समर्थ केले जाते
  • कोणत्या उद्देशास्तव समर्थ केले गेले?
  • यहोवाला शोभेल असे वागण्याकरता इतरांना मदत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • “परमेश्‍वर व त्याचे सामर्थ्य ह्‍यांचा शोध करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • प्रबळ सत्ताधीश—यहोवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • परिपूर्ण व दृढनिश्‍चयी असे स्थिर राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 १२/१५ पृ. ८-१३

यहोवा तुम्हाला सामर्थ्यशाली बनवू शकतो

“तो थकलेल्यास सामर्थ्य देतो; निर्बलास विपुल बल देतो.”—यशया ४०:२९, NW.

१, २. यहोवाच्या विपुल सामर्थ्याचे काही पुरावे कोणते आहेत?

यहोवा “महासमर्थ” देव आहे. आपण देवाचे “सनातन सामर्थ्य व देवपण” याचा पुरावा त्याच्या भौतिक निर्मितीच्या भव्यतेत पाहू शकतो. सृष्टीकर्ता या नात्याने असलेल्या अधिकाराच्या पुराव्याचा स्वीकार करण्याचे नाकारणारे निरुत्तर आहेत.—स्तोत्र १४७:५; रोमकर १:१९, २०.

२ विश्‍वात करोडो प्रकाशवर्षे दूर पसरलेल्या आकाशगंगांविषयी शास्त्रज्ञ दूरपर्यंत पाहणी करतात तसतसे यहोवाचे सामर्थ्य अधिकच प्रकट होते. काळोख्या पण निरभ्र आकाशाकडे दृष्टी लावा आणि तुम्हाला स्तोत्रकर्त्याप्रमाणेच वाटते की नाही ते पाहा: “आकाश जे तुझे अंगुलीकार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्‍यांच्याकडे पहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी?” (स्तोत्र ८:३, ४) यहोवाने आम्हा मानवांची किती चांगल्याप्रकारे काळजी घेतली आहे! त्याने पहिल्या पुरूष व स्त्रीला सुंदर पार्थिव घर दिले. तिच्या मातीत वनस्पती, पौष्टिक उपज, दूषित नसलेले अन्‍न उगवण्याची शक्‍ती देखील होती. देवाच्या सामर्थ्याच्या या प्रदर्शनामुळे मनुष्य आणि प्राणी यांना शारीरिक शक्‍ती प्राप्त होते.—उत्पत्ती १:१२; ४:१२; १ शमुवेल २८:२२.

३. विश्‍वाच्या भौतिक गोष्टींशिवाय आणखी कोणत्या गोष्टी देवाचे सामर्थ्य प्रकट करतात?

३ आकर्षक आकाश आणि आनंदविणाऱ्‍या वनस्पती व प्राणी जीवनासोबत ते आपल्याला देवाचे सामर्थ्य देखील प्रकट करतात. प्रेषित पौलाने लिहिले: “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरुन ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत.” (रोमकर १:२०) परंतु आपले लक्ष व गुणग्राहकता यांच्या योग्यतेचा असा त्याच्या सामर्थ्याचा आणखी एक पुरावा आहे. तुम्ही कदाचित विचार कराल की ‘विश्‍वाच्या व्यतिरिक्‍त आणखी कोणती गोष्ट देवाच्या सामर्थ्याचे अधिक प्रदर्शन करते?’ याचे उत्तर येशू ख्रिस्त आहे. वस्तुतः, प्रेषित पौल प्रेरित होऊन म्हणतो, की वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त “देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान” आहे. (१ करिंथकर १:२४) ‘असे का बरे? त्याचा माझ्या जीवनाशी आता काय संबंध आहे?’ असे तुम्ही कदाचित विचाराल.

त्याच्या पुत्राकरवी सामर्थ्य

४. देवाचे सामर्थ्य त्याच्या पुत्राच्या बाबतीत कसे दिसून आले होते?

४ देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला त्याच्या प्रतिरूपात उत्पन्‍न केले तेव्हा त्याचे सामर्थ्य प्रथमच प्रदर्शित झाले. या आत्मिक पुत्राने इतर सर्व गोष्टींची सृष्टी करण्यासाठी देवाच्या विपुल सामर्थ्याचा वापर करुन यहोवाचा एक “कुशल कारागीर” या नात्याने सेवा केली. (नीतीसूत्रे ८:२२, ३०) पौलाने कलस्सैमधील आपल्या ख्रिस्ती बांधवांना लिहिले: “आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्‍य व अदृश्‍य असलेले . . . जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे.”—कलस्सैकर १:१५, १६.

५-७. (अ) प्राचीन काळी, देवाचे सामर्थ्य दाखविण्यात मानवांचा कशाप्रकारे समावेश होता? (ब) देवाचे सामर्थ्य आज ख्रिश्‍चनांच्या बाबतीत देखील प्रकट होऊ शकते, असा विश्‍वास बाळगण्यास कोणते कारण आहे?

५ आपण ‘पृथ्वीवर निर्माण केलेल्या गोष्टींमधील’ भाग आहोत. यास्तव, देवाचे सामर्थ्य आम्हा मानवांना दिले जाऊ शकेल काय? यहोवाने अपरिपूर्ण मानवांसोबत केलेल्या सर्व व्यवहारात, आपले उद्देश सिद्धीस नेण्याकरता त्याच्या सेवकांना काही विशिष्ट समयी जादा सामर्थ्य प्रदान केले. सर्वसामान्यपणे, अपरिपूर्ण मानव ७० किंवा ८० वर्षे जगतात हे मोशेला माहीत होते. (स्तोत्र ९०:१०) स्वतः मोशेबद्दल काय? तो वयाच्या १२० वर्षांपर्यंत जगला, तरीही “त्याची दृष्टि मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतिहि क्षीण झाली नव्हती.” (अनुवाद ३४:७) देव आपल्या प्रत्येक सेवकाला अधिक काळ जगण्यासाठी शक्‍ती देतो किंवा जोम देतो, असा याचा अर्थ होत नसला तरी, यहोवा मानवांना समर्थ करु शकतो हे यावरुन सिद्ध होते.

६ शिवाय, पुरूष आणि स्त्रियांना समर्थ करण्याची देवाची क्षमता आहे हे त्याने अब्राहामाच्या पत्नीला ज्याप्रमाणे समर्थ केले त्यावरून दिसते. “वयोमर्यादेपलीकडे असताहि सारेला देखील विश्‍वासाने गर्भधारणेची शक्‍ति मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्‍यास विश्‍वसनीय मानले.” किंवा देवाने इस्राएलातील न्यायाधीशांना आणि इतरांना कसे समर्थ केले त्याचा विचार करा: “गिदोन, बाराक, शमशोन, इफताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे . . . दुर्बळांचे सबळ झाले.”—इब्रीयांस ११:११, ३२-३४.

७ अशाचप्रकारचे सामर्थ्य आमच्याबाबतीत देखील कार्य करु शकते. नाही, आपण चमत्काराद्वारे संतती मिळण्याची अपेक्षा आता करू शकत नाही, किंवा शमशोनासारखे सामर्थ्य दाखवू शकणार नाही. पण पौलाने कलस्सैमधील सर्वसाधारण मानवांना सांगितल्याप्रमाणे आपण सामर्थ्यशाली होऊ शकतो. होय, आज आपल्याला ख्रिस्ती मंडळीत दिसते त्याप्रमाणे पौलाने पुरुष, स्त्रिया आणि मुलांना लिहिले, व म्हटले की त्यांना “सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ” केले जात होते.—कलस्सैकर १:११.

८, ९. पहिल्या शतकात, यहोवाचे सामर्थ्य आपल्यासारख्या मानवांच्या बाबतीत कसे स्पष्ट करण्यात आले?

८ येशूच्या पार्थिव सेवेदरम्यान, यहोवाने त्याचे सामर्थ्य त्याच्या पुत्राकरवी कार्य करीत असल्याचे स्पष्ट केले. उदाहरणार्थ, एके प्रसंगी कफर्णहूम येथे लोकसमुदाय येशूकडे आला तेव्हा, “बरे करण्यास यहोवाचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते.”—लूक ५:१७, NW.

९ येशूच्या पुनरुत्थानानंतर, त्याने आपल्या अनुयायांना ‘पवित्र आत्मा आल्यावर त्यांना सामर्थ्य प्राप्त होईल’ याची खात्री दिली. (प्रेषितांची कृत्ये १:८) हे खरेच ठरले! सा. यु. ३३ पेन्टेकॉस्टच्या काही दिवसांनंतर झालेल्या विकासाबद्दल एक इतिहासकार कळवतो: “प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभु येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते.” (प्रेषितांची कृत्ये ४:३३) देवाने त्याला सोपविलेले कार्य करण्यासाठी सबळ करण्यात आलेला पौल स्वतः एक होता. त्याच्या परिवर्तनानंतर आणि दृष्टी पूर्ववत झाल्यावर, त्याला “अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दिमिष्कात राहणाऱ्‍या यहूदी लोकांना कुंठित करीत राहिला.”—प्रेषितांची कृत्ये ९:२२.

१०. पौलाच्या बाबतीत देवाकडील सामर्थ्य कसे साहाय्यकारी होते?

१० हजारो किलोमीटरच्या या तीन मिशनरी यात्रा करण्यास आध्यात्मिक तसेच मानसिक जोमाची गरज असते याचा विचार आपण करतो तेव्हा आपल्याला हे कळते की, ते करण्यासाठी पौलाला निश्‍चितच अधिक सामर्थ्याची गरज होती. तसेच, त्याला तुरुंगवास आणि हुतात्मिक मृत्युचा सामना करण्यासहित सर्व प्रकारची संकटे सहन करावी लागली. कशाप्रकारे? त्याने उत्तर दिले: ‘प्रभु माझ्याजवळ उभा राहिला आणि माझ्याकडून घोषणा पूर्ण व्हावी म्हणून त्याने मला शक्‍ती दिली.’—२ तीमथ्य ४:६-८, १७; २ करिंथकर ११:२३-२७.

११. पौलाने देवाच्या सामर्थ्याविषयी कलस्सैमधील आपल्या सहसेवकांना कोणत्या आशेचा उल्लेख केला?

११ यास्तव, पौलाने “ख्रिस्ताशी एकतेत असणाऱ्‍या कलस्सैमधील बांधवांना” लिहिताना याची हमी दिली की त्यांना ‘सर्व प्रकारचा धीर व सहनशक्‍ति ही आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या [यहोवाच्या] गौरवाच्या पराक्रमानुसार सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ केले जाऊ शकते.’ (कलस्सैकर १:२ NW, ११) ते शब्द प्रामुख्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसाठी असले, तरी ख्रिस्ताच्या पावलांचे अनुकरण करणाऱ्‍या सर्वांना पौलाने लिहिलेल्या गोष्टींपासून लाभ मिळू शकतो.

कलस्सैमध्ये समर्थ केले गेले

१२, १३. कलस्सैकराच्या पत्राची पार्श्‍वभूमी काय आहे आणि शक्यतो त्याचा प्रतिसाद काय होता?

१२ आशियाच्या रोमी प्रांतातील कलस्सैची मंडळी, कदाचित एपफ्रास नावाच्या विश्‍वासू ख्रिश्‍चनाच्या प्रचारकार्यामुळे स्थापिली असावी. असे दिसते की, सुमारे सा. यु. ५८ मध्ये एपफ्रासने पौलाच्या रोममधील तुरुंगवासाबद्दल ऐकले, तेव्हा त्याने प्रेषिताला भेटण्याचा आणि कलस्सैमधील त्याच्या बांधवांची प्रीती व दृढनिश्‍चय याचा उत्तम अहवाल देऊन त्याला उत्तेजन देण्याचा निश्‍चय केला. शिवाय एपफ्रासने बहुधा कलस्सैच्या मंडळीत सुधारणा करण्याची गरज असणाऱ्‍या काही समस्यांचा वास्तविक अहवाल देखील सांगितला असावा. याच्या परिणामस्वरुपात, पौलाला त्या मंडळीला उत्तेजनपर व बोधाचे पत्र लिहिण्याची प्रबळ इच्छा झाली. तुम्ही देखील त्या पत्राच्या पहिल्या अध्यायामधून बरेच उत्तेजन मिळवू शकता, कारण यहोवा आपल्या सेवकांना शक्‍तिशाली कसे बनवतो यावर तो अध्याय प्रकाश पाडतो.

१३ पौलाने कलस्सैमधील बंधू व बहिणींना “ख्रिस्तातील विश्‍वास ठेवणाऱ्‍या बंधूस” असे म्हटले, तेव्हा त्यांना कसे वाटले असावे याची तुम्ही कल्पना करू शकता. ‘सर्व पवित्र जनांवर प्रीती’ असल्यामुळे शिवाय ते ख्रिस्ती झाल्यापासून ‘ही सुवार्ता फळ देत’ असल्यामुळे त्यांची प्रशंसा करावयास ते पात्र होते! हेच वक्‍तव्य आपल्या मंडळीबद्दल, आपल्या प्रत्येकाबद्दल केले जाऊ शकते का?—कलस्सैकर १:२-८.

१४. कलस्सैकरांबद्दल पौलाची काय इच्छा होती?

१४ पौलाला कलस्सैकर मंडळीचा अहवाल मिळाला तेव्हा तो इतका उद्दीपित झाला की ज्यामुळे त्याने कलस्सैकरांना सांगितले की त्याने त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आणि ‘सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्‍यांच्याद्वारे देवाच्या इच्छेसंबंधीच्या अचूक ज्ञानाने भरले जावे अशा हेतूने की त्यांनी यहोवाला शोभेल असे वागावे,’ अशी मागणी करण्यात खंड पडू दिला नव्हता. त्याने प्रार्थना केली, की त्यांनी ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने त्यांची वृद्धि व्हावी; सर्व प्रकारचा धीर व सहनशक्‍ति ही त्यांना आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार त्यांनी सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे.’—कलस्सैकर १:९-११, NW

आज देखील समर्थ केले जाते

१५. पौलाने कलस्सैकरांना लिहिलेल्या गोष्टींवरून दिसून येते त्याप्रकारची मनोवृत्ती आपण कशी दाखवू शकतो?

१५ पौलाने आपल्यासाठी ठेवलेले उत्तम उदाहरण किती उल्लेखनीय आहे! संपूर्ण पृथ्वीभरातील आपल्या बांधवांना त्रास असतानाही सहनशील राहण्यासाठी तसेच त्यांचा आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपल्या प्रार्थनांची आवश्‍यकता आहे. दुसऱ्‍या मंडळीतील किंवा इतर देशातील आमचे बांधव कठीण परिस्थिती सहन करीत असल्याचे समजते तेव्हा पौलाप्रमाणे आपणही प्रार्थनेत स्पष्ट असले पाहिजे. कदाचित जवळच्या मंडळीवर नैसर्गिक आपत्ती किंवा काही आध्यात्मिक कठीण परिस्थितींचा परिणाम झाला असेल. किंवा ख्रिस्ती जन कदाचित मुलकी युद्ध अथवा आंतरजमातीय हत्या होत असलेल्या देशात त्रास सहन करीत असतील. प्रार्थनेत आम्ही ‘यहोवाला शोभेल असे वागण्यासाठी,’ सहन करीत असताना राज्याचे फळ देत राहण्यासाठी व ज्ञानात वृद्धी करत जाण्यासाठी मदत करावी म्हणून या गोष्टी मागितल्या पाहिजेत. याप्रकारे “सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ” होण्यास देवाच्या सेवकांना त्याच्या आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तुमचा पिता तुमचे ऐकेल आणि प्रतिसाद देईल ही खात्री तुम्ही बाळगू शकता.—१ योहान ५:१४, १५.

१६, १७. (अ) पौलाने लिहिल्याप्रमाणे, आपण कशासाठी कृतज्ञ असले पाहिजे? (ब) देवाच्या लोकांना कोणत्या अर्थाने सुटका व क्षमा करण्यात आली आहे?

१६ पौलाने लिहिले की, कलस्सैकरांनी ‘ज्याने त्यांना प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची उपकारस्तुती’ केली पाहिजे. आपणही आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याच्या योजनेतील आमच्या उचित स्थानाबद्दल मग ती त्याच्या राज्यात स्वर्गातील असो किंवा पार्थिव क्षेत्रातील असो त्याचे आभार मानू या. अपरिपूर्ण मानवांना देवाने त्याच्या दृष्टीत योग्य कसे बनवले? पौलाने त्याच्या अभिषिक्‍त बांधवांना लिहिले: “त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले; त्या पुत्राच्या ठायी खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्‍ति म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.”—कलस्सैकर १:१२- १४.

१७ यहोवाच्या प्रिय पुत्राच्या खंडणी यज्ञार्पणाच्या बहुमोल योजनेवरील आपल्या विश्‍वासाने, स्वर्गीय किंवा पार्थिव अशी कोणतीही आशा असली तरी, अंधाराच्या दुष्ट व्यवस्थेतून आपली मुक्‍ती साध्य झाल्याने आपण दररोज देवाचे आभार मानतो. (मत्तय २०:२८) आत्म्याने अभिषिक्‍त असणाऱ्‍या ख्रिश्‍चनांना खंडणीचा लाभ विशेष मार्गाने झाल्यामुळे त्यांना ‘देवाच्या प्रीतीच्या पुत्राच्या राज्यात नेले जाऊ शकत होते.’ (लूक २२:२०, २९, ३०) परंतु “दुसरी मेंढरे” यांना आता देखील खंडणीपासून लाभ मिळतो. (योहान १०:१६) मित्र या नात्याने देवासमोर धार्मिक भूमिका घेण्यासाठी त्यांना क्षमा प्राप्त होऊ शकते. या अंत समयात “राज्याची सुवार्ता” गाजविण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. (मत्तय २४:१४) यासोबत ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीच्या समाप्तीस त्यांना पूर्णपणे धार्मिक तसेच शारीरिकरित्या परिपूर्ण होण्याची अद्‌भुत आशा आहे. त्याचे वर्णन प्रकटीकरण ७:१३-१७ मध्ये वाचताना, तेथे वर्णन केलेली परिस्थिती मुक्‍त व आशीर्वादित असल्याच्या पुराव्याचा तुम्ही नक्कीच स्वीकार कराल.

१८. कलस्सैकरात उल्लेखलेला कोणता समेट देव अजूनही साध्य करीत आहे?

१८ आपण सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्याचे किती ऋणी आहोत हे जाणण्यासाठी पौलाचे पत्र आपल्याला मदत करते. देव ख्रिस्ताकरवी काय साध्य करत होता? “त्याच्या वधस्तंभावरील रक्‍ताच्या द्वारे शांति करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले [होते.]” एदेनातील बंडाळीआधी होते त्याप्रमाणे सर्व सृष्टी त्याच्या संपूर्ण एकवाक्यतेत आणावी हा देवाचा उद्देश आहे. सर्व गोष्टींची सृष्टी करण्यासाठी ज्याचा वापर केला होता त्याचाच वापर हा समेट साध्य करण्यासाठी आता केला जात आहे.—कलस्सैकर १:२०.

कोणत्या उद्देशास्तव समर्थ केले गेले?

१९, २०. आमचे पवित्र आणि निष्कलंक असणे कशावर अवलंबून आहे?

१९ देवाबरोबर समेट करणाऱ्‍यांवर जबाबदारी येत असते. आपण एके काळी पापी आणि देवासाठी परके होतो. पण आता, येशूच्या यज्ञार्पणावर विश्‍वास ठेवल्याने आणि आपल्या मनात येथून पुढे दुष्ट गोष्टी नसल्याने आपण मूलभूतपणे “पवित्र व निष्कलंक” स्थितीत “निर्दोष असे [देवासमोर]” उभे राहतो. (कलस्सैकर १:२१, २२) देवाला ज्याप्रमाणे प्राचीन काळच्या विश्‍वासू साक्षीदारांची लाज वाटली नाही, त्याचप्रमाणे आपला देव म्हणवून घ्यावयास त्याला आपली देखील लाज वाटत नाही. (इब्रीयांस ११:१६) आज, त्याच्या सुविख्यात नावाची चुकीने ओळख देण्याचा किंवा ते नाव पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाहीर करण्यास भय असल्याचा आरोप आपल्यावर कोणीही करू शकत नाही!

२० तरीही, कलस्सैकर १:२३ मध्ये पौलाने कोणत्या इशाऱ्‍याची भर टाकली आहे त्याकडे लक्ष द्या: “जर तुम्ही विश्‍वासात स्थिरावलेले व अढळ राहता आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली . . . तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही तर हे होईल.” यहोवाला विश्‍वासू राहण्यावर, त्याच्या प्रिय पुत्राच्या पदचिन्हाचे अनुकरण करण्यावर कितीतरी अवलंबून आहे. यहोवा आणि येशूने आपल्यासाठी कितीतरी गोष्टी केल्या आहेत! पौलाच्या सल्ल्याचा अवलंब करून त्यांच्याबद्दलची प्रीती आपण दाखवू या.

२१. आज हर्षदायक असण्यासाठी आपल्याजवळ मोठे कारण का आहे?

२१ ‘ऐकलेल्या सुवार्तेची घोषणा आकाशाखालच्या सर्व सृष्टीत झाल्याची’ ऐकल्यामुळे कलस्सैकर ख्रिश्‍चनांचे कदाचित रोमांच उभे राहिले असतील. आज, ४५ लाखांपेक्षा अधिक साक्षीदार २३० पेक्षा अधिक देशांमध्ये राज्याच्या सुवार्तेची घोषणा विस्तृत प्रमाणात करीत असल्याचे ऐकणे अधिक हर्षदायक आहे. दर वर्षी तर सर्व राष्ट्रांमधून सुमारे ३,००,००० लोक देवासोबत समेट करीत आहेत!—मत्तय २४:१४; २८:१९, २०.

२२. आपण त्रास अनुभवत असलो, तरी देव आपल्यासाठी काय करु शकतो?

२२ पौलाने कलस्सैकरांना लिहिलेले पत्र, तुरुंगात कैद असताना लिहिले असावे हे स्पष्टपणे दिसत असले, तरी आपल्या वाट्याला आलेल्या गोष्टींबद्दल त्याने कोणत्याही प्रकारे शोक केला नाही. उलटपक्षी त्याने म्हटले: “तुम्हासाठी जी माझी दुःखे त्यामध्ये मी आनंद करितो.” ‘सर्वप्रकारचा धीर व सहनशक्‍ती आनंदासह प्राप्त होण्याचा’ अर्थ काय होतो, हे पौलाला माहीत होते. (कलस्सैकर १:११, २४) पण स्वतःच्या सामर्थ्याने तो करु शकत नसल्याचे त्याला माहीत होते. यहोवाने त्याला सामर्थ्यशाली बनवले होते! आज देखील असेच आहे. कैद आणि छळवणूक केलेल्या हजारो साक्षीदारांनी यहोवाची सेवा करण्यामध्ये आनंद गमावलेला नाही. उलटपक्षी, यशया ४०:२९-३१ मधील देवाच्या शब्दांची सत्यता त्यांना समजली आहे: “तो भागलेल्यांस जोर देतो . . . परमेश्‍वराची [यहोवा, NW] आशा धरून राहणारे नवीन शक्‍ति संपादन करितील.”

२३, २४. कलस्सैकर १:२६ मध्ये सांगितलेले पवित्र रहस्य काय आहे?

२३ ख्रिस्ताभोवती केंद्रित असलेल्या सुवार्तेचे सेवकपण पौलाला अधिक महत्त्वाचे वाटत होते. इतरांनी देवाच्या उद्देशातील ख्रिस्ताच्या भूमिकेच्या मूल्याची कदर करावी असे त्याला वाटत असल्यामुळे त्याने याचे वर्णन “जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते,” असे केले. पण ते कायम रहस्य राहणार नव्हते. पौलाने भर टाकली: “आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे.” (कलस्सैकर १:२६) एदेनात बंडाळीचा विकास झाला तेव्हा ‘स्त्रीची संतती सर्पाचे डोके फोडील’ हे भाकीत करून यहोवाने येणाऱ्‍या चांगल्या गोष्टींबद्दल अभिवचन दिले. (उत्पत्ती ३:१५) याचा काय अर्थ होतो? पिढ्यान्‌पिढ्या, शतकानुशतके ते एक रहस्यच राहिले. मग येशू आला आणि त्याने “सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली.”—२ तीमथ्य १:१०.

२४ होय, ‘पवित्र रहस्य’ ख्रिस्त आणि मशीही राज्याभोवती केंद्रित आहे. पौलाने ख्रिस्तासोबत राज्य शासनात भाग घेणाऱ्‍यांचा उल्लेख, ‘स्वर्गातील गोष्टी’ असा केला. हे लोक, ‘पृथ्वीवरील गोष्टींवर,’ येथे सार्वकालिक नंदनवनाचा आनंद उपभोगणाऱ्‍या सर्वांवर अगण्य आशीर्वाद आणण्यास कारणीभूत होतील. पौलाने ‘या पवित्र रहस्याच्या गौरवाच्या संपत्तीचा’ उल्लेख करणे किती उचित होते हे तुम्ही पाहू शकता.—कलस्सैकर १:२०, २७.

२५. कलस्सैकर १:२९ मध्ये दाखवल्यानुसार, आता आमची मनोवृत्ती काय असली पाहिजे?

२५ पौलाने राज्यातील स्वतःच्या जागेची उत्कंठेने अपेक्षा बाळगली. तरीही, काहीही हालचाल न करता त्याची आशा बाळगण्यासारखी ती गोष्ट नव्हती हे त्याने जाणले. “ह्‍याकरिता त्याची जी शक्‍ति माझ्या ठायी जोराने कार्य चालवीत आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.” (कलस्सैकर १:२९) यहोवाने जीवन बचावणारी सेवा साध्य करण्यासाठी पौलाला ख्रिस्ताकरवी सामर्थ्यशाली बनवले हे लक्षात घ्या. यहोवा आज आपल्यासाठी हेच करू शकतो. पण आपण स्वतःला विचारण्यास हवे, ‘मी सत्य शिकलो तेव्हा सारखाच सुवार्तिक आत्मा आज माझ्या ठायी आहे का?’ तुमचे उत्तर काय आहे? सतत ‘झटून श्रम करण्यास आणि यहोवाच्या सामर्थ्याच्या मानाने कार्य करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला काय मदत करू शकते’? हाच विषय पुढील लेखात दिला आहे.

तुम्ही नोंद घेतली का?

▫ यहोवा आपले सामर्थ्य मानवांच्या वतीने दाखवू शकतो याची खातरी आपल्याला का असू शकते?

▫ कलस्सैकराच्या पहिल्या अध्यायातील पौलाच्या शब्दांची पार्श्‍वभूमी काय आहे?

▫ कलस्सैकर १:२० मध्ये उद्धृत केलेला समेट, देव कशाप्रकारे साध्य करीत आहे?

▫ यहोवा त्याच्या सामर्थ्याद्वारे, आपल्याकडून काय साध्य करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा