वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ४/१५ पृ. ८-१३
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मनुष्याचे अयशस्वी प्रयत्न
  • मूळ कारणाचा उलगडा
  • शांतीकडे नेणारा मार्ग
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • खऱ्‍या शांतीच्या प्राप्तीसाठी झटा व तिचा मार्ग धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • शांती—तुम्ही ती कशी मिळवू शकता?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ४/१५ पृ. ८-१३

खरी शांती—कोणत्या उगमाकडून?

“[यहोवा] दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.”—स्तोत्र ४६:९.

१. यशयाच्या भविष्यवाणीत आपल्याला शांतीची कोणती अद्‌भुत प्रतिज्ञा सापडते?

“नीतिमत्तेचा परिणाम शांति व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल; आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानांत व सुखाश्रमांत राहतील.” (यशया ३२:१७, १८) केवढी अद्‌भुत प्रतिज्ञा! ही देवाकरवी आणल्या जाणाऱ्‍या खऱ्‍या शांतीची प्रतिज्ञा आहे.

२, ३. खऱ्‍या शांतीचे वर्णन करा.

२ तथापि, खरी शांती म्हणजे नेमके काय? फक्‍त युद्ध नसण्याच्या स्थितीला खरी शांती म्हणता येईल का? किंवा ज्या कालावधीत राष्ट्रे पुढच्या युद्धाची तयारी करतात त्याला शांतीचा काळ म्हणता येईल का? खरी शांती केवळ एक कल्पना तर नाही? या प्रश्‍नांची भरवशालायक उत्तरे मिळणे आवश्‍यक आहे. पहिली गोष्ट, खरी शांती निव्वळ एक स्वप्न नाही. देवाने प्रतिज्ञा केलेली शांती या जगातील कोणाच्याही कल्पनेपेक्षा कितीतरी सरस आहे. (यशया ६४:४) ती शांती केवळ काही वर्षांपुरती किंवा काही दशकांपुरती नव्हे. ती सर्वकाळ टिकणारी शांती आहे! शिवाय, ती केवळ काही निवडक लोकांसाठी नसून—स्वर्ग आणि पृथ्वी, देवदूत आणि मानव या सर्वांना ती सामावते. सर्व राष्ट्रांच्या, जातीय समूहांच्या, भाषांच्या आणि वर्णांच्या लोकांपर्यंत तिचा अवाका आहे. तिच्याठायी कोणत्याही सीमा, बंधने किंवा अपयश नाही.—स्तोत्र ७२:७, ८; यशया ४८:१८.

३ खरी शांती म्हणजे दैनंदिन शांती. ज्याअर्थी, तुमचा प्रत्येक दिवस युद्धाच्या कोणत्याही विचाराशिवाय, स्वतःच्या किंवा तुमच्या मुलांच्या अथवा नातवंडांच्या भवितव्याविषयी कोणत्याही चिंतेविना उजाडतो. वेगळ्या शब्दांत बोलायचे झाल्यास, संपूर्ण मानसिक शांती. (कलस्सैकर ३:१५) अर्थात, त्यापुढे गुन्हेगारी, हिंसाचार नाही, विस्कटलेली कुटुंबे, बेघर लोक, उपासमार किंवा थंडीने गारठून मृत्यूमुखी पडणारे लोक नाहीत, तसेच, निराशा आणि विफलता ही नाहीत. एवढेच काय, तर देवाची शांती म्हणजे जगात आजार, दुःख, शोक किंवा मृत्यूही नाही. (प्रकटीकरण २१:४) खऱ्‍या शांतीचा सर्वकाळ उपभोग घेण्याची केवढी अद्वितीय आशा आपल्याला लाभली आहे! अशाच शांतीसुखाची आपल्या सर्वांना उत्कंठा नाही का? अशाच शांतीसाठी आपण प्रार्थना आणि प्रयास करू नयेत का?

मनुष्याचे अयशस्वी प्रयत्न

४. शांतीसाठी राष्ट्रांनी कोणकोणते प्रयास केले आहेत, आणि यांतून काय निष्पन्‍न झाले?

४ विविध लोकांनी आणि राष्ट्रांनी शतकानुशतके शांतीची भाषा केली आहे, शांतीविषयी वादविवाद केले आहेत आणि शेकडो शांती करारांवर स्वाक्षऱ्‍या केल्या आहेत. या सर्वांतून काय निष्पन्‍न झाले आहे? मागील ८० वर्षांत, जगाच्या पाठीवर कोणतेतरी राष्ट्र किंवा गट युद्धात सामील नव्हता असा अक्षरशः एकही क्षण आला नाही. शांती मानवांच्या हाती लागू शकलेली नाही, हे उघड आहे. साहजिकच प्रश्‍न असा उद्‌भवतो की, आंतरराष्ट्रीय पातळीवर शांती स्थापन करण्यासाठी मानवाने केलेले सर्व प्रयत्न निष्फळ का ठरले आहेत, आणि कायम टिकणारी खरी शांती आणण्यास मनुष्य असमर्थ का ठरला आहे?

५. शांती आणण्याचे मनुष्याचे प्रयास वारंवार अपयशी का ठरले आहेत?

५ या प्रश्‍नांचे सरळसोपे उत्तर हे आहे की मनुष्याने खऱ्‍या शांतीसाठी योग्य उगमाकडे डोळे लावलेले नाहीत. दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली मनुष्याने आज अशा संघटना स्थापन केल्या आहेत, ज्या त्यांच्या स्वतःच्याच उणिवा आणि दोषांना, अर्थात, त्यांचा हव्यास, महत्त्वाकांक्षा तसेच त्यांचा सत्तापिपासूपणा आणि अधिकाराच्या लालसेला बळी पडतात. लोकांनी उच्च शिक्षणाच्या संस्थांमधून विद्या संपादन केली आहे, अनेक प्रतिष्ठाने आणि वैचारिक गट स्थापन केले आहेत; पण याद्वारे त्यांनी उलट जुलूम आणि विध्वंस करण्याचे आणखी माध्यम शोधून काढले आहेत. मनुष्यांना कोणत्या उगमाकडे मार्गदर्शित करण्यात आले आहे? त्यांनी कोणाकडून शांतीची अपेक्षा केली आहे?

६, ७. (अ) राष्ट्र संघाने स्वतःसाठी कसे नाव कमावले आहे? (ब) संयुक्‍त राष्ट्रसंघाने कोणता इतिहास घडवला?

६ कायमस्वरूपी शांती स्थापन करण्यासाठी राष्ट्रांनी १९१९ साली, राष्ट्र संघावर भरवसा ठेवला. तथापि १९३५ साली मुसोलिनीने इथियोपियावर केलेल्या हल्ल्यामुळे आणि १९३६ साली सुरू झालेल्या स्पेनमधील मुलकी युद्धामुळे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. १९३९ साली दुसरे महायुद्ध पेटल्यानंतर राष्ट्र संघ नामशेष झाला. ती नावापुरती शांती २० वर्षेही टिकू शकली नव्हती.

७ संयुक्‍त राष्ट्रसंघाविषयी काय? त्यातर्फे तरी कायमस्वरूपी जागतिक शांतीची आशा मिळू शकली आहे का? निश्‍चितच नाही. १९४५ साली त्याची स्थापना झाल्यापासून १५० वर युद्धे आणि सशस्त्र संघर्ष झाले! हे लक्षात घेता, युद्ध आणि युद्धाच्या मुळारंभावर अभ्यास करणाऱ्‍या एका कॅनेडियन अभ्यासकांनी संयुक्‍त राष्ट्रसंघाचे वर्णन करताना त्यास, “देवमाणसांची सभा नव्हे, तर मुळच्या शिकारचोरांनी बदलून शिकार रखवालदार बनावे, अशांची संस्था, निव्वळ एक अधिकारशून्य रिकामचावडी,” असे म्हटले यात काही नवल नाही.—पडताळा यिर्मया ६:१४; ८:१५.

८. एकीकडे शांतीची भाषा करणाऱ्‍या राष्ट्रांनी दुसरीकडे काय केले आहे? (यशया ५९:८)

८ एकीकडे शांतीची भाषा करणारी राष्ट्रे, दुसरीकडे मात्र नवनव्या शस्त्रांचा शोध लावणे आणि त्यांचे उत्पादन करणेही सुरूच ठेवतात. शांती परिषदा आयोजित करणारे देशच सहसा शस्त्रनिर्मितीत अग्रेसर असल्याचे दिसते. जबरदस्त व्यापारी स्वार्थांमुळे ही राष्ट्रे विध्वंसक शस्त्रसंभाराच्या उत्पादनाला बढावा देतात; जिवघेण्या लँड माईन्स अशाच महाभयानक शस्त्रांपैकी आहेत आणि दरवर्षी अंदाजे २६,००० असैनिकी प्रौढ नागरिक आणि मुले यांमुळे एकतर मृत्युमुखी पडतात किंवा अपंग होतात. लोभ आणि भ्रष्टाचार हेच याचे मुख्य प्रवर्तक आहेत. शस्त्रांच्या आंतरराष्ट्रीय खरेदी-विक्रीत लाच देण्याचे आणि मूठ दाबण्याचे प्रकार अविभाज्यपणे गोवलेले आहेत. या माध्यमातून काही राजकारणी लोक स्वतःची घरे भरतात.

९, १०. युद्धे आणि मानवी प्रयासांबद्दल जगिक विशेषज्ञांचे काय निरीक्षण आहे?

९ पोलिश भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल शांती पुरस्काराचे विजेता यूझेफ रोटब्लॉट यांनी १९९५ च्या डिसेंबर महिन्यात राष्ट्रांना अण्वस्त्र स्पर्धा बंद करण्याचे आव्हान केले. ते म्हणाले: “[नवी अण्वस्त्र स्पर्धा] टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे युद्धांचे उच्चाटन.” हे शक्य होईल असे तुम्हाला वाटते का? आपसांतील मतभेद मिटवण्यासाठी युद्ध हा तोडगा नाही हे मान्य करून, १९२८ सालापासून, ६२ देशांनी केलॉग-ब्रायन्ड करारास आपली मंजुरी दिली. तथापि, दुसरे महायुद्ध झाले तेव्हा, हा करार मुळातच अर्थशून्य होता याचा प्रत्यय आला.

१० मानव इतिहासाचा संथ प्रवाह युद्धांमुळे वारंवार विचलित झाला आहे याविषयी कोणतेही दुमत नाही. ग्विन डायर यांनी लिहिल्याप्रमाणे, “युद्ध मानवी संस्कृतीतील एक केंद्रीय संस्था असून युद्धांचा इतिहास मानवी संस्कृतीइतकाच पुरातन आहे.” खरोखर, प्रत्येकच संस्कृतीत आणि साम्राज्यात कोणत्या न कोणत्या लष्करी वीर पुरुषांना पूजले जाते, प्रत्येक संस्कृतीचे आणि साम्राज्याचे आपापले खडे सैन्य, प्रसिद्ध लढाया, त्यांच्या अतिपवित्र युद्धशाळा आणि त्यांचा भरमसाट शस्त्रास्त्रसाठा असतोच. तथापि, युद्धांची विध्वंसकता आणि त्यांमध्ये होणारी जीवितहानी या दोहोंच्या बाबतीत आपले शतक लक्षात राहण्याजोगे आहे.

११. शांतीसाठी प्रयास करताना जगिक पुढाऱ्‍यांनी कोणत्या मूलभूत गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे?

११ यिर्मया १०:२३ येथे दिलेल्या मूलभूत बोधाकडे जागतिक पुढाऱ्‍यांनी डोळेझाक केली आहे हे उघड आहे, या वचनात असे म्हटले आहे: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” देवाला वगळून, खरी शांती आणणे शक्य नाही. तर मग, सुसंस्कृत समाजात युद्धे अपरिहार्य आहेत का? शांती—खरी शांती—एक असाध्य कल्पना आहे असा याचा अर्थ होतो का?

मूळ कारणाचा उलगडा

१२, १३. (अ) युद्धाच्या मूलभूत, अप्रत्यक्ष कारणाविषयी बायबल कोणता खुलासा देते? (ब) सैतानाने जागतिक समस्यांच्या खऱ्‍या उपायापासून मानवजातीचे लक्ष कशाप्रकारे विकर्षित केले आहे?

१२ या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी आपल्याला प्रथम युद्धाची कारणे समजून घेतली पाहिजे. बायबल स्पष्टपणे सांगते की, विद्रोही देवदूत सैतान हा प्रारंभापासूनच “मनुष्यघातक” आणि “लबाड” आहे, शिवाय ते हेही सांगते की, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (योहान ८:४४; १ योहान ५:१९) आपल्या कुयुक्‍त्‌यांना बढावा देण्यासाठी त्याने काय केले आहे? २ करिंथकर ४:३, ४ येथे आपण वाचतो: “परंतु, आमची सुवार्ता आच्छादिलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादिलेली आहे. त्यांची म्हणजे विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने ह्‍या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.” जगाच्या समस्यांवरील तोडगा या अर्थाने देवाच्या राज्यापासून मानवजातीचे लक्ष विकर्षित करण्याच्या उद्देशाने सैतान होताहोईल तितके प्रयत्न करतो. विभाजन घडवून आणणारे सामाजिक, राजनैतिक आणि धार्मिक वादविषय उठवून तो लोकांचे डोळे आंधळे करतो आणि त्यांना मार्गभ्रष्ट करतो, जेणेकरून देवाच्या राज्यत्वापेक्षा हे वादविषयच त्यांना जास्त महत्त्वाचे वाटू लागतात. जगात सर्वदूर उफाळलेली राष्ट्रीयवादाची लाट, याचेच एक उदाहरण आहे.

१३ दियाबल सैतान राष्ट्रीयवादाला आणि जातीयवादाला, अर्थात, एखादे राष्ट्र किंवा एखादी जात अथवा जमात इतरांपेक्षा वरचढ आहे या समजुतीला बढावा देतो. शतकानुशतके जे स्थापित वैरभाव दाबून टाकण्यात आले होते त्यांना पुन्हा एकदा भडकवून आणखी युद्धांच्या आणि संघर्षांच्या आगीत सरपण घातले जात आहे. युनेस्कोचे महासंचालक फेडेरिको मेयर यांनी या वाढत्या प्रवृत्तीबद्दल इशारा देऊन म्हटले की, “जेथे सहिष्णुता प्रचारात होती अशा भागांतही आता परदेशीयांविषयीचा भयगंड अधिकाधिक प्रकट होऊ लागला आहे; तसेच, कालबाह्‍य वाटणाऱ्‍या उग्र राष्ट्राभिमानाचे किंवा जातीयवादाचे दर्शन घडविणारी विधाने आता पूर्वीपेक्षा अधिक ऐकावयास मिळतात.” यामुळे कोणता परिणाम घडून आला आहे? भूतपूर्व युगोस्लाव्हियामध्ये झालेल्या भयंकर कत्तली आणि र्‌वांडा येथे घडलेला रक्‍तरंजित जातीसंहार, ही बातमीपत्रकांतील ठळक मथळ्यांपर्यंत पोहंचू शकलेल्या अशा परिणामी घटनांपैकी केवळ दोन उदाहरणे आहेत.

१४. युद्ध आणि आपल्या काळात त्याचा परिणाम प्रकटीकरण ६:४ येथे कशाप्रकारे चित्रित करण्यात आला आहे?

१४ बायबलने पूर्वभाकीत केले होते की या व्यवस्थीकरणाच्या शेवटास, युद्धाला सूचित करणारा एक अग्नीवर्ण घोडा सबंध पृथ्वीभर दौडेल. प्रकटीकरण ६:४ येथे आपण वाचतो: “तेव्हा दुसरा ‘घोडा’ निघाला; तो ‘अग्निवर्ण’ होता आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराकडे पृथ्वीवरील शांतता हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करविण्याचे काम सोपविले होते; त्याला मोठी तरवार देण्यात आली होती.” या लाक्षणिक घोडेस्वाराने कशाप्रकारे ‘पृथ्वीवरील शांतता हरण केली’ आणि राष्ट्रांनी कशाप्रकारे अविरत युद्धे आणि लढाया केल्या हे आपण १९१४ सालापासून पाहातच आहोत.

१५, १६. (अ) युद्ध आणि नरसंहारांत धर्माने कोणती भूमिका बजावली आहे? (ब) धर्माने जे केले आहे त्याकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो?

१५ ज्याकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये असा एक मुद्दा म्हणजे, या युद्धांमध्ये आणि नरसंहारांमध्ये धर्माची भूमिका. मनुष्याच्या रक्‍तरंजित इतिहासासाठी बऱ्‍याच अंशी खोट्या धर्माच्या दिशाभूल करणाऱ्‍या प्रभावाला जबाबदार ठरवता येईल. कॅथलिक धर्मवेत्ता हॅन्स कुंग यांनी लिहिले: “गतकाळात धर्मांनी एक प्रतिकूल, विध्वंसक प्रभाव पाडला आहे आणि ते आजही पाडताहेत हे वादातीत सत्य आहे. असंख्य झगडे, रक्‍तपाती लढाया, दुसऱ्‍या शब्दांत ‘धार्मिक युद्धांविषयी’ त्यांच्याकडून जाब मागण्यात यावा; . . . दोन जागतिक महायुद्धांचा समावेश देखील यात आलाच.”

१६ रक्‍तपात करण्यातील आणि युद्धांतील खोट्या धर्मांच्या सहभागाविषयी यहोवा देवाचा कोणता दृष्टिकोन आहे? खोट्या धर्मांचे देवाने केलेले खंडन प्रकटीकरण १८:५ येथे अभिलिखित आहे, ते असे: “तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे; आणि तिची अनीति देवाने लक्षात घेतली आहे.” जगाच्या राजनैतिक शासकांशी खोट्या धर्मांनी केलेल्या हातमिळवणीमुळे त्यांच्यावर इतका प्रचंड रक्‍तदोष ओढवला आहे आणि त्यांच्या पापांची एवढी प्रचंड रास झाली आहे की देव त्याकडे निश्‍चितच दुर्लक्ष करू शकत नाही. तो खऱ्‍या शांतीच्या मार्गातील हा अडथळा लवकरच समूळ नष्ट करील.—प्रकटीकरण १८:२१.

शांतीकडे नेणारा मार्ग

१७, १८. (अ) सार्वकालिक शांती येईल असा विश्‍वास ठेवणे हे एक अवास्तविक स्वप्न का नाही? (ब) खरी शांती खात्रीने येण्यासाठी यहोवाने आधीच काय केले आहे?

१७ संयुक्‍त राष्ट्रसंघासारख्या संघटनांच्या माध्यमाने जर मानव खरी आणि कायमस्वरूपी शांती आणू शकत नाहीत, तर मग, खरी शांती कोणत्या उगमाकडून आणि कशी येईल? चिरस्थायी शांती येणे शक्य आहे यावर विश्‍वास ठेवणे म्हणजे एखादे अवास्तविक स्वप्न पाहण्यासारखे आहे का? नाही, अर्थात, जर आपण शांतीच्या सुयोग्य उगमाकडे वळलो तरच. आणि तो कोण आहे? स्तोत्र ४६:९ आपल्याला याचे उत्तर देते, ते सांगते की यहोवा “दिगंतापर्यंत लढाया बंद करितो; तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो; रथ अग्नीत जाळून टाकितो.” आणि यहोवाने युद्धांचा अंत करून खरी शांती प्रस्थापित करण्याची प्रक्रिया केव्हाच सुरू देखील केली आहे. कशाप्रकारे? ख्रिस्त येशूला १९१४ साली त्याच्या हक्काच्या राज्य सिंहासनावर विराजमान करण्याद्वारे तसेच, मानवजातीच्या इतिहासात शांतीच्या समर्थनार्थ एक अभूतपूर्व शैक्षणिक मोहीम राबवण्याद्वारे. यशया ५४:१३ येथील भविष्यसूचक शब्द आपल्याला याची खात्री पटवून देतात: “तुझी सर्व मुले परमेश्‍वरापासून शिक्षण पावतील; तुझ्या मुलांना मोठी शांति प्राप्त होईल.”

१८ हा भविष्यवाद, कारण आणि परिणामाच्या तत्त्वावर—अर्थात, प्रत्येक परिणामामागे काहीतरी कारण असते, या तत्त्वावर प्रकाश टाकतो. या भविष्यवादानुसार, यहोवाची शिकवण—हे कारण—युद्धप्रेमी लोकांचे रूपांतर करून त्यांना देवासोबत शांतीचा संबंध असणारे शांतीप्रिय लोक बनवते. परिणाम असा की, त्यांचे हृदयपालट होऊन ते शांतताप्रेमी लोक बनतात. लक्षावधी लोक “शांतीचा अधिपति” येशू ख्रिस्त याचा आदर्श अनुसरत आहेत, अशाप्रकारे, लोकांच्या हृदयात आणि मनात पालट घडवून आणणाऱ्‍या या शिकवणुकीचा आजही जगभर प्रसार होत आहे.—यशया ९:६.

१९. येशूने खऱ्‍या शांतीविषयी काय शिकवले?

१९ येशूने खऱ्‍या शांतीविषयी काय शिकवले? त्याने केवळ राष्ट्रांमधील शांतीबद्दलच नव्हे तर लोकांच्या आपसांतील संबंधातील आणि शुद्ध विवेकामुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या आंतरिक शांतीविषयीही सांगितले. योहान १४:२७ येथे येशूने आपल्या अनुयायांना उद्देशून बोललेले शब्द आपल्याला वाचायला मिळतात: “मी तुम्हास शांति देऊन ठेवितो; मी आपली शांति तुम्हास देतो; जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.” येशूची शांती जगाच्या शांतीपेक्षा कशाप्रकारे वेगळी होती?

२०. येशू कोणत्या माध्यमाने खरी शांती आणेल?

२० सर्वप्रथम, येशूची शांती त्याच्या राज्य संदेशाशी निगडित होती. येशू व १,४४,००० सहशासकांनी बनलेले नीतिमान स्वर्गीय सरकार, युद्धांचा आणि युद्धखोरांचा नायनाट करील हे त्याला माहीत होते. (प्रकटीकरण १४:१, ३) आपल्या बाजूला मृत्यू पावलेल्या चोराला येशूने ज्या शांतिमय परादीस परिस्थिती देऊ केल्या होत्या त्या परिस्थिती या शासनामार्फत आणल्या जातील हे येशूला माहीत होते. येशूने त्याला स्वर्गीय राज्यात एक स्थान देऊ केले नाही, उलट तो म्हणाला: “आज, मी तुला खचित सांगतो, तू माझ्यासोबत परादीसमध्ये असशील.”—लूक २३:४३, NW.

२१, २२. (अ) खऱ्‍या शांतीत कोणती अद्‌भुत साहाय्यकारी आशा अंतर्भूत आहे? (ब) तो आशीर्वाद वास्तवात उतरताना पाहण्यासाठी आपण काय करावे?

२१ येशूला याची देखील जाणीव होती की, त्याचे राज्य त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्व शोकाकूल लोकांना सांत्वन देईल. त्याने दिलेल्या शांतीत पुनरुत्थानाची अद्‌भुत सहाय्यकारी आशा देखील अंतर्भूत आहे. योहान ५:२८, २९ येथे आढळणारे त्याचे उत्तेजनात्मक शब्द लक्षात असू द्या: “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”

२२ तुम्हाला त्या काळाची उत्कंठा आहे का? मृत्यूमुळे तुमच्या प्रिय व्यक्‍तींशी तुमची ताटातूट झाली आहे का? त्यांना पुन्हा पाहण्यासाठी तुम्ही अधीर आहात का? तर मग, येशूने दिलेल्या शांतीचा स्वीकार करा. लाजाराची बहीण, मार्था हिच्यासारखा विश्‍वास बाळगा, तिने येशूला म्हटले: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” तथापि, येशूने मार्थाला दिलेले प्रोत्साहनदायक उत्तर पाहा: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्‍वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो कधीहि मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?”—योहान ११:२४-२६.

२३. देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान खरी शांती मिळवण्यासाठी अत्यावश्‍यक का आहे?

२३ या अभिवचनावर तुम्ही देखील विश्‍वास ठेवू शकता व त्याकरवी फायदा मिळवू शकता. तो कसा? देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान आत्मसात करण्याद्वारे. प्रेषित पौलाने अचूक ज्ञानाच्या महत्त्वावर कशाप्रकारे जोर दिला याकडे लक्ष द्या: “आम्हीहि . . . तुम्हासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धि ह्‍यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण [अचूक] ज्ञानाने तुमची वृद्धि व्हावी.” (कलस्सैकर १:९, १०) या अचूक ज्ञानातून तुम्हाला खात्री पटेल की खऱ्‍या शांतीचा उगम यहोवा देव आहे. त्यातून तुम्हाला हेही कळून येईल की स्तोत्रकर्त्याचे पुढील शब्द तुम्हालाही म्हणता यावेत म्हणून तुम्ही आता काय करावे: “मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे परमेश्‍वरा, तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस.”—स्तोत्र ४:८.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल का?

◻ मनुष्याचे शांती आणण्याचे प्रयास वारंवार का अपयशी ठरले आहेत?

◻ युद्धाचे मूलभूत कारण कोणते आहे?

◻ खरी शांती एक अवास्तविक स्वप्न का नाही?

◻ खऱ्‍या शांतीचा उगम काय आहे?

[८ पानांवरील चित्र]

खरी शांती एक स्वप्न नव्हे. ती देवाची प्रतिज्ञा आहे

[१० पानांवरील चित्र]

१९१४ सालापासून अग्निवर्ण घोड्याच्या लाक्षणिक स्वाराने पृथ्वीवरून शांती हरण केली आहे

[११ पानांवरील चित्र]

धर्म आणि संयुक्‍त राष्ट्रसंघ शांती आणू शकतात का?

[Credit Line on page 11]

UN Photo

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा