वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ४/१५ पृ. ४-७
  • ‘शांतीचा देव’ दुःखितांची काळजी घेतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘शांतीचा देव’ दुःखितांची काळजी घेतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा तुमची काळजी घेतो
  • देव दुःखितांना कशी मदत करतो
  • लवकरच—दुःखविरहीत जग!
  • पीडित असलेल्यांकरता सांत्वन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • दुःखितांना कधीतरी शांती लाभेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • आपत्तींना तुम्ही कसे सहन करू शकाल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • यहोवा पीडितांना सोडवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ४/१५ पृ. ४-७

‘शांतीचा देव’ दुःखितांची काळजी घेतो

बायबल स्पष्टपणे दाखवते की दावीदाला दुःखाचा चांगलाच अनुभव होता. त्याच्या जिवावर उठलेला एक दुष्ट आणि दुराग्रही राजा त्याचा निरंतर पाठलाग करत असल्यामुळे अनेक वर्षांपर्यंत तो एका फरारीचे जीवन जगला. या दुःखाच्या काळादरम्यान दावीद वेगवेगळ्या एकांत स्थळी आश्रय घेत असे. पण याच्या जोडीला त्याने आणखी काही तरी केले. त्याने आपल्या विपत्तीविषयी यहोवाला कळकळीने प्रार्थना केली. आपल्या भयंकर अनुभवाविषयी नंतर लिहिताना तो म्हणतो, “मी आपल्या वाणीने परमेश्‍वराला आरोळी मारितो. . . . मी त्याच्यापुढे आपले गाऱ्‍हाणे मांडितो; मी आपले संकट त्याला सांगतो.”—स्तोत्र १४२:१, २.

देवावर इतके विसंबून राहण्याबद्दल आजच्या काळात काहीजण कदाचित दावीदाची थट्टा करतील. ते कदाचित असे म्हणतील की, प्रार्थना निव्वळ एक मानसिक आधार असून व्यावहारिक दृष्टीने पाहू जाता प्रार्थना करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. तथापि, दावीदाचा देवावर असलेला विश्‍वास व्यर्थ ठरला नाही, कारण त्याचे शत्रू शेवटी पराजित झाले. मागे वळून पाहताना, दावीदाने लिहिले: “ह्‍या पामराने धावा केला आणि परमेश्‍वराने तो ऐकला, आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडविले.” (स्तोत्र ३४:६) दावीदाने ज्याच्याकडे मदतीची याचना केली त्या खऱ्‍या देवाला दुसऱ्‍या एका ठिकाणी ‘शांतीचा देव’ म्हणण्यात आले आहे. (फिलिप्पैकर ४:९; इब्री लोकांस १३:२०) दुःखांपासून सुटका मिळवून देण्याद्वारे तो आपल्यालाही शांती देईल का?

यहोवा तुमची काळजी घेतो

यहोवा आपल्या लोकांच्या विपत्तींविषयी बेफिकीर नाही. (स्तोत्र ३४:१५) तो केवळ एक समूह या नात्याने आपल्या सेवकांच्या गरजांकडे लक्ष देतो असे नाही, तर त्याची भीती बाळगणाऱ्‍या प्रत्येक व्यक्‍तीच्या गरजांची तो दखल घेतो. प्राचीन जेरुसलेम येथील मंदिराच्या समर्पणाच्या वेळी, शलमोनाने यहोवाला विनंती केली की, “एखादा इस्राएल किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपणास होणारे क्लेश किंवा दु:ख ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी आपले हात या मंदिराकडे पसरून करितील,” तेव्हा त्याने त्यांचे ऐकावे. (तिरपे वळण आमचे.) (२ इतिहास ६:२९) शलमोनाने कबूल केल्याप्रमाणे, प्रत्येकाला आपापले निराळे दुःख सहन करावे लागते. एखाद्याला शारीरिक दुखणे असेल. तर दुसऱ्‍याला, भावनिक क्लेश. इतर कदाचित आपल्या प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूमुळे शोकाकूल असतील. बेकारी, आर्थिक ओढाताण आणि कौटुंबिक वितुष्टे देखील या कठीण काळातील सर्वसामान्य दुःखांपैकी आहेत.

तुम्ही स्वतः “आपणास होणारे क्लेश किंवा दु:ख,” क्षणभर विचारात घ्या. काही वेळा कदाचित तुम्हालाही पुढील शब्द लिहिणाऱ्‍या स्तोत्रकर्त्या दावीदासारखेच वाटले असावे, तो लिहितो: “माझी कीव करणारा कोणी आहे की काय हे मी पाहिले, पण कोणी आढळला नाही; माझे कोणी समाधान करील म्हणून मी वाट पाहिली, पण कोणी आला नाही.” तथापि, तुमच्या परिस्थितीविषयी देवाला काळजी आहे याची तुम्ही खात्री बाळगू शकता; कारण नंतर याच स्तोत्रात दावीदाने लिहिले: “परमेश्‍वर दरिद्र्‌यांचे ऐकतो; बंदीत पडलेल्या आपल्या लोकांना तो तुच्छ मानीत नाही.”—स्तोत्र ६९:२०, ३३.

दावीदाच्या शब्दांचा खुलासा केल्यास आपण खात्री बाळगू शकतो की, जे लोक आपल्या दुःखांत जणू बंदिस्त होऊन पडले आहेत त्यांच्या प्रार्थना मनुष्याचा निर्माणकर्ता ऐकतो. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्यांची दैनावस्था पाहून त्याच्यावर परिणाम होतो. दुःखितांविषयी यहोवाला किती कळवळा आहे हे दाखवणारी खालील विधाने विचारात घ्या.

‘कोणा विधवेला किंवा पोरक्याला गांजू नका. तुम्ही त्यांना कोणत्याहि प्रकारे गांजिले आणि त्यांनी माझ्याकडे गाऱ्‍हाणे केले तर मी त्यांचे गाऱ्‍हाणे अवश्‍य ऐकेन; आणि माझा राग भडकेल.’—निर्गम २२:२२-२४.

“तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?”—लूक १८:७.

“कारण धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.”—स्तोत्र ७२:१२-१४.

‘जो कोणी तुम्हास [पृथ्वीवरील देवाच्या लोकांस] स्पर्श करील तो माझ्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील.’—जखऱ्‍या २:८.

आपला निर्माता त्याच्या लोकांच्या कल्याणात किती स्वारस्य बाळगून आहे हे या उदाहरणांवरून स्पष्ट होते. यामुळे, “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो,” या प्रेषित पेत्राच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आपल्याजवळ खात्रीलायक आधार आहे. (१ पेत्र ५:७) तथापि, दुःखमय काळात देव आपल्याला कशाप्रकारे मदत पुरवील?

देव दुःखितांना कशी मदत करतो

आपण पाहिल्याप्रमाणे, दावीदावर दुःख आले तेव्हा त्याने मार्गदर्शनासाठी देवाकडे मनःपूर्वक प्रार्थना केली. शिवाय, त्याने आपला पाठलाग करणाऱ्‍यांपासून जीव वाचवण्यासाठी चातुर्याचा उपयोग करून, आपली परिस्थिती सुसह्‍य करण्याच्या दिशेने स्वतःहून खटपट केली. अशा प्रकारे, यहोवावर विसंबून राहण्याव्यतिरिक्‍त, स्वतःहून प्रयत्न केल्यामुळे दावीदाला त्याच्यावर कोसळलेले संकट सहन करणे शक्य झाले. यातून आपल्याला कोणता धडा मिळतो?

आपल्यावर दुःख येते तेव्हा आपल्या समस्येची तड लावण्यासाठी स्वतःहून वाजवी प्रयत्न करण्यात निश्‍चितच काही गैर नाही. उदाहरणार्थ, एखादा ख्रिस्ती बेरोजगार झाल्यास, तो काम शोधण्याचा प्रयत्न करणार नाही का? किंवा तो एखाद्या शारीरिक व्याधीने ग्रासलेला असल्यास, तो वैद्यकीय मदत घेणार नाही का? खरे पाहता, सर्व प्रकारची दुखणीखुपणी बरी करण्यास समर्थ असलेल्या येशूने देखील मान्य केले की, ‘दुखणाइतांना वैद्याची गरज आहे.’ (मत्तय ९:१२; पडताळा १ तीमथ्य ५:२३.) अर्थात, काही दुःखे असाध्य असतात; सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. तथापि, काही लोकांच्या समजुतीप्रमाणे, दुःख सोसणे म्हणजेच सद्‌गुण आहे अशा दृष्टिकोनातून एक खरा ख्रिस्ती दुःखाबद्दल विचार करत नाही. (पडताळा १ राजे १८:२८.) उलट, तो आपल्या दुःखाला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.

तथापि, स्वतःच्या प्रयत्नांव्यतिरिक्‍त आपली समस्या यहोवा देवासमोर ठेवणे समंजसपणाचे आहे. का? पहिले कारण असे की, आपल्या निर्मात्यावर विसंबून राहिल्याने आपल्याला ‘श्रेष्ठ ते पसंत’ करण्यासाठी मदत मिळते. (फिलिप्पैकर १:१०) उदाहरणार्थ, नोकरी शोधताना, आपण देवावर प्रार्थनापूर्वक विसंबून राहिल्यास बायबल तत्त्वांशी खटकणारे काम न स्वीकारण्यास आपल्याला मदत मिळेल. याशिवाय, धनसंपत्तीच्या मोहापायी ‘विश्‍वासापासून बहकण्याचा’ धोका देखील आपण टाळू शकू. (१ तीमथ्य ६:१०) खरोखर, प्रपंचासंबंधाने असो किंवा जीवनाच्या आणखी कोणत्याही बाबतीत असो—महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी दावीदाच्या या सल्ल्याचा आपण अवश्‍य अवलंब करावा: “आपला भार परमेश्‍वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.”—स्तोत्र ५५:२२.

प्रार्थनेमुळे आपल्याला आपले मानसिक संतुलन कायम ठेवण्यासही मदत मिळते आणि यामुळे आपल्या दुःखामुळे आपण दडपून जात नाही. प्रेषित पौलाने लिहिले: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा.” याचा परिणाम? “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) होय, शांती, देवाने दिलेली शांती. ही शांती “सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे” असल्यामुळे आपण दुःखमय भावनांच्या दडपणाने खचून जातो तेव्हा ती आपल्याला सावरू शकते. ही शांती ‘आपली अंतःकरणे आणि आपले विचार राखील;’ अशा प्रकारे, ज्यांमुळे आपल्या दुःखात आणखी भर पडू शकते अशा उतावीळ आणि असमंजस कृती टाळण्यासाठी ती आपल्याला मदत करते.—उपदेशक ७:७.

प्रार्थनेचे चांगले परिणाम एवढ्यावरच संपत नाहीत. एखाद्या परिस्थितीत घटना कशा घडून येतात यावरही प्रार्थनेचा प्रभाव पडतो. बायबलमधील एक उदाहरण लक्षात घ्या. प्रेषित पौल रोममध्ये बंदिस्त होता तेव्हा त्याने सहख्रिश्‍चनांना आपल्यासाठी प्रार्थना करावयाचे उत्तेजन दिले. का बरे? त्याने त्यांना लिहीले, “तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे.” (इब्री लोकांस १३:१९) पौलाला ठाऊक होते की, त्याच्या सहविश्‍वासू बांधवांच्या निरंतर प्रार्थनांमुळे, त्याची केव्हा सुटका होणार यावर प्रभाव पडू शकत होता.—फिलेमोन २२.

प्रार्थनेमुळे तुमच्या दुःखाचा अंतिम परिणाम बदलेल का? कदाचित बदलेलही. तथापि, ही जाणीव असू द्यावी की यहोवा नेहमीच आपण अपेक्षा करतो त्याच पद्धतीने आपल्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही. उदाहरणार्थ, पौल ‘त्याच्या शरीरातल्या काट्याविषयी’ निरंतर प्रार्थना करत असे; ही कदाचित दृष्टिदोषाशी संबंधित असणारी शारीरिक समस्या असावी. पौलाचे हे दुःख काढून टाकण्याऐवजी, देवाने त्याला सांगितले: “माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्‍तपणातच शक्‍ति पूर्णतेस येते.”—२ करिंथकर १२:७-९.

तर काहीवेळा, आपल्यावर आलेली संकटे काढून टाकली जाणार नाहीत. उलट, त्यांमुळे आपल्याला आपल्या निर्मात्यावर भरवसा असल्याचे शाबीत करण्याची संधी मिळेल. (प्रेषितांची कृत्ये १४:२२) शिवाय, आपण खात्री बाळगू शकतो की यहोवाने दुःख जरी काढून टाकले नाही, तरीसुद्धा ‘[आपण] ते सहन करावयास समर्थ व्हावे, याकरता तो निभावण्याचा उपायही करील.’ (१ करिंथकर १०:१३) होय, “सर्व सांत्वनदाता देव . . . तो आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करितो,” हे काही यहोवाविषयी उगाच म्हणण्यात आलेले नाही. (२ करिंथकर १:३, ४) बऱ्‍याच प्रमाणावर आपली शांती कायम राखून, सहन करण्यासाठी जे आवश्‍यक ते तो पुरवतो.

लवकरच—दुःखविरहीत जग!

निर्माणकर्ता अभिवचन देतो की आपल्या राज्याच्या माध्यमाने तो लवकरच मनुष्याच्या दुःखांचे उच्चाटन करील. ते कसे काय? दुःखांचा मुख्य प्रवर्तक आणि शांतीचा आद्यशत्रू दियाबल सैतान याचा नाश करण्याद्वारे देव हे साध्य करील; बायबल त्याची ‘या युगाचा दैवत’ म्हणून ओळख करून देते. (२ करिंथकर ४:४) परंतु, लवकरच त्याचे मानवजातीवरील नियंत्रण संपेल. त्याचा नाश झाल्यामुळे देवाची भीड राखणाऱ्‍यांना असंख्य आशीर्वाद मिळणे शक्य होईल. बायबलच्या प्रतिज्ञेनुसार यहोवा, “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:१-४.

दुःखविरहित जगाची कल्पना अप्रतिम असली तरीही ती वास्तवात उतरणे अशक्य आहे असे तुम्हाला वाटते का? दुःख सहन करीत जगण्याची आपल्याला इतकी सवय झाली आहे की त्याचे अस्तित्वच नसेल हे मान्य करणे आपल्याला जड जाते. परंतु भय, चिंता आणि संकटांपासूनची मुक्‍तता देवाने निर्मीतीच्या वेळेस मानवासाठी उद्देशिले होते आणि त्याचा उद्देश खात्रीने पूर्ण होईल.—यशया ५५:१०, ११.

हीच आशा सुरवातीच्या लेखात उल्लेखलेल्या सोनिया, फाबियाना आणि आना यांना प्राप्त झाली. जिची दोन मुले एड्‌समुळे मरण पावली, त्या सोनियाला बायबलमध्ये दिलेल्या—धार्मिक आणि अधार्मिकांच्या पुनरुत्थानाच्या आशेतून मोठी शांती लाभली. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) ती म्हणते, “एक गोष्ट निश्‍चित, आपली आशा कोणत्याही दुःखापेक्षा बलवत्तर आहे.”

अनाथालयात राहतानाच, आनाकडे यहोवाच्या साक्षीदारांपैकी कोणीतरी आले. आना सांगते, “तिनं मला बायबलमध्ये यहोवाचं नाव दाखवलं, तेव्हा आनंदाने मला रडू आवरले नाही. मला मदतीची अत्यंत गरज होती, तेव्हा आपली काळजी वाहणारा एक देव आहे हे मला शिकायला मिळालं.” अनाथालय सोडल्यावर, आना बायबल अभ्यास करू लागली आणि तिला यहोवाच्या प्रतिज्ञांविषयी आणखी बरेच काही शिकायला मिळाले. नंतर, तिने यहोवाला आपले जीवन समर्पित केले आणि याचे द्योतक म्हणून बाप्तिस्मा घेतला. “तेव्हापासून मी प्रार्थनेकरवी नेहमी यहोवावर विसंबून राहिले आहे, तो माझी मदत करील या खात्रीमुळे मला सांत्वन लाभते.”

फाबियानालासुद्धा भविष्याविषयीच्या देवाच्या अभिवचनांविषयी शिकल्यामुळे तिच्या दुःखात बरेच सांत्वन आणि मानसिक शांती लाभली आहे. “बायबलमधून सत्य शिकल्यापासून मला भयाण अंधारातून बाहेर पडून लख्ख प्रकाश असलेल्या प्रसन्‍न वातावरणात पाऊल ठेवल्यासारखं वाटतं.”—पडताळा स्तोत्र ११८:५.

तथापि, शब्दशः अर्थाने सबंध पृथ्वीवर शांती कशी आणि केव्हा येईल? आपण पुढील लेखांत याविषयी पाहू.

[६ पानांवरील चौकट]

दुःखाच्या अनेकविध बाजू

▪ जगाच्या एकूण जनसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक अत्यंत गरिबीत दिवस कंठतात आणि लक्षावधी लोक त्यांच्या अस्तित्वाला धोकेदायक असणाऱ्‍या अपमानवी परिस्थितींत जगत आहेत.

▪ २० कोटीपेक्षा अधिक मुले अवपोषित आहेत.

▪ दरवर्षी अतिसारामुळे पाच वर्षांपेक्षा कमी वयाची जवळजवळ ३० लाख मुले दगावतात.

▪ संसर्गजन्य रोगांमुळे एकट्या १९९३ सालीच अंदाजे १.६५ कोटी लोकांचा मृत्यू ओढवला. काही देशांत रोगांचे वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने करत असल्यामुळे खरा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असावा.

▪ अंदाजे ५० कोटी लोकांना कोणत्या न कोणत्या प्रकारच्या मानसिक व्याधीने ग्रासलेले आहे.

▪ आणखी कोणत्याही वयोगटाच्या तुलनेत तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

▪ द युनेस्को कुरियर यातील विधानाप्रमाणे, “उपासमार आणि बेकारी हे जगाला कलंकित करणारे धब्बे आहेत. जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी सात देशांत ३.५ कोटी लोक बेकार आहेत आणि एकट्या ब्राझीलमध्ये दोन कोटी कामगारांच्या नोकऱ्‍या अशा आहेत की त्यांतून त्यांना पोटभर अन्‍नसुद्धा मिळू शकत नाही.”

[७ पानांवरील चित्र]

दुःखविरहित जग आणण्याची देवाची प्रतिज्ञा सतत नजरेपुढे ठेवण्यासाठी प्रार्थनेकरवी आपल्याला मदत मिळते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा