वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ३/१५ पृ. १७-२२
  • समजबुद्धी तुमचे रक्षण करो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • समजबुद्धी तुमचे रक्षण करो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • समजबुद्धीची खास गरज
  • पैसे गुंतवण्याविषयी काय?
  • जोखिमेचे व्यापार कोलमडतात तेव्हा
  • पण ठकबाजी झाली असल्यास काय?
  • समजबुद्धी आणि निर्णय घेणे
  • आपले अंतःकरण समजबुद्धीकडे लाव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • तुम्ही अधिक समजबुद्धी विकसित करू शकता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ‘यहोवा बुद्धी देतो’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुमच्या व्यापारामुळे तुम्हाला कोणती किंमत मोजावी लागेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ३/१५ पृ. १७-२२

समजबुद्धी तुमचे रक्षण करो

“विचारशीलता तुझे रक्षण करील, समजबुद्धी तुला संभाळील.”—नीतिसूत्रे २:११ [NW]

१. समजबुद्धी कशापासून आपले रक्षण करू शकते?

तुम्ही समजबुद्धीने वागावे अशी यहोवाची इच्छा आहे. का? कारण त्यामुळे विविध धोक्यांपासून तुमचे रक्षण होईल हे त्याला ठाऊक आहे. नीतिसूत्रे २:१०-१९ [NW] ची सुरवात या शब्दांनी होते: “कारण बुद्धी तुझ्या अंतःकरणात प्रवेश करील, आणि ज्ञान तुझ्या जिवाला रम्य वाटेल, विचारशीलता तुझे रक्षण करील, समजबुद्धी तुला संभाळील.” कशापासून तुम्हाला सांभाळील? “कुमार्गापासून,” सरळ मार्ग सोडून दिलेल्यांपासून आणि विपरीत वाटा असलेल्यांपासून.

२. समजबुद्धी काय आहे, आणि ख्रिस्ती कोणत्या प्रकारची समजबुद्धी इच्छितात?

२ समजबुद्धी ही मनाची क्षमता असून दोन गोष्टींमधील भेद दाखवून देते हे तुम्हाला आठवत असेल. समजूतदार व्यक्‍तीला कल्पना किंवा विविध गोष्टींमधील भेद कळतो आणि तिला उत्तम निर्णयशक्‍ती असते. ख्रिस्ती या नात्याने, देव वचनाच्या अचूक ज्ञानावर आधारित असलेली आध्यात्मिक समजबुद्धी मिळवण्याची आपली विशेषकरून इच्छा असते. आपण शास्त्रवचनांचा अभ्यास करतो तेव्हा जणू आपण आध्यात्मिक समजबुद्धीच्या वीटा उकरून काढत असतो. आपण ज्या गोष्टी शिकतो त्या आपल्याला यहोवाला संतुष्ट करणारे निर्णय घेण्यास मदत करतील.

३. आपण आध्यात्मिक समजबुद्धी कशी प्राप्त करू शकतो?

३ देवाने इस्राएलच्या राजा शलमोनाला कोणता आशीर्वाद हवा आहे असे विचारले तेव्हा, त्या तरुण शासकाने म्हटले: “यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास आज्ञाधारक अंतःकरण दे म्हणजे मला बऱ्‍यावाइटांचा भेद करता येईल.” शलमोनाने समजबुद्धी मागितली आणि यहोवाने असाधारण प्रमाणात त्याला ती देऊ केली. (१ राजे ३:९, NW; ४:३०) समजबुद्धी प्राप्त करायला आपण प्रार्थना केली पाहिजे, तसेच ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ पुरवण्यात येणाऱ्‍या बोधप्रद प्रकाशनांच्या मदतीने देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे. (मत्तय २४:४५-४७) ते आपल्याला, “समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे” होण्याइतपत आध्यात्मिक समजबुद्धी विकसित करण्यास मदत करील जेणेकरून आपण ‘चांगले आणि वाईट समजण्यास [किंवा त्यांमधील भेद जाणण्यास],’ समर्थ होऊ.—१ करिंथकर १४:२०; इब्री लोकांस ५:१४.

समजबुद्धीची खास गरज

४. “निर्दोष” डोळा असण्याचा काय अर्थ होतो, आणि त्याचा लाभ आपल्याला कसा होऊ शकतो?

४ योग्य समजबुद्धीसह आपण येशू ख्रिस्ताच्या शब्दांच्या एकवाक्यतेत कार्य करू शकतो: “तर तुम्ही पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व [भौतिक] गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) येशूने असेही म्हटले: “तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय. तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते.” (लूक ११:३४) डोळा हा लाक्षणिक दिवा आहे. “निर्दोष” डोळा सरळ, एकाग्र असतो. असा डोळा असल्यामुळे आपण समजबुद्धीने आणि आध्यात्मिकरित्या न अडखळता चालू शकतो.

५. व्यापारी मामल्यांविषयी ख्रिस्ती मंडळीच्या उद्देशाबद्दल आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

५ आपला डोळा निर्दोष ठेवण्याऐवजी काहींनी आकर्षक व्यापारी व्यवहारांमुळे स्वतःचे तसेच इतरांचेही जीवन गुंतागुंतीचे करून ठेवले आहे. पण, ख्रिस्ती मंडळी “सत्याचा स्तंभ व पाया” आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. (१ तीमथ्य ३:१५) इमारतीतील खांबांप्रमाणे मंडळी कोणाच्या व्यापाराला नव्हे तर देवाच्या सत्याला पाठिंबा देते. यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्या, व्यापारी कामकाज, मालाची विक्री करण्यासाठी किंवा व्यापारी सेवा चालवण्यासाठी स्थापण्यात आलेल्या नाहीत. राज्य सभागृहात व्यक्‍तिगत व्यापारविषयक व्यवहार आपण करू नयेत. यहोवाच्या साक्षीदारांची राज्य सभागृहे, मंडळीचे पुस्तक अभ्यास, संमेलने आणि अधिवेशने ही ख्रिस्ती सहवास आणि आध्यात्मिक चर्चा करण्याची ठिकाणे आहेत हे समजण्यास समजबुद्धी आपली मदत करते. आध्यात्मिक परिचयांचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या व्यापारासाठी करणे म्हणजे आध्यात्मिक मूल्यांबद्दल आपल्याला कदर नाही हे यावरून दिसून येत नाही का? आर्थिक फायद्यास्तव मंडळीतील परिचितांचा कधीही गैरफायदा घेतला जाऊ नये.

६. मंडळीच्या सभांमध्ये व्यापारी उत्पादनांची विक्री आणि सेवा सादर का करू नये किंवा विकत घेण्यास उत्तेजन का दिले जाऊ नये?

६ काहींनी आरोग्य साधने किंवा सौंदर्यप्रसाधने, व्हिटॅमिन उत्पादने, टेलीकम्युनिकेशन सेवा, बांधकाम साहित्य, पर्यटनविषयक योजना, कॉम्प्युटर प्रोग्रॅम आणि साहित्य वगैरेंची विक्री करण्यासाठी मंडळीतील परिचितांचा उपयोग केला आहे. तथापि, मंडळीच्या सभा, व्यापारी उत्पादने किंवा सेवा सादर करण्याचे अथवा विकत घेण्यास उत्तेजन देण्याचे स्थान नाही. येशूने “मेंढरे व गुरे ह्‍या सर्वांस मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाहि ओतून टाकला व चौरंग पालथे केले; आणि तो कबुतरे विकणाऱ्‍यांना म्हणाला, ही येथून काढून घ्या! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका!” हे आपल्या लक्षात असेल, तर त्यामागील तत्त्व आपण समजून घेऊ शकतो.—योहान २:१५, १६.

पैसे गुंतवण्याविषयी काय?

७. गुंतवणुकींबाबत समजबुद्धी आणि सावधगिरीची आवश्‍यकता का आहे?

७ जोखिमेच्या व्यापारात पैसे गुंतवण्याचा विचार करताना समजबुद्धी तसेच सावधगिरी यांची आवश्‍यकता आहे. समजा तुम्ही गुंतवणूक करावी अशी कोणाची इच्छा आहे आणि त्याने असे म्हटले: “तुम्ही यातून नक्कीच खूप पैसा कमवू शकाल.” “तुमचा तोटा होणार नाही. इथं तुम्हाला खात्री दिली जात आहे.” कोणी अशी आश्‍वासने दिल्यास सावध असा. एकतर त्याचा वास्तविक दृष्टिकोन नाही किंवा तो फसवेगिरी करणारा आहे कारण पैसे गुंतवण्याविषयी खात्री कधीच मिळत नसते. खरे पाहता, गुलुगुलु गोष्टी करणाऱ्‍या काही भामट्या लोकांनी मंडळीतल्या सदस्यांना फसवले आहे. यावरून पहिल्या शतकाच्या मंडळीत “अभक्‍तीने वागणारी माणसे” शिरली व त्यांनी ‘देवाच्या कृपेचा विपर्यास करुन कामातुरपणा’ चालू दिला ही गोष्ट लक्षात येते. ते, पाण्याखालील अणकुचीदार खडकांसमान होते ज्यांमुळे पोहणाऱ्‍यांच्या शरीराचे चिंधडे होऊन ते मरू शकत होते. (यहूदा ४, १२) ठकवणाऱ्‍यांचा उद्देश वेगळा असला, तरी तेसुद्धा मंडळीच्या सदस्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात.

८. फायदेकारक भासणाऱ्‍या काही व्यापारांसंबंधी काय घडले आहे?

८ सद्‌हेतू बाळगणाऱ्‍या ख्रिश्‍चनांनी देखील फायदेकारक वाटणाऱ्‍या जोखिमेच्या व्यापाराबद्दल काही माहिती इतरांना दिली, पण शेवटी त्यांच्या स्वतःचे व त्यांचे ऐकून गुंतवणूक केलेल्या इतरांचेही सर्व पैसे बुडाले. परिणामतः, मंडळीतल्या अनेक ख्रिश्‍चनांनी आपले विशेषाधिकार गमावले आहेत. रातोरात-श्रीमंत करणारे हे जोखिमेचे व्यापार फसवे निघतात तेव्हा, केवळ फसवणाऱ्‍याचाच फायदा होतो आणि तो देखील लागलीच पसार होतो. समजबुद्धी एखाद्याला अशा परिस्थितींतून कशी वाचवू शकते?

९. गुंतवणुकींबद्दलची आश्‍वासने कितपत खरी आहेत हे माहीत करून घेण्यासाठी समजबुद्धीची आवश्‍यकता का आहे?

९ अस्पष्ट गोष्टींना ओळखू शकणे म्हणजे समजबुद्धी होय. गुंतवणुकीविषयी केलेल्या प्रतिपादनांचा अंदाज काढण्यासाठी ही क्षमता आवश्‍यक आहे. ख्रिस्ती लोक एकमेकांवर भरवसा ठेवतात आणि आपले आध्यात्मिक बंधू अथवा बहिणी सहविश्‍वासूंच्या संपत्तीला धोक्यात टाकणारे जोखिमेचे व्यापार करणार नाहीत असा काहीजण कदाचित तर्क करतील. परंतु व्यापार करणारी व्यक्‍ती ख्रिस्ती आहे याचा अर्थ व्यापार करण्यात त्याचा हातखंडा आहे किंवा त्याचा व्यापार यशस्वी ठरेल अशी हमी मिळत नाही.

१०. काही ख्रिस्ती व्यापारासाठी सहविश्‍वासूंकडून कर्ज का घेतात, आणि अशा गुंतवणुकींचे काय होऊ शकते?

१० काही ख्रिश्‍चन सहविश्‍वासूंकडून व्यापारासाठी कर्ज घेतात कारण कर्ज देणाऱ्‍या नामवंत संस्थांकडून त्यांच्या जोखिमेच्या व्यापारांसाठी पैसा दिला जात नसतो. पैसे गुंतवल्यावर अगदीच थोडे काम करून किंवा बसल्याबसल्याच आपण श्रीमंत होऊ या विचाराने अनेकांची फसवणूक झाली आहे. काहीजण केवळ डामडौल पाहून आकर्षित होतात आणि गुंतवणूक करू पाहतात पण नंतर मात्र तेल गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे अशी त्यांची गत होते! एका ख्रिश्‍चनाने भरमसाट पैसा गुंतवला आणि केवळ दोन आठवड्यात आपल्याला त्यातील २५ टक्के नफा मिळेल अशी अपेक्षा धरली. पण कंपनीचे दिवाळे निघाल्याची घोषणा झाल्यावर त्याचे होते-नव्हते ते सारे पैसे बुडाले. दुसऱ्‍या एका जोखिमेच्या व्यापारात, एका बांधकाम कंत्राटदाराने मंडळीतील इतरांकडून मोठमोठ्या रकमा उसन्या घेतल्या. विश्‍वासही बसणार नाही इतका मोठा नफा मिळवून देण्याचे आश्‍वासन त्याने दिले, पण त्याचे दिवाळे निघाले आणि उसने घेतलेले सर्व पैसे बुडाले.

जोखिमेचे व्यापार कोलमडतात तेव्हा

११. पौलाने लोभ आणि द्रव्यलोभाविषयी कोणता सल्ला दिला?

११ व्यापार कोलमडल्यामुळे निराशा परिणीत झाली आहे आणि ज्या ख्रिश्‍चनांनी जोखिमेच्या व्यापारांमध्ये गुंतवणूक केली त्यांची तर आध्यात्मिकता सुद्धा कोलमडली. समजबुद्धीला संरक्षण न करू दिल्याने हृदयभंग आणि कटुता परिणीत झाली आहे. लोभाने पुष्कळांना पाशात अडकवले आहे. “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे . . . लोभ [ह्‍याचे] तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.” (इफिसकर ५:३) तसेच त्याने इशाराही दिला: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.

१२. ख्रिश्‍चनांनी एकमेकांशी व्यापार केल्यास, विशेषतः काय लक्षात ठेवले पाहिजे?

१२ एखादा ख्रिस्ती द्रव्याचा लोभ करू लागला, तर त्याचे पुष्कळ आध्यात्मिक नुकसान होईल. परूश्‍यांना पैशांची हाव होती आणि शेवटल्या काळात अनेकांचे हेच गुणलक्षण आहे. (लूक १६:१४; २ तीमथ्य ३:१, २) त्याउलट, एखाद्या ख्रिश्‍चनाची जीवनशैली, “द्रव्यलोभावाचून” असावी. (इब्री लोकांस १३:५) अर्थात, ख्रिस्ती एकमेकांसोबत व्यापार करू शकतात किंवा एकत्र मिळून एखादा धंदा सुरू करू शकतात. परंतु तसे असल्यास, व्यापारविषयक चर्चा आणि व्यवहार मंडळीच्या गोष्टींपासून वेगळ्या असाव्यात. त्याचप्रमाणे लक्षात असू द्या: आध्यात्मिक बांधवांसोबत देखील, व्यापारविषयक करार नेहमी लेखी असावेत. याबाबतीत, सावध राहा! (इंग्रजी), फेब्रुवारी ८, १९८३, पृष्ठ १३ ते १५ वर प्रकाशित झालेला “व्यवहार लेखी ठेवा!” हा लेख मदतदायी ठरेल.

१३. तुम्ही नीतिसूत्रे २२:७ हे वचन, व्यापाराच्या बाबतीत कसे लागू कराल?

१३ नीतिसूत्रे २२:७ आपल्याला सांगते: “ऋणको धनकोचा दास होतो.” स्वतःला किंवा आपल्या बांधवाला अशाप्रकारचा दास बनवणे बहुधा सुज्ञतेचे नसते. कोणा व्यक्‍तीने व्यापारासाठी आपल्याजवळ पैसे मागितले, तर पैसे परत करण्याची त्याची किती ताकद आहे याचा विचार करणे योग्य असेल. तो विश्‍वसनीय आणि भरवसालायक आहे का? अशारितीने, पैसे उधार दिल्यावर पैसे बुडू शकतात कारण पुष्कळसे जोखिमेचे व्यापार ठप्प होतात हे आपण ओळखले पाहिजे. आपापसात करार झाला आहे म्हणजे व्यापार चालेल अशी काही खात्री नसते. त्याचप्रमाणे, अंथरूण पाहून पाय पसरणे सुज्ञपणाचे ठरेल.

१४. आपण एखाद्या सह-विश्‍वासू ख्रिश्‍चनाला पैसे उसने दिले आणि त्याचा व्यापार ठप्प झाला तर समजबुद्धी दाखवण्याची का गरज आहे?

१४ आपण कोणा ख्रिस्ती व्यक्‍तीला व्यापारासाठी पैसे उसने दिले आणि ते पैसे बुडाले पण हा फसवेगिरीचा मामला नसला, तर समजबुद्धीने वागण्याची आवश्‍यकता आहे. आपल्याकडून उधारीने पैसे घेतलेल्या सहविश्‍वासूमुळे जर व्यापारात नुकसान झाले नाही, तर आपल्याला धोका दिला असे आपण म्हणू शकतो का? नाही, कारण आपण स्वतःहून कर्ज देऊ केले, कदाचित आपण त्यावरील व्याजही घेत असू आणि म्हणून कोणतीही अप्रामाणिकता घडलेली नाही. फसवेगिरी झाली नसल्यामुळे, उसने पैसे घेणाऱ्‍याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्याकडे कोणताही आधार नाही. सद्‌हेतूने सुरू केलेला व्यापार कोलमडल्यामुळे, दिवाळे निघाल्याचे सह-ख्रिश्‍चनाला नोंदावे लागले असल्यास, त्या प्रामाणिक ख्रिश्‍चनाविरुद्ध खटला भरून तरी काय फायदा होणार आहे?—१ करिंथकर ६:१.

१५. दिवाळखोरीची घोषणा झाली असल्यास कोणत्या गोष्टींचा विचार करण्यात यावा?

१५ काहीवेळा ज्यांना व्यापारात तोटा होतो ते दिवाळे निघाले असे सांगून मोकळे होतात. ख्रिश्‍चन, कर्ज घेण्याला क्षुल्लक समजत नसतात म्हणून विशिष्ट कर्जांमधून कायदेशीरपणे सुटका मिळाली असतानाही जर धनकोंनी रक्कम स्वीकारण्याची इच्छा दाखवली तर रद्द केलेल्या रकमा फेडण्यास आपण बांधील आहोत असे काहींना वाटले आहे. पण ऋणको, आपल्या बांधवाचे पैसे बुडवल्यानंतरही चैनीने राहत असल्यास काय? किंवा पैसे फेडण्यासाठी ऋणकोला पुरेसा पैसा मिळाला पण आपल्या बंधूचे कर्ज फेडण्याच्या नैतिक कर्तव्याकडे त्याने दुर्लक्ष केल्यास काय? मग मंडळीत जबाबदार पदावर सेवा करण्यास ऋणकोच्या योग्यतेविषयी शंका निर्माण होऊ शकेल.—१ तीमथ्य ३:३, ८; पाहा टेहळणी बुरूज सप्टेंबर १५, १९९४, पृष्ठ ३०-१.

पण ठकबाजी झाली असल्यास काय?

१६. आपल्याला व्यापारात ठकवल्यास कोणती पावले उचलली जाऊ शकतात?

१६ सर्व प्रकारच्या गुंतवणुकीतून लाभ मिळत नसतो हे समजून घेण्यास समजबुद्धी आपली मदत करते. पण ठकबाजी झाली असल्यास काय? ठकबाजी म्हणजे, “फसवेगिरी अथवा चालीचा मुद्दामहून उपयोग करून किंवा सत्याचा विपर्यास करून एखाद्या व्यक्‍तीला स्वतःची मौल्यवान वस्तू किंवा आपला कायदेशीर हक्क सोडण्यास भाग पाडणे.” आपल्याला आपल्या सह-उपासकाने ठकवले असे कोणा व्यक्‍तीला वाटल्यास येशू ख्रिस्ताने त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन दिले आहे. मत्तय १८:१५-१७ नुसार येशू म्हणाला: “तुझ्या भावाने तुझा अपराध केला, तर त्याच्याकडे जा, तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध त्याला दाखीव. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळविलास असे होईल. परंतु त्याने जर न ऐकले तर तू आणखी एका-दोघास आपणाबरोबर घे; अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा. आणि जर त्याने त्यांचे न ऐकले तर मंडळीला कळीव आणि जर त्याने मंडळीचेहि न ऐकले तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्‍यांच्यासारखा होवो.” यानंतर येशूने दिलेल्या दृष्टान्तावरून स्पष्ट होते की, ठकबाजी झालेल्या कोणा आर्थिक मामल्यासंबंधीचे अपराध त्याच्या मनात होते.—मत्तय १८:२३-३५.

१७, १८. ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या कोणा व्यक्‍तीने आपल्याला ठकवल्यास, समजबुद्धी आपले रक्षण कशी करू शकते?

१७ अर्थात, ठकबाजी झाल्याचा पुरावा नसला किंवा अप्रत्यक्षरित्या देखील तसे सूचित झाले नसले, तर मत्तय १८:१५-१७ येथे दिलेली पावले उचलण्यास शास्त्रवचनीय आधार असू शकत नाही. परंतु, ख्रिस्ती म्हणविणाऱ्‍या कोणा व्यक्‍तीने आपल्याला ठकवले तर काय? मंडळीचा नावलौकिक खराब होईल अशी कारवाई करण्यापासून समजबुद्धी आपले रक्षण करील. आपल्या बांधवाला न्यायालयात खेचण्याऐवजी सह-ख्रिश्‍चनांनी अन्याय किंवा ठकबाजी सहन करावी असा सल्ला पौलाने दिला.—१ करिंथकर ६:७.

१८ आपले खरे बंधू व बहिणी बर्येशू जादूगाराप्रमाणे “सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने” भरलेले नाहीत. (प्रेषितांची कृत्ये १३:६-१२) म्हणून सहविश्‍वासूंचा सहभाग असलेल्या व्यापारांमध्ये पैसे बुडल्यावर आपण समजबुद्धीने कार्य करू या. कायदेशीर कारवाई करण्याचा विचार आपण करत असल्यास, स्वतःवर, दुसऱ्‍या व्यक्‍तीवर किंवा व्यक्‍तींवर, मंडळीवर आणि बाहेरच्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल हे लक्षात घ्यायला हवे. भरपाई करण्याच्या मागे लागून कदाचित आपला वेळ, आपली शक्‍ती आणि इतर गोष्टी देखील वाया जातील. त्यामुळे केवळ वकील आणि इतर पेशेवाईकांचेच खिसे भरतील. दुःखाची गोष्ट अशी की, काही ख्रिश्‍चनांनी या गोष्टींमध्ये अति लक्ष घालून आपले ईश्‍वरशासित विशेषाधिकार गमावले आहेत. अशारीतीने विकर्षित होण्यामुळे सैतान आनंदी होतो, पण आपल्याला मात्र यहोवाचे मन आनंदित करायचे आहे. (नीतिसूत्रे २७:११) दुसऱ्‍या बाजूला पाहता, तोटा आपल्या पदरी घेतल्याने आपल्याला पुष्कळ दुःखापासून सुटका मिळू शकते आणि आपला तसेच वडिलांचा अधिक वेळही वाचू शकतो. त्यामुळे मंडळीची शांती टिकवण्यास मदत मिळेल आणि प्रथम राज्य मिळवण्याचा यत्न करायलाही आपण समर्थ होऊ.

समजबुद्धी आणि निर्णय घेणे

१९. आपण कठीण निर्णय घेतो तेव्हा आध्यात्मिक समजबुद्धी आणि प्रार्थना आपल्याकरता काय करू शकतात?

१९ आर्थिक किंवा व्यापारविषयक निर्णय घेणे अतिशय कठीण असू शकते. परंतु, आध्यात्मिक समजबुद्धी आपल्याला साधकबाधक विचार करण्यास आणि सुज्ञ निर्णय घेण्यास साहाय्य करील. शिवाय, यहोवावर प्रार्थनापूर्वक विसंबून राहिल्याने “देवाने दिलेली शांति” आपल्याला मिळेल. (फिलिप्पैकर ४:६, ७) ही, यहोवासोबतच्या निकट व्यक्‍तिगत नातेसंबंधातून परिणीत होणारी शांतता आणि स्थिरता आहे. निश्‍चितच, आपल्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात तेव्हा ही शांती आपल्याला संतुलन राखण्यास मदत करू शकते.

२०. व्यापारी मामले आणि मंडळीच्या बाबतीत आपला कोणता दृढसंकल्प असण्यास हवा?

२० व्यापारविषयक वादविवादांमुळे आपल्या किंवा मंडळीच्या शांतीत भंग होऊ नये असा दृढसंकल्प आपण करू या. ख्रिस्ती मंडळी, व्यापारी मामल्यांचे केंद्र नसून आध्यात्मिकरित्या आपली मदत करण्यासाठी कार्य करते हे लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे. व्यापारविषयक मामले, मंडळीच्या कार्यहालचालींपासून नेहमी वेगळे ठेवले जावेत. व्यापार सुरू करताना आपण समजबुद्धीने आणि सावधगिरीने कार्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे, आपण सतत अशा या व्यवहारांसंबंधी संतुलित दृष्टिकोन बाळगून राज्य हितांना प्राधान्य देत राहू या. सह-उपासकांचा सहभाग असलेला व्यापार निष्फळ ठरलाच, तर सर्व संबंधितांकरता जे उत्तम ठरेल तेच आपण करण्याचा प्रयत्न करू या.

२१. समजबुद्धीने वागून आपण फिलिप्पैकर १:९-११ मधील वचनाच्या एकवाक्यतेत कसे कार्य करू शकतो?

२१ पैशांविषयी आणि इतर कम-महत्त्वाच्या मामल्यांची जास्त चिंता करत बसण्याऐवजी आपण सर्वजण समजबुद्धीकडे आपले मन लावू या, देवाच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना करू या आणि राज्य हितांना प्राधान्य देऊ या. पौलाच्या प्रार्थनेच्या एकवाक्यतेत, ‘आपली प्रीति अचूक ज्ञानाने व पूर्ण समजबुद्धीने वाढावी असे की, ज्या अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांची खात्री आपण करावी आणि दुसऱ्‍यांना’ व स्वतःला अडखळण करू नये. आता राजा ख्रिस्त, आपल्या स्वर्गीय सिंहासनावर बसलेला असताना आपण जीवनाच्या प्रत्येक पैलूत आध्यात्मिक समजबुद्धी प्रदर्शित करू या. तसेच ‘देवाचे अर्थात सार्वभौम प्रभू यहोवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने आपण भरून जावे.’—फिलिप्पैकर १:९-११.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ समजबुद्धी काय आहे?

◻ ख्रिश्‍चनांमध्ये व्यापारविषयक व्यवहारांविषयी समजबुद्धी दाखवण्याची खास आवश्‍यकता का आहे?

◻ एखाद्या सहविश्‍वासूने आपल्याला ठकवले आहे असे वाटल्यास, समजबुद्धी आपली मदत कशी करू शकते?

◻ निर्णय घेण्याच्या बाबतीत समजबुद्धीची काय भूमिका असावी?

[१८ पानांवरील चित्र]

प्रथम राज्य मिळवण्यास झटा, हा येशूचा सल्ला अंमलात आणण्यास समजबुद्धी आपले साहाय्य करील

[२० पानांवरील चित्र]

व्यापारविषयक व्यवहार नेहमी लेखी स्वरूपात ठेवा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा